शनिवार, २७ जून, २००९

सप्रेम धन्यवाद, विनंती विशेष! - श्री. राज ठाकरे


लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना लोकांनी भरभरून मतदान केले त्याबद्दल प्रथम मी सर्वांचे आभार मानतो. अवघ्या तीन वर्षांच्या `मनसे' ला आपण जे प्रेम दिले, जो विश्वास दाखवला, तो सार्थ ठरविण्यासाठी सर्वशक्ती पणाला लावून मी यापुढील वाटचाल करीन. महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून पक्षाची स्थापना केल्यानंतर झालेल्या महापालिकांच्या निवडणुकीतही आपण मला साथ दिली होती. त्यावेळी पक्षाला मिळालेल्या मतांपेक्षा दुप्पट मतदान लोकसभा निवडणुकीत करून आपण माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे मराठी अस्मितेसाठी यापुढे अधिक कडवटपणे लढण्याचे बळ मला मिळाले आहे. आपले प्रेम यापुढेही असेच भरभरून मिळावे, यासाठी माझे `महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न' आपल्यासमोर मांडत आहे.

गुणवत्ता ठासून भरलेली असतानाही महाराष्ट्राचा खर्‍या अर्थाने विकास का झाला नाही? महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात देशाचा आदर्श का बनू शकले नाही? या प्रश्नांचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. सर्वच पक्ष याला कमी-अधिक प्रमाणात जबाबदार आहेत. त्या सार्‍यानीच महाराष्ट्राच्या विकासाची वाट लावण्याचे काम केले आहे. दिल्लीपुढे लोटांगण घालत आपली खुर्ची सांभाळण्याचे काम केले आहे. मराठीचा मुद्दा आमचाच, असे म्हणणार्‍यानाही महापालिकेत सत्ता असतानाना दुकानांवर मराठीत पाट्या लावता आल्या, ना संसदेत महाराष्ट्राचा आवाज उठवता आला. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत सार्‍याचीच नावे उठता-बसता घेणाऱ्या ‍आजच्या राजकारण्यांनी या युगपुरुषांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आज आहे का, व त्यासाठी आपण कोणते प्रामाणिक प्रयत्न केले, याचा एकदा तरी आढावा घ्यावा. `मनसे' ला लोकसभेत एकाही जागी विजय मिळाला नसला तरी अवघ्या तीन वर्षांच्या माझ्या पक्षाला मतदारांनी दिलेली `लाखमोला' ची मते ही लोकांना`गृहित' धरून राजकारण करणार्‍याच्या डोळ्यापुढे दिवसा काजवे चमकावून जाणारी आहेत. कालपर्यंत `मनसे' ला अनुल्लेखाने टाळणारी ही मंडळी आज `मनसे' मुळे मराठी मतांचे विभाजन झाल्याचे गळा काढून सांगत आहेत. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला जात आहे. या मंडळींनी गेल्या काही वर्षांत आपली विश्वासार्हता किती गमावली आहे, याचा आढावा घेण्याची गरज आहे. एकीकडे शरद पवार यांच्याशी चुंबाचुंबी करायची, तर दुसरीकडे उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून लाई चना आणि उत्तर प्रदेश दिन साजरे करायचे, हा मराठी माणसांचा विश्वासघात नाही का?

गेल्या तीन वर्षांच्या वाटचालीत `मनसे' ने अनेक आंदोलने केली. माझ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, रक्तबंबाळ होईपर्यंत मार खाल्ला, अनेक केसेस अंगावर घेतल्या, तडीपार्‍या भोगल्या. माझ्या स्वत:वर ८० हून अधिक केसेस आहेत. हे सारे मराठी माणूस उघडे डोळे ठेवून पाहात होता. माझ्या भाषणातील तसेच कृतीतील तळमळ त्याला दिसत होती. त्यामुळेच त्यांनी `मनसे' ला भरभरून मतदान केले. यामध्ये नवमतदारही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वाढलेल्या जाबादारीची संपूर्ण जाणीव मला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करताना महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न मी पाहिले. जगाला हेवा वाटावा, असा महाराष्ट्र घडविण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी विकासाची `ब्लू प्रिंट' मी तयार केली. आज जो विश्वास आपण दाखवलात, तसाच विश्वास यापुढेही दाखवलात आणि महाराष्ट्राची सत्ता `मनसे' च्या हाती दिलीत, तर लोकहितासाठी कठोरपणे राज्यकारभार करून महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न खर्‍या अर्थाने साकार करून दाखवेन, एवढाच शब्द आज मी आपल्याला देतो.

दिल्लीच्या मनात महाराष्ट्राचा विकास होऊ नये, असेच आहे. किंबहूना, महाराष्ट्राविषयी दिल्ली व उत्तरेतील राजकारण्यांच्या मनात आकस व रागच आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यापासूनच हा आकस कायम असल्याचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळीच स्पष्ट झालेले आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविण्यासाठी १०६ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. त्यावेळी चिंतामणराव देशमुख यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना दाखविलेल्या बाणेदारपणानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुतेक सर्वच नेत्यांनी दिल्लीश्वरांपुढे कायम लोटांगणच घातल्याचे दिसून येईल. महाराष्ट्रातील आजचे राज्यकर्ते तर टीकेपलीकडेच आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विकासाचे एक स्वप्न उराशी बाळगून मी `महाराष्ट्र नवनिर्माण सेने' ची स्थापना केली. आज जो मी लढत आहे, तो केवळ विरोधासाठीचा विरोध म्हणून नाही, तर एक ठाम भूमिका घेऊन मी उभा आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि विकासाचा हा लढा आहे.

