मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०१४

अचानक जॉब गेल्यास आर्थिक गणित कसे सांभाळाल?


आजच्या युगात जॉब सिक्युरिटीची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही. अलिकडेच चेन्नई येथील नोकिया कंपनीने आपले युनिट बंद केल्याने शेकडो जण बेरोजगार झालेत. त्यामुळे अशी स्थिती उद‍्भवल्यास सर्वांत मोठा फटका हा आर्थिक आघाडीवरच बसतो. त्यामुळे व्यक्ती कितीही कुशल असली तरी तिला नवी नोकरी मिळविण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागू शकतो. या काळासाठी आपल्या आर्थिक गणिताची जुळवणी करणे फारच आवश्यक असते. याबाबत आपल्या कुटुंबीयांनाही विश्वासात घेऊन काही पावले उचलणे सहज शक्य आहे, त्याबाबत...

इमर्जन्सी फंड

'तहान लागल्यावर विहीर खोदण्यात' काहीच अर्थ नसतो. त्यामुळे अचानक जॉब गेल्याची परिस्थिती उद्‍भवण्याची शक्यता असो वा नसो आपला व कुटुंबाचा सहा महिन्यांचा खर्च भागेल एवढा इमर्जन्सी फंड तयार करून ठेवणे श्रेयस्कर ठरते. त्यासाठी सध्याच्या नोकरीकाळात थोडीथोडी रक्कम जमा केल्यास हे सहज शक्य आहे. थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण येथे लागू होते.

बजेटची नव्याने आखणी

प्रत्येकाच्या महिन्याच्या बजेटमध्ये दोन भाग असतात. एक अत्यावश्यक खर्च आणि दुसरा चैनीचे बजेट. अत्यावश्यक बजेटमध्ये किराणा, इलेक्ट्रिक बिल, मोबाइल बिल आणि अऩ्य भाजी,दूध यांचा खर्च, औषधे आदी न टाळता येणारे खर्च. हे तर लागणारच असतात पण आपण चैनीच्या बजेटमधून जसे की, दर आठवड्याला बाहेर जेवायला जाणे, चित्रपट बघण्यासाठी जाणे, गरज नसतानाही होणारी कपड्यांची खरेदी, गिफ्ट्स, पार्टी आदी. हे खर्च टाळता येण्यासारखे असतात किंवा मोबाइल बिलातही कपात करणे शक्य असते. त्यामुळे आपल्याला जमेल तेवढे खर्च कमी करणे अधिक श्रेयस्कर ठरते.

वेगळा मेडिकल इन्शुरन्स घ्या

बऱ्याच ठिकाणी आपण जेथे नोकरी करतो ती संस्था किंवा कंपनी आपल्याला ठराविक रकमेचा हेल्थ इन्शूरन्स कव्हर देत असते. त्यामुळे नोकरी गेल्यास आपले संरक्षणही जाते. त्यामुळे अनेक आर्थिक गुंतवणूक सल्लागार हे वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स घेण्याचा सल्ला देतात. कुटुंबातील कोणाची तब्येत कधी बिघडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्याची आधीच तरतूद केलेली बरी. निदान तीन ते पाच लाख रुपयांपर्यंतचा हेल्थ इन्शुरन्स असणे कधीही चांगले ठरू शकते. शेवटी निर्णय आपण सारासार विचार करूनच घ्यायचा आहे. काही नोकरीच्या ठिकाणी मिळणारा हेल्थ इन्शुरन्स नोकरी गेल्यानंतरही सेवा देतो. त्यामुळे तसे आपल्या कंपनीला अगोदर विचारून घ्यावे.

कर्जे फेडण्यासाठी प्राधान्य ठरवा...

नोकरी करीत असताना आपण विविध कर्जे घेतो. जसे की, होम लोन, पर्सनल लोन, क्रेडिट कार्डचे हप्ते आदी. त्यामुळे नोकरी गेल्यानंतर या कर्जापोटीच्या ईएमआय भरणे आवश्यक असते. नोकरी गेल्यास सर्वप्रथम कर्ज फेडीचे प्राधान्यक्रम ठरवावे. त्यात गृहकर्ज फेडण्याऐवजी पर्सनल लोन व क्रेडिट कार्डची रक्कम प्रथम फेडून टाकावी कारण त्यावर दंड व अधिक व्याजाची आकारणी होत असते. क्रेडिट कार्डच्या पेमेन्टला उशिर केल्यास मोठा दंड व व्याजाचीही आकारणी होते. त्यामुळे सर्वांत आधी क्रेडिट कार्डचे पेमेन्ट करावे.

गुंतवणुकीचा फेरआढावा घ्यावा...

आपण नोकरी काळात म्युच्युअल फंड, मुदत ठेवी आदी गुंतवणूक योजना किंवा सोने, चांदी, स्थावर मालमत्ता यांच्यात गुंवतणूक करीत असतो. ठराविक महिन्यात आपल्या गुंतवणुकीचा आढावा हा आपण नियमितपणेच घ्यायला हवा पण नोकरी गेल्यानंतर त्यात अधिक सतर्कता दाखविणे गरजेचे आहे. आपण दहमहा एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करीत असू तर ती बंद करण्याचा पर्यायही आपल्यापुढे असतो. तसेच त्यातून आवश्यक रक्कम काढण्याचीही सोय असते. त्यामुळे तातडीची कर्जे फेडण्यासाठीही याचा वापर होऊ शकतो.

*कर्जाचे हप्ते सांभाळताना...

फेरआखणी

कर्जफेडीचा कालावधी वाढविता येऊ शकतो. त्यामुळे ईएमआय आपोआप कमी होईल.

फेररचना

बँकेला कर्जाची फेररचना करण्याची विनंती तुम्ही करू शकता. कर्जात सवलत मिळविण्याची संधीही यातून मिळू शकते.

आश्वासन

सध्या नोकरी गेल्यामुळे तुम्ही कर्जाचे हप्ते फेडू शकत नसाल तर तसे बँकेला कळवा व भविष्यात मी नक्की कर्ज फेडणार आहे, असे आश्वासनही देऊ शकता. यावर योग्य निर्णय बँकच घेते.

हस्तांतरण

आपल्यापुढे कर्जाचे हस्तांतरण हा एक चांगला पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. आज कमीत कमी व्याजदराने कर्जे देण्यासाठी बँकांमध्ये स्पर्धा आहे. त्यामुळे कर्ज एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे हस्तांतरित करण्याची सोय सुद्धा आहे. पण एकंदरीत फायदा-तोट्याचे गणित करूनच याचा निर्णय घ्यावा.