-
सोमवार, १५ नोव्हेंबर, २०१०
केल्याने होत आहे रे...
आंतरराष्ट्रीय समुदाय, प्रश्न, डावपेच, परस्पर सहकार्य- यासंदर्भात भारताची भूमिका, परराष्ट्र धोरण हे सगळं भारतीय तरूण विशेषतः मराठी तरुणांच्या कक्षेबाहेरचे विषय. या सगळ्याची स्वअनुभवातून ओघवत्या भाषेत मांडणी केली आहे आंतरराष्ट्रीय विषयांचे तज्ञ संदीप वासलेकर यांनी. डोंबिवली सारख्या शहरातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणारे वासलेकर आणि त्यांची स्ट्रॅटेजिक फोरसाईट ही संस्था आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर विविध देशांना त्यांचं धोरण ठरवण्यात मार्गदर्शन करतात. जगामध्ये संघर्ष टाळावा आणि शांततेने प्रश्न सुटावेत यासाठी ते आणि त्यांची संस्था सातत्याने प्रयत्नशील असतो.वासलेकरांचे देशोदेशीचे अनुभव आणि पुस्तकातील त्यांचे वैचारिक लिखाण मराठी तरुणांना क्षितिजापलीकडला विचार करायला प्रवृत्त करेल यात शंकाच नाही. राजहंस प्रकाशित या पुस्तकाचा गेल्या काही दशकातील सर्वोत्तम मराठी वैचारिक लिखाणामध्ये या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.मराठी राजहंस प्रकाशन प्रकाशित आणि संदीप वासलेकर लिखित 'एका दिशेचा शोध' या पुस्तकातील हा एक भाग खास वाचकांसाठी.
केल्याने होत आहे रे......
विशेष दक्षता विभागाच्या एक उच्चपदस्थ महिला अधिकारी मला भेटावयास आल्या. त्यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षेच्या व्यापक योजनेचा प्रस्ताव बनवण्याची जबाबदारी दिली गेली होती. त्या विषयावरील औपचारिक बोलणी झाल्यानंतर आम्ही गप्पा मारत होतो. गुप्तहेर खाते , नक्षलवादी प्रदेश , शहरी कायदा व सुव्यवस्था अशा चौफेर अनुभवातून आमची चर्चा सुरू होती. त्यानंतर याला कारणीभूत असणा-या घटकांचा शोध घेत घेत आम्ही एकंदरीत व्यवस्थेपर्यंत पोहोचलो. त्याचवेळी त्यांच्या बोलण्यात कमालीचे नैराश्य आले. त्या म्हणाल्या , '' आज जरी मी एवढया मोठया पदावर असले , तरी अनेक गोष्टी जवळून बघताना खूप वाईट वाटते. सध्या जे काही चालले आहे , ते बदलेल , असे मुळीच वाटत नाही.
नेहमीप्रमाणे निवडणुका होतात. सत्तेवरील पक्ष बदलतात किंवा तेच राहतात. काही खात्यांत चांगले कार्यक्रम व योजना राबवल्या जातात. थोडी रस्तेबांधणी , महाविद्यालयांचा विस्तार , संगणकाशी संबंधित उद्योग , शेतकऱ्यांची कर्जमाफी , कर्जमेळावे असे कार्यक्रम होतात. काण ते वरवरचे असतात. कारण तळागाळातील लोकांपर्यंत त्याचा फायदा किती पोहोचतो , हा संशोधनाचाच विषय ठरेल. काही नेते त्याला अपवाद आहेत. कोण त्यांचे धडाडीने काम चालते ते फक्त आपल्या मतदारसंघापुरतेच. आपल्याच मतदारसंघात ते नवे प्रकल्प आणतात , रोजगारनिर्मिती करतात. त्याचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत संकुचित लाभ होतो. हे सारे काही पाहिल्यानंतर एक समाज किंवा देश म्हणून अकारण समाधानकारक का पातळीवर गेलो आहोत , असे वाटत नाही. सरकार बदललेच , तर सुरुवातीच्या काळात थोडेफार चांगले कार्यक्रम राबवले जातात. पण गरीब व सामान्य जनतेला काही विशेष फरक पडत नाही. वेळप्रसंगी आमच्या बदल्या केल्या जातात. चक्र असेच सुरू राहते. सर्वच पक्षांत थोडयाफार फरकाने साम्य दिसते.
पैशांचा स्वार्थ , आपल्या मुलांना किंवा नातलगांना राजकारणात आणण्याचा मोह असे हे मायाजाल पसरलेले आहे. परिस्थितीत बदल होणार नाही म्हणूनच मन निराश होते. या साऱ्या वातावरणामुळेच बेरोजगारी , गुन्हेगारी , भ्रष्टाचार , दहशतवाद दिवसेंदिवस वाढतच आहे. मला तरी यातून कुणी सुटका करेल , असे वाटत नाही. ''
सरकारी सेवेत असणारे अधिकारी अनौपचारिक वातावरणातही मनमोकळेपणाने बोलत नाहीत. मात्र या अधिकारी महिलेची व्यथा मनापासून होती. त्यामुळेच तिला ती लपवता आली नाही. तिचे हे विचार प्रातिनिधिक स्वरूपाचे म्हणता येतील. कारण अनेक संवेदनशील अधिका-यांच्याही अशाच प्रतिक्रिया आणि वेदना आहेत. सरकारी अधिकाऱ्यांना सध्याच्या परिस्थितीची आणि भोवतालच्या वातावरणाची जाणीव आहे. भविष्याकडे बघण्याची दृष्टीदेखील आहे.
म्हणूनच अशा बजबजपुरीपेक्षा अनेकजण आपल्या मुलामुलींना परदेशी स्थायिक होण्यास प्रोत्साहित करतात. या निर्णयातच त्यांचे देशाच्या भविष्याबद्दलचे मत व्यक्त होते.
आपल्या देशाची परिस्थिती बघता सर्वसामान्य लोक मनातून निराश असल्याचे जाणवते. प्रत्येकाचा स्तर , त्यांच्या भोवतालचे घटक काहीही असू शकतात. पण ज्यावेळी सामूहिक पातळीवर विचार होतो , त्यावेळी आपल्या देशाची परिस्थिती निराशाजनक असल्याचेच सर्वांचे मत असते.
त्यासाठी सरसकट सर्वजण राजकारण्यांवर खापर फोडतात. हे चुकीचे नसले तरी इतर बाबीही त्याला कारणीभूत असतात , त्यांचा विचार करून त्या परिस्थितीत बदल करण्यासाठी व्यक्तिगत स्तरावर कृती करण्याचे धारिष्टयदेखील सहसा कुणी दाखवत नाही , ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
आपल्या समाजाचा किंवा देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास फक्त राजकारण्यांवरच अवलंबून असतो , हा समज चुकीचा आहे. हे निश्चित की , ही मंडळी त्याला आडकाठी आणू शकतात. कारण तेवढे सामर्थ्य व शक्ती आपणच त्यांना दिलेली असते. सुधारणा करण्याचे प्रभावी माध्यम त्यांच्याकडे असूनही तशी त्यांची मानसिकता नसते. याबाबत मला आलेले दोघा दिग्गज राजकारण्यांचे अनुभव बोलके आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणातील वजनदार मानल्या गेलेल्या एका नेत्याने मित्रत्वाच्या नात्याने मला भोजनासाठी निमंत्रित केले. आज ते हयात नाहीत. हा प्रसंग घडला तेव्हा त्यांच्या पक्षाचे सरकार महाराष्ट्रात होते.
