मंगळवार, १३ जुलै, २०१०

कवचकुंडले!

विळीवर भाजी चिरताना कधी कधी घाईगडबडीत अचानक बोट कापते आणि त्यातून भळाभळा रक्त वाहायला सुरुवात होते, मग आपण रक्त वाहणारा हात/बोट थेट वाहत्या पाण्याखाली धरतो, रक्तस्त्राव थांबविण्यासाठी बोट तोंडात घालतो किंवा हळद चेपून रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न करतो. मोठा अपघात झाला किंवा गंभीर भाजण्याच्या घटनेतही मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव होतो. अशा वेळी पहिल्यांदा रक्तस्त्राव थांबविणे हे रुग्णाच्या जीवासाठी महत्त्वाचे असते. छोटी जखम असेल तर रक्तस्त्राव काही वेळाने आपोआप थांबतो, पण गंभीर जखम झाल्यास रक्तस्त्राव थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. आपल्या रक्तातील ‘प्लेटलेट्स’ रक्त गोठण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत असतात.त्यामुळे ‘प्लेटलेट्स’ म्हणजे आपल्या प्राणांसाठीचे कवचकुंडल आहेत.
‘प्लेटलेट्स’रुपी या कवचकुंडलांविषयी अधिक माहिती देताना नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात ‘निमा’च्या महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य डॉ. अभय कानेटकर यांनी सांगितले की, कोणत्याही गंभीर अपघातात किंवा भाजण्याच्या दुर्घटनेत तसेच डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस् यांसारख्या गंभीर आजारात प्लेटलेट्सची आवश्यकता भासते. आपल्या शरीरातील रक्तात हिमोग्लोबीन, कॅल्शिअम, पांढऱ्या आणि लाल पेशी, ऑक्सिजन असे अनेक महत्त्वाचे घटक असतात. तसेच आपल्या रक्तात ‘प्लेटलेट्स’ हाही एक महत्त्वाचा घटक असतो. रक्त गोठविण्याचे काम या ‘प्लेटलेट्स’ करीत असतात. एखादी जखम झाल्यास रक्तस्त्राव होतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये रक्तस्त्राव होण्याचा आणि तो थांबण्याचा काळ वेगवेगळा असतो. रक्तातील ‘प्लेटलेट्स’ हा घटक रक्त गोठविण्याचे (गुठळी तयार करण्याचे)काम करतो. जखमेच्या ठिकाणी प्लेटलेट्स एकत्र येतात आणि रक्तस्त्राव बंद होतो.
‘प्लेटलेट्स’साठी गोळ्या किंवा औषधे नाहीत
एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील हिमोग्लोबीन कमी झाले तर त्याला बाहेरून औषधे, गोळ्या किंवा इंजेक्शन देऊन त्याची पातळी वाढवता येते. तसेच कॅल्शियमच्याही गोळ्या किंवा इंजेक्शन देऊन ते वाढवता येते. मात्र रक्तातील ‘प्लेटलेट्स’ कमी झाल्या तर कोणत्याही गोळ्या, औषधे किंवा इंजेक्शन देऊन त्या वाढविता येत नाहीत. संबंधित व्यक्तीला त्या रक्तावाटेच द्याव्या लागतात, असे सांगून डॉ. कानेटकर म्हणाले की, रक्ताच्या तपासणीमध्ये अन्य घटकांप्रमाणेच ‘प्लेटलेट्स’चे प्रमाणही तपासता येते. सर्वसामान्य माणसाच्या शरीरात अडीच लाख इतक्या संख्येत ‘प्लेटलेट्स’ असतात, सुदृढ व्यक्तीसाठी ही संख्या आवश्यक असते. त्यापेक्षा प्रमाण कमी असेल तर ‘प्लेटलेट्स’ द्याव्या लागतात. काही वर्षांपूर्वी रक्तातून ‘प्लेटलेट्स’ वेगळ्या काढण्याचे तंत्र विकसित झालेले नव्हते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला रक्तातील फक्त ‘प्लेटलेट्स’ची गरज असली तरी त्याला संपूर्ण रक्त द्यावे लागायचे. मात्र आता तसे होत नाही. रक्तातील घटक वेगळे करणारी यंत्रणा ‘आयएसओ’ नामांकनप्राप्त रक्तपेढय़ांमध्ये असते. या ठिकाणी प्रयोगशाळेत रक्तातील ‘प्लेटलेट्स’ वेगळ्या काढून त्या वेगळ्या पिशवीत भरतात. त्यामुळे आता रुग्णाला फक्त ‘प्लेटलेट्स’ही देता येऊ शकतात.

