बुधवार, २६ नोव्हेंबर, २००८

शिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.

शहाजीराजे भोसले हे २ 3 जानेवारी १६६४ रोजी कर्नाटकात होदिगेरी या ठिकाणी घोड्यावरून पडून मृत्यू पावले। राजगडावर मातु:श्री जिजाबाईसाहेब सती जाण्यास सिद्ध झाल्या. पण मोठ्या मुश्कीलीने शिवाजीराजांनी आपल्या आईस सती जाण्यापासून माघारा फिरविले. या दिवसापासून शिवाजीमहाराज आठ महिने सतत आईच्या सहवासात राहिले. स्वत:चे आणि आईचेही दु:ख निवविण्याचा हा महाराजांचा प्रयत्न होता. ते आईला कुलदेवतेच्याच ठिकाणी मानीत असत.
शहाजीराजांची समाधी शिमोग्याजवळ होदिगेरी येथे त्याचवेळी व्यंकोजीराजांनी बांधली. हे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ. त्यांनीच राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली. शहाजीराजांच्या समाधीवर ' श्री शाजीराजन समाधि ' असा लेख कोरलेला आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर महाराजांनीही राजगडावर विपुल दानधर्म केला। आईवडिलांच्या बाबतीत महाराजांचं मन अतिशय नम्र होतं. नितांत श्रद्धावंत होतं. पूवीर् एकदा (इ. १६४९ मे-जून) शहाजीराजांच्याच पत्रामुळे कोंढाणा उर्फ सिंहगड हा मोलाचा किल्ला आदिलशाहस देऊन टाकण्याची वेळ महाराजांवर आली. स्वराज्यातला तळहाताएवढाही प्रदेश शत्रूच्या ताब्यात जाण्याची वा देण्याची वेळ आली तर महाराजांना अतोनात वेदना होत असत. इथं तर सिंहगडसारखा किल्ला वडिलांच्या चुकीमुळे , बेसावधपणामुळे बादशाहला द्यावा लागतोय याच्या वेदना आणि तेवढाच वडिलांच्यावरती राग महाराजांच्या मनात उफाळून आला. आणि ते शहाजीराजांच्याबद्दल रागावून कडू बोलले. पण क्षणातच त्यांनी स्वत:ला सावरलं आणि जरी वडील चुकले असले , तरी वडिलांच्याबद्दल असे कडू बोलणे योग्य नाही याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी सोनो विश्वनाथ डबीर यांच्यापाशी आपले व्याकूळ दु:ख आणि पश्चाताप व्यक्तही केला. यावरून आणि इतरही काही चारित्र्याची जडणघडण कशी झाली याची आपल्याला कल्पना येते.
इथं आणखीन एक गोष्ट लक्षात येते , ती जिजाबाई आऊसाहेबांच्या बद्दलची। या आईने आपल्या शिवबांवर अगदी सहजपणे दोन संस्कार केलेले दिसून येतात. त्यातला पहिला संस्कार शहाजीराजांच्या बाबतीतला. तिने आपल्या मुलापाशी शहाजीराजांच्या हातून घडलेल्या राजकीय चुकांबद्दल कधीही टीका आणि कठोर दोषारोप केलेले आढळून येत नाहीत. अन् दुसरी गोष्ट म्हणजे शत्रूपक्षातीलही कोणत्याही धर्माच्या वा जातीच्याबाबत कडवट द्वेषभावना निर्माण होऊ दिली नाही. तशी एकही नोंद उपलब्ध नाही. ती महाराजांना , ' या अफझलखानाला ठार मार ' असं म्हणते पण तो मुसलमान आहे म्हणून त्याला ठार मार असा भाव त्यात अजिबात दिसत नाही. जातीधर्मद्वेषाच्या पार पलिकडे गेले ही मायलेकरे आमच्या इतिहासात दिसून येतात. जिजाऊसाहेबांची ही शिकवण म्हणजे मराठी इतिहासातील एक पवित्र अध्याय आहे. त्यावर अशा चार ओळी लिहून भागणार नाही. विस्मृत प्रबंधच लिहावयास हवा.
या वषीर्चा ( इ। १६६४ ) पावसाळा संपत आला आणि ऑक्टोबरच्या प्रारंभीच्या महाराजांना विजापुरकडची खबर मिळाली की , खवासखान या सरदारास बेळगांवमागेर् कोकणात कुडाळ भाग शिवाजीराजांकडून जिंकून शाही अमलाखाली आणण्याकरिता मोठ्या सैन्यानिशी कूच करण्याचा हुकुम झाला आहे. खानाबरोबर मुधोळहून बाजी घोरपडे यांनाही जाण्याचा हुकुम सुटला आहे.
हे बाजी घोरपडे बादशाहचे निष्ठावंत सेवक। आणि म्हणूनच स्वराज्याचे शत्रू बनले होते. त्यांनीच पूवीर् शहाजीराजांना बेड्या घालून कैद केले होते. या सर्व गोष्टींचा राग जिजाऊसाहेबांच्या आणि महाराजांच्या मनात सतत धुमसत होता. वडिलांचे चिरंजिवांस तर सांगणे होते की , ' बाजी घोरपडे यांचे वेढे घ्यावेत ' वेढे म्हणजे सूड.