भेटल्यानंतर झालेल्या चर्चेत त्यांनी विषय काढला. ते म्हणाले , '' तुझ्याशी एक बोलायचे आहे. मुंबईची सिंगापूरसारखी स्थिती कशी करता येईल , यासंबंधी तुझ्याकडे काही कल्पना आहेत का ?'' आमचे अरे-तुरेचे संबंध होते. मी सांगितले , '' मी काही नगर विकासशास्त्रातला तज्ज्ञ नाही , मी काय सल्ला देणार ?'' ते हसून म्हणाले , '' अरे , नगरविकास तज्ज्ञ मला नेहमीच भेटायला येतात. या विषयावर एक मंत्रीही आहे व अनुभवी अधिकारी आहेत. मी त्यांच्याशी नेहमीच बोलतो. काण तुला जगाचा अनुभव आहे , सर्वसाधारण तज्ज्ञ विचार करू शकणार नाहीत अशा सूचना तू देशील , अशी माझी
अपेक्षा आहे. म्हणून सहज विचारले. '' मी थोडा वेळ विचार केला आणि सांगितले , '' मुंबई हे अतिशय अस्वच्छ शहर आहे. जर सर्व पक्षांचे कार्यकर्ते , सेवाभावी संस्था ,
महानगरपालिका व राज्य सरकार एकत्र आले आणि सर्वांनी संपूर्ण शहर सिंगापूरसारखे स्वच्छ करायचे ठरविले , तर कमीत कमी वेळेत ते शक्य होईल. सुलभ शौचालयाला अथवा गाडगे महाराज प्रकल्पाला मोठे अनुदान देऊन अनेक शौचालये बांधावी लागतील. महानगरपालिका कचऱ्यांच्या
गाडया वाढवू शकेल. या दोन खर्चाच्या बाबी आहेत. बाकी सर्व कार्यकर्त्यांचा निर्धार व लोकांची इच्छाशक्ती यांच्यावर अवलंबून आहे. अर्थात ही एक स्वच्छता मोहीम सुरू करून नटांबरोबर पेपरात फोटो झळकवून थांबणार असेल , तर मात्र परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही. तर अगदी गल्ली- बोळांतील नागरिकांनीही जबाबदारी घेतली पाहिजे. जिथे कचऱ्यांच्या कुंडया नाहीत तिथे त्या महानगरकाालिकेने पुरवल्या पाहिजेत. कचरा
सकाळी नेऊन त्याचे खत उत्पादन करण्यासाठी शहराबाहेर प्रकल्प केले पाहिजेत व कायमची यंत्रणा निर्माण केली पाहिजे. ''
माझ्या या मतामुळे त्यांचा अपेक्षाभंग झाला. थोडे नाराज होत ते म्हणाले , '' अरे , काय फालतू कल्पना दिलीस. मला वाटले , तू जगभर फिरतोस तर एखाद्या परदेशी सरकारबरोबर किंवा जागतिक बँकेबरोबर सहकार्य करून कोटी रुपयांच्या योजना बनवशील. शहर चकचकीत होईल. नवीन इमारती , हवेतील रेल्वे आणण्यासाठी योजना तयार करशील. '' मला ते पटले नाही. मी उत्तर दिले , '' ते नंतर बघता येईल. पहिल्यांदा शहर स्वच्छ झाले आणि लोकांना आपल्या नागरिकत्वाची जाणीव झाली ,
तर आपण खूप मोठे यश मिळवू. स्वच्छतेमुळे आरोग्य , पर्यावरण व पर्यायाने राहणीमान सुधारेल. एकदा स्वच्छतेचा प्रश्न सुटला की घर , रस्ते ,
पर्यावरण हे प्रश्न नागरिकांना प्रेरित करून सोडण्यास मदत होईल. त्यासाठी कमीत कमी सरकारी खर्च होईल. '' त्यांना तेसुध्दा पटले नाही. '' मी उगाच विषय काढला , एरव्हीदेखील तू कधी काही काम घेऊन येत नाहीस. सध्या आमचे सरकार आहे. काही
काम असेल , तर नक्की सांग. '' असे बोलून त्यांनी हा विषय संपवला.
त्यानंतर एक वर्षाचा काळ उलटला. निवडणुका झाल्या. महाराष्ट्रात दुसऱ्या पक्षाचे सरकार आले. सत्तेत असलेल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने मला भोजनाच्या निमित्ताने चर्चेसाठी बोलावले. सध्या ते नेते फारसे प्रसिध्दी झोतात नाहीत. त्यांनी थेट प्रश्न केला की , '' महाराष्ट्राचा ग्रामीण भाग वर आला पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत. यासाठी तुमच्याकडे काही योजना आहेत का ?''
मी म्हटले , '' मी काही कृषितज्ज्ञ नाही व ग्रामविकास कार्याचा मला अनुभव नाही. आपल्या पक्षात शेती , सहकार , ग्रामविकास यांचा दांडगा अनुभव असलेले अनेक नेते आहेत. मी त्यांना काय सांगणार ?'' ते म्हणाले , '' तुमचा जगभरचा अनुभव आहे. आम्ही रोज ज्या गोष्टींचा विचार करत नाही. अशा काही गोष्टी आपण सुचवू शकाल , असे
आमचे काही सहकारी म्हणाले. ''
शेतकरी आणि ग्रामीण विकास यांना केंद्रस्थानी ठेवून विकास प्रक्रियेतील काही मुद्दयांचा परामर्श घेत मी त्यांना सुचवले की , शेतकऱ्यांची खाजगी व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होते म्हणून सहकार व शेतीमाल बाजार समिती या दोन प्रक्रिया आल्या. त्यामुळेच काही शेतकऱ्यांना फायदा झाला. पण आता सहकार क्षेत्रात व शेतीमाल बाजार समितीत अनेक हितसंबंध निर्माण झाले आहेत. त्यामुळे गरीब शेतकरी गरीबच राहिला. जर
सहकार व शेतीमाल बाजार समितीत सुधार केला , शेतकऱ्यांचा माल चांगल्या दराने विकणे शक्य व्हावे म्हणून मुक्त अर्थव्यवस्था आणली व त्याचबरोबर शेतकऱ्यांचे शोषण होणार नाही , याची खबरदारी घेण्यात आली ; तर शेतकऱ्यांचा फायदा होईल. त्यांच्याकडे पैसे आले , तर ते उत्पादन वाढविण्यासाठी खते व सिंचन या क्षेत्रात गुंतवणूक करू शकतील. गावागावात छोटी व वातानुकूलित गोदामे बांधली , तर त्यांना घाईघाईत
स्वस्तात माल विकण्याची गरज राहणार नाही. त्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रशिक्षण , विमायोजना , कर्जव्यवस्था यांची सोय केली ; तर त्यामुळे ते उत्पादन वाढवू शकतील. खेडयात शेतीमालापासून खाण्याचे पदार्थ बनवण्याचे कारखाने टाकण्यासाठी उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले , तर शेतकऱ्यांची मुले शेतीपासून शेतीसंबंधी औद्योगिक व्यवसायाकडे वळतील. ''
त्यांना माझे हे विचार अपेक्षित नव्हते. ते म्हणाले , '' हे सर्व सोडा! यात फक्त काही शेतकऱ्यांचा फायदा होईल , पण इतरांचे नुकसान होईल. सर्व शेतकऱ्यांचा फायदा होईल , अशी एक योजना माझ्याकडे आहे. त्यासाठी तुमची मदत मिळेल , अशी अपेक्षा आहे. ''
'' अशी कोणती योजना आहे व मी काय मदत करणार ?'' मी आश्चर्याने विचारले.
'' प्रत्येक शेतकऱ्याला एक संगणक देण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनांकडून मदत हवी आहे. '' ते थेट मुद्दयावर आले. '' प्रत्येक शेतकरी संगणक घेऊन काय करणार ? प्रथम सहकार व शेतीमाल बाजार समितीत सुधार केले पाहिजे. जी पडीक जमीन आहे , ती शेतीसाठी वापरली गेली पाहिजे आणि हे सर्व करण्यास फारसा वेळ खर्च होणार नाही. '' हे माझे म्हणणे त्यांना पटले नाही. आम्ही भोजन लवकर संपविले व मी घरी परतलो.
यानंतर काही महिन्यांनी मला असाच एक अनुभव आला पण आंध्र प्रदेशच्या बाबतीत. तिथले शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे राजकारणी भेटले. त्यांच्याकडे अशीच संगणकाची योजना होती व ते त्यासाठी निधी कुठे मिळेल , याची चौकशी करत होते.
आत्मकेंद्री राजकीय मनोवृत्ती ही स्वातंत्र्योत्तर काळापासून भारतीयांची फार मोठी शोकांतिकाच बनली आहे. राजकारणातले खेळाडू बदलतात , पण त्यांचे राजकीय डावपेच कायम राहिले आहेत. कार्यकर्त्यांचे किंवा पदाधिकाऱ्यांचे चेहरे बदलतात , पण त्यांची मानसिकता कायम राहिली आहे.
स्वार्थाचे स्वरूप बदलले , पण लोभी वृत्ती कायम राहिली आहे. यात भरडली जाते ती सामान्य जनता. पण त्याचे कुठलेही सोयरसुतक कुणालाच नाही. एखाद्या नेतृत्वाविषयी नाराजी असली , तरी जनतेला अपेक्षित असलेला नेता मिळत नाही. नवीन नेतृत्व कोणाचे याबाबत पक्ष श्रेष्ठींनी निर्णय घ्यायचे व जनतेने निमूटपणे त्याचा स्वीकार करावा , हेच हायकमांडना अकोक्षित असते. प्रामाणिक , दूरदर्शी , कल्पक व यशस्वी व्यक्तींना सामान्य
लोक नेतृत्वपदी नेऊ शकतात व कोणत्याही पक्षातल्या श्रेष्ठींना व कार्यकर्त्यांना अशा नेतृत्वाचा स्वीकार करण्यासाठी भाग पाडू शकतात , असा आपल्या लोकशाहीचा सिध्दांत असला तरी तो केवळ विचारापुरताच ; प्रत्यक्षात आचरणात तो येत नाही.
