स्वामी तिन्ही जगाचा... आईविना भिकारी, असं म्हटलं जात असलं तरी बापाचं महत्त्वही तितकंच आहे. परंतु चिडणाऱ्या, रागावणाऱ्या बापाची प्रतिमा मुलांच्या मनात आईइतका हळवेपणा निर्माण करीत नाही. पण बाप काय कष्ट करतो, त्याची घुसमट, त्याला कुटुंब चालवताना सहन करावे लागणारे मान-अपमान यांसारखे कितीतरी प्रसंग तो मनात साठवत असतो. अशा बापाला सलाम करणाऱ्या प्रा. लक्ष्मण महाडिक यांच्या कविता आता लोकप्रिय होऊ लागल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे राहणाऱ्या या कवीने लिहिलेल्या बापाच्या कविता नव्या नाहीत, पण त्यांनी या कविता मृत्यूप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात जेव्हा एकत्रितरित्या सादर केल्या, तेव्हा त्याचा परिणामही जास्त खोलवर जाणवू लागला. आपल्या बापाची व्यथा त्यांनी त्यांच्या कवितेतून मांडली असली, तरी दुसऱ्याच्या बापाच्या व्यथाही यापेक्षा वेगळ्या नसतात. त्यामुळे त्या सहज भिडतात व बापाचे महत्त्व कळते. अशा या बापाच्या सर्व कविता एकत्र करून त्यावर पुस्तक काढायचे महाडीक यांनी ठरवले आहे.
मराठी साहित्यात वडिलांवर काही मोजक्या कवींनी कविता लिहिल्या आहेत. परंतु शेतीकाम करणाऱ्या बापाच्या व्यथा मांडणाऱ्या प्रा. लक्ष्मण महाडिक यांच्या कविता वेगळ्याच ठरतात.
मृत्यूनंतर सरकार दफ्तरी नोंद करताना,
तलाठ्याला द्यावी लागते दक्षिणा,
अन् घालाव्या लागतात प्रदक्षिणा सरकारी कचेऱ्यात
कदाचित असे केलेही नाही तर बाप मरूनही जिवंत राहील कायमचाच सरकारी कचेऱ्यांच्या रेकॉर्डवर
मग, आपण मोठ्या श्रद्धेनं घातलेल्या श्राद्धाला,
मुळीच अर्थ उरत नाही आणि बापाला असं
उगाचच ताटकळत ठेवणं तलाठ्यालाही परवडत नाही.
अशा कवितेतून बापाच्या मृत्यूनंतर केलेले भाष्य बोलके असून सरकारी दप्तरी होणारा प्रकार तितकाच क्लेषदायक वाटणारा पण रुटीन आहे. कवितेबरोबच महाडीक एका कवितेतून शेतकरी बापाची व्यथा संागतात.
शेतीवर इमान राखणाऱ्या बापाला,
प्रत्येक हंगामागणिक घ्यावं लागतं कर्ज
बँका, सोसायट्या, अन् सावकाराकडून
अन् त्यासाठी कराव्या लागतात विनंत्या,
अर्ज अर्जवपणे, हात जोडून याचक होऊन
सोबतीला लागते स्थावर मालमत्ता, गहाणवट अथवा तारण देण्यासाठी टेबलाखालूनची चिरीमिरी वेगळीच
कर्ज हातात पडण्याआधीच कापल्या जातात, ना परतीच्या ठेवी, इमारत निधी, शेअर्स, डिपॉजिट.
खरंतर बापाच्या या कवितेतून शेतकऱ्यांच्या व्यथाही मांडल्या असल्याने या कविता मनाला अधिक भिडतात. शेतकऱ्यांचे दु:ख मांडताना लक्ष्मण महाडिक यांनी आपल्या कवितेला माध्यम केले असले, तरी ते वास्तव जगासमोर आणण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. प्रा. महाडीक यांचा कुणब्याच्या कविता हा कवितासंग्रही तितकाच प्रसिद्ध आहे. या काव्यसंग्रहाने आतापर्यंत तब्बल पाचहून अधिक राज्यस्तरीय पारितोषिक पटकावले. राज्य शासनाचा उत्कृष्ट वाड्.मय निमिर्तीबद्दल असणारा बहिणाबाई पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील पुरस्कार, कविवर्य वसंत सावंत पुरस्कार, रा.र.बोरडे पुरस्कृत साहित्य शिवार पुरस्कार, कविवर्य कुसुमाग्रज अमरावती यांचा पुरस्कार असे कितीतरी पुरस्कार महाडिक यांच्या काव्यसंग्रहाला मिळाले आहेत.
एकूणच कवीने कवितेतून शेतकरी, बापाच्या व्यथा मांडण्याचा ध्यासच घेतला आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर...
कित्येक कोरडवाहू हंगामात
मातीचे आसु पिताना स्वत:ला मातीत गाडत आलो
आणि हिरव्या पातीचा रांगडा पोळ, तरी कधी उनाळ कांदा झालो
पुढे पुढे तर कुणब्याचा वसा चालवताना
मातीबरोबरच अक्षरांचा दास झालो
आणि तळहातावरच्या जखमा कागदावर
पुसता पुसता मीच कवितेचा बाप झालो.
-