आईवडिलांची ही इच्छा आणि स्वराज्यातीलच एक कठोर कर्तव्य म्हणून महाराजांनी याचवेळी (ऑक्टोबर १६६४ ) राजगडावरून तडफेने कूच केले। बाजी मुधोळहून खवासखानास सामील होण्याच्या आतच त्यांनी मुधोळवरच धडक मारली. या अचानक छाप्यात बाजी घोरपडे महाराजांचे हातून ठार झाले. वर्षाच्या आतच महाराजांनी वडिलांची इच्छा पूर्ण केली. हा मुधोळवरील महाराजांचा छापा लष्करी दृष्टीनेही अतिशय अभ्यास करण्यासारखा आहे. हाही एक प्रबंधाचा विषय आहे. या छाप्याने विजापूर हादरले. कारण मुधोळ ते विजापूर हे अंतर फार कमी आहे. याचा दुसरा अर्थ असा होता की , शहाजीराजांच्या मृत्यूनंतर महाराजांनी थेट विजापुरच्या वेशीपर्यंत धडक मारली होती. महाराजांच्या या सगळ्या लष्करी वेगांचा अभ्यास केला , तर असा गतीमान सेनापती भारतात तर सापडत नाहीच , पण युरोपिय इतिहासातही कोणी दिसत नाही. थोडा फार नेपोलियनच महाराजांच्या जवळपास येऊ शकतो.
मुधोळवरच्या छाप्यानंतर महाराजांनी थेट कुडाळ-सावंतवाडीवर दौड घेतली आणि तेथे येऊन बसलेल्या खवासखानावर त्यांनी हल्ला चढविला. खानाचा पूर्ण पराभव झाला. राजगड ते विजापूर ते मुधोळ ते कुडाळ ही अंतरे नकाशात पाहिली की आणि कमीतकमी वेळात महाराजांनी मारलेली यशस्वी दौड पाहिली की माझे वरील विधान वाचकांच्या लक्षात येईल.
या कुडाळ स्वारीत एकच गोष्ट महाराजांना जाणवली असेल की , खवासखानाच्या फौजेत व्यंकोजीराजे भोसले हे आपले भाऊ आपल्याविरुद्ध लढावयास उभे आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर दोन भाऊ एकमेकांच्या विरुद्ध शत्रू म्हणून उभे राहावेत हे आमच्या वाट्याला वाढून ठेवलेले कायमचेच दुदैर्व आहे. खवासखान आणि व्यंकोजीराजे पराभूत झाले ; अन् सुखरूप विजापुरास सुखरूप पोहोचले.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी! झेड सिक्युरिटी!

सुरतेच्या मोहिमेत ८ जाने. १६६४ रोजी इनायतखानाने महाराजांकडे वकील म्हणून एक मारेकरीच पाठविला , हे आपण पाहिले। महाराजांच्याकरिता मावळ्यांनी जी सुरक्षा ठेवली होती ती लक्षात घेण्यासारखी आहे. अशी व्यवस्था महाराजांच्याभोवती ठेवणं हा त्यांच्या सौंगड्यांचा अंगीभूत सहज स्वभावच बनला होता. दगा करणं हा शत्रूचा स्वभावच असतो. शत्रू फक्त संधी साधत असतो. महाराजांचं संरक्षण करणं हा मावळी डोळ्यांचा आणि हातांचा अगदी घारींसारखा स्वभावधर्मच झालेला दिसून येतो. अफझलखानाच्या भेटीच्या वेळी शामियान्यात जिवा महाला सकपाळ हा जर सावध राहिला नसता तर ? घातच. सुरतेच्या मारेकऱ्यानेही वकीलीचे नाटक करीत करीत महाराजांवर एकदम अचानक झडप घातली. जर जवळचे मावळे सावध नसते तर ? घातच. पुढे आग्ऱ्याच्या कैदेतही याच मावळ्यांचा अबोल पहारा महाराजांभोवती होता. पुढे जालन्याच्या स्वारीतच (इ. १६७९ ) महाराजांच्या अंगात फणफणून ज्वर चढला. त्यावेळी केसरीसिंह आणि मोहकमसिंह हे अचानक मराठ्यांवर हल्ला करावयास आले. अशा आजारपणात महाराजांचं रक्षण करणं , त्यांना सुरक्षित ठिकाणी नेणं अवघड होतं. बहिजीर् नाईकाने महाराजांना आपल्या पाठीवर घेऊन पट्टा नावाच्या किल्ल्यावर सुखरूप पोहोचवलं. महाराजांची ही सिक्युरिटी भोवतीच्या सौंगड्यांनी उत्कृष्ट सांभाळली. त्यात उत्तम नोकरी करणे या गोष्टीपेक्षा कडव्या निष्ठेने राजा राखणे हाच भाग जास्त दिसून येतो. वास्तविक ' महाराजांचा दरबार तो सर्वांस सहज ' असा लौकीक होता. म्हणजे महाराजांना कोणीही भेटू शकत असे. पण याचा अर्थ भोंगळ बेसावधपणा असा नव्हता.
आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किती तरी थोर व्यक्ती घातपाताने मारल्या गेल्या। कोणाकोणाचा मृत्यू संशयास्पद घडला. उदाहरणार्थ डॉ. श्यामाप्रसाद मुखजीर् , लाल बहादूर शास्त्री , महात्मा गांधी , इंदिराजी , राजीव गांधी , जनरल अरुणकुमार वैद्य , पं. दिनदयाळजी या थोरांच्या मृत्युचे दु:ख आपणास आहे. जगाच्या पाठीवर असे प्रकार घडतच आले आहेत. त्याबाबतीत जास्तीतजास्त दक्षता घेऊन सुरक्षाव्यवस्था ठेवणे एवढेच आवश्यक आहे , असे म्हणता येते.
पण शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जी सिक्युरिटी त्यांच्या खाश्या मित्रांनी ठेवली ती निश्चितच उद्बोधक आहे. महाराज अंगात वेळप्रसंगी चिलखत घालीत असत. कधी पोलादी चिलखत , कधी कापडी चिलखत. त्याला बख्तर असा शब्द आहे. पण त्यांचं सर्वात मोठं चिलखत आणि अभेद्य शिरस्त्राण म्हणजे त्यांचे निधड्या छातीचे मावळे. या मावळ्यांनीच ही हृदयातील ठेव प्राणापलिकडे जपली.
मराठ्यांच्या पुढील इतिहासात घातपाताचे प्रसंग अनेक आहेत। सेनापती संताजी घोरपडे , सेनाधुरंधर संताजी भोसले अमरावतीकर , नारायणराव पेशवे , जयाप्पा शिंदे , वकील महादेव भट हिंगणे , वकील धर्मराव तमाजी गलगलीकर इत्यादी राजकारणी व्यक्तींचे खून पडले. त्यामुळे राजकीय उलथापालथीही झाल्या. त्याचा अभ्यास केला तर या सिक्युरिटीचे महत्त्व लक्षात येते. सिक्युरिटी हा थट्टेचा , विनोदाचा विषय नाही. ती अत्यंत गरजेची गोष्ट आहे. समर्थांनी तर असे म्हटले आहे की , महत्त्वाच्या राजकीय नेत्यांनी आपला जीव धोक्यात घालणे हे योग्य नाही. ' धुरेने युद्धासी जाणे , ही तो नव्हे राजकारणे. ' स्वत:ची अतिशय दक्षता घेणे म्हणजे भेकडपणा असा अर्थ कुणी लावू नये.
पेशवाईत गारद्यांनी नारायणरावष्श्ा पेशव्यांवर खुनी हल्ला केला। ऐन शनिवारवाड्यातच पेशवा मारला गेला. पण त्यांच्याआधी सदाशिवराव भाऊ पेशवा , नानासाहेब पेशवा , माधवराव पेशवा यांच्यावरही मारेकऱ्यांनी अचानक खुनी हल्ले केले होते हे सरदारांना माहित नव्हते का ? राजघराण्यांना तर ही भीती नेहमीच असते. शनिवारवाड्यात एका पेशव्याचाच खून झाला , तसाच कोल्हापुरात राजवाड्यात प्रत्यक्ष एका छत्रपती महाराजांचाच खून झाला. हे ऐतिहासिक सत्य आहे. यातून योग्य तो बोध घेणं आवश्यक आहे. राजकीय खून केवळ हत्यारांनेच केले गेले असे नाही , तर खाण्यापिण्याच्या पदार्थातूनही केले गेले आहेत.
चाणक्याच्या काळात खून करण्याचा एक विलक्षणच प्रकार ' मुदाराक्षस ' या नाटकांत , विशाखदत्त या नाटककाराने नमूद केला आहे. तो प्रकार म्हणजे ' विषकन्या '.
आजच्या काळातील एड्सपेक्षाही या विषकन्येचा प्रयोग भयंकर आहे. अशा विषकन्येशी शारीरिक संबंध ज्याचा येईल , तो मरणारच. म्हणूनच त्या स्त्रीला विषकन्या म्हणत.
एकूण खून पाडण्यातही खूप व्हरायटी आहे. ती भयंकर असली तरी मनोरंजक आहे. पण राजकीय आणि सामाजिक जबाबदारी ज्यांच्या शिरावर आली आहे , त्यांनी राष्ट्राच्या आणि समाजाच्या हिताकरीता स्वत:ची सुरक्षितता ठेवणं हे अत्यंत मोलाचे काम आहे. टॉप सिक्युरिटी , झेड सिक्युरिटी , स्वयंसिक्युरिटी.
