शुक्रवार, २६ डिसेंबर, २००८

शिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक .

दिलेरखान हा मोगल सेनापती पठाण होता। पण् त्याची निष्ठा सर्वस्वी औरंगजेबाच्या पायाशी होती। वास्तविक पठाण जमातीचे मोगलांशी वैरच होते. कारण दिल्लीची सत्ता पठाण वंशाकडून खेचून घेऊन बाबर हा दिल्लीचा पहिला मोगल बादशाह झाला होता. पण हे आसले काही नाते लक्षातही न घेता दिलेरखान त्यांची सेवा करीत होता. इतकी तळमळून अहोरात्र शाही चाकरी करणारा माणूस राजपुतांच्याशिवाय इतर कोणत्याही समुदायात मिळणे अशक्य होते. औरंगजेबाच्या मनात संशयाने कायमचेच कुरुप केलेले होते. त्याचा कोणावरही विश्वास नसायचा.
स्वत:च्या मुलामुलींवर तर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. मिर्झाराजांवरही नव्हता. पण त्याचे राजपुती कर्तृत्त्व , शौर्य आणि मोगल बादशाहीबद्दलची स्वामीनिष्ठा औरंगजेब जाणून होता. म्हणूनच मिर्झाराजांवर त्याने महाराष्ट्रावरील मोहिम सोपविली. पण तिथेही संशयी स्वभाव व्यक्त झालाच. मिर्झा व सीवा दोघेही राजपूत. ते कदाचित आपल्या- विरुद्ध एक झाले तर ? आपली नुकसानी झाली तर ? म्हणून मिर्झावर सावध लक्ष ठेवण्यासाठीच औरंगजेबाने दिलेरला या मोहिमेत बरोबर दिले होते. हे मिर्झाराजाने ओळखले होते. म्हणूनच अनेकदा मतभेद आणि अवमान गिळून टाकून मिर्झा दिलेरच्या कलाकलाने वागत होता. पुरंदरच्या वेढ्यात मिर्झा आणि दिलेर यांचे अनेकदा खटके उडाले. मिर्झाने शक्य तेवढे स्वत:ला सावरीत सावरीत अलगद पडते घेतलेले दिसून येते.
दिलेरखान पुरंदरसाठी अत्यंत नेटाने हट्टाला पेटला होता. त्याचे एकूण या मोहिमेतील वर्तन पाहिले की , दुसऱ्या महायुद्धातील एखाद्या जनरल पॅटनची किंबहुना हिटलरचीच आठवण होते. पण येथे दिलेरच्या बाबतीत ते वर्तन कौतुकाचेच वाटते.
पुरंदरच्या पूर्व पहाडावर असलेल्या ' काला बुरुजावर ' दिलेरने मोठ्या कष्टाने तोफा डागल्या व मारा सुरू केला. पण मराठ्यांच्या या बुरुजावर असलेल्या दारुच्या साठ्याचा स्फोट झाला अन् बुरुज उडाला. ऐंशी मराठे हशम एका रकमेने उडाले. ठार झाले. दिलेरला हे अचानक यश मिळाले. आनंदाच्या भरात किंचितही न रेंगाळता त्याने ताबडतोब या खिंडारावर आपल्या फौजेचा एल्गार केला. स्वत: दिलेरखान उभा होता. त्याला वाटले की , आपण किल्ल्यात घुसणार , नक्की आत्ताच किल्ला मिळणार. पण मराठे तेवढेच अक्राळविक्राळ होते. काळा बुरुज उडालेला , ऐंशी मराठी माणसं चिंधड्या झालेली समोर दिसूनही मराठे कचरले नाहीत. त्यांनी मागेच असलेल्या सफेद बुरुजावरून या मोगली हल्ल्यावर जबर प्रतिहल्ला चढविला. तो एवढा तिखट होता की , हल्ला करणारे मोगल माघारा पळत सुटले. ही मराठी जिद्द पाहून दिलेर चकीत झाला. पण तेवढाच भयंकर संतापला. अन् मग तो संताप पुरंदरावर त्याने आगीसारखा ओकावयास सुरुवात केली. काळ सरकत होता. दिवस उलटत होते. पण दिलेरच्या काळजात निराशेची रात्र होतच नव्हती. गडही मिळतच नव्हता. तेव्हा दिलेरने आपल्या सेनाधिकारी सरदारांसमोर संतापून आपली पगडी घालणार नाही. असा हा हट्टी , संतापी दिलेर , औरंगजेबाला असे सरदार मिळाले पण ते त्याला सांभाळता आले नाहीत. माणसं कशी सांभाळावीत , त्यासाठी आपल्या काळजाचा तुकडा कापून द्यावा लागला तरी तो द्यावाच हे शिकावं शिवाजीराजांकडून औरंगजेबाला हे कसं जमणार ?
अखेरपर्यंत पुरंदरगड दिलेरला जिंकून घेता आलाच नाही. गडावर मराठी सैन्याला नेता नव्हता. मुरार बाजी ठार झाले होते. तरीही पुरंदर झुंजतच होता. नेता नसतानाही एक दिलाने , एक मनाने आणि एक निष्ठेने अशी मरणाच्या तोंडावर उभे राहून झुंजणारी माणसं स्वराज्याला महाराजांनी घडविली. खऱ्या अर्थानं पुरंदरावर यावेळी लोकशाही होती. खऱ्या अर्थानं लोकशाही यशस्वी होते ती अशीच. आपसांत क्षुद , स्वाथीर् भांडणे भांडून नव्हे!
आमच्या लोकशाहीचे दर्शन लोकसभेत आणि विधानसभेत आपल्याला नेहमीच घडते. आपण पावन होऊन जातो.
दिलेर आणि मिर्झाराजे हे दोघेही औरंगजेबाकरीता आणि मोगली तख्ताकरीता जिवाचं रान करीत होते. या दोघांच्याही आयुष्याची अखेर कशी झाली ? हताश आणि दु:खमय. याच मिर्झाराजाला औरंगजेबाने उदयराज मुन्शी या , मिर्झाराजाच्याच नोकराकडून विष घालून पुढे (दि. ११ जुलै १६६७ ) बुऱ्हाणपूर येथे मारले. आणि दिलेरचं काय झालं ? आयुष्यभर त्याने औरंगजेबाची जीव उगाळून सेवा केली. पुढे संभाजीराजांच्या विरुद्ध मांडलेल्या युद्धात दिलेर असाच लढत होता. मराठे हरत नव्हते. मोगलांना यश मिळत नव्हते. चिडलेल्या औरंगजेबाने दिलेरलाच दोष दिला. ' तुमच्याच अंगचोरपणामुळे आपण हार खातो आहोत ' असा आरोप औरंगजेबाने घेतला. (इ. १६८५ ) त्यावेळी दिलेरनं मान खाली घातली. त्याला काय यातना झाल्या असतील त्या त्यालाच ठाऊक. आयुष्यभर ज्याची सेवा केली , तो आपल्याला अंगचोर म्हणतोय.