आम जनतासुध्दा या प्रक्रियेत तितकीच जबाबदार आहे. राजकारण्यांना गेंडयाच्या कातडीचे म्हणताना आपण आपल्या विकासाबाबत कितपत संवेदनशील व जागरूक आहोत , ते तपासले पाहिजे ; कारण आपल्या भावनांचा उद्रेक राजकारण्यांवर दबाव टाकण्यासाठी होऊ शकतो. पण ' मला काय त्याचे ? मी का म्हणून पुढाकार घ्यायचा ? आपण कशाला वैर घ्यायचे ? ज्याला भांडायचे असेल तो बघेल ना! ' असे आपण स्वत:शी आणि
आपल्या कुटुंबाशी बोलताना नक्कीच म्हणत असतो. यातून आपणच आपल्या प्रांताचे आणि देशाचे नुकसान करतो आणि आपणच त्याला कारणीभूत आहोत , ही जाणीव आपल्याला त्याप्रसंगी होताना दिसत नाही.
याच्या अगदी विरुध्द दृश्य अमेरिकेत दिसते. तेथील नागरिक आपल्या देशाविषयी किती भावुक आणि हळवे असतात , हे मला माझ्या व्याख्यानादरम्यान दिसून आले.
जॉर्ज बुश अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्या देशात खूप निराशा आली होती. सरकारी कर्ज वाढले होते. अर्थव्यवस्था कोसळेल अशी भीती होती. इराकमध्ये अमेरिकेचे सैनिक मारले जात होते. आशियातील दोन-तीन देश वगळता जगात सर्वत्र अमेरिकेची नाचक्की झाली होती. अशा परिस्थितीत एका सुप्रसिध्द संस्थेने कॅलिफोर्नियात बर्कले येथे माझे व्याख्यान ठेवले होते. शेवटी प्रश्नोत्तराचा तास होता. एका महिलेने मला अमेरिकेविषयी जागतिक मत विचारले. मी प्रांजळपणे सांगितले , '' तुमचा देश सामर्थ्यवान असूनही त्याला किंमत राहिली नाही. अमेरिका मोठी झाली ; कारण स्वातंत्र्य , विश्वास व कायद्यावर आधारित राज्याचा तुम्ही पुरस्कार केला. आज या मूल्यांची गळचेपी झाली आहे. दहशतवादाविरुध्द
युध्दात अथवा इराकमधल्या युध्दात तुम्हांला लष्करी विजय मिळेल. पण तुमच्या सरकारने त्या मूल्यांचा म्हणजे तुमच्या देशाच्या आत्म्याचा पर्यायाने तुमच्या देशाचाच पराभव केला आहे. जगातले लोक तुम्हांला एक स्वपराभूत देश समजून हसतात. '' माझे भाषण संपल्यावर ती महिला व श्रोतृवृंदातील अनेक लोक अक्षरश: रडू लागले. मी रात्री आयोजकांना सांगितले , '' ज्या देशाचे नागरिक एवढे संवेदनशील आहेत , त्या देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे. ''
त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत बराक ओबामा या तोपर्यंत अपरिचित असलेल्या कृष्णवर्णीय नेत्याने अशा लोकांना दिलासा दिला. ओबामांकडे पैशाचे पाठबळ नव्हते , संघटना नव्हती. त्यांनी इंटरनेटचा वापर करून डेमोक्रेटिक पक्षावरील क्लिंटन पति-पत्नीचे वर्चस्व मोडून काढले. नंतर रिपब्लिकन पक्षाचा पराभव करून ते राष्ट्राध्यक्ष झाले. सत्तेवर येताच लगेच त्यांनी सुधारणांच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली. देशाच्या इतिहासात प्रथमच स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने वेतन मिळण्याचा हक्क दिला. गरिबांसाठी घरांची सोय करण्याच्या योजना आखल्या. सर्व गरिबांना आरोग्यविमा मिळण्यासाठी नवीन कायदा आणला. श्रीमंत व्यवस्थापनांच्या वेतनावर निर्बंध आणले.
अध्यक्ष ओबामा यांनी सहा महिन्यांत अमेरिकेची जगातील पत वाढविली. अरब राष्ट्रांबरोबरचे संबंध सुधारले. चीन व रशिया बरोबरचे वैमनस्य दूर केले. केवळ पाकिस्तान-अफगाणिस्तानाबाबत अवलंबलेले चुकीचे धोरण वगळता ओबामा यांनी अंतर्गत व बाह्य असे बरेच बदल केले.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओबामा डेमोक्रेटिक पक्षाच्या साहाय्याने वर आले नाहीत. त्यांना पक्षात काहीही स्थान नव्हते. माझ्या भाषणात अश्रू ढाळणाऱ्या व देशप्रेम वाटणाऱ्या असंख्य सामान्य नागरिकांनी स्वत:च चळवळ उभी करून ओबामांचे नेतृत्व तयार केले. त्या मोबदल्यात त्यांनी खाजगीरीत्या कोणालाही काही दिले नाही. एक परिवर्तनाच्या मार्गावर असलेला देश दिला. सत्तेवर कोण बसणार याचा निर्णय ज्या देशात
धनाढय लोक घेत असत , त्या देशात सर्वसाधारण नागरिकांनी पैशाविना एक नूतन नेतृत्व निर्माण केले.
याउलट भारतातील लोकशाही सरंजामी वृत्तीची आहे. पाच वर्षातून निवडणुका घ्यायच्या आणि मतदारांचा कौल मागायचा. या लोकशाहीच्या राजवटीत मग आपली मुले , नातलग यांना सत्तेवर बसवायचे , अशी वृत्ती नेत्यांमध्ये बळावली आहे. कोणत्याही पक्षाचा विजय झाला , तरी देशातील किंवा राज्यातील काही कुटुंबांचीच सत्ता येते. उरलेले लोक या कुटुंबांचे गुलाम असतात. जनतेलाही या गोष्टी कळतात , पण वळत नाहीत.
अमेरिकेच्या लोकांनी बुश व क्लिंटन या कुटुंबशाहीला झिडकारले आणि ओबामा यांना नेते केले. अमेरिकेत लोकशाही बळकट असल्यामुळे हे बदल झाले आहेत. अमेरिकेत बदल होण्याआधी सुमारे वीस वर्षे पूर्व युरोपातील देशांत रक्तहीन राजकीय बदल झाले. या सर्व देशांत साम्यवादी राजकीय पध्दत होती. राज्यकर्त्यांना रशियाच्या सैन्याचा पाठिंबा होता. गुप्तहेरखाते पाठीशी होते. तरीही पोलंडमध्ये लेच वालेसा या साध्या कामगाराने व झेक
प्रजासत्ताकामधील वासलाव हावेल या नाटयकाराने लोकांना स्फूर्ती दिली. लोकांनी दडपशाही झुगारली व स्वत:च्या देशाला स्वत:च्याच राज्यकर्त्यांच्या पोलादी पकडीतून मुक्त केले. हळूहळू ही लाट सर्व पूर्व युरोपात पसरली. अर्धा खंड स्वतंत्र झाला. आता सुबत्तेच्या मार्गावर आहे. आधुनिक काळात जगभरात असे परिणामकारक बदल होत गेले आहेत. त्याचा उदय युरोपातील पूर्व जर्मनीतून झाला , असेही म्हणता येईल.