कोल्हापूरच्या चौथ्या शिवाजी महाराज छत्रपतींना इंग्रजांनी वेडे ठरवून अहमदनगरच्या किल्ल्यात कैदेत ठेवले. त्या कैदेत छत्रपती महाराजांना इंग्रज अधिकाऱ्याने अतिशय वाईट रितीने ठार मारले. इथे महाराज अगतिकच होते. पण स्वामी श्रद्धानंदासारख्या संन्याशाचा खून झाला , तो संरक्षक दक्षता न घेतल्यामुळे. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजे भोसले घराण्यांत अनेक घातपाती प्रकार झाले , तो सिक्युरिटी न ठेवल्यामुळेच शत्रूंनी डाव साधले. शिवछत्रपती हे एकच असे नेते होते की , ते शत्रूच्या झडपेत कधीच सापडले नाहीत.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.

शाहिस्तेखानवरच्या छाप्याच्या बातम्या औरंगजेबास तपशीलवार समजल्या। त्याचा संताप वाढतही राहिला। आता या सीवाच्याविरुद्ध नेमके कोणते पाऊल टाकावे याचा विचार तो करीत होता , तेवढ्यात सुरतेवरती महाराजांचा छापा आणि सुरतेची बदसुरत कशी झाली आहे याचाही तपशील त्याला दिल्लीत समजला. त्याच्या संतापात भर पडली. पण अभ्यासात भर पडलेली दिसत नाही. या सगळ्याच मोगलांचा अभ्यास अगदी शून्य वाटतो. खूप मोठं सैन्य , तोफखाना , खजाना , हत्ती आणि अफाट युद्धसाहित्य याच गोष्टींवर या दिल्ली दरबारचा प्रचंड विश्वास होता. मराठ्यांवर नवी मोहिम काढायची म्हणजे या सर्व सार्मथ्यात आणखी वाढ करायची हाच यांचा अभ्यास आणि निर्णय. ' शिवाजी ' हे प्रकरण औरंगजेबास कधीच समजले नाही.
खरोखर ' शिवाजी ' हे प्रकरण आजही २१ व्या शतकात जर खरंच समजले , तर काय होईल ? पं। जवाहरलाल नेहरू म्हणाले , ' जगाच्या पाठीवर जर कोणाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल आणि ते बळकट अन् समृद्ध करायचे असेल तर (त्या राष्ट्राने वा समाजाने) छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास (अन् अनुकरणही) करावयास हवे. '
प. नेहरू यांनी या पूर्ण आशयाचे उद्गार नागपूर येथे धनवटे बिल्डींगवर शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले , त्या प्रसंगी काढले.
महाराज सुरतेहून निघाले. सह्यादीचा घाट चढून ते नासिक जिल्ह्यात पोहोचले. तेथून घाटमाथ्याने राजगडकडे निघाले.
याच काळात म्हणजे दि. २ 3 जाने. १६६४ रोजी महाराजांचे तीर्थरूप शहाजीराजे हे कर्नाटकात शिमोग्याजवळ होदीगेरी या ठिकाणी घोड्यावरून दौडत असता अपघात होऊन पडले. मृत्यू पावले. ही दु:खद खबर दि. ५ फेब्रु. १६६४ यादिवशी राजगडावर पोहोचली.
थोडासा तपशील असा महाराज सुरतेच्या लुटीसह फेब्रुवारी प्रारंभी लोणावळ्याच्या पुढे पोहोचले। तेवढ्यात (बहुदा 3 फेब्रुवारीस) महाराजांना छबिन्याच्या हशमांनी पुण्याकडची खबर कळविली असावी की , मोगलांची फौज पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने येत आहे. महाराजांनी ताबडतोब सर्व लूट नेताजी पालकरांबरोबर शेजारच्याच लोहगडावर सुरक्षिततेकरिता पाठविली. मोगल अंगावर येत आहेत हे पाहून महाराजांनी वडगावजवळ मोगलांची वाट अडविण्याकरिता नारो बापूजी देशपांडे नऱ्हेकर या आपल्या सरदारांस सांगाती सैन्य देऊन पाठविले. महाराज उरवडे , घोटवडे , तव , मुठाखिंड , मोसे , पानशेत , खामगांव खिंड या राजगडमार्गाने पुढे गेले. वडगांवपाशी नारो बापूजी देशपांडे याच्या सेनेची मोगलांशी गाठ पडली. या लढाईत नारो बापूजी ठार झाला. पण मोगलांना काहीच साध्य झाले नाही. शिवाजीराजे राजगडकडे गेले , लूट लोहगडावर बंदोबस्तात पोहोचली.
महाराज खामगावाजवळ पोहोचले. तेथून दक्षिणेस राजगड सुमारे २० किलोमीटरवर आहे. राजांना शहाजीमहाराजांच्या अपघाती मृत्यूची बातमी येथेच समजली. सुरतेची स्वारी , यशस्वी झाली , नियतीने मात्र वडिलांच्या प्राणावर आघात करून त्यांना दु:खात लोटले.
