शुक्रवार, १० जुलै, २००९

वी लव्ह हिम.

आजही तरूणांचं आदरस्थान म्हणून पहिलं नाव शिवाजी महाराजांचं घेतलं जातं . इतिहासात अभ्यासासाठी असूनही शिवाजीराजे कोणाला नकोसे झाले नाहीत . मोबाइलच्या स्क्रीन सेव्हरपासून ऑरकुटच्या साइटवरही ते आरूढ झाले . पण ... शिवाजीराजांची एवढी क्रेझ असूनही त्यांची माहिती फारच थोड्यांना आहे . शिवाजी महाराजांनी अफझलखानाची बोटं कापली असा शोध कोणी लावतं , कोणासाठी ते ' लीडर ' आहेत , तर कोणासाठी ' ग्रेट राजा '!
.........................

' शिवरायांचा आठवावा प्रताप ,' असं आपण म्हणत असलो तरी आपल्याला तो आठवावा लागत नाही . त्यांनी घडवलेला इतिहास केवळ पुस्तकापुरता नाही , तर तो आजही सगळ्यांना स्फूर्ती देणाराच ठरतो . त्यांनी केलेला प्रताप , त्यांनी घडवलेला इतिहास सगळ्यांनाच माहित आहे , असं आपण गृहित धरतो .

ज्या काळात हिंदूंना कोणी त्राता नव्हता , त्या काळात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं साम्राज्य उभं राहिलं . स्वराज्याचं सुराज्य करणाऱ्या या राजाच्या दूरदृष्टीमुळे शत्रूलाही सळो की पळो करुन सोडलं होतं . या कर्तव्यदक्ष राजाचा प्रताप आणि त्याची न्यायप्रियता यावर त्या काळात हिंदूच नाही , तर अन्य धमिर्यांनाही विश्वास होता . मराठी माणसाला अभिमान वाटावा असाच हा कालखंड . आपल्या प्रजेची काळजी वाहणाऱ्या या राजाला आपल्या सर्वांचा मानाचा मुजरा .

खरं सांगायचं तर शिवरायांना आठवायला आपल्याकडे निमित्त लागत नाही . त्यांचा अभिमान बाळगायला केवळ मराठी असण्याची गरज नाही . भाषणात त्यांची उदाहरणं देण्यासाठी अमुक एका पक्षाची उमेदवारी करावी लागत नाही . इतिहासात अभ्यासायला आले किंवा भाषेच्या पुस्तकात त्यांच्यावर एखादा धडा होता , म्हणून मुलांना ते कधीच नकोसे झाले नाहीत . आजच्या आयटी युगातही ते ' सॉल्लिड पॉप्युलर ' आहेत . तरुणांनी ऑरकुटवर त्यांची कम्युनिटी आणि एक साइटही आणलीय . मोबाइलचा स्क्रीन सेव्हरवर म्हणूनही ते सेट झाले आहेत . एकंदरीत छत्रपती शिवराय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके आहेत . आवडता राजा म्हणून आजही त्यांचाच पहिला नंबर लागतो . पण जेव्हा वेळ येते त्यांच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं देण्याची तेव्हा ... तेव्हा मात्र कपाळाला हात लावायची पाळी येते . हे हवेतले तीर नाहीत . कॉलेजमधल्या काही मुलांशी गप्पा मारल्या . म्हटलं , जाणून घेऊयात शिवाजी महाराजांचा आदर करणाऱ्या या ' मराठ्यां ' ना शिवाजी महाराजांबद्दल कितपत माहिती आहे ते ! म्हणून शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारल्या तेव्हा आलेला अनुभव अतिशय धक्कादायक होता . आपल्या माहितीसाठी एक नमुना पेश है -

प्रश्न : शिवाजी महाराज कोण होते ?

उत्तर : लीडर

प्रश्न : शिवरायांचा राज्याभिषेक कोणी केला ?

उत्तर : शहाजीराजांनी (' हो ना ?'आपल्यालाच उलट प्रश्न विचारण्यात येतो .)

प्रश्न : शिवाजी महाराजांनी कोणाची बोटं कापली ?

उत्तर : अफझलखानाची (' ए चुकलं तर चालेल ना ?')

प्रश्न : शिवाजीराजांना तलवार कोणी दिली ?

उत्तर :( अरे , आम्हाला हा प्रश्न होता !) औरंगजेबाने

प्रश्न : शिवरायांनी कोणता युद्धप्रकार आणला ?