दिलेरने आपल्या तंबूत एकांती विषय पिऊन आत्महत्या केली. हे पाहिल्यावर आठवावेत शिवाजीराजे. त्यांचे कैसे बोलणे होते ? कैसे चालणे होते ? त्यांची सलगी देणे कैसे असे ? तानाजी , कान्होजी जेधे , जिवा महाला , बाजी प्रभू , दौलतखान , बाळ प्रभू चिटणीस , येसबा दाभाडे , धाराऊ गाडे , हिरोजी फर्जद अन् असेच कितीतरी हिरे आणि हिरकण्या महाराजांच्या हृदयातच जाऊन बसलेल्या दिसतात. प्रेम ही एक अलौकिक शक्ती आहे. ती नेत्यांनी अन् अनुयायांनीही कधी विसरू नये. तिचं दर्शन घडावं. प्रदर्शन करू नये. स्वाथीर् व्यत्यय कामामध्ये येऊ नयेत. यशाचे प्रत्यय यावेत. खरे प्रेम अबोलच असते. ऐसी कळवळ्याची जाती , लाभाविण करिती प्रिती. शिवकाल म्हणजे ठायी ठायी या प्रेमाचा प्रत्यय.
- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.

पुरंदर गड बुलंद आहे बेलाग आहे। प्रचंड तर घटोत्कचासारखा आहे. असा हा गड चटकन मिळावा असा प्रयत्न दिलेरखान करीत होता. महिना उलटून गेला होता. अजूनही गड खानाला चटकन मिळत नव्हता.
अन् एक चित्तरकथाच गडाच्या दक्षिणेस काळदरीत घडली। खानानं गडाचा दख्खन दरवाजा तोफांच्या सरबत्तीने अस्मानात उडविण्याचा घाट घातला. दोन प्रचंड तोफा मोठ्या कष्टाने काळदरी या गावापासून गडाच्या या दख्खन दरवाजापासून थोड्या अंतरावर असलेल्या डोंगरमाथ्यावर चढविण्यात आल्या. खाटल्यावर पहुडलेल्या घटोत्कचानं आपला एक गुडघा उंचावावा तसा हा डोंगरमाथा दिसतो. भोवती झाडी. समोर उंचावर तो दरवाजा. हा दरवाजा जर कब्जात आला तर पुरंदरच्या थेट बाले किल्ल्यावरच आलमगिरी झेंडा लावता येईल हा दिलेरचा डाव. हे काम अत्यंत अवघड होते. पण तोफांच्या माऱ्याने दरवाजा उडवून ते साधता येईल असा खानाचा विश्वास होता. या तोफांच्या मोर्च्यावर एक मोगली तुकडी आणि दोन प्रख्यात सरदार खानाने नेमले. दाऊदखान कुरेशी आणि रसूल बेग रोजभानी हे ते दोघे. अहिमही होते. म्हणजे हा दरवाजा आता अशा तोफांच्या आणि मोगली सरदारांच्या तोंडासमोरच उभा होता. त्या मानाने दरवाजा बऱ्याच उंचीवर गडाच्या खोबणीत होता.
अन् या तोफांचा मारा दरवाज्यावर सुरूही झाला. दोन-तीन दिवस उलटले. दरवाजा पक्का होता. (अजूनही आहे.) अन् याचवेळी एका रात्री गडद अंधारातून आणि गडाच्या अंगावर असलेल्या झाडीझुडपांतून सुमारे चारशे मावळे , काळदरीकडून गडावर उंदरासारखे या दरवाजाच्या रोखाने घुसले. चढू लागले. या मावळ्यांच्या पाठीवर धान्याची आणि बारुदाची म्हणजे तोफा बंदुकांच्या दारुची लहानमोठी पोती होती. महाराजांनी राजगडावरून पुरंदरगडावर मुरारबाजींना ही रसद गुपचूप पाठविली होती. सुमारे दोनशे पोती होती. मोगली सैन्याच्या आणि तोफांच्या तडाख्यातून हे मावळे मोठ्या हिमतीने , कष्टाने आणि चतुराईने गड चढत होते. दाऊदखान कुरेशी आणि रसूलबेग रोजभानी यांना या चोरांच्या चतुराईची चुकूनही चाहूल लागली नाही. दख्खन दरवाज्यावरच्या मराठ्यांनी अचूकपणे दिंडीदरवाजा उघडला. ही मराठी कुमक आणि रसद गडात अगदी सुखरूप पोहोचली. दख्खन दरवाजा बंद झाला. मोगली तोफा उडचत होत्या.
रात्र संपली. दिवस उगवला. मुरारबाजींना ही नवीन कुमक पाहून केवढा आनंद झाला असेल नाही ? खास महाराजांनी गडाला पाठविलेली ही मदत.
अन् रात्र संपल्यावर दिवसाउजेेडी दाऊदखानला अन् रसूलबेगला बातमी लागली की , रात्रीच्या अंधारातून आपल्या समोरच्या झाडीतून मोठी थोरली कुमक मराठ्यांनी गडावर नेली. दोघेही सरदार थक्क झाले , सुन्न झाले , गप्प झाले , गप्पच राहिले. कारण ही आपली फजिती आपणच कशी कुणाला सांगायची! अन् जर गडाच्या उत्तर पायथ्याशी असलेल्या दिलेरखानाला ही फजिती समजली , तर तो संतापेल. अन् काय करील याचा नेम नाही , हे ते दोघे ओळखून होते. म्हणून गप्पच बसले.
तो दिवस मावळला. रात्र झाली. तोफा उडतच होत्या. अस्वलानं शिकावं तशा.
गडाच्या बाले किल्ल्यावर याच रात्री एक भयंकर धाडसी कवटाळ किल्लेदाराने योजले. त्याने चाळीस मावळ्यांना सज्ज केले. मोगलांच्या उडणाऱ्या तोफांवरच झडप घालण्यासाठी केवढे धाडस! या चाळीसातील काहींच्या जवळ टोकदार मोठे लोखंडी खिळे आणि हातोडे होते. ही सशस्त्र टोळी दख्खन दरवाजाच्या दिंडीतून गुपचूप बाहेर पडली. झाडीतून लपत छपत तोफांकडे उतरू लागली. या छाप्याची कल्पनाही दाऊद आणि रसूल यांना आली नाही. या मराठ्यांनी एकदम अंधारातून येऊन मोगलांवर झडप घातली. मोगलांचा गोंधळच उडाला. झटापट पेटली. हातोडेवाल्या मावळ्यांनी गदीर् करून तोफांच्या छिदात खिळे घातले. घाव घातले. तोफा क्षणात निकामी झाल्या. काम झाले. मावळे जितक्या झपाट्याने आले तितक्याच झपाट्याने झाडीत पसार झाले. चार सहा मावळे मारले गेले.
दख्खनची दिंडी उघडली गेली. मावळे किल्ल्यात शिरले. दिंडी बंद झाली. खानाच्या तोफा ठार बंद पडल्या होत्या. काळगडावर मावळी कुमक पोहोचली. आज आपल्या तोफा बेकाम होऊन निपचित पडल्या. तोबा!