अत्यंत तातडीने महाराज राजगडावर पोहोचले। तेथे आणखी एक भयंकर दु:खाने भरलेले ताट नियतीने वाढून ठेवलेले होते. मातु:श्री जिजाबाईसाहेब या सती जाण्याच्या तयारीत होत्या. वडील गेले , आता आईपण निघाली. प्रयत्नांची शिकस्त करून महाराजांनी शथीर्ने आऊसाहेबांना सती जाण्यापासून परावृत्त करण्यात अखेर यश मिळविले. आऊसाहेब थांबल्या.
हा सारा प्रचंड कल्लोळ आयुष्यभर महाराजांच्या भोवती चितेसारखाच ज्वाला नाचवीत होता. प्रत्येक प्रसंगाला ते तोंड देत होते.
महाराजांना कोणाची मदत होती ? कोणाचीही नव्हती. तापी-नर्मदेच्या उत्तरेला अवघा हिंदुस्थान मोगलांची सेवा करीत होता. राजपुतांच्याकडे मदतीच्या अपक्षेने पाहण्याची सोयच नव्हती. याच राजपुतांच्या जीवावर औरंगजेबाचे राज्य सुरक्षित होते.
पण इथेच शिवाजीमहाराजांच्या स्वराज्याच्या तत्त्वज्ञानातील एक महान तत्त्व सतत टवटवीतपणे बहरत होते. स्वावलंबन. कोणावरही अवलंबून न राहता स्वराज्याच्याच बळावर स्वराज्याचाच विचार विस्तार आणि समृद्धी करायची हे महराजांचे महान तत्त्व होते.
अजूनही पुण्यात मोगल छावणी होतीच. शाहिस्तेखान आसाम-बंगालच्या सुभेदारीवर ढाक्याकडे निघून गेला होता. पण पुण्यात छावणी कायम होती. सिंहगडाला जसवंतसिंह याने घातलेला वेढा अजून चालूच होता. महाराज मोगलांच्या पोटात सुरतेपर्यंत गेले आणि लूट घेऊन परत आलेसुद्धा , याचा या जसवंतसिंहाला पत्ताच नव्हता. अगदी उघड आहे. तसा पत्ता त्याला असता , तर त्याने महाराजांना सिंहगडाच्या पश्चिमेलाच अडवले असते. जाऊच दिले नसते. निदान परतीच्या वाटेवर महाराजांना त्याने राजगडाकडे येऊच दिले नसते. पण त्याला कशाचाही पत्ता नव्हता. यातच मोगलांची ठिसूळ लष्करी स्थिती दिसून येते. यालाच मी ' अभ्यासशून्य मोगलाई ' असे म्हणतात.
गेल्या १८ वर्षांत (इ. १६४६ ते १६६४ ) स्वराज्याच्या शत्रूंना कुठेच यश मिळाले नाही. महाराजांचे काही तुरळक पराभवही झाले. उदाहरणार्थ चाकणची लढाई. पण यातून शत्रूनी कोणताच ठोस अभ्यास केलेला दिसत नाही. अन् महाराजांचा अभ्यास थबकलेलाही दिसत नाही. या काळात काही लढाया ते हरले , पण सर्व युद्ध जिंकली. लढायांमुळे अखंड अशांतता स्वराज्यात होतीच की. पण स्वराज्यातील नागरिकांनीही आपले शेतकरी जीवन आणि बलुतेदारी कुठेही ढासळू दिली नाही. मांजर उंचावरून पडले तरी जमिनीवर पडताना ते चार पायांवरच उभे पडते. स्वराज्यही असेच मांजराच्या कुशलतेने आणि कोल्ह्याच्या कौशल्याने सह्यादीच्या कुशीत जगत होते.
- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.

सुरत बंदरात अनेक युरोपियन व्यापारी कंपन्या होत्या। त्यातच इंग्लीश ईस्ट इंडिया कंपनी होती। त्यांची फार मोठी वखार होती. जॉर्ज ऑक्झींडेन हा त्यांचा यावेळी (इ. १६६४ ) प्रमुख होता. सर्व युरोपियन व्यापारी कंपन्यांनी , महाराजांचा हा अचानक हल्ला आलेला पाहून महाराजांपुढे पटकन नमते घेतले आणि ते खंडण्या देऊन मोकळे झाले. पण जॉर्ज ऑक्झींडेनने अजिबात ' खंडणी देणार नाही ' असा निर्धार केला. हे त्याचे धाडस भयंकरच होते. मराठ्यांच्यासारख्या कर्दनकाळ शत्रूला असा कडवा निर्धारी नकार देणे म्हणजे मरण ओढवून घेणेच होते. महाराजांनी तीन वेळा या जॉजॅकडे माणूस पाठवून खंडणीची मागणी केली. त्याचा ठाम नकारच. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे , इंग्रजांची खास इंग्लीश माण्से येथे किती होती ? फक्त ४० अधिक १६० स्थानिक सुरतवाली नोकरमंडळी. सर्व मिळून दोनशे. तरीही जॉर्ज वाघासारखा वागत होता. त्याची वखार म्हणजे बळकट किल्ला नव्हता. वखारीला कंपाऊंड वॉल होती. लढावू तर नव्हता. तरीही जॉर्जचे एवढे बळ ? ते बळ त्याच्या मनात होते. म्हणूनच मनगटातही होते. दोनशे लोकांच्यानिशी तो वखारीच्या रक्षणाकरिता युद्धाला सज्ज होता.