जगभर अनेकदा फिरण्याचा मला योग आला आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातही मी अनेकदा फिरलो आहे. जगातील मोठ्या राष्ट्रांनीच नव्हे, तर अनेक छोट्या देशांनी केलेली प्रगतीही थक्क करणारी आहे. तेथील रस्ते, पाण्याची व्यवस्था, उद्योग वाढविण्यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न, पर्यटनाच्या माध्यमातून केलेला विकास, वाळवंटात धरण बांधण्याची साधलेली किमया... हे पाहताना माझ्या महाराष्ट्रात असे का साकारू शकत नाही, असा विचार मनात आल्याशिवाय राहात नाही. या सर्व देशांतील नेत्यांनी देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांचा स्वार्थ कधी आड येऊ दिला नाही. प्रखर राष्ट्रनिष्ठा असलेले आणि विकासाचाच विचार करणारे लोक अशा प्रकारची प्रगती करू शकतात. महाराष्ट्राचाही सर्वार्थाने विकास करणे शक्य आहे. त्यासाठी लागणारी गुणवत्ताही येथे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असणारी राजकीय इच्छाशक्ती येथे नाही, हेच आपले दुर्देव आहे. त्यामुळेच राज्याच्या निर्मितीनंतर ६० वर्षानंतरही पाणी, वीज, बेरोजगारी या प्रश्नांवरच निवडणुका लढविल्या जात आहेत. हे सारे चित्र बदलायचे आहे की नाही, याचा विचार आता महाराष्ट्रातील सूज्ञ मतदारांना करायचा आहे. गेल्या ६० वर्षांतील सर्वच राजकीय पक्षांनी लोकांना गृहीत धरले आहे. जातीपातीचे राजकारण केले आहे. यामुळे महाराष्ट्र गर्तेत गेला आहे. शेतकर्‍याना आत्महत्या कराव्या लागत आहेत, तर चांगल्या शिकलेल्या तरुणांनाही बेरोजगारांच्या रांगेत उभे राहावे लागत आहे.

महाराष्ट्रावर राज्यकर्त्यांचा वचक राहिलेला नाही. कोणाचा पायपोस कोणाला नाही. वीज फुकट देऊ, नोकर्‍याच देऊ, दोन रुपयांत धान्य देऊ, अशा लोकप्रिय घोषणा करणार्‍याच राजकीय नेत्यांना व त्यांच्या पक्षांना निसर्गाकडून फुकट मिळणार्‍या पाण्याचे साधे नियोजन करता आलेले नाही. नुसता मराठवाड्याचा विचार केला, तर तेथे पाण्याची पातळी ७०० फुटांहून खाली गेली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर १५ ते २० वर्षांनंतर मराठवाड्याचे वाळवंटात रुपांतर होण्याची भीती काही अभ्यासकांनी आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. याच मराठवाड्यात शेतीचे व शेतकर्‍याचे पाण्याअभावी हाल होत आहेत. परंतु, त्यांचा विचार करण्यासाठी राज्यकर्त्यांकडे वेळ नाही.

औरंगाबाद येथे बीअरच्या सहा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यासाठी पाण्याचा उपस मराठवाड्यातच केला जात आहे. बीड आणि लातूर येथे बिस्लेरीसारख्यांचे अनेक प्रकल्प टाकण्यात आले आहेत. लोकांना बाटल्यांतील पाणी घेण्याची सक्ती करणारे हे कोणते धोरण आहे? दिवसेंदिवस परिस्थिती भीषण होत असताना आमचे राजकारणी मात्र सत्तेत मश्गुल आहेत. शेतकर्‍याच्या आत्महत्त्या झाल्या की, कर्जमाफी करायची; परंतु प्रश्नाच्या मुळाशी जाऊन सोडवणूक करायची नाही. शेतीचे, पाण्याचे, वाढत्या शहरीकरणाचे,विजेचे महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी योग्य नियोजन करायचे नाही. तात्पुरती मलमपट्टी करून प्रश्र्नच लोंबकाळत ठेवायचे, अशी या राजकारण्यांची नीती आहे. जेथे नियोजनाच्याच नावाने बोंब आहे, तेथे अंमलबजावणीचा प्रश्नच येत नाही. भविष्याचा वेध घेणे, आगामी काळाच्या गरजा लक्षात घेणे, त्यासाठी महाराष्ट्रातील प्रश्नांचा आढावा घेणे - यासाठी राज्यकर्त्यांकडे वेळही नाही आणि इच्छाशक्तीही नाही, हेच या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

`महाराष्ट्र नवनिर्माण सेने' ची स्थापना करण्यापूर्वी मी महाराष्ट्राचा दौरा केला होता. लोकांचे प्रश्न पुन्हा एकदा समजून घेतले. वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक चांगल्या व तज्ज्ञ लोकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. महाराष्ट्राच्या विकासाचा लढा लढताना लोकांचा पाठिंबा मिळेल का, याची पाहणी केली. त्यानंतरच पक्षाची स्थापना केली. हे सारे करताना केवळ महाराष्ट्राचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. पक्ष स्थापनेनंतर शिवाजी पार्क येथील भाषणात महाराष्ट्राच्या विकासाची `ब्लू प्रिंट' तयार करण्याची घोषणा केली होती. आजही काही लोक खवचटपणे `ब्लू प्रिंट' कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित करतात. अशी `ब्लू प्रिंट' माझ्याकडे तयार आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठीचे सात विषय आम्ही तयार केले आहेत. त्यासाठी पक्ष स्थापनेच्यावेळीच पुणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण अकादमीची स्थापना केली होती. या अकादमीत तज्ज्ञ लोकांच्या मदतीने महाराष्ट्रातील विविध प्रश्नांचा निरंतर अभ्यास करण्यात येत आहे. यामध्ये अर्थकारण, आरोग्य, शेती, उद्योग, शिक्षण तसेच पायाभूत सुविधांसह अनेक विषयांवर नेमके काय केल्यास महाराष्ट्राचा खर्‍या अर्थाने विकास होईल, यांच्या योजना तयार केल्या जात आहेत.