उत्तर : गुरिला वॉर ( मराठीत काय म्हणतात ते आठवत नाही )

इतिहास कच्चा होता किंवा इतिहासातील काही आठवत नाही , असं म्हणत आपल्या अज्ञानाचं समर्थन करायला मात्र कोणी विसरत नाही . शिवाजी महाराजांचे गुरू कोण , शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातल्या व्यक्तींची नावं काय , गड आला पण सिंह गेला असे उद्गार त्यांनी कोणाला उद्देशून काढले , असे प्रश्न म्हणजे मुलांना परत एकदा परीक्षा द्यायला लावण्यासारखंच होतं . या प्रश्नांना बरोबर उत्तरं देणारी फारच कमी मुलं होती . चुकीची उत्तरं ऐकून आपण चक्रावून गेलो नाही , तरच नवल !

या प्रश्नांना मिळणा-या चमत्कारिक उत्तरांनंतर खरं तर अनेकजण निराश होतील . अशा वेळेला आजच्या मुलांना इतिहासाचं महत्त्व ते काय कळणार , जन्मत : च स्वातंत्र्य मिळालेल्या या मुलांना स्वातंत्र्याची किंमत काय कळणार अशा प्रतिक्रिया साहजिकच व्यक्त होतात . यापेक्षा आणखी भयंकर उत्तरं न मिळता काहीतरी बरं ऐकू येईल या आशेवर आपण आणखी प्रश्न विचारत राहतो . महाराजांमधला कोणता गुण तुम्हाला आवडतो किंवा महाराजांना तुमच्या लेखी एवढं महत्व का हा प्रश्न मुलांना विचारताच जवळजवळ सर्वच मुलांनी महाराजांच्या न्यायप्रियतेचा आणि परस्त्रीला सन्मान देण्याच्या गुणांचं कौतुक केलं . त्यांच्यातील याच गुणामुळे आपण महाराजांचे फॅन , ओह सॉरी महाराजांचा आदर करतो असं सांगितलं . शिवाजी महाराज , मराठी भाषा , मायबोलीचा डंका पिटणाऱ्यांच्या राज्यात ' वाघिणीचं दूध ' पिण्याची भलतीच ओढ दिसून येते . त्यामुळे बोलताना भाषेची गल्लत होतच होती . परस्त्रीला ' इज्जत द्यायचे ,' शिवाजी महाराज म्हणजे ' अरे , सॉलिड राजा . मानतो आपण त्यांना ! ग्रेट माणूस यार ,' अशी तरुणांच्या बोलीभाषेची गरुडझेप दिसत होती . पण त्यात शिवरायांचा अपमान करण्याची भावना नव्हती . उलट , ज्यांना उत्तरं देता आली नाहीत , महाराजांबद्दल आपल्याला माहिती नाही म्हणून वाटणारी खंत त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत असते . कुठलीही परीक्षा नाही , जाहीर सभा नाही , सहज चालणा-या गप्पातही आपल्या तोंडून शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारला जाऊ नये म्हणून मुलांना काळजी वाटत असते . तरीही संभाषण संपवताना सगळे सांगायला विसरत नाहीत , ए , कूल , वी लव हिम !

तुझी साथ.

जीवनाच्या या खडतर वाटेवर लाभली तुझी साथ
स्वखुशीने पुढे केलास तू प्रेमाचा हात
तुझे ते सुमधुर बोलणे पटकन मनात
ठसते
बाह्यांगावरूनच तुझ्या सोज्वळतेची खात्री पटते.
तुझा तो लाघवी स्वभाव मनात उमेद निर्माण करतो
प्रत्येक नवीन गोष्ट करण्याची मला प्रेरणा देतो.
तुझ्याशिवाय माझे हे जगणं व्यर्थ आहे
तुझ्यामुळेच माझ्या जगण्याला अर्थ आहे.
तुझे अस्तित्व मला सर्व ठिकाणी जाणवते
तू माझ्या जवळच आहेस याची जाणीव करून देते.
तुझे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व मनाला भुलवते
त्यामुळेच तुझ्या आठवणीत मी दिवसरात्र झुरते.
तुझ्या या प्रेमळ वागण्याने माझी झोपच उडाली आहे
सांग बरं, माझ्यावर तू कोणती जादू केली आहेस?
नकळत तुझे आणि माझे सूर जुळले
माझे अवघे जीवनच बदलून गेले.

जगण्याचा मार्ग.

