शनिवार, २८ फेब्रुवारी, २००९

शिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप

वणी दिंडोरीची लढाई लहानसान झाली नाही. ते युद्धच झाले. मोकळ्या मैदानावर झाले. इ. स. १६४६ पासून ते आत्ता १६७० पर्यंत. या पंचविशीत अनेक चकमकी झाल्या. अनेक जरा मोठ्या झटापटीही झाल्या. अनेक लढाया झाल्या , त्यात मोकळ्या मैदानावर काही लढाया झाल्या.

रुस्तुमे-जमा व फाझलखान यांच्याशी कोल्हापूरजवळ २८ डिसेंबर १६५९ रोजी झालेली कोल्हापूरची लढाई , ही मोकळ्या मैदानावरची होती. ती जिंकली. त्यानंतर अनेक छोट्या झटापटीही मावळ्यांनी फत्ते केल्या. पण वणी दिंडोरीच्या मोठ्या युद्धाने मोठाच बदल दिसून आला. आता आम्ही मोकळ्या मैदानावरही शत्रूच्या तिप्पट चौपट फौजांचाही पराभव करू शकतो , हे सिद्ध झाले.

याच आत्मविश्वासाने आपली युद्धपद्धती आणि युद्धनीती आपण चालविली , तर हरलेली राक्षसतागडी , फतेपूर सिक्री आणि हळदीघाटही आम्ही पुढे फत्ते करू असा आत्मविश्वास महाराजांच्या मनात आणि सैन्याच्याही मनात निर्माण झाला असेल तर नवल काय ? आमच्या घोड्यांच्या टापा गोदावरी ओलांडून उत्तरेच्या दिशेने पडू लागल्या. आम्ही सुरतेत तापीच्या तीरापर्यंत पोहोचलो.

आता नर्मदा , नंतर चंबळा , नंतर यमुना , नंतर गंगा , रावी , झेलम , सतलज अन् नंतर सिंधू ही आम्ही पार करू शकू , अन् अटक गाठू. हिंदुकुश ओलांडू , गांधारीच्या अन् शकुनीच्या गंधारपर्यंतही पोहोचू असा विश्वास मराठी बाळांच्या बाळमुठीत अन् मराठी जवानांच्या मनगटात प्रकटला असेल काय ? कारण याच काळात महाराजांनी सुरतेच्या मोगल सुभेदाराला लिहिलेले एक पत्र साडपले आहे. त्यात ते म्हणतात , ' तुमचे मोगली घोडे माझ्या मुलुखात पराभूत होत आहेत. माझ्या मुलुखाचे रक्षण मी करणारच. तुम्ही तुमच्या बादशाह औरंगजेब आलमगीर यांना तुमचे अनुभव अन् पराभव का कळवीत नाही ?'

महाराजांनी रावजी सोमनाथ पतकी सुभेदार यांस बोलून दाखविलेले मनोगत आज अस्सल कागदोपत्री उपलब्ध झाले आहे. महाराज म्हणतात , ' सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापर्यंत अवघा मुलुख (म्हणजे आसेतु हिमाचल भारतवर्षच) मुक्त करावा महाक्षेत्रे सोडवावीत ; ऐसा मानस आहे. ' केवढी आकांक्षा! केवढी महत्त्वाकांक्षा! केवढे विशाल स्वप्न! आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे!

याच काळात इ. स. १६७१ , पावसाळा , पण नक्की तारीख उपलब्ध नाही. एक उमदा बुंदेला राजपूत युवक ऐन पावसाळ्यात महाराजांना भेटण्याकरता आपल्या मूठभर सहकाऱ्यांनिशी मोगलाईतून महाराष्ट्रात आला. त्याचे नाव छत्रसाल चंपतराय बंुदेला. वास्तविक छत्रसालाच्या वडिलांनी आणि परिवाराने मोगल बादशाहीची तनमनधनपूर्वक लष्करी चाकरी केली. पण औरंगजेबाने चंपकरायचा अखेर विश्वासघाताने अंत केला. त्याचे घरदार , सर्वस्व जप्त केले. बुंदेल्यांचे हे राजघराणे अक्षरश: रस्त्यावर आले. ' पानी पिनेके लिए मिट्टीका बर्तनभी नहीं राहा! ' अशी त्याची अवस्था झाली. छत्रसालाच्या आईने आत्मार्पण केले. छत्रसाल निराधार होऊन उघड्यावर पडला. अखेर हा तरुण (वय अंदाजे १८ वषेर् असावे) मोगलांच्या सैन्यात शिपाईगिरीची नोकरी धरून कसा बसा जगू लागला. त्याच्या बायकोचे नाव किशोरीदेवी.

बुऱ्हाणपूर येथे मुघल सरदार खान जहाँ बहाद्दूर , बहाद्दूरखान कोकलताश याची छावणी होती. त्यातच छत्रसाल होता. सुमारे दीड वर्ष आधी ( इ. स. १६६८ सुमार) मोगलांनी दिलेरखानाच्या सेनापतीत्वाखाली , नागपूर , शिवणी , छिंदवाडा , देवगड वगैरे भागाचे गोंडवनी राज्य जिंकून घेण्याकरिता मोठी मोहिम काढली. यावेळी गोंडांचा राजा होता बख्तबुलंदशहा. त्याची राजधानी छिंदवाड्याजवळ देवगडच्या किल्ल्यात होती. हा गोंड राजा पूर्ण सार्वभौम स्वतंत्र होता. त्याची कुलदेवता होती दंतेश्वरी भवानी. ते संपूर्ण गोंडराज्य जिंकून घेण्याकरिता दिलेरखानची मोहिम सुरू झाली.

अखेर दिलेरखानाने जंगलमय अन् डोंगरमय भागात असलेला देवगड काबीज करण्यासाठी वेढा घातला. हा भाग अतिशय दुर्गम म्हणूनच अजिंक्य होता. दिलेरखान सुमारे सहा महिने झुंजत होता. पण त्याला देवगड मिळेना. तेव्हा देवगड काबीज करण्याचे काम त्याने छत्रसालावर सोपविले. छत्रसालाला आनंद झाला. वास्तविक आपल्याच एका स्वतंत्र गोंडराजाचे स्वराज्य बुडवून ते औरंगजेबाच्या घशात घालण्यचे पाप आपण करीत आहोत , याची जाणीव छत्रसालाला झालीच नाही. पराक्रमाची शर्थ करून देवगड छत्रसालाने जिंकला. राजा बख्तबुलंदशहा कैद झाला. औरंगजेबाचे निशाण छत्रसालाने फडकविले.

या महापराक्रमाबद्दल छत्रसालाला काय मिळाले ? त्याला हवी होती दिल्लीच्या दरबारातील मानाची सरदारकी. पण त्याला काहीच मिळाले नाही. औरंगजेबाकडून साधे शाबासकीचे पत्रही मिळाले नाही. मानपत्रही नाही. पुष्पगुच्छही नाही. शाल आणि नारळही नाही!

या प्रकाराने छत्रसाल भयंकर नाराज झाला. दिलेरखानानंतर नेमणूक झाली बहाद्दूरखान कोकलताशची. औरंगजेबाने मराठ्यांविरुद्ध या कोकलताशची योजना केली. तो बुऱ्हाणपुरास तळ देऊन बसला. त्यात छत्रसाल होता. पावसाळा सुरू झाला होता. तो संपेपर्यंत खान छावणीतच होता. अस्वस्थ असलेला छत्रसाल विचार करीत होता. त्याच्या मनात विचार आला की , आपण इथून गुपचूप शिवाजीमहाराजांकडे जावे आणि त्यांच्या पदरी सैन्यात राहून चाकरी करावी. नर्मदेच्या उत्तरेला असा भयंकर आत्मघातकी विचार महाराणा प्रतापांच्यानंतर याच एका तरुण राजपुताच्या मनात आला. एकमेव वेडा!

आणि शिकारीला जातो असे कारण सांगून छत्रसाल आपल्या मूठभर सहकाऱ्यांच्यानिशी भर पावसात बुऱ्हाणपूर छावणीतून बाहेर पडला आणि त्याने शिवाजी महाराजांचा मार्ग धरला. त्याला जंगलातून , चिखलातून आणि नद्यानाल्यातून जावे लागत होेते. खाण्यापिण्याचे आणि मुक्कामाचे फार हाल होत होते. काही वेळेला तर सापडलेल्या शिकारीचे मांस कच्चे खाण्याची वेळ त्याच्यावर व सहकाऱ्यांवर येत होती. त्या सहकाऱ्यांत लालजी पुरोहित उर्फ गोरेलाल तिवारी या नावाचा ब्राह्माण मित्र होता. मिळेल ते खाऊन अन मिळेल ती शिकार करून हे सारे वाट तुडवीत होते. फार हाल. खाण्यापिण्याचे , गोरेलाल तिवारीचे हाल तर फारच होत होते. त्याला मांसाहार कसा चालेल ? ( कारण तो त्या काळचा ब्राह्माण होता!) छत्रसालाने गोदावरी ओलांडली , प्रवरा , भीमा , नीरा ओलांडून तो श्रीकृष्णा नदीच्या परिसरात प्रवेशला. त्याला बातमी मिळाली की , महाराज शिवाजीराजांचा मुक्काम कृष्णानदीच्या तीरावर छावणीत आहे. महाराजांची छावणी लांबवरून दिसू लागली.

-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य

हिंदवी स्वराज्य अजिबात कर्जबाजारी नव्हते. इ. १६७० हे वर्ष महाराजांना प्रचंड यशदायी धनदायी ठरले. पण याचे वर्म आणि मर्म काय ? या यशाच्या नौबतींचा आणि शिंगतुताऱ्यांचा आवाज प्रेरणादायी आहे हे खरे. पण या मागे महाराजांनी आणि त्यांच्या प्रत्येक सैनिकानेही योजनाबद्ध केलेली पूर्व आणि पूर्ण तयारी , कडक अनुशासन , तिखट शिस्त आणि आपल्या नेत्यावरती व ध्येयावरती अढळ निष्ठा व विश्वास हे या यशाचे मर्म आहे. महाराज शिवाजीराजे हे पाच वर्षात शिवनेरी गड घेण्यात अपयशी ठरले. नंतर लगेच माहुलीगड घेण्यातही प्रथम त्यांना पराभव पत्करावा लागला. बाकी सर्वत्र सर्व मावळ्यांना व सरदारांना अचूक यश मिळत गेले.

महाराजांनाच दोन ठिकाणी अपयश आले. कोणाही सरदाराच्या वा सैनिकाच्या मनांत अविश्वासाचा ठराव लिहिला गेला नाही. कारण नितांत , विश्वास आपल्या नेत्याच्या ईश्वरी महत्त्वाकांक्षेची प्रत्येकाला पुरेपूर खात्री होती. माहुलीचा किल्ला ही महाराजांनी लगेच जिंकलाच की , शिवनेरी जिंकण्याकरिता महाराजांनी पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांना आज्ञा केली. प्रधानपंतांनीही शिवनेरीवर कडवा हल्ला चढवला. पराक्रमाची साऱ्या सैन्याने शिकस्त केली पण शिवनेरी पुढे मोरोपंतांनी हार खाल्ली. मोरोपंतांना माघार घ्यावी लागली. पण माघारी फिरलेले पराभूत मोरोपंत त्र्यंबकच्या किल्ल्यावर चालून गेले. (दि. २५ ऑक्टोबर १६७० ) या दिवशी मोरोपंतांनी किल्ले त्र्यंबकगड काबीज केला. म्हणजेच इ. १६७० च्या प्रचंड विजयमालिकेत फक्त शिवनेरीचा अपवाद सोडला तर ही मालिका अपरंपार यशदायीच ठरली.

एका मागोमाग एक मोहिमा सतत चालू आहेत बघा! स्वराज्याचा अंतर्गत राज्यकारभार चोख ठेवला जात आहे. बघा. कोकण पट्टा आणि समुद फिरंग्यांना , जंजिरेकर श्यामलांना आणि मोमईकर इंग्रजांना बिनतोड जबाब देत अखंड सावधान , सारेचजण आगरी , कोळी , भंडारी , कोकणी कुणबी सारेचजण दर्यावदीर् बनले आहेत बघा. त्यामुळे महाराजांना कोकणची चिंताच वाटत नव्हती. अनुशासन ठिकेठीक होते. एक विचार मनात येतो. बोलू काय ? भारताच्या पंतप्रधान इंदिराजी यांनी (इ. १९७६ ) मध्ये एक भयंकर अवघड प्रयत्न करून पाहिला. त्यांनी वीस कलमी कार्यक्रम शासनाच्या हाती घेतला. जनतेच्या पुढे ठेवला. ती वीस कलमे खरोखरच राष्ट्राच्या हिताची नव्हती काय ? क्वचित थोडाफार कोणाचा यात मतभेद होऊ शकेल. पण उत्कृष्ट अनुशासन असावे आणि कष्टास पर्याय नाही , या दोन कलमांशी कशाकरिता कोणाचा विरोध असेल ? इंदिराजींच्या राजकीय मतांशी व धोरणांशी मतभेद असावयास हरकतच नाही. पण जे निविर्वाद राष्ट्राच्या कल्याणाचे आहे त्याच्याशीही आमचा मतभेद असावा का ? अनुशासन , कष्ट , भ्रष्टाचाररहित राज्ययंत्रणा आणि कडवे स्वराज्यप्रेम या गोष्टी शिवशाहीतही निर्धाराने पाळल्या जात होत्या. म्हणूनच हिंदवी स्वराज्य छत्रचामरांकित सार्वभौम सुवर्ण सिंहासनावर अधिष्ठित होऊ शकले ना ? आम्ही त्याचा विचार कधी करतो का ?

सुरत , नगर , हुबळी , कारंजा , नंदुरबार , औसा , इत्यादी अनेक मोगली ठाण्यांची महाराजांनी लूट केली असे आपण पाहतो. ते खरेही आहे. पण त्यातही महाराजांचे विचार , खंडणी गोळा करण्याचे नियम , त्यातील कडक अनुशासन , त्यातील नीती आणि शिस्त महाराजांनी किती दक्षतेने पाळली होती. याचाही अभ्यास झाला पाहिजे. कोणाही गरीब कुटुंबाला झळ लागू नये याची दक्षता ते घेत होते. ज्यांना ' श्रीमंत ' म्हणता येईल अशा लक्षाधिशांना आणि ज्यांना ' नबकोट नारायण ' म्हणता येईल अशा अतिश्रीमंतांना महाराज पैसे मागत होते. त्याच्या पावत्याही दिल्या जात. पुन्हा त्या पावतीधारकांना कोणीही त्रास देत नसे. तत्कालीन उद्योगधंद्यांचे कारखाने उभे करावेत आणि परदेशांशीही आयात-निर्यातीचा व्यापार करावा असे विचार महाराजांच्या मनात येत नव्हते असे नाही. थोडाफार प्रयत्न त्यांनी केलेला दिसूनही येतो. पण पारतंत्र्यातलाच स्वदेश स्वतंत्र करण्याकरिता युद्धाचाच प्रचंड खचिर्क उद्योग महाराजांना करावा लागल्यामुळे शांततेतच करण्यासारखे बाकीचे उद्योगधंदे करण्यास त्यांना वेळ , स्वास्थ्य आणि पैसाही पुरेसा नव्हता. या साऱ्या लुटींच्या मागे एक कठोर पण निश्चित उदात्त हेतू होता. स्वराज्य श्रीमंत पैसेवाले नव्हते. खाऊनपिऊन सुखी होते. स्वराज्याला एक पैशाचेही कर्ज नव्हते. पुढे पेशवाईत प्रत्येकाला कर्जच होते.

स्वराज्य स्वावलंबी असावे असा प्रयत्न महाराजांचा होता. गलबते बांधण्याचे कारखाने (गोद्या) त्यांनी कोकणात काढले होते. पुरंदर किल्ल्यावर तोफा ओतण्याचाही कारखाना त्यांनी काढला होता. गावोगावच्या गावकामगारांना चांगल्या प्रमाणात उद्योगधंदे मिळत होते. सुतार , लोहार , चांभार , मातंग इत्यादी छोट्या पण पारंपरिक व्यावसायिकांना हाताला काम अन् पोटाला दाम मिळत होता. मिठागरांना कोकणात पूर्ण संरक्षण होते. वतनदारांपासून इतकेच नव्हे तर धामिर्क देवदेवस्थानांपासूनही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये , त्यांना भुर्दंड बसू नये याबाबतीत ते दक्ष होते. याबद्दलची अनेक पत्रे उपलब्ध आहेत.

या कालखंडात मराठी बंदरांतून आखाती देशांशी विशेषत: मस्कतसारख्या शहरी बंदरांशी व्यापार चालत होता. याबाबतीत डॉ. बी. के. आपटे यांचा मराठी व्यापारी आरमाराच्या संबंधीचा इतिहास ग्रंथ वाचनीय आहे.

अरबी व्यापारीही घोड्यांचा व हत्यारांचा व्यापार स्वराज्याच्या बंदरांशी निर्धास्तपणे करू शकत होते. त्यांच्यावर आथिर्क , धामिर्क किंवा शारीरिक जुलुम जबरदस्ती कधीही होत नसे. पण एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. अरबस्थानातून काही सौदागर बरेचसे (नक्की आकडा माहीत नाही) अरबी जातिवंत घोडे विकावयास भारतात आणीत होते. असा व्यापार नेहमीच चालायचा. घोड्यांना निरनिराळ्या भारतातील सत्ताधाऱ्यांची , सरदारांची , श्रीमंतांची आणि व्यापाऱ्यांचीही मागणी असायची. हे घोडे मराठी राज्यातल्या बंदरातही उतरायचे. एकदा असेच बहुदा मोठ्या संख्येने अरबी सौदागरांनी गिऱ्हाईकांची मागणी पुरविण्यासाठी घोडे राजापूर बंदरात आणले.

ही घोड्यांची गलबते येत असल्याची बातमी महाराजांना रायगडावर समजली. महाराजांनी राजापुरच्या आपल्या अधिकाऱ्यांना आज्ञा पाठविली की , ' हे अरबी घोडे ताब्यात घ्या आणि त्याची जी काही किंमत असेल ती ताबडतोब द्या. ' त्याप्रमाणे राजापुरच्या सुभेदाराने हे घोडे जागीच ताब्यात घेतले आणि त्यांनी अरबी सौदागरांना सांगितले की , ' तुमच्या अन्य कोणा गिऱ्हाईकांना हे घोडे यावेळी विकत न देता आम्हालाच विकत द्या. महाराजसाहेब याची पूर्ण किंमत आपणास देतील. ' अरबांना हे मान्य करणे भागच होते. त्यात त्यांचे नुकसानही नव्हते. थोडीशी सक्ती होती पण जुलुम अजिबात नव्हता. अशा व्यवहाराला म्हणत असत ' खूशखरेदी. '

-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र

महाराजांच्या जीवनातील अनेक घटना आणि मोहिमा यांचा वेग इतका विलक्षण दिसतो की , अशा प्रकरणांना नाव काय द्यावे ? त्याला पुन्हा तेच नाव द्यावेसे वाटते ' आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे ' खरं म्हणजे महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र हे पर्यायी नाव झाले.

मोगलांविरुद्ध महाराजांनी सिंहगड मिळवून मोहिम सुरू केली. दि. ४ फेब्रुवारी १६७० अन् लगेच मराठी सैन्याचे क्षेपणास्त्र सुटले. पुरंदरच्या पराभवी तहाच्या या क्षेपणास्त्राने ठिकऱ्या उडविल्या. औरंगजेबाला दिलेले सर्व किल्ले महाराजांनी परत जिंकले. त्यांनी स्वत: जिंकलेला किल्ला कर्नाळा. दि. २२ जून १६७० म्हणजे चार फेब्रुवारी ते २२ जून अवघ्या पाच महिन्यात हा प्रचंड झपाटा शिवसैन्याने दाखवला. पावसाळा सुरू झाला. लढणारे सैन्य शेतात राबू लागले. ऑक्टोबर १६७० प्रारंभी म्हणजेच दसऱ्याला मोहिमा पुन्हा शिलंगणाला निघाल्या. पंधरा हजारा स्वारांची फौज कल्याणहून सुरतेच्या रोखानं रोरावत निघाली आणि ऐन दिवाळीत मराठी फौज सुरतेत शिरली. सुरत स्वारीची ही दुसरी आवृत्ती दिवाळीच्या प्रकाशात प्रसिद्ध होत होती. मात्र पहिल्या सुरत स्वारीपेक्षा (इ. स. १६६४ जानेवारी) ही दुसरी स्वारी लढायांनी गाजली.

सर्व प्रतिकारांना तोंड देतदेत सुरतेची सफाई मराठे करीत होते. नेहमीप्रमाणे इंग्रजांनी आपल्या वरवारींचे रक्षण केले. मराठ्यांची इंग्रजांची गोळाबारी चालूच होती. तरीही इंग्रज वाकेनात. पण आपण फार हट्टाला पेटलो तर मराठे आपला सर्वनाश करतील हे इंग्रजांच्या लक्षात आले. त्यांचा प्रमुख स्ट्रीनशॅम मास्टर याने नमते घेऊन आपला वकील नजराण्यासह महाराजांकडे पाठविला. या नजराण्यात उत्कृष्ट तलवारी आणि मौल्यवान कापडही होते. महाराज एवढ्याने सुखावणार नव्हते. पण अधिक वेळ व आपली अधिक माणसे खचीर् घालून आत्तातरी इंग्रजांकडून अधिक फारसे मिळणार नाही , फक्त जय मिळेल हे लक्षात घेऊन महाराजांनी इंग्रजांशी चाललेले रणांगण थांबविले. मुख्य कारण म्हणजे महाराजांना झपाट्याने सुरतेहून निघून जाणे जरुरीचे होते. नाहीतर मोगलांच्या फौजा जर आल्या , तर संपत्तीच्याऐवजी जबर संघर्षच समोर उभा राहील. मूळ हेतू सफळ होणार नाही हे लक्षात घेऊन महाराज थांबले. सुरतेतली संपत्ती (नक्की आकडा सांगता येत नाही) घेऊन महाराजांनी नासिकच्या दिशेने कूच केले. ही दिवाळी आनंदाची आणि सुख समृद्धीची झाली.