बर्लिनची भिंत पूर्व आणि पश्चिम युरोकाच्या विभाजनाचे प्रतीक होती. त्या भिंतीपलीकडे उंटेर डेन लिंटन हा महामार्ग सुरू होतो. तिथे सुरुवातीलाच रशियाचे दूतावास आणि त्याच्या बाजूलाच कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यालय होते. पूर्व जर्मनीतील दडपशाहीची सूत्रे या ठिकाणाहून हलायची. पूर्व जर्मनीच्या नागरिकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. विजेची प्रचंड कमतरता होती. वर लष्कराची दडपशाही. त्यामुळेच पूर्व जर्मनीचे लोक
भिंत ओलांडून पश्चिम जर्मनीत जाण्याचा प्रयत्न करायचे. काहीजण त्यात यशस्वी होत , तर काही पूर्व जर्मनीच्या सैनिकांच्या गोळीचे शिकार व्हायचे. उंटेर डेन लिंटनला जवळच असलेल्या फ्रेडरिशस्ट्रास रस्त्यावर चार्ली नावाचा चेकनाका होता. तिथून पश्चिमेकडील नागरिक आपल्या पूर्वेकडील नातलगांना भेटण्यासाठी येत. जर्मन नागरिकांना व्हिसा मिळत नव्हता. काण पूर्व जर्मनीतल्या भारतीय विद्यार्थ्यांना मात्र मुक्तपणे शिक्षण
घेता येत होते. त्यांना भेटायला येणारे नातलग चार्ली नाक्यावर रेल्वेगाडीत चढत व तिथून पूर्व जर्मनीत येत असे. या नातलगांची सैनिकांकडून तपासणी होत असताना त्यांचा अविर्भाव पाहून पोटात भीतीचा गोळा येई. थोडक्यात सांगायचे , तर उंटेर डेन लिंटन व फ्रेडरिशस्ट्रास हे दोन्ही महामार्ग म्हणजे मृत्यूकडे नेणारे रस्तेच अशी परिस्थिती साधारणत: 1989 पर्यंत होती. बर्लिनची भिंत तोडल्यानंतर मात्र परिस्थिती बदलली .
नागरिकांचा रोष पाहून लष्करच घाबरून पळून गेले. त्यामुळे रक्ताचा एकही थेंब न सांडता पूर्व जर्मनीतील साम्यवादी राजवट इतिहासजमा झाली.
मी अनेकदा उंटेर डेन लिंटन आणि फ्रेडरिशस्ट्रासला गेलो. आता परिस्थिती खूपच वेगळी आहे. वेगवेगळया प्रकारची रेस्टॉरंट्स , महागडया गाडयांची दुकाने यांची तेथे वर्दळ आहे. ऐश्वर्यसंपन्नता आहे व लोक मनमुरादपणे स्वातंत्र्याचा उपभोग घेत असल्याचे चित्र दिसून येते.
कोप-याकोप-यावर संगीतशाळा व भव्य ऑपेरा थिएटर्स आहेत. उंटेर डेन लिंटनच्या आइनस्टाइन कॅफेमध्ये दुपारी बसायला जागा मिळत नाही. हीच परिस्थिती फ्रेडरिशस्ट्रासच्या रेस्टॉरंटमध्ये रात्रीच्या भोजनासाठी असते. परदेशी पर्यटक मोठया संख्येने येत असतात. त्यावेळी आठवण म्हणून ते बर्लिनच्या तुटलेल्या भिंतीचे तुकडे विकत घेताना दिसतात.
काही वर्षांपूर्वी ज्या रस्त्यांना मृत्यूचे महामार्ग समजले जात होते , त्याच ठिकाणी इतक्या अल्पाववधीत झालेली प्रगती व परिवर्तन हे फक्त सामान्य नागरिकांचे परिश्रम , प्रयत्न , आत्मविश्वास व निर्धार यांच्यामुळेच शक्य झाले. शेतकरी किंवा बांधकाम करणाऱ्या मजुराने दिवसभर घाम गाळायचा , तर बँकेतल्या कारकुनाने किंवा सचिवालयातल्या अधिकाऱ्याने सारखे चहाला जायचे , असे आपल्यासारखे प्रकार जर्मनीत चालत नाहीत.
तिथे कामगार असो किंवा उच्च पदावरील अधिकारी सर्वजण कठोर परिश्रम करतात. म्हणूनच हा देश दुसऱ्या महायुध्दात बेचिराख होऊन फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेऊ शकला. उंटेर डेन लिंटन व फ्रेडरिशस्ट्रासचे सध्याचे परिवर्तन फक्त स्वातंत्र्य मिळाल्यामुळे झालेले नाही , तर सामान्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती , सामूहिक प्रयत्न , भ्रष्टाचाराला मूठमाती आणि राजकारण्यांपासून ते तळागाळातील नागरिकांपर्यंत समान वागणूक व आदर यांनीच ते घडवले आहे.
हिंसक क्रांतीने विशेष काही साध्य होत नाही , हे गेल्या ५०० वर्षांच्या इतिहासावरून आपल्या लक्षात येईल. १७८९ साली फ्रान्सची राज्यक्रांती झाली. क्रांतिकारकांनी धर्मगुरूंना पळवून लावले. देशाच्या राजाला आणि महाराणीला पकडून भर रस्त्यावर सुळावर चढवले. काण काय निष्पन्न झाले ? त्यांच्यातीलच नेपोलियन बोनापार्टला क्रांतिकारकांनी सम्राट बनवले. पुन्हा एकदा राजेशाही आली. नेपोलियनने शेजारच्या राष्ट्रावर हल्ला
केला. शेवटी त्याचा वॉटर्लू येथे दारुण पराभव झाला. त्यानंतर त्याचा पुतण्या सम्राटपदी विराजमान झाला. त्याला सत्तेवर आणण्यासाठी धर्मगुरूंनी मदत केली. आपल्या खाजगी महत्त्वाकांक्षेपायी त्याने जर्मनीवर हल्ला केला. त्यात फ्रान्सचा पराभव झाला. त्यानंतर तिथे दहशतवाद पसरला. संसदेवरही मोठया प्रमाणावर हल्ले झाले.
रशियात १९१७ मध्ये हिंसक क्रांती झाली आणि जगात पहिल्यांदाच साम्यवादी सत्ता आली. स्टॅलिनसारखा क्रूर नेता सत्तेवर आला. नंतर ख्रुश्चेव , ब्रेझनेव्ह , आंद्रापोव यांनी हेरांना हाताशी धरून जनतेवर अतोनात अत्याचार केले. शेवटी मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी देश व साम्यवाद मोडीत काढला. नंतर बोरिस येल्स्तीन यांनी तर रशियाचा जवळजवळ लिलावच केला.
इराणमध्ये आयातुल्ला खोमेनी यांच्या मार्गदर्शनाखाली १९७९ मध्ये क्रांती झाली. त्याची परिणती म्हणजे नंतरच्या तीस वर्षात देशाचे उत्पन्न तीस टक्क्यांनी घटले. गुप्त पोलीस , दहशतवादी बसीज संघटना व धर्मगुरूंनी स्त्रियांना काळया बुरख्यात बांधले. शेजारी अफगाणिस्तानमध्ये १९९३ मध्ये तालिबानने क्रांती केली. तत्कालीन पंतप्रधानांना फाशी दिली गेली. अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याने तालिबानचा
आश्रय घेतला. अखेर अमेरिकेने अफगाणिस्तानावर हल्ला करून तालिबान राजवट मोडीत काढली. अमेरिकेने इराणचीही आर्थिक नाकेबंदी केली आहे. तिथले धर्मावर आधारित सिंहासन त्यामुळे डळमळीत झाले आहे.
याउलट महात्मा गांधींपासून मार्टिन ल्यूथर किंगपर्यंत व नेल्सन मंडेलांपासून लेच वालेसाकार्यंत ज्यांनी रक्तहीन क्रांती करून बदल घडवून आणले , ते शाश्वत ठरले. ' अहिंसैव जयते। ' हे ब्रीद या परिवर्तनाबाबत सांगता येईल.
अहिंसक परिवर्तनाच्या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ आणि मानसिकता तयार व्हायला हवी. अन्य देशांमधील नागरिकांनी आपल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ठेवलेली मानसिकता व अवलंबिलेले मार्ग जाणून घेतले , तर निश्चितपणे आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो.
मला स्टॉकहोमच्या वास्तव्यात तीन अनुभव आले. ते लोकांची बदललेली मानसिकता व कोणतीही चुकीची गोष्ट न स्वीकारण्याचा बाणेदारपणा दर्शवतात.
एकदा मी रस्त्यात एक गोड पदार्थ खाऊन वरचा कागद तसाच टाकला. माझी चूक झाली होती , हे कळले. पण कंटाळा आल्याने मी तसाच पुढे गेलो. थोडया वेळाने एक वृध्द गृहस्थ धावत माझ्याकडे आले. मला नम्रपणे म्हणाले , '' तुम्ही आमच्या देशात पाहुणे दिसता , म्हणून रागावत नाही. आम्हांला रस्त्यात कचरा टाकलेला आवडत नाही. मी तुमचा कचऱ्याचा कागद माझ्या खिशात उचलून ठेवला आहे. तो मी पुढील कचरापेटीत
टाकेन. पण तुम्ही अशी चूक पुन्हा करू नका. ''
एकदा मी पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरत होतो. माझा मुलगा साहिल त्यावेळेस सात वर्षांचा होता. अचानक तो गाडीतून बाहेर पडला व रस्त्यात स्केटिंग करू लागला. दुपारची वेळ होती. सर्व घरे बंद होती. पण थोडयाच वेळात जवळच्या सर्व घरांचे दरवाजे उघडले. अनेक लोक बाहेर आले. ते म्हणाले , '' तुम्ही परदेशी दिसता , आमच्या देशात मुलांनी हेल्मेट घातल्याशिवाय स्केट वाकारणे अवैध आहे. मुलगा चुकून पडला , तर डोके फुटण्याचा धोका आहे. '' नंतर एकाने मला कागद दिला. त्यावर हेल्मेट विकणाऱ्या जवळपासच्या दुकानाचा पत्ता होता. मी माफी मागून तेथून निघालो.