स्वत:चं भविष्य, करिअर सगळेच बघतात. मी पण बघतोय आणि पण हे सगळं असताना सामाजिक देणं म्हणून मी नेहमी काही ना काही सामाजिक कार्य करत असतो.

मला काय मिळणार... काय फायदा होणार, याशिवाय कुठलंच काम होत नाही का किती फायदा बघणार! आतापर्यंत आपण प्रत्येक जण फायदाच बघत आलोय. फायदा बघतोय आणि पुढे ही बघतच राहणार.

जन्माला आल्यानंतर नकळत्या वयापासून आपण स्वत:चा फायदाच बघतोय. मी आणि माझं हेच... पाहत आलोय.

मग आपण आपल्या आयुष्यातला काही वेळ स्वत:चा फायदा न बघता कुठलं काम करू शकत नाही का?

एवढं आपण मीपणात गुरफटून गेलोच की. आपल्या फायद्याशिवाय काहीच विचार किंवा काम करता येत नाही.

इतिहास डोकावून पाहिला तर समजेल.

बाबू गेनू यांनी परदेशी मालाने भरलेल्या गाडीखाली झोकून दिले. त्याने बघितला होता का स्वत:चा फायदा?

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव स्वातंत्र्यासाठी हसतहसत फासावर गेले त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

महात्मा गांधी यांनी आपलं आयुष्य स्वातंत्र्यासाठी घालवलं त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

विनोबा भावे गोरगरीबांसाठी गावोगावी फिरले, त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले स्वत: शिकून हालअपेष्टा झेलत स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून त्यांच्यासाठी शाळा काढल्या. त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी समर्पण केले. त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

बाबा आणि साधनाताई आमटे यांनी सुखी जीवन सोडून जंगलात वाईट दिवस काढून ज्या कुष्ठरोगींची सेवा करून त्यांच्याकडून एक वेगळं विश्व निर्माण केलं. त्यांनी साधनाताईंनी बघितला होता का आपला फायदा? त्याची मुलं, सुना, नातवंडे पण हेच कार्य करताहेत त्यांनी बघितला होता का आपला फायदा?

या लोकांनी जर आपला फायदा स्वार्थ बघितला असता तर काय झालं असतं या देशाचं, हे आपण कल्पना करूनच पाहवं. आपल्याला जरी या लोकांत सारखं महान कार्य करता येत नसलं तरी मला वाटतं आपण प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी आपला फायदा विसरून, स्वार्थ सोडून, मीपणा काढून काहीतरी कार्य करायला हवं आणि याच निस्वार्थ मनाने केलेल्या कार्यानेच आपला एक परिपूर्ण माणूस बनायला मदत होते.

मीपण तेच करतोय अर्थात मी पण स्वत:चा विचार करतोय मला आर्ट डायरेक्टर बनायचंय आहे. त्यासाठी शिकायचं आहे. घरची जबाबदारी संभाळायची आहे. गाडी, बंगला, बँक बॅलन्स मलाही करायचं आहे. आणि त्यासाठी जी मेहनत करायची आहे ती करतोय. आणि मला पूर्ण विश्वास आहे की, मी ठरवलं आहे ते मी करेनच, त्यासाठी मी सतत प्रयत्नशील असतो. मग हे करत असताना जर मी काही वेळ स्वत:चा फायदा न बघता, कोणाची तरी मदत करत असेल, एखाद्या गरजू व्यक्तीसाठी मी उपयोगी पडत असेन. एखादं सामाजिक कार्य करत असेल तर यात माझं काही चुकतंय का?

मला वाटतं अजिबात नाही चुकत माझं.

प्रत्येकाने असाच विचार करायला हवा, खरं आयुष्य जगणं म्हणजे हेच आहे. पण मी मात्र थांबणार नाही. स्वत:साठी करतोयच पण नि:स्वाथीर् मनाने जिथे गरज असेल तिथे दुसऱ्यांना मदत करतच राहिल. बाकी कोणीही काही बोलो. मला माझा जगण्याचा मार्ग सापडला आहे आणि मी असाच जगत राहणार.

- Namdev Bamane.

गुरुवार, ९ जुलै, २००९

बेळगावचा धडा.

मराठी उमेदवार निवडून येतील, असे बेळगाव, कारवार भागात जेमतेम सहा मतदारसंघ. तिथे समितीतर्फे एकेकच मराठी उमेदवार उभे असते, तर सहाच्या सहा निवडून येऊ शकले असते. पण तसे झाले नाही. सर्वत्र मराठी आडनावाचे किमान दोन उमेदवार रिंगणात एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून उभे राहिले आणि सारेच कोसळले. हे असे होणार, हे त्यांना ठाऊक नव्हते, असे कसे मानायचे? कारण या मंडळींची उभी हयात या एक, दोन जिल्ह्यांचे राजकारण करण्यातच गेली. त्यांना गल्लीन् गल्ली आणि घरन् घर ठाऊक असे बोलले जात होते. पण ज्यांना घरे ठाऊक होती, त्यांना त्यांत राहणा-या माणसांची मने मात्र माहीत नव्हती, हेच निकालांवरून दिसते.

.................

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे कवित्व अद्याप चालू आहे आणि ते आणखी काही काळ चालू राहील, याचे महत्त्वाचे कारण हे की, पुढील लोकसभा निवडणुकांपूर्वीचा दक्षिण भारतातील हा बहुधा शेवटचाच सार्वजनिक कौल. म्हणूनच कर्नाटकची जनता कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकते, याकडे ब-याच जणांचे बारीक लक्ष होते. त्यातले अनेकांचे अंदाज चुकले, हे ओघाने आलेच. ज्यांचे अंदाज चुकले, ते आधी छातीठोकपणे आपण बोलतो, लिहितो ती कशी काळ्या दगडावरची रेघ आहे, हे सांगत होते. आता तीच मंडळी चुकलेल्या अंदाजांचे तर्कशास्त्र वाचक आणि टीव्ही प्रेक्षकांच्या गळी उतरवत आहेत. हे असेच दर वेळी चालते. या निवडणुकीतील महाराष्ट्राच्या दृष्टीने बातमी ही की, कर्नाटक विधानसभेतील बेळगाव, कारवार या सीमाभागातील जनतेचा गेली पाच दशके चाललेला लढा या निवडणुकीने संपुष्टात आणला. यंदा महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही उमेदवार निवडणूक जिंकू शकला नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. आता विधानसभा सीमाभागाविषयी जो काही निर्णय घेईल व विविध सामाजिक, सांस्कृतिक धोरणे संमत करेल, त्याचा प्रतिवाद विधिमंडळाच्या आत करण्याच्या वाटा बंद झाल्या आहेत. निदान ही विधानसभा हयात असेपर्यंत सीमावासीयांना आपल्या मागण्यांसाठी विधानसौधाच्या बाहेर फूटपाथवरच तिष्ठावे लागणार. गेली पाच दशके केवळ एकाच मागणीसाठी लढत राहणा-या बेळगाव, कारवारातील मराठी माणसांचा पुन्हा एकदा स्वप्नभंग झाला आहे.

भाषानिहाय प्रांतरचना करण्याचा फाझलका कमिशनचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला व १९५६ साली मुंबई प्रांतातून कानडी भाषिक वगळले व म्हैसूर राज्याला जोडले, तेव्हापासून हा लढा चालू आहे. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचे साडेतीन-चार वर्षे पेटलेले आंदोलन मुख्यत्वे मुंबईचा समावेश महाराष्ट्राची राजधानी म्हणून व्हावा, यासाठी होते. त्यामुळेच गुजरात व महाराष्ट्र राज्यांच्या स्थापना होताना १९६० साली मुंबईचा समावेश महाराष्ट्राची राजधानी म्हणून झाला, यातच मराठी जनांचे हात स्वर्गाला टेकले. गुजरात-महाराष्ट्र सीमेवरचा डांग जिल्हा अगोदर वादग्रस्त होता, पण तो वाद तिथेच विरला. आणखी काही सीमाप्रांतही चूप बसले, पण बेळगाव, कारवारची मंडळी जोर लावत राहिली. त्यांची सांस्कृतिक आणि मुख्य म्हणजे आथिर्क नाती महाराष्ट्राशी अधिक जवळची होती, हे एक कारण होतेच. त्यामुळे सीमाभागातील काही लढवय्ये लढत राहिले आणि हरतही राहिले. महाजन आयोग महाराष्ट्राच्या आग्रहाखातर अस्तित्त्वात आला. त्याचा निकाल विरुद्ध गेला. कर्नाटकच्या दृष्टीने हा प्रश्न तिथेच सुटला, पण लोकेच्छा तशी नाही, हे त्यानंतरच्या विविध स्तरांवरील निवडणुकांनी वारंवार दाखवून दिले. कायदेशीर प्रक्रिया आणि निवडणुकीतून जाहीर होणारी लोकेच्छा या स्वतंत्र बाबी आहेत, हे खरे. पण संसदीय लोकशाही मानणा-या राज्यव्यवस्थेत या निवडणुकीतून प्रकट झालेल्या लोकेच्छेचाही विचार व्हायला हवा. ही लोकेच्छा अधिक स्पष्टपणे आजमवायची, तर सार्वमत हा मार्ग होता. तो घ्यायची गरज कर्नाटकला वाटत नव्हती, कारण सीमाभाग तांत्रिकदृष्ट्या कर्नाटकाचाच भाग होता. महाराष्ट्राला असे सार्वमत घेण्यात धोका वाटत होता, कारण गोव्यात सार्वमत घेण्याचा प्रयोग महाराष्ट्राच्या अंगलट आला होता. अशा वेळी वारंवार आंदोलने पेटवणे, मोर्चे, धरणे, उपोषणे, शिष्टमंडळे आदी शिष्टसंमत उपायच अंमलात येत होते.

या विषयात कर्नाटकात अर्थातच स्वारस्य नाही. महाराष्ट्रात कोल्हापूर, सोलापूर आदी सीमाभागातील प्रदेश वगळता कोणाला त्यात सोयरसुतक नाही. आधी एस. एम. जोशी, ना. ग. गोरे यांनी आणि नंतर एन. डी. पाटील, शरद पवार यांनी हा प्रश्न हाती घेतला खरा, पण तो केवळ राजकारण म्हणून. मुंबई, दिल्लीत बसून सीमावासीयांच्या बैठका घ्यायच्या, त्यांना आश्वासनांची गाजरे दाखवायची, झिंदाबादच्या घोषणा ऐकून कान तृप्त करून घ्यायचे आणि आपाल्या उद्योगांना लागायचे, यापलीकडे केव्हाही काहीही झाले नाही. शिवसेनेनेही हा विषय हाती घेऊन कोणालाही जमले नाही, असे उग्र आंदोलन उभारले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हाताबाहेर चाललेली परिस्थिती ओळखून विशाल गोमंतकचा पर्याय मांडला. तोही तिथेच थिजला.

अशा वेळी सीमाभागातील मंडळींना आपला लढा केवळ स्वत:च्याच जोरावर लढावा लागणार, हेही स्पष्ट झाले. महाराष्ट्र एकीकरण समिती या संयुक्त व्यासपीठावर सर्व मराठी जनांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातच विलीन होण्याची मागणी सातत्याने लावून धरली असती, तर कदाचित चित्र बदलले असते. पण जसजशी वर्षे मागे जाऊ लागली, तसतसे या भागातील नवतरुण या मागणीपासूनही दूर जाऊ लागले, हे वास्तव आहे. पिकलेल्या केसांच्या आणि टक्कल पडलेल्या निवृत्त व निरुद्योगींचा टाइमपास असे सीमालढ्याचे स्वरुप उरले, हे वास्तवही नाकारता येत नाही. पण ही मंडळी आपल्या भूमिकेविषयी कमालीची हळवी आहेत. त्यामुळे मुंबई, पुण्याच्या पेपरांत या आंदोलनाविरुद्ध ब्र जरी छापून आला, तरी रान उठते. त्यांची भावना ठीक आहे. तिचा आदर राखतानाच वास्तवाचे भान सोडून कसे चालेल?

' सार्मथ्य आहे संघटनेचे, जो जो करील तयाचे, मात्र तेथे भगवंताचे वास्तव्य पाहीजे', असे समर्थ रामदासांनी सांगितले. सीमावासीयांनी संघटना तर बांधली. पण ती समर्थ कशी होणार? कारण संघटनेचे मुख्य सूत्र एकी हे असेल, तर तिचाच अभाव या एकीकरण समितीत आहे. गेल्या काही वर्षांत कर्नाटक सरकारने बेळगाव शहराला 'उपराजधानी'चा दर्जा दिल्याने शहराचे रुप पालटू लागले. महाराष्ट्रात जाऊन एका जिल्ह्याचे गाव बनण्याऐवजी 'उपराजधानी' म्हणून दिमाखात राहावे, असे काही मराठी तरुणांनाच वाटू लागले, हे खरे आहे. त्यांना सत्य परिस्थिती सांगून आपल्याकडे वळवायचे, तर समितीत ऐक्य हवे आणि हे ऐक्य निवडणुकीत दिसायला हवे. मराठेशाहीच्या उत्तरार्धात मराठे सरदार आपसात लढले आणि सर्वजण पराभूत झाले. बेळगावातील मराठी नेत्यांनी हा उत्तर पेशवाईचाच आदर्श स्वत:समोर ठेवला.