चांगले रस्ते बांधल्यामुळे अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते, उद्योगांचा विकास होऊ शकतो. आजचे अनेक राजकारणी वेळोवेळी परदेशात जातात. तिथून येताना आपल्या नातेवाईकांसाठी अनेक गोष्टी आणतात. मात्र त्यांना महाराष्ट्रासाठी एखादी गोष्ट आणावी, असे का वाटत नाही? परदेशात एकदा रस्ते बांधले की, ते ३० वर्षे टिकतात. असे चांगले रस्ते आपण कधी बांधणार? चांगले रस्ते बांधले तर त्यावर खड्डे कसे पडणार आणि मग खड्डे बुजवण्यासाठी व पुन्हा रस्ते बांधण्यासाठी निविदा कशा काढणार, एवढाच विचार करणारे राजकारणी महाराष्ट्राचे काहीही भले करू शकत नाहीत. ब्रिटनमधील कंपन्यांनी शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलांसंदर्भात अलीकडेच येथील महापालिकांना पत्र पाठवले आहे. या पत्रात म्हटले आहे की, सदर पुलाची जाबदारी ही १०० वर्षापर्यंत आमची होती. आता ही जबाबदारी तुम्ही सांभाळा. अशी बांधीलकी आमच्यात कधी निर्माण होणार? आम्ही आज पूल बांधले की, दुसर्‍या आठवड्यात त्यावर डांबर टाकण्याचे काम सुरू केले जाते. वर्षभरात पुलाला खड्डे पडून दुरुस्तीच्या नावाखाली बंद केला जातो. या खराब बांधणीमुळे राज्याच्या नियोजनावर मोठा परिणाम होतो आणि विकासाचा पैसा खड्ड्यात जातो. दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांकडे द्रष्टेपणा नाही. एवढेच नव्हे, तर प्रश्न लोंबकळत ठेवायचे किंवा वाढवत न्यायचे, एवढेच काम ही मंडळी करत आहेत. यातून केवळ महराष्ट्रच नव्हे, तर सार्‍याच देशाचा विकास अडकून पडला आहे. चांगले रस्ते न बांधणार्या कंत्राटदारांवर कठोरपणे कारवाई होत नाही, की या कामांवर लक्ष ठेवणार्‍या अधिकार्‍याना जेलची हवा खावी लागत नाही, कारण राजकीय नेत्यांचे यामध्ये हितसंबंध गुंतलेले असतात.

स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात ज्यांनी आपल्या बलिदानाची आत्माहुती दिली, अशा स्वातंत्र्यवीरांचे बलिदान भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत बुडविणार्‍या राजकारण्यांना धडा शिकविण्याची आता वेळ आली आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रमार्ग शत्रू प्रवेश करू शकतो, असा इशारा दिला होता. तरी आपण आजही झोपलेलो आहोत. त्यामुळेच समुद्रमार्गे येऊन मुंबईवर हल्ला करण्याची हिम्मत पाकिस्तानी अतिरेकी करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने अफजल गुरूला फाशी देण्याचा निर्णय दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होत नाही. लोकांनी अशा बेजबाबदार नेत्यांना आणि पक्षांना धडा शिकविण्याची गरज आहे.

आज शहरांच्यानियोजनाचा पत्ता नाही. नियोजनाअभावी शहरे बकाल होत आहेत. अनधिकृत झोपड्या वाढत आहेत. कोणीही यावे व कसेही राहावे. कोणतेही नियंत्रण नाही. कसलाही धाक नाही. मुंबई व महाराष्ट्रात परप्रांतातून लोंढे येत आहेत. अनधिकृत झोपड्या बांधून राहत आहेत. या अनधिकृत झोपड्यांना मान्यता देऊन त्यांनाच मोफत घरे देण्याचे उद्योग राजकारणी करत आहेत. यातूनच मुंबईसारख्या शहरांमध्ये परप्रांतीयांची दादागिरी मतांच्या रूपाने वाढत आहे. दिवस - रात्र सेवा करणाऱ्या पोलिसांना तसेच सरकारी नोकरांना हक्काची घरे नाहीत आणि बिहार, युपीतून येणाऱ्या लोंढ्यांना मात्र मोफत घरे मिळत आहेत. अरबाच्या तंबूत घुसलेल्या उंटासारखी येथील मराठी माणसाची अवस्था होणार आहे.

मतांच्या राजकारणासाठी शहरांची वाट लावली जात आहे. मुंबईतून केंद्राला ६८ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र त्यातून महाराष्ट्राला योग्य वाटा केंद्राकडून दिला जात नाही. अविकसित राज्ये या नावाखाली बिहार व उत्तर प्रदेशसारख्या राज्यांना या महसुलातील मोठा वाटा मिळतो. एकीकडे महराष्ट्राने या राज्याच्या विकासाचा वाटा उचलायचा आणि ते कमी ठरावे, म्हणून तेथून येणार्‍या लोंढ्यांनाही येथे पोसायचे, हे उद्योग महाराष्ट्राला फार काळ परवडणारे नाही. येथील भूमीपुत्रांनाच शंभर टक्के येथील व्यवसायात अथवा नोकर्यांरमध्ये वाटा मिळायला हवा. रेल्वे, आयकर अथवा अन्य केंद्रीय सेवांमध्ये महाराष्ट्रात भरती होणार असेल तर येथील मराठी तरुणांनाच नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत, यावर मी ठाम आहे. यासाठीच `मनसे' ने मधल्या काळात आंदोलन पुकारल्यानंतर दिल्लीतील युपी-बिहारच्या नेत्यांनी मी देश तोडायला निघाल्याचा आरोप केला.

आज प्रत्येक राज्य आपला विकास, अस्मिता, भाषा व वेशभूषा यासाठी पराकेटीचे आग्रही आहेत. दक्षिणेतील राज्यांकडे याबाबत आदर्श म्हणून पाहता येईल. आपल्याकडील बिनकण्याच्या नेत्यांमुळे मराठी तरुणांचे हक्क डावलले जात आहेत. दुकानांवर मराठी पाट्या लावणे, शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा असणे आणि नोकऱ्या मध्ये मराठी तरुणांना प्राधान्य देणे या मुद्दांवर मी ठाम आहे.

दुर्दैवाने मराठी मते फोडल्याचा आरोप माझ्यावर लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेतील काही `बालबुद्धी' च्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मराठी मतदार म्हणजे काही शिवसेनेच्या गोठ्यातील गाय नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. २००४ साली `मनसे' हा पक्ष नव्हता. त्यावेळी मुंबईत लोकसभा निवडणुकीत काय झाले होते? मराठी मतदारांनी तेव्हा शिवसेनेला का मते दिली नाहीत, याचा विचार प्रथम त्यांनी करावा आणि त्यानंतरच मराठी मते फुटल्याचा बेताल आरोप करण्याची हिम्मत करावी.

खरे तर मराठी मते फुटलेली नाहीत. नवमतदारांनी `मनसे' ला भरभरून मते दिली आहेत. मी मांडत असलेले विचार, त्यासाठी केलेली आंदोलने, घेतलेल्या केसेस आणि माझी तळमळ अवघ्या तीन वर्षांत लोकांपर्यंत पोहोचल्यामुळेच लोकंनी `मनसे' ला मते दिल्याचे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे व अस्मितेचे स्वप्न घेऊनच मी राजकारणाच्या रणांगणात उभा आहे. आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांना आपण राज्यात सत्ता देऊन पाहिली आहे. आता एकदा माझ्यावर विश्वास टाकून पाहा. विधानसभा जिंकण्याची संधी द्या. जगाला हेवा वाटावा, असा महाराष्ट्र मी घडवेन, एवढेच मनापासून सांगतो.

- मा. राज ठाकरे
***
(शब्दांकन - संदीप आचार्य)
सौजन्य : लोकसत्ता - लोकरंग, रविवार २४ मे, २००९.

शुक्रवार, २६ जून, २००९

माझी भूमिका, माझा लढा! - श्री. राज ठाकरे


मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल बोलल्याबद्दल आणि तिच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याबद्दल युपी-बिहारमधून आलेल्या गुंडांकडून आणि पत्रकारांचा बुरखा पांघरून यूपी-बिहारची वकिली करणार्‍या बहुतेक सर्व हिंदी चॅनल्सच्या भैय्या पत्रकारांकडून माझी आणि माझ्या सहकार्‍यांची, माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संघटनेची सतत बदनामी होते आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी मुलं आणि जे तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत, ते चांगल्या घरातले आहेत. त्यांची घरची तसेच सांस्कृतिक पार्श्र्वभूमी अतिशय चांगली आहे. त्यांना उत्तम करियर्स आणि व्यवसाय आहेत. परंतु तरीही त्यांनी ही बदनामी आणि हा प्रचंड त्रास अंगावर घेतला, ज्यातून त्यांना काहीही आर्थिक किंवा इतर कोणत्याच प्रकारचा फायदा होणार नाही. तात्काळ कोणती सत्तापदंही त्यांना मिळणार नाहीत. नेता म्हणून आणि एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून मलाही या सार्‍या संघर्षाचा कोणताच व्यक्तिगत फायदा होणार नाही, हे सारं माहीत असूनही या संघर्षाला मी प्रवृत्त का झालो?

संपूर्ण महाराष्ट्रातल्या समज असलेल्या जनतेसाठी मी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात येणार्‍या यूपी-बिहारमधल्या सर्व भैय्यांना आपण इथे महाराष्ट्रात राज्य करण्याकरताच येतो आहोत असे वाटत असते. एखाद्या प्रांतातल्या जनतेला तिची स्वत:ची भाषा असते. तिची समृद्ध अशी संस्कृती असते. पाहुणा जेव्हा येतो, तेव्हा यजमानाकडून जशी आतिथ्यशीलतेची अपेक्षा असते, तशी पाहुण्याकडून यजमानाच्या घराशी, त्याच्या संस्कृतीशी समरस होण्याची अपेक्षा असते. उत्तर प्रदेश, बिहारमधला साधा माणूस असो, नेता असो, पत्रकार असो, शिक्षणासाठी येणारा विद्यार्थी असो, नट असो, वा मच्छीमार असो - तो तिथे, त्या राज्यांमध्ये त्याच्यावर फाके मारण्याची वेळ तिथल्या नेत्यांमुळे आलेली असते म्हणून इथे महाराष्ट्रात येतो - पण इथे आल्यावर त्याची स्टाइल बदलते. इथली भाषा तो शिकत नाही. इथल्या संस्कृतीला, स्थानिक माणसाला तो तुच्छ लेखतो, त्याच्यावर दादागिरी करतो. एखाद्या युपी-बिहारच्या रिक्षा-टॅक्सीवाल्यापासून ते सिनेमानटांपर्यंत हा अनुभव आपल्याला पुन: पुन्हा येत असतो. आपण आपल्या मराठी संस्कृतीनुसार त्याला औदार्याने, सहिष्णूपणे पुन: पुन्हा माफ करतो, विसरून जातो. असं बंगाली, पंजाबी, उडिया, आसामी किंवा तामिळ माणूस कधीही करणार नाही. कारण या भाषिकांची भाषिक आणि सांस्कृतिक उद्दिष्टं अतिशय तीक्ष्ण आहेत आणि त्याबाबत ते सतत सावध असतात. परंतु आपण सहिष्णू आहोत.

आजही सहिष्णुता हा मला गुणच वाटतो. सवर्च अमराठी माणसांशी असा संघर्ष करण्याच्या बाजूचा मी नव्हतो आणि नाही. परंतु युपी-बिहारमधल्या भैय्यांनी हा संघर्ष आमच्यावर लादलेला आहे. सैन्यात मराठा बटालियनमध्ये ‘मराठा’ (म्हणजे महाराष्ट्रीयन) या शब्दाची फोड ‘मरता लेकिन हटता नही वो मराठा’ अशी केली जाते. यापूर्वी हात जोडून या यूपी-बिहारवाल्यांना मी महाराष्ट्रातल्या मराठी माता-बांधवांच्या वतीने अनेकदा सांगितलेलं आहे की, इथल्या संस्कृतीने तुम्हाला सतत खूप दिलेलं आहे, तेव्हा या संस्कृतीचं रक्षण, संवर्धन आणि आदर करणं तुमचं कर्तव्य आहे. असं जाहीर भाषणांत आणि खासगी चर्चांत सांगितलं. परंतु यांची मग्रूरी इतकी आहे की, उत्तर प्रदेश-बिहारमधून तिथल्या जनतेची पूर्ण वाताहत करून गब्बर झालेले अमरसिंह, मुलायमसिंह आणि तत्सम इतर अनेक नेते इथे बोलावून घेऊन इथल्या मराठी जनतेला राज्यघटना आणि देशप्रेम ‘शिकवण्याचे’ प्रयोग इथल्या युपी-बिहारवाल्यांनी सुरू केले. एवढेच नव्हे, तर हिंदी भाषा आणि हिंदी संस्कृती मुंबई महापालिका आणि महाराष्ट्रावर लादण्यासाठी दादागिरीची भाषा सुरू केली.

महाराष्ट्रातल्या बहुतेकांना खरंतर हिंदी भाषा येतेच. पण मराठी ही इथली राजभाषा आहे. तिला घटनेने राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला आहे. शिवाय स्वत:ची भाषा-संस्कृती वाढवण्यासाठी आणि अनिवार्य करण्यासाठी भाषावार प्रांतरचना झालेल्या राज्यातल्या जनतेला युपी-बिहारमधल्या भैय्यांची परवानगी घेण्याची गरज आहे का? या भैय्यांनी चक्क मुंबई महापालिकेत हिंदी अनिवार्य करण्याची मागणी करून मराठी मागे रेटण्याचे प्रयत्न सुरू केले. महाराष्ट्रात छट पूजा, उत्तर प्रदेश स्थापना दिवस, राजकीय बळ दाखवण्याकरिता जोराने साजरे करायला सुरुवात केली. रिक्षा असो, टॅक्सी असो, रस्ते असोत, इमारती असोत, सोसायट्या असोत, वर्तमानपत्रं असोत, चॅनल्स असोत, मच्छिमारी असो, सिनेमे असो - सर्वत्र या युपी-बिहारवाल्या भैय्यांची बेबंद दादागिरी महाराष्ट्रात सुरू झाली. तेव्हा लक्षात आलं की, यांच्याशी हात जोडून बोलण्याचे दिवस संपले. आता यांना हात सोडून सामोरं जायला हवं. म्हणून मी आणि माझ्या सर्व सहकार्‍यांनी महाराष्ट्रात युपी-बिहारवाल्यांच्या सांस्कृतिक व राजकीय दादागिरी आणि गुंडगिरीविरुद्ध संघर्ष सुरू केला. महाराष्ट्रात राहायचं असेल, तर महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रीयनांच्याच जीवनपद्धतीप्रमाणे बाहेरून येणार्‍यांना जगावं लागेल. महाराष्ट्राशी त्यांना जुळवून घ्यावं लागेल. हे झालं नाही, तर महाराष्ट्रात अराजक माजेल.


महाराष्ट्रात जी कायदा-सुव्यवस्था आहे, महाराष्ट्रात ज्या विकासाच्या संस्था आहेत, त्यांचा फायदा देशभरचे लोक घेत असतात. ती संस्कृतीच उखडून टाकली, तर इथे जौनपूर-आझमगढसारखीच परिस्थिती निर्माण होईल. राजाभय्या, अमरसिंह, लालू, पासवानांसारखे लोक महाराष्ट्राचा कब्जा घेतील. हे केवळ मी म्हणतोय असं नव्हे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभाध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी आमचं आंदोलन झाल्याच्या दुसर्‍या दिवशी कोल्हापूरमध्ये ‘महाराष्ट्राचे पुढचे मख्यमंत्री अमराठी झाले, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही,’ असे उद्‌गार काढले. आता कुपेकर हे काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नव्हेत. परंतु ही सार्वत्रिक भावना आहे. मराठी जनतेत, मराठी नेत्यांमध्ये, मराठी नटांमध्ये, सर्व महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांमध्ये या युपी-बिहारवाल्यांबद्दल चीड आहे. मी आणि माझा पक्ष फक्त वाईटपणा घेऊन त्यांचं प्रतिनिधित्व करतो. नागड्याला नागडं म्हणण्याचं साहस कुणीतरी सगळ्यांचे शिव्याशाप घेऊन केलं पाहिजे. ते साहस मी करतो आहे. परिणामांची पूर्ण कल्पना करून. एकेकाळी तेच साहस प्रबोधनकारांनी केलेलं होतं, आचार्य अत्र्यांनी केलेलं होतं, बाळासाहेबांनी केलेलं होतं, खुद्द कुसुमाग्रजांनी केलेलं होतं.

कित्येक जण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आंदोलनाची तुलना शिवसेनेची स्थापना झाली तेव्हाच्या सुरुवातीच्या आंदोलनांशी करतात. परंतु भावना काही प्रमाणात तशीच वाटली, तरी दोन्हींमध्ये फरक खूप आहे. तेव्हाचं आंदोलन हे गरीब मराठी माणसाचं, प्रामुख्यानं नोकर्‍यांसाठीचं आंदोलन होतं. इतर विषय त्याला नंतर चिकटत गेले. आज माझं आंदोलन हे उत्तर भारतीयांच्या महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक आणि राजकीय दादागिरी आणि गुंडगिरीविरुद्ध आहे. त्यांच्याकडे उत्तरेतून येणारे गुंड नेते, त्यांच्यामार्फत येणारे प्रचंड प्रमाणातले चलन, शस्त्रास्त्रं आहेत. इथे त्यांचं मग्रुर मनुष्यबळ वाढवण्याच्या प्रयत्नात ते असतात. भैय्या टॅक्सीवाला, रिक्षावाला, मच्छीमार हा गरीब बिचारा उत्तरेतून आलेला असं चित्र भैय्यांची लॉबी असलेली चॅनल्स उभी करतात. परंतु त्यांना रोजच्या जगण्यात एकेकटा स्थानिक मराठी माणूस भेटतो, त्यांच्याशी व्यवहार करतो, तेव्हा त्यांची खास उत्तरेतली मग्रुरी, महाराष्ट्राबद्दलचा त्यांचा द्वेष, उत्तरेतल्या गुंडांवरची त्यांची श्रद्धा या सार्‍याचं आपल्याला दर्शन होतं. त्यामुळे ‘तो गरीब बिचारा पोटासाठी येतो’ अशा वाक्यात यांचं वर्णन होऊच शकत नाही.

राजकीय आणि सांस्कृतिक वर्चस्ववादाविरुद्धची ही आमची लढाई कितीतरी अवघड आहे. ती एकपदरी नाही, बहुपदरी आहे. महाराष्ट्रात आज राज्य कोणत्याही पक्षाचं असो. युपी-बिहारमधले त्या त्या पक्षाचे नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला अतिशय मग्रुरीने ‘व्हाया दिल्ली चेपू इच्छितात. हा महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचा अपमान आहे. पं. बंगाल, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओरिसा, आसाम, केरळच्या बाबतीत हे होऊ शकत नाही.
कारण तिथली जनता या भैय्यांच्या गुंडगिरीबाबत अतिशय सावध आहे. स्वत:च्या सांस्कृतिक आणि भाषिक राजकीय अस्मितेविरूद्ध एकही शब्द ते सहन करत नाहीत. पण महाराष्ट्राची स्थिती तशी नाही.

आज मराठी माणूस समृद्ध आहे. त्याची आज जागतिक बाजारात पत आहे. दीपक घैसास, आशुतोष गोवारीकर, सचिन तेंडुलकर आणि यांसारखे अनेक दिग्गज मराठी आज बाजारपेठेत वेगवेगळ्या क्षेत्रांत आपलं अस्तित्व दाखवत आहेत. आज परप्रांतीय मराठी माणसांकडे नोकर्‍या करत आहेत. हा बदल स्वागतार्ह आहे. पण राजकीय आणि सांस्कृतिक सावधपणाविना तो व्यर्थ जाऊ शकतो. या जाणिवेनेच मी आणि माझा पक्ष रस्त्यावर उतरलेलो आहोत.

एकेकाळी, म्हणजे बाळासाहेब पूर्णपणे कार्यरत असताना शिवसेना पक्ष मराठी माणसांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. तेव्हा तो माझाही पक्ष होता. तेव्हाही मी मराठी राजकीय वर्चस्वाचा मुद्दा लावून धरलाच होता. बिहारींविरुद्धचं माझं आंदोलन त्यावेळचंच. त्यामुळे माझ्या नव्या पक्षाच्या नव्या अजेंड्यात हा मुद्दा सामील झाला आहे असं अजिबातच नाही.

आता या भयानक परिस्थितीमुळे मी आणि माझ्या सर्व सहकार्‍यांनी आपलं राजकीय आयुष्य आणि सांस्कृतिक पुण्याई जुगारावर लावण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्यातलेच काही मराठी मला आणि माझ्या सहकार्‍यांना शिव्याशाप देत आहेत. पण त्यांची मुलं-नातवंडं पुढे मला दुवा देतील. कविता, पुस्तकं, संस्कृती, अहिंसा, सहिष्णुता मलाही कळते. नवनिर्माणाच्या विकास कामांसाठी, विकासदृष्टीसाठी मी अकादमीच (पुण्यात) सुरू केलेली आहे. ज्या शिवाजी पार्कवर परवा स. पा. ने बिहारच्या आणि उत्तरेतल्या गुंडगिरीच्या भाषा केल्या, तिथे मीच मराठी काव्यवाचन आणि मराठी पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन केलं. त्यामुळे मराठी सुसंस्कृतपणा आणि सहिष्णुता मलाही कळते. पण मराठी भाषा टिकेल, तेव्हा मराठी कविता टिकेल. मराठी भाषा टिकेल, तेव्हा मराठी संस्कृती टिकेल. मराठी संस्कृती टिकेल तेव्हा अस्सल मराठी राजकारण टिकेल. शेवटी रस्त्यावरचा संघर्ष कुणालाच प्रिय नसतो. पण आत्मरक्षणासाठी आणि संस्कृती टिकवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. तसं नसतं तर शेजार्‍यांच्या सद्‌सद्‌विवेकबुद्धिवर विश्वास ठेवून देशांनी सैन्य ठेवणं बंद केलं असतं आणि शेजारी राज्यांच्या प्रेमाखातर सर्व राज्यांत पोलीसदलही ठेवलं नसतं. संघर्ष करताना रक्त, घाम, अश्रू द्यावेच लागतात. पुढे ते संघर्ष यशस्वी झाल्यावर लोकप्रिय होतात!

फ्रांन्सचे राष्ट्राध्यक्ष सरकोझी आल्यावर स्वत: भारताचे पंतप्रधान शिखांच्या पगडीवर फ्रांन्समध्ये असलेल्या बंदीवर रदबदली करतात. करुणानिधी मलेशियातल्या तामिळांसाठी मलेशियन सरकारशी वाग्‌युद्ध करतात आणि मग भारत सरकारला त्यात रदबदली करावी लागते. दमदमी टाकसाळमध्ये अकाली दलाच्या पुढाकाराने अतिरेकी जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचा संत म्हणून फोटो लागतो. इंदिराजींच्या हत्येला कारणीभूत ठरणार्‍या या संताबद्दल देशात अवाक्षरही निघत नाही. राजीव गांधींच्या हत्येला सरळ कारणीभूत असणार्‍या एलटीटीईशी तामिळनाडूतील बहुतेक सर्व राजकीय पक्ष तामिळ मुद्यावर थेट संबंध ठेवून असतात. गांगुलीला टीममधून काढल्यावर पं.बंगालमधले कम्युनिस्ट बंगाली बनून आक्रमक होतात. हे सारं प्रांतवादी आणि सांस्कृतिक नाही? मुंबईत चालणारे सर्व हिंदी चॅनल्स आणि त्यांचे पत्रकार महाराष्ट्राविरुद्ध विष ओकत युपी-बिहारची वकिली करतात, ते प्रांतवादी नाहीत? अमिताभ बच्चन स्वत:ला ‘छोरा गंगा किनारेवाला’ मानतो. ते प्रांतवादी नाही का? मी आणि माझ्या पक्षाने मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मिता यावर बोललं वा कृती केली की मी गुंड ठरतो? हा मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

अमिताभ बच्चननी त्यांच्यासाठी मरमर मरून काम करणार्‍या सावंत नावाच्या मेकअपमनच्या मराठी, भोजपुरी चित्रपटांत दयेने काम केलं, तर ते जणू काही महाराष्ट्रावर उपकारच करताहेत, असं दाखवलं जातं. त्यांचा मेकअपमन जरी गांगुली, सुब्रम्हण्यम, मिश्रा कुणीही असता, तरी ते असेच वागले नसते काय? त्याच्यात त्यांचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंध काय? ते तन, मन, धनाने उत्तर प्रदेशचेच आहेत. त्यांनी जे मिळवलं ते इथे, हेही सत्य नाही का?फक्त मी माझ्या महाराष्ट्रासाठी उभा राहिलो तर गुन्हेगार ठरतो? राज्यघटनेत असं लिहिलंय का? मी इथे एकच पुन्हा सांगू इच्छितो. सर्व जग जरी विरोधात गेलं, तरी मी आणि माझी संघटना मराठी भाषिक जनता, महाराष्ट्र संस्कृती, मराठी भाषा यासाठीच लढत राहू. युपी-बिहारवाल्यांची महाराष्ट्रातली दादागिरी आणि गुंडगिरी आम्ही मोडून काढूच. मला महाराष्ट्राच्या मराठी जनतेला एवढंच सांगावंसं वाटतं की, जर मी तुमच्या मनातलंच बोलत असेन तर बघता काय, सामील व्हा!

आपण विजयी होऊच; कारण कोणताही कायदा, कोणतंही युद्ध, कोणताही माणूस पेटलेल्या मराठी मनांना थोपवू शकतच नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या मराठी माता-भगिनी-बांधवांनो, विजय तुमचाच आहे.

जय महाराष्ट्र!


-महाराष्ट्र टाईम्स, ९ फेब्रुवारी, २००८

आयुष्यातल्या एका वेड्या क्षणी...

आयुष्यातल्या एका वेड्या क्षणी, कोणीतरी आपल्याला आवडतं. त्याचा सहवास हवाहवासा वाटतो. कालांतराने हीच भावना बळावते आणि 'त्याच्या' किंवा 'तिच्या' शिवाय जगणे फार अवघड आहे इत्यादी इत्यादी विचार मनात येतात. हे सगळे फार नैसर्गिक आहे. खरंतर हा त्या वयाचा प्रताप असतो. खरंतर त्या वयात 'कुणीतरी' आवडावं इतकीच योजना निसर्गाने केलेली असते. पण 'त्याच्याशिवाय शक्य नाही' हा मात्र पूर्ण मनाचा खेळ असतो. आयुष्यात प्रथमच असे घडत असल्याने मनाची तशी समजूत होणे स्वाभाविक आहे. त्या वयात निसर्ग स्वप्न पहायची वृत्ती देतो, व्यवहार नव्हे. प्रेम करायची भावना देतो, विषयाकर्षण नव्हे. 'तूच एकमेव' चा विचार देतो, 'तू पण चालेल' नव्हे. थोडक्यात काय, तर मन स्वप्नाळू आणि अपरीपक्व असते.

पण हा काळ दुर्दैवाने जास्त नसतो. मनाची ही अवस्था आयूष्यभर राहू शकत नाही. ते जेंव्हा स्वप्नातून सत्यात येते, तेंव्हा 'स्वप्नात असताना' घेतलेले निर्णय जर त्याला चुकिचे वाटले तर मग सुरू होते ती मनाची असह्य फरफट. आणि प्रेम-विवाह करून नंतर घटस्फोट घेणार्‍या बहुतांश जोडप्यांमध्ये ही फरफटच कारणीभूत असते!

मग सत्य काय आहे? अशा मनाला काबूमध्ये आणावे तरी कसे? योग्य जोडीदार खरोखर 'एकमेव' असतो का? 'त्या वयात' मनाची समजूत कशी घालावी? असे अनेक विचार मनात येतात. आणि इथेच मन परीपक्व व्हायला चालू होते असे म्हणायला हरकत नाही.

व्यवहारी विचार केला, तर 'तो किंवा तीच एकमेव' ही कल्पना चुकीची आहे. एक नाही मिळाला तरी आपल्याला हवा तसा दुसरा जोडीदार मिळणे हे अवघड असले तरी अशक्य मुळीच नाही. शेवटी 'लग्नांतरचे यशस्वी आणि सुखी आयुष्य' हेच आपल्याला हवे असते ना? मग काय लागते त्यासाठी? तर त्यासाठी तीन 'स' पहावे लागतात. 'सवय, स्वभाव आणि समजूतदारपणा'.

सवयी काय आहेत? आपल्याला जूळणार्‍या आहेत का? (एकाला क्रिकेट आवडते तर दुसर्‍याला 'एकता कपूर' ची सिरियल! बस्स इतके कारण खूप असते. हो ना? :) स्वभाव कसा आहे. आपल्याशी जुळतो का? आणि सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट 'समजूतदारपणा'. ही एकच गोष्ट पहील्या दोन्हींना पुरून ऊरेल. म्हणजे, जरी स्वभाव आणि सवयी जुळत नसतील तरी केवळ 'समजूतदारपणा'च्या जोरावर संसार खूप सुखी होतो.

तेंव्हा, तारुण्याच्या भरात पट्कन आवडून गेलेली एखादी व्यक्ती 'आयुष्याचा जोडीदार' करण्याची गडबड मुळीच करायला नको. ह्या तिन्ही गोष्टी पुरेसा वेळ देउन पहायला हव्यात.. आणि त्याही पुढे जाऊन मी म्हणेन की ह्या तिन्ही गोष्टि जुळणारी एखादी व्यक्ती जरी आपली झाली नाही, तरीही वाईट वाटण्याचे कारण नाही. आपल्यासाठी दुसरे कोणी तरी जरूर वाट पहात असते :)

शुक्रवार, ५ जून, २००९

प्रेम

नेहमीच वाटत माझ्यावरही प्रेम करणार कोणी असाव्
नेहमीच वाटत.....

नेहमीच वाटत कोणीतरी आपलस व्हाव्
सुखदु:ख् वाटुन घेणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत माझ्यावरही प्रेम करणार कोणी असाव्
ह्रदयात सामावून घेणार कोणीतरी आपल असाव्

नेहमीच वाटत बागेत भेट्णार कोणीतरी असाव्
प्रेमाने गुलाबाच फुल देणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत हातात हात घेणार कोणीतरी असाव्
लढ्ण्याची प्रेरणा देणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत माझीही आठवण काढ्णार कोणीतरी असाव्
आठवणीत माझ्या प्रेमपञ पाठ्वणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत सुखात माझ्या सुख मानणार कोणीतरी असाव्
मी रडत असतांना डोळे पुसणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत प्रेमान हाक मारणार कोणीतरी असाव्
माझ्यासाठीही गाण म्हणणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत संकटात धीर देणार कोणीतरी असाव्
अपयशातून यशाकडे नेणार कोणीतरी असाव्

नेहमीच वाटत आपल्यासाठीही कोणीतरी जगाव्
आयुष्यभर साथ देणार कोणीतरी आपल असाव्

नेहमीच वाटत माझ्यावरही प्रेम करणार कोणी असाव्
मलाही आय लव्ह यु म्हणणार कोणीतरी असाव्

एक लघु कथा ...

एक लघु कथा, मला आवडली म्हणुन तुमच्या साठी.....


सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनार्‍यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, ;समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं, यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण या माशाला विचारा, त्याला काय फ़रक पडला? ज्याचा मी नुकताच जीव वाचवला.

मराठी माणूस...

उठलाय मराठी माणूस...
पण जागा नाही झाला अजुन..
उतु लागलाय आयुष्यातून..
पण सावरला नाहीए अजुन..

अजुन त्याची जुनी खोड काही गेलेली नाही..
समजून ना समजयची आवड संपलेली नाही…
असंच चालू राहीले तर लौकरच तो दिवस दिसेल…
मराठी माणूस नकाशात नाहीतर,
इतिहासाच्या पुस्तकातच दिसेल..

.....

म्हणून म्हणतोय मित्रांनो..
हीच आहे खरी वेळ..
जागे व्हा.. उठा आणि

"वाहू दे पुन्हा तेच मराठी रक्त धमन्यांमधून.. "
ज्याने बदलला भूगोल.. या हिंदुस्थानचा..
रचला नवा इतिहास.. मराठीच्या अस्मितेचा..

दाखवून द्या जगाला.. जर आम्ही जाउ म्हटले पुढे.. तर..
नाही कोणीच येऊ शकत आमच्या मध्ये..

आणि जर कोणाला वाटतच असेल.. तर सांगू त्यांना.. छातीठोक
... असेल हिंमत .. तर अडवा...

मराठी प्रतिज्ञा

मराठी ही माझी मातृभाषा आहे.

मराठी भाषेवर माझे नितांत प्रेम आहे.

माझ्या मायमराठीला मी सदैव मान देईन.

इतर सर्व भाषांचा, नेहमी आदर करीन.

त्या भाषा मायमराठीच्या, बहिणी आहेत.

जागतिक व राष्ट्रभाषा याबरोबरच मी मराठीचा देखील नेहमी वापर करीन.

मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.

मराठी भाषेचे आद्य सारस्वत माऊली ज्ञानेश्वरांपासून सर्वच मला वंदनीय आहेत.

महाराष्ट्राचे महत्व मराठी भाषेच्या विकासातच आहे, याची मला जाणीव आहे.

मराठी भाषेची जडणघडण प्रादेशिक बोलींमधील विविधता व त्यातून निर्माण होणारी भारताची एकता आणि अखंडता जपण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन.

मराठी भाषेच्या विकासार्थ जास्तीत जास्त निदोर्ष बोलेन, लिखाण दर्जेदार होण्यासाठी प्रयत्नशील राहीन.

महाराष्ट्र माझा आणि मराठी माझी यांची सदैव आठवण ठेवीन.

मराठीच्या विकासातच माझा विकास आहे. म्हणूनच मी मराठीच्या विकासार्थ झटेन.

मी मराठी बोलतो, लिहितो आणि वाचतो, याचा मला अभिमान व स्वाभिमान आहे.

जय मराठी जय महाराष्ट्र जय हिंद!