पूर्वी महाराज सुरतेवर येऊन गेले होते हे लक्षात असूनही औरंगजेबाने सुरतेच्या संरक्षणाची विशेष व्यवस्था केलेली नव्हती. सावध होते आणि कडवेपणाने वागले ते इंग्रजच. या त्यांच्या कडवेपणाचा परिणाम म्हणजे , याच सुरतेचे ते पंच्याऐंशी वर्षांनी म्हणजे इ. स. १७५६ मध्ये सत्ताधारी पूर्ण मालक बनले. सुरतेचा इंग्रज अधिकारी स्ट्रीनशॅम मास्टर हा जेव्हा इंग्लंडला परत गेला. तेव्हा लंडनमध्ये त्याचा ' राष्ट्राची प्रतिष्ठा वाढविणारा शूर नेता ' म्हणून सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला.

त्या सीवाने दुसऱ्यांदा आपली बदसुरत केली याचा राग औरंगजेबाला आलाच. तहात मिळविलेले सर्व किल्ले आणि मुलुख सीवाने घेतलेच होते. आता सुरतेत आपली त्याने बेअब्रुही केली याचा हिशेब औरंगजेबाच्या डोळ्यापुढे उभा राहिला होता. आग्ऱ्यात आपण त्याच्याशी ज्या पद्धतीने वागलो , त्याचे अपमान केले , त्याला कैदेत टाकले , त्याला ठार मारण्याचे बेत केले त्याचा हा सीवाने घेतलेला सूड होता हे औरंगजेबाच्या लक्षात आले.

शाही वाढदिवसाच्यादिवशी सीवाने अर्पण केलेला सोन्याच्या मोहरांचा नजराणा आणि केलेले मुजरे औरंगजेबाला फार फार महागात पडले.

महाराज सुरतेच्या संपत्तीसह व फौजेसह बागलाणात (नासिक जिल्हा , उत्तर भाग) पोहोचले. सुरतेवरच्या या दुसऱ्या छाप्याची बातमी औरंगाबाद , बुऱ्हाणपूर , अहमदाबाद इत्यादी ठिकाणी पोहोचली होती. बुऱ्हाणपुराहून दाऊदखान कुरेशी झपाट्याने महाराजांना अडविण्यासाठी निघाला आणि त्याने वणी दिंडोरीच्या जवळ महाराजांना रात्रीच्या अंधारात गाठले. ही कातिर्की पौणिर्मेची रात्र होती. दि. १६ ऑक्टोबर १६७० . भयंकर युद्ध पेटले. दाऊदखान , इकलासखान , रायमकरंद , संग्रामखान घोरी , इत्यादी नामवंत मोगली सरदार महाराजांवर तुटून पडले होते. आणलेली संपत्ती सुखरूप सांभाळून आलेला हा प्रचंड हल्ला फोडून काढण्याचा महाराजांचा अवघड डाव , साऱ्या मराठ्यांनी एकवटून यशस्वी केला. रात्रीपासून संपूर्ण दिवस ( दि. १७ ऑक्टोबर) हे भयंकर रणकंदन चालू होते. अनंत हातांची ती वणीची सप्तश्रृंग भवानी जणू मराठ्यांच्या अनंत हातात प्रवेशली होती. मोगली सैन्याचा प्रचंड पराभव झाला. महाराज स्वत: रणांगणात झुंजत होते. कातिर्केच्या पौणिर्मेसारखंच महाराजांना धवल यश मिळाले. मोगलांचा हा प्रचंड पराभव होता. आपल्या हे लक्षात आलं ना , की ही लढाई मोकळ्या मैदानावर झाली. गनिमी काव्याया छुप्या छाप्यांच्याही पलिकडे जाऊन मोकळ्या मैदानात अन् रात्रीच्या अंधारातही महाराज अन् मावळे झुंजले अन् फत्ते पावले.

-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती

महाराष्ट्राच्या इतिहासात दोन हजार वर्षांपूवीर् शालिवाहन कुळात गौतमी या नावाची एक प्रभावशाली ' आई ' होऊन गेली. सातकणीर् शालिवाहन हा तिचा पूत्र. पैठणचा सम्राट. तो स्वत:ला अभिमानाने अन् कृतज्ञतेने म्हणवून घेत असे ' गौतमीपुत्र सातकर्णी सातवाहन '. नाशिक आणि पुणे परगण्यांत असलेल्या लेण्यांमधील शिलालेखांत या मायलेकांचे उल्लेख सापडतात. त्या महान राजमातेनंतर महाराष्ट्राला महान राजमाता आणि लोकमाता लाभली ती जिजाऊसाहेबांच्या रूपाने.

जिजाऊसाहेबांच्या बद्दलची कागदपत्रे त्या मानाने थोडीफारच गवसली आहेत. पण साधार तर्काने व परिस्थितीजन्य पुराव्यांनी हे चरित्र आपल्या मन:पटलावर उत्तम ' फोकस ' होते. इ. १६ 3 ० ते 33 पर्यंतचे शिवाजीराजांचे शिशुपण त्यातून डोळ्यापुढे येते. नंतर राजांचे बालपणही अधिक स्पष्ट होत जाते. त्यांच्या बालपणच्या खेळांचे आणि खेळण्यांचे सापडलेले उल्लेख मामिर्क आहेत. त्यातील एक उल्लेख असा आहे की , आपल्या सौंगड्यांच्याबरोबर शिवाजीराजे लढाईचे खेळ खेळताहेत. या लुटुपुटीच्या लढाईत मातीच्या ढिगाऱ्यांचे किल्ले करून ते जिंकण्याची राजे आणि त्यांचे चिमणे सैनिक शर्थ करताहेत. अन् राजे म्हणताहेत , ' हे किल्ले आपले. आपण येथे राज्य करू. ' इथं राजांचे पाय पाळण्यात दिसतात. अन् राजमातेचे महत्त्वाकांक्षी मन त्या पाळण्याच्या झोक्यांप्रमाणेच घोडदौड करताना दिसते.

आपल्याकडे एक लोकांचा लाडका विषय अजूनही सतत चचेर्त चवीने चघळताना दिसतो. तो म्हणजे शिवाजीमहाराज अशिक्षितच काय पण पूर्ण निरक्षर होते! त्यांना साधी सहीसुद्धा करता येत नव्हती. स्वत:च्या वर्तमानकालीन अडाणीपणाचे समर्थन शिवाजीमहाराजांचा आधार घेऊन तर आम्ही करत नाही ना ? वास्तविक महाराज निरक्षर होते. त्यांना सहीसुद्धा करता येत नव्हती हा आरोपच पूर्ण खोटा आहे. हा आरोप ग्रँट डफ यांच्यापासून डॉ. यदुनाथ सरकारांपर्यंत अनेक इतिहासकारांनी केला आहे. महाराजांवर निरक्षरतेचा आरोप करणे म्हणजे राजमातेवरच , मुलाच्या बाबतीत निष्काळजी राहिल्याचा आरोप करणे आहे. तो खोटा आहे. आता तर महाराजांच्या हस्ताक्षारांनी लेखनसीमा केलेली किती तरी पत्रे मिळाली आहेत. त्यांच्या विद्येचे इतरही अनेक पुरावे सापडले आहेत. त्यावर एक स्वतंत्र प्रकरणच लिहिता येईल. अविद्येने मति जाते , मति विना गती जाते , गतिविना सर्वस्व जाते हे राजमातेच्या आणि पुढे महाराजांच्या मनात किती खोलवर रुजले होते , हे अभ्यासकांच्या लक्षात येते. शिवाजी महाराजांची सर्वांगीण अतिसुंदर आणि कर्तबगार अशी घडण जिजाऊसाहेबांनीच केली.

शिवाजीमहाराज जे काही शिकले ते अंतर्मुख होऊन विचारांनी शिकले. त्यांच्या विचारात विवेक होता. अंत:चक्षूंनी ते गगनालाही ठेंगणे करून टाकतील अशा भावना , अशी स्वप्ने , अशा आकांक्षा ते पाहात होते. नंतर कृतीत आणत होते. पूर्ण व्यवहारी दृष्टीने वागत होते. मागच्या पिढ्यांत घडलेल्या घटनांचा खोलवर विचार करीत होते. त्यातून शिकत होते. प्रत्येक गोष्ट स्वत: अनुभव घेऊनच शिकायची असं ठरविलं तर माणसाला मार्कंडेयाचं आयुष्यही पुरणार नाही. ते शिकण्याकरताच इतिहासाचा अभ्यास आवश्यक असतो. इतिहास म्हणजे साक्षात अनुभव.

म्हणूनच आज (इ. स. २००५ अन् पुढेही) आम्ही इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. असे केल्याने काय होईल ? असे केल्याने आमच्या राष्ट्रीय आकांक्षा , सामाजिक आकांक्षा अन् व्यक्तिगत आकांक्षाही गगनाला ठेंगणे करून सूर्यमंडळही भेदून जातील. म्हणून शिवचरित्र! अन् म्हणूनच महारुद हनुमानाचाही अभ्यास. नारळ फोडण्याकरता नव्हे , शंभरापैकी पस्तीस मार्क मिळवून पास होण्यासाठीही नव्हे , तर कलेच्या आणि शास्त्रांच्या अंगोपांगात. सूर्यबिंब गाठण्याइतकी झेप घेण्याच्या महत्त्वाकांक्षेसाठी. टागोर , विवेकानंद , रामन , डॉ. भाभा , राजा रविवर्मा , योद्धा अब्दुल हमीद , अन् आजही आपल्या पुढे साक्षात तळपत असलेले राष्ट्रपती अब्दुल कलाम अर्मत्य सेन , रविशंकर , भारतरत्न लता मंगेशकर , डॉ. विजय भटकर , शिल्पकार सदाशिव साठे अशी कर्तृत्त्वाचे शतसूर्य शोधिताना शतआतीर् धन्य होत आहेतच ना!

जिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे यांची चरित्रे मिळून एकच महान महाभारत आपल्यापुढे उभे आहे.

जिजाऊसाहेबांच्या चरित्रात एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते. पाहा पटते का. शिवाजीराजांना त्यांनी पाळण्यापासून सिंहासनापर्यंत घडविलं. हाती छिन्नी- हातोडा घेतला तो प्रखर बुद्धिचा अन् सुसंस्काराचा , राजसंस्काराचा , स्वत: राजांना बोटाशी धरून राजांच्या सोळाव्या सतराव्या वयापर्यंत त्यांनी राज्यकारभाराचे अन् राजरणनीतीचे मार्ग हारविले. स्वत: न्याय आणि राज्यकारभार केला. नंतर आपण स्वत: राजव्यवहारातून अलगद पावले टाकीत त्या बाजूला होत गेल्या. राजांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. अन् राजांच्या अनुपस्थितीत , विशेषत: आग्ऱ्याच्या भयंकर संकट काळात , स्वराज्याचा संपूर्ण राज्यकारभार स्वत: पाहिला. अगदी चोख.

कुठेही काहीही कमी न पडू देता. अन् नंतर संपूर्ण प्रसन्न मनाने आणि समाधानाने त्यांनी राज्यकारभारातून निवृत्ती घेतली. पाहा आपण : इ. स. १६७० पासून पुढे याच क्रमाने जिजाऊसाहेबांचे जीवनचरित घडत गेले की नाही ? गोष्टी सांगेन युक्तिच्या चार हीच भूमिका त्यांची दिसून येते. मोह , लोभ , उपभोग , सत्तेची हाव इत्यादी विषारी पदार्थांचा त्यांनी स्वत:ला कधी स्पर्शही होऊ दिला नाही. त्यांच्या तेजाचे वलय हे हिंदवी स्वराज्याच्या मागे शेवटपर्यंत फिरत मात्र राहिले. कवी जयराम पिंड्ये यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे खरोखर जिजाऊसाहेबांचे जीवन कादंबिनिवत् जगजीवनदान हेतूनेच भरून राहिले होते. त्यांच्या जीवनाला रंगच द्यायचा असेल , तर तो भगवा रंगच द्यावा लागेल.

सत्ता , संपत्ती , तारुण्य , सौंदर्य आणि आयुष्य याचा कुणी मोह धरू नये. हे सारं वा यातील काही प्राप्त झाले तर त्याचा योग्य तो उपयोग करावा. ते आज असते , उद्या संपते. शिल्लक राहतो तो त्याचा ' कसा उपयोग केला ' तो इतिहास.

- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता - एक समर्थ नेतृत्व

रायगडावर राजधानीच्या दृष्टीने अनेक बांधकामे सुरू झाली. हळूहळू पूर्ण होत गेली. त्याचवेळी रायगडच्या डोंगरवाटेवर निम्म्यावरती पाचाड येथे विशाल सपाटी पाहून महाराजांनी छान राजवाडा बांधला. वाड्याच्या भोवती चिरेबंद बुरुज आणि दोन भव्य दरवाजेही बांधले. पाचाड हे एक छोटेसे कोकणी खेडेगाव , या राजवाड्याच्या अगदी जवळच आहे. पाचाडातील लोकवस्ती शेतकऱ्यांची त्यात अनेक जातीजमातींची घरं , हा पाचाडचा वाडा महाराजांनी आपल्या आईकरिता बांधला. या वाड्याला आज जिजाऊसाहेबांचा वाडा असेच म्हणतात. आता हा पडून मोडून पडला आहे. तरीही त्याच्यावर सारेजण आदरपूर्वक प्रेम करतात. पाऊस काळात आणि थंडीत रायगडाच्या ऐन माथ्यावर हवा फार गारठ्याची असते. म्हणून या काळात आऊसाहेबांना मुक्कामाला हा वाडा सोईचा असे. महाराजही राहात.

इथं वाड्यात सर्व प्रकारच्या सोई महाराजांनी केल्या. त्यात एक विहीर चिरेबंदी बांधली. छोटीशीच. पण देखणी. पाचाडमधल्या गावकऱ्यांनाही पाणी न्यायला वापरायला ही विहीर मुक्त होती. या विहिरीच्या काठावर खेटूनच एक लहानसा चिरेबंदी ओटा बांधलेला आहे. त्यावर टेकून बसायला एक सुबक तक्क्याही बांधलेला आहे. तक्क्या अर्थात अखंड एका दगडाचाच. महाराज जेव्हा जेव्हा पाचाडला मुक्कामला असत , तेव्हा तेव्हा कधी सकाळी तर कधी मावळतेवेळी ते इथं या विहिरीवर तक्क्याशी बसत. गावातल्या आयाबाया पाणी भरायला विहीरीवर येत. कोणा कोणा बायांच्या संगतीला त्यांची लहानगी मुलं बोट धरून येत. महाराजांना ते फार आवडे. ते त्या लेकीसुनांची अतिशय आस्थेनं चौकशी , विचारपूस करीत. त्यांच्या लहानग्या पोरांना महाराज जवळ घेत आणि त्यांना काही खाऊ देत. हे महाराजांचं मायेचं वागणं औरंगजेबाच्या दरबारातील मोहम्मद हाशीम खाफीखान या तवारीखनवीसाला समजलं. त्याला नवल वाटलं. प्रजेतल्या बायकामुलांना हा राजा आपल्याच कुटुंबातल्या माणसांसारखं वागवितो याची त्याला मोठी कौतुकानं गंमत वाटली.

इथं एक गोष्ट सहज मनात येते की , या तक्क्याच्या विहिरीवर पाणी भरायला येणारी सारी माणसं विविध जातींची असत. त्यांनाही हे राजमातेच्या राजवाड्यातील पाणी , वाड्यात येऊन , विहिरीवर भरता येत होतं. अधिक काय लिहिणे ?

कधी गडाच्या माथ्यावरील राजवाड्यात तर कधी पाचाडमधल्या राजवाड्यात जिजाऊ आऊसाहेबांचा मुक्काम असायचा. अखेर जिजाऊसाहेबांनी आपला शेवटचा श्वास याच पाचाडच्या वाड्यात सोडला. आऊसाहेब सर्वांशीच आईच्या मायेनं वागत असत असं उपलब्ध असलेल्या अस्सल कागदपत्रांवरून दिसून येतं. ही आई एखाद्या योगिनीसारखीच जगली आणि वागली. जयराम गंभीरराव पिंड्ये या नावाचा एक विद्वान कवी महाराज होता. तो मूळचा राहणारा वणीच्या सप्तश्रृंगीच्या परिसरातील होता. त्यांनी लिहून ठेवलेले दोन गंथ सापडले आहेत. त्यातील त्यांनी जिजाऊसाहेबांच्या बद्दल काढलेले उद्गार मननीच आहेत. जयराम म्हणतो , ही जिजाऊसाहेब कशी आहे ? ' कादंबिनिव जगजिवनदानहेतु:! योगिनीप्रमाणे जगाला जीवन देणारी ही राजाची आई आहे. नव्हे जगाचीच आई आहे. एका मराठी बखरांत जिजाऊसाहेबांच्याबद्दल म्हटलंय , की , ' जिजाऊसारखे कन्यारत्न ईश्वराने पैदा केले. '

सर्वसामान्यपणे स्त्री स्वभावात दिसून येणारी वेगळी वैशिष्ट्ये जिजाऊसाहेबांत नव्हती असे दिसते.

मोठेपणाचा अहंकार नाही. डागडागिन्यांचा सोस नाही. नात्या गोत्यातल्या कोणाचा मत्सर नाही किंवा कुणाचे फाजील लाडकौतुकही नाही. सवती मत्सर नाही. तीर्थयात्रे करिता का होईना पण भटकण्याची हौस नाही. पुण्याजवळच्या आळंदी , देहू , सासवड , जेजुरी , चिंचवड , मोरगांव , शिखर शिंगणापूर , पाषाण अशा जवळजवळच्या तीर्थक्षेत्रांत त्या क्वचित गेल्याही असतील. त्यांच्या काही नोंदीही सापडल्या आहेत. त्यांनी देवाला दिलेली दानपत्रेही आहेत. पण या सगळ्या देवधर्मात आणि यात्रेजत्रेत कुठेही चंगळवाद दिसत नाही. शिखर शिंगणापूरच्या देवळाच्या बाहेर त्यांनी एक साधे पण भव्य प्रवेशद्वार (कमान) बांधले आहे. त्या कमानीच्या पायरीवर राजे भोसले. एवढाच दोन ओळीत त्यात मजकूर आहे. यातील संभाजीराजे भोसले म्हणजे जिजाऊसाहेबांचे थोरले पूत्र. आपल्या दोन मुलांच्या नावाने आऊसाहेबांनी ही कमान बांधली असा याचा अर्थ आहे. पाषाण येथील श्री सोमेश्वर महादेवाच्या मंदिराचा त्यांनी जीणोर्द्धारही केला. या मंदिराच्या सभामंडपात भिंतीवर सुंदर रंगीत पौराणिक चित्रे चितारण्यात आलेली होती. या चित्रांची थोडीफार प्रसिद्धीही महाराष्ट्र शासनाने केली. आता मात्र आम्ही मंडळींनी या मंदिराची सुधारणा करण्याच्या नादात ही चित्रे (म्युरल्स) चांगली ठेवलेली नाहीत. पाषाणच्या या सुंदर शिवमंदिराच्या पश्चिमेस तट , ओवऱ्या आणि पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायऱ्यांशेजारूनच ' राम ' नावाची एक छोटी नदी वाहते. या नदीच्या पात्रात सुंदर बंधारा आणि लकुंडे बांधलेली आहेत. हे सारेच प्रेक्षणीय काम जिजाऊसाहेबांच्या पुण्यातील वास्तव्य काळात (इ. १६ 3 ७ ते इ. १६४५ ) झालेले आहे. ही बाई फार दूरदृष्टीची , विवेकी होती. याच काळातले तिने न्यायासनावर बसून दिलेले न्यायनिवाडे अगदी समतोल आहेत. शेतकऱ्यांना आणि दारिद्याने होरपळलेल्या अन् शाही गुलामगिरीत पिचून निघालेल्या अनेक लोकांना तिने दिलेला मदतीचा हात म्हणजे भावी शिवशाहीच्या सुखी स्वराज्याची शुभचाहुलच होती.

जिजाऊसाहेब शिवाजीराजांना घेऊन पुण्यात आल्या , ( इ. १६ 3 ७ फेब्रुवारी) त्यावेळी आदिलशाही फौजांनी कसबा पुणे आणि इतर छत्तीस गावे फार चुरगाळून मुरगाळून टाकली होती. (इ. १६ 3 २ ) त्यातच इ. १६ 3 ० आणि १६ 3 १ चा भयंकर दुष्काळ पडला होता. त्यात कर्यात मावळाचं म्हणजेच पुणे प्रदेशाचंही भयंकर नुकसान झालं. या अस्मानी आणि सुलतानी संकटात संसार होरपळून निघाले. आऊसाहेब आणि राजे इ. १६ 3 ७ मध्ये पुण्याला आले आणि त्यांनी पुणे आणि परगणा पुन्हा स्थिरस्थावर करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या , त्या अभ्यासनीय आहेत. गरजवंत गावकऱ्यांना त्यांनी ' ऐनजिनसी ' मदत केली. म्हणजे शेती आणि अन्य बलुतेदारीतील व्यवसाय करण्याकरिता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता , असते , त्या गोष्टीच त्यांना दिल्या. म्हणजे बैल , मोट , शेतीची अवजारे इत्यादी. यामुळे बारा बलुतेदार व इतरही गावकरी आपापल्या उद्योगाला इषेर् हौसेने लागले. रानटी जनावरांचा आणि चोराचिलटांचा बंदोबस्त केला. तेही काम त्यांनी गावागावच्या तराळ , जागले , येसकर , पाटील पटवारी यांच्यावर सोपविले. रानटी जनावरं म्हणजे वाघ , बिबटे , रानडुकरे , इत्यादींचा गावकऱ्यांनीच उपदव कमी करून टाकला. त्याबद्दलही या मंडळींना थोडेफार कौतुकाचे ' शेपटामागे इनाम बक्षीस ' देण्यात येत होते. हा तपशील आणखीही मोठा आहे. जिजाऊसाहेबांच्या नेतृत्त्वाखाली ही लोकांच्या सोईसुखाची कामे त्यांनी केली. लोकांचेच सहकार्य त्यांत मिळविल्यामुळे पुणे परगणा ताजातवाणा झाला. सहज मनांत येते की , आजच्या काळात आमच्या निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना , मग ते ग्रामपंचायतीचे असोत की विधानसभा अन् संसदेचे असोत , त्यांना या शिवशाहीच्या उष:कालात जिजाऊसाहेबांनी केलेल्या जनहितांच्या कार्यातून निश्चित मार्गदर्शन मिळू शकेल आणि प्रेरणाही मिळेल. शिवकालातील आऊसाहेबांचे आणि संस्थानी काळातील राजषीर् छत्रपती शाहू महाराजांचे विधायक कार्य म्हणजे खरोखर महाराष्ट्राला अत्यंत उपयुक्त अशी लोकराज्यकारभाराची गाथाच आहे. पण लक्षात कोण घेतो ?

- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा

काल आपण हिरा गौळणीची ' कथा ' ऐकलीत. उपलब्ध असलेल्या आणि पुण्याच्या ऐतिहासिक सरकारी दप्तरखान्यात जपलेल्या रुमालांत ' हिरकणीचा कडा ', ' हिरकणी बुरुज ', ' हिरकणीचा पहारा ,' इत्यादी शब्द असलेली अक्षरश: शेकडो अस्सल कागदपत्रे आज आपल्याला अभ्यासासाठी मिळतात. या हिरकणीच्या उल्लेखांवरून ही हिरा गवळणीची हकीगत वास्तव असावी , असे दिसून येते.

महाराजांनी , हिरा गवळण ज्या भयंकर अवघड कड्यावरून उतरून गेली , त्या कड्याच्या माथ्यावर नव्याने भरभक्कम बुरुज बांधण्याची इमारत खात्याला आज्ञा दिली. हिराजी इंदुलकर सुभेदार , खाते इमारत यांनी हा बुरुज बांधला.

गिर्यारोहण करणाऱ्या युवायुवतींना ही हिरा गवळण कायमची पेरणादायी ठरली आहे. ऐतिहासिक आख्यायिकाही किती प्रेरक आणि मार्गदर्शक ठरतात , त्याचा हा अनुभव आहे.

रायगडाच्या एकूण बांधकामावरती विजापूरच्या आदिलशाही बांधकामाचा (वास्तु-स्थापत्य कामाचा) खूपच परिणाम दिसून येतो. मेडोज टेलर यांनी इ.स. १८८५ मध्ये लिहिलेला ' विजापूर आर्ट अॅण्ड आकिर्टेक्चर ' हा ग्रंथ जरूर पाहावा आणि रायगडचाही अभ्यास अभ्यासकांनी करावा.

रायगडाचं ऐतिहासिक , भौगोलिक , सांस्कृतिक आणि गनिमी काव्याच्या दृष्टीने लष्करी महत्त्व किती मोठे आहे. हे आमच्या लोकांना कधीच समजले नाही. छत्रपती शकर्कत्या शिवाजीमहाराजांच्या राजधानीचा म्हणजे ' तख्ताचा जागा ' रायगड पेशवाईत इ.स. १७ 3 ४ पासून १८१८ पर्यंत केवळ अडगळीत पडला होता. त्याचे महत्त्व पेशव्यांना काहीच वाटले नाही. या कालखंडात सातारा , कोल्हापूर , तंजावर येथील प्रत्यक्ष राजघराण्यातील एकही व्यक्ती रायगडावर आली नाही. तसेच एकही पेशवासुद्धा आला नाही. रायगड म्हणजे राजकीय कैदी ठेवण्याचा केवळ तुरुंग ठरला. अखेरच्या काळात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांच्या विधवा पत्नीला या रायगडावर कैदेत ठेवले होते. तिचे नाव श्रीमंत यशोदाबाईसाहेब. त्या रायगडावर अकरा डिसेंबर १८११ या दिवशी मृत्यू पावल्या. भडाग्नी देऊन त्यांचे गडावर दहन करण्यात आले. बस्स! एवढाच पेशवे घराण्याचा अन् रायगडाचा सुतकसंबंध. साडेतीन शहण्यातला प्रख्यात मुत्सद्दी शहाणा सखाराम बापू बोकील हाही बारभाईंच्या कारकीदीर्त रायगडावर तुरुंगात होता. त्याचाही मृत्यू येथेच झाला. एकूण रायगड तो स्वर्गास बहुत जवळ ठरला ?

रायगड इ.स. १७ 3 ४ पासून इ.स. १८१८ , ९ मेपर्यंत मराठी सत्तेखाली होता. आश्चर्य म्हणजे रायगडावर याच काळात राजसभेच्या भव्य महालांत सिंहासनाच्या डाव्या उजव्या बाजूस विटांचे हौद बांधण्यात आले. (ते आजही शिल्लक आहेत.) त्या हौदात धान्य भरून ठेवीत. म्हणजेच प्रत्यक्ष राज्याभिषेक झाला , त्या राजसभा मंदिराचे धान्याचे कोठार बनवले गेले. वास्तविक या राजसभेचे एक स्वातंत्र्यदेवतेचे मंदिर म्हणून वैभवसंपन्न असे प्रेरणादायी स्मारक म्हणून मराठी सत्ताधीशांनी जपणूक करावयास हवी होती. पण त्यांनी गडाचा बनवला तुरुंग आणि राजसिंहासन सभेचे बनवले गोदाम. संपूर्ण शिवचरित्राकडेच पेशवाईत दुर्लक्ष झाले ; तिथे एका रायगडाची काय कथा ? राज्यकारभार , युद्धपद्धती , अष्टप्रधान पद्धती , आरमार , परराष्ट्रनीती , स्वराज्यानिष्ठा आणि अलिखित राज्यघटना या शिवराष्ट्रधर्माचा आम्ही कधी विचारही केला नाही. मग अभ्यास कुठला ? त्याचे आचरण कुठले ?

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे केवळ कोणा एका असामान्य मानवाचे चरित्र नाही. ती एक राष्ट्रधर्माची , राष्ट्रीय चरित्र्याची आणि राष्ट्रनिष्ठेची गाथा आहे. ती आम्ही गुंडाळून ठेवली. आजही आम्ही काही वेगळे वागतो आहोत का ? मिरवणुकी , गुलाल , वर्गण्या , जयजयकार , अन् पुतळेच पुतळे , याशिवाय काही करतो आहोत का ?

रायगडाच्या बाबतीत फक्त एकच गोड आनंददायी असा अपवाद इ.स. १७९८ च्या काळात नाना फडणवीसांनी केला. त्यांनी महाराजांच्या राजसभेतील सिंहासनाच्या चौथऱ्याची नित्य उत्तम व्यवस्था आस्थापूर्वक सुरू केली. नंदादीप , पूजा , कीर्तन , त्रिकाळ सनई चौघडा इत्यादी मंगल आचार उपचार सुरू केले.

पेशवाईच्या अगदी शेवटच्या पर्वात ते ही बंद पडले. नगाऱ्यावर अखेरची टिपरी पडली. आमचे राष्ट्रीय चलनवलनच संपले. आम्ही ' कोमा ' त गेलो. जिवंत असूनही मेलो.

रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला. कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता. या वेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेखान. आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता. मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते. पण अखेर दहाव्याच दिवशी म्हणजे १० मे १८१८ या दिवशी रायगडावर दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट होऊन सारा गड धडाडून पेटला. वरून सूर्याची उन्हाळी आग , खालून इंग्रजांची तोफाबंदुकांची आग अन् गडावरही आगच आग. रायगड होरपळून गेला. शत्रू कॅ. प्रॉथर गडात शिरला. भयंकर अवस्था झाली होती रायगडाची. प्रॉथर गडात आला , तेव्हा एका खुरट्या लहानग्या झुडपाच्या लहानग्या सावलीत एक स्त्री बसली होती. ती होती शेवटच्या बाजीराव पेशव्यांची पत्नी. तिचं नाव श्रीमंत वाराणसी बाईसाहेब पेशवे. कॅ. प्रॉथर वाराणसीबाईसाहेबांशी अदबीने आणि आदराने वागला. त्याने त्यांना मेण्यातून सन्मानपूर्वक पुण्याकडे रवाना केले. ब्रह्माावर्त येथे स्थानबद्ध असलेल्या श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे नंतर वाराणसीबाईंची इंग्रजांनी रवानगी केली.

रायगडावर उरली फक्त राख. सारे वाडे , राजसभा आणि होतं नव्हतं ते जळण्यासारखं सारं जळून गेलं. सर्वात धडाडून जळालं असेल रायगडचं रक्षण करण्याकरता दहा दिवस झुंजलेल्या अबुल फतेखानचं आणि मराठी सैनिकांचं काळीज.

पुढच्या काळात रायगडाची सारी आबाळच होती.

शिवाजीराजा छत्रपती या शब्दांची जादू एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी मनांत पुन्हा शिलगावली गेली. नक्की वर्ष आणि दिवस माहीत नाही. कुठे सापडत नाही. पण थोर महात्मा आपल्या चार सहकारी सौंगड्यांनिशी रायगडावर आला. हाच महात्मा महाराष्ट्राला कळवळून सांगत होता , ' ज्ञान मिळवा. अभ्यास करा. ज्ञानाविण मति गेली , गती गेली , सर्वस्व गेलं. दारिद्यात आणि अपमानात कुजत जगू नका. मराठी पोरीबाळींनो , लेकीसुनांनो तुम्हीही शिका , फुकट राबणारे गुलाम होऊ नका. शेतकऱ्यांनो , कष्टासाठी अन् पोटासाठी कर्तबगारीचा आसूड हाती घ्या. '

या महात्म्याने शिवाजीराजांचं विश्वरूप ओळखलं होतं. हा महात्मा रायगडावर आला. त्याने शिवाजी महाराजांच्या समाधीवर डोकं टेकलं. महाराजांची कीतीर् आणि त्यांचे पोवाडे गाण्याचा जणू संकल्पच सोडून हा महात्मा रायगडावरून उतरला. महात्मा जोतीराव गोविंदराव फुले. ते नेमके केव्हा रायगडावर येऊन गेले , ती तारीख सापडत नाही. पुढच्या काळात लोकमान्य टिळक हे दोन वेळा रायगडावर येऊन गेले. त्यांनी महाराजांच्या समाधीच्या जीणोर्द्धाराचा संकल्पच सोडला. शिवाजी रायगड स्मारक मंडळ या नावाचा ट्रस्ट स्थापन केला. शिवजयंतीचे सार्वजनिक उत्सव देशभर सुरू झालेच होते. अशा सर्व लोकजागरणातून पुन्हा एकदा रायगडाकडे महाराष्ट्राचे लक्ष गेले.

- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा? नव्हे, यमराजाची पाठच!

हिरा दचकली. अन् रिकामा हंडा घेऊन गडा
च्या महादरवाजाकडे पळत सुटली. गडाच्या माथ्यापासून महादरवाजा जवळ होता का काय ? साडेसातशे पायऱ्यांइतकं अंतर. साठसाठ हात उंचीच्या दोन प्रचंड बुरुजांच्यामध्ये तो महादरवाजा उभा होता. दरवाजा करकचून बंद झालेला होता. मोठेमोठे तुळवटासारखे अडसर आणि मनगडासारख्या कड्या कोयंड्यांनं घातलेली ती मधमाशांच्या पोळ्यासारखी दोन कुलुपं आणि दोन्ही बाजूच्या देवड्यांवर वावरणारे धिप्पाड पहारेकरी. हिरा घाबरली. ती कोवळी पोर. तिला उमगेचना. काय करावं ते ती कळवळून त्यांना म्हणाले , ' कवाड उघडा हो. मला घरी जायचंय , उघडा ना! '

' न्हाय पोरी , आता दरवाजं बंद झालं , उंद्या सकाळाला दिस उगवला की तोफ व्हईल अन् दरवाजं उघडंल. मंग जावा. '

हिरा रडूच लागली. तो देवडीवरचा गडी म्हणाला , ' आं! अग पोरी , रडतीयास कशापायी ? काय जंगलात पडलीस व्हय ? अगं , राजाच्या रायगडावर हायस तू , आजची रात गडावर ऱ्हावा. '

हिरा कळवळून म्हणत होती. पदराचा शेव पसरून विनवीत होती , ' मला जाऊ द्या. म्या पुन्हा न्हाई येनार. '

' आत्ता ? काय रावणराखीसाच्या लंकेत अडकलीयास का काय तू ? अग , सीतामाय , का रडतीयास ? हतं कायदा लई कडक हाय. राजाचा परधान जरी आत्ता आला , तरी कवाड खुलणार न्हायी. अगदी महाराजांनी जातीनं हुकूम दिला , तर गडाचं गडकरी जातीनं यिऊन ह्या कड्याकुलपं काढतील. न्हाईतर न्हाई. रडू नगंस , ऱ्हावा. '

व्याकुळलेली हिरा मुसमुसत होती. तिला तिचं पाळण्यातलं लेकरू डोळ्यापुढं दिसत होतं. ते रडत असंल , भुकेनं कळवळंल. शेजारापाजाराला कोन हाय ? कुनाच्या ध्यानी येनार ? कशी म्या अवदसा माझ्याच लेकराची बैरीन झाले ? आता काय करू!

' व्हय , व्हय पोरी. अवघाड झालं. आता घरी जाशील सकाळाला तवा सासुसासरं काय करतील तुझं ? तुझा दादला ?'

' नाय वो! घरी कुनीबी नाय. माझं तान्हं लेकरू झोपवून म्या आलो. आता जागं होऊन रडत असंल एवढी मोठी रात. त्या लेकराचं काय हुईल ?'

' आरा , आरा , आरा. अगं सांगायचं न्हाई व्हय ? थांब गडी पाठीवतो किल्लेदाराकडं. किल्लेदार जातीनं यील. अन् तुला त्यो म्हाराजाची खासखास परवानगी घिऊन कवाड खोलील. राजा न्हाई म्हणार न्हाई. राजाचं काळीज लई मोठं हाय. दहा हंडं दूध मावल त्यात. थांब. '

आणि दरवाजावरचा एक गडी किल्लेदाराच्या सदरेकडं धावला. पेटलेल्या देवडीवरच्या मशालीच्या उजेडात ढाली तलवारी भिंतीला टांगलेल्या दिसत होत्या. पहारेकरी जरा तिकडं कुठं वळला , तो समजुतीच हिराला काहीबाही सांगत होता. खिनभरानं असंच बोलत त्यानं वळून पाहिलं. तर-तर हिरा त्याला दिसलीच नाही. तो चार पावलं हिकडं तिकडं निरखू पाहू लागला. ' आत्ता ? ही पोरगी आत्ता व्हती. गेली कुठं ? आं ?' त्यानं तिथल्या पहारेकऱ्यांना म्हटलं सगळीच जण दरवाजाच्या आसपास मशाल घेऊन बघू लागले. ' पोरी , पोरी ' करून हाकारू लागले. पोरगी नाहीशी झाली. गेली तरी कुठं ? गवसेचना.

एवढ्यात किल्लेदार झपाझपा आले. पहारेकऱ्यांनी त्यांना समदा परकार सांगितला. लेकुरवाळी पोर , गडात अडकली. रडत व्हती. आत्ता व्हती. कुठं गेली ? पाहिलं पाहिलं. पण गवसचना! काय चेटूक झालं ? किल्लेदार निब्बर काळजाचा गडी. पण लेकुरवाळ्या पोरीची ही गत ऐकून लोण्यावाणी इरघळला.

हिरा तळमळत तळमळत सैरावैरा अंधारात , हंडा हाती घेऊन धावत होती. आपण काही केल्या आता दरवाजातून सुटणार नाही असं तिला वाटलं. म्हणून ती गडाच्या त्या भयंकर कड्यावरून खाली उतरून जाता येईल का , म्हणून फटीसापटी शोधत सैर धावत होती.

आणि तिनं गडाच्या पश्चिमेच्या टोकावर धाव घेतली. मधूनअधून माणसांची चाहूल येत होती. पहारेकरी कुठं कुठं उभे राहिलेले भुताच्या सावलीसारखे तिला दिसत होते. ती लपतछपत त्या टोकाच्या कड्यावर आली. तिनं हंडा खाली ठेवला. विहिरीत डोकावून बघावं , तसं तिन खाली पाहिलं. खोल खोल. भयाण. भीषण. कभिन्न अंधार. तिनं साडी सावरली. पदर खोचला आणि गडावरून म्हणजे त्या भीषण कड्यावरून खाली उतरण्याकरीता चाचपडत चाचपडत आधार शोधला. ती उतरू लागली. काळाच्या काळोख्या घशात ती जणू उतरू पाहात होती. तिला काहीही दिसत नव्हतं. काहीही ऐकू येत नव्हतं. तिला दिसत होतं , फक्त पाळण्यातलं आपलं बाळ अणि ऐकू येत होता भुकेल्या अन् रडवेल्या बाळाच्या ओठांचा नाजूक आवाज. वाऱ्याच्या झुळकीनं रानपाखरं चिल्लाटत होती. रातकिड्यांनी सूर धरला होता. त्या भयाण कड्यावरून कणाकणानं अन् क्षणाक्षणानं ती उतरतच होती. कितीतरी वेळ. वेळेचं भान व्हतं कुनाला ?

हिरा उतरत नव्हती. आईचं वात्सल्य उतरत होतं. आईचं काळीज उतरत होतं. ती उतरतच होती. कुठंतरी अटकून साडी फाटतीय की अचानक टोकदार काट्यांवर हात पडून काटा शिरतोय , कशाचंच तिला भान नव्हतं. अनवाणी हिरा आता दीनवाणी नव्हती. तिच्या हातापायांच्या बोटात वाघिणीचं बळ आलं होतं. किती येळ गेला ? ठावं कुनाला! अडखळत , कुठं ठेचाळत ती उतरतच होती. सांदीसापटीच्या काट्याकुट्यानं अंधारात तिला ओरबाडून काढलं होतं. तिच्या साडीच्या पार चिरफाळ्या झाल्या होत्या.

आणि हिरा तळाशी पोहोचली. अन् झाडाझुडपांतून सुसाट हरिणीसारखी रायगडवाडीतल्या आपल्या घराकडं धावत सुटली.

गडावर गडकऱ्याच्या काळजात कालवा झाला. एक तरणीताठी पोर आपल्या गडावर अशी सीतेच्या संकटात सापडावी ? त्यातून ती हरवलीय. किल्लेदारानं दहा गडी मशाली घेऊन सगळीकडं शोधायला पाठविले. कुठं शोधायचं ?

हा समदा करिना महाराजांना समजला. महाराज बेचैन झाले. चौफेर शोध सुरू झाला. कळेना की ही गवळ्याची पोर कुठं कड्यावरून कोसळली का काय ?

पुनवेचा चंद माथ्यावर आला. पोरीचा शोध लागेना.

अन् तेवढ्यात वळखलं. हा हंडा तिचाच. ती कुठंच ? नाही. नक्कीच इथून कोसळली. किल्लेदार महाराज अन् महादरवाज्यावरचे अवघे गडी कळवळले. नक्कीच पोरगी कोसळून मेली.

तिचा रिकामा हंडा घेऊन गडावरचे दोन स्वार रायगडवाडीत रामपारी आले. बघतात तो ती पोरगी , हिरा आपल्या बाळाला मांडीवर घेऊन पाजत होती. रायगडासकट स्वराज्यातले अवघे गडकोट , अवघं कोकण अन् अवघी मावळं तिच्या मांडीवर जोगवली होती.

खरंच. आईच्या त्या वात्सल्यापुढे अन् मराठी लक्षुमीच्या त्या सहज साहसापुढे गगन ठेंगणं झालं होतं. गगनाहुनी उंच उंच झेप घेणाऱ्या मराठी महत्त्वाकांक्षाच जणू तिच्या मांडीवर दूध पीत होत्या.

- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी

इतिहासात गाजलेल्या जुन्या वाड्याराजव
ाड्यांच्या , किल्लेकोटांच्या आणि शूर वा कूर , सज्जन वा दुर्जन , आदरणीय वा तिरस्करणीय अशा व्यक्तींच्या भोवती इतिहासाचं विश्वसनीय असं वलय असतंच. पण दंतकथांचं आणि आख्यायिकांचं असंही एक वर्तुळ असतंच. या साऱ्या आख्यायिका खऱ्याच असतात असं नाही किंवा खोट्याच असतात असंही नाही. पुरावा मिळेपर्यंत त्यांना सत्य इतिहासाच्या शेजारी बसविता येणार नाही. या कथांना नवलकथा असे नाव द्यावेसे वाटते. केवळ आपल्याकडेच नाही तर झाडून साऱ्या पाश्चात्य देशांसह जगात अशा नवलकथा लोकमानसावर कायमच्या शतकानुशतके चितारल्या गेल्या आहेत.

किल्ले रायगडावरही अशा नवलकथा चमकत आहेत. अशीच ही एक प्रख्यात नवलकथा.

आभाळाला भिडलेल्या अन् भुईवरही अस्ताव्यस्त पसरलेल्या रायगडाच्याभोवती झाडीझुडपांच्या दाटीत शेतकऱ्यांची बरीच गावं नांदत होती. मुलींनी सागर गोट्याचा डाव टाकावा अन् ते विखुरलेले स्वैर सागरगोटे जसे दिसावेत , तशी या गावातली लहानलहान खोपटी गडावरून आपल्याला दिसतात. त्यातलंच हे एक गाव , रायगडवाडी. उगीच वीस-बावीस गवती छपरांचं हे गाव. एखाददुसरं घर कौलारू. आजही याचं रूप पालटलेलं नाही.

नवरात्र संपली. रायगडावरचा दसराही नगाऱ्यासारखा दणाणला. शिलंगण झालं. महाराज छत्रपती शिवाजी महाराज मिरवणुकीने शिलंगणाहून परतले. दरबार झाला. मानपान झाले. खांद्याला खांदा भिडवून सरदार शिलेदार उराउरी भेटले. पुरणावरणाचा सण साजरा झाला.

चार दिवस उलटले. अन् गडाभोवतीच्या वाड्या-हुंड्यात गडाच्या गडकऱ्याचा एकेक स्वार शिपाई वाडीत येऊन गावकऱ्यांना गडावरचा निरोप सांगून गेला ' आयांनो , बायांनो , उद्या हाय पुनव. कोजागिरी. तवा गडावर महाराजांच्या राजवाड्यात संध्याकाळला दूध लागतंय हंडाहंडा , तरी समद्या आयाबायांनी जमल तेवढं दूध हंड्याभांड्यातून , दिस मावळायच्या आंत , गडावर वाड्यांत आणून घालावं. उशीर करू न्हाई. '

दुसरे दिवशी कोजागिरी पुनव उगवली. रायगडवाडीतल्या आयाबाया अन् लेकीसुना सुखावल्या. दूध घालायला गडावर जायचं. राजाराणीच्या हंड्यात दूध घालायचं. चार पावलं गडावरची शोभा बघायची अन् परतायचं. ठरलं.