अशीच एक दुपार होती. आम्ही गाडीने बाहेरून घरी चाललो होतो. मागून एक गाडी आली व आमच्या गाडीला धक्का देऊन वेगाने पुढे निघून गेली. आम्ही सुखरूप होतो. गाडीला थोडा मार लागला होता. कोणाशी भांडण नको , म्हणून आम्ही पुढे प्रवास सुरू ठेवला. पण रस्त्यातल्या सर्व गाडया थांबल्या. सर्व वाहनचालक एकमेकांना अपरिचित होते. एकाने आमची गाडी कोपऱ्यात थांबवण्याची सूचना केली. जवळ येऊन तब्येतीची चौकशी केली. दुसऱ्याने धक्का देणाऱ्या गाडीचा पाठलाग केला व क्रमांक नोंदवून घेतला. तिसऱ्याने पोलिसांना फोन केला. थोडयाच वेळात पोलिसांची गाडी आली. त्यांनी वायरलेसवरून संदेश पाठविले. केवळ पंधरा मिनिटांत आम्हांला मार देणाऱ्या गाडीला घेऊन दुसरी पोलीस गाडी
आली. आमची व रस्त्यातील लोकांची साक्ष घेतली. दोषी वाहनचालकास दंड भरण्यासाठी पावती दिली. आम्हांला आमचा दोष नसल्याचे पत्र दिले. व आमची गाडी दुरुस्त करण्यासाठी विमा कंपनीस सुपूर्द करण्यास सांगितले. काही क्षणांत पोलीस , धक्का देणारी गाडी , आम्ही व इतर सर्व आपापल्या मार्गाने निघून गेलो. हा सर्व प्रकार अर्ध्या तासात संपला. अपघात झाला , तेव्हा पोलीस जवळ नव्हते. केवळ नागरिकांनी स्वत:हून
जबाबदारी घेतल्याने आम्हांला न्याय मिळाला. आरोपीला दंडपत्र मिळाले.
मुंबई-पुण्याला अपघात झाला , तर आपण जखमींना मदत करायला घाबरतोच. पण आपण आरोपींना पकडण्यासाठी धावत नाही. मवाली लोक रेल्वेगाडीत महिलांना त्रास देताना अनेकदा आपण पाहतो व तोंड वळवतो. कधी आपण एखाद्या गुंडाला चोरी करताना किंवा धाकदपटशा दाखवताना पाहतो व आपण काही पाहिलेच नाही , असा आविर्भाव आणतो. यामुळे समाजातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे फावते. हळूहळू दहशतवादी
अशा संवेदना नसलेल्या समाजाचा फायदा घेतात. १९९२ च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानातून आरडीएक्स हा स्फोटक पदार्थ आला. तो आलाच कसा ? तटरक्षक दल , कस्टमचे अधिकारी , किनाऱ्यावर राहणारे लोक काय करत होते ? गुन्हेगारी व दहशतवादास सक्रिय विरोध केला नाही , तर आपणच त्याची शिकार बनू , हे त्यांच्या लक्षात आले नाही का ? हल्ला झाल्यावर आपण केवळ जखमींना मदत केली आणि गुन्हेगारीकडे
दुर्लक्ष केले तर हा एक प्रकारचा दांभिकपणा झाला.
मी चीनच्या दौऱ्यात बीजिंगपासून साधारणत: 250 किलोमीटर अंतरावरील खेडयातील काही शेतकऱ्यांच्या घरी गेलो. सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या घरी वीज , कापणी , संडास , फोन , टीव्ही अशा सोयी-सुविधा होत्या. ते शेतकरी दुग्धव्यवसायात होते व खूष होते. केवळ दहा वर्षांत तिथल्या प्रत्येक गाईचे दूध उत्पादन सुमारे दहापट वाढले. त्यामुळे भांडवल न वाढवता शेतकऱ्यांची आवकही वाढली. त्यांना मिळणारा नफा मुलांचे शिक्षण , दुग्धव्यवसायाची वाढ व इतर ग्रामीण विकासात गुंतवणूक करण्यासाठी वापरण्यात येतो. भारतीय गायी व म्हशी यांच्या दुग्ध- उत्पादन वाढीसाठी सामान्य शेतकऱ्याला भारतात नियमित मार्गदर्शन मिळते का ? अर्थात पुण्यातले चितळे बंधू , गुजरातमधील अमूल असे थोडे अपवाद आहेत. पण भारतीय शेतकरी गरीबच राहिला आहे. शेतकऱ्यांची मुले कुपोषणाला बळी पडतात. मागच्या दहा-पंधरा वर्षांत शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र त्यामुळेच सुरू झाले.
चीनमध्ये सुबत्ता असली , तरी तिथले सगळेच शेतकरी फारसे समाधानी आहेत असे नाही. चीनमध्ये लोकशाही नसूनही ते मोर्चे , अधिकाऱ्यांविरुध्द मोहीम वा तत्सम मार्गांनी विरोध करत असतात. असे विरोधाचे प्रकार मोठया संख्येने घडतात , असा अंदाज आहे. चिनी शेतकरी नक्षलवादाचा मार्ग वापरुन हिंसाचार माजवत नाहीत की आत्महत्या करत नाहीत ; तर ते आधुनिक तंत्रज्ञान , व्यवस्थापन व जरूर तेव्हा दडपशाहीला विरोध करून
आपले जीवन पुढे नेतात.
चीनचे प्रमुख राजकीय नेते नेहमी शेतकरी , गरिबी व उपासमार यांविषयी बोलत असतात. अमेरिकेचे राजकारण , नट-नटयांचे आयुष्य , उद्योगपतींबरोबर पंचतारांकित मेजवान्या असल्या क्षुल्लक गोष्टींसाठी ते कधीही आपला वेळ वाया घालवत नाहीत. याचा अर्थ चिनी नेते फार स्वच्छ आहेत , असेही नाही. अनेक राजकीय नेत्यांची मुले भांडवलदार बनली आहेत व त्यांना सरकारकडून कंत्राटे मिळतात. पण शेतकऱ्यांना कळल्यावर
शेतकरी अशा प्रकल्पांना विरोध करतात. चीनचे राजकारण बहुतांशी विकासाचे आहे. राजकर्त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष सतत होत असला , तरी त्यातील बेरजेचे राजकारण आपण लक्षात घेतले पाहिजे. तेथील सरकारने आर्थिक सुधारांचा प्रारंभ शेतीपासून केला. शेतकऱ्यांनी नक्षलवादाऐवजी सनदशीर विरोध व आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून शेतीचा विकास केला.
सामाजिक परिवर्तन करणे म्हणजे सर्व जुने टाकून देणे नव्हे. परिवर्तनाचा असा अर्थ लावणे चुकीचे होईल. अनेक देशांनी शेकडो वर्षे आपले सरकार , संस्था व विचार यशस्वीपणे चालवले आहेत. दमास्कसला गेल्यावर मी तेथील जुन्या बाजारात जातो. हा बाजार गेली अडीच हजार वर्षे अस्तित्वात आहे. त्यात विकल्या जाणाऱ्या वस्तू काळानुसार बदलल्या , पण दुकाने ख्रिस्तपूर्व काळापासून आहेत ; तरी सतत भरभराटीला असलेली दिसतात. या बाजाराच्या समोर उम्मायुद मशीद आहे. तेथे गेली अडीच हजार वर्षे लोक प्रार्थनेसाठी जातात. पहिल्यांदा तिथे रोमन लोकांचे उंच स्तंभ
असलेले प्रार्थनास्थळ होते. मग ख्रिश्चन लोकांनी चर्च बांधले. त्याच जागेवर आठव्या शतकात मुस्लीम राजकर्त्यांनी मशीद बांधली. आज तिथे
मशिदीत अजूनही पूर्वीचे चर्च व त्याआधी असलेल्या रोमन प्रार्थनास्थळाचे भाग व्यवस्थित जत करून ठेवले आहेत. मागच्या अडीच हजार वर्षांत
दमास्कसमध्ये धर्मांतर झाले , पण जुना बाजार व त्याच्या समोर असलेले प्रार्थनास्थळ आहे तसे राहिले. नवीन धर्माचे प्रार्थनास्थळ बांधताना आधीच्या धर्माचा आदर करून त्यांच्या प्रार्थनास्थळाचा महत्त्वाचा भाग सुरक्षित ठेवण्यात आला.
