आत्ता कोणत्या विषयाचा अभ्यास करावा? कोणता चित्रपट पाहावा.. हा की तो? इथपासून ते करिअर कोणतं निवडावं? कशा प्रकारची नोकरी
आपल्याला जमेल? कोणत्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न करावं…. असे एक ना अनेक प्रश्न. आयुष्य म्हणजे प्रश्नांचा गुंता.
ज्यांचं उत्तर आपल्याला द्यावंच लागतं. हे उत्तर बरोबर असेल की चूक? चूक असेल तर त्याची शिक्षा केवढी असेल? आपला निर्णय चुकीचा
ठरला तर? एकेका निर्णयावर आपलं आयुष्य अवलंबून असतं. त्यामुळं आणखीच गोंधळायला होतं आणि असं वाटतं, नकोच हे निर्णय
घेण्याचं प्रकरण….. मग आपण निर्णय घेणं लांबणीवर टाकू लागतो, पण त्यामुळं प्रश्न सुटतो का? उलट परिस्थिती आणखी बिकट होते.
म्हणून योग्य वेळी योग्य तो निर्णय घेता येणं फार महत्त्वाचं आहे. आता तो कसा घ्यायचा? आणि आपण घेतलेला निर्णय बरोबरच
असेल कशावरून? असे तुम्हाला प्रश्न पडलेत.. होय ना?
खरं सांगू का? ज्या परिस्थितीत जो निर्णय आपल्याला योग्य वाटतो, तोच योग्य निर्णय असतो' असं तुम्ही खुशाल मानून चला.
असं पाहा,समजा तुम्ही सध्या एखाद्या बीपीओ कंपनीत नोकरी करता आहात.आता बीपीओमध्ये काम करायचं म्हणजे अक्षरश: रात्रीचा दिवस
करावा लागतो. त्यामुळं त्याचा मोबदलाही तुम्हाला चांगला मिळतो, पण कालांतरानं जागतिक मंदी आली.परदेशांशी संबंधित असलेल्या
कंपन्या अडचणीत आल्या. तुम्ही काय करणार त्याला? सत्यम कॉम्प्युटर्समध्ये आर्थिक घोटाळा झाला. अनेकांना कंपनीतून
बाहेर पडावं लागलं, पण म्हणजे तिथं नोकरी करण्याचा तुमचा निर्णय चुकला असं समजायचं का? मुळीच नाही.आपण काही ज्योतिषी नाही.
त्यामुळं पुढे काय परिस्थिती उद्भवेल हे आपल्याला आज कसं कळणार? तेव्हा निर्णय घेताना ‘नंतर मग असं झालं तर?
या जंजाळात फार अडकू नका. प्राप्त परिस्थितीत जो निर्णय योग्य वाटेल तो एकदा घ्या आणि मोकळे व्हा.
त्याचे परिणामही खुल्या दिलानं स्वीकारा. आपण घेतलेला निर्णय योग्य ठरण्यासाठी प्रथम आपल्या आवडीनिवडी लक्षात घ्या.
आपल्याला कसं जगायला आवडतं, आपण कोणत्या बाबतीत तडजोड करू शकतो आणि कोणती गोष्ट आपल्याला मुळीच चालणार नाही
यावर नीट विचार करा. उदाहरणार्थ, तुम्हाला परदेशात नोकरी करण्याची संधी मिळाली आहे.तुम्ही तिथं रमू शकाल का? वर्षवर्ष तुम्हाला
इथली मंडळी, कुटुंबीय, मित्रमैत्रिणी नाही भेटले तरी चालणार आहे का? तिकडं गेलात तरी तुम्हाला इथलं वातावरण, इथली माती
यांचीच ओढ राहणार असेल तर तुमची तिथं कुचंबणा होईल.
लग्न करताना तर पूर्ण विचार करूनच निर्णय घ्या. सरळ दोन कॉलम करा. एकामध्ये लिहा चालेल; दुसऱ्यात लिहा मुळीच चालणार नाही.
त्या खाली तुमची यादी लिहून काढा. तुम्हाला कदाचित गरीब नवरा चालेल, पण त्यानं पैसे खाल्लेले अजिबात चालणार नाहीत
किंवा उलटसुद्धा चालत असेल. जे काय असेल ते प्रामाणिकपणे पाहा आणि मग निर्णय घ्या. तोच तुम्हाला सुखाचा होईल.
निर्णय घेण्यासाठी खूप वेळ जसा लावू नये तसाच आततायीपणे घेतलेला निर्णयही घातक ठरू शकतो. कधीकधी असं होतं की,
समोर आलेल्या परिस्थितीनं आपण इतके गांगरून जातो की, तिरीमिरीनं काही तरी करून टाकतो. उदाहरणार्थ, घरात भांडण झालं,
आईवडील टाकून बोलले; त्यातला एखादाच शब्द मनाला लागतो आणि त्यावरून आपण यांना नकोच आहोत, कशाला मग
यांच्याजवळ राहायचं, असा काही तरी विचार करून घर सोडून जायचा निर्णय घेतला जातो. भावनेच्या भरात काही तरी घडून जाणं
म्हणजे निर्णय नव्हे. हा तर अविचार झाला. आपला राग व्यक्त करण्यासाठी झालेली प्रतिक्रिया आहे ही!
असं कधीही करू नका. कधी बॉस रागावला की, रागारागानं आपण राजीनामा खरडून टाकतो, त्याऐवजी नीट विचार करा.
निर्णय घेताना शांतपणेच घ्या. सारासार विचार करून आपल्या हिताचा निर्णय घ्या.
इलियाहू गोल्डरॅट यानं ट्री या नावाची थिअरी मांडली आहे.
आपल्याला निर्णय घेणं अवघड का वाटतं? तर त्या निर्णयाचे अनेक उलटसुलट परिणाम आपल्याला दिसत असतात.
अशा वेळी झाडाची आकृती कागदावर काढावी. झाडाचं मूळ म्हणजे आपला प्रश्न असेल. त्याच्या अनेक फांद्या असतील.
आपल्या समस्येला अनेक पर्याय असतील. ते सगळे फायदेतोटे झाडांच्या फांद्या समजून तसे लिहून काढावेत. अशा प्रकारे
पहिल्यांदा आपल्या मनातला सगळा कोलाहल कागदावर उतरवून घ्यावा, म्हणजे मग निर्णय घेण्यासाठी आपलं डोकं मोकळं राहतं.
आता त्यातला प्रत्येक पर्याय समोर घ्या आणि तो कितपत बरोबर ठरेल यावर विचार करा. एकेक पर्याय तपासत अनावश्यक, अशक्य
असा पर्याय म्हणजेच फांदी छाटत जायचे. असे करत जो पर्याय जास्तीत जास्त फायदेशीर असेल, अटळ असेल,अमलात आणण्यासारखा
असेल तो शिल्लक राहील आणि तोच निर्णय योग्य ठरेल.
कितीही विचार करून निर्णय घेतला तरी प्रत्येक वेळी तो योग्य ठरतोच असं नाही. मग तुम्ही आयुष्यभर त्यासाठी हळहळत बसणार का?
त्यापेक्षा असा विचार करायचा, त्या वेळच्या परिस्थितीत माझ्या वकुबानुसार मला जो योग्य वाटला तो निर्णय मी घेतला.
आता तो जर बदलणे शक्य असेल, तर मी त्यात सुधारणा करीन, पण जर बदलणे शक्य नसेल तर त्यासाठी मी दु:ख करीत बसणार नाही
यातून मी धडा शिकेन आणि दुसऱ्या कुठल्या बाबतीत निर्णय घेताना मी त्याचा विचार करीन.
तेव्हा निर्णय घेणं ही गोष्ट म्हटलं तर सोपी आहे आणि म्हटलं तर अवघड ! सारासार विचार करून निर्णय घेतलात तर आयुष्य वाटतं तितकं अवघड होणार नाही.