महाराजांनी जॉर्जला निर्वाणीचा खंडणीसाठी खलिता पाठविला आणि मुकाट्याने खंडणी न द्याल तर राजापुरात दीड वर्षापूवीर् आम्ही तुमच्या इंग्रजी वखारीची काय अवस्था करून टाकली ते आठवा! असा इशारा दिला। तरीही जॉर्जने निर्धार सोडला नाही. उलट जबाब दिला की , ' पुन्हा तुमचा वकील खंडणीसाठी आमच्याकडे आला , तर त्याला ठार मारू. '
अखेर महाराजांनी आपली एक सैनिकी तुकडी हल्ला करण्यासाठी इंग्रजांवर पाठविली। जॉर्जने कडवा प्रतिकार केला. काही मराठे ठार झाले आणि महाराजांनी हल्ला थांबविला. चक्क माघार घेतली. ते ही योग्यच होते. कारण महाराज सुरतेत युद्ध करायला आलेले नव्हते. त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट आथिर्क होते. तसं पाहिलं तर दोनशे (त्यात बिनलढावू माणसेच जास्त) वखाररक्षकांचा बिमोड करायला महाराजांपाशी सैन्य नव्हतं का ? पण आत्ता लढाईत वेळ आणि बळ खर्च करून किती नफा वा तोटा होईल याचा विचार महाराजांनी केला. इंग्रजांचे बळ होते , निश्चय आणि निष्ठा.
महाराजांना सुरतेत प्रत्येक तास आणि क्षण महत्त्वाचा आणि अपुरा वाटत होता। इंग्रज खंडणी न देता विजयी ठरले. जॉर्ज ' हिरो ' ठरला.
सुरत शहराच्या उत्तर दिशेस गस्तीवर ठेवलेल्या मराठी स्वारांनी अचूक बातमी महाराजांना सुरतेत पोहोचविली की , ' मोगलांचा सरदार महाबतखान हा मोठी फौज घेऊन पाटणहून सुरतेवर तडफेने येत आहे। महाराजांना ही बातमी समजताच त्यांनी लूट सुरक्षित नेण्यासाठी ताबडतोब सुरतेतून निघण्याची आज्ञा दिली. कारण महाबतखानाशी यावेळी युद्ध करणे परवडणारेही नव्हते आणि उद्दिष्टही नव्हते. उद्दिष्ट होते , लूट सहीसलामत स्वराज्यात नेण्याचे. महाराज इंग्रजांपुढंही भित्रे नव्हते. आता महाबतखानापुढेही भित्रे नव्हते. ते हिशेबी आणि धोरणी होते.
दि। १० जाने. १६६४ या दिवशी सकाळी सुमारे साडेदहा वाजता महाराजांची सेना आणि सुरतेची संपत्ती सुरत सोडून निघाली आणि स्वराज्याच्या वाटेस लागली. सुरतेतून बाहेर पडताना बऱ्हाणपूर दरवाजापाशी महाराज घोड्यावरून क्षणभर सुरत शहराकडे वळले आणि म्हणाले , ' बहुता दिवसांची इच्छा किती होती की , औरंगजेब बादशाहांची सुरत वसूल करावी. ती आज पूर्ण झाली. ' यावेळी इस्ट इंडिया कंपनीतील एक इंग्रज अँथनी स्मिथ हा ( याला मराठ्यांनी कैद केले होते , नंतर सोडून दिले.) बऱ्हाणपूर वेशीपाशी उभा होता. त्याने हे सर्व पाहिले आणि नंतर लिहून ठेवले.