इटलीत गेल्यानंतर मी आवर्जून ' फॅब्रियानो ' या कागदाच्या दुकानात जातो. तेथे चित्रकलेसाठी लागणारे उत्कृष्ट दर्जाचे कागद मिळतात. कागदापासून बनवलेल्या आकर्षक भेटवस्तूही या ठिकाणी मिळतात. हे दुकान १२६४ सालापासून आहे. अजूनही एकच कुटुंब ते दुकान चालवते.
आता त्याच्या अनेक शाखा कार्यरत आहेत. आपण कधी सातशे पन्नास वर्षांचे दुकान चालवू शकू ? एखादी इमारत तीस-चाळीस वर्षांची झाली की ती बिल्डरला विकून पैसे घेण्यात आपण धन्यता मानतो. मायकल एंजेलो हा सुप्रसिध्द चित्रकार ' फॅब्रियानो ' तून कागद विकत घेत असे. सध्या युरोच्या नोटा या दुकानातील कागदावरच छापल्या जातात.
झुरिकजवळ एगिलासो नावाचे एक खेडे आहे. -हाइन नदीच्या काठी , द्राक्षांच्या मळयांनी वेढलेले आणि घनदाट जंगलाच्या बाजूलाच वसलेले हे गाव आहे. एका उन्हाळयात तिथल्या एका हॉटेलमध्ये माझे वास्तव्य होते. ते पाचशे वर्षांचे जुने आहे. तिथल्या खोल्यांमधील कपाटे अडीचशेतीनशे वर्षांपूर्वीची आहेत. इतकी वर्षे या हॉटेलचे व्यवहार अखंडपणे सुरू आहेत. गावात फेरफटका मारला , तर पाचशे-सहाशे वर्षांपूर्वीची जुनी
घरे अजूनही आढळतात.
लंडनमधील ऑक्सफर्ड व केंब्रिज विश्वविद्यालयेदेखील पाचशे वर्षांहून अधिक काळ जुनी आहेत. त्यांत अखंडपणे विद्यादान सुरळीतपणे सुरू आहे. आपण आपला भूतकाळ विसरलो आहोत. राजस्थानमधील काही प्रासाद आज हॉटेलमध्ये स्थलांतरित झाले आहेत. रायगड व सिंहगडासारखे किल्ले उपेक्षित राहिले आहेत. भूतकाळातील अनेक मौल्यवान गोष्टींचा दुर्मीळ खजिना आपण दुर्लक्षित केला आहे. आपण राष्ट्रीय अस्मितेत रमत
नाही. महापुरुषांचे पुतळे रस्त्यावर उभारले की आपले काम झाले , अशा थाटात आपण वावरतो. ' फॅब्रियानो ' चे मालक अजून एक हजार वर्षे आपले दुकान चालावे , यासाठी प्रयत्न करताना दिसतात. तर आपल्याकडे नालंदासारखे जगद्विख्यात विद्यापीठ बंद होते , याची आपल्याला काहीच खंत
वाटत नाही. कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या निधनाला अजून एक शतकही झाले नाही ; तोच शांतिनिकेतनला जी अवकळा झाली , ती बघून
आपली मान शरमेने खाली झुकली पाहिजे. आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे. प्रामाणिकपणे आपण ते केले पााहिजे.
मॅक्डोनाल्ड - कोकाकोला - हॉलिवूड आणि बॉलिवूडचे सिनेमे यांच्यातून आपण बाहेर आले पााहिजे. भारतासारख्या अतिशय समृध्द परंपरेचा कसोशीने सांभाळ केला पाहिजे. आपण केवळ ऐतिहासिक वैभवाच्या गप्पा न मारता आपल्या संस्था हजारो वर्षे कशा चालतील व त्यांतून सकारात्मक बदल कसे होतील , याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वासही असायला हवा. भारतात बेरजेचे समाजकारण ,
अर्थकारण व राजकारण आणले ; तर पुढील अनेक मार्ग सापडू शकतील. आपली सामाजिक मनोवृत्ती सर्वसामान्यकाणे बेरजेची नाही. कुणी पुढे जायला लागला की त्याचा पाय कसा खेचायचा , हे आपल्याला चांगले ठाऊक आहे. पण या धडपडीत आपणसुध्दा पडतो , हे आपल्या ध्यानात येत नाही. बेरजेच्या राजकारणात जर दुसऱ्याला हात दिला , तर दोघेही वर पोहोचू शकतात.
तुर्कस्तानचे पंतप्रधान अर्दोगान , इस्त्रायलचे मंत्री एफ्रेम स्नेह , अरब महासंघाचे प्रमुख आम्रे मुसा , जर्मनीचे उका-परराष्ट्रमंत्री हॉयर , उत्तर आयर्लंडचे माजी सभापती लॉर्ड ऑल्डरडाइस , अमेरिकेचे प्रसिध्द संसदपटू सॅम ब्राऊनबॅक , कॅनडाचे माजी पंतप्रधान पॉल मार्टिन अशा अनेक नेत्यांनी त्यांच्या राष्ट्राच्या विकासाच्या मुद्दयांसंदर्भात माझ्याशी चर्चा केली , सल्ला मागितला. त्यात त्यांना कमीपणा वाटला नाही. परक्यांकडून ते नवीन कल्पनांची मागणी करतात ; तसेच स्वत:च्या देशातील विरोधी पक्षनेत्यांबरोबरही देशहितासाठी नेहमी चर्चा करतात. राष्ट्रांची जडणघडण करताना राजकारणातील लढाई ते आड येऊ देत नाहीत. त्यामुळेच त्या देशांची प्रगती होते.
औद्योगिकदृष्टया सुधारलेल्या देशांमध्ये कामगार उगीचच संपांवर जात नाहीत. जपानमध्ये संपाची व्याख्या काळी फीत दंडाला लावून नेहमीपेक्षा जास्त जोम लावून काम करणे , अशी आहे. युरोप व अमेरिकेत कामगार संघटना आणि उद्योगसमूहांचे मालक एकत्र बसून संपूर्ण कामगारवर्गाचे भले कसे होईल , कामगार उत्पादन कसे वाढवू शकतील याच्यावर विचारविनिमय करतात.
विविध पक्षांमधील स्पर्धा हा लोकशाहीचा भाग झाला. पण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मोहिमा आखणे हे लोकशाही समाजात परिपक्व झाल्याचे लक्षण आहे. उद्योगपती व कामगार संघटना यांनी एकत्रित येऊन पर्यावरणाचा संतुलन सांभाळणारी उत्पादने वाढवणे आणि नफ्यात कामगारांना योग्य प्रमाणात हिस्सा देणे , हे सुधारलेल्या अर्थकारणाचे द्योतक आहे. सारे जग पुढे धावत आहे , आपण वजाबाकीच्या गणिताने मागासलेले राहिले आहोत. जेव्हा आपण विधायक दृष्टिकोन स्वीकारू , तेव्हाच आपल्याला एक योग्य दिशा सापडेल. अन्यथा पुढच्या पिढीलाही आपण काही देऊ शकणार नाही. त्यांच्या अधोगतीला आपणच जबाबदार असू. दिवसेंदिवस वाढणाऱ्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आपल्यापुढील आव्हानांना मोठी परिमाणे मिळत आहेत. अशा तुफानात आपल्याला एकमेकांच्या मदतीने आपल्या देशाची नौका वल्हवायची आहे.
जगातील अनेक देशांनी भूकंप , प्रलय अशा अनेक प्रकारच्या संकटांतून आपल्या नागरिकांना सावरले आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणजे पैसे कमविण्याचे नवे मार्ग अशी भावना काही स्वार्थी प्रवृत्तीच्या राजकर्त्यांमध्ये तसेच स्वयंसेवी संघटनांमध्येही दिसून येते. पण परदेशात तसे नाही.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात व जपानमध्ये नेहमीच भूकंप होत असतात. कधी ते ५ वा ६ रिश्टर स्केलवर होतात. कॅलिफोर्नियात अथवा जपानमध्ये एकही व्यक्ती दगावत नाही. तेथील घरांची बांधणी , भूकंपाचा विचार करणारे स्थापत्यशास्त्र व शहरांची बांधणी करताना भूकंप झाल्यास मनुष्यहानी होऊ नये , याची योग्य ती काळजी घेतली जाते. ज्या देशांत घरे बांधताना काळजी घेत नाहीत , राजकीय पुढारी व शासकीय अधिकारी गैरमार्गाने इमारती बांधण्यास परवानगी देतात , बांधकाम करणारे नफा वाढवण्यासाठी कमी दर्जाचा माल वापरतात , सामानात भेसळ करतात ; अशा देशांत भूकंप झाल्यास हजारो नव्हे , तर लाखो लोक मरतील.