या गोष्टी लपून राहिल्या नाहीत. दिलेरखानाला त्या समजल्या. तो आगीसारखा भडकला. संतापून तो या बंद पडलेल्या तोफांच्याकडे दौडत आला. दाऊद आणि रसूल गुन्हेगारासारखे मान खाली घालून उभे होते. संतापलेल्या दिलेरखानाने आपला क्रोध शब्दात उधळावयास सुरुवात केली. अत्यंत कठोर भाषेत दाऊद आणि रसूल यांची तो अब्रू सोलून काढीत होता. थांबतच नव्हता. तो त्यांना बेवफादार , हरामखोर , नालायक , बत्तमीज अशा घनघोर शिव्यांनी झोडपीत होता. कितीतरी वेळ.
त्यांनी दोघांनी तरी किती ऐकून घ्यायचे ? जबाबदारी त्या दोघांवर होती हे खरं. पण आता त्याबद्दल किती शिव्या घालायच्या ? अखेर एक क्षण असा आला की , दाऊदखान कुरेशीने मान वर करून दिलेरखानालाच जाब विचारला , ' तुमच्याच छावणीत दारूगोळ्याचा सारा साठा भडकून उडाला , कोण जबाबदार होतं त्याला ? आम्ही ? की तुम्ही ?'
दाऊदचा सवाल मुँहतोड होता. अन् मग! दाऊदखान आणि रसूल बेग यांची लांब दुसऱ्या छावणीत बदली करण्यात आली! ते परिंड्याच्या किल्ल्याकडे रवाना झाले. पुरंदर झुंजतच होता.
- बाबासाहेब पुरंदरे

बुधवार, २४ डिसेंबर, २००८

शिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ

दिलेरखानाने आपली किल्ले घेण्याची मोहिम सुरू करण्याचे ठरविले. प्रथम पुरंदर आणि सिंहगड हे किल्ले ' लक्ष्य ' म्हणून निश्चित केले. मोगली सर्जाखानाने सिंहगडास मोर्चे लावले. यावेळी सिंहगडावर जिजाऊसाहेब आणि महाराजांच्या एक राणीसाहेब होत्या. या नेमक्या कोणत्या राणीसाहेब होत्या , त्यांचे नाव सापडत नाही. पण जिजाऊसाहेब सिंहगडात असल्यामुळे आधीच बलाढ्य असलेला सिंहगड अतिबलाढ्य बनला. सिंहगडचा किल्लेदार यावेळी कोण होता त्याचेही नाव समजत नाही. पण गेल्याच वषीर् (दि. २८ मे १६६४ ) जसवंतसिंह राठोड आणि भावसिंह हाडा या दोघांवर जबरदस्त हल्ला करून त्यांचे मोचेर् पार उधळून लावून अन् त्यांना पिटाळून लावणारा जो मराठा किल्लेदार होता , तोच हा आताही असावा.
पुरंदर किल्ल्याला एकजोड किल्ला आहे. त्याचं नाव वज्रगड. म्हणजे दिलेरखानाने पुरंदर वज्रगड आणि सिंहगड हे किल्ले प्रथम घेण्याचे निश्चित केले. दिलेरखान आणि त्याच्याबरोबर मिर्झाराजेही पुरंदरच्या दिशेने निघाले. त्यांचा मार्ग पुणे ते हडपसर-लोणी-फुरसुंगी-चोराची आळंदी- सोनोरी-सासवड ते पुरंदर असा होता. दिलेरखानाचा कामाचा झपाटा विलक्षण गतीमान होता. आळस आणि चैनबाजी त्याच्या स्वभावातच नव्हती. मोगलांकडील एकूण सेनानायकांत या शंभर वर्षात हा दिलेरखान म्हणजे एकमेव वेगळा अपवाद ठरावा असा इस्लामी सेनानायक होता. एखादे काम अंगावर घेतले की ते पुरे करण्याकरिता तो अहोरात्र बेचैन असायचा.
दिलेरखान म्हणजे मूतिर्मंत निष्ठा , मूतिर्मंत तळमळ , मूतिर्मंत तडफड. खान आणि मिर्झाराजे पुण्याहून निघाले आणि 3 ० मार्च १६६५ या दिवशी सोनोरीच्या डोंगराच्या दक्षिण पायथ्याशी असलेल्या सोनोरी गावात पोहोचले. त्यांच्याबरोबर अफाट युद्धसाहित्य आणि लवाजमा होता. तरीही अवघ्या १५ - १६ दिवसांत पुण्याहून ते सोनोरीस पोहोचले. सैन्य निदान पाऊणलाख तरी होतेच. येथे एक आठवण देतो. हेच अंतर फक्त 3 ० हजार सैन्यानीशी चालून जायला पूवीर् शाहिस्तेखानास पूर्ण नऊ दिवस लागले होते. दि. १ मे ते ९ मे १६६० अर्थात दिलेरखानसारख्या सतत भडकत राहणाऱ्या बारुदगोळ्याची शाहिस्तेखानसारख्या गचाळ सेनानीशीच काय पण कोणत्याही इतर इस्लामी सेनानीशी तुलना करता येणार नाही.
मोगलांनी तोफखाना मोठाच आणला होता. त्यात तीन तोफा प्रचंड होत्या. दि. 3 १ मार्च १६६५ रोजी मध्यरात्री अचानक मराठ्यांच्या शेपाचशे स्वारांच्या टोळीने खानाच्या या सोनोरीजवळच्या छावणीवर एकदम वळवाच्या पावसासारखा हल्ला चढविला. छावणी झोपलेली होती. त्या प्रचंड छावणीवर हा हल्ला तसा लहानसाच होता. पण इतका भयंकर होता की , मोगलांची क्षणात तारांबळ उडाली. मराठे सुसाट वादळासारखे आले. अचाट वेगाने तुटून पडले. त्यांनी भन्नाट कापाकापी केली अन् सुसाट पसार झाले. कसे आले , कोठून आले , कोठे गेले पत्ताच नाही. आले गेले मनोगती. दिलेरला मराठ्यांचा पहिला परिचय असा झाला.
दि. १ एप्रिल रोजी खान तशाच वेगाने १५ कि. मी.वर असलेल्या पुरंदरच्या पायथ्याशी जाऊन पोहोचला. खानाने लगेच मोचेर्बंदी सुरू केली. स्वत: खान जातीने नेतृत्त्व करीत होता. मिर्झाराजे या वेढ्यापासून दीड कि. मी. असलेल्या नारायणगावापाशी आपली छावणी ठोकून राहिले.
एक दिवस दिलेरच्या वेढ्यात भयंकर भडका उडाला. खानाचा दारुगोळ्याचा साठा अचानक पेटला. सगळी दारू प्रचंड स्फोटाने एकाक्षणात खाक झाली. भयानक नुकसान झाले. हा अपघात ? की मराठ्यांनी केलेला आघात ? नक्की माहित नाही. पण बहुदा मराठ्यांच्या गुप्तचरांनीच ही ठिणगी टाकली असावी.
पुरंदरच्या भोवती अक्षरश: तोफा बंदुकातून आग गडावर फेकली जात होती। मराठी इतिहासातील एक रौद संग्राम म्हणून या युद्धाचा अध्याय दाखवावा लागेल.
