मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०

सोन्याचा गणपती



मानवी मनोऱ्यांच्या जीवघेण्या स्पर्धेत किशोरचा बळी.







जीव फक्त ‘लाख’ मोलाचाच?

दहीहंडी फोडण्यासाठी चौथ्या-पाचव्या थरावर चढून ‘चमकेश’ आयोजकांना सलामी देता देता कोसळलेल्या ठाण्यातील किशोर कांबळे या गोिवदाचा रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला. वृद्ध आई-वडील, एक अपंग आणि दोन लहान भावंडे असा परिवार किशोरच्या जाण्याने एका क्षणात उघडय़ावर आला. अवघे २० वर्षांचे तरुण वय असलेला किशोर कुठेतरी नोकरी शोधून आपले घर सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच दहीहंडीवर लावण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या आमिषाला बळी पडला आणि आयोजकांनी स्वत:ची हिडीस प्रसिद्धी व भपकेबाजीचे दर्शन घडविण्यासाठी गोविंदारूपी दहीहंडीच्या रूपात रस्त्या-रस्त्यांवर मांडलेल्या मानवी जीवाच्या जुगारात तो आयुष्य गमावून बसला. किशोरच्या बलिदानातून निदान या पुढेतरी दहीहंडीच्या उत्सवात मर्यादांचे भान ठेवण्याची सद्बुद्धी आयोजकांना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
२५-३० हजारांच्या हंडय़ा आता २५-३० लाख रुपयांवर गेल्या आहेत. धन, संपत्ती आणि काळ्या पैशांचे एकीकडे किळसवाणे प्रदर्शन होत असताना गोरगरिबांच्या जगण्याच्या वाटेवर मात्र अंधार दाटतो आहे. यातही उल्लेखनीय बाब म्हणजे करचुकवेगिरी करणाऱ्या एखाद्या सामान्य नगरिकाच्या हात धुवून मागे लागणाऱ्या आयकर खात्याच्या ‘कर्तव्यदक्ष’ अधिकाऱ्यांना २५ लाखांची दहीहंडी उभारणाऱ्यांकडे मात्र एवढा निधी कोठून आला, हे विचारण्यास कदाचित ‘वेळ’ मिळत नसावा. राजकीय लागबांधे एवढेच उत्तर असू शकते.
किशोरच्या घरी कुणी कमावते नाही. मोठा भाऊ अपंग, दोन लहान भावांचे शिक्षण आणि वृद्ध आई-वडिलांचे पालनपोषण कसे करावे या विवंचनेत असलेल्या किशोरला दहीहंडीवर लावलेल्या लाखालाखांच्या बक्षिसांची भुरळ पडली. कोणतेही प्रशिक्षण नसताना १०-२० हजार रुपये तरी मिळतील, या अपेक्षेने गोविंदा मंडळात तो सहभागी झाला आणि पाचव्या थरावरून तीन ते चार वेळा खाली कोसळला. परंतु डीजेचा धुमाकूळ आणि ‘शोर मच गया शोर..’च्या बेधुंद गोंगाटात त्याच्या छातीत मुक्या माराने सुरू झालेल्या वेदना कुणालाच ऐकू गेल्या नाहीत. औषधोपचारांसाठी पैसा नाही म्हणून तो कुणालाही न सांगता सहन करीत घरी बसला आणि शेवटी त्यातच संपला. त्याच्या जाण्याने किती वेदना होत आहेत, हे दाखविण्यासाठी दहीहंडय़ांचा जुगार मांडणारी नेते मंडळीच पुन्हा त्याच्या घराकडे धावली आणि अवघे एक लाख रुपये एवढे त्याच्या आयुष्याचे मोल करून मोकळी झाली. पण तेवढय़ाने हा प्रश्न संपला नसून त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचा गुंता कुणी सोडवायचा, याचे उत्तरही आता शोधावे लागणार आहे.
माणसातील माणुसकी आणि संवेदना संपल्या काय, असा प्रश्न करणारी ही घटना. लोकांच्या उत्सवप्रियतेचा लाभ उठवित स्वत:च्या राजकीय लाभासाठी त्याचे ‘इव्हेण्ट’मध्ये रूपांतर करणारे नवराजकारणीच या दुर्घटनांना जबाबदार आहेत. राजकारणातून पैसा आल्यानंतर त्याचे जाहीर प्रदर्शन करण्यासाठी असे जीवावर बेतणारे मानवी जीवाचे जुगार मांडले जात आहेत. आयकर खात्यासह त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. कुणीही उठतो आणि लाखा-लाखांच्या हंडय़ा जाहीर करून सळसळत्या तरुणाईला बक्षिसांचे आमिष देऊन या जीवघेण्या स्पर्धेत उतरवितो. ४०-५० फूट उंचीवर लावल्या जाणाऱ्या या दहीहंडय़ा तेवढय़ाच उंचीचे मनोरे लावून फोडण्यात प्रचंड साहस व कौशल्य लागते, हे मान्य केले तरी त्यातील जीवाची जोखीम व बघ्यांची विकृती याचे समर्थन कसे करता येईल? इमारतीच्या चौथ्या, पाचव्या मजल्यावरून अपघाताने एखाद्या जिवंत माणूस खाली पडतानाचा क्षण ज्यांना रोमहर्षक वाटतो, अशांची गणना विकृत माणसांतच केली जाते. दहीहंडीच्या सातव्या, आठव्या थरावर चढलेले लहान बालक ३५-४० फुटांवरून खाली कोसळते, तेव्हा टाळ्या आणि शिट्टय़ा मारणारे आयोजक व बघ्यांच्या गर्दीला काय म्हणावे असा प्रश्न पडतो. कोसळणाऱ्यांपैकी किशोर कांबळे प्राणास मुकला. पण असे अनेक गोविंदा मणक्याला, पायाला, डोक्याला गंभीर इजा झाल्याने आजही मुंबई, ठाण्यातील इस्पितळात जायबंदी होऊन पडलेले आहेत. त्यापैकी किती जणांच्या वाटय़ाला जन्मभराचे अपंगत्व व विकलांगता येणार हे काळच ठरविणार आहे. त्यावर काय उपाय आहे, याचे उत्तर आज दहीहंडय़ांवर लाखोची बक्षिसे लावणाऱ्यांकडे नाही. एक दिवसाचा इव्हेण्ट होता. तो साजरा करून राजकारणी मंडळी मोकळी झाली, पण किशोर कांबळेसारख्या अनेक तरुणांच्या आयुष्यात व त्यांच्या कुटुंबांत कायमचा अंधार निर्माण करण्यास आपण कारणीभूत झालो याचे भान त्यांना नाही.
किशोरच्या मृत्यूमुळे निदान दहीहंडीच्या उंचीवर तरी कायदेशीर र्निबध यावेत आणि या उत्सवासाठी काही कठोर आचारसंहिता व नियम तयार केले जावेत अशी मागणी करण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे. आमदार प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे यांनीही या घटनेनंतर तशी आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले आहे. परंतु, त्यासाठी सर्वानी एकत्र येऊन पुढाकार घेतला तरच भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील. अन्यथा किशोरसारख्या अनेक तरुणांचे जीवन यापुढेही उद्ध्वस्त होतच राहील, याच कोणतीच शंका नाही!