एका पिशवीचा तिहेरी उपयोग
आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा रक्त जमा केलेली पिशवी रक्तपेढीत जमा केली जाते. या ठिकाणी रक्ताच्या प्रत्येक पिशवीतील लालपेशी (आरबीसी), हिमोग्लोबीन आणि ‘प्लेटलेट्स’ वेगळ्या केल्या जातात. हे तीन घटक वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरले जातात. त्यामुळे आता एका व्यक्तीने दिलेल्या रक्ताचा उपयोग तीन वेगवेगळ्या रुग्णांना होऊ शकतो. रुग्णाला ‘प्लेटलेट्स’ देण्याचे काम दोन प्रकारे होते. एक प्रकार म्हणजे रक्तपेढीत जमा झालेल्या रक्तातील वेगळ्या केलेल्या ‘प्लेटलेट्स’ ज्याला गरज आहे, त्याला देता येऊ शकतात. तर दुसरा प्रकार म्हणजे ‘प्लेटलेट्स’ दान (रक्तदान करण्याप्रमाणे ‘प्लेटलेट्स’ही दान करता येतात) करणाऱ्या दात्याच्या रक्तातून थेट ‘प्लेटलेट्स’ काढल्या जातात आणि त्या लगेच संबंधित रुग्णाला दिल्या जातात. रुग्ण आणि ‘प्लेटलेट्स’दाता हे एकाच वेळी रुग्णालयात हजर असतात. ही यंत्रणा डायलेसिस्सारखी असते. दात्याच्या रक्तातून काढलेल्या ‘प्लेटलेट्स’ रुग्णाच्या रक्तात मिसळल्या जातात.

‘प्लेटलेट्स’ची गरज
गंभीर अपघात, भाजणे यांसारख्या दुर्घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव होत असतो. अशा वेळी रक्तस्त्राव थांबवणे ही पहिली गरज असते. त्यासाठी प्लेटलेट्सची आवश्यकता भासते. डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस् यांसारख्या आजारात प्रतिजैविके देऊन ताप बरा केला जातो. मात्र ताप उतरला तरी रक्तातील ‘प्लेटलेट्स’ कमी होत असतात. कमी झालेल्या ‘प्लेटलेट्स’ कोणतीही औषधे किंवा इंजेक्शनने भरून निघत नाहीत. त्यासाठी थेट रक्तातील ‘प्लेटलेट्स’चे प्रमाण वाढविण्याची गरज असते. रुग्ण बरा होऊन घरी गेला आणि एखाद्या अपघातात तो जखमी झाला, तर रक्तस्त्राव होऊन त्याच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा रुग्णांना ‘प्लेटलेट्स’ची अत्यंत गरज भासते. रक्तदानाप्रमाणेच ‘प्लेटलेट्स’ दानही करता येऊ शकते. मात्र त्याचा मोठय़ा प्रमाणात प्रचार होण्याची गरज असून ‘प्लेटलेट्स’ दान करणाऱ्या दात्यांच्या संख्येत वाढ होणे आवश्यक आहे. त्यामुळे आता रक्तदान करणाऱ्यांप्रमाणेच ‘प्लेटलेट्स’ दान करण्यासाठी मोठय़ा संख्येने व्यक्तींनी पुढे यायला हवे, अशी अपेक्षाही डॉ. कानेटकर यांनी व्यक्त केली.
- शेखर जोशी