यावेळी मराठी सैन्याची पथके जागोजाग मोगलांना सतावीत होतीच. पण मनुष्यबळ कमी पडत होते. महाराज निश्चयाने उभे होते. त्यांची मनोभूमिका त्यांच्याच शब्दात अशी , ' पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठीच मी जन्माला आलो आहे. माझ्या भूमीचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य. ते बजावण्यास मी कधीही चुकणार नाही. '
मोगलांचा धूमाकूळ पुणे जिल्ह्यात चालू होता. तो त्यांनी केंदित केला होता. त्यामुळे आग भयंकर होती. याचवेळी कोकण भक्कम आणि निर्धास्त होते. महाराजांचे आगरी , भंडारी , कोळी , प्रभू , कोकणी मराठे कोकणची अन् विशेषत: किनारपट्टीची राखण करीत होते. मिर्झाराजाने यावेळी औरंगजेबास डाक पाठवून विनंती केली की , गुजराथेतून मराठी कोकणावर तुम्ही मोगली फौजा पाठवा. हे कोकण झोडपले पाहिजे. औरंगजेबाने हे केले नाही का ? माहित नाही. पण पूवीर् शाहिस्तेखानाने कोकणावर पाठविलेल्या एकूण एक सरदारांचा कोकणी मराठ्यांनी पार धुव्वा उडवून दिलेला होता. पूर्ण फजिती. हे औरंगजेबाच्या लक्षात असावे. म्हणूनच बहुदा त्याने कोकणातील आगरी , कोळी , भंडाऱ्यांची कलागत काढली नाही. दिलेर आणि मिर्झाराजा यांनीही पुण्याहून कोकणावर आपल्या फौजा पाठविण्याचे धाडस केले नाही. कोकणच्या माणसांची इथे ओळख पटते. असे हे कोकण , असे हे मावळ , चिवट , चपळ , चमत्कारिक.
- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.

कारवार किनाऱ्यावरील बसनूर उर्फ बसिर्लोखर महाराजांचा आरमारी छापा पडला. पण या मोहिमेमागे किती पद्धतशीर योजना त्यांनी केली असेल याचा अभ्यासकांनी विचार करावा. आधी हेर पाठवून तेथील लष्करी आणि राजकीय स्थितीची पूर्ण माहिती मिळवून नंतरच ही सागरी मोहिम त्यांनी केली. त्यात यश चांगले मिळाले. पण अपेक्षेप्रमाणे पुरेपूर मिळाले नाही. जेथे यश मिळाले नाही त्याचाही त्यांनी नंतर पुरेपूर अभ्यास केलेला दिसतो. प्रत्येक विषयात ते अभ्यासाला आणि योजनाबद्ध आराखड्याला महत्त्व देत असत. आमचे आजचे थोर समाजसेवक बाबा आमटे तरुणांना उद्देशून एक गोष्ट निक्षून सांगतात , मलाही त्यांनी ती सांगितली. ती अशी ' भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन काम करा ' किती महत्त्वाचा इशारा आहे हा नाही ? अगदी हेच सूत्र महाराजांच्या कार्यपद्धतीत आढळते.
पण भान ठेवून केलेल्या योजनेत जर कुणी कार्यकर्ता अनुयायी चुकला किंवा त्याने जाणूनबुजून कुचराई केली , तर बेभान होऊन केलेले काम अपेक्षित होते. थोडाफार असाच प्रकार कारवार मोहिमेत कोणा तरी हेरगिरी करणाऱ्या गुप्तचराकडून घडला. आपला मराठी माणूस अचूक वागावा , अचूक चालावा आणि अचूक बोलावा ही महाराजांची अपेक्षा नेहमीच असे. पण त्यातूनही असा क्वचितच का होईना , पण चुकार गडी निघत असे. कारवार मोहिमेत अशी चुकीची वा अपुरी गुप्त बातमी आपल्याच हेरांनी दिल्यामुळे आपणांस थोडे अपयश आले हे महाराजांनी हेरले. पण त्यांनी कानाडोळा केला नाही. त्यांनी त्या संबंधित हेराला शासनही केले. करायलाच हवे होते. नाहीतर चुका करायची चटक लागते. कोणाची तरी चिठ्ठी आणली की , मोठमोठ्या गुन्ह्यातील प्रतिष्ठित आरोपी अलगद सुटतात , नंतर मानाने मिरवतातही. हे बरे नव्हे.
या कारवार मोहिमेच्या काळातच महाराजांचा वाढदिवस (फाल्गुन वद्य तृतीया) येऊन गेला. हा त्यांचा पस्तीसावा वाढदिवस. पण तो साजरा केल्याची नोंद नाही. इतकंच नव्हे त्यांनी आपला कोणताही वाढदिवस साजरा केला नाही.
आज मात्र आमच्या ' तरुण , तडफदार , तेजस्वी ' हिरोंना विसाव्या वर्षांपासून ' प्रत्येक वर्षी आपला वाढदिवस जाहिरातबाजीने साजरा करण्याची चटक लागली आहे. सिद्धीच्या मागे लागावे , प्रसिद्धीच्या नव्हे. शिवरायांस आठवावे. जीवित तृणवत मानावे. महाराजांनी स्वराज्य साधनाची लगबग कैसी केली , ते स्मरावे. स्वत:चा आरोग्यसंपन्न शंभरावा वाढदिवस साजरा करण्याची जरुर महत्त्वाकांक्षा ठेवावी. त्यासाठी निर्व्यसनी असावे. असो. बहुत काय लिहिणे ?
मोहिम संपवून महाराज भूमार्गाने परतले. मोहिमेवर येत असलेले मिर्झाराजे पुण्याच्या दिशेने सरकत होते. ते आणि दिलेरखान पुढच्या मोहिमांची चर्चा करीत असावीत असे दिसून येते. दोघांचेही हेतू एकच होते. शिवनाश! पण पद्धती वा मार्ग जरा भिन्नभिन्न होते. दिलेरचे म्हणणे असे की , ' या शिवाजीराजाचे किल्ले एकूण आहेत तरी किती ? फार फार तर चाळीस. ते सर्वच किल्ले आपण युद्धाने जिंकून घेऊ. हा विचार आपल्या प्रचंड सैन्यबळावर दिलेर मांडीत होता. हा विचार केवळ शिपाईगिरीचा होता. त्यात सरदारी नव्हती. डोके कमीच होते. मिर्झाराजांचा विचार वेगळा होता. त्यात अभ्यास दिसून येतो. मिर्झाराजांचे म्हणणे थोडक्यात असे शिवाजीराजाचे किल्ले घेणे वाटते तितके सोपे नाही. कारण त्या किल्ल्यातील मराठी माणसं अजिंक्य आहेत. ती फितवा फितुरीने विकत घेणे वा लढूनही जिंकून घेणे जवळजवळ अशक्य आहे. या माणसांचे म्हणजे लढाऊ सैनिकांचे घरसंसारच जर आपण तुडवून काढले आणि त्यांची बायकापोरे , शेतीवाडी आणि त्यांची खेडीपाडी पार मुरगाळून काढली तर गडागडांवर असलेले हे मराठी आपोआप भुईवर गुडघे आणि डोकं टेकतील. त्यामुळेच शिवाजीराजा हा आपोआप शरण येईल.
असा विचार आणि पुढे प्रत्यक्ष तो विचार कृतीत आणू पाहणारा मिर्झाराजा जयसिंग हा एकमेव शत्रू वा सेनापती ठरला. बाकीचे सगळे हाणामारी आणि जाळपोळ करणारे केवळ दंगेखोर. दिलेर आणि मिर्झा हे दोन सेनापती आपापले विचार घेऊन पुण्यात दाखल झाले.
महाराजांनी एक तिसराच प्रयत्न करून पाहिला. मोगलांचे बळ अफाट आहे आणि मिर्झाराजा हा सेनापतीही शहाण्या डोक्याचा आहे. जर हे प्रचंड मोगली वादळ आपल्या अंगावर न येऊ देता परस्पर विजापुरच्या आदिलशाहकडेच वळविता आले तर स्वराज्याला मोगली धक्का लागणार नाही , या हेतूने महाराजांनी मिर्झाराजाकडे अशी बोलणी वकिलामार्फत केली की , हा विजापूरचा बादशाह आदिलशाह दिल्लीचा शत्रू आहे. त्याचा तुम्ही पुरा मोड करा. आम्ही तुम्हांस मदत करू.
म्हणजे विजापूर खलास करून टाकायचं अन् त्यात आपणही चार ओंजळी कमवायच्या असा हा महाराजांचा डाव होता. तो डाव मिर्झाराजांनी अचूक ओळखला. आणि त्यांना दादच दिली नाही. मोगली फौज त्यांनी थेट पुण्यावर आणली. पुणे ही त्यांची केंद छावणी झाली. शाहिस्तेखानापासून पुणे मोगलांच्याच ताब्यात होते. आता आपण टाळू पाहात असलेले मोगली आक्रमण टळत नाही , हे महाराजांना कळून चुकले. संकट कितीही मोठे अंगावर आले तरीही आपला आब न सोडता ताठ उभे राहायचे हा महाराजांचा नेहमीचा स्वभाव.
मिर्झाराजा आणि दिलेरखान यांनी आपापल्या पद्धतीप्रमाणे मराठ्यांविरुद्ध डाव खेळायचं ठरविलं. मराठी स्वराज्याची जाळपोळ , लूट जनतेवर अत्याचार ही मराठ्यांना शरण आणण्याकरिता मिर्झाराजाने ठरविलेली खेळी त्याने सुरू केली. पुण्यात कुबाहतखानास , कार्ला , मळवली , वडगांव या मावळ भागात कुतुबुद्दीनखान आणि पुण्याभोवतीच्या भागात इंदमणबुंदेला , रायसिंग सिसोदिया इत्यादी सरदारांना ही धूमाकूळ घालण्याची कामगिरी सांगून धामधुमीस प्रारंभही केला. (मार्च. १६६५ ) ब्रिटीश भूमीवर सतत बॉम्बवर्षाव करून ब्रिटीश सैन्याचे धैर्य खचविण्याचा हिटलरने असाच प्रयत्न दुसऱ्या महायुद्धात केला होता हे आपल्याला आठवतंय ना ? अशाच घनघोर प्रसंगी राष्ट्राचे चारित्र्य दिसून येते. ते खचते तरी किंवा धगधगते तरी.
परीक्षा होती स्वराज्यातील जनतेची. मराठी सैनिकांना हा मोगलाई वणवा दिसत होता. आपली घरेदारे आणि बायकापोरे पार चिरडून निघत आहेत , हे मराठ्यांना उघडउघड दिसत होते. समोरासमोर मोगलांशी झुंजायला मराठी माणूसबळ कमी पडत होते. तरीही प्रतिकार चालूच होता. स्वराज्यास आरंभ झाल्यापासून आत्तापर्यंत (१६४६ ते १६६५ ) मराठी सैनिक सतत लढतोच आहे. विश्रांती नाहीच अन् आता तर ढगफुटीसारखे मोगली हत्ती आपल्यावर तुटून पडले आहेत. हे मराठ्यांना दिसत होतं. महाराजांनाही दिसत होतं. नकाशा पाहिला तर हा मोगली धूमाकूळ मुख्यत: पुणे जिल्ह्याच्या मध्य आणि पश्चिम भागावर मिर्झाराजांनी केंदित केला होता.
पण इथेच शिवशाहीचा मावळा सैनिक आपलं प्रखर धैर्य , शौर्य , सहनशीलता , त्याग , निष्ठा आणि नेतृत्त्वावरील विश्वास अन् प्रेम अगदी नकळत , अगदी सहज , अगदी उत्स्फूर्त अन् अगदी हसतहसत जगून वागून दाखवित होता. यालाच राष्ट्रीय चारित्र्य म्हणतात. या काळातील या आक्रमक आगीच्या वर्षावात कोणत्याही किल्ल्यावरचा वा दऱ्याकपारातल्या ठाण्याछावणीतला मराठा सैनिक हताश , निराश , गर्भगळीत वा अगतिक झालेला दिसत नाही. हे कशावरून ? फितुरी नाही. आपापल्या कामात कसूर नाही अन् महाराजांकडे केविलवाण्या विनविण्याही नाहीत की महाराज आमचे संसार मातीला मिळताहेत. महाराज हे युद्ध थांबवा. शरण जा. तह करा. आम्हाला वाचवा.
मराठी स्वराज्याच्या पाठीचा कणा वज्रासारखा आणि गर्दन शेषासारखी ताठ दिसून आली ती या मिर्झा-दिलेर यांच्या आक्रमणाच्या काळातच. असा हा कणा होता की , वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.
- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.

शाहिस्तेखानाच्या फटफजितीनंतर , त्याच्याच हाताखालचा सरदार जसवंतसिंह राठोड हा खूप मोठी फौज घेऊन पुण्याशेजारच्याच सिंहगडाला वेढा घालण्यासाठी आला. त्याने गडाला मोर्चे लावले. त्याच्याबरोबर त्याचा मेव्हणा बंुदीमहाराजा भावसिंह हाडा हाही होता. झुंज सुरू झाली.
शाहिस्तेखानाची झालेली फजिती सर्वात जास्त असह्य होत होती या जसवंतसिंहाला आपण पुण्यात लाल महालाभोवतीच्या छावणीत असताना खानावर छापा पडावा हा जणू या सिंहाला स्वत:चाच अपमान वाटत होता. झालेल्या फजितीचा थोडातरी बदला घेण्याकरीता आपण शेजारचा सिंहगड घ्यावा असा जसवंतचा हेतू होता.
हा वेढा चालू असतानाच सिंहगडच्या पश्चिमेच्या बाजूने स्वत: महाराज पाच हजार घोडदळ घेऊन सुरतेवर गेले. जसवंतला याचा पत्ताच नव्हता. महाराज सुरतेहून परत असेच जसवंतच्या पश्चिमबाजूने राजगडला गेले. जसवंतला याचाही पत्ता नव्हता. बातमीदार नाहीत , लष्करी गस्त नाही , सावधपणा नाही. कशी या मोगलांना कल्पना आली की , हे मराठे कोल्हे आपल्या अवतीभोवती आट्यापट्या खेळताहेत अन् आपल्याला त्यांचा भयंकर धोका आहे. पण केवळ प्रचंड युद्धसाहित्य , पैसा आणि अपार सैन्य याच्या जिवावर आपण मराठ्यांना मोडून काढणार आहोत अशी स्वप्न हे लोक पाहत होते. निव्वळ हा त्यांचा भाबडेपणा होता.
आता पाहा , दि. ६ एप्रिल १६६ 3 या दिवशी शाहिस्तेखानावर महाराजांचा छापा पडला. त्या दिवसापासून ते पुढे मिर्झाराजा आणि दिलेरखान दुसरी प्रचंड मोहिम घेऊन याच पुण्यात येईपर्यंत , म्हणजेच मार्च १६६५ पर्यंत मोगलांचा मुक्काम पुण्यात होताच. या पावणेदोन वर्षात मोगली सरदारांनी काय काय मिळवलं ? काहीही नाही. जसवंत आणि भावसिंह हे सिंहगडाला गराडा घालून बसले होते. प्राप्ती काय ? शून्य. मधूनमधून मराठ्यांच्याच हातचा मार खात होते.
याच काळातील शिवाजी महाराजांची कमाई लक्षात घ्यावी. सुरतेची खंडणी ही त्यांची प्रचंड आथिर्क कमाई. मुधोळकर बाजी घोरपड्यांचा समूळ फडशा , कुडाळवर खवासखानाचा पूर्ण पराभव , सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास प्रारंभ , जिजाऊसाहेबांची महाबळेश्वरास सुवर्णतुळा दानधर्म , कारवारवरील आरमारी स्वारी अन् याशिवाय अनेक लहानमोठी स्वराज्यातील कामे यशस्वी. हा हिशोब पाहिल्यावर मोगल आणि मराठे यांचा उद्योग कोणत्या काळ काम आणि वेगाने चालला होता हे लक्षात येते.
महाराजांचा कामाचा हा झपाटा पाहिला की , त्यांच्या ध्येयवादाची कल्पना येते. साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर आपण मराठे आणि आपला महाराष्ट्र स्वराज्य मिळवीत आहोत , याची सावध जाणीव महाराजांना आणि त्यांच्या सौंगड्यांना होती.
पाहा. या साऱ्या उद्योगात उपभोगाला , उनाड चैनबाजीला , आळसाला अन् आरामाला कुठे जागा सापडते का ? नाही , नाही , नाही. जीणशीर्ण अवस्थेतून स्वतंत्र होणाऱ्या राष्ट्राने या चंगळबाजीच्या वासालाही उभे राहू नये. पहिल्या दोन पिढ्यांनी करायचे ते राष्ट्र उभारणीसाठी कष्ट , कष्ट आणि कष्टच. त्याची गोड फळे खायची ती पुढच्या पिढ्यांनी. आपण फक्त करायची साधना आणि आराधना. आपण जगले पाहिजे व्रतस्थ वारकऱ्यासारखे.
हे सारे शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनात अखंड दिसून येते. म्हणूनच त्याही वेळचे लोक म्हणत की , हे राज्य म्हणजे देवताभूमी , हे राज्य श्रीच्या वरदेचे आहे. हे राज्य व्हावे हे श्रीचे मनात फार आहे. मराठीयांचे गोमटे करावे यासाठी अवघा डाव मांडिला.
हे सारं स्वराज्यावर औरंगजेबाच्या वतीने चालू न येणाऱ्या राजपुतांना , बुंदल्यांना , जाटांना आणि शाही छावणीत इमानेइतबारे चाकरी करणाऱ्या पंडितांना कधी दिसलेच नाही का ? दिसले असेल , पण उमजले नाही. कारण देश आणि समाज यांच्याशी काहीतरी आपल्याला करावयास हवे ही भावनाच शून्यात होती. खाना पिना , मजा करना या पलिकडे त्यांना जीवनच नव्हते.
जसवंतसिंगने सिंहगडला वेढा घातल्याला पाऊण वर्ष होऊन गेले होते. परिणाम शून्यच. अखेर एके दिवशी जसवंतसिंहाने गडावर सुलतान ढवा केला. म्हणजे काय ? म्हणजे एकवटून गडावर हल्ला चढविला. पण तो हल्ला गडावरच्या मराठ्यांनी पार चुरगाळून काढला. हल्ला वाया गेला. पण मराठ्यांनीही एके दिवशी (२८ मे १६६४ ) गडावरून बाहेर पडून पायथ्याशी असलेल्या जसवंतसिंहाच्या छावणीवर भयंकर हल्ला चढविला. त्यांनी मोगलांना झोडपून काढले. खुद्द जसवंतसिंहालाही जखमा झाल्या. जसवंतसिंह आणि भावसिंह अवघ्या मोगल फौजेनिशी पुण्याकडे धूम पळाले. पूर्ण पराभव. हे दोन सिंह जिवंत सुटले हीच कमाई.
म्हणजे थोडक्यात हिशोब असा की शाहिस्तेखानच्या या टोलेजंग मोहिमेत मोगलांची कमाई काय ? तर फक्त चाकणचा छोटासा किल्ला.
खरोखर हा सारा इतिहास चित्रपटाच्या (डॉक्युमेंटरीज) माध्यमातून तुम्हा उमलत्या तरुणांपुढे मांडला पाहिजे.
- बाबासाहेब पुरंदरे

शुक्रवार, १९ डिसेंबर, २००८

शिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते

जीवनात संकटे कोणावर येत नाहीत ? सुख-दु:खाच्या धाग्यांनी प्रत्येकाचे जीवन विणलेलेच असते। प्रखर तेजस्वी सूर्यालाही ग्रहणकाळ अटळ असतो। आता स्वराज्यावरही एक महाप्रचंड आक्रमण येऊ घातले होते. दिल्लीत औरंगजेब अशा मोठ्या मोहिमेची योजना करीत होता. ही त्याची स्वराज्यावरील मोहिम जणू निर्णायक ठरणार आहे , असा प्रचंड आखाडा तो मांडीत होता. खरोखरच हे लहानसं हिंदवी स्वराज्य या मोगली मोहिमेत टिकणार की संपणार असाच जबडा औरंगजेबाने उघडला होता. प्रचंड सैन्य , तोफखाना , हत्ती , युद्धसाहित्य , खजाना दक्षिणेवर जणू फुटलेल्या प्रचंड धरणासारखा लोटावयाचा हा आराखडा होता. म्हणजे त्याच चुका पुन्हा एकदा औरंगजेब करीत नव्हता का ? तळहाताएवढ्या शिवस्वराज्याचा आणि मूठभर शिवसैन्याचा समूळ नाश करण्याकरीता हे अफाट बळ महाराष्ट्रावर पाठविले की , आपले काम चोख होणार. आपण फक्त वाट पाहायची , मोगली झेंडा शिवाजीच्या राजगडावर फडकल्याच्या बातमीची आणि तो शिवाजी मारला गेल्याची किंवा कैद केल्याची. आपण अलमगीर आहोत. सीवा एक भुरटा दंगेखोर आहे. असेच मूल्यमापन प्रारंभापासून (ते स्वत:च्या अंतापर्यंत) औरंगजेब करीत होता. बळाने बुद्धिचा पराभव करता येतो अशी त्याची कल्पना होती. इथेच तो चुकत होता. अन् आजही अनेकजण अशाच चुका करतात. हिटलरने चचिर्लच्या बाबतीत आणि अमेरिकने व्हिएतनामच्या बाबतीत अशीच चूक केली. परिणाम जगाला दिसून आला. औरंगजेब हीच चूक आत्ता ( इ. १६६५ ) नव्याने करीत होता. प्रचंड युद्धसाहित्य आणि सेना असूनही शाहिस्तेखानचा पराभव का झाला याचा त्याने थोडासुद्धा विचार केलेला दिसत नाही. शिवाजीमहाराजांचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती योगेश्वर श्रीकृष्णाच्या ( कागदावर न रेखलेल्या पण कृतीत आणलेल्या) चक्रव्यूहाइतकी अभेद्य आणि आत्मविश्वासू होती. या शिवनीतीचा आणि शिवकार्याचा पराभव करण्याची ताकद कोणत्याही शत्रूकडे नव्हती. तिचा पराभवच करावयाचा असेल तर त्यांचेच लेक करू शकतील. अन् त्यांच्याच लोकांनी या शिवनीतीचा आणि शिवस्वराज्यकार्याचा घात केलेला पुढे आपल्याला दिसून येत नाही का ?
आज इतिहासात उभा दिसतो आहे तो असाच औरंगजेब। शिवाजीराजा न समजलेला महान शत्रू.
पुन्हा एकदा प्रचंड सैन्य दक्षिणेवर निघाले। औरंगजेबाने एक गोष्ट मात्र मोलाची केली. त्याने विवेकी , अनुभवी आणि बुद्धिमान असा सेनापती नेमला. त्याचे नाव मिर्झाराजा जयसिंग. हा एकमेव सेनापती असा आहे की ज्याने शिवाजी महाराजांच्या युद्धपद्धतीचा शिवअनुयायांचा आणि शिवमुलुखाचा बराच विचार केलेला आहे. पण त्यातही औरंगजेबाने आपल्या संशयी स्वभावाप्रमाणे दिलेरखान पठाण या जबरदस्त सरदारास जवळजवळ बरोबरीचे अधिकार देऊन मिर्झाराजांबरोबर पाठविले. दिलेरखान हा जबर योद्धा आहे. पण त्याला डोके कमी आहे. ते पुढे दिसून येईलच. औरंगजेबाने शिवाजीराजांविरुद्ध मिर्झाराजा आणि दिलेर यांना पाठविले. म्हणजेच तीन पायांची शर्यत खेळायला एकमेकांचे एकेक पाय एकत्र बांधून धावायला पाठविले.
स्वराज्यावरील हाच तो ग्रहणकाळ. हे ग्रहण क्षणिक की खग्रास हे काळ ठरविणार होता. नव्हे , स्वराज्यच ते ठरविणार होते. म्हणजेच स्वराज्यातील जनता आणि रणांगणावरचे मराठी सैनिक. नक्की आकडे माहित नाहीत. पण सुमारे दीड ते पावणेदोन लाख फौज या मोगली मोहिमेत आहे. इतर मोहिमांपेक्षा या मोहिमेत एकच गोष्ट (प्रकर्षाने) दिसून येते की , मिर्झा आणि दिलेर यांच्याबरोबर जनानखान नाही. मिर्झाराजे आणि दिलेर इ. १६६४ , ऑक्टोबर २९ नंतर मोहिमशीर झाले.
विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की , या प्रचंड आक्रमणाच्या वार्ता महाराजांना समजत होत्या. त्यांना पुरेपूर कल्पना होती. ते सावध होते. याच काळात त्यांनी एक साधे गणित मांडलेले दिसते की , ही मोगली लाट (इ. १६६४ ) च्या दिवाळीच्या दिवसांत दिल्लीहून निघतेय. ती आपल्या सरहद्दीवर येऊन पोहोचायला , म्हणजेच पुण्यावर पोहोचायला अजून पाच महिने लागणार आहेत , हे निश्चित. तेवढ्या वेळेत इतर काही कामे उरकता येतील. म्हणून महाराजांनी कर्नाटक सागरी किनाऱ्यावरील कारवार , मर्जा , अंकोळा , भटकळ , सदाशिवगड आणि बसनूर इत्यादी महत्त्वाची आदिलशाही ठाणी गिळून टाकण्याची योजना केली. आपल्या उत्तर आणि पूर्व स्वराज्यसरहद्दीची चिंता त्यांना नव्हतीच. पुरंदर , लोहगड , माहुलीगड , कसाराघाट इत्यादी ठाणी सुसज्जच होती. कोकणी सौंगड्यांच्या पूर्ण भरवशावर ते कोकणात निर्धास्त होते. महाराजांनी याचवेळी येत असलेल्या सूर्यग्रहणाचे दिवशी एक दानसोहळा करावयाचे योजिले. दि. ६ जाने. १६६५ , पौष वद्य आमावस्या या दिवशी सूर्यग्रहण होते. महाबळेश्वर येथे त्यांनी आपल्या आईची म्हणजेच जिजाऊसाहेबांची सोन्याने तुळा केली. हे सर्व धन दानधर्मात खर्च करावयाचे असते. ते केले. महाराज दि. ८ फेब्रुवारीस मालवणांस आले. पूर्वयोजनेने आरमार बंदरात सिद्ध होते. महाराज गलबतावर चढले. कारवारवरील ही त्यांची मोहिम आरमारातून होणार होती. त्यांच्या आयुष्यातील ही एकमेव आरमारी स्वारी. महाराज कारवारवर निघाले. मिर्झा राजा बुऱ्हाणपुरावरून औरंगाबादकडे सरकत होता. महाराजांनी सूर्यग्रहणाचेवेळी स्नाने , दाने , पूजाअर्चा केल्या होत्या. मिर्झाराजेही व्रतवैकल्ये करीत स्वराज्यावर येत होते. बगलामुखी कालरात्री या भवानीदेवीची त्यांनी होमहवनपूर्वक आराधना केली. पुढे शिवशंकराची कोटीलिंगार्चने अंत:करणपूर्वक केली. औरंगजेबाला यश मिळावे आणि शिवाजीराजाचा पूर्ण विनाश व्हावा ही मिर्झाराजांची श्रीचरणी प्रार्थना होती. एकाचे मन असे , दुसऱ्याचे मन तसे. तिसरे मन औरंगजेबाचे. त्याला शिवाजीराजेही नको होते अन् मिर्झाराजेही नको होते. या तीन मनांचा आम्ही कधीही अन् आजही अभ्यास केला नाही अन् करीतही नाही.
- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत

कुडाळची मोहिम फत्ते करून महाराज ससैन्य मालवणास आले. हा सागरी किनारा. मालवणातून महाराजांचे लक्ष समुदावर फिरत होते. ते बेट त्यांना समोरच दिसत होते. बेटाचे नाव कुरटे बेट. महाराजांनी आपल्या कोकणी शिलेदारांसह हे बेट , होडीतून जाऊन पाहिले. त्यांना फार आवडले. ते म्हणाले , ' इथं सागरी किल्ला बांधावा '.
खरं म्हणजे सुरतेहून आणलेली संपत्ती सागरी सरहद्द बळकट करण्यासाठी महाराज कुठेतरी पण योजनापूर्वक खर्च करण्याचा विचार करीत होतेचे। या कुरटे बेटावर जर पाणकोट बांधला तर दक्षिणेकडील गोवेकर फिरंग्यांच्या आणि इतर शत्रूंच्या तोंडावर आपलाही एक जबरदस्त जंजिरा उभा राहील हा विचार त्यामागे होता आणि महाराजांनी तो बोलूनही दाखवला , ' येथे जलदुर्ग बांधावा ऐसा मानस आहे ' यानिमित्ताने यावेळी एक चित्तरकथाच घडली. या नव्या पाणकिल्ल्याचे भूमीपूजन करावे , त्याकरिता आधी सुमुहूर्त पाहावा अन् लगेच संकल्प सोडून मग कामास सुरुवात करावी असा विचार त्यांचे मनी आला. त्यांनी बरोबरच्या कारभाऱ्यांस पूर्वतयारीची आज्ञा दिली. महाराजांचे बरोबर त्यांचे राज गुरुजी होतेच. अडचण काहीच नव्हती. पण महाराज म्हणाले , ' येथे आपले गुरुजी नकोत ' मग ? जे मालवणातील स्थानिक धामिर्क कायेर् करणारे नेहमीचे गुरुजी असतील त्यांनाच बोलवावे. कारभाऱ्यांना कदाचित यावेळी संभ्रमही पडला असेल. आपले गुरुजी आहेत ना ? मग स्थानिक कशांस ?
पण यातच या राजाचे मन व्यक्त होणार होते. स्थानिक माणसांकडून अशी कायेर् करवून घेतली की , स्थानिक माणसांची मने स्वराज्याच्या कामात अधिकच रुजतात , एकरुप होतात. त्यांची नाती अतूट होतात. मालवणातील स्थानिक गुरुजी होते , कोणी एक जानभट अभ्यंकर वयोवृद्ध स्वभावाने खास मालवणी. जरा तिखट.
महाराजांनी जानभटांस आणावयास कारकुनांबरोबर पालखी पाठवली. भटजी घरीच होते. पालखी आली. कारकून म्हणाले , ' कुरट्या बेटावर महाराज राजश्री जलदुर्ग बांधीताती , तरी प्रथम पूजनांस मुहूर्त पाहणे आहे. संकल्प सोडणे आहे. म्हणून राजेश्री आपणास बोलविताती. पालखी आणली आहे. चलावे. '
पण भटजी साफ नकार देऊन म्हणाले , ' आमचे येणे होत नाही '
नवलच. एवढा शिवाजीराजा राजकाजासाठी बोलावतोय , पालखी पाठवतोय अन् हे भटजी येत नाहीत. काय कारण ? जानभट कारणही सांगेनात. पालखी परत गेली. महाराजांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी पालखीसह पुन्हा कारकुनांना जानभटजींकडे निमंत्रण पाठविले. पुन्हा तेच. गुरुजींनी नकार दिला. पालखी परतली. महाराजांनी कारकुनांना पुन्हा पाठविलं अन् म्हटलं की , ' भटजींस घेऊन येणे. न आलियास उचलून घेऊन येणे. '
अन् तसंच करावं लागलं। कारकुनांनी नम्र जबरदस्ती करून गुरुजींना पालखीतून महाराजांकडे आणलं. महाराजांनी त्यांचे न येण्याचे कारण पुसलं , तेव्हा तो गरीब ब्राह्माण म्हणाला , ' महाराज , येथे धर्मराज्य आले. आनंदच आहे. पण येथे तुम्ही जलदुर्ग बांधू पाहता. आम्हांस संकल्प मुहूर्त सांगावयास बोलविता. पण आम्हांस भय वाटते. कारण की , पलिकडे (वेंगुर्ला भागात) आदिलशाही ठाणी अजून आहेत. ( त्यापलिकडे गोवेकर फिरंगी आहेत.) ते उद्या येथे चालून आल्यास प्रथम आम्हांसच धरतील म्हणून भय वाटते. ' महाराजांच्या अगदी मनांतले विचार समिंदरातल्या देवमाशासारखे उसळून आले. स्थानिक सरहद्दीवरील अवघ्या प्रजेस असा पूर्ण विश्वास वाटला पाहिजे की , आमच्या राज्याची ही सरहद्द आमच्या राजाने अगदी पक्की बंदोबस्तात जागती ठेविली आहे. तो आपली पुरेपूर खबरदारी घेणारच आहे , हा विश्वास अवघ्यांच्या मनांत ठाम होणे गरजेचे आहे.
म्हणूनच तर महाराजांनी या धामिर्क कार्यासाठी स्थानिक वेदमूतीर्ंना बोलविले। महाराजांनी आपला विचारही बोलून दाखविला की , ' चिंता करू नका. येथे असे समर्थ लष्करी ठाणे घालतो की , आमचे सार्मथ्य पाहून सरहद्दी पलिकडचे जे शत्रू असतील , ते दहशत खाऊन उठोन निघूनच जातील. '
सरहद्दीच्या रक्षणाबद्दलचा महाराजांचा हा विचार किती मोलाचा होता! आमच्याच देशात आमचेच नागरिक निर्वासित व्हावेत हे बरे नव्हे. आमच्या सरहद्दी चिरेबंदीच असल्या पाहिजेत. आमच्या सरहद्दीवरची बायकामाणसेच काय , पोरेबाळेच काय पण गाईवासरेही निर्धास्त असली पाहिजेत. आमचे राज्यकतेर् आमच्या पाठिशी अहोरात्र जागे उभे आहेत हा विश्वास ठामपणे सर्वांच्या मनांत असला पाहिजे , हा विचार केवढा मोलाचा आहे. महाराजांच्या मनांत तोच होता.
मग श्रीगणेश पूजन झाले. मुहूर्त ठरला. चिरा बसला. बेटावर बांधकामास सुरुवात झाली. सुरतेतील खंडणी स्वराज्याच्या नव्या आरमारी तळासाठी खचीर् पडू लागली.
शाही फौजेचा पूर्ण पराभव झाला होता , तरीही विजापूरच्या आदिलशाहाने व्यंकोजीराजे भोसले यांना दोन गावे इनाम दिली , स्वराज्याविरुद्ध अन् भावाविरुद्ध इमानदारीने लढल्याबद्दलचे हे इनाम.
-बाबासाहेब पुरंदरे