महाराज स्वराज्याच्या मार्गाला लागले। महाबतखान पाटण्याहून वेगाने येत होता. पण तो , महाराज निघून गेल्यानंतर सात दिवसांनी (दि. १७ जाने. १६६४ ) सुरतेला पोहोचला. या सात दिवसांत सुरतेची भयंकर बदसुरत झाली होती. आता सुरतेचा मोगली संरक्षक सुभेदार इनायतखान हा निर्धास्त झाला होता. तो महाबतखानच्या स्वागतास गेला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप गदीर् होती. कोणी दु:खाने व्याकूळ होते , बहुतेक सारे इनायतवर संतापलेले होते. त्यानेच शहर वाऱ्यावर सोडून सुरतेच्या किल्ल्यात दडी मारली होती. तोच खान आता महाबतखानाच्या स्वागतास सामोरा चालला होता. त्याच्या वागण्याबोलण्यात वा चेहऱ्यावर अपराधीपणाचा लेशही नव्हता. पूर्ण निर्लज्ज. याचवेळी इंग्रज जॉर्ज ऑक्झींडेन हाही महाबतखानास सामोरा आला. महाबतखानास सुरतेत घडलेल्या एकूण सर्व हकीकती तपशीलवार समजलेल्या होत्या. हा खान इनायतनावर कमालीचा नाराज झाला होता. पण साफसाफ बोलावे अशी ती वेळ नव्हती. त्याने इनायतला काहीच न बोलता , जॉर्जचे हादिर्क कौतुक केले , ' तुम्ही इंग्रजांनी एवढ्या मोठ्या शत्रूशी ताठ मानेने जाबसाल केला याचे खरोखच आश्चर्य आणि कौतुक वाटते ' अशा आशयाचा शब्दात जॉर्जचे गुणगौरव करीत खानाने त्याला एक उत्कृष्ट घोडा आणि एक अत्यंत मौल्यवान रत्नजडीत तलवार भेट म्हणून देऊ केली. तेव्हा जॉर्ज अतिशय नम्रतेने म्हणाला की , ' मी काय विशेष केले ? मी माझे कर्तव्य केले. माझ्या राष्ट्राकरिता (इस्ट इंडिया कंपनीकरिता) अत्यंत दक्षतेने आणि कठोरपणे वागलो. ' महाबतखानाने तरीही त्याचे कौतुक करीत आपल्या मौल्यवान आहेराचा स्वीकार करण्याची जॉर्जला विनंती केली. तेव्हा जॉर्ज म्हणाला , ' मला स्वत:ला काहीही नको. माझ्यासाठी काही करणारच असाल , तर एकच करा. आपले वजन दिल्ली दरबारात आहे. तर आपण औरंगजेब बादशहांस शब्द टाकून आमच्या इस्ट इंडिया कंपनीला जरूर त्या सवलती मिळवून द्या.
यावर अधिक काही बोलण्याची गरज आहे का ? हे कंपनीवाले इंग्रज याच सुरत शहराचे , यानंतर फक्त ९० वर्षांनी ( इ. १७५५ सुमारास) पूर्ण मालकी हक्काचे सत्ताधीश झाले.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे

जर सुरतेच्या सुभेदार इनायतखानाने महाराजांना योग्य तो प्रतिसाद दिला असता आणि महाराजांशी राजकीय पातळीवरून बोलणी करून महाराज मागतात त्या खंडणीबाबत काही ठरविले असते , तर सुरतेतील हा अग्निकल्लोळ टळला असता। पण ते त्या भ्रष्टाचारी सुभेदाराने केले नाही। महाराजांना त्याने आपल्या सैन्यबळानिशी निर्वाणीचा प्रतिकारही केला नाही। तो लपून बसला. अखेर महाराजांना खंडणीचा आणि खंडणी न देणाऱ्यांचा विचार कठोरपणे करावा लागला. जगाच्या इतिहासात कठोर निर्णयाने आपले राजकीय हेतू पार न पाडणाऱ्यांना अखेर स्वत:चाच नाश उघड्या डोळ्याने बघावा लागला आहे. सुरतेच्या प्रकरणावर आज खूप कागदपत्रे आणि वृत्तांत उपलब्ध आहेत. त्याचा बारकाईने अभ्यास केला तर मराठा स्वराज्याचा हा कठोर , कर्तव्यनिष्ठ पण कठोर न्यायीही नेता जे वागला ते योग्यच वागला असे दिसून येईल. यात अभिनिवेश नाही. खोटा अभिमान बाळगून ' शिवाजी महाराज की जय ' म्हणण्याची गरज नाही.
जर शिवाजी महाराज असे वागले नसते , तर ते नेभळट ठरले असते। ते सोवळ्यातल्या मुकटा नेसून राज्यकारभार करायला उभे नव्हते , तर कठोररितीने भवानी हातात घेऊन , वेळच आली तर ब्राम्हण किंवा ख्रिश्चन मिशनरी गुन्हेगारांचा शिरच्छेद करायलाही न कचरणारे विक्रमादित्य होते. आम्ही अनेकदा नेभळटपणामुळे अन् भाबड्या सहिष्णुतेचे ' मुखवटे नेसून राजमुकुट गमावले हो! '
बोलून टाकू का ? नुकतेच घडले आहे। पाक अतिरेकी आमच्या संसदेत घुसले। आमच्या राष्ट्रदेवतेच्या हृदयसिंहासनालाच त्यांनी ठोकर मारली. आम्ही काय केले ? मुखवटा नेसून आम्ही फक्त कागदी इशारा दिला ' हे सहन केले जाणार नाही. '
पाकव्याप्त पण भारताच्याच पूर्ण हक्काच्या काश्मिरी भागात पाक अतिरेकी विषारी सर्पांनी केलेल्या वारूळांवर आम्ही बॉम्ब का टाकले नाहीत ? आपले बॉम्ब न्याय्य ठरले नसते का ?
नाही! ते आम्हाला जमणार नाही। कारण आम्ही सहिष्णुतेचे मुखवटे नेसून शिवाजी महाराजांची भवानी हाती घेण्याची नाटकी चूक करीत असतो. खरं म्हणजे आम्ही सोवळ्याचे मुकटेही नेसता कामा नयेत अन् उपभोगाची भरजरी राजवस्त्रेही पेहरता कामा नयेत. आम्ही श्रीरामाची विरक्त वल्कले परिधान करून पातकी आक्रमकांवर रामबाण सोडले पाहिजेत. महाराज असे रामबाण सोडीत होते.
हा सुरतेतला रावण काय करीत होता यावेळी ? तो सुरतेच्या किल्ल्यात आपल्या एक हजार मोगली सैन्यानिशी लपून बसला होता। त्याने आपला एक वकील , तिसऱ्या दिवशी (दि। ८ जाने. १६६४ ) शिवाजीमहाराजांच्याकडे आपले पत्र देऊन तहाची बोलणी करण्याकरता पाठविला. हा वकील काळाबागेत महाराजांकडे आला. महाराज रोजच्या प्रमाणेच एका प्रचंड झाडाच्या बुंध्याशी उंचट आसनावर बसले होते. महाराजांनी भेटीची परवानगी दिली. तो वकील महाराजांच्या समोर सुमारे पंधरा पावलांवर अदबीने उभा राहिला. आपल्या हातातील कागदाची वळकटी उलगडीत तो महाराजांना म्हणाला , ' आमचे सुभेदार इनायतखान आपल्याशी तह करावयास तयार आहेत. आमच्या तहाच्या अटी अशा ' तो वकील एवढे बोलतोय , तेवढ्यात महाराज दरडावले , ' तहाच्या अटी ? अटी आम्ही घालायच्या की तुम्ही ? भेकडाप्रमाणे तुमचा सुभेदार किल्ल्यात लपून बसलाय. आणि तो आम्हाला अटी पाठवतोय ?'
तेवढ्यात तो वकील ' महाराज , आपल्याला अगदी महत्त्वाचे मला काही सांगायचे आहे ' ( आपके तहनाईमें मुझे कुछ कहना है।) असे वारंवार म्हणत म्हणत महाराजांच्या दिशेने पावले टाकू लागला। तो क्षणात अगदी जवळ आला आणि त्याने एकदम आपल्या कमरेस असलेली कट्यार उपसली आणि तो घाव घालण्यासाठी महाराजांच्यावर धावला. तो झडप घालणार , एवढ्यात महाराजांच्या नजीक उभ्या असलेल्या मराठा चार-दोन सैनिकांनी या वकीलावरच विजेच्या वेगाने सपासप घाव घातले. इतके ते मराठे सावध होते. तो वकील म्हणजे इनायतखानाने महाराजांचा खून करण्याकरता पाठविलेला मारेकरी होता. मारेकरी मारला गेला. मराठे सैनिक वणव्यासारखे भडकले. आणि मग सुरतेत खरोखरच सूडाचा भडका उडाला. सुरतेत जो काही भयंकर हल्लकल्लोळ उडाला तो सर्वस्वी अन् प्रत्येक बाबतीत बेजबाबदारपणे वागलेल्या इनायतखान सुभेदारामुळेच. इथे नवल वाटते ते औरंगजेब बादशाहचेच. त्याने साम्राज्याच्या पश्चिम सागरी सरहद्दीवर , सुरतेसारख्या जागतिक बाजारपेठ असलेल्या संपन्न अर्थनगरीवर इतका नालायक बेजबाबदार , भेकड निर्लज्ज भ्रष्टाचारी आणि अक्कलशून्य सर्वाधिकारी कसा काय नेमला ?
सुरतेच्या स्वारीने स्वराज्य सैनिकांनी शिलंगण केले। सीमोल्लंघन ' आम्ही कधीही दुसऱ्याच्या मुलुखावर अतिक्रमण वा स्वारी करीत नाही ' असे अभिमानाने सोवळ्यातला मुकटा नेसून सांगणाऱ्या आमच्या मंडळींनी याचा विचार करावा ना ? महाराजांचे हे महाराष्ट्राबाहेर झालेले दुसरे शिलंगण। पहिले शिलंगण त्यांनी अफझलखानच्या स्वारीपूवीर्च कर्नाटकात मासूर या आदिलशाही ठाण्यावर , म्हणजे पुण्यापासून जवळजवळ सातशे कि। मी. दूर केले होते. महाराज तर म्हणत होते की , ' सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापावेतो अवघ्या मुलुखाचे राज्य आपल्या स्वराज्यात सामील करावे.
' केवढी विशाल पण तेवढीच उदात्त , उन्नत , उत्कट आणि उत्तुंग स्वप्न पाहणारा हा नेता होता! अशी स्वप्न जागे असणाऱ्यांनाच पडतात। झोपा काढणाऱ्यांना नाही. त्यांच्या आकांक्षा गगनाच्याही पल्याड सूर्यमंडळ भेदून जात असतात.
राहून राहून रूखरूख वाटते की , पाक अतिरेक्यांच्या काश्मिरातील वारूळांवर , संसदच्या अपमानाचा जाब विचारण्यासाठी बॉम्ब टाकण्याची अप्रतिम संधी आम्ही गमावली. शाहिस्तेखानाच्या आक्रमणाचा जाब महाराजांनी सुरतेवर विचारला औरंगजेबाला.
- बाबासाहेब पुरंदरे