एखाद्या मोठया भूकंपात किती लोक मरतात हे त्या देशात राज्यकारभार व प्रशासन कसे चालते आणि लोकांची सामाजिक मूल्ये काय आहेत , यावर जास्त अवलंबून आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे अथवा मानवी बेदरकारकाणाच्या वृत्तीमुळे निर्माण होणा-या अनेक आव्हानांमध्ये जीवितहानी हे भयंकर संकट आपल्यापुढे असते. ही मनुष्यहानी दूर करण्यासाठी आपल्याला प्रत्येक स्तरावर यशस्वी प्रयत्न करता येणे शक्य आहे.
नैसर्गिक आपत्ती असो अथवा मानवनिर्मित संकट - अशावेळी मृत्यूवर विजय मिळवत आपण इतरांना कसे जीवदान देतो , याला महत्त्व आहे. बिघडलेली राजकीय व सामाजिक परिस्थिती असो किंवा नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती अथवा इतर समस्या - या सा-या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनावर फार मोठे परिणाम करतातच , कारण त्या आपले सामाजिक स्वास्थ्यदेखील बिघडवू शकतात. त्यामुळे हातपाय गाळून बसण्यापेक्षा अशा परिस्थितीवर थेट मार्ग काढला पाहिजे. अशक्य असे काहीच नसते. आपल्यात माणुसकी आहे , पण सामाजिक घडी व न्यायासाठी चाड असणेही आवश्यक आहे. अर्थात एका रात्रीत सर्वच लोक बदलणार नाहीत. कोणीतरी , कुठेतरी बदल करण्यास सुरुवात करणे आवश्यक आहे.
एकदा सुरुवात झाली तर एक वेळ अशी येते , जेव्हा बदल मोठी गती घेतो. आपल्या नकळत सर्व समाज बदलून जातो. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी अमेरिकेत गुलामगिरीचा काळ होता. ती नष्ट होईल व कृष्णवर्णीय व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईल , असे कोणाला पूर्वी स्वनातही वाटले नव्हते. काण काही लोकांनी गुलामगिरीस विरोध केला. अशक्य वाटणारा बदल शक्य झाला. सुमारे १९०० पर्यंत लोक विमानतळावर , सिनेमागृहात , रस्त्यात धूम्रपान करत. त्यामुळे कर्करोग होतो , हे लोकांना समजले. प्रथम विमानात धूम्रपान करण्यास बंदी आली. मग विमानतळावर बंदी आली. नंतर सार्वजनिक जागी , सरकारी इमारतींत आणि इतर अनेक ठिकाणी बंदी आली. हळूहळू लोकांनी धूम्रपान सोडले.
मी माझ्या घरातही धूम्रपान करू देत नाही. जवळच्या मित्रालाही धूम्रपान करायचे असल्यास बाहेरून धूम्रपान करून मग घरात ये , असे सांगतो. माझी कोणाशीही मैत्री कमी झाली नाही , उलट मित्रांचे धूम्रपान कमी झाले. पूर्वी स्त्रियांना अधिकार कमी होते. इंग्लंड-अमेरिकेसारख्या प्रगत लोकशाहीतही शंभर वर्षांपूर्वी महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. अमेरिकेत वेतन समानता तर बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर शक्य झाली. भारतात स्वातंत्र्यानंतर स्त्रियांना मतदानाच्या हक्कासाठी लढावे लागले नाही. पंचायत राज आणले , तेव्हा ३३ टक्के जागा स्त्रियांसाठी आरक्षित ठेवल्या. संसदेतही महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
आपल्या सभापती एक दलित महिला नेत्या आहेत , सर्वांत मोठया पक्षाच्या अध्यक्ष एक महिला आहेत , एका मोठया राज्याच्या मुख्यमंत्री महिला आहेत व राष्ट्रपती एक महिला आहेत. ज्याप्रमाणे गुलामगिरी , धूम्रपान व स्त्रियांच्या अधिकारातील कमतरता इतिहासजमा होत आहेत ; त्याप्रमाणे भ्रष्टाचार , सरंजामी वृत्ती व भ्रष्ट अकार्यक्षम लोकशाही इतिहासात जमा करणे शक्य आहे.
आपल्याला आपली शहरे आणि गावे सुधारण्याची इच्छा असेल , तर त्यासाठी फार मोठा अवधी नको किंवा मोठी गुंतवणूक नको. हे सर्व सध्याच्या आर्थिक चौकटीत करणे शक्य आहे. त्यासाठी गरज आहे ती समाजाभिमुख नेते आणि जागरूक तळमळ असलेल्या नागरिकांची. आपली प्रगती वेळ अथवा पैशांच्या अभावी खुंटलेली नाही. जेव्हा आपल्याला दूरदृष्टी असलेले नेते व जागरूक आणि सक्रिय नागरिक मोठया प्रमाणात मिळतील , तेव्हा अल्पशा अवधीत व थोडयाशा निधीत बेरोजगारी , रोगराई व भूक हे प्रश्नही सुटतील.
त्याची सुरुवात कोणीतरी करायला हवी. कोणी एका मानवाने जमिनीवर रेघ मारली व ही जागा माझी आहे , असे जाहीर केले व खाजगी मालमत्तेची कल्पना रूढ झाली ; कोणी एका मानवाने हातात नांगर धरला व संपूर्ण जगात शेतीची कल्पना रूढ झाली ; कोणी एका मानवाने दोन दगड घासले , ठिणगी उडाली व ऊर्जेची कल्पना अस्तित्वात आली ; कोणी एका मानवाने धातू वाकविला व उद्योग जन्मास आला ; कोणी एका मानवाने १ , ० , १ , ० अशी द्विमान अंकमोजणी वापरली व संगणकशास्त्र उदयास आले ; कोणी एका मानवाने काव्य म्हटले व साहित्य जन्मास आले ; कोणी एका मानवाने गुहेच्या भिंतीवर छोटया दगडाने रेघा मारल्या व कलेचा उदय झाला ; कोणी एकाने परमेश्वराची कल्पना मांडली व धर्माचा उदय झाला ; तर कुणी दुर्बीण तयार केली अन् आपल्या मनाचा विस्तार वसुंधरेपलीकडे पसरला. कोणी अज्ञात व्यक्तीने केलेल्या छोटया बदलामुळेच मानवी संस्कृती निर्माण झाली. काही शोधांचे जनक आपणांस माहिती आहेत. पण ज्यांनी मूलभूत शोध लावले त्यांची आपल्याला काहीच माहिती नाही. वेद व उपनिषदे कोणी लिहिली ते सारे ॠषीमुनी आपल्याला ठाऊक नाही. त्याचा वापर करून साम्राज्य बनवणारे आधुनिक धर्मगुरू आपल्या माहितीचे आहेत.
जगातील अलीकडचे अनुभव लक्षात घेतल्यानंतर हेच स्पष्ट होते की , राजकीय व सामाजिक बदल करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. नागरिकांनी धैर्य व सक्रिय जागरूकता दाखवली , तर एक नवीन उष:काल शक्य आहे. हे करत असताना बदलाची सुरुवात आपल्यापासून करावी लागेल , हे लक्षात घेतले पाहिजे. भ्रष्टाचार व स्वत:च्या कुटुंबाचेच भले करणारे राजकारण समूळ नष्ट करणे आवश्यक आहे. मुलांना आपल्या धंद्यात ओढून न घेता स्वतंत्र आयुष्य जगण्याचे शिक्षण दिले पाहिजे.
पात्रतेपेक्षा केवळ घराणेशाही अथवा सत्ता आपल्या हातातून निसटून जाऊ नये , या भावनेतून जेव्हा डॉक्टरचा मुलगा डॉक्टर , अभिनेत्रीची कन्या अभिनेत्री , पोलीस अधिका-याचा मुलगा पोलीस होणे बंद होईल ; तेव्हाच खासदाराचे पुत्र व कन्या खासदार - आमदार होऊ नये , असे आपल्याला वाटू लागेल. आपण आपल्या घरात मुलाची लायकी अथवा आवड नसताना त्याला आपल्या व्यवसायाचा वारसदार करत असलो ; तर राजकीय नेतेही आपल्या मुलांना वारस म्हणून निवडत असल्यास त्यात गैर ते काय ?