मराठी उमेदवार निवडून येतील, असे बेळगाव, कारवार भागात जेमतेम सहा मतदारसंघ. तिथे समितीतर्फे एकेकच मराठी उमेदवार उभे असते, तर सहाच्या सहा निवडून येऊ शकले असते. पण तसे झाले नाही. सर्वत्र मराठी आडनावाचे किमान दोन उमेदवार रिंगणात एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून उभे राहीले आणि सारेच कोसळले. हे असे होणार, हे त्यांना ठाऊक नव्हते, असे कसे मानायचे? कारण या मंडळींची उभी हयात या एक, दोन जिल्ह्यांचे राजकारण करण्यातच गेली. त्यांना गल्लीन् गल्ली आणि घरन् घर ठाऊक असे बोलले जात होते. पण ज्यांना घरे ठाऊक होती, त्यांना त्यांत राहणाऱ्या माणसांची मने मात्र माहीत नव्हती, हेच निकालांवरून दिसते.

समितीतले नेते छोट्या स्वार्थासाठी आपसात लढले आणि परिणाम म्हणून एकीकरण समितीचाच नव्हे, तर मराठी भाषिकांचा गुणफलक कोराच राहीला. हा पराभव केवळ महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणून मिरवणाऱ्या डझनभर लोकांच्या टोळीचा नव्हे, तर समस्त मराठी समाजाचा झाला. या पराभवाच्या पापाचे धनी कर्नाटकातील कानडी नेते नसून मराठी भाषिकच आहेत, हे ध्यानात घ्यायला हवे. कर्नाटकातील सर्व मोठ्या पक्षांना सीमाभाग आपल्याच राज्यात हवा आहे. म्हणून त्यांच्या पाठिंब्याचा प्रश्नच नाही. पण या प्रश्नावर महाराष्ट्रात रान उठवणारे किती मराठी नेते एकीकरण समितीच्या प्रचाराला गेले? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह निम्मे मंत्रिमंडळ कर्नाटकात 'प्रचार' करत होते. त्यांनी आपल्या पक्षांच्या उमेदवारांचा जरूर प्रचार केला असेल. पण तिथल्या तुमच्या भाषा बांधवांचे काय? त्यांची तुम्हाला काळजी नाही, हे आता स्पष्ट झाले. मग महाराष्ट्रात एकीकरणाच्या परिषदा आणि राणाभीमदेवी आगखावू भाषणे कशाला? आणि कोर्टकज्जे तरी कोणाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी? याचा एकदाच अंतिम निर्णय घ्यायला हवा. कारण सीमाभागातील मराठी बांधवांच्या मनाशी असा वर्षानुवर्षे खेळ खेळणे अमानुषपणाचे आहे.

बेळगावची महापालिका जिंकून तिथल्या मराठी समाजाने आपला ध्वज तिथं मानाने फडकावला होता, पण महापालिकेत जे जिंकले, ते मोठ्या प्रमाणावरील विधानसभेत पूर्णपणे गमावले. आता मराठीचा मुद्दा कोण लावून धरणार? महाराष्ट्र सरकारने सीमाभागाचा प्रश्न ब-याच उशीराने का होईना, सुप्रिम कोर्टात नेला आहे, त्याचा निकाल लागेल, तेव्हा लागो, तोपर्यंत विधानसभा निकाल हेच सार्वमत मानून कर्नाटक सरकार बेळगावचे कानडीकरण करणार. त्यास विरोध कोण व कसा करणार?

बेळगावचा धडा असा आहे. गेल्यावर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान मुंबई कोणाची? हा सवाल उपस्थित झाला आणि समस्त मराठी जनांनी त्याचा जवाब ती मराठी माणसाचीच, असा दिला. त्याचा परिणाम दिसलाच. ठाण्याच्या निवडणुकीतही असेच ऐक्याचे दर्शन घडले. बेळगावने अशीच एकजूट दाखवली असती, तर इतिहास बदलला असतो. पण आता ती वेळ पाच वर्षांसाठी तरी टळलेली आहे. आता केवळ चचेर्चे कवित्वच आपल्या हाती आहे.

bharat.raut@timesgroup.com

( लेखक टाइम्स ऑफ इंडिया समुहाचे संपादकीय सल्लागार असून शिवसेनेचे राज्यसभा सदस्य आहेत.)