जमला तेवढा टाकमटिकला करून गवळणी तयार झाल्या. कुणाच्या कानी बाळ्याबुगड्या तर कुणाच्या दंडात चांदीच्या येळा. दंडाचं का असना तरी नीटनेटकं लुगडं अन् चोळी , असल तर नाकात वाटोळी नथ तर कुणी काहीच नसल्यामुळे अंगभर माहेरी चालल्यासारखा आनंदच. लेवूनलपेटून तयार झाल्या. या गोकुळच्या गवळणी हसत बोलत चकचक घासलेले हंडे घेऊन निघाल्या. त्यांनी हिरा गवळणीला साद घातली. हिरा घरी एकटी. नवरा स्वारीवर गेलेला. बाकी कुणीच नाही. फक्त पाळण्यात सहा-सात महिन्याचं पोर , त्याला पदराखाली पाजून हिरा निघाली. ' आलो , आलो , आलो ' म्हणून हिरा पडसाद देत उठली. पेंगुळलेलं बाळ पाळण्यात झोपिवलं अन् गाडग्या मडक्यांनी भरलेल्या आपल्या संसाराला कडी घालून टचटच जोडवी वाजवीत , हंडा डोक्यावर घेऊन निघाली. म्हणत असेल , आलो वैन्सं. हसत बोलत रायगडवाडीतल्या या सगळ्या तरण्या राधा चालू लागल्या. थट्टा चेष्टांना दुधासारखा ऊत येत होता.

हिराच्या घरात कुणी माणूस नव्हतं. राजाराणीचा संसार. मांडीवर तान्हुलं. तिनं मनाशी हिशेब केला , की माझा बाळा आत्ताच पिवून झोपलाय. आता दिस मावळतो काही जागा व्हायाचा न्हाई. तवपावतर गडावर जाऊन , दूध घालून कवाच परत येऊ , पाळण्यातला राजा जागा व्हायच्या आत. अशा हिशेबानं हिरा निघाली. कुजबूज गोष्टीत अन् थट्टाचेष्टेत आयाबाया झपाझपा गड चढून गेल्या. महादरवाज्याशी आल्या. केवढा बया तो दरवाजा! वर झेंडा. भैरोबा , खंडोबासारखे धिप्पाड बाप्येगडी हाती भाले घिऊन गस्त घालत्याती. अशा दरवाजातून या गौळणी गडात गेल्या. गड कसा रामराजाच्या गावावाणी गजबजला होता. पालख्या मेणं अधूनमधून लगाबगा धावत होते. तलावावर दोन तीन हत्ती सोंडेनं पाणी उडवीत होते. गंगातळ्याला वळसा घालून या सगळ्या राधा गौळणी लगाबगा चालल्या होत्या. वाड्यात आल्या. केवढा बया त्यो सौपाकाचा रांधवडा! याला मुदपाकखाना म्हणत्यात.

साऱ्या जणींनी राजवाड्यात दूध घातलं. हंडेकळशा रिकाम्या केल्या अन् कारकुनानं एकेकीला हातावर दुधाचे पैसे दिले. रिकाम्या चुंबळीवर अन् कमरेवर रिकामे हंडे अन् घागरी घेऊन गौळणी सगळीकडे टकामका पाहात राजवाड्यातून बाहेर पडल्या. सूर्यदेव डुंबायला घडीभर वेळ होता. दोन पैसे जास्तच मिळाले या आनंदात साऱ्याजणी सुखावल्या मनानं परतत होत्या. हसताबोलताना नथांचे झुबके हलत होते. एकटी हिरा एका खडकावर उभी राहून दोन्ही हातानं रिकामा हंडा गुडघ्यावर धरून समोर दिसणारं अल्याडपल्याडचं गडाचं रूप बघत होती. ती पहिल्यांदाच गडावर आली होती , लगीन झाल्यापासून , नवऱ्याच्या तोंडी गडाचं रूप तिनं ऐकलं होतं. पण पाहिलं नव्हतं. ती पाहण्यात रमली होती. सूर्य डुंबत होता. तिला मैतरणींनी सांगितलं होतं की , ' हिरे , गडाचं दरवाजं दिस मावळताच तोफ वाजली की कड्याकुलपं घालून बंद होत्यात गं! ध्यान ठिव! '

साऱ्याजणी निघून गेल्या. हिरा रिकामा हंडा घेऊन उभी होती , ती मंतरल्यासारखी बाजारपेठेकडे झपाझपाझपा चालत निघाली. केवढी बाजारपेठ! लखलख माल झगमगत होता. साड्या काय , चिरगुटं काय , हंडे भांडी काय , चांदीचं गोठ तोंड काय , येळा काय , वाळं काय! आता सांगू तरी किती असं वाटत होतं , सगळा बाजार हंड्यात घालावा अन् घरी दादल्यासोनुल्यासाठी घरला न्यावा. पुनवेचा दिस. गोंधळी पोत पेटवून संबळ झांजा वाजवीत पेठेतून चालले होते. कडकलक्षीम्या आसूड कडाडीत दान मागत होत्या. कुणी बहुरुपी सोंग घेऊन फिरत होता. तर मधूनच कोणाचा पालखीमेणा ' पैसपैस ' करीत गदीर्तून झपाझपा जात होता. हिरा भान विसरली होती.

अन् तेवढ्यात झाणकन तोफेचा आवाज कडाडला. हिरा एकदम भानावर आली. तिला एकदम आठवलं , की तोफेसरशी गडाचं दरवाजं बंद व्हत्यात.

आता ? आता ? आता ? तिच्या तोंडून घाबरलेला अन् कळवळलेला शब्द उमटला. ' आई! आये!

तिला स्वत:तलीच आई आठवली होती. अन् घरचा पोराचा पाळणा दिसू लागला होता.

- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड

रायगड किल्ला हा तत्कालीन लष्करी दृष्टीने अभ्यास करण्यासारखा किल्ला आहे. एखाद्या ताटात भाताची मूद ठेवावी तसा हा सर्व बाजूंनी अलिप्त असा डोंगर आहे. रायगड सह्यादीचा पराक्रमी पुत्रच आहे. रायगडाची प्रत्येक दिशा केवळ अजिंक्य आहे. भिंतीसारखे ताठ सरळ कडे पाहिले की , असं वाटतं , हा गड आपल्या अंगावर येतोय. पावसाच्या दिवसांत अन् त्यातल्या त्यात आषाढी पावसांत रायगड चढून जाणं हा एक अघोरी आनंद आहे. आषाढी ढगांची फौज गडाला गराडा घालून तांडव करीत असते. कधीकधी त्यातच वादळ घुसते अन् मग होणारा ढगांचा गडगडाट आणि विजांचाही कडकडाट आपण कधी अनुभवला आहे का ? वेळ दिवस मावळण्याची असावी , हे सारं थैमान सुरू झालेलं असावं अन् आपण गडावरच्या नगारखान्याच्या उत्तुंग माथ्यावर उभे असावं.

रणवाद्यांचा बेताल कल्लोळ , शिंगतुताऱ्यांचा आणि शंखांचा अचानक आक्रोश , रुदवीणांच्या तारा तुटाव्यात असा विजांचा सणाणत सणाणत उठणारा चित्कार पावसाच्या भयंकर वर्षावात डोळे उघडता येत नाहीत पण उघडले तर अवतीभवतीचा तो महाप्रलय कल्लोळ भयभयाट करीत आपल्याला गदागदा हलवत असतो. तो प्रलयंकाल , महारुद , क्षुब्ध सहस्त्रशीर्ष , दुगेर्श शिवशंकर आणि सर्व संहारक चंडमुंडभंडासुरमदिर्नी , उदंडदंड महिषासुरमदिर्नी महाकालिका दुर्गाभवानी भयंकर रौद तांडव एकाचवेळी करीत आहेत असा भास व्हायला लागतो. कभिन्न अंधार वाढतच जातो. रायगड हे सारं तांडव आपल्या खांद्यावर आणि मस्तकावर झेलीत उभा असतो. अन् त्याही भयानक क्षणी आपल्याला वाटायला लागतं , अर्जुनाला दिसलेलं कुरूक्षेत्रावरचं ते भयप्रद दर्शन यापेक्षाही किती भयंकर असेल!

असा हा पावसाळ्यातला रायगड , कोण जिंकायला येईल ? अन् बिनपावसाळ्यातला रायगड तरी ? तेही अशक्यच. शिवाच्या भोवती तांडव करणाऱ्या त्याच्या भूतप्रेत , पिशाच्च , समंधादि भयंकर शक्ती मावळ्यांच्या रुपानं रायगडावरती असायच्याच ना ?

अशा रायगडात प्रवेश करण्याची कोणा दुष्मनाची हिंमत होती ? रायगडात प्रवेश करणं शत्रूला अशक्य होतं. सीतेच्या अंत:करणात रावणाला प्रवेश मिळणं जेवढं अशक्य तेवढंच शत्रूला रायगडावर प्रवेश मिळणं अशक्य होतं.

या रायगडावर शिवाजीमहाराजांनी राजधानी आणली. हिरोजी इंदुलकरासारखा कुशल बांधकामगार महाराजांनी गडावरच्या तटाकोटाबुरुजांसाठी आणि अन्य बांधकामांसाठी नामजाद केला. हिरोजी कामाला लागला. रायगडाच्या अंगाखांद्यावर श्रावणातल्या गोकुळासारखं बांधकाम सुरू झालं. गडाचे कडे आणखी अवघड करण्यासाठी सुरुंगांच्या बत्त्या शिलगावल्या जाऊ लागल्या. सुरुंगांचे पडसाद दाही दिशांस घुमू लागले. महादरवाजा , चित्ता दरवाजा , नाणेदरवाजा , वाघ दरवाजा अन् अवघड सांदीसापटीत बांधलेला चोरदरवाजाही अंग धरू लागला. तीन मनोरे रूप घेऊ लागले. नगारखाना , सातमाडी महाल , पालखी दरवाजा , मेणा दरवाजा , शिरकाई भवानीचं देऊळ , कुशावर्त तलाव , गंगासागर कोळंब तलाव पाण्याने भरू लागले. कमीजास्त चाळीस बेचाळीस दुकानांची दोरी लावून सरळ रांग उभी राहिली. मधे रस्ता , समोर दुसरी रांग. जगदिश्वराचं भव्य मंदिर उभं राहिलं. असा रायगड पगडीवरच्या कलगीतुऱ्यांनी अन् नऊ रत्नांच्या फुलदार जेगो चौकड्यांनी सजवावा तसा हिराजीने सजवला.

केवळ राजधानीचा किल्ला म्हणून तो सुंदर सजवावा एवढीच कल्पना रायगडच्या बांधणीबाबतीत नव्हती. तर एक अजिंक्य लढाऊ किल्ला म्हणून गडाचं लष्करी महत्त्व महाराजांनी आणि हिराजीनं दक्षतापूर्वक लक्षात घेतलं आहे. गडावरच राजघराण्याचं वास्तव्य राहणार असल्यामुळे राजस्त्रियांची राहण्याची व्यवस्था हिराजीने खानदानी पडदा सांभाळून केली. या विभागाला बादशाही भाषेत म्हणत असत , ' झनानखाना ' किंवा ' दरुणीमहाल ' किंवा ' हरमखाना '. पण रायगडावर या कौटुंबिक राजवाड्याला म्हणत असत ' राणीवसा ' या राजकुटुंबाच्या विभागात प्रवेश करण्याकरिता स्त्रियांसाठी दक्षिणेच्या बाजूस एक खास दरवाजा बांधला. त्याचं नाव मेणादरवाजा. बारद्वारी आणि बाराकोनी उंच झरोक्याचे दोन मनोरे गडावर बांधले या मनोऱ्यात प्रत्येक मजल्यावर मध्यभागी कारंजी केली. भिंतींशी लोडतक्के ठेवून सहज पंधरा- सोळा आसामींनी महाराजांशी गोष्टी बोलण्याकरता वा राजकीय चर्चा करण्याकरता बसावं , अशी जागा मनोऱ्याच्या दोन्ही मजल्यांवर ठेवली आहे.

दिवे लावण्याकरता सुंदर कोनाडे आहेत. झरोक्यांवर पडदे सोडण्याकरता गोल कड्याही ठेवल्या आहेत. आबदारखाना , फरासखाना , शिलेखाना , जिन्नसखाना , दप्तरखाना , जामदारखाना , मुदपाकखाना इत्यादी सारे महाल , दरख आणि कोठ्या गडावर बयाजवार होत्या. रात्री सगळीकडे दिवेलागण व्हायची. नगारखाना कडकडायचा. सनईचे सूर कोकणदिव्याला साद घालायचे. गडाचे सारे दरवाजे कड्याकुलुप घालून बंद व्हायचे. तोफ उडायची. गस्तीच्या पाहरेकऱ्यांच्या आरोळ्या लांबून लांबूनही उठायच्या. मशाली पेटायच्या. अन् सारे व्यवहार तेवढ्या प्रकाशात गडावर चालायचे. देवघरात अन् राजवाड्यात उदाधुपाचे अन् चंदनाचे सुगंध दरवळायचे. अन् देवघरात जगदंबेची आरती निनादायची. असा रायगड डोळ्यापुढं आला की मन फार सुखावतं. आजचा उद्ध्वस्त भकास आणि आम्ही लोकांनीही सिगरेटची थोटकं , दारुच्या रिकाम्या बाटल्या , अन् खरकटे प्लॅस्टिकचे कागद आणि पिशव्या अस्ताव्यस्त फेकून अन् ठिकठिकाणी भिंतींवर आपली नावं लिहून विदुप केलेला गड पाहिला की , स्वत:च्याच मनाला सुरूंग लागतो. त्याच्या चिंधड्या उडतात. अन् वाटतं , ' तुझ्या विछिन्न रूपाला , पाहुनि फाटतो ऊर. '

- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार

याच काळात (इ. १६७१ ) महाराज रायगडावर काही काळ होते. नेमका महिना आणि तारीख माहीत नाही. एके दिवशी गडावर एक पाहुणा आला. अचानकच आला. तरुण होता. तो हिंदी भाषिक होता. कवी होता. याचं नाव भूषण तिवारी. तो राहाणारा यमुनाकाठीच्या टिकमापूरचा. या गावाचं खरं नाव त्रिविक्रमपूर. कानपूरपासून काही कोसांवर हे गाव आहे. अकबर बादशाहाच्या जो राजा बिरबल म्हणून चतुर सरदार होता त्याचंही गाव हेच टिकमापूर. या गावात बिहारीश्वर महादेवाचं मंदिर आहे.

कवी भूषणाच्या बाबतीत अधिकृत माहिती फारच थोडी मिळते. बाकी साऱ्या कथा आणि दंतकथा. हा महत्त्वाकांक्षी आणि अत्यंत तेजस्वी भाषाप्रभू टिकमापूरहून रायगडाकडे आला. हे अंतर कमीतकमी तेराशे कि.मी. अंदाजे आहे. इतक्या दूरवरून तो दगडाधोंड्यांच्या आणि काट्याकुट्यांच्या सह्यादींवरच्या रायगडावर आला. कशाकरीता ? शिवाजीराजांच्या दर्शनाकरता. कथा , दंतकथा बाजूला ठेवल्या तरी एक गोष्ट लक्षात येते की , या भूषणाला यमुनाकाठी शिवाजीराजांच्या शौर्याच्या आणि मुत्सद्देगिरीच्या कथावार्ता नक्कीच समजलेल्या होत्या. विशेषत: महाराजांचे आग्रा प्रकरण अन् त्यातून त्यांची झालेली विलक्षण सुटका. त्याच्या मनावर या शिवचरित्राचा विलक्षण प्रभाव पडला होता.

हा काळ मोगलाईचा अन् विशेषत: औरंगजेबाचा होता. गंगायमुना अंधारातूनच चाचपडत वहात होत्या. अन्याय आणि अपमान जनतेच्या आता अंगवळणी पडले होते. जगन्नाथ पंडितासारख्या संस्कृत कवींनाही दिल्लीचा बादशाह जगदीश्वर वाटत होता. अशा काळात एक हिंदी तरुण कवी सह्यादीत येत होता. आजपर्यंत ज्यांना कधी पाहिलेलेही नाही अशा महाराजांच्या दर्शनाच्या ओढीने येत होता.

आला. महाराजांची आणि त्याची भेट रायगडावर झाली. तो कवी आहे हे त्यांना समजले आणि त्यांनी त्याला म्हटलं , आपण कवी आहात ? मला आपलं एखादं काव्य ऐकता येईल का ?

भूषणाने चटकन म्हटलं

' हे राजन ,

इंद जिमि जृंभपर। बाढब सअंबपर
रावण सदंभपर। रघुकुलराज है
पवन बारिबाहपर। संभू रतिनाहपर
जो सहसबाहपर। रामद्विजराज है
दावा दुमदंडपर। चीता मृग झंडपर
भूषण वितुंडपर। जैसे मृगराज है
तेज तम अंशपर। कन्नजिमि कंसपर
जो म्लेंछ वंशपर। शेर शिवराज है ,
शेर शिवराज है '

ही अप्रतिम कविता ऐकून महाराजांना आनंदच झाला. पण त्यात महाराजांची भूषणाने तुलना केली होती रामाशी , कृष्णाशी , सिंहाशी. महाराजांनी येथे एवढेच लक्षात घेतले की , हा हिंदी भाषिक कवी प्रतिभावंत भाषाप्रभू दिसतोय. या पाहुण्याचा आदर करावा आणि गडावर त्याला ठेवून घ्यावे , असे त्यांच्या मनात आले. भूषणाचा मुक्काम गडावर पडला. या काळात (म्हणजे सुमारे अडीच वषेर्) भूषणाने महाराजांच्या जीवनातील अनेक घटनांचा अन् विशेषत: युद्धप्रसंगांचा वेध घेतला , हे निश्चित आणि त्याने महाराजांच्या जीवनावर काव्यरचना करावयास प्रारंभच केला.

पण ही काव्यरचना करताना त्याने या शिवकाव्य रचनेतच वाङ्मयातील अलंकारशास्त्राचा परिचय करून दिला आहे. म्हणजे पंडित मम्मट या संस्कृत पंडिताने अलंकारशास्त्रावर काव्यप्रकाश हा गंथ लिहिला आणि वाङ्मयातील अनेकविध अलंकारांची ओळख करून दिली तसाच उपक्रम भूषणाने आपल्या शिवकाव्यात केला आहे. एक एक अलंकार त्याने फार सुंदर आणि प्रभावी शब्दांत शिवचरित्रात गुंफला आहे. अन् शिवचरित्र काव्यात गुंफले आहे. अलंकारशास्त्रावरचा हा त्याचा गंथ चिरंजीव आहे. संस्कृत भाषेत जबरदस्त प्रभावी गद्य नाटक लिहिणाऱ्या विशाखदत्त या दोन हजार वर्षांपूवीर्च्या नाटककार कवीची जेवढी योग्यता संस्कृत वाङ्मयात आहे , तेवढीच शक्तीशाली प्रतिभा आणि तेज भूषणाच्या या शिवकाव्यात आहे.

त्याने आपल्या या गंथास नाव दिले , शिवराजभूषण. यात वीररसाचा परमोत्कर्ष दिसेल. प्रत्येक अलंकाराची व्याख्या सांगून त्याचं साक्षात उदाहरण म्हणून शिवचरित्रातला एखादा प्रसंग आणि तत्त्व कवीने रसपूर्ण काव्यात लिहिले आहेत. या कवी भूषणचे एक चित्र सापडले आहे. चित्रात भूषण घोड्यावर बसलेला दाखविला आहे. चित्रकाराचे नाव कुठेही दिलेले नाही. चित्रावर तळाशी ' भूषणकब ' अशी अक्षरे आहेत. हे चित्र औंध येथील ( जि. सातारा) ऐतिहासिक वस्तुसंग्राहलयात आहे. सर्वात विशेष म्हणजे शिवचरित्रातील घटना , त्यातील संबंधित स्थळे आणि व्यक्ती यांचे उल्लेख अन्य पुराव्यांनी बिनचूक असल्याचे अभ्यासकांच्या प्रत्ययास येते. त्याचा ग्रंथ काव्याचा आहे पण विषय इतिहासाचा आहे. शस्त्रधारी वीरांचा जेवढा आदर रायगडावर होत होता , तेवढाच प्रतिभावंत कलावंतांचाही आदर होत होता.

भूषणाचं घराणं हे विद्वान कवींचं होतं. त्याचे बंधू आणि वडील हेही उत्तम कवी होते. भूषणावर अनेक संशोधकांनी लेखन केलेले आहे. पण दंतकथांच्याशिवाय त्याच्या प्रत्यक्ष जीवनातील घटनांचा शोध लागत नाही. इतिहास संशोधनाची आणि लेखनाची आपल्याकडे कुणी पर्वा केली नाही. इतिहास तो ही संशोधनपूर्वक साधार इतिहास म्हणजे देशाचे अत्यंत मोलाचे धन आहे , याचा सुगावा आत्ताशी गेल्या शंभर वर्षात आम्हाला जरा लागू लागला आहे. महाराष्ट्राबाहेर तर इतिहासाकडे फार थोडे लक्ष दिले जात आहे. आसाम , राजस्थान , कर्नाटक आणि आंध्र या प्रांतांना महाराष्ट्राइतकाच विलक्षण तेजस्वी आणि प्रेरक इतिहास आहे. तेथील कला आणि विविध विषयांवरील ग्रंथ म्हणजे कुबेराचे धन आहे. पण फार थोड्या प्रज्ञावंतांचे तिकडे लक्ष गेलेले आहे. या कविराज भूषणाबद्दल उत्तरप्रदेशात जास्तीतजास्त संशोधन होण्याची आवश्यकता आहे. हा भूषण म्हणजे प्रतिभेचा कस्तुरीगंध आहे.

-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका

हंबीरराव मोहिते , मोरोपंत , प्रतापराव , आनंदराव भोसले आणि असे अनेक समशेरीचे सरदार नासिकपासून तापीपर्यंत हुतूतू घालीत होते. महाराज स्वत: किल्ले शिवनेरीच्या रोखाने निघाले हा महाराजांच्या जन्माचा किल्ला. त्याची ओढ वेगळी काय सांगावी ? महाराजांनी शिवनेरीवर हल्ला चढवला. महाराज या गडाशी किती तास किंवा दिवस झुंजत राहिले. हे माहीत नाही. पण त्यांना या अजिंक्य शिवनेरीत अजिबात रीघ मिळेना. अखेर माघार घेऊन महाराज नाणेघाटाने कोकणाकडे वळले. (इ. १६७० एप्रिल बहुदा) शिवनेरीवर महाराजांना यश आले नाही.

महाराज कोकणात उतरले आणि त्यांनी माहुलीच्या किल्ल्यावर छापा टाकला. माहुली गड अजस्त्र आहे. भंडारदुर्ग , पळसदुर्ग आणि माहुली अशा तीन उत्तुंग शिखरांनी हा गड उभा आहे. यावेळी येथे औरंगजेबाचा किल्लेदार होता राजा मनोहरदास गौड. हा बलाढ्य किल्लेदार दक्षतेने गड सांभाळीत होता.

महाराजांचा गडावर छापा पडला. जबर झटापट झाली आणि महाराजांना माघार घ्यावी लागली. गड मिळाला नाही. पराभवच. लागोपाठ हा दुसरा पराभव. महाराज आपल्या सैन्यानिशी टिटवाळ्यास आले. महागणपतीचे हे टिटवाळे. तळ पडला. पुढचे काय पाऊल टाकावे हा विचार त्यांच्या मनी होता. शहर बंदर कल्याण आणि तेथील किल्ले दुर्गाडी मोगलांच्या ताब्यात होती. महाराजांनी तेच लक्ष्य केले. त्यांनी सुभेकल्याणवर झडप घातली. मोगलांची अक्षरश: दाणादाण उडाली. कल्याण फत्ते झाले. (इ. १६७० , एप्रिल अखेर)

माहुलीच्या किल्ल्यावर खासा सीवा चालून आला. पण आपल्या बहाद्दूर किल्लेदाराने त्याचा पूर्ण पराभव केला याच्या बातम्या औरंगजेबाला दिल्लीत समजल्या. तो सुखावला त्याने राजा मनोहरदास गौड याचे भरभरून कौतुक आणि सर्फराजी केली. मनोहर दासलाही धन्यता वाटली. कुणालाही जमत नाही ते आपल्याला जमले. सीवाचा पराभव! तो आनंदला , सुखावला आणि लगेचच धास्तावलाही. कारण हा यशाचा शिरपेच आणखीन किती तास आपल्या माथ्यावर झळकेल याची त्याला खात्री नव्हती. म्हणून त्याने औरंगजेबाकडे नोकरीतून कायमची रजा मागितली. इस्तीफा म्हणजेच राजीनामा दिला. असा अंदाज आहे की , राजा मनोहरदास हा वयाने वृद्ध असावा. कारण औरंगजेबाने त्याचा अर्ज मंजूर केला आणि माहुली गडावर अलीविदीर्खान याची नेमणूक केली.

महाराज कल्याणास होते. त्यांनी माहुलीच्या किल्ल्यावर एकदम झडप घातली. अन् किल्ला जिंकला. खान पराभूत झाला. (इ. १६७० जून १६ )

पुरंदर , शिवनेरी , माहुली आणि अनेक किल्ल्यांशी या काळात घडलेल्या लढायांचा तपशील मिळतच नाही. हा उन्हाळा होता. (जून १६७० ) पेण पनवेलच्या जवळ शिरढोणचा किल्ले कर्नाळा बोट उंचावून उभा होता. गडावर मोगली निशाण होते. महाराज या गडावर हल्ला करण्यासाठी पायथ्याशी आले. मे अखेर. महाराजांनी अचानक छापा घातला नाही आणि वेढाही घातला नाही. त्यांनी एक वेगळाच प्रयत्न सुरू केला. कर्नाळ्याच्या पायथ्याशी त्यांनी माती उकरून खूप चिखल तयार केला. त्या चिखलाची घमेली आघाडीवर बांधासारखी ओतावयास सुरुवात केली. त्यात लाकडी फळ्या उभ्या केल्या. म्हणजेच एक संरक्षक भिंत उभी केली. अशा किल्ल्याच्या दिशेने चिखलात फळ्या उभ्या करीत त्याच्या आडोशाने मराठी सैन्य गडावर पुढे पुढे सरकत होतं. अन् असे करीतकरीत त्यांनी दि. २२ जून १६७० या दिवशी कर्नाळ्यावर शेवटचा हल्ला चढविला. अन् गड काबीज झाला. या आधीच महाराजांना आपल्या मराठ्यांनी माळा लावून लोहगड (अन् विसापूर गडसुद्धा) जिंकल्याची खबर आली. दि. १ 3 मे १६७०

या संपूर्ण मोहिमेत शिवनेरीसारखा अपवाद सोडला तर सर्वत्र मराठी झेंडे फत्ते पावले. एकदा हरलेला माहुलीगड फत्ते झाला होता. आग्ऱ्यास जाण्यापूर्वी पुरंदरच्या तहात मोगलांना द्यावे लागलेले एकूण एक किल्ले स्वराज्यात आले. शिवाय इतरही काही किल्ले मराठ्यांनी घेतले. या एकूण चढाईत मराठी सैन्यात दिसणारा उत्साह , आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा कारंज्यासारखी नाचत होती.अस्वस्थ होता औरंगजेब.

- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान

महाराजांच्या जीवनात लढाया अनेक. शत्रूकडील भुईकोट अन् गिरीकोट काबीज करण्यासाठी त्यांनी अनेक लढाया केल्या. पण एक गोष्ट लक्षात येते की , किल्ले घेताना ते एकदम आकस्मिक हल्ला करूनच घेण्याचे त्यांचे बेत असत. त्यांच्या संपूर्ण जीवनात किल्ल्याला वेढा घालून तो जिंकण्याचा प्रयत्न महाराजांनी अगदी बोटावर मोजण्याइतक्याच वेळी केला. मिरजेचा किल्ला घेण्यासाठी त्यांनी या भुईकोटाला दोन महिने वेढा घातला होता. जातीने ते वेढ्यात होते. (दि. २९ डिसेंबर १६५९ ते मार्च २ , १६६० ) सतत झुंजूनही हा भुईकोट त्यांना मिळाला नाही. अखेर त्यांनी मिरजेहून पन्हाळ्याकडे माघार घेतली. सेनापती नेतोजीने विजापूरच्याच भुईकोटावर सतत आठ दिवस हल्ले केले. शेवटी त्याला माघार घ्यावी लागली. येथे ' सरप्राइज अॅटॅक ' नेतोजीस जमला नाही.

इ. १६७७ तंजावर मोहिमेचे वेळी तामिळनाडूमधील वेल्लोरच्या भुईकोटास मराठी सैन्याने वेढा घातला. हा वेढा प्रदीर्घकाळ म्हणजे सुमारे एक वषेर् चालू होता. अखेर वेल्लोर कोट मराठ्यांनी काबीज केला. बस्स! वेढे घालण्याचे हे एवढेच प्रसंग. बाकी सर्व वेगवेगळ्या हिकमतीने कमीतकमी वेळात त्यांनी ठाणी जिंकलेली दिसतात. वेढे घालण्यात फार मोठे सैन्य प्रदीर्घ काळ गंुतून पडते. शिवाय विजयाची शाश्वती नसते. अन् एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांपाशी अशा वेढ्यांकरिता लागणारा तोफखाना कधीच नव्हता.

आता महाराजांच्या डोळ्यासमोर उभा होता गड पुरंदर. दि. ८ मार्च १६७० या दिवशी हल्ल्याचा बेत होता. निळो सोनदेव बावडेकर यांना महाराजांनी पुरंदरची मोहिम सांगितली. दि. ८ मार्चलाच सोनोपंतांनी पुरंदरावर छापा घातला. एकाच छाप्यात पुरंदर स्वराज्यात आला. लढाई झाली. पण जय मिळाला. मोगली किल्लेदार शेख रजीउद्दीन पराभूत झाला. मराठी सैन्यातील केशव नारायण देशपांडे हा तरुण लढताना मारला गेला. गड मिळाला. दि. ८ मार्च मुरारबाजी देशपांड्यांच्या पुरंदराला पुन्हा स्वराज्यात स्थान मिळाले. इथे एक गोष्ट लक्षात येते की , महाराजांनी सिंहगडापासून औरंगजेबाविरुद्ध चढाईचे धोरण स्वीकारले. सिंहगड मिळाला. या घटनेने पुरंदरचा किल्लेदार शहाणा व्हावयास हवा होता ना ? पण पुरंदरही असाच झटकन मराठ्यांनी घेतला. किल्लेदार शेख पराभूत झाला. तो सावध नव्हता ? त्याचे कौशल्य किंवा हत्यार कुठे तोकडे पडले ? की मराठ्यांनीच अगदी वेगळाच काही डाव टाकून पुरंदर घेतला ? या लढाईची तपशीलवार माहिती मिळतच नाही.

महाराजांनी लगेच (मार्च १६७० ) इतर किल्ल्यावरच्या मोहिमाही निश्चित केल्या. इतकेच नव्हे तर स्वत:ही जातीने मोहिमशीर झाले. आखाडा मोठाच होता. तुंग , तिकोना अन् लोहगडापासून थेट खानदेश वऱ्हाडपर्यंत महाराज धडक देणार होते. निरनिराळ्या सरदारांच्यावर एकेका गडाची मोहिम महाराजांनी सोपविली होती. या प्रचंड आघाडीच्या अगदीच थोडा तपशील हाती लागला आहे. सर्वत्र मराठ्यांना विजय मिळत गेला , मिळत होते , हा त्याचा इत्यर्थ. मोरोपंत पिंगळ्यांनी त्र्यंबकचा किल्ला काबीज केला. हंबीररावर मोहित्यांनी नासिकच्या उत्तरेस मुसंडी मारली. ठरविलेले घडत होते. मोगली ठाण्यातून धनदौलत आणि युद्धसाहित्य मिळत होते. विजयाच्या बातम्या राजगडावर आणि स्वराज्यात सतत येत होत्या. यावेळी एक गंमत घडली. अत्यंत मामिर्क. पुरंदर घेतल्यानंतर महाराजांनी गडाच्या उत्तर बाजूचा मुलुख म्हणजे सामान्यपणे पुण्यापासून बारामतीपर्यंतच्या मुलुखावरती निळो सोनदेव बावडेकर (ज्यांनी पुरंदर काबीज केला) यांची मुलकी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. आज्ञेप्रमाणे ते कामही पाहू लागले होते. याच काळात मराठ्यांची ही उत्तर आघाडी सुरू झाली होती. विजयाच्या बातम्या हररोज येत होत्या. त्या या निळोपंत बावडेकरांनाही समजत होत्या. त्या ऐकत असताना निळोपंत अस्वस्थ होत होते का ? त्यांना असं वाटत होतं की , या नवीन तलवारीच्या मोहिमेत महाराजांनी आपल्याला घेतलं नाही. सगळे राव आणि पंत ठिकठिकाणी विजय मिळवीत आहेत तसा मीही तलवारीने मिळविला नसता का ? का घेतला नाही मला ? मुलखाची मुलकी कारकुनी मला का सांगितली ? अन् या म्हाताऱ्या बावडेकराची लेखणी मानेसारखीच थरथरली. त्यांनी महाराजांना या काळात लिहिलेले एक पत्र सापडले आहे. त्यांनी लिहिले आहे की , महाराज आपण स्वत: आणि राजमंडळातील अनेक समशेरवंत पराक्रमाची शर्थ करीत आहेत. ठाणी घेत आहेत. मोगलांकडील धनदौलत स्वराज्यासाठी मिळवीत आहेत आणि मला मात्र आपण लेखणीचा मनसुबा सांगितला आहे. मलाही समशेरीचा मनसुबा सांगावा. मीही चार ठाणी अन् चार सुवर्णाची फुले मिळवून आणीन.

म्हाताऱ्या बावडेकरांना बाळसं आलं होतं. त्यांचा उत्साह आणि आकांक्षा यांच्यापुढे गगन ठेंगणेसे झुकले होते. निळोपंतांचे वय यावेळी नेमके किती होते ते समजत नाही. बहुदा ते पंच्याहत्तीच्या आसपास असावे असा तर्क आहे. वयाने थोराड असलेले असे त्यांचे दोन पुत्र यावेळी स्वराज्यात काम करीत होते. एकाचे नाव नारायण अन् दुसऱ्याचे रामचंद. असा हा निळोपंत न वाकलेला म्हातारा बाप्या माणूस होता. त्यांचे पत्र महाराजांस मोहिमेत मिळाले. ते वरील आशयाचे पत्र महाराजांस मिळाल्यानंतर त्यांना काय वाटले असेल ? आपली म्हातारी माणसेही केवढी उमेदीची आहेत ? यांचे पोवाडे गायला शाहीरच हवेत. यांच्या आकांक्षापुढे आभाळ बुटके आहे. अन् हेच स्वराज्याचे बळ आहे. महाराजांनी मायेच्या ओलाव्याने आणि कौतुकाने भिजलेले उत्तर निळो सोनदेव बावडेकरांना पाठविले. ते सापडले आहे. महाराज म्हणतात , ' लेखणीचा मनसुबा आणि तलवारीचा मनसुबा सारखाच मोलाचा आहे. कुठे कमी नाही. एकाने साध्य करावे , दुसऱ्याने साधन करावे. म्हणजेच ते सांभाळावे. '

खरं म्हणजे आता नव्या नव्या तरुणांनी नव्या मोहिमांवर मोहीमशीर व्हावे. फत्ते करावी. त्याचे जतन मागच्या आघाडीवर असलेल्या अनुभवी पांढऱ्या केसांनी करावे. आता जर तुम्हांसारख्या इतक्या वयोवृद्धांना आम्ही तलवारीची कामे सांगू लागलो तर ? जग काय म्हणेल ? महाराजांच्या पत्राचा हाच आशय होता. निळो सोनदेवही समजुतीचे शुभ्र होते. कलंक नव्हता. तेही समजले. उमजले. त्यांची लेखणी मुलकी कारभारात घोड्यासारखीच दौडत राहिली.

यानंतर एकाच वर्षाने (इ. १६७१ ) निळो सोनदेव बावडेकर वार्धक्याने स्वर्गवासी झाले.

- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये

अन्य काही उपाये पोट भरावे. असं युवकांना सांगणारे समर्थ आयुष्यभर शौर्य , धैर्याचा आणि भक्ती , निष्ठेचा उपदेश आणि आग्रह जनांना करीत होते. धीर धरा , धीर धरा , हडबडू गडबडू नका. विवेकी जे गवसेना , ऐसे काहीच असेना. म्हणून विचारी बना , विवेकी बना. कृतीशील बना. प्रयत्नांची शिकस्त करा. यत्न तो देव जाणावा. प्रपंच नेटका करा. उगीच वणवण हिंडोनी काय होते ? म्हणोन योजनाबद्ध , शिस्तबद्ध , नेटाने हाती काम घ्या अन् ते पूर्ण करा. निरोगी असा. सदा मारुती हृदयी धरा. शक्तीची उपासना करा.

शक्ती युक्ती जये ठायी , तेथे श्रीमंत धावती. म्हणजेच ईश्वर युक्ती त्यांच्याच मदतीला धावतो. संसार आणि व्यवहार उत्तम करा. जयासी प्रपंच साधेना तो परमार्थी खोटा. सशक्त व्हा. कोण पुसे अशक्ताला , रोगीसा बराडी दिसे. सुंदर दिसा , सुंदर असा , सुंदर जगा असा साराच आणि अजूनही कितीतरी मानवी जीवनाला उपयुक्त अन् मार्गदर्शक असा जीवनवेद समर्थांनी आयुष्यभर सांगितला. स्वत: व्यक्तिगत तीन दगडांचा संसार न मांडता अवघ्या जनलोकांचा संसार सुखी आणि कर्तव्यतत्पर व्हावा यासाठी त्यांनी स्वत:च जीवन महाराष्ट्राच्या सहाणेवर चंदनासारखं झिजवलं. त्या समर्थांनी सज्जनगडावर देह ठेवला , त्या दिवशीही माघ वद्य नवमी होती.

तानाजी मालुसऱ्याने सिंहगडावर देह ठेवला त्याही दिवशी माघ वद्य नवमी होती. फक्त वर्ष वेगवेगळे. एकाने मराठी मुलुखाला जीवन दिले. दुसऱ्याने मराठी मुलुखासाठी जीव दिला. दोघांनीही वाट्याला आलेली तिथी साजरी केली. या भूमीसाठी या जनलोकांसाठी आपलेही जीवन वा जीव खचीर् घालणारे कितीतरी समर्थ आणि कितीतरी मालुसरे इतिहासात आपल्याला दिसतात ना! युवकांनी आकाशालाही ठेंगणं ठरविणारी आकांक्षा हृदयी धरावी अन् हसतहसत जगावं अन् हसतहसतच येणारी अशी तिथी साजरी करावी असंच हे इतिहासातील वीर आणि विवेकी स्त्री- पुरुष आपल्याला सांगत असतात नाही का ? बेचैन जगा अन् चैनीत मरा , भान ठेवून योजना करा अन् बेभान होऊन काम करा हाच याचा अर्थ.

तानाजीच्या मृत्युने महाराजांच्या आणि मराठ्यांच्या मनावर दु:खाचं सावट आलं. पंधरा दिवस उलटले. अन् विसाव्या दिवशी म्हणजेच दि. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर बाळंतीणीच्या दालनावरचा पडदा हलला. सोयराबाईसाहेब , राणीसाहेब प्रसूत झाल्या. त्यांचे पोटी पुत्र जन्माला आला. मनं उमलली. आवतीची भिंगरी फिरली. राजकुमार जन्मास आले. गडावर रीतीप्रमाणे नगारे चौघडे अन् बारुदगोळा उडवीत बंदुका वाजल्या. महाराज यावेळी राजगडावरच होते. त्यांना जिजाऊसाहेबांनी ही आनंदाची बातमी सांगितली. सिऊबा , राजकुमार जन्मास आले.

आनंदच , मुलगा जन्माला आला अन् समजा मुलगी जन्माला आली असती तर ? तरीही आनंदच. महाराजांच्या पोटी एकूण सहा कन्या जन्माला आल्याच की. फरक नाही.

पण इथे जरा नियतीनं मानवी मनाला कोपरखळी दिलीच. नवीन जन्माला आलेला हा राजकुमार ( राजाराम महाराज) पालथा म्हणजे पालथ्या स्थितीत जन्माला आला. मानवी मनाला हे असलं काही झालं की , खटकतंच. मन जरा चुकचुकतंच. मग मन शांत करण्यासाठी करा अभिषेक , फोडा नारळ. म्हणा मंत्र. करा शांत. अन् बाळाच्या बऱ्याकरता करा नवस. हे चालतंच. आजच्याही जगात आपण पाहतोच की. पण पुत्र राजाराम जन्माला आल्यावर महाराजांना हेही समजले , ' राजकुमार जन्मास आले , पण पालथे जन्मास आले. '

हे ऐकताच महाराज चट्कन उद्गारले , ' पालथे जन्मास आले ? बहुत उत्तम! आता दिल्ली पालथी घालतील! '

जीवनातल्या अशा घटनांचा पुरोगामी अर्थ लावणारा हा राजा होता. हा तीर्थरुप होता.

एकूण वातावरण बदलले. नवी पालवी आली. इथं सहज जाताजाता सांगायचंय की , शिवाजी महाराजांच्या जीवनात त्यांनी देवाला किंवा देवीला नवस केल्याची एकही नोंद सापडत नाही. व्यक्तिगत स्वत:च्या सुखदु:खासाठी किंवा स्वराज्याच्या अवघड सवघड कामगिऱ्या फत्ते व्हाव्यात , आग्ऱ्याच्या कैदेतून सुटावं , सिद्दी जौहरच्या वेढ्यातून पार व्हावं अशा गोष्टींसाठीही महाराजांनी कधी नवस केल्याची नोंद मिळत नाही. त्यांचं मन अत्यंत श्रद्धावंत होतं. पण अंधश्रद्धावंत नव्हतं. ते भावनाशील होते. पण भावनाप्रधान नव्हते. ते स्वकष्टाने , तपश्चयेर्ने यशे मिळवीत होते. नवसासायासांनी नव्हे.

- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान

सिंहगडावर पाण्याची 33 टाकी आहेत. कालभैरव अमृतेश्वर , कोंढाणेश्वर महादेव , नृसिंह , मारुती , गणपती , गडाच्या रामदऱ्यात भवानी अशी देवदैवतेही आहेत. पूवेर्कडच्या कंदकड्यावर सुबक तटबुरूज आहेत. खोल गुहेत गारगार अन् काचेसारखं स्वच्छ पाणी आहे. याला म्हणतात सुरुंगाचे पाणी. यादवकाळातील एखाद्या सुंदर मंदिराचे पडकेमोडके अवशेषही अस्ताव्यस्त पडलेले आहेत. याच गडावर पुढे 3 मार्च १७०० या दिवशी शिवछत्रपतींचे धाकटे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू घडला. त्यांचे दहन जेथे झाले , त्या जागेवर पुढे महाराणी छत्रपती राजमाता ताराबाईसाहेब यांनी समाधीमंदिर बांधले. तानाजी मालुसऱ्यांचीही नंतर बांधलेली समाधी आणि त्याही नंतर बसविलेला अर्धपुतळा गडावर आहे.

या गडावरचं तरुणांचं अपरंपार प्रेम सतत आमच्या प्रत्ययास येत गेलं आहे. गडाच्या दोन्ही वाटांनी तरुण या गडावर येतात , हसतात , खेळतात , बागडतात. दही दूध पितात घरी जातात. क्वचित कोणी धाडसी मुलगा आडरान वाटेनं पायी गड चढून येण्याचा हौशी डाव यशस्वी करतो. कधी कोणी दोर सोडून गडावर चढण्या उतरण्याचा डाव करतो. आपण अश्विन विद्याधर पुंडलिक हे नाव ऐकलं असेल. अनेकांच्या तर तो ओळखीचा खेळगडीच होता. अश्विन धाडसी होता. बिबट्या वाघासारखे त्याचे काहीसे घारे असलेले डोळे पाहिले की , असं गमतीनं वाटायचं , की हे पोरगं सिंहगडावरच्या गुहेतच सतत नांदत असावं.

शतकाचं पावकं काळाच्या निठव्यात भरायला आलं असावं. त्या दिवशी अश्विन सिंहगडावर गेला. झपझप चढला. त्या दिवशी गडावर गेल्यानंतर कल्याण दरवाज्याने तो बाहेर पडला. अन् गडाला उजवा वळसा घालून पश्चिमेच्या डोणागिरीच्या कड्याखाली आला. उंच , भिंतीसारखा ताठ कडा दिसतोय. हाच तो कडा. या कड्यावरून तानाजी सुभेदार जसे चढले , तसाच अश्विन हातापायाची बोटं कड्यावरच्या खाचीत घालून शिडीसारखा चढू लागला. नेहमीच असले खेळ रानावनात अन् घाटाखिंडीत खेळणारा अश्विन पूर्ण आत्मविश्वासाने सिंहगडाचा कडा आपल्या बोटांनी , आपल्या वीस बोटांनी चढत होता. वितीवितीने तो वर माथ्याकडे सरकत होता. हे कडा चढण्याचे जे तंत्र आहे ना , त्यात एक गोष्ट निश्चित असते. की मधेअधे कुठे थांबायला मिळत नाही. अन् मधूनच पुन्हा माघारी फिरता येत नाही. एकदा चढायला सुरुवात केली की , वर माथ्यावर पोहोचलंच पाहिजे. अश्विन चढत होता. पुरुषभर गेला. दोन पुरुष , तीन पुरुष , चार पुरुष , पाच पुरुष , सहा पुरुष , सात , आठ , नऊ , दहा , अकरा , पुरुषांपर्यंत वर गेला. अन् पूर्णपणे अगदी सफाईनं माथ्यावर पोहोचलाही. गिर्यारोहणाचा तो आनंद सोफा सेटवर कळणार नाही. अश्विन आनंदात होता. दमला असेल , थोडाफार घामही आला असेल. माहीत नाही. पण त्याचा आनंद तर्काच्या पलिकडं जाऊनही लक्षात येतो. तो माथ्यावर पोहोचला , अन् त्याच्या मनाने चेंडूसारखी उसळी घेतली. तो या कड्यापासून पुन्हा गडाच्या कल्याण दरवाजाकडे निघाला. कल्याण दरवाज्यातून पुन्हा बाहेर पडला. गडाला उजवा वळसा घालून पुन्हा त्याच डोणागिरीच्या कड्याच्या तळाशी आला. अन् पुन्हा तोच कडा आपल्या वीस बोटांनी चढू लागला. आत्मविश्वासाची एक जबर फुंकर त्याच्या मनावर इतिहासाने घातली होती. हा इतिहास अर्ध्या पाऊण तासांपूवीर्च घडला होता. तो त्यानेच घडविला होता. पुन्हा आणखीन एक तसेच पान लिहिण्यासाठी अश्विन कडा चढू लागला.

अश्विन चढत होता. एक पुरुष. एक पुरुष म्हणजे सहा फूट. घोरपडीच्या नखीसारखी त्याची बोटं वर सरकत होती. दोन पुरुष. तीन पुरुष. चार , पाच , सहा , सात , अन् आणखीन किती कोण जाणे. अश्विन वर सरकत होता आणि काय झालं , कसं झालं , कळले नाही कोणाला. अन् अश्विनचा पाय किंवा हात सटकन निसटला. खडकांवर आदळत , आपटत अश्विन डोणागिरीच्या तळाला रक्तात न्हाऊन कोसळला.

हे दु:ख शब्दांच्या पलिकडे आहे. सिंहगडही गुडघ्यांत डोकं घालून ढसढसा रडला असेल.

अश्विन गेला. त्याचं घर , त्याच्या मित्रांची घरं , अन् सारेच पुंडलिक परिवारातले सगेसोयरे नाकातोंडात दु:ख असह्य होऊन तळमळू लागले.

होय. हे फार मोठं दु:ख आहे. असे अपघात कड्यावर , नद्यांच्या महापुरात , कधी जीवघेण्या शर्यतीत तर कधी खेळतानाही घडलेले आपण पाहतो.

यावर उपाय काय ? धाडस , साहस हे शिपाईपणाचे खेळ खेळायचेच नाहीत का ? नाही. खेळले पाहिजेत. जास्तीत जास्त दक्षता घेऊन खेळले पाहिजेत. त्यातूनच शिपाईपणा अंगी येतो ना!

आज महाराष्ट्रभर तरुण मुलंमुली असे काही कमीजास्त धाडसाचे खेळ खेळताना दिसतात. एका बाजूने ते पाहताना आनंद होतो. दुसऱ्या बाजूने मन धास्तावतं , या मुलांना म्हणावसं वाटतं , छान पण पोरांनो , याही तुमच्या खेळातले नियम शिस्त , गुरुची शिकवण अन् धोक्याचे इशारे डावलू नका. खूप खेळा. खूप धाडसी व्हा. मोठे व्हा.

- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात

आरडाओरडा , किंकाळ्या , गर्जना यांचा एकच कल्लोळ गडावर उसळला. सुस्तावलेल्या अन् गाढ झोपलेल्या अन् जागती गस्त घालणाऱ्या त्या मोगली सैन्यावर एकदम धगधगते निखारे येऊन पडावेत असा हा तानाजीचा हल्ला होता. इथे मावळ्यांच्यामध्ये जबर इर्षा होती. आत्मविश्वास होता. आपण जिंकरणारच. पण जर समजा कच खाल्ली तर आपल्याला पळून जायलाही वाट नाही. आपण लढलंच पाहिजे , जिंकलंच पाहिजे , नाहीतर मेलंच पाहिजे , पुन्हा असा डाव खेळताच येणार नाही अन् जगून किंवा मरूनही हे पराभवाचं तोंड महाराजांना अन् जिजाऊसाहेबांना दाखवायचं ? कसं ? पण असला कसला विचारही कोणाच्या मनात येत नव्हता. उदयभानला त्याच्या वाड्यात हा भयंकर हल्ला अकस्मात समजला. इतकी दक्षता घेऊनही हे मराठे गडावर आलेच कसे , पोहोचले कसे हा सवाल आता व्यर्थ होता. उदयभान ढाली तलवारीनिशी धावला. यावेळी मोगली सैनिकांनी मशाली पेटवल्या असतील का ? शक्यता आहे.

अन् प्रत्यक्ष गदीर्त उदेयभान आणि तानाजी घुसले. या अचानक हल्ल्याचा मोगली सैन्यावर नक्कीच परिणाम झाला. बराचसा गोंधळ अन् थोडीफार घबराट. युद्ध कडकडत होते. त्यातच उदयभान आणि तानाजी अचानक समोरासमोरच आले आणि घावावरती घाव एकमेकांवर कोसळू लागले. ही झटापट किती वेळ चालली असेल ? काही सांगता येत नाही. पण प्रत्येक क्षण जगण्या मरण्याच्या तराजूची पारडी खालीवर झुलवीत होता. कुणी कोणाला रेटू शकत नव्हता. कुणी हटतही नव्हता. तेवढ्यात उदयभानचा तलवारीचा कडाडून कोसळलेला घाव तानाजी सुभेदारांच्या ढालीवर पडला. अन् ढालच तुटली. केवढा कल्लोळ! त्याही स्थितीत डोईचं मुंडासं तुटक्या ढालीच्या हातावर घेऊन अन् कमरेचं पटकुरं त्या हातावर गुंडाळीत तानाजी एकांगी लढत होता. उदयभानला जबर हर्ष झाला असेल की , खासा गनीम आता क्षणाक्षणात मारतोच. तो वारावर वार तडाखून घालू लागला. तेवढ्यात ढाल तुटलेल्या हातावर घाव पडला. अन् तानाजीचा हातच तुटला. तरीही रक्त गाळीत उजव्या हातातल्या तलवारीने तो झुंजतच राहिला. दोघंही एकमेकांवर घाव घालीत होते. या क्षणी तानाजी काय ओरडत असेल ? उदयभान काय ओरडत असेल ? इतिहासाला माहीत नाही. पण नक्की गर्जत असतील. अन् एका क्षणी तराजूची पारडी हेलकावली. उदयभानचा तानाजीला अन् तानाजीचा उदयभानला कडाडून धारेचा तडाखा बसला आणि दोघंही भयंकर जखमी , किंबहुना मृत्युच झेलीत एकाचवेळी भुईवर कोसळले. दोघेही ठार झाले. अन् ही गोष्ट अवतीभवतीच्या चार मावळ्यांना दिसली. अन् ते गोंधळलेच. खचलेच. अन् ओरडू लागले. ' सुभेदार पडिले , सुभेदार पडिले! ' पळा. अन् हाहा म्हणता सुभेदार पडल्याचा रणबोभाट झाला. बरेचसे मावळे धीर खचून ज्या कड्यावरून दोराने ते चढून आले होते , त्या दिशेला धावत सुटले , कड्यावरून उतरण्यासाठी वास्तविक उदयभानही पडला होता ना! पण ती वेळ अशी होती , ती सांगता येत नाही. ती वेळ यमाची. ती वेळ जिवाच्या मायेची. मावळे ओरडत धावत होते. गदीर्त झुंजत असलेल्या सूर्याजी मालुसऱ्यानं हे पाहिले , ऐकलं. त्यानं ओळखलं , अन् तो त्याच दोरांच्याकडे ताडताड धावत सुटला. पोहोचलाही अन् त्याने गडाखाली सोडलेले दोर , जे लोंबत होते , ते तलवारीच्या घावानं ताडताड तोडायला सुरुवात केली. तोडले. अन् तसाच तो वळून पळू पाहणाऱ्या मावळ्यांवर ओरडला , ' पळताय भेकडांनो ? तुमचा बाप इथं झुंजता झुंजता पडला अन् तुम्ही कुठं पळताय ? थू तुमच्या जिनगानीवर. हे थोबाड कुणाला दाखविणार आहात ? अरे , तुमी कोणाची माणसं ? महाराजांची ? पळता ? फिरा माघारी! ' अन् सूर्याजीनं एकच गर्जना केली. ' हर हर हर हर महादेव ' पळते होते ते फिरले. सूर्याजीने अन् सर्वांनीच मोगलांच्यावर कडाडून फेरहल्ला चढविला , तो त्या सर्वांच्या दोन हातात जणू आठआठ हातांच्या भवानीचं बळ अवतरल्यासारखाच. या भयंकर हल्ल्यात मोगलांची दाणादाण उडाली. गड मराठ्यांनी जिंकला.

असा हा इतिहास. जो सिंहगड पूवीर् आणि नंतरही प्रतिर्स्पध्याशी महिनोन महिने झुंजली. पण हार गेला नाही. तो अजिंक्य गड एका अचानक गनिमी छाप्यात तानाजी , सूर्याजी आणि सर्व मावळे यांनी जीव पणाला टाकून , फारतर दीडदोन तासात जिंकला. गडावरच्या तोफा मुकाट होत्या. मराठ्यांवर एखादीही तोफ उडविण्याची संधी अन् अवसर मोगलांना मिळाला नव्हता. शत्रूच्या तिप्पट फौैजेचा कमीतकमी वेळेत अन् कमीतकमी शस्त्रांंनिशी पूर्ण पराभव मराठ्यांनी केला. हे या असामान्य लढाईचंं असामान्य महत्त्व.

काल्पनिक कादंबऱ्या , कथा , पोवाडे अन् अख्यायिका यांच्या गुंतागुंतीतून सत्य शोधीत शोधीत आपण इथपर्यंत निश्चित येऊन पोहोचतो की , सूर्याजी मालुसऱ्यानं आणि त्याच्या मावळ्यांनी एक फार मोठा राष्ट्रीय मोलाचा धडा रक्तानी लिहून ठेवला की , नेता पडला तरी झुंजायचं असतं. जिंकायचं असतं. सेनापती पडला तरीही! अन् खासा राजा पडला तरीही! हा शिवाजीराजांनी घालून दिलेला आखाडा आणि आराखडा सूर्याजीनं प्रत्ययास आणून दिला , नाहीतर आमची रीत अशी की , नेता , सेनापती किंवा राजा पडला की , सर्वांनी पळत सुटायचं.

महाराजांना केवढं दु:ख झालं असेल याची तुलना सांगायला तराजूच नाही. त्यांच्या तोंडून उद्गार निघाले , ते आज शिलालेखासारखे इतिहासात कोरले मात्र गेले आहेत. ' माझा एक गड आला पण माझा दुसरा गड गेला. '

- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र

यावेळी प्रतापगडच्या मावळतीला असलेल्य
ा डोंगर-वेढ्यातील ' उमरठ ' या गावात लग्नाचा मांडव पडला होता म्हणे! हे लग्न प्रत्यक्ष उमरठकर सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या मुलाचं होतं म्हणे. रायबा हा त्यांचा लहानसा मुलगा.

या सगळ्या कथा मराठी प्रत्येक कानामनाला गेली 3 ०० वर्ष ठाऊक आहेत. त्यावर तुळशीदार शाहीर या नावाच्या शाहिराने चौकबंद मोठा पोवाडाही रचलेला सापडला आहे. बखरीतून थोडीफार माहिती लिहिलेली आहे. पण यात अभ्यासकांच्या मते मतभेदाचे मुद्देही अनेक आहेत. एवढे निश्चित की , सिंहगड काबीज करण्याची कामगिरी महाराजांनी तानाजी मालुसरे या जबऱ्या मर्दावर सोपविली. तानाजी हा स्वराज्याच्या लष्करात एक हजार पाइकांचा सुभेदार आहे. त्याला एक सख्खा भाऊ आहे. त्याचे नाव सूर्याजी.

मोंगलांच्या विरूद्ध तडजोडीनंतर आपले किल्ले परत होण्यासाठी महाराजांनी जी मोहीम उघडली. त्या मोहिमेचा पहिला नारळ तानाजीच्याच हातात त्यांनी दिला या विषयी मतभेद नाही. मुहूर्त होता माघ वद्य नवमी , शुक्रवार दि. चार फेब्रुवारी १६७० मध्यरात्रीचा.

ही मोहीम करण्यासाठी तानाजी सुमारे ५०० मावळे घेऊन राजगडावरुन निघाला , हे ही पूर्ण सत्य. आता थोडा अभ्यास करू या. मोहीम प्रत्यक्ष हाती घेण्यापूवीर् गडाची अवघड सवघड बाजू तानाजीने लक्षात घेतली असले की नाही ? गुप्त हेरगिरीने गडाच्या घेऱ्यात आपल्याला गुपचूप पोहोचता येईल , बोभाटा होणार नाही यासाठी त्याने काही प्रयत्न केले असतील का ? प्रत्यक्ष अस्सल समकालीन कागदपत्रात हे काहीच सापडत नाही. कागदच नाहीत. पण तुळशीदार शाहिराच्या पोवाड्यातील ऐन मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवले , तरी गडाच्या भोवती असलेल्या उतरणीवरील जंगलातील मेटकऱ्यांशी तानाजीने संधान बांधले व घेरे सरनाईकाला त्याने आपलेसे केले , हे पूर्ण संभाव्य वाटते. गडावर एकूण मोगली सैन्य दीड हजार असून तटावर ठिकठिकाणी जबर तोफा खड्या आहेत अन् गडाच्या विशेषत: पश्चिमेच्या कड्यावर उत्तरार्धात तटबंदी बांधीव नाही , अन् त्या बाजूस पहारेही जरा कमी आहेत. असे तानाजीच्या लक्षात आहे. व त्या दृष्टीनेच तो या कड्याखाली नेमका आला. नाहीतर तो तसा आला नसता. ही सर्व माहिती घेरेसरनाईक मेटकऱ्याकडून तानाजीला मिळाली हा जो पोवाड्यात व उत्तरकालीन आख्यायिकांत सूर दिसतो तो सत्य असण्याची शक्यता आहे.

एक तर तानाजीचे (म्हणजे महाराजांचेही पण) निश्चित ठरलेले दिसते की , नेहमीच्या ढोबळपद्धतीने गडावर चाल करावयाची नाही. गडाला वेढा घालून माहिनोन् महिने झुंजत बसावयाचे नाही. तर अचानक झडप घालून (सरप्राइज अॅटॅक) गड कब्जात घ्यावयाचा. गडावर अशी झडप घातली व प्रवेश मिळविला तर त्यांच्या तोफखान्याचा काहीही उपयोग त्यांना होणार नाही. त्या निरूपयोगी ठरतील. जी काही झंुज द्यावी लागेल ती समोरासमोर द्यायची. त्यात अवघड भाग फारफार मोठा होता. एकतर गडात प्रवेश मिळवणे अत्यंत अवघड अन् मिळाला तर गडावरचे सैन्य आपल्या तिप्पट आहे याची जाणीव मराठ्यांना निश्चित आहे.

म्हणूनच तानाजीने मेटावरच्या कोळी मेटकऱ्यांशी आधीपासून संधान बांधून अचानक छाप्याची तयारी चोख केलेली होती , असे दिसते.

तानाजी चार फेब्रुवारी १६७० च्या मध्यरात्री म्हणजे बहुदा दोन अडीच वाजता निबिड अरण्यात अन् गडाच्या उतरणीवर आपल्या लोकांनिशी येऊन पोहोचला.

गडवरचं वातावरण शांत सुन्न होतं. गस्तीची पाळी असलेले मोंगल सैनिक आपापल्या जागी गस्त घालीत होते. किल्याची दोन प्रवेशदारे पुण्याच्या दिशेला म्हणजे उत्तरेला एका पाठोपाठ एक असे तीन मोठे दरवाजे आणि दक्षिणेच्या बाजुल असे दोन दरवाजे. या बाजूने किल्याच्या खाली कल्याण नावाचे खेडेगाव आहे. म्हणून या दरवाज्यास कल्याण दरवाजा हे नाव होते. आणि उत्तरेच्या बाजूच्या दरवाजांना पुणे दरवाजा असे नाव होते. वास्तविक उदयभान राठोड हा मोंगली किल्लेदार अतिशय निष्ठावंत आणि दक्ष होता. त्याचं काम किल्लेदार या नात्यानं तो ठीक करीत होता. पण तानाजीने किल्ल्याच्या आणि किल्लेदाराच्या दुबळ्या दुव्यांचा अचूक शोध आणि वेध आधीच गुप्त रितीने किल्याच्या सरघेरेनाईकांकडून मिळविला होता. खरं म्हणजे स्वराज्य आणि मोंगलाई यातील तह उघडउघड मोडल्यानंतरचे हे दिवस आहेत. उदयभानने अधिक जागरुक दक्षता घ्यायला हवी होती. पण एकूण किल्याच्या अवघड खांदाबांधा , आपली गडावरील माणसेही उत्तम , तोफा आणि बारूदगोळा अगदी सुसज्ज , दरवाजे अगदी भक्कम अशा या जमेच्या भांडवलवर उदयभान निचिंत होता. नेमका अशाच माघ वद्य नवमीच्या मध्यरात्रीच्या काळोखातला मुहूर्त तानाजीने पकडला आणि चित्यांच्या चोरपावलांनी पाचशे मावळ्यांनिशी तो गडाच्या पश्चिमांगास भिंतीसारख्या ताठ उभ्या असलेल्या कड्याच्या कपारीशी येऊन पोहोचला ही नेमकी जागा गडाच्या माथ्यावर दुबळी होती. पहारे नसावेतच किंवा अगदी विरळ होते. या बाजूला तटबंदीही अगदी अपुरी आहे. या जागेचं नाव किंवा या कड्याचं नाव डोणगिरीची कडा.

स्वत: तानाजी आणि असेच आणखी तीन-चार गडी कड्याशी आले. प्रत्येकाच्या खांद्याला एकेक लोखंडी मेख आणि वाखाची बळकट दोरखंडाची वेटोळी होती. तानाजीसह हे दोरखंडवाले मावळे कडा चढू लागले. हे काम फार फार अवघड आणि धोक्याचंही असतं कड्याला खडकांत असलेल्या खाचीकपारीत पावलं आणि हाताची बोटं घालून चाचपत चाचपत वर चढायचं. त्यात अंधार दाट. कुठे कपारीत जर सापानागीणीनं वेटोळं घातलेलं असलं अन् त्याला धक्का लागला तर ? तर मृत्यूच. कुठे मधमाश्यांचं किंवा गांधील माश्यांयं पोळं लागलेलं असलं तरीही संकटच. कुठं गिधाडांनी कपारीत अंडी घालून त्यावर उबविण्यासाठी पंखांचा गराडा टाकून बैठक मांडली असली तरी कठीणंच. आजच्या काळात कडे चढणाऱ्या गिर्यारोहकांस याची अचूक कल्पना येऊ शकेल. अशा अवघड धोक्यांना सामोरे जात जात एक भीती मावळ्यांच्या मनगटात आणि पावलीत सतत जागी होतीच , की एखाद्या कपारीतून आपला हात किंवा पाऊल सट्कन निसटलं , तर भयाण मृत्युशिवाय दुसरं कोणं आपल्याला झेलील ? अशा या डोणागिरी कड्याची उंची किती होती ? होती आणि आजही आहे सुमारे बावीस , चोवीस पुरूष ?

अशा या कड्याच्या माथ्यावर पक्या तटबंजीचीही जरूर नाही अन् या बाजूने कोणताही शत्रू कधीच येणं शक्य नाही अशा पूर्ण विश्वासानं किल्लेदारानं येथील बंदोबस्त अगदी ठिसूळ ठेवलेाल असावा.

नेमकी हीच जागा वानरांसारखी चढून जाण्याकरीता तानाजीनं ठरविली होती. तो चढत होता. आणखी एक गोष्ट लक्षात येेते की , सिंहगड यापूवीर् मराठी स्वराज्यातच होता. तानाजी सुर्याजी आणि असंख्य मावळ्यांनी सिंहगडावर राहून , हिंडून अन् फिरून गडाची माहिती प्रत्यक्ष अनुभविली होती.

मावळे अन् तानाजी वर पोहोचले. त्यांनी खांद्यावर अडकविलेले दोरखंड वर मेखा अडकवून कड्याखाली सोडले. अन् मग भराभरा सर्वच मावळे वर आले. मोठ्या प्रमाणात वस्ती गस्ती आणि राबता गडाच्या दक्षिण पूर्व व उत्तर बाजूला होता. तानाजी हत्यारे सरसावून त्या दिशेला पुढे सरकू लागला. मावळेही. अन् एका क्षणी मोंगली सैनिकांचा आणि शांततेचा एकदमच भडका उडाला. युध्द पेटले.

- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर

सिंहगड म्हणजेच कोंढाणा. हा
किल्ला पुण्याच्या नेऋत्येला तीस कि. मी.वर आहे. या किल्ल्याचे चरित्र अध्यायवारीने सांगावे असे मोठे आहे. पण काही मोजक्या घटनासुद्धा या गडाचे वेगळेपण सांगणाऱ्या आहेत. सर्वात शेवटची लढाई प्रथम पाहूया. इ. १७ नोव्हेंबर १८१७ या दिवशी पुणे शहर शनिवारवाड्यासकट कॅप्टन रॉबर्टसन या इस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रजाच्या कब्जात गेले. म्हणजेच पेशवेही गेले. पेशवाईही गेली. साताऱ्यास महाराज छत्रपती प्रतापसिंहराजे यांनाही इंग्रजांचे मांडलिकत्त्व स्वीकारावे लागले. म्हणजेच मराठी सत्ता संपली. पाठबळ देणारा धनी किंवा कोणी वाली उरला नाही.

तरीही या पुण्याशेजारचा हा डोंगरी सिंहगड इंग्रजांच्या सुसज्ज बंदुकधारी फौजेशी आणि चहुअंगाने गडावर मारा करणाऱ्या कुलपी गोळ्यांच्या इंग्रजी तोफखान्याशी झुंजत होता. इंग्रजांनाही याचे आश्चर्य वाटत होते , की हे मुठभर मराठे निराधार झालेले असूनही आपल्या विरुद्ध अहोरात्र का झुंजताहेत ? इंग्रजांनी एकूण गडावर तोफांचे मोठे गोळे धडकविले , त्या गोळ्यांची संख्या तीन हजाराहूनही अधिक होती , तरीही मराठे झुंजतच होते. या सिंहगडच्या शेवटच्या युद्धाचा आम्ही कधी सूक्ष्म विचार केला का ? तसे दिसत नाही. या लढणाऱ्या मराठ्यांच्या मनांत कोणती नेमकी भावना असेल ? विचार असेल ? इंग्रजी निशाण पुण्यावर लागल्यानंतर शेजारचा सिंहगड अजूनही रोज अहोरात्र इंग्रजांशी लढतोय याचा परिणाम पुण्यातील आणि एकूण मराठी राज्यातील जनतेच्या मनावर काही झाला का ? तसेही दिसत नाही. लढणारे आणि मरणारे मराठे झुंजतच होते. सारा देश गुलामगिरीत पडल्यानंतर सिंहगड , सोलापूरचा किल्ला राजधानी रायगड आणि असेच आणखी काही किल्ले इंग्रजांशी झुंजत होते. या त्यांच्या झुंजी म्हणजे व्यर्थ मृत्युच्या खाईत उड्या घालणेच होते. रायगड कॅप्टन प्रॉथरशी दहा दिवस झुंजला. (दि. १ मे ते १० मे १८१८ ) सोलापूरचा किल्लाही असाच आठापंधरा दिवसा इंग्रजांनी घेतला. सिंहगड मात्र झुंजतच होता. अखेर त्याचे तेच होणार होते. तेच झालं. किल्ला इंग्रजांच्या हाती पडला. एखादे राष्ट्र दुर्दैवाने शत्रूच्या गुलामगिरीत पडत असताना ज्या अगदी शेवटच्या लढाया दिल्या जातात , त्या त्या राष्ट्राच्या भावी स्वातंत्र्य संग्रामातील खरोखर पहिल्या लढाया असतात. सिंहगडची ही लढाई म्हणजे भारताच्या भावी स्वातंत्र्य संग्रामातील पहिले स्वातंत्र्ययुद्ध नाही का ? ही लढाई इंग्रजांशी तीन महिन्यातून किंचित अधिक काळ चालली होती. अखेर गड पडला. सिंहही पडले.

या आधीच्या काळातला सिंहगडाचा इतिहास असाच धगधगीत ज्वालांनी लपेटलेला आहे. १ 33 ९ पासून ते इ. १६४७ पर्यंत हा गड सुलतानांच्या कब्जात होता. शेवटी आदिलशाही ठाणेदार म्हणून सिद्दी अंबर वाहब हा किल्लेदारी सांभाळत होता. नेमकी तारीख माहीत नाही. पण इ. १६४७ च्या अखेरीस शिवाजी महाराजांच्या योजनेने आणि कारस्थानाने बापूजी मुद्गल नऱ्हेकर देशपांडे याने ' कारस्थाने ' करून कोंढाणा स्वराज्यात काबीज करून आणला. महाराज आणि जिजाऊसाहेब यांची मने सुखावली आणि बळावली. कारण सिंहगडसारखी अश्रफाची बलाढ्य जागा स्वराज्यात आली. या गडावर श्री काळभैरव आणि योगेश्वरी यांचे मंदिर आहे. या देवाळाला श्री अमृतेश्वर असेही नाव आहे. स्थानिक लोक याला अंबरीबुवा असे म्हणतात. या देवाच्या देवळांत बसून जिजाऊसाहेबांनी रयतेचे काही न्यायनिवाडे केल्याच्याही नोंदी आहेत. कोणालाही आवडावा असाच हा सह्यादीतील दागिना आहे. एक गोष्ट आत्ताच सांगून टाकू का ? पुढे (इ. १७० 3 एप्रिल) मध्ये औरंगजेबाने अगदी म्हातारपणी हा गड छत्रपती ताराबाईसाहेबांच्या कारकिदीर्त काबीज केला. त्याचा तपशील आत्ता नको. पण बादशाहाच्या ताब्यात हा किल्ला आल्यावर तो स्वत: गडावर गेला. त्याने गड पाहिला. एक गाजलेला असामान्य मराठी किल्ला आपल्या ताब्यात आलेला पाहून औरंगजेब निहायत खूश झाला आणि त्याने या किल्ल्याला नाव दिले , ' बक्शींदा बक्श ' तो म्हणतो , ' यह तो खुदाकी करामत है! यह बक्शींदा बक्श है। आलमगीर के लिए है! बक्शींदा बक्श! '

बक्शींदा बक्श म्हणजे परमेश्वराची देणगी.

हा गड पुण्याच्या नजीक असल्यामुळे म्हणा , पण पुढच्या काळात बहुतेक सर्व थोर मंडळी या गडावर येऊन , राहून गेली आहेत. अगदी लो. टिळक , म. गांधी , स्वा. सावरकर , जयप्रकाश नारायण इतकेच नव्हे तर नेताजी सुभाषचंद बोससुद्धा.

गडावर लो. टिळकांनी स्वत:साठी छान घर बांधले. एक गंमत सांगू का ? म. गांधी यांचेही स्वत:च्या मालकीचे एक घर सिंहगडावर आहे. मोहनदास करमचंद गांधी हे नाव सातबाऱ्याच्या उताऱ्यावर आहे.

मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान पठाण हे औरंगजेबाचे सरदार स्वराज्यावर चालून आले. (इ. १६६५ मार्च) त्यावेळी मोगली फौजेने पुरंदरगडास आणि सिंहगडासही मोचेर् लावले. सिंहगडचा मोर्चा होता. सर्फराजखान याच्याकडे. तो शर्थ करीत होता , गड घेण्याची. पण गडाचा टवकाही उडाला नाही. गड जिद्दीने अखेरपर्यंत ( म्हणजे लढाई थांबेपर्यंत) झुंजतच राहिला. यावेळी गडावर महाराजांच्या मातोश्री जिजाऊसाहेब या वास्तव्याला होत्या. त्यांचे ते वास्तव्य हेच प्रचंड प्रेरक सार्मथ्य होते. पण दि. ११ जून १६६५ या दिवशी मोगलांशी महाराजांचा तह पुरंदर गडाखाली झाला , अन् त्यात तेवीस किल्ले मोगलांना द्यावयाचे महाराजांनी मान्य केले. त्यात सिंहगड होता.

तहाप्रमाणे सिंहगड देणे भाग होते. सर्फराजखान आणि दिलेरखान याच्या निसबतीचा एक सरदार अन् प्रत्यक्ष महाराजांचाही एक मुतालिक यावेळी गडावर आले. गड मोगलांच्या ताब्यात देण्याचा सोहळा सुरू झाला. जिजाऊसाहेबांना आपल्या सर्व मराठ्यांनिशी आणि डंकेझेंड्यांनिशी गडावरून कल्याण दरवाज्याने उतरावे लागले. उतरल्या. पण गड उतरत असताना त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल , याची आपण कधी कल्पना केली का ? ज्यांच्या आकांक्षांपुढे गगनही ठेंगणे ठरत होते. त्यांना आपल्या हातातलाच पराभूत न झालेला किल्ला शत्रूच्या ताब्यात देऊन उतरावे लागत होते. त्याकरिता ते गगन आणि ते मन आणि त्या मनाचा मनस्वी महाराजा तिळातिळाने समजावून घेण्याची आवश्यकता आहे.

-- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र

मराठी फौज औशाच्या किल्ल्यातूनही २० लाखाचा खजिना घेऊन पसार झाली. औरंगजेबाचा सुटलेला हजबल हुक्म मराठे औरंगाबादेतून पसार झाल्यावर थोड्याच काळात आला आणि चिरंजीव अजीम यांस मिळाला. आता या वडिलांच्या हुकुमाला उत्तर काय द्यायचे ? चिरंजीवांनी तीर्थरुपांस लिहिले की , ' आपला हुकुम मिळण्यापूवीर्च प्रतापराव आणि त्यांची फौज शहरातून पसार झाली. अशी अचानक कशी पसार झाली ते लक्षात येत नाही. पण जर आपले आज्ञापत्र थोडे आधी येऊन पोहोचले असते , तर मराठ्यांचा फडशा पाडता आला असता. '

चिरंजीवांचे हे उत्तर वाचून औरंगजेबास काय वाटले असेल ? एक मात्र नक्की की त्याच्या डोक्यात असलेला प्रतापराव , निराजी आणि प्रमुख मराठ्यांना अचानक कैद करून , दिल्लीत आणून , हौसेप्रमाणे ठार मारण्याचा गोड बेत उधळला गेला. पाच हजार मराठे शहर औरंगाबादेतून जिवानिशी सुटले. औरंगजेबाचे केवढे प्रचंड नुकसान झाले ?

महाराज यावेळी राजगडावर होते. घडलेल्या घटनांच्या बातम्या त्यांना येऊन पोहोचत होत्या. तह मोडण्याचे औरंगजेबाने केलेले उद्योग तेही त्यांना समजले. एवढेच नव्हे तर आपला पराक्रम महाराजांना सादर करण्याकरिता औशाचा खजिना घेऊन प्रतापरावही राजगडास पोहोचले.

आधीची तीन साडेतीन वर्षे महाराजांनी आपली लष्करी शक्ती आणि भावी युद्धाची तयारी जय्यत करण्यात खर्च केलेली होती. महाराज आणि मुत्सद्दी मंडळ नव्या डावपेचांसाठी कल्पनांचा आखाडा उकरीत होते. औशाला मराठ्यांनी घातलेला छापा तपशीलवार दिल्लीस औरंगजेबाला कळला. त्याने औशाच्या पराभूत किल्लेदाराचा किताब एका शब्दाने छाटून कमी केला. म्हणजे काय ? या किल्लेदाराचे नाव होते शेर बहाद्दूर जंग. त्यातील जंग ही दोन अक्षरे काढून टाकण्याचा हुकुम औरंगजेबाने दिला. पण मग पुढे काय ? पुढे काय झाले कोण जाणे ?

औरंगजेबाच्या डोक्यात सततच धुमसत असलेले धर्मवेड किंवा धर्मपेम म्हणा यावेळी उसळून आले. औरंगजेब तसा स्वधर्मावर कडोविकडीचे प्रेम करणारा होता. यात काहीही शंका नाही. पण त्याकरिता अन्य धमिर्यांचा छळ आणि अपमान करण्याचे कारण काय ? ते अजूनही कोणास उमजलेले नाही. त्याने एक स्वतंत्र घोडेस्वारांचे सैन्यच तयार ठेवले. त्यांचे काम मूतीर्भजन आणि धामिर्क छळवाद. याच काळात अनेक पवित्र हिंदू धर्मक्षेत्र त्याने उद्ध्वस्त केली.

इतिहासाचा अभ्यास करताना असा एक विचार डोळ्यापुढे येतो की , हे हाल आणि अपमान भारतात सर्वांच्याच वाट्याला येत होते ना ? होय. मग या सर्वांनी म्हणजे पंजाबात शिरवांनी , आसामात आसामींनी , महाराष्ट्रात सर्व मराठ्यांनी , राजस्थानात सर्व राजपुतांनी , काश्मिरात डोग्रांनी जर एकवटून उठाव केला असता तर येथील वेडी धामिर्क दांडगाई थांबली नसती का ? पण हे कधीच होऊ शकले नाही. उलट गोमांतकात पोर्तुगीजांच्या इन्क्विझिशनला उधाण आले होते.

आता महाराजांचे लक्ष आग्ऱ्याला जाण्यापूवीर् मोगलांना दिलेल्या २ 3 किल्ल्यांवर आणि शिवाय नव्याने घेण्याकरता उभ्या असलेल्या शिवनेरी , साल्हेर , मुल्हेर इत्यादी गडांकडेही लागले होते. राजगडावरच्या खलबतखान्यात याच भावी मोहिमांचे आराखडे आखले जात होते.

याच काळात असाच आणखीन एक शिवाजीराजा आसामात मोगलांच्या विरुद्ध गेंड्याच्या बळाने धडका देत होता. त्याचे नाव लछित बडफुकन. हा आसामच्या राजांचा सरसेनापती होता. आसाम पूर्ण जिंकावा म्हणून मोगल सुलतान अन् आत्ता विशेषत: औरंगजेब सतत आसामवर फौजा पाठवित होते. युद्धे चालू होती. त्यातच शाहिस्तेखान मामाला औरंगजेबाने मुद्दाम या बडफुकनच्या विरुद्ध झंुजायला पाठविले. (इ. १६६ 3 जून) या शाहीमामाला तो ढाक्यापर्यंत आल्याचे कळल्यानंतर लछित बडफुकनने त्याला एक पत्र पाठविल्याची नोंद ' शाहिस्ताखान की मुरंजी ' या कागदात आहे.

पण अखेर नियतीने इथेही आसामवर घाव घातला. लछित बडफुकन हा भयंकर आजारी पडून (बहुदा विषमज्वरानेे) मरण पावला. बडफुकन म्हणजे मुख्य सेनापती. बहुआ , बडपुजारी , बडफुकन याचा अर्थ त्या त्या क्षेत्रातला मुख्य.

-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ

औरंगजेब दिल्लीत गेली तीन वर्षे जरी मराठी मुलुखाच्या बाबतीत शांत होता , तरी त्याच्या अचाट बुद्धीत सतत वेगवेगळे फासे पडतच होते. महाराज न मरता आग्र्याहून निसटले आणि आपल्या चिरेबंदी सह्यप्रदेशात पोहोचले. या गोष्टीचा त्याला राहून राहून उबग येत होता. निसटून गेलेला सीवा केवळ शांततेचा तह कुरवाळीत आपल्या घरट्यात बसला आहे. एवढ्यावर औरंगजेबाचे समाधान नव्हते. विश्वासही नव्हता. हा सीवा आज ना उद्या संधी साधून मोगलाईवर झडप घेणार हे तो ओळखून होता. औरंगजेबानेच तह मोडीची कुऱ्हाड स्वत: घालावयाचे ठरविले आणि त्याने जंजिऱ्याच्या सिद्दीच्या मदतीसाठी आपले मोगली आरमार सीवावर सोडले. लगेच त्याने अजीमला म्हणजे औरंगाबादमध्ये असलेल्या आपल्या चिरंजीवांना एक गुप्त हजबल हुक्म म्हणजे तातडीचा हुकूम पाठविला की , ' औरंगाबादेत असलेल्या सीवाच्या सेनापतीला (प्रतापराव गुजर) त्याच्या कारभाऱ्याला (निराजी रावजी) आणि इतर प्रमुख मराठ्यांना ताबडतोब एकदम छापा घालून कैद करा आणि दिल्लीला त्यांना बंदोबस्तात आमच्याकडे पाठवा. सीवाच्या मराठ्यांची औरंगाबादेत असलेली छावणी मारून काढा आणि त्यातील लूट खजिन्यात जमा करा. सीवा आग्ऱ्यास आला त्यावेळी त्याला वाटखर्चासाठी जी एक लाख रुपयांची रक्कम आपण दिली आहे , ती या छावणीच्या लुटीतून जमा होईल. हुक्मकी तामील जल्द अज् जल्द हो जाए! '

हा तो भयंकर औरंगजेबी ज्वालामुखीचा स्फोट या हुकुमात भरलेला होता. म्हणजे औरंगजेबाने अगदी उघडउघड महाराजांच्या विरुद्ध आघाडी उघडली. तह मोडला.

खरं म्हणजे हा तह मोडण्यासाठी महाराजही उत्सुकच होते. ते संधीची वाट पाहात होते. ती संधी औरंगजेबानेच दिली. इथं एक मोगली शहाजाद्यांच्या स्वभावातील गंमत दिसली. अजीमला आपल्या बापाचा तो हजबल हुक्म अजून मिळायचाच होता. तो वाट दौड करीत होता. पण त्या हुकुमाचा तपशील अजीमला आधीच औरंगाबादेत कळला तो आपल्या गुप्त हस्तकांकडून. बापाचा स्वभाव माहित असल्यामुळे अजीमला आश्चर्य वाटले नसावे. पण त्याने अत्यंत तातडीने , गुपचूप मराठ्यांच्या छावणीतून प्रतापराव गुजर आणि निराजी रावजी यांना आपल्या सफेर् एखास म्हणजे खास वास्तव्याचा वाडा बोलावून घेतले. ते दोघे आले आणि अजीमने त्यांना म्हटले , ' मला बादशाहा अब्बाजान यांचेकडून असा हुकुम येतो आहे. ' अजीमने येणारा भयंकर आलमगिरी हुकूम त्या दोघांना सांगितला. आपल्याविरुद्ध येत असलेला एवढा भयंकर हुकूम प्रत्यक्ष औरंगजेबाचा पुत्रच प्रतापराव आणि निराजी यांना सांगत होता. केवढा चमत्कार. अन् अजीमने या मराठी सरदारांना लगेच म्हटले की , ' तुम्ही तुमच्या सैन्यासह आणि छावणीसह ताबडतोब पसार व्हा. नाहीतर तेवढ्यात वडिलांचा हुकूम मला मिळाला , तर मला तुमच्याकरिता काहीच करता येणार नाही. हुकुमाची अंमलबजावणी करावीच लागले. '

यावर प्रतापराव काय बोलले ते इतिहासाला माहित नाही. पण निराजीसह ते अजीमचा निरोप घेऊन ताबडतोब आपल्या छावणीत आले.

काही वेळातच प्रतापराव , निराजी आणि पाच हजार मराठी स्वारांची छावणी पाखरासारखी पसार झाली. मराठी छावणी एकदम अशी भुर्रकन का उडून गेली हे औरंगाबादेत कोणालाच कळले नाही. कळले होते फक्त अजीमला.

याच सुमारास जंजिऱ्याला घातलेला मराठी आरमाराचा वेढा महाराजांनी हुकूम पाठवून उठविला. जंजिऱ्याभोवतीच्या समुदात असलेली मराठी गलबते भराभरा निघून गेली. मुरुडच्या आसपास असलेली मराठी फौजही निघून गेली.

या प्रकाराने सिद्दींना काय वाटले असेल कोण जाणे! पण जंजिऱ्याचा गळफास आत्तातरी सुटला. जीव वाचला.

या जंजिऱ्याच्या किल्ल्याचे नाव होते , ' जंजिरेमेहरुब ' मेहरुब म्हणजे अष्टमीची चंदकोर. सिद्द्यांच्या या अर्धचंदाचे बळ असे टिकले.

तिकडे औरंगाबादेहून पसार झालेले पाच हजार स्वार थेट महाराजांकडे आले नाहीत. प्रतापराव आणि निराजीपंत यांनी तिसराच डाव टाकला. पाच हजार फौज घेऊन ते जे सुटले , ते थेट औशाच्या किल्ल्यावर. हा किल्ला मोगलांच्या म्हणजेच औरंगजेबाच्या ताब्यात होता. हा किल्ला तुळजापूरच्या जवळ आहे. किल्ला जबरदस्त. येथे किल्लेदार होता शेर बहाद्दूर जंग. त्याला स्वप्नातही कल्पना नव्हती की , मराठ्यांची फौज आपल्या किल्ल्यावर झडप घालणार आहे. तो बेसावधच होता. शिवाजी राजांपासून इतक्या दूर अंतरावर असलेल्या आपल्या औसा किल्ल्यावर मराठी कसे येणे शक्य आहे ? शिवाय आत्ता तर बादशाहांचा सीवाशी मैत्रीचा तह चालू आहे. पण बादशाहानेच या तहावर कुऱ्हाड घातल्याचे शेर बहाद्दूर जगला कुठे माहित होते ? मराठ्यांची धडक इतक्या वेगाने आणि आवेगाने किल्ल्यावर आली की , किल्ल्यात एकच पळापळ आणि गोंधळ उडाला. वास्तविक असे व्हायचे काहीही कारण नव्हते. एवढा बळकट तटबंदीचा किल्ला सहज झुंजू शकला असता. पण त्यांची हिम्मतच बारगळली. मराठी फौज किल्ल्यात घुसली. वीस लाख रुपयाचा रोख खजिना प्रतापरावांच्या हातात पडला. कदाचित इतरही काही लूट आणि हा खजाना घेऊन मराठी फौज प्रतापरावांच्या मागोमाग किल्ल्यातून बाहेर पडली आणि दौडत सुटली थेट महाराजांकडे. ' आग्रा प्रवासाचा खर्च रुपये एक लाख मराठ्यांच्या छावणीच्या लुटीतून खजिन्यात जमा करा ', असा हुकूम सोडणाऱ्या औरंगजेबाला मराठ्यांनी आपले एकूण एकवीस लाख रुपये पळविल्याचे आता कळणार होते.

- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला

महाराजांनी यावर्षी (इ. १६६९ ) मुरुड-जजिंऱ्यावर अगदी नेट धरून मोहिम सुरू केली. ही मोहिम दुहेरी होती. किनाऱ्यावरून आणि ऐन समुदातूनही. स्वराज्याचे आरमार समुदाकडून तोफा बंदुकांचा भडीमार करीत होते. स्वत: महाराज काही आठवडे पेणपाशी तळ ठोकून बसले होते. पेणच्या जवळचे किल्ले कर्नाळा आणि रोह्याच्या जवळचे किल्ले अवचितगड , त्याचप्रमाणे तळेगड आणि किल्ले भोसाळगड हे महाराजांच्याच स्वराज्यात होते. त्यामुळे असे वाटत होते की , दिघीच्या खाडीत समुदात असलेला हबश्यांचा जंजिरा किल्ला हा मराठी किल्ल्यांनी पूर्वदिशेने आणि मराठी आरमारामुळे समुदात पश्चिमदिशेने अगदी कोंडल्यासारखा झाला आहे. फक्त नेट धरून सतत जंजिऱ्यावर मारा केला तर जंजिऱ्याला अन्नधान्य पुरवठा आणि युद्धसाहित्याचा पुरवठा कुठूनही होणार नाही. त्याची पूर्ण नाकेबंदी होईल. अन् तशी मराठ्यांनी केलीच. वेंटाजी भाटकर , मायनाक भंडारी , तुकोजी आंग्रे , लायजी कोळी , सरपाटील , दर्यासारंग आणि दौलतखान ही मराठी सरदार मंडळी आणि आरमारी मंडळी अगदी असाच सर्व बाजूंनी जंजिऱ्याला गळफास टाकून बसली. महाराज अन्य राजकीय मनसुब्यांसाठी रायगडास गेले. ही मोहिम प्रत्यक्ष महाराज चालवीत नव्हतेच. ती चालवीत होते हे सगळे मराठी सरदार आणि खरोखर या सैन्याने जंजिऱ्यास जेरीस आणले. जंजिऱ्याची अवस्था व्याकूळ झाली.

रायगडावर या खबरा महाराजांना पोहोचत होत्या. असे वाटत होतं की , एक दिवस ही लंका आपल्याला मिळाली आणि जंजिऱ्यावर भगवा झेंडा लागला , अशी खबर गडावर येणार. इतकंच नव्हे तर जंजिऱ्याचा मुख्य सिद्दी खैरतखान हा मराठी आरमारी सरदारांशी तहाची बोलणी करू लागला.

पण तेवढ्यात किल्ल्यातील इतर दोन सिद्दी सरदारांनी या मराठ्यांना शरण जाऊ पाहणाऱ्या सिद्दीला अचानक कैद केले आणि युद्ध चालूच ठेवले. काही हरकत नाही , तरीही जंजिरा मराठ्यांच्या हाती पडणार हे अगदी अटळ होते. जंजिरेकर सिद्दींचे ही कौतुक वाटते. त्यांचे धाडस , शौर्य आणि स्वतंत्र राहण्याची जिद्द अतुलनीय आहे.

याचवेळी एक वेगळेच राजकारण महाराजांच्या कानांवर आले. दिल्लीत बसलेल्या औरंगजेबाने सिंध आणि गुजरातच्या किनाऱ्यावर असलेले आपले आरमार जंजिऱ्याच्या सिद्दीला मदत करण्यासाठी जंजिऱ्याकडे पाठविण्याचा डाव मांडला. हुकुम गेले आणि मोगलांचे थोडेफार आरमारी दल शिडे फुगवून दक्षिणेकडे जंजिऱ्याच्या दिशेने निघाले. या बातम्या ऐकून महाराज चपापलेच. हे औरंगजेबी आक्रमण सागरी मार्गावर अनपेक्षित नव्हतं. पण मोगल मराठे असा तह झाला असताना आणि गेली तीन वषेर् ( इ. १६६७ ते १६६९ ) हा तह महाराजांनी विनाविक्षेप पाळला असताना , औरंगजेब असा अचानक वाकडा चालेल अशी अपेक्षा नव्हती. आता जंजिऱ्याचे युद्ध हे अवघड जाणार आणि हातातोंडाशी आलेला जंजिरा निसटणार हे स्पष्ट झाले. जंजिऱ्याशी आणि उत्तरेकडून येणाऱ्या औरंगजेबी आरमाराशी युद्ध चालू ठेवायचे की नाही असा प्रश्ान् महाराजांपुढे आला.

तेवढ्यात महाराजांना औरंगाबादेहून एक खबर मिळाली की , औरंगजेबाचे मनसुबे घातपाताचे ठरत आहेत. म्हणजेच बादशाह शांततेचा तह मोडून आपल्याविरुद्ध काहीतरी लष्करी वादळे उठविण्याच्या बेतात आहे. अन् तसे घडलेच.

त्याचं असं झालं , औरंगाबादमध्ये सेनापती प्रतापराव गुजर आणि निराजी रावजी नासिककर यांच्याबरोबर पाच हजार मराठी घोडेस्वार गेली तीन वषेर् मोगल सुभेदाराच्या दिमतीस होते. हे कसे काय ? आग्ऱ्यास जाण्यापूवीर् जो पुरंदरचा तह झाला , त्यात एक कलम असे होते की , शिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजे भोसले ( त्यावेळी वय वषेर् आठ) यांच्या नावाने बादशाहाने पाच हजाराची मनसब द्यावी. त्या कलमाप्रमाणे हे पाच हजार मराठी स्वार औरंगाबादेस होते. युवराज संभाजीराजे हे ' नातनाव ' म्हणजे वयाने लहान असल्यामुळे ते प्रत्यक्ष स्वत: या सैन्यानिशी औरंगाबादेत राहू शकणार नव्हते. म्हणून सेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्याबरोबर कारभारी म्हणून निराजी रावजी या दोघांनी तेथे राहावे असे ठरले.

यावेळी औरंगाबादला सुभेदारीवर होता औरंगजेबाचा प्रत्यक्ष एक शाहजादा. त्याचे नाव अजीम. तो गेली तीन वषेर् कोणत्याही लढाया बिढायांच्या भानगडीत पडलाच नाही. खानापिना और मजा कराना हेच त्याचे यावेळी तत्त्वज्ञान होते. तो महाराजांशी स्नेहानेच राहत वागत होता. वाकड्यांत शिरत नव्हता. त्याचे खरे कारण सांगायचे तर असे पुढे मागे आपल्याला आपल्या तीर्थरूप आलमगीर बादशाहांच्या विरुद्ध बंड करायची संधी मिळाली , तर शिवाजीराजांशी मैत्री असलेली बरी!

याच शाहजादा अजीमला दिल्लीवरून बापाने एक गुप्त हसबल हुक्म (म्हणजे अत्यंत तातडीचा हुकुम) पाठविला. पण हा हसबल हुक्म काय आहे हे अजीमला एकदोन दिवस आधीच समजले! तो हुकुम भयंकर होता. जणू ज्वालामुखी त्यातून भडकणार होता. पृथ्वी हादरणार होती.

- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी

याच काळात (इ.स. १६६९ ) महाराजांनी जंजिऱ्याच्या सिद्दीकडे नजर टाकली. खरं म्हणजे त्यांची क्रुद्ध नजर सिद्दीवर प्रारंभापासूनच वटारलेली होती. हे जंजिऱ्याचे सिद्दी म्हणजे मूळचे आफ्रिकेतील अॅबिसेनियन. यांनाच हबशी म्हणत. वास्तविक हे भारतात आले नाहीत. गुलाम म्हणून व्यापारी लोकांनी त्यांना आणले. गुलामांचा व्यापार हा त्याकाळी सगळीकडेच तेजीत होता. या हबशी गुलामांची शरीरप्रकृती लोखंडासारखी भक्कम होती. त्यांचा रंग काळाभोर होता. महाराज आणि मराठी माणसं या हबश्यांना श्यामल म्हणत. हे सिद्दी केवळ गुलामगिरी करीत जगले नाहीत , तर युद्धातही जबर पराक्रम गाजविण्याची आपली शक्ती आणि कुशलता त्यांनी दाखवून दिली. दक्षिणेतल्या बहामनी , आदिलशाही कुतुबशाही , निजामशाही आणि दिल्लीच्या मोगलशाही सुलतानांच्या पदरी या हबश्यांनी लष्करात कामगिऱ्या करून दाखविल्या.

अहमदनगरच्या निजामशाही राज्यात एक जबरदस्त सिद्दी व्यादाचा फजीर् झालेला आपल्याला ठाऊक आहे. तो म्हणजे मलिक अंबर सिद्दी. हा प्रारंभी असाच गुलाम पोरगा होता. पण आपल्या कर्तृत्त्वाने तो निजामशाहीचा केवळ वजीरच नव्हे , केवळ सेनापतीच नव्हे , केवळ राज्यकारभारी प्रशासकही नव्हे तर नगरचा सवेर्सर्वा ठरला. महाराष्ट्राचा गनिमी कावा पुन्हा एकदा उजळून काढला तो या मलिकने. दिल्ली सल्तनतीला म्हणजेच जहागीरच्या फौजांना जबर तडाखे देऊन निजामशाही टिकविणारा हा मलिक अंबर गनिमी काव्याचा प्राचार्य वाटतो. शहाजीराजे भोसले हे एक उत्कृष्ट सेनापती म्हणून ( इ. १६१० पासून पुढे) गाजू लागले , ते याच मलिक अंबरच्या गनिमी काव्याच्या युद्धतंत्रातून तरबेज होऊनच. भातवडीची लढाई (इ. १६२४ ऑक्टोबर) शहाजी राजांनी शर्थ करून जिंकली. जहांगिरी आणि आदिलशाही यांच्या प्रचंड जोडफौजेचा एकाच युद्धात शहाजीराजांनी फडशा उडविला. यावेळी रणांगणावर मलिक अंबरने स्वत: भाग घेतला नव्हता. सर्व जोखीम त्याने शहाजीराजांवर टाकली होती. प्रचंड जय मिळाला. कोणाला ? खरं म्हणजे शहाजीराजांना. मराठ्यांना. पण श्रेय मिळाले मलिक अंबरला. मिळेना का! तो वजीरच होता ना. पण शहाजीराजे , म्हणजेच एक मराठा , एवढ्या झपाट्याने अस्मानात झळाळू लागल्याचे सहन होईना याच मलिक अंबरला. भोसल्यांचा मत्सर करू लागला. निजामशाहीतील आपल्याच हाताखालील मराठी सरदारांत भेद पाडू लागला.

पुढे या साऱ्या सुलतानी आणि हबशी राजकारणातून अचूक बोध घेतला , उगवत्या शिवाजीराजांनी! अगदी इ.स. १६४७ पासून महाराजांनी आपली पावलं अगदी अचूक टाकली ती आधीच्या इतिहासातून बोध घेऊन. एक निष्कर्ष महाराजांचा नक्कीच होता की , हे सिद्दी बेभरवशाचे आहेत.

मुरुडच्या सागरी किनाऱ्याजवळ बेटावर असलेला जंजिरा अशाच सिद्दी हबश्यांच्या पूर्ण स्वतंत्र सत्तेखाली होता. हे हबशी कामापुरते स्वत:ला निजामशाहीचे किंवा जरूर तेव्हा दिल्ली बादशहाचेही सेवक म्हणवून घेत. पण जंजिऱ्याच्या सिद्दींची प्रवृत्ती पूर्णपणे सार्वभौम महत्त्वाकांक्षेची होती. एका बेटावरती असलेलं तळहाताएवढं हे हबशी राज्य विलक्षण चिकाटीने आणि क्रूर जरबेने त्यांनी सांभाळलं होतं. सध्याच्या रायगड जिल्ह्याच्या किनारी भूमीवर आपल्या हबशी राज्याचा अंमल बसविण्याचा , म्हणजेच उगवत्या हिंदवी स्वराज्याला कोकणात कडवा विरोध सतत करण्याचा सिद्दीचा अखंड उद्योग चालू होता.

महाराज या ' श्यामला ' च्या दंगेखोरीमुळे कायमचे अस्वस्थ झालेले होते.

' हा जंजिऱ्याचा सिद्दी म्हणजे आमच्या (मराठी) दौलतीस लागलेला पाण्यातील उंदीर आहे ' असे ते म्हणत.

अगदी इ.स. १६५७ पासून सतत पुढे या हबश्यांच्या विरुद्ध महाराज लढाया करीत राहिले. पण आपल्या जंजिरा किल्ल्याच्या आणि आरमाराच्या बळावर सिद्दी कायमचाच झुंजत राहिला. बेटावरील हा किल्ला बळकट आहे. याचे बळ केवळ तटाबुरुजांच्या बलाढ्य बांधणीत नाही ; तर ते भोवती पसरलेल्या अथांग समुदामुळे आहे , हे महाराजांच्या केव्हाच लक्षात आलेले होते. पण हा पाण्यात डुंबत असलेला पाणकोट जंजिरा जिंकणे हे खरोखर जिकीरीचे काम होते. स्पेन , फ्रान्स किंवा अन्यही युरोपियन राष्ट्रांना अगदी थेट नेपोलियनपर्यंत जसे ब्रिटिश बेटांचे विरुद्ध विजय मिळविता आले नाहीत , अगदी तसेच या मुरुड जंजिऱ्याच्या बेटांविरुद्ध महाराजांना आणि पुढे शंभू छत्रपतींनाही यश मिळू शकले नाही.

केवळ समुद हीच या मुरुड जंजिऱ्याची ताकद होती काय ? त्याहीपेक्षा जबरदस्त ताकद या मुरुड जंजिऱ्यात असलेल्या हबशी लोकांच्या अतूट ऐक्यात होती. हे त्यांचे आपसातील ऐक्य आणि आपल्या नेत्यावरील त्यांची निष्ठा एवढी जबरदस्त होती की , या किल्ल्यात मराठ्यांचा कधीही चंचूप्रवेशही होऊ शकला नाही.

पुढच्याच काळातील एक गोष्ट सांगता येईल. इ.स. १७ 3 ७ मध्ये चिमाजीअप्पा पेशवे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांची जंजिऱ्याविरुद्ध मोहिम सुरू झाली. उरण येथे फार मोठी लढाई झाली. त्यात मराठ्यांनी जंजिऱ्याचा मुख्य नेता (सुलतान म्हटले तरी चालेल) सिद्दी सात याला युद्धात ठार मारले. नेता पडला. पण पाण्यातला जंजिरा तसाच झुंजत राहिला. हे एकीचे , शिस्तीचे आणि अनुशासनाचे बळ आहे.

महाराज जंजिऱ्यावरील मोहीम आताही मांडीत होते. (इ. १६६९ ) जंजिऱ्याचे तीन सिद्दी एकवटून प्रतिकारास उभे होते. सिद्दी कासम , सिद्दी खैरत आणि सिद्दी संबूळ ही त्यांची नावे.

- बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ

स्वराज्याला प्रारंभ केल्यापासून महाराजांचे वास्तव्य मुख्यत: राजगडावरच होते. राजगड हाच स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला करावा असे त्यांच्या मनात होते , म्हणूनच राजगडाचा वापर राजधानी सारखाच सुरू झाला. (इ. १६४६ पासून) त्या वेळेपासूनच राजगडाच्या तीनही माची आणि बालेकिल्ला बांधकामाने सजू लागल्या. सुवेळा , संजीवनी आणि पद्मावती अशी या तीन माचींची नावे. एवढी उत्कृष्ट बांधकामे महाराष्ट्रातील कोणत्याही एकाच किल्ल्यावर सापडणार नाहीत. राजगड केवळ अजिंक्य होता.

वास्तविक स्वराज्याचे राज्यकारभारातील वेगवेगळे भाग सपाट प्रदेशावरती असणे हे राजाच्या प्रजेच्या आणि राज्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने जेवढे सपाटीच्या शहरात सोईचे होतात , तेवढे उंचउंच डोंगरमाथ्यावर होऊ शकत नाहीत. पण असे शहरात सपाटीवर राजधानी करणे क्रांतीच्या प्रारंभ काळात धोक्याचेही असते. शत्रू केव्हा झडप घालील आणि ऐन राजधानीलाच कधी धोका पोहोचेल याचा नेम नसतो. म्हणून उंच शिखरावर तटबंदीने अजिंक्य बनविलेल्या किल्ल्यावर राजधानी असणे गरजेचेच असते. राजगडचे बांधकाम सुमारे १० वषेर्ं चालले होते. जगातील उत्कृष्ट अशा डोंगरी लष्करी किल्ल्यात राजगडाचा समावेश करावा लागेल.

इ. स. १६४६ पासून ते आग्ऱ्याहून सुटकेपर्यंत स्वराज्याची राजधानी राजगड होती. अद्यापीही होतीच की , पण मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखान यांची स्वारी आली तेव्हा महाराजांच्या प्रत्ययास एक गोष्ट आली की , मोगलांचे लष्कर राजगडाच्या पायथ्यापर्यंत घुसण्याचा प्रयत्न करीत आहे.

रायकरण सिसोदिया , दाऊतखान कुरेशी , सर्फराजखान इत्यादी मोगली सरदार राजगडाच्या उत्तरेस असलेल्या मावळात , म्हणजेच गुंजण मावळ आणि कानद मावळ या भागांत विध्वंसन करण्यासाठी मुसंड्या मारताहेत. या मोगली सरदारांनी प्रत्यक्ष राजगडावर हल्ले चढविले नाहीत. मोचेर् लावले नाहीत किंवा वेढा घालून बसण्याचेही प्रयत्न केले नाहीत. तशी एकही नोंद सापडत नाही. तरीही मोगली शत्रू राजधानीच्या पायथ्यापर्यंत येऊन जातो ही गोष्टही फार गंभीर होती. म्हणून महाराजांनी राजधानीचे ठिकाणच बदलावयाचा विचार सुरू केला.

नवी राजधानी कुठे करायची म्हटले , तरी ती डोंगरी किल्ल्यावरच करावी लागणार हे उघड होतं. जेव्हा कधी पुढे स्वराज्याचा सपाट प्रदेशावरतीही विस्तार होईल , तेव्हा एखाद्या शहरांत राजधानी करणे थोडे सोईचे ठरेल. पण जोपर्यंत उत्तर , पूर्व आणि दक्षिण या बाजूंना बादशाही अंमल अगदी लागून आहे , तोपर्यंत डोंगरातून बाहेर येणे आणि राजधानी स्थापणे हे धाडसाचे आणि लष्करी जबाबदारी वाढविणारे ठरेल.

म्हणून महाराजांनी राजधानीचा विचार नवीन केला. त्यांचे लक्ष रायगडावरच खिळले. कोकणच्या बाजूने समुदापर्यंत मराठी स्वराज्याचा विस्तार झालेला होता. रायगड उंच पर्वतावर असूनही विस्ताराने प्रचंड आणि संरक्षणाच्या दृष्टीने केवळ अजिंक्य होता.

आणि महाराजांनी ' राजधानी ' करण्याच्या दृष्टीने रायगडावर बांधकामे सुरू केली. त्यांनी रायगड राजधानी केली. यात त्यांची युद्धनेता या दृष्टीने अधिकच ओळख चांगल्याप्रकारे इतिहासाला होते.

रायगड सर्व बाजूंनी सह्यशिखरांनी गराडलेला आहे. एका इंग्रजाने या रायगडावर असा अभिप्राय व्यक्त केला आहे की , ' रायगडसारखा अजिंक्य किल्ला जगाच्या पाठीवर दुसरा नाही. ' दुसऱ्या एका इंग्रजाने रायगडाला ' त्नद्बड्ढह्मड्डद्यह्लश्ाह्म श्ाद्घ ह्लद्धद्ग श्वड्डह्यह्ल ' असे म्हटले आहे. हेन्री ऑक्झिंडेन , ऑस्टीन , युस्टीक इत्यादी अनेक पाश्चात्य मंडळींनीही रायगडचा डोंगरी दरारा आपापल्या शब्दांत लिहून ठेवला आहे.

हिराजी इंदुलकर या नावाचाही एक उत्कृष्ट दुर्गवास्तुतज्ज्ञ महाराजांच्या हाताशी होता. महाराजांनी याच हिराजीला राजधानीच्या रुपाने रायगडची बांधकामे सांगितली. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता रायगडाच्या म्हणजेच राजधानीच्या बेलाग सुरक्षिततेचा. त्या दृष्टीने रायगड सजू लागला. रायगड किती बलाढ्य आहे , हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर खरे लक्षात येते.

हळूहळू एकेक राज्यकारभाराचा विभाग राजगडावरून रायगडावर दाखल होऊ लागला. पुढे इ. १६७४ मध्ये महाराज प्रत्यक्ष ' सिंहासनादिश्वर छत्रपति ' झाले ते याच रायगडावर. त्यावेळी हिराजी इंदुलकरानी जी काही बांधकामे गडावर केली , त्याची नोंद एका शिलालेखात कोरली. हा शिलालेख आजही रायगडावर श्रीजगदीश्वर मंदिराच्या बाहेर आहे. तेथेच देवळाच्या पायरीवर त्याने पुढील शब्द कोरले आहेत.

' सेवेचे ठाई तत्पर हिराजी इंदुलकर '

रायगडावर चढून जाण्याची वाट अरुंद आणि डोंगरकड्याच्या कडेकडेने वर जाते. त्यामुळे चढणाऱ्याला धडकीच भरते. वर चढत असताना डावीकडे खोल खोल दऱ्या आणि उजवीकडे सरळसरळ कडा. असे हे बांधकाम गडाच्या माथ्यापर्यंत करताना केवढे कष्ट पडले असतील , याची कल्पनाही नेमकी येत नाही.

अशा उंच गडावर चिरेंबदी दरवाजे , बुरुज , चोरवाटा आणि संरक्षक मोचेर् पाहिले की , हिराजीने भीमाच्या खांद्यावर जणू चक्रव्यूहच रचला असे वाटते. त्याने एक सुंदर वास्तू , एक बलाढ्य लष्करी वास्तू आणि तेवढीच मोलाची कला , संस्कृती , विविध शास्त्रे यांची ' रायगड ' ही सरस्वती नगरीही उभी केली. हिराजी इंदुलकर हा निष्णात लष्करी वास्तुतज्ज्ञ होता स्वत: महाराज.

- बाबासाहेब पुरंदरे