घराणेशाहीला आळा घालण्याबरोबरच लाचलुचपत देणे बंद करणेही सामान्य लोकांची जबाबदारी आहे. आपली नैतिक अधोगती राजकीय क्षेत्रापुरती मर्यादित नाही. स्वत:ला पांढरपेशे समजणारे बँकांचे व वित्तीय संस्थांचे अधिकारी आर्थिक घोटाळे करतात , शेअर बाजारात उचापती करतात. ब-याच उद्योजकांना ओळखीने अथवा लाच खाऊन कर्ज देतात , दिलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पाठपुरावा करत नाहीत. आपणांस जर स्वच्छ राजकारण हवे असेल , तर प्रथम स्वच्छ अर्थकारण लागेल. त्यासाठी लोकांनी जागरूक राहून आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्याची गरज आहे. हे काम सेवाभावी संस्थाच करू शकतात , कारण प्रसारमाध्यमे मोठया उद्योगसमूहांच्या हातात आहेत. सेवाभावी संस्थांनी इंटरनेटसारखे नवीन माध्यम किंवा पथनाटय अथवा रस्त्यांवरील सभांसारखे जुने मार्ग अवलंबून घोटाळे करणा-या उद्योजकांची माहिती लोकांसमोर आणली पाहिजे.
अशा उद्योजकांच्या मालावर व शेअरवर ग्राहकांनी बहिष्कार टाकला पाहिजे. काही उद्योगसमूह रत्नांचा व्यवसाय करताना आफ्रिकेतील गरीब देशांचे शोषण करतात व स्थानिक जमातींमध्ये आपल्या फायद्यासाठी संघर्ष घडवतात , अशी माहिती बाहेर आली ; व्हा युरोप , अमेरिकेतील ग्राहकांनी अशा उद्योगसमूहांच्या रत्नांवर व दागिन्यांवर बहिष्कार टाकला. सर्व समूह त्यामुळे वठणीवर आले व त्यांनी आपल्या व्यवसायाची तत्त्वे कायमची बदलली. भारतातही जागरूक नागरिक असा धडा शिकवू शकतात. आपल्याकडे माणुसकी , उद्योजकता , लोकशाहीची कल्पना व इतर मूल्ये आहेत. त्यांपैकी काही मूल्यांविषयी आपल्या मनात संभ्रम आहे , तर काही मूल्ये आपल्याला कालबाह्य वाटू लागली आहेत. आपल्याकडे जे आहे त्याचा सकारात्मक उपयोग करून अहिंसेच्या मार्गाने बदल केले , तर एका नवीन समाजाची निर्मिती होईल.
माझ्या एका मित्राने एक गोष्ट सांगितली. त्यानेही ती ऐकली होती. एका तळयाकाठी शंभर माकडे बसली होती , ती रताळी खात होती. रताळयाला लागलेल्या मातीसह माकडे ती खात होती. चुकून एका माकडिणीच्या हातून रताळे तळयात पडले. तिने ते उचलले तेव्हा ते पाण्याने स्वच्छ झाले होते. माकडिणीला स्वच्छ रताळयाची चव आवडली. तिने दुसरे रताळे स्वत:च पाण्यात टाकले. स्वच्छ झाल्यावर चवीने खाल्ले. तिचा आविर्भाव पाहून दुस-या माकडिणीने रताळे पाण्यात टाकले. तिलाही चव आवडली. तिने सगळी रताळी धुऊन खाल्ली.
हळूहळू तिसरे , चौथे व पाचवे माकड पहिल्या दोन माकडिणींना बघून पाण्यात रताळी टाकून स्वच्छ करून खाऊ लागले. इतर माकडांनीही त्यांचे अनुकरण केले. हळूहळू करत शंभराव्या माकडाने रताळे धुऊन खाल्ले , तेव्हा चमत्कार झाला. त्या बेटावरील सर्व माकडे रताळे धुऊन खाऊ लागली. ज्या माकडांनी पहिल्या शंभर माकडांना रताळे धुताना पाहिले नव्हते , त्यांनाही ही सवय लागली. काही आठवडयांनी इतर बेटांवरील माकडेही रताळे धुऊन खाऊ लागली. काही महिन्यांत ही नवीन सवय संपूर्ण प्रदेशभर पसरली व माकडांची रताळे खाण्याची पध्दत कायमची बदलली. घाणेरडी रताळी व अस्वच्छ राजकारण आणि घोटाळयाचे अर्थकारण यांत फरक नाही. आपल्याला त्यांची जणू सवय झाली आहे. काहीजणांनी ती नाकारली , तर हळूहळू ही सवय सर्वत्र पसरेल.
जगात सर्वत्र रचनात्मक बदल होणे शक्य आहे. तुर्कस्तान , मलेशिया , सिंगापूरसारख्या देशांत ते अल्पावधीत झाले आहेत. त्यासाठी रक्तरंजित क्रांतीची , पैशाच्या पाठबळाची गरज नाही. नागरिकांनी स्वत: स्वच्छतेपासून अनेक कार्यक्रम राबवले. भ्रष्टाचारी , सरंजामी व कुचकामी राजकीय नेत्यांवर पोकळ टीका करण्यापेक्षा आपण त्याबाबत किती दक्ष आहोत , हे राजकारण्यांना प्रत्यक्ष दाखवून दिले पाहिजे व राजकारण्यांना त्यांच्या विश्वासार्हतेबाबत जाब विचारला पाहिजे. असे प्रत्येकजण करू लागला , तर समाज बदलू शकतो. हा विचारही दूध पिणा-या गणपतीप्रमाणे एका दिवसात जगभर पसरू शकतो. तो विचार पसरला व नागरिक कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या मागे उभे राहिले , तर फरक पडू शकतो.
संत रामदासांनी म्हटले आहे की , ' केल्याने होत आहे रे , आधी केलेची पाहिजे. ' आपल्याला प्रथम आपले मन कुठे भरकटले आहे ते तपासून ठिकाणावर आणले पाहिजे. त्यासाठी काही प्रयोग करणे आवश्यक आहे. वेद , उपनिषदे , गीता , कौटिलीय अर्थशास्त्र या भारतातील ग्रंथांनी तत्कालीन ग्रीक व चिनी तत्त्वज्ञानाच्या जोडीने आधुनिक तत्त्वज्ञानाचा पाया घातला. आपणास त्यातून राजकीय व सामाजिक तत्त्वे शिकता येतील. किंबहुना त्याची अधिक गरज आहे. मागच्या पाचशे वर्षांत हॉब्स , लॉक , रूसो , कांट , रसेल यांनी ही तात्त्विक चर्चा पुढे नेली. आपली फारशी वैचारिक प्रगतीझाली नाही. त्यामुळे जगातील राजकीय व सामाजिक आदर्श आपण कसे अमलात आणू शकतो , याचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. वेदांना विसरून मार्क्सला मिठी मारायची , आर्यभटला विसरून कोपर्निकसची पूजा करायची , कौटिल्यास बाजूला ठेवून केन्सकडून धडे घ्यायचे - ही सर्व वागणूक आपल्यात राष्ट्रीय आत्मविश्वास नसण्याची चिन्हे आहेत. पण त्याचबरोबर तीन हजार वर्षांपूर्वीच्या प्रगतीची बढाई मारून आधुनिक ज्ञानाकडे पाठ फिरवणेसुध्दा मूर्खपणाचे आहे. एकविसाव्या शतकातला भारत हा पूर्व व पश्चिम दोन्हीकडच्या उचित तत्त्वांवर आधारित मार्गक्रमण करणारा असला पहिजे.
आपला सर्वांगीण व सर्वसमावेशक विकास होण्यासाठी जबाबदार राजकीय नेतृत्व मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी जनतेने पुढाकार घेऊन नेते घडवले पाहिजेत. त्यासाठी पक्षांची कुटुंबशाही व पारंपारिक राजकीय पध्दती झिडकारली पाहिजे. बदल आणताना हिंसेने काहीही साध्य होत नाही , हे लक्षात ठेवले पाहिजे. परिवर्तन म्हणजे सर्वच जुने मोडकळीस काढणे हेही चुकीचे आहे. हजारो अथवा किमान शेकडो वर्षे सामाजिक संस्था अखंडितपणे सुरळीत कार्यरत ठेवून त्यात सकारात्मक बदल करण्याची कला आपण शिकली पाहिजे. बेरजेचे राजकारण व अर्थकारण केले पाहिजे. आत्मविश्वास व चांगली मूल्ये यांच्या जोरावर दुराग्रही शक्तींना नमवले पाहिजे. आयुष्याचे मूल्यमापन यश किंवा अपयश याच्यावर न करता इष्ट की अनिष्ट या निकषांवर केले पाहिजे. त्यातून आपल्याला एक दिशा सापडेल.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा