शुक्रवार, १७ एप्रिल, २००९

शिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा

दि. २९ मे १६७४ यादिवशी सकाळी महाराजांची मुंज करण्यात आली. म्हणजेच त्या महान विश्वामित्रप्रणित गायत्री मंत्राचा अधिकार संस्कारपूर्वक ' बटु ' स देण्यात आला. मुंजबटु ४४ वर्षांचा होता! महाराजांची यापूवीर्च आठ लग्ने झाली होती. त्यांना सहा मुली , दोन पुत्र आणि मुलींकडून काही नातवंडेही होती. इतका सगळा संसार झाला होता.

फक्त मुंज राहिली होती. साडेतीनशे वर्षांपूवीर्पासून स्वातंत्र्य हरपल्यामुळे महाराष्ट्रातील क्षत्रिय घराण्यांचेही अनेक मोलाचे पवित्र धामिर्क संस्कार लुप्त झाले होते. वास्तविक महाराजांचे भोसले घराणे अशाच थोर राजघराण्यांपैकीच क्षत्रिय कुलावतांस होते. त्यांच्या घराण्याला ' राजा ' ही क्षत्रिय पदवी परंपरेनी चालूच होती. महाराजांचे पणजोबा बाबाजीराजे भोसले यांनाही कागदोपत्रीसुद्धा राजे हीच पदवी वापरली जात होती. भोसले नातेसंबंध फलटणच्या पवार कुलोत्पन्न नाईक निंबाळकर या ज्येष्ठ राजघराण्याशी आणि जाधवराव आदि उच्चकुलीन क्षत्रिय घराण्यांशीही होते.

परंपरेने असे मानले जात होते की , हे भोसले घराणे चितोडच्या सिसोदिया घराण्याचीच एक शाखा महाराष्ट्रात आली , त्यातीलच ते आहे. स्वत: महाराजही तसेच म्हणत असत. पुढच्या काळात छत्रपती शाहू महाराजांना दत्तक पुत्र घेण्याची वेळ आली , त्यावेळी चितोडच्याच राजघराण्यातील एका मुलाला छत्रपती शाहू महाराजांच्या मांडीवर दत्तक द्यावयाचा विचार चालू होता. याचा अर्थच असा , की त्यावेळी चितोड महाराणा सिसोदिया घराणे आणि छत्रपतींचे भोसले राजघराणे हे एकाच रक्ताचे आहे हे मान्य होते.

मुद्दा असा , की शिवाजीमहाराज हे कुलपरंपरेनेच क्षत्रिय कुलावतांस होते. त्यांना धर्मशास्त्राप्रमाणेही वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करण्याचा अधिकार होता. सर्वात महत्त्वाचा मुद्दा तर असाच ठरावा की , आयुष्यभर हातात तलवार घेऊन ज्याने रयतेचे रक्षण , पालनपोषण आणि स्वातंत्र्य हेच व्रत आचरिले , धर्म , संस्कृती आणि अस्मिता यांच्याकरिता रक्त आणि स्वेद सतत गाळले असा महापुरुष कोणत्याही जातीधर्मात जन्माला आला , तरीही तो क्षत्रिय कुलावंतांसच की! नाही का ?

मुंजीनंतर लग्न! शास्त्राप्रमाणे लग्नाचा विधी आता करणे आवश्यकच होते. येथे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे , की यावेळी जर महाराजांनी आणखी एक नवे कोरे लग्न करावयाचे ठरविले असते , तर महाराष्ट्रातील कोणत्याही क्षत्रिय कुलावतांस घराण्यातील आईबापांनी आपली मुलगी महाराजांना वधू म्हणून दिलीच असती. पण तत्कालीन बालविवाह पद्धतीमुळे कोणत्याही नवऱ्यामुलीचे वय सात आठ नऊ फारतर दहा वर्षाचे असावयाचे.

महाराजांचे वय यावेळी ४४ होते. म्हणजे नव्या लग्नातील अशा बालिकेशी महाराजांनी लग्न करावयाची वेळ येणार. महाराजांच्या विवेकी मनाला हा जरठ कुमारी विवाह पटणे कधी शक्यच नव्हते. मुंजीनंतर लग्न झालेच पाहिजे हे राज्याभिषेकाकरिता आवश्यकच होते. पण मग आता ? महाराजांनी आणि शास्त्रीमंडळींनी यावर तोड काढली. ती म्हणजे राणी सोयराबाईसाहेब यांच्याशीच पुन्हा विवाह करावयाचा. म्हणजे विवाहसंस्कार करावयाचा. यावेळी सोयराबाईसाहेबांचा राजारामराजे हा पुत्र चार वर्षाचा झालेला होता!

सोयराबाईसाहेबांशी महाराजांचे दि. ३० मे रोजी लग्न करण्यात आले. पुतळाबाईसाहेब आणि सकवारबाईसाहेब या महाराजांच्या राण्यांशीही असेच विधीपूर्वक विवाह करण्यात आले. या एकूण मुंज आणि लग्न प्रकरणातून महाराजांचे जे विवेकी , सुसंस्कृत आणि सामाजिक मन दिसून येते , त्याचा आपण कधी विचार करतो का ? पुरोगामी सुधारणा तावातावाने मांडणारी मंडळीही बहुदा , निदान अनेकदा नेमके उलटे आचरण करताना आजच्या काळातही दिसतात. हे पाहिले की , शिवाजीमहाराजांच्या जोडीला विचाराप्रमाणेच सामाजिक आचरण करणारे म. फुले अन् अण्णासाहेब कवेर् यांच्यापुढे आपली मान आदराने लवते. ज्या काळात दलितांची सावलीही आम्हाला आगीसारखी झोंबत होती , अशा काळात ज्योतिबांनी आपल्या स्वत:च्या घरातील पिण्याच्या पाण्याचा पाणवठा दलितांना अन् सर्वांनाच मुक्त केला हेाता. आजच्याकाळात ही गोष्ट तुम्हाआम्हाला किरकोळच वाटेल. पण त्या काळात ती प्रक्षोभक होती.

इथेच एक गोष्ट सांगितली पाहिजे की , तत्कालीन रिवाजाप्रमाणे अनेकजणांच्या जनानखान्यात नाटकशाळा असतच. नाटकशाळा म्हणजे रखेली. पण महाराजांच्या राणीवंशात अशी एकही नाटकशाळा नव्हती. असती तरी कोणीही त्यांना दोष दिला नसता. पण नव्हतीच. या गोष्टीचाही आपण विचार केला पाहिजे. महाराजांची जी लग्ने झाली. (एकूण आठ) त्यातील सईबाईसाहेब आणि सोयराबाईसाहेब यांच्या पुढची सहा लग्ने ' पोलिटिकल मॅरेजेस ' असावीत असे दिसते.

उत्तरकालीन एका शिवादिग्विजय नावाच्या बखरीत ( लेखनकाल इ. १८१३ ) महाराजांच्या उपस्त्रिया म्हणून मनोहरबाई आणि मनसंतोषबाई अशी दोन नावे आलेली आहेत. त्याला समकालीन अस्सल कागदपत्रांचा अजिबात पुरावा नाही.

दि. ४ जून १६७४ या दिवशी महाराजांची सुवर्णतुळा करण्यात आली. यावेळी महाराजांचे वजन किती भरले हे हेन्री ऑक्झिंडेन या इंग्रज वकीलाने लिहून ठेवले आहे. १६० पौंड वजन भरले. हेन्रीने नक्कीच विचारणा करून ही नोंद केलेली आहे. आमच्यापैकी कोणीही अशी अन् अशाप्रकारची नोंद केलेली नाही येथेच त्यांच्या आमच्यातला फरक लक्षात येतो.

सोन्याप्रमाणेच इतर २३ पदार्थांनी महाराजांची तुळा करण्यात आली. याला ' तुलापुरुषदान ' असे म्हणतात. सोळा महा दानांपैकी हे तुलापुरुषदान आहे. हे सर्व नंतर सत्पात्र लोकांना दान म्हणून वाटून टाकावयाचे असते. तसे केले.

सुवर्णतुळेत महाराजांचे वजन १६० पैंड भरले , म्हणून हेन्रीने नोंदविले आहे. पण अभ्यासानंतर असे वाटते की , महाराजांचे वजन १६० पेक्षा कमी असावे. कारण महाराजांच्या अंगावर अलंकार आणि वस्त्रे होती. हातापायांत सोन्याचे तोडे होते. कमरेला शस्त्र म्हणजे तलवार आणि कट्यार असणारच. उजव्या हातात श्रीविष्णुची सोन्याची मूतीर् असणारच. या सर्वांचे वजन वजा करावे लागेल. असे वाटते की , ही वजाबाकी केली , तर महाराजांचे वजन सुमारे १४५ पौंड असावे. सोन्याच्या पारड्यात महाराजांचे शिवराई होन तुळेसाठी घातले होते. एका होनाचे वजन सामान्यत: अडीच ग्रॅम होते. त्यावरून हेन्रीने कॅल्क्युलेशन केले असावे. अन्य धामिर्क विधी चालूच होते. प्रत्यक्ष अभिषेक आणि नंतर राऱ्यारोहण होणार होते , दोन दिवसांनी दि. ६ जून १६७४ .
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला

इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झिंडेन मुंबईहून रायगडास येण्यास निघाला. तो दि. १३ मे रोजी कोरलई जवळच्या आगरकोट या पोर्तुगीज ठाण्यात येऊन पोहोचला. त्याचेबरोबर आठ माणसे होती. त्यात एक श्यामजी नावाचा गुजराथी व्यापारी होता. राज्याभिषेकाचा मुहूर्त होता दि. ६ जून १६७४ . म्हणजे हेन्री खूपच लौकर निघाला होता का ? कारण त्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारीहिताची काही कामे शिवाजी महाराजांकडून मंजुरी मिळवून करावयाची होती.

हेन्री आगरकोटला दि. १३ मे रोजी दिवस मावळताना पोहोचला , तेव्हा आगरकोटाला असलेले प्रवेशद्वार म्हणजे वेस बंद झालेली होती. रहदारी बंद! हेन्रीला मुद्दाम ही वेस उघडून आत घेण्यात आले. तेव्हा त्याने आगरकोटच्या पोर्तुगीज डेप्युटी गव्हर्नरला सहज विचारले , की ' अजून दिवस पूर्ण मावळला नाही. तरीही आपण वेशीचे दरवाजे बंद का करता ? त्यावर डे. गव्हर्नरने उत्तर दिले की , ' अहो , तशी काळजी आम्हाला घ्यावीच लागते. कारण तो शिवाजी केव्हा आमच्यावर झडप घालील अन् आगरकोटात शिरेल याचा नेम नाही. म्हणून आम्ही ही दक्षता घेतो. ' यातच शिवाजी महाराजांचा दरारा आणि दहशत केवढी होती हे व्यक्त होते.

नंतर हेन्री रायगडावर पाचाड या छोट्या गावी येऊन पोहोचला. रायगडच्या निम्म्या डोंगरावर हे पाचाड गाव आहे. हेन्रीची उतरण्याची व्यवस्था रामचंद निलकंठ अमात्य यांनी तेथे केली होती. दि. १९ मे १६७४ या दिवशीची ही गोष्ट. हेन्रीने मराठी अधिकाऱ्यांस विचारले की , ' शिवाजीराजे यांना लौकर भेटावयाचे आहे. पुढे राज्याभिषेकाच्या गदीर्त ते जमणार नाही. तरी ते आम्हांस केव्हा भेटू शकतील ?' त्यावर अधिकाऱ्याने उत्तर दिले की , ' महाराज प्रतापगडावर श्रीभवानी देवीच्या दर्शनासाठी निघाले आहेत. चार दिवसांनी परततील. भेटतील. '

खरोखरच महाराज पालखीतून गडावरून प्रतापगडाकडे निघाले होते. राज्याभिषेकापूवीर् श्रीभवानी देवीचे दर्शन घेऊन तिला सुवर्णछत्र आणि अलंकार अर्पण करण्यासाठी महाराज प्रतापगडास गेले. दि. २१ रोजी त्यांनी श्रींची यशासांग महापूजा केली. विश्वनाथभट्ट हडप यांनी पूजाविधी समंत्र केला. श्रीदेवीस सोन्याचे छत्र आणि अत्यंत मौल्यवान असे अलंकार महाराजांनी अर्पण केले.

महाराज दि. २२ मे रोजी रायगडास परतले. हेन्री वकील वाटच पाहात होता. त्याच्याबरोबर नारायण शेवणी सुखटणकर हा दुभाषा वकील आलेला होता. आधी ठरवून हेन्री महाराजांचे भेटीस गेला. त्याने व्यापारविषयक सतरा कलमांचा एक मसुदा अमात्यांच्या हस्ते महाराजांस सादर केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या काही मागण्या विनंतीच्या शब्दात त्यात होत्या. त्यात शेवटचे कलम असे होते की , ईस्ट इंडिया कंपनीची नाणी मराठी राज्यातही चालावीत! महाराजांनी हे नेमके कलम ताबडतोब नामंजूर केले. त्यांची सावधता आणि दक्षता येथे चटकन दिसून येते. बाकीची कलमे थोड्याफार फरकाने त्यांनी मंजूर केली.

हेन्री डायरी लिहीत होता. त्याने आगरकोटपासून पुढे रायगडावर झालेल्या आणि पाहिलेल्या राज्याभिषेकापर्यंत जेजे घडलेले पाहिलेले ते डायरीत लिहून ठेवले आहे. ही डायरी सध्या लंडनच्या इंडिया ऑफिस लायब्ररीत मला पाहावयास मिळाली. त्या डायरीत हेन्रीची साक्षेपी दृष्टी दिसून येते.

रायगड आणि पाचाड पाहुण्यांनी फुलू लागला. पाचाडास महाराजांनी एक मोठा भुईकोट वाडा बांधलेला होता तो मुख्यत: जिजाऊसाहेबांसाठी होता. या वेळी जिजाऊसाहेब खूपच थकलेल्या होत्या. त्यांची सर्व आस्था आणि व्यवस्था पाहण्यासाठी नारायण त्र्यंबक पिंगळे या नावाचा अधिकारी नेमलेला होता. राज्याभिषेक सोहाळ्यासाठी अर्थातच जिजाऊसाहेबांचा मुक्काम रायगडावरील वाड्यात होता.

हे दिवस ज्येष्ठाच्या प्रारंभीचे होते. अधूनमधून पाऊस पडतही होता. त्याच्या नोंदी आहेत. वैशाखात इंग्रजांचे इतर दोन वकील रायगडावर महाराजांच्या भेटीस येऊन गेले होते. त्यावेळी पावसाने त्यांना चांगलेच गाठले. त्या वकीलांच्या बाबतीत घडलेली एक गोष्ट सांगतो. ते वकील बोलणी करण्याकरता जेव्हा मुंबईहून रायगडावर येण्यास निघाले , तेव्हा मुंबईच्या इंग्रज डेप्युटी गव्हर्नरने वाटेवरच त्यांना एक लेखी निरोप पाठविला की , ' त्या शिवाजीराजाशी अतिशय सावधपणाने बोला. ' इंग्रजांची शिवाजीमहाराजांच्या बाबतीतली ही दक्षता फारच लक्षवेधी आहे नाही!

रायगडावरील धामिर्क विधींना लवकरच प्रारंभ झाला. श्रीप्राणप्रतिष्ठा आणि नांदीश्राद्ध इत्यादी विधी सुरू झाले. गागाभट्ट आवश्यक तेथे मार्गदर्शन करत होते. कुलउपाध्याय राजोपाध्ये मुख्य पौरोहित्य करीत होते. यावेळी निश्चलपुरी गोसावी हेही आपल्या शिष्यगणांसह गडावर होते. त्यांनी पूवीर्पासून केेलेल्या अपशकुनविषयक सूचना महाराजांनी शांतपणे ऐकून घेतल्या पण ठरविलेल्या संस्कारविधींत बदल केला नाही. अपशकुन वगैरे कल्पनांवर महाराजांचा विश्वासच नव्हता. ते अंधश्रद्ध नव्हते.

हेन्री ऑक्झिंडेन आपल्या डायरीत सर्व सोहाळ्याचे वर्णन विचारपूस करून लिहीत होता. डच प्रतिनिधी इलियड यानेही काही लिहिलेले सापडले आहे. पण आमच्या मंडळींनी या अलौकिक महत्त्वाच्या ऐतिहासिक सोहाळ्याचे यथासांग वर्णन करून ठेवलेले नाही. निदान अद्यापतरी तसे सापडलेले नाही. लौकरच महाराजांची मुंज होणार होती! या वेळी महाराजांचे वय ४४ वर्षांचे होते.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १४३ रायगड राजसाज सजला

रायगडावर राज्यभिषेकाची तयारी अत्यंत योजनाबद्ध आणि शिस्तबद्ध रीतीने सुरू होती. गागाभट्ट हे महापंडित राज्यभिषेक विधीचे प्रमुख अध्वर्यू होते. पण राजघराण्याचे धामिर्क विधीसंस्कार करण्याचे काम भोसल्यांचे कुलोपाध्याय आणि राजोपाध्याय आवीर्कर यांचेच होते. सर्व विधी या बाळंभट्ट राजोपाध्याय यांनीच उपाध्याय या नात्याने केले. मार्गदर्शक होते , गागाभट्ट. गागाभट्टांनी या सर्व राजसंस्कारांची एक लिखित संहिता संस्कृतमध्ये गंथरूपाने तयार केली. या गंथाचे नाव ' राजाभिषेक प्रयोग. '

या ' राजाभिषेक प्रयोग ' या हस्तलिखित गंथाची एक प्रत बिकानेरच्या ( राजस्थान) अनुप संस्कृत गंथालयात पाहावयास मिळाली. हीच प्रत प्रत्यक्ष गागाभट्टांच्या हातची मूळ प्रत असावी , असा तर्क आहे. प्रत्येक विधी कसा आणि केव्हा करावयाचा याचा तो तपशीलवार आराखडा आहे.

सुपारीपासून हत्तीपर्यंत आणि हळकुंडापासून होमकुंडापर्यंत , तसेच दर्भासनापासून सिंहासनापर्यंत सर्व गोष्टी दक्षतापूर्वक सिद्ध होत होत्या. ती ती कामे त्या त्या अधिकारी व्यक्तींवर सोपविण्यात आली होती. सोन्याचे बत्तीस मण वजनाचे सिंहासन तयार करण्याचे काम पोलादपूरच्या (जि. रायगड) रामाजी दत्तो चित्रे या अत्यंत विश्वासू जामदाराकडे सोपविले होते. जामदार म्हणजे सोने चांदी आणि जडजवाहीर याचा खजिना सांभाळणारा अधिकारी. अत्यंत मौल्यवान अगणित नवरत्ने सिंहासनावर जडवून , अनेक सांस्कृतिक शुभचिन्हेही त्यावर कोरावयाची होती. सोन्याची इतर राजचिन्हेही तयार होऊ लागली.

चारही दिशांना राजगडावरून माणसे रवाना झाली. सप्तगंगांची आणि पूर्व , पश्चिम आणि दक्षिण समुदांची उदके आणण्यासाठी कलश घेऊन माणसे मागीर् लागली होती. हे पाणी कशाकरता ? रायगडावर काय पाण्याला तोटा होता ? अन् सप्तगंगांचं उदक आणि रायगडावरचं तळ्यातील पाणी काय वेगळं होतं ? शेवटी सारं ।।२ह्र च ना ? मग इतक्या लांबलांबच्या नद्यांचं पाणी आणण्याचा खटाटोप कशासाठी ? अशासाठी की , हा देवदेवतांचा आणि ऋषीमुनींचा प्राचीनतम भारतदेश एक आहे. या सर्व गंगा आमच्या माता आहेत. प्रातिनिधिक रूपाने त्या रायगडावर येऊन आपल्या सुपुत्राला अभिषेक करणार आहेत , हा त्यातील मंगलतम आणि राष्ट्रीय अर्थ.

विख्यात तीर्थक्षेत्रांतील देवदेवतांनाही निमंत्रणपत्रे जाणार होती. ती गेली. विजापूर , गोवळकोंड , मुंबईकर इंग्रज , जंजिरेकर सिद्दी , गोवेकर फिरंगी आणि औरंगजेब यांना निमंत्रण गेली असतील का ? रिवाजाप्रमाणे गेलीच असतील असे वाटते. पण एका इंग्रजाशिवाय आणि एका डच वकिलाशिवाय या राज्याभिषेकाला अन्य कुणाचे प्रतिनिधी वा पत्रे आल्याचा एकही पुरावा अद्याप मिळालेला नाही. पण निमंत्रणे गेलीच असतील. इंग्रजांचा वकील हेन्री ऑग्झिंडेन आणि वेंगुलेर्कर डच वखारींचा प्रतिनिधी इलियड हे राज्यभिषेकास हजरच होते.

पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त आणि बडवे असलेले प्रल्हाद शिवाजी बडवेपाटील यांनाही एक पत्र गेले होते. ते पत्र या बडवे घराण्यात जपून ठेवलेले होते. पण त्यांच्या वंशजांनी ते पत्र एका इतिहास संशोधकास अभ्यासासाठी विश्वासाने दिले ते पत्र गहाळ झाले. काय बोलावे ?

अभिषेकाकरिता सोन्याचे , चांदीचे , तांब्याचे आणि मृत्तिकेचे अनेक कलश तयार करण्यात आले. ते शतछिदान्वित होते. म्हणजे शंभर शंभर छिदे असलेले होते. पंचामृत आणि गंगोदके यांनी या कलशातून महाराजांवर अभिषेक व्हावयाचा होता. प्राचीनतम भारतीय संस्कृतीचा , परंपरेचा आणि अस्मितेचा आविष्कार साक्षात डोळ्यांनी पाहण्याचे आणि कानांनी ऐकण्याचे भाग्य स्वराज्याला साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर रायगडावर लाभणार होते. विद्वानांना आणि कलावंतांना राज्याभिषेकाच्या राजसभेत शूर सरदारांच्या इतकेच मानाचे स्थान होते. गाणारे , नाचणारे , वाद्ये वाजविणारे कलाकार याकरिता गडावर आले आणि येत होते. स्वत्त्वाचा आविष्कार प्रकट करणाऱ्या अनेक गोष्टी यानिमित्ताने रायगडावर चालू होत्या. छत्रपतींच्या नावाची सोन्याची आणि तांब्याची नाणी पाडली जात होती. रघुनाथपंडित अमात्य आणि धुंडिराज व्यास या विद्वानांना राज्यव्यवहार कोश म्हणजेच राज्यव्यवहारात आपल्याच भाषेत शब्द देऊन त्याची एक प्रकारे ' डिक्शनरी ' तयार करण्याचे काम सांगितले होते. इ. १९४७ मध्ये आपण स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान पं. नेहरू यांनीही डॉ. रघुवीरसिंग या पंडितांना पदनामकोश म्हणजेच भारतीय शब्दात राज्यव्यवहाराची डिक्शनरी तयार करण्याचे काम सांगितले आणि त्यांनी केले , हे आपणास माहीतच आहे. शिवकालीन राज्यव्यवहार कोशातील हे शब्द पाहा. मुजुमदार हा फासीर् शब्द त्याला प्रतिशब्द दिला अमात्य , सुरनीसाला म्हटले पंतसचिव. सरनौबताला म्हटले सरसेनापती , इत्यादी.

राजमुदा होती तीच ठेवली. ' प्रतिपश्चंदलेखेव... ' या वेळी एक नवीन राजमुदा तयार करण्यात आली होती ; मात्र ती कधीही पुढे वापरली गेली नाही.

या निमित्ताने राजसभा आणि अन्य जरूर ती बांधकामे हिराजी इंदुलकर यांनी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे सिद्ध केली. राजदुंदुभीगृह म्हणजे नगारखाना , भव्य आणि सुंदर उभा राहिला. आजही तो उभा आहे.

अनेक राजचिन्हे सिद्ध झाली. सोन्याच्या सुंदर दंडावर तराजू , सोन्याचा मासा , ध्वज , नक्षत्रमाळा , अश्वपुच्छ , राजदंड , अब्दागिऱ्या , मोचेर्ले , चवऱ्या , पंखे , कलमदान , सोन्याचे हातापायातील तोडे , जडावाचे कमरपट्टे इत्यादींचा जिन्नसखाना तयार झाला. यातील सोन्याचा मासा लावलेल्या राजचिन्हाला म्हणत माहीमरातब. स्वराज्याची सत्ता समुदावरही आहे याचे हे प्रतीकचिन्ह. या सर्व चिन्हांत मुख्य होते राजसिंहासन. ते उत्कृष्ट प्रकारे रामाजी दत्तो चित्रे यांनी कुशल सोनारांकडून तयार करवून घेतले होते. त्याला दोन सिंह होते. चार पाय होते. एक चरणासन होते. सिंहासनावर आठ सुबक खांबांची मेघडंबरी होती. छत्रपतीपदाचे मुख्य चिन्ह म्हणजे छत्र. तेही सुवर्णदंडाचे आणि झालरदार कनातीचे होते.

यानिमित्ताने एक नवे बिरुद म्हणजे पदवी महाराजांनी धारण केली. ती म्हणजे क्षत्रिय कुलावतांस. राजाची पदवी ही राष्ट्राचीच पदवी असते. हे हिंदवी स्वराज्याच क्षत्रिय कुलावतांस आहे हाच याचा आशय होता. चाणक्याचे वेळी नंद राजघराणे पूर्णपणे संपले. त्यातूनच एक विक्षिप्त कल्पना रूढ झाली , की भारतात आता कुणीही क्षत्रिय उरला नाही. उरले फक्त त्रैवणिर्क. ही कल्पना जितकी चुकीची होती , तितकीच राष्ट्रघातकीही होती. महाराजांनी आवर्जून ही क्षत्रिय कुलावतांस पदवी स्वीकारली ती , एवढ्याकरता की , हे राष्ट्र क्षत्रियांच्या तेजामुळे अजिंक्य आहे. किंबहुना या राष्ट्रातील प्रत्येकजण राष्ट्रासाठी शस्त्रधारी सैनिकच आहे. एका अर्वाचीन विद्वानाने या आशयाची दोन ओळीची कविता लिहिली.

स्वातंत्र्येण स्वधमेर्ण नित्यं शस्त्रच्छ जीवनम्
राष्ट्रभ्भवनोन्मुखताचा सौ महाराष्ट्रस्य संस्कृती:।
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या निदान पहिल्या दोन पिढ्यांना उपभोगी , सुखवस्तू जीवन जगण्यास अवधीच मिळणार नाही. याच दृष्टीने शिवकालीन हिंदवी स्वराज्याची पहिली पन्नास वर्षे कशी गेली , याची बेरीज वजाबाकी योग्य तुलनेने आपण केली पाहिजे. आजच्या आपल्या स्वराज्याची गेल्या पन्नास वर्षांत सर्वच क्षेत्रात प्रगती निश्चित झाली आहे. पण गती मात्र कमी पडली , अन् पडत आहे हेही उघड आहे. याकरता इतिहासाचा अभ्यास आणि उपयोग केला पाहिजे. अशा अभ्यासासाठी शिवकाळात साधने फारच कमी होती. दळणवळण तर फारच अवघड होते. महाराजांची मानसिकता सूक्ष्मपणे लक्षात घेतली , तर असे वाटते की , युरोपीय प्रगत वैज्ञानिक देशांचा अभ्यास करण्यासाठी महाराजांनी आपली माणसे नक्की पाठविली असती. हा तर्क मी साधार करीत आहे. पाहा पटतो का! मराठी आरमार युरोपियनांच्या आरमारापेक्षाही सुसज्ज आणि बलाढ्य असावे असा त्यांचा सतत जागता प्रयत्न दिसून येतो. माझ्या तर्कातील हा एक महत्त्वाचा टप्पा.

राज्याभिषेकाची तयारी रायगडावर सुरू झाली. हो , तयारी सुमारे वर्षभर आधी सुरू झाली. याच काळात पण प्रारंभी एक प्रकरण घडले. एक अध्यात्ममार्गी सत्पुरुष रायगडावरती आले. ते स्वत: होऊन आलेले दिसतात. त्यांना महाराजांनी मुद्दाम बोलावून घेतलेले दिसत नाही. यांचे नाव निश्चलपुरी गोसावी. त्यांच्याबरोबर थोडाफार शिष्यसमुदायही होता. त्यात गोविंदभट्ट बवेर् या नावाचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेले शिष्यही होते. त्यांनी राज्याभिषेकपूर्व रायगडावरील निश्चलपुरी गोसावी यांचे वास्तव्य आणि त्यात घडलेल्या घटना एक गंथ संस्कृतमध्ये लिहून नमूद केल्या आहेत. या ग्रंथाचे नाव , ' राज्याभिषेक कल्पतरू. '

रायगडावर आल्यावर निश्चलपुरींना दिसून आले की , गागाभट्टांच्या मार्गदर्शनाखाली राज्याभिषेकाची तयारी चालू आहे. हे निश्चलपुरी स्वत: पारमाथिर्क साधक होते. ते तांत्रिक होते. म्हणजे मंत्र , तंत्र , उतारे , पशु बलिदान इत्यादी मार्गांनी त्यांची तांत्रिक योगसाधना असे. त्यांच्या मनांत एक कल्पना अशी आली की , शिवाजी महाराजांनी आपला संकल्पित राज्याभिषेक हा वैदिक पद्धतीने करून घेऊ नये , तर तो तांत्रिक पद्धतीने करून घ्यावा.

महाराज , राज्योपाध्ये बाळंभट्ट आवीर्कर आणि वेदमूतीर् गागाभट्ट यांच्या मनात सहज स्वाभाविक विचार होता की , प्राचीन काळापासून परंपरेने रघुराजा , प्रभू रामचंद , युधिष्ठिर इत्यादी महान राजपुरुषांना , महान ऋषीमुनींनी ज्या वैदिक पद्धतीने राज्याभिषेक केले , त्याच परंपरेप्रमाणे राजगडावरील हा राज्याभिषेक सोहाळा व्हावा. पण निश्चलपुरींना हे मान्य नव्हते. त्यांनी महाराजांना सतत आग्रहाने म्हटले की , ' मी सांगतो त्याच पद्धतीने म्हणजेच तांत्रिक पद्धतीने तुम्ही राज्याभिषेक करून घ्या. '

महाराजांना हे उगीचच धर्मसंकट पुढे आले. पण वाद न घालता महाराजांनी यात अगदी शांत , विचारी भूमिका ठेवली. प्राचीन पुण्यश्लोकराजपुरुषांचा आणि तपस्वी ऋषींचा मार्ग अवलंबायाचा की , हा तांत्रिक मार्ग स्वीकारावयाचा हा प्रश्ान् त्यांच्यापुढे होता.

महाराजांनी गागाभट्टांच्या प्राचीन वैदिक परंपरेप्रमाणेच हा राज्याभिषेकाचा राज्यसंस्कार स्वीकारावयाचे ठरविले. पण या सुमारे सात आठ महिन्यांच्या कालखंडात त्यांनी निश्चलपुरींचा थोडासुद्धा अवमान केला नाही. अतिशय आदरानेच ते त्यांच्याशी वागले. याच कालखंडात प्रतापराव गुजर सरसेनापती यांचा नेसरीच्या खिंडीत युद्धात मृत्यू घडला.( दि. २४ फेब्रु. १६७४ ) महाराज अतिशय दु:खी झाले. निश्चलपुरी महाराजांना म्हणाले , ' महाराज , ही घटना म्हणजे नियतीने तुम्हाला दिलेला इशारा आहे. सरसेनापतीचा मृत्यु म्हणजे अपशकुनच आहे , तरी तुम्ही माझ्याच पद्धतीने हा राज्याभिषेक करा. '

महाराजांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पण तयारी मात्र चालू होती. तशीच चालू ठेवली.

पुढच्याच महिन्यात दि. १९ मार्च १६७४ या दिवशी महाराजांच्या एक राणीसाहेब , काशीबाईसाहेब या अचानक मृत्यू पावल्या. याहीवेळी निश्चलपुरींनी महाराजांना ' हा अपशकुन आहे , अजूनही विचार करा ' असा इशारा दिला , तरीही महाराज शांतच राहिले. पुढे तर किरकोळ अपशकुनांची मालिका त्यांचेकडून महाराजांपुढे येत गेली. एके दिवशी गडावरील राजप्रासादाला मधमाश्यांचे आग्यामोहोळ लागले. हाही त्यांना अपशकुन वाटला. दुसऱ्या एका दिवशी आभाळात पक्ष्यांचा थवा उडत चाललेला पाहून त्यांनी महाराजांना म्हटले की , या मार्गाने हे पक्षी उडत जाणे हे अपशकुनी आहे. अर्थात महाराज मात्र शांतच आणि असेच अपशकुन ते मांडीत राहिले. त्यांनी सांगितलेला शेवटचा अपशकुन असा. एका होमहवनाचे प्रसंगी महाराज होमापुढे बसले होते. मंत्र चालू होते. महाराजांचे राजोपाध्याय बाळंभट्ट हे तेथेच बसले होते. एवढ्यात अचानक वरच्या पटईला ( सिलिंगला) असलेल्या नक्षीतील एक लहानसे लाकडी कमळ निसटले आणि ते राजोपाध्यायांच्या तोंडावरच पडले. त्यांना जरा भोवळ आली. थोडेसे लागले. पण धामिर्क कार्यक्रम चालूच राहिले. निश्चलपुरी महाराजांना म्हणाले की , ' हा अपशकुन आहे. अजूनही विचार करा आणि हे वैदिक सोहळे थांबवून माझ्या सूचनेप्रमाणे सर्व करा. '

पण तरीही महाराज शांतच राहिले. सर्व विधी , संस्कार आणि राज्याभिषेक सोहळा पूर्ण पार पडला. महाराज छत्रपती झाले.

निश्चलपुरी आपल्या मनाप्रमाणे न झाल्यामुळे फारच नाराज झाले आणि नंतर महाराजांना म्हणाले , ' तुम्ही माझे ऐकले नाहीत. हा तुमचा राज्याभिषेक अशास्त्रीय झाला आहे. तुम्हाला लौकरच त्याचे प्रत्यंतर येईल. ' असे म्हणून निश्चलपुरी रायगडावरून निघून गेले. हे प्रकरण आपणापुढे थोडक्यात पण नेमके विषयबद्ध सांगितले आहे. पण आपणही याचा अभ्यास करावा. या विषयावर विस्तृत लेखन केले आहे. समकालीन ' राज्याभिषेक कल्पतरू ' हा गोविंदभट्ट बवेर् यांचा गंथही उपलब्ध आहे. शिवाय अनेकांनी आपापली मते मांडली आहेत. या सर्वांचा आपण अभ्यास करून आपले मत ठरवावे.

महाराजांच्या या प्रकरणातील भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटते ? मला मात्र असे वाटते की , महाराजांच्या मनात निश्चलपुरींनाही नाराज करावयाचे नसावे. प्राचीन परंपरेप्रमाणे राज्याभिषेक करावा आणि नंतर वेगळ्या मुहूर्तावर निश्चलपुरी यांच्या म्हणण्याप्रमाणे तांत्रिक राज्यभिषेकसुद्धा करून टाकावा , असे वाटते. कारण तसा तांत्रिक राज्याभिषेक नंतर दि. २४ सप्टेंबर १६७४ , अश्विन शुुद्ध पंचमी या दिवशी महाराजांनी याच निश्चलपुरींकडून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रायगडावर करवून घेतला. हा तांत्रिक विधी तसा फार थोड्या वेळातच पूर्ण झाला. निश्चलपुरींनाही बरे वाटले. पण दुसऱ्याच दिवशी (दि. २५ सप्टेंबर) प्रतापगडावर आकाशातून वीज कोसळली आणि एक हत्ती आणि काही घोडे या घाताने मरण पावले. यावर निश्चलपुरी काय म्हणाले ते इतिहासाला माहीत नाही. आपणास काय वाटते ?
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय

माणसाला फुकट मिळालं की त्याची किंमत कळत नाही. त्याचा बाजारभाव समजतो , तसंच उपयोग आणि उपभोगही समजतो. पण महत्त्व आणि पावित्र्य समजत नाही. हिंदवी स्वराज्य असे नव्हतेच. कमालीच्या त्यागाने आणि अविश्रांत कष्टाने ते मिळविले गेले होते. मिळवणारी मावळी मंडळी अगदी साधी आणि सामान्य होती. पण त्यांचे मन हनुमंतासारखे होते. छाती फाडली , तर त्यात त्यांचा राजा , राज्य आणि ध्वजच दिसावा. एकेका घरातली एकेक माणसं इषेर्नं आणि हौसेनं कष्टत होती. मरत होती. अशीही असंख्य मावळी घरं होती की , त्या घरातील दोन-दोन किंवा तीन-तीन माणसं अशीच मरत होती. म्हणूनच एक अजिंक्य हिंदवी स्वराज्य एका राष्ट्रपुरुषाने उभे केले.

अजिंक्य स्वराज्य ? होय , अजिंक्य. महाराजांच्या मृत्यूनंतर एक कर्दनकाळ , औरंगजेब आपल्या सर्व सार्मथ्यानिशी हे स्वराज्य गिळायला महाराष्ट्रात उतरला. अखंड पंचवीस वषेर् तो इथे यमदूतासारखा राबत होता. काय झाले त्याचे ? हे स्वराज्य बुडाले का ? नाही. औरंगजेबच बुडाला. मोगली साम्राज्यही बुडण्याच्या मार्गाला लागले. हे कोणामुळे ? कोणाच्या शिकवणुकीमुळे ? हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीमुळेच ना! शिवचरित्रातून तेच शिकावयाचे आहे. नागपूर येथे धनवटे प्रासादावर शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा स्थापन करण्यात आला ; त्यावेळी पं. जवाहरलाल नेहरू म्हणाले की , ' जगाच्या पाठीवर पारतंत्र्यात पडलेल्या एखाद्या राष्ट्राला स्वतंत्र व्हावयाचे असेल आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समर्थ व्हावयाचे असेल , तर त्या राष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवावा. '

हे अक्षरश: खरे आहे जीर्णशीर्ण स्थितीतून , गुलामगिरीतून आपले राष्ट्र स्वतंत्र झाले. ते बलाढ्य करावयाचे असेल , तर आदर्श असावा महाराजांचा.

सतत २७ - २८ वषेर् अविश्रांत श्रम आणि त्याग केल्यानंतरच राज्याभिषेकाचा विचार रायगडावर अंकुरला. या निमिर्तीच्या कालखंडात अत्यंत गरजेची कामे आणि प्रकल्प महाराजांनी हाती घेतलेले दिसतात. भव्य महाल किंवा उपभोगप्रधान अशा कोणत्याही वस्तू- वास्तू निमिर्तीकडे लक्षही दिले नाही. जीर्णशीर्ण अवस्थेतून मराठी मुलुख अति कष्टाने स्वतंत्र होत आहे , आता पहिल्या दोन पिढ्यांना तरी चंगळबाजीपासून हजार पावलं दूरच राहिलं पाहिजे , असा विचार महाराजांच्या कृतीत दिसून येतो. महाराज चंगळबाजीला शत्रूच मानत असावेत. ' आत्ता , या क्षणी स्वराज्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे ' हाच विचार त्यांच्या आचरणात दिसून येतो.

मग राज्याभिषेक करून घेणं , ही चंगळबाजी नव्हती का ? नव्हती. ते कर्तव्यच होते. सार्वभौमत्त्वाची ती महापूजा होती. त्या राज्याभिषेक सोहाळ्याचा परिणाम वर्तमान आणि भावी काळातील सर्व पिढ्यांवर प्रभावाने होणार होता. तो कोणा एका व्यक्तीच्या कौतुकाचा स्तुती सोहळा नव्हता. ते होते स्वातंत्र्याचे सामूहिक गौरवगान. इंदप्रस्थ , चितोड , देवगिरी , कर्णावती , वारंगळ , विजयनगर , द्वारसमुद , पाटलीपुत्र , गोपकपट्टण (गोवा) श्रीनगर आदि सर्व भारतीय स्वराज्यांच्या राजधान्यांवर बंडाची स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणारी फुंकर या रायगडावरील राज्याभिषेकाने पडणार होती. पडावी अशी अपेक्षा होती. बुंदेलखंडातील भंगलेल्या सिंहासनावर आणि चेतलेल्या छत्रसालावर ही फुंकर आधीच पडलीही होती. बुंदलेखंडात एक नवे हिंदवी स्वराज्य आणि सिंहासन उदयाला आले होते.

सिंधू नदीच्या उगमापासून कावेरी नदीच्या पैलतीरापावेतो , म्हणजेच आसेतु हिमाचल हा संपूर्ण देश स्वतंत्र , सार्वभौम , बलशाली व्हावा हे मनोगत महाराजांनी स्वत:च बोलून दाखविले होते ना!

राज्याभिषेकाचा मुहूर्तही ठरला. शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ , शुद्ध त्रयोदशी , आनंदनाम संवत्सर , म्हणजेच ६ जून १६७४ . महाराज राज्याभिषिक्त छत्रपती होणार याच्या वार्ता हळुहळू सर्वत्र पोहोचू लागल्या.

याचवेळी घडलेली एक गंमत सांगतो. कॉस्म- द-गार्द या नावाचा एक पोर्तुगीज कोकणातून भूमार्गाने गोव्याकडे जात होता. त्याला या प्रवासात ही बातमी समजली. मार्गावरती तो एका खेड्याजवळच्या झाडीत विश्रांतीकरता उतरला. भोवतालची मराठी दहापाच खेडुत माणसे सहज गार्दच्या जवळ जमली. एक गोरा फिरंगी आपल्याला दिसतोय , एवढाच त्यात कुतूहलाचा भाग असावा. गार्दने त्या जमलेल्या लोकांना आपल्या मोडक्या तोडक्या भाषेत म्हटले की , ' तुमचा शिवाजीराजा लवकरच सिंहासनावर बसणार आहे , हे तुम्हाला माहिती आहे का ?' ही गोड गोष्ट त्या खेडुतांना प्रथमच समजत होती. पण आपला राजा आता रामाप्रमाणे सिंहासनावर बसणार , एवढे त्यांना नक्कीच उमजले अन् ती माणसं विलक्षण आनंदली. ही एक सूचक कथा मराठी मनाचा कानोसा घेणारी नाही का ? साध्या भोळ्या खेड्यातील माणसांनाही हा राज्याभिषेकाचा आनंद समजला , जाणवला होता.

आपण सार्वभौम , स्वतंत्र स्वराज्याचे प्रजानन आहोत , राज्यकतेर्च आहोत , सेवक आहोत याची जाणीव प्रत्येक लहानमोठ्या वयाच्या माणसाला होण्याची आवश्यकता असतेच. प्रथम हेच कळावे. नंतर कळावे , राष्ट्र म्हणजे काय ? माझे राष्ट्रपती कोण आहेत. पंतप्रधान कोण. माझी राज्यघटना , माझी संसद , माझा राष्ट्रध्वज , माझे राष्ट्रगीत इत्यादी अष्टांग राष्ट्राचा परिचय यथासांग व्हावा. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे अर्वाचीन भरतखंडाचा पहिला स्वातंत्र्यदिन.
-बाबासाहेब पुरंदरे

शनिवार, ११ एप्रिल, २००९

शिवचरित्रमाला भाग १४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी

काशीहून गागाभट्ट नासिकला आले. महाराजांनी त्यांना आणण्याकरिता पालखी पाठविली. दरबारातील चार थोर मंडळी सामोरी पाठविली. सन्मानपूर्वक त्यांना रायगडावर आणण्यात आले. महाराजांनी मधुपर्कपूर्वक या महापंडिताचे गडावर स्वागत केले. त्यांचा मुक्काम गडावर होता. प्रवासात आणि गडावर गागाभट्टांना स्वराज्याचे रूप स्पष्ट दिसत होते. महाराजांनी आपल्या असंख्य कर्तबगार , शूर , निष्ठावंत आणि त्यागी जीवलगांच्या सहकार्याने निर्माण केलेले एक सार्वभौम राष्ट्र जाणत्या मनाला स्पष्ट दिसत होते.

या हिंदवी स्वराज्यात अनेक क्रांतीकारक घटना घडल्या होत्या , घडत होत्या. तेहरानपासून काबूलपर्यंत आणि खैबरपासून दिल्लीपर्यंत मराठी स्वराज्याचा दरारा सुलतानांना हादरे देत होता. दक्षिणेतील पातशाह्या निष्प्रभ झाल्या होत्या. इंग्रज , फिरंगी अन् सिद्दी आपले प्राण कसे वाचवायचे , याच चिंतेने ग्रस्त , पण दक्ष होते. अत्यंत शिस्तबद्ध अधिकारीवर्ग आणि राजकारणी मुत्सद्दी राज्यकर्तव्यात तत्पर होते. यादव , कदंब , शिलाहार , विजयनगर , वारंगळ , द्वारसमुद यांच्या उज्ज्वल परंपरेत आज रायगड आणि महाराज शिवाजीराजे निविर्वाद शोभत होते.

मग उणीव कशात होती ? कशातच नव्हती. फक्त एका अलंकाराची उणीव होती. तो अलंकार म्हणजे राजसिंहासन. छत्रचामरांकित राजसिंहास न. त्या सिंहासनाची स्वराज्याला नितांत गरज होती. कारण त्याशिवाय सार्वभौम चक्रवतीर् राज्याचा मान आणि स्थान जगातील आणि स्वदेशातीलही लोक देत नव्हते. देणार नव्हते. हा केवळ संस्कार होता. पण त्याची जगाच्या व्यवहारात अत्यंत मोठी किंमत होती. राज्याभिषेक हा उपभोग नव्हता. ते राष्ट्रीय कर्तव्य होते. जोपर्यंत सिंहासनावर राज्याभिषेक होत नाही , तोपर्यंत जग या थोर सूर्यपराक्रमी मी पुण्यश्ाोक महामानवाला ' राज्यकर्ता ' समजणार होते , पण ' भूपतिराजा ' म्हणणार नव्हते.

एक आठवण सांगतो. महाराज औरंगजेबाला भेटायला आग्ऱ्यास जाण्यास निघाले. ( दि. ५ मार्च १६६६ ) त्यावेळी स्वराज्यातील एक नागरिक महाराजांना भेटावयास राजगडावर आला. त्याचे नाव नरसिंहभट्ट चाकालेकर. हा कुणी महापंडित , अभ्यासक , विचारवंत , दष्टा , समाजधुरीण नव्हता. होता तो एक सामान्य भिक्षुक. पण तरीही त्यावेळच्या एकूण संपूर्ण समाजात शिक्षणाच्या दृष्टीने दोनच पावलं का होईना , पण थोडा पुढे होता ना! तो महाराजांना एक विनंती करावयास आला होता. विनंती कोणती ? तो म्हणतोय , ' महाराज , माझ्या जमीनजुमल्याचे आणि घरादाराचे सरकारमान्यतेची , तुमच्या शिक्कामोर्तबीचे कागदपत्र माझ्यापाशी आहेतच. पण आपण आता औरंगजेब बादशाहास भेटावयास जात आहात , तरी माझ्या या जमीनजुमल्यास औरंगजेब बादशाहाच्याही मान्यतेची संदापत्रे आपण येताना घेऊन या. ' हा त्याच्या म्हणण्याचा आशय.

काय म्हणावे या प्रकाराला ? कपाळाला हात लावून रडावे ? स्वराज्यात राहणारा , जरासा का होईना पण शहाणपण मिरविणारा एक वेदमूतीर् औरंगजेबाच्या मान्यतेचे कागदपत्र आणायला महाराजांनाच विनवतोय. त्याला महाराजांचा हा स्वराज्यनिमिर्तीचा प्रकल्प समजलाच नाही ? बाजी पासलकर , बाजीप्रभू , मुरारबाजी इत्यादी वीरपुरुष कशाकरता मेले , जळत जळत पराक्रम गाजविणारे मावळे कशाकरता लढताहेत अन् मरताहेत हे त्याला समजलेच नाही ?

नाहीच समजलं त्याला ? अन् असे न समजणारे अंजान जीव नेहमीच जगात असतात. त्यांना सार्वभौमत्त्व , स्वराज्याचे महत्त्व , स्वातंत्र्याचे अभिमानी जीवन अन् त्याकरिता आपलेही काही कर्तव्य असते , हे दर्शनानी अन् प्रदर्शनाने शिकवावे लागते. आम्ही जन्मजात देशभक्त नाहीच. आम्ही जन्मजात गुलामच. यातून बाहेर काढण्याकरिता त्या शिवाजीराजाने महाप्रकल्प मांडला. तो साऱ्या जगाला अन् आमच्याही देशाला समजावून सांगण्याकरिता , नेमका अर्थ त्याचा पटवून देण्याकरिता एका राजसंस्काराचे दर्शन आणि प्रदर्शन घडविणे नितांत आवश्यक होते , ते उपभोग म्हणून नव्हे , तर कर्तव्य म्हणून आवश्यक होते. ते म्हणजे सार्वभौम , छत्रचामरांकित सुवर्ण सिंहासनावर आरोहण. म्हणजेच राज्याभिषेक.

पण केवळ कर्तव्यातच अर्ध्यदान करण्यासाठी उभ्या असलेल्या त्या महान योगी शिवाजीराजांना सिंहासन , छत्रचामरे , राज्याभिषेक इत्यादी गोष्टींची अभिलाषा तर नव्हतीच , कधीच नव्हती. पण त्यांना त्याची आठवणही होत नव्हती. हा राजा शिबी राजाचा वारस होता. तो जनकाचा वारस होता. तो रघुराजाचा वारस होता. हे सारं अभ्यासपूर्वक , मनन आणि चिंतनपूर्वक समजावून घेण्याची बौद्धिक ऐपत आमच्यापाशी असायची आवश्यकता होती आणि आहे. कोणा बादशाहाने आम्हाला त्याच्या सेवेसाठी एखादी पदवी दिली , तर त्या पदवीचा आम्हाला अभिमान वाटावा ? पण अशी पदवीधर मंडळी बादशाही जगात त्यावेळी नांदत होती. ही मंडळी महाराजांच्या बाबतीत म्हणत होती , ' राजे आम्ही पातशाहाने आम्हास किताब दिले. मानमरातब दिले. ' अशा जगाला एकच उत्तर देणे आवश्यक होते. ते म्हणजे राज्याभिषेक.

या राज्याभिषेकाची विचारसरणी कोणाही विचारवंताला सहज पटण्यासारखी होती. महाराजांनाही ती तत्त्वत: नक्कीच पटलेली होती. पण राज्याभिषेकातील तो गौरव , ती प्रशस्ती , तो मोठेपणा महाराजांच्या मनाला रुचतच नव्हता. ते हिंदवी स्वराज्याचे उपभोगशून्य स्वामी होते. पण स्वत: जीवन जगत होते. हिंदवी स्वराज्याचे एक साधे पण कठोर सेवाव्रती प्रजानन म्हणून. ते सविनय नम्र स्वराज्यसेवक होते. पण नरसिंहभट्ट चाकालेकरासारखी काही विचित्र , विक्षिप्त अन् अविवेकी उदाहरणे त्यांनी अनुभविली होती.

अखेर कर्तव्य म्हणूनच महाराजांनी राज्याभिषेकाला आणि सोहळ्याला , कठोर मनाने मान्यता दिली. राज्याभिषेक ठरला!
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.

चिंचवडच्या श्रीमोरया गोसावी यांचे पुत्र चिंतामणी महाराज आणि नातू नारायण महाराज देव या तीनही पिढ्यांतील गणेशभक्तीबद्दल भोसले राजघराण्यात नितांत आदरभाव होता. चिंतामणी महाराज आणि नारायण महाराज हे तर शिवाजीमहाराजांच्या अगदी समकालीन होते. श्रीमोरया गोसावी हे योगी होते. त्यांनी चिंचवडला संजीवन समाधी घेतली. या गणेशभक्तांबद्दल स्वराज्यस्थापनेपूवी र्च्या काही मराठी सरदार जहागीरदारांनी आपला भक्तिभाव चिंचवड देवस्थानाला जमिनी , पैसे , दागिने आणि काही इनामी हक्क प्रदान करून व्यक्त केला होता.

येथे नेमकेच सांगायचे , तर श्रीनारायण महाराज देव यांना कुलाबा कोकणातील काही बाजारपेठेच्या गावातून पडत्या भावाने तांदूळ , नारळ , सुपारी , मीठ इत्यादी कोकणी माल खरेदी करण्याचा हक्क मिळालेला होता. म्हणजे समजा , देवमहाराजांना काही खंडी तांदूळ हवा असेल , तर तो बाजारभावापेक्षाही खूपच कमी भावाने परस्पर शेतकऱ्यांकडून वा व्यापारी दुकानदारांकडून खरेदी करण्याचा हक्क श्रीदेवांना मिळालेला होता.

हा माल खरेदी करण्याकरता दरवर्षी श्रीदेवांचे कारकून आणि नोकर कोकणात जात असत. हा माल कोणा एकाच मालकाकडून सर्वच्यासर्व खरेदी न करता अनेकांकडून मिळून तो खरेदी करण्याचा विवेकी व्यवहार श्रीदेवांचे कारकून नक्कीच सांभाळत असत हे उघड आहे. अशा देणग्यांना आणि अधिकारांना (हक्क) प्रत्यक्ष बादशाही मान्यता घ्यावी लागे. ती निजामशाह किंवा आदिलशाह यांची असे. हे बादशाह तशी मान्यता देत असत. दरवर्षी श्रीदेवांचे नोकर कुलाबा भागात उतरून हा हक्क बजावीत आणि माल बैलांवर लादून घाटावर चिंचवडला आणीत असत.

श्री योगी मोरयागोसावी यांची पुण्यतिथी मार्गशीर्ष वद्य षष्ठीस साजरी होत असे. अन् आजही होते. त्यानिमित्त यात्रेकरूंना भंडारा म्हणजे अन्नदान होई. हजारो लोक येथे भोजन करीत. श्रीदेव या भंडाऱ्याकरिता हा कोकणातील माल उपयोगात आणीत असत. पुढे (१६५७ पासून) स्वराज्याची सत्ता या कुलाबा भागात प्रस्थापित झाली. स्वराज्याचे कायदे सुरू झाले. दरवषीर्प्रमाणे श्रीदेवांचे कारकून चिंचवडहून श्रीदेवांच्या आज्ञेप्रमाणे कुलाबा भागातील माल पडत्या भावाने खरेदी करण्यासाठी कोकणात आले. तेथील मराठी स्वराज्याच्या सुभेदाराने या कारकुनांना सांगितले की , ' पडत्या भावाने तुम्हांस माल खरेदी करता येणार नाही '

श्रीदेवांची कारकून मंडळी विस्मितच झाली. बादशाही अमलात देवस्थानकरता आम्हाला मिळालेले हक्क मराठी स्वराज्य आल्यावर काढून घेतले जावेत ? काय आश्चर्य ? हे हिंदवी स्वराज्य श्रीच्या इच्छेने आणि आशीर्वादानेच निर्माण झाले ना ?

स्वराज्याच्या अंमलदाराने अशी बंदी घातली आहे असे या कारकुनांनी श्री देवमहाराजांना चिंचवडला पत्र पाठवून कळविले. श्री नारायणमहाराज देवही चकीत झाले. त्यांनी राजगडास शिवाजीमहाराजांकडे तक्रारीचे पत्र पाठविले की , ' देवकार्यासाठी मिळालेला पडत्या भावाने माल खरेदी करण्याचा हक्क शिवशाहीत रद्द व्हावा ? ये कैसे ?'

महाराजांनी श्रीदेवांचे हे पत्र आल्यावर उत्तर म्हणजे राजाज्ञापत्र चिंचवडास पाठविले की , ' स्वराज्यात असे हक्क कोणासही दिले जाणार नाहीत. पूवीर् दिलेले असतील , तर ते अमानत म्हणजे रद्द करण्यात येतील. कारण पडत्या भावाने माल खरेदी केला , तर शेतकऱ्यांचे वा दुकानदारांचे नुकसानच होते. म्हणून हा हक्क रद्द करण्यात आला आहे. तसेच त्यावरील जकातही वसूल केली जाईल माफ होणार नाही. ' या राजाज्ञेची अमलबजावणीही झाली. स्वराज्याचा कारभार असा होता.

पण महाराजांची श्रीगणेशावर आणि देवस्थानावर पूर्ण भक्ती होती. महाराजांनी श्री नारायण महाराज देव यांना कळविले की , ' कोकणातून शेतकऱ्यांकडून आणि व्यापाऱ्यांकडून जो आणि जितका माल आपण पडत्या भावाने खरेदी करीत होता , तेवढा माल श्रीचे अन्नदान आणि भंडाऱ्याकरिता सरकारी कोठारातून चिंचवडास विनामूल्य , दरवषीर् सुपूर्त केला जाईल. ' शिवाजी महाराज असे होते आणि हिंदवी स्वराज्य म्हणजे शिवशाहीही अशी होती. आचारशीळ , विचारशीळ , दानशीळ , धर्मशीळ सर्वज्ञपणे सुशीळ , सकळांठायी!

असाच एक प्रश्न् कोकणात मिठागरांच्या बाबतीत निर्माण झाला. हा प्रश्ान् गोव्याच्या धूर्त पोर्तुगीज फिरंग्यांनी निर्माण केला. स्वराज्यातील आगरी समाजाची आणि काही इतर समाजाचीही खायचे मीठ तयार करणारी मिठागरे होती. मिठागरे म्हणजे मिठाची शेती. त्याचे असे झाले की , या धूर्त पोर्तुगीजांनी त्यांच्या पोर्तुगीज देशात तयार होणारे मीठ गोव्यात आणावयास सुरुवात केली. हे पांढरे दाणेदार मीठ पोर्तुगीजांनी अगदी कमी किंमतीत कोकणात विकावयास सुरुवात केली. मीठ चांगले होते. ते अगदी स्वस्त भावात विक्रीस आल्यावर कोकणातच तयार होणारे आगरी लोकांचे स्वदेशी मीठ कोण विकत घेणार ? मुक्त बाजारपेठ स्वराज्यात असल्यामुळे पोर्तुगीज लोक आपले मीठ विकू लागले. याचा परिणाम उघड होता. तो म्हणजे स्वराज्यातील आमची मिठागरे तोट्यात जाणार आणि आगरी लोकांचा धंदा बुडणार. स्वराज्याचेही नुकसान होणार. हे महाराजांच्या त्वरित लक्षात आले. शिष्टमंडळे राजगडावर आणावी लागली नाहीत. महाराजांनी आज्ञापत्रे काढून या पोर्तुगीज मीठावर जबरदस्त कर बसवला. त्यामुळे गोव्याचे मीठ स्वराज्यात येणे ताबडतोब अन् आपोआप बंद झाले. स्वराज्यातील उद्योगधंद्यांना संरक्षण देण्याची महाराजांची ही दक्षता होती. ही दक्षता व्यापारपेठेत आणि करवसुली खात्यातही जपली जात होती.

चांभार म्हणजे चर्मकार. हे लष्काराच्या अतिशय उपयोगी पडणारे लोक. करवसुली आणि जकात स्वराज्यात रोख पैशांत घेतली जात असे. या चर्मकारांकडूनही तशीच घेण्यात येई. पण खेड्यापाड्यातील आणि सर्वच चर्मकारांना रोख पैसे कर म्हणून देणे शक्य होईना. महाराजांनी आज्ञापत्रक काढून आपल्या अंमलदारास लिहिले की , ' ज्यांना रोख रकमेने कर देता येणे शक्य नसेल , त्या चर्मकारांकडून तेवढ्या किंमतीचे जिन्नस सरकारात घ्यावेत. रोख पैशाचा आग्रह धरू नये. आपल्या शिलेदारांस कातड्याच्या खोगीरांची , पादत्राणांची आणि इतर कातडी वस्तूंची गरज असतेच. तरी ते जिन्नस घ्यावेत. ' त्याप्रमाणे चर्मकारांना मोठी बाजारपेठही मिळाली आणि त्यांची अडचणही दूर झाली. असा व्यवहार तराळ , मातंग , धनगर , लोहार , कुंभार वगैरे मंडळींच्या व्यवसायातही महाराजांनी अमलात आणला असावाच. मात्र त्या संबंधीचे कागद अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.

राजाचे लक्ष असे स्वराज्यावर आणि रयतेवर चौफेर होते. असे लक्ष बादशाही अंमलात नव्हते. उलट काही कर शाही धर्माचे नसलेल्या लोकांवर लादले जात असत. हा फरक स्वराज्य आणि मोगलाई यातील आहे.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे?

शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर नेहमीच स्मितहास्य तरळत असे , असे अनेक स्वकीय आणि परकीय भेटीकारांनी लिहून ठेवले आहे. आपल्याला आजही महाराजांच्या व्यक्तिमत्वाबद्दल कुतूहल असते. समर्थांनीही आवर्जून लिहिले आहे की , ' शिवरायाचे आठवावे रूप '. रूपानं महाराज कसे होते ? सावळे की गोरे ? काही युरोपीय भेटीकारांनीही महाराजांना गौरवर्णाचे म्हटले आहे. त्याअथीर् ते अगदी कोकणस्थी गोऱ्या रंगाचे नसले , तरी अधिक जवळ गव्हाळ रंगाचे असावेत. मुंबईच्या शिवछत्रपती म्युझियममध्ये ( पूवीर्चे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) महाराजांचे एक उभे रंगीत चित्र ( मिनिएचर) आहे.

त्यात महाराजांचा रंग सावळा दाखविलेला आहे. हे चित्र चित्रकाराने इ.स. १७०० च्या जरा नंतरच्या काळात चितारलेले असावे , असे तज्ज्ञांचे मत आहे. चक्क काळ्या रंगात पं. जवाहरलाल नेहरू यांचीही चित्रे चित्रकारांनी काढलेली आहेत. पण नेहरूंचे गोरे देखणेपण आपण प्रत्यक्ष पाहिलेले आहे. चित्रकाराने काळ्या वा वेगळ्या रंगात चित्र काढले , ही त्या चित्रकाराची शैली आहे. तसेच महाराजांचे मुंबईचे हे चित्र आहे. हे चित्र मूळ साताऱ्याच्या छत्रपती महाराजांच्या वाड्यातूनच विश्राम मावजी या इतिहासप्रेमी गृहस्थांना मिळाले. हा राजघराण्याचा आणि छत्रपतींच्या राजवाड्याचा चित्र प्राप्तीधागा लक्षात येतोच. युरोपीय लोक सगळ्याच भारतीयांना ' काळे ' म्हणतात. पण त्यांनीही महाराजांना गौर रंगाचे सटिर्फिकेट दिलेले पाहून महाराजांच्या गव्हाळ मराठी गौरवर्णाची ओळख पटते.

महाराज आग्ऱ्याला गेले , तेव्हा त्यांना शहरात प्रवेश करताना परकालदास या नावाच्या राजपूत राजकीय प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहिले. त्यानेही आपल्या एका पत्रात महाराजांचे वर्णन लिहिले आहे. तो म्हणतो , ' शिवाजीराजे तेजस्वी आणि अस्सल राजपूतासारखे दिसतात. ' औरंगजेबाच्या दरबारात अपमान झाल्यामुळे महाराज संतापले. तेव्हा ते कसे धगागलेले दिसले , याचेही वर्णन राजपूत प्रतिनिधीच्या पत्रात सापडते. महाराजांच्या दृष्टीत विलक्षण त्वरा होती. महाराजांच्या सहवासात राहिलेल्या परमानंद गोविंद कविंदाने महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन शिवभारतात लिहून ठेवले आहे. एकाच वाक्यात सांगायचे तर त्याचे सार , महाराज राजकुलीन , तेजस्वी , तडफदार , प्रभावी आणि सावध व्यक्तिमत्त्वाचे होते. ऐतिहासिक कागदपत्रांतून आणि विशेषत: त्यांनी लिहिलेल्या पत्रांतील भाषेतून त्यांचे व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यापुढे असेच जाणवते. राजेपणाचे त्यांचे दर्शन अगदी सहज जन्मजात दिसते. त्यात कृत्रिमता वा बनावट आव दिसत नाही. छत्रपती , सिंहासनाधीश्वर , क्षत्रिय कुलावतांस , महाराजा या राजविशेषणांचे ' बेअरिंग ' महाराज अगदी सहज , आपादमस्तक सांभाळत होते. राजेपण वा राणीपण एवढ्या तोलामोलाने व्यक्तिमत्त्वात सांभाळणे , हे योगसाधना करण्याइतकेच अवघड आहे.

महाराज तेजावरच्या प्रवासात असताना एका छावणीत पाँडिचेरीचा माटिर्न नावाचा फेंच प्रतिनिधी महाराजांस भेटावयास आला. भेटीच्या शामियान्यात तो थोडा आधीच उपस्थित झाला. या शामियान्यात महाराज नंतर प्रवेशले. माटिर्नने शामियान्यातील त्या सदरेचे (छोट्या दरबाराचे) वर्णन लिहून ठेवले आहे. प्रत्यक्ष महाराज शामियान्यात कसे प्रवेशले अन् त्यावेळी दरबारी लोक (मराठे सरदार) कसे उभे राहिले आणि त्यांनी कशी राजआदब सांभाळली ते लिहून ठेवले आहे. महाराज चालत राजमसनदीपर्यंत आले आणि बसले याचे फार सुंदर वास्तवपूर्ण चित्र त्याने शब्दांकित केले आहे. ते वाचताना समार्थांचेच शब्द आठवतात. ' शिवरायाचे कैसे बोलणे , शिवरायाचे कैसे चालणे , शिवरायाची सलगी देणे कैसे असे ' त्याची चुणूक माटिर्नच्या शब्दांतून व्यक्त होते. आमची ' मराठा राजसंस्कृती ' खरोखर फार उदात्त आहे. आम्ही कोणी आज शिरपेच तुरे घालणारे राजेमहाराजे नाही. पण आम्ही आपापल्या आमच्या जीवनात मर्यादित राजेच आहोत ना ? ते खानदानी मराठी संस्कृतीचे देखणेपण अकृत्रिमरित्या आम्ही सांभाळलेच पाहिजे. ती आमची जबाबदारी आहे. शिवचरित्रातून आणि जिजाऊसाहेबांच्या चरित्रातून हे शिकता येते.

महाराजांच्या वेशभूषेबद्दल आपण पूवीर् पाहिलेच. परमानंद कविंदाने लिहिले आहे त्यात एक मामिर्क नोंद केली आहे. अफझलखानाच्या भेटीला जातानाचे महाराजांचे वर्णन करताना तो लिहितो की , ' महाराजांची दाढी कात्रीने नीटनेटकी केलेली होती. ' ही गोष्ट तशी अगदी किरकोळ आहे. पण त्यातून त्यांचा ' एस्थेटिक सेन्स ' दिसून येतो.

महाराजांची जुनी चित्रे उपलब्ध आहेत. त्यात ब्रिटिश म्युझियम लायब्ररी , लंडन येथील चित्रांत महाराजांनी थोडेसे उभे गंध कपाळावर लावलेले असावे की काय , असा भास होतो. पण अन्य चित्रांत गंध लावलेले कुठेही दिसत नाही. ही चित्रे प्रोफाइल आहेत. पण कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमधील म्युझियममध्ये आणि हैदराबादच्या सालारजंग म्युझियममध्ये महाराजांचे एकेक चित्र आहे. ही दोन्ही चित्रे समोरून , जरा कोनात काढलेली आहेत. अशा चित्रांना ' तीन चष्मी चित्र ' म्हणत. यात व्यक्तीचे दोन डोळे आणि एक कान दिसतो. कोल्हापूर आणि हैदराबाद येथील चित्रे अशीच तीन चष्मी आहेत. त्या चित्रांत महाराजांचे कपाळ समोरून दिसते , पण कपाळावर कोणत्याही प्रकाराचे वा आकाराचे गंध लावलेले दिसत नाही. सणसमारंभ , पूजाअर्चा वा राज्याभिषेकासारखा सोहळा चालू असताना महाराजांच्या कपाळावर नक्कीच गंध आणि कुंकुमतिलक असणारच. पण दैनंदिन जीवनात तसा होता की नव्हता , हे चित्रात वा कोणत्याही पत्रात दिसत नाही.

वेशभूषेच्या संदर्भात महाराजांच्या बाबतीत घडलेली एक गंमत सांगतो. महाराज एकदा राजापूर शहरात पालखीतून चालले होते. सांगाती थोडेफार सैनिक होते. रस्त्याने पालखी जात असताना दोन्ही बाजूंना नागरिक मंडळी स्वारी बघत होती. त्यातच एक- दोन इंग्रज उभे होते. राजापुरात ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी वखार होती , हे आपणांस माहीतच आहे. पालखी चालत असताना महाराजांचे सहज लक्ष त्या इंग्रज पुरुषांकडे गेले. इंग्रजांची वेशभूषा अर्थात इंग्रजीच होती. त्यांनी डोक्याला केसांचा टोप ( विग) घातलेला होता. महाराजांच्या मनात हे वेगळेच केस पाहून कुतूहल निर्माण झाले. महाराजांनी पालखी मुद्दाम त्या इंग्रजांच्या जवळून नेली. थांबविली. अन् त्यांनी त्या इंग्रजांच्या कानाशेजारी आपल्या हाताने केसात बोटांनी चाचपून पाहिले. अन् महाराजांच्या लक्षात आले की , हे केस वरून लावलेले आहेत. नैसगिर्क नाहीत. त्यांना गंमत वाटली. इंग्रजांनाही गंमत वाटली. पालखी पुढे गेली.

आग्ऱ्यात महाराजांनी आपल्या वकिलांमार्फत आग्ऱ्याच्या बाजारातून काही जडजवाहीर आणि मौल्यवान कापडचोपडही खरेदी केले होते. त्यावरून महाराजांना वेशभूषेबद्दल नक्कीच थोडीफार तरी आवड होती असे दिसते.

महाराजांच्या अंतरी नाना कळा होत्या. पण वेष बावळा नव्हता! नीटनेटकेपणा असलाच पाहिजे. साधेपणाही पाहिजे. बावळेपणा असता कामा नये.

महाराजांनी आपल्या खाश्या जिलेबीस ( म्हणजे सैन्याच्या खास राजपथकास) चेकसारखे पोषाख केले होते ? अशी नोंद आहे. म्हणजेच युनिफॉर्मची कल्पना त्यांच्या मनात निश्चित होती.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर!

साल्हेर! आपल्या इतिहासात विशेषत: इ. १२९६ पासून पुढे रक्तपाताने लाल झालेली पानेच जास्त दिसतात. पण शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा प्रारंभ करून उघडउघड युद्धकांडच सुरू केले नाही का ? पण या स्वातंत्र्ययुद्धकांडाचा इतिहास वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते , की महाराजांनी करावे लागले तिथे युद्ध केलेच , पण शक्यतेवढा रक्तपात टाळण्याचाही प्रयत्न केला. या शिवस्वराज्य पर्वाला सुरुवात झाली. इ. १६४६ मध्ये. पण तोरणा , कोरीगड , पुरंदर हे किल्ले रक्ताचा थेंबही न सांडता त्यांनी स्वराज्यात आणले.

इतकेच काय , पण सिंहगडसारखा किल्ला सिद्दी अंबर वाहब या आदिलशाही किल्लेदाराच्या हातून ' कारस्थाने करोन ' महाराजांच्या बापूजी मुदगल नऱ्हेकर याने स्वराज्यात आणला. प्रत्यक्ष पहिली लढाई महाराजांना करावी लागली , ती दि. ८ ऑगस्ट १६४८ या दिवशी आणि या आठवड्यात. विजापूरचा सरदार फत्तेखान शिरवळ आणि पुरंदर या किल्ल्यांवर चालून आला. त्यावेळी महाराजांनी त्याच्या खळद बेलसरवर असलेल्या (ता. पुरंदर) छावणीवर पहिला अचानक छापा घातला. लढाई झाली. पण या गनिमी काव्याच्या छाप्यात रक्तपात किंवा मृत्यू त्यामानाने बेतानेच घडले. अंतिम विजय महाराजांचाच झाला. एकूण लढाया तीन ठिकाणी झाल्या. शिरवळ , बेलसर आणि पुरंदर गड.

पुढच्या काळातही झालेल्या लढायांचा अभ्यास केला , तर असेच दिसेल , याचे मर्म महाराजांच्या क्रांतीकारक युद्धपद्धतीत आहे. ती युद्धपद्धती गनिमी काव्याची , छाप्यांची , मनुष्यबळ बचावून शत्रूला पराभूत करण्याचे हे तंत्र म्हणजे गनिमी कावा.

पहिली खूप मोठी लढाई ठरली ती प्रतापगडाची. ( दि. १० नोव्हेंबर १६५९ ) या युद्धातही शत्रूची महाराजांनी कत्तल केली नाही. त्यांचा मावळ्यांना आदेशच होता की , ' लढत्या हशमास मारावे ' म्हणजेच न लढत्या शत्रूला मारू नये. त्याला निशस्त्र करावे. जरुर तर कैद करावे. पळाल्यास पळू द्यावे. कत्तलबाजी ही महाराजांची संस्कृतीच नव्हती. प्रतापगड विजयानंतर पुढे पाऊण महिना महाराज सतत आदिलशाही मुलुख आणि किल्ले घेत पन्हाळा , विशाळगड प्रदेशापर्यंत पोहोचले. हा प्रदेश दौडत्या छापेगिरीने महाराजांनी काबीज केला. शत्रू शरण आल्यावर आणि उद्दिष्ट साध्य झाल्यावर शरणागतांना ठार मारण्याची हौस त्यांना नव्हती. अकबराने राणा प्रतापांचा चितोडगड जिंकल्यावरही गडावरच्या राजपुतांची मोठी कत्तल केल्याची नोंद आहे. अशा नोंदी शाही इतिहासात खूपच आहेत. शिव इतिहासात नाहीत , हे सांस्कृतिक फरक होय.

एक तर महाराजांच्या चढाया आणि लढाया या अचानक छाप्यांच्या असल्यामुळे रक्तपात कमी घडले. त्यातही शरण आलेल्या लोकांना , शक्य असेल तर आपल्याच स्वराज्यसेनेत सामील करून घेण्याची महाराजांची मनोवृत्ती होती. उदाहरणार्थ अफझलखान पराभवानंतर खानाच्या फौजेतील नाईकजी पांढरे , नाईकजी खराटे , कल्याणजी जाधव , सिद्दी हिलाल खान , वाहवाह खान आदि खानपक्षाचे सरदार महाराजांना शरण आले आणि सामीलही झाले. अशी उदाहरणे आणखीही सांगता येतील.

मोठ्या प्रमाणावर मोकळ्या मैदानात महाराजांनी युद्धे करण्याचे शक्यतोवर टाळलेलेच दिसते. पण तरीही काही लढाया कराव्याच लागल्या. वणी दिंडोरीची लढाई ( दि. १५ नोव्हें १६७० ) आणि त्याहून मोठी लढाई साल्हेरची , ही लढाई नव्हे , हे युद्धच मोगलांची फौज लाखाच्या आसपास होती. मराठी फौज त्यांच्या सुमारे निम्मीच. पण युद्ध घनघोर झाले. साल्हेरचे युद्ध क्रांतीकारक म्हणावे लागेल. कर्नाटकच्या शेवटच्या विजयनगर सम्राट रामराजाचा पराभव दक्षिणेतील सुलतानांनी राक्षसतागडीच्या प्रचंड युद्धात केला. (इ. १५६५ ) हे युद्ध भयानकच झाले. याला जंगे-ए-आझम राक्षसतागडी असे म्हणतात. यात रामराजासह प्रचंड कानडी फौज मारली गेली. सुलतानांचा जय झाला. या लढाईची दहशत कर्नाटकावर एवढी प्रचंड बसली की , विजयनगरचे साम्राज्य राजधानीसकट उद्ध्वस्त झाले. संपले. ती दहशत महाराष्ट्रावरही होतीच. पण महाराजांनी अतिसावधपणाने सपाटीवरच्या लढाया शक्यतो टाळल्याच. कारण मनुष्यबळ आणि युद्धसाहित्य अगदी कमी होते ना , म्हणून. पण साल्हेरचे युद्ध अटळ होते. जर साल्हेरच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला असता , तर ? तर १७६१ चे पानिपत १६७३ मध्येच घडले असते. पण प्रतापराव , मोरोपंत , सूर्यराव काकडे , इत्यादी सेनानींनी हे भयंकर लंकायुद्ध जिंकले. मराठी स्वराज्य अधिक बलाढ्य झाले. वाढले.

ज १७६१ चे पानिपत मराठ्यांनी जिंकले असते तर ? तर मराठी झेंडा अटकेच्या पलिकडे अन् खैबरच्याही पलिकडे काबूल कंदहारपर्यंत जाऊन पोहोचला असता. पाहा पटते का!

साल्हेरच्या युद्धात जय मिळाला , पण आनंदाच्याबरोबर युद्धातील विजय दु:ख घेऊनच येतो. या युद्धात महाराजांचा एक अत्यंत आवडता , शूर जिवलग सूर्याजी काकडे हा मारला गेला. महाराजांना अपार दु:ख झाले. त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले , ' माझा सूर्याराऊ पडिला. तो जैसा भारतीचा कर्ण होता. '

उपाय काय ? अखेर हा युद्धधर्म आहे. सूर्यराव काकडे हे पुरंदर तालुक्यातील पांगारे गावचे शिलेदार फार मातब्बर. त्यांच्या घराण्याला ' दिनकरराव ' अशी पदवी होती. सूर्यराव साल्हेरच्या रणांगणावर पडले. सूर्यमंडळच भेदून गेले. या काकडे घराण्याने स्वराज्यात अपार पराक्रम गाजविला. प्रतापगडचे युद्धाचे वेळी खासा प्रतापगड किल्ला सांभाळण्याचे काम याच घराण्यातील गोरखोजी काकडे यांच्यावर सोपविले होते. ते त्यांनीही चोख पार पाडले.

साल्हेरच्या युद्धाचा औरंगजेबाच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. तो दु:खीही झाला आणि संतप्तही झाला. उपयोग अर्थात दोन्हीचाही नाही.

कोणा एका अज्ञात मराठी कवीने चारच ओळीची एक कविता औरंगजेबाच्या मनस्थितीचे वर्णन करण्यासाठी लिहून ठेवलेली आहे ,

सरितपतीचे जल मोजवेना
माध्यान्हीचा भास्कर पाहवेना
मुठीत वैश्वानर साहवेना
तैसा शिवाजीनृप जिंकवेना!
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व

शिवाजी महाराज हे स्वराज्य संस्थापक होते. पण तेही या स्वराज्याचे प्रजाजनच होते. राजेपण , नेतेपण आणि मार्गदर्शक गुरूपण या महाराजांच्या वाट्याला आलेल्या भूमिका होत्या. त्या त्यांनी आदर्शपणे पार पाडल्या. सत्ताधीश असूनही जाणत्यांच्या आणि कर्तबगारांच्या पुढे ते सविनय होते. अहंकार आणि उद्धटपणा त्यांना कधीही शिवला नाही. मधमाश्यांप्रमाणे शंभर प्रकारची माणसं त्यांच्याभोवती मोहोळासारखी जमा झाली. त्यांचा त्यांनी त्यांच्या योग्यतेप्रमाणे उपयोग केला. या साऱ्यांना सांभाळण्याचं काम सोपं होतं का ? जिजाऊसाहेब ते काम जाणीवपूर्वक ममतेने आणि मनापासून कळवळ्याने करीत होत्या. माणसांशी वागणं ही त्यांची ' पॉलिसी ' नव्हती. प्रेम हा त्यांचा स्थायीभाव होता. सध्याच्या काळात लोकप्रतिनिधित्त्व करणाऱ्या संसदेपासून ग्रामपंचायतीपर्यंतच्या कार्यर्कत्यांनी जिजाऊसाहेबांच्या नेतृत्वाचा म्हणजेच मातृत्त्वाचाच अभ्यास करावा. त्या उत्कृष्ट संघटक होत्या.

शाही धुमाकुळात उद्ध्वस्त झालेल्या पुणे शहरात त्या प्रथम राहावयास आल्यावर ( इ. १६३७ पासून पुढे) त्यांनी पुण्याभोवतीच्या छत्तीस गावात एकूणच कर्यात मावळात त्यांनी अक्षरश: दारिद्याने आणि हालअपेष्टांनी गांजलेल्या दीनवाण्या जनतेला आईसारखा आधार दिला. आंबील ओढ्याच्या काठावरील ढोर समाजाला त्यांनी निर्धास्त निवारा दिला. बेकार हातांना काम दिले , काम करणाऱ्या हातांना दाम दिले. प्रतिष्ठीत गुंडांचा सफाईने बंदोबस्त केला. प्रसंगी या अतिरेकी छळवादी गुंडांना त्यांनी ठार मारावयासही कमी केले नाही. उदाहरणार्थ फुलजी नाईक शिळमकर आणि कृष्णाजी नाईक बांदल. यांना शब्दांचे शहाणपण समजेना. त्यांना त्यांनी तलवारीनेच धडा दिला. त्यांच्या इतक्या कडकपणाचाही लोकांनी नेमका अर्थ लक्षात घेतला.

लोक जिजाऊसाहेबांच्या पाठिशीच उभे राहिले. कोणीही त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला नाही! याच शिळमकर , बांदल आणखीन बऱ्याच दांडगाईवाल्या माणसांच्या घरातील गणगोणाने महाराजांच्या सांगाती स्वराज्यासाठी बेलभंडार उचलून शपथा घेतल्या. ते महाराजांचे जिवलग बनले. हे सारे श्रेय जिजाऊसाहेबांच्या ममतेला आहे. त्याही अशा मोठ्या मनाच्या की , चुकल्यामाकलेल्यांच्या रांजणातील पूवीर्चे खडे मोजत बसल्या नाहीत.

जरा पुढची एक गोष्ट सांगतो. मसूरच्या जगदाळ्यांनी आदिलशाहीची परंपरेनं चाकरी केली. अर्थात महाराजांना विरोध करणं त्यांना भागच पडलं. महादाजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफझलखानाच्या सांगाती प्रतापगडच्या आखाड्यात उतरले. त्यात खान संपला. शाही फौजेची दाणादाण उडाली. त्यात महादजी जगदाळे तळबीड गावाजवळ महाराजांचे हाती जिता गवसला. महाराजांनी त्याचे हात तोडले. याच महादाजीला आठदहा वर्षाचा पोरगा होता. जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेनं या पोराला आपल्यापाशी सांभाळला. त्याला शहाणा केला. तो स्वराज्याचाच झाला. अशी ही आई होती.

उद्ध्वस्त झालेलं पुणं आणि परगणा जिजाऊसाहेबांनी संसारासारखा सजविला. पावसाळ्यात चवताळून सैरावैरा वाहणाऱ्या आंबील ओढ्याला त्यांनी पर्वतीजवळ पक्का बंधारा घातला. शेतीवाडीचा खडक माळ करून टाकणाऱ्या आणि जीवितहानी करणाऱ्या या आंबील ओढ्याला त्यांनी शिस्तीची वाहतूक दिली. लोकांना न्याय दिला. शेतकऱ्यांना सर्व तऱ्हेची मदत केली अन् माणसं महाराजांच्या धाडसी उद्योगात हौसेनं सामील झाली.

नुस्त्या घोषणा करून माणसं पाठीमागे येत नाहीत. जोरदार घोषणा ऐकून चार दिवस येतातही. पण पाचवे दिवशी निघूनही जातात. लोकांना भरवसा हवा असतो. त्यांना प्रत्यय हवा असतो. आऊसाहेबांनी मावळ्यांना शिवराज्याचा प्रत्यय आणून दिला. म्हणून मी म्हटलं , की सध्याच्या आमच्या या नव्या हिंदवी स्वराज्यातील निवडून येणाऱ्या अन् न येणाऱ्याही लोकप्रतिनिधींनी जिजाऊसाहेबांच्या कार्यपद्धतीच्या आणि अंत:करणाचा अभ्यास करावा. निवडून आल्यावर पाच वषेर् फरारी होण्याची प्रथा बंद करावी.

एका ऐतिहासिक कागदात आलेली एक गंमत सांगतो. कागद जरा शिवोत्तरकालीन आहे. पण लक्षात घेण्यासारखा आहे. त्यातील आशय असा तानाजी मालुसऱ्याच्या घरी रायबाचं लगीन निघाले. तो राजगडावर महाराजांकडे भेटायास आला. खरं म्हणजे लग्नाचं आवतण द्यावयासच आला. पण सिंहगड काबीज करण्याच्या गोष्टी महाराजांपुढे चाललेल्या दिसताच त्याने पोराच्या लग्नाचा विचारही कळू न देता , ' सिंहगड मीच घेतो ' म्हणून सुपारी उचलली. ही गोष्ट जिजाऊसाहेबांना गडावरच समजली. चांगलं वाटलं. पण थोड्याच वेळात त्यांना कळलं की , तानाजीच्या घरी लगीन निघालंय. पण तो बोललाच नाही. तेव्हा मी आणि महाराजही तानाजीला म्हणाले , की ' सिंहगड कोंढाणा कुणीही घेईल. तू तुझ्या पोराचं लगीन साजरं कर. ' तेव्हाचं तानाजीचं उत्तर मराठ्यांच्या इतिहासात महाकाव्यासारखं चिरंजीव होऊन बसलंय. तानाजी म्हणाला , ' आधी लगीन कोंढाण्याचं '.

नंतर कोंढाण्याची मोहिम निश्चित झाली. मायेच्या हक्कानं तानाजी आपल्या अनेक मावळ्यांनिशी जिजाऊसाहेबांच्या खाश्या ओसरीवर जेवण करायला गेला. तो अन् सारे पानावर जेवायला बसलेही. अन् तानाजी मोठ्यानं म्हणाला , ' आम्हाला आऊसाहेबानं स्वत:च्या हातानं पंगतीत वाढलं पाहिजे. ' केवढा हा हट्ट. जिजाऊसाहेबांनी चार घास पंगतीत वाढले. वाढता वाढता आऊसाहेब दमल्या. तेव्हा तानाजी सर्वांना म्हणाला , ' आई दमली , आता कुणी तिनं जेवायला वाढायचा हट्ट धरू नका. ' जेवणे झाली. तानाजीसह सर्वांनी आपापली खरकटी पत्रावळ उचलली अन् तटाखाली टाकली.

तानाजीनं निघताना आऊसाहेबांच्या पावलांवर आपलं डोक ठेवलं अन् दंडवत घातला. त्याने आपल्या डोईचं पागोटं आऊसाहेबांच्या पावलावर ठेवलं. आऊसाहेबांनी ते पागोटं उचलून तानाजीच्या डोईस घातलं आणि त्याचा आलाबला घेतला. ( म्हणजे त्याच्या कानागालावरून हात फिरवून आऊसाहेबांनी स्वत:च्या कानशिलावर बोटे मोडली) त्याची दृष्ट काढली.

नंतर तानाजी मोहिमेवर गेला. माघ वद्य नवमीच्या मध्यान्नरात्री सिंहगडावर भयंकर झटापट झाली. तानाजी पडला. पण गड काबीज झाला. तानाजीचं प्रेत पालखीत घालून सिंहगडावरून राजगडास आणलं आऊसाहेबांना माहीत नव्हतं. कोण करणार धाडस सांगण्याचं ? आऊसाहेबांनी पालखी येताना पाहून कौतुकच केलं. कौतुकाचं बोलल्या. पण नंतर लक्षात आलं , की पालखीत प्रेत आहे. आऊसाहेबांनी ते पाहून अपार शोक मांडला. या सगळ्या घटनांवरून जिजाबाई समजते. तिची मायाममता समजते. तिचं नेतृत्व आणि मातृत्व समजतं.

ही हकीकत असलेला कागद कै. य. न. केळकर यांना संशोधनात गवसला.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.

स्वराज्याचे एक विलक्षण मोलाचे सूत्र महाराजांनी आणि जिजाऊसाहेबांनी अगदी प्रारंभापासून , कटाक्षाने सांभाळले होते. ते म्हणजे , स्वराज्यात लायकीप्रमाणे काम मिळेल. लायकीप्रमाणे दाम मिळेल. लायकीप्रमाणे स्थान मिळेल. हेच सूत्र फ्रान्सच्या नेपोलियनला पूर्णपणे सांभाळता आले नाही. जिंकलेल्या नवनवीन प्रदेशावर नेमायला नेपोलियनला नातलग , सगेसोयरे अपुरे पडले. त्यामुळे गुणवत्ता ढासळली. अखेर सम्राट झालेला नेपोलियन ब्रिटीशांचा कैदी म्हणूनच तुरुंगात मरण पावला.

पण योग्य लायकी असलेल्या नातलगालाही टाळायचे का ? तसेही महाराजांनी केले नाही. त्यांचे थोडेेसेच पण फार मोठ्या योग्यतेचे नातलग अधिकारपदावर होते.

अभ्यासकांचे विशेष लक्ष वेधते ते काही व्यक्तींवर. उदाहरणार्थ बहिजीर् नाईक. हा बहिजीर् रामोशी समाजातील होता. पण योग्यतेने राजकुमारच ठरावा , असा महाराजांच्या काळजाचा तुकडा होता. तो अत्यंत धाडसी , अत्यंत बुद्धिमान , अत्यंत विश्वासू , तिखट कानाचा आणि शत्रूच्या काळजातलही गुपित शोधून काढणाऱ्या भेदक डोळ्याचा , बहिरी ससाणा होता. महाराजांनी त्याला नजरबाज खात्याचा सुभेदार नेमले होते. सुभेदार म्हणजे त्या खात्याचा सर्वश्रेष्ठ अधिकारी. हेरखात्याचा मुख्य अधिकारी होणे ही सामान्य गोष्ट आहे का ? त्याची बुद्धिमत्ता आणि चातुर्यप्रतिभा असामान्यच होती. अनुभवाने ती असामान्यच ठरली. वास्तविक रामोशी समाज हा लोकांनी ( अन् पुढच्या काळात ब्रिटीशांनी) गुन्हेगारच ठरवून टाकला. पण त्यातील हिरे आणि मोती महाराजांनी अचूक निवडले. किल्ल्यांच्या संरक्षणासाठी आणि दौडत्या सैन्यातही महाराजांनी रामोशी ' नाईक ' मंडळी आवर्जून नेमली.

जरा थोडे विषयांतर करून पुढचे बोलतो. स्वराज्य बुडून इंग्रजी अंमल आल्यानंतरच आमच्या पुरंदरच्या परिसरातला भिवडी गावचा एक तरुण होता , उमाजी नाईक रामोशी. त्याचे आडनांव खोमणे. सारे मराठी स्वराज्य बुडाले , म्हणजे आम्हीच बुडवले. हा उमाजी नाईक एकटा स्वराज्य मिळविण्याकरता इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र उठला. चार जिवलग मिळविले. आणि इंग्रजांचे राज्य उलथून पाडण्याकरता हा रामोशी आपल्या दोन पुत्रांनिशी उठला. त्याच्या एका मुलाचे नाव होते , तुका. दुसऱ्याचे नाव होते म्हंकाळा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की , या उमाजी नाईकाने उभारलेले बंड. इंग्रजांचे राज्य मोडून , शिवाजीराजा छत्रपतीचे राज्य स्थापन करण्याचा त्याचा तळमळीचा हेतू होता. शिवाजीमहाराजांना बाकी सारे जण विसरले. एका उमाजी नाईकाच्या काळजात महाराज विसावले होते. शिवाजीराजे या शब्दाचे सार्मथ्य किती मोठे होते आणि आहे हे एका रामोशालाच समजले. आम्हाला केव्हा समजणार ? होय. आम्हालाही माहिती आहे की , कॅप्टन मॅकींगटॉश या इंग्रज अधिकाऱ्याने उमाजी नाईकाला पडकले अन् फाशीही दिली. पण त्याच कॅप्टनने उमाजी नाईकाचे चरित्र लिहिले. छापले. त्यात तो कॅप्टन म्हणतो , ' हा उमाजी म्हणजे अपयश पावलेला शिवाजीराजाच होता. ' मन भावना आणि त्याप्रमाणे कर्तबगारी ही जातीवर अवलंबून नसते. बहिजीर् नाईक आणि उमाजी नाईक हे सारखेच. एक यशस्वी झाला , दुसरा दुदैर्वाने अयशस्वी ठरला. दोघेही शिवसैनिकच.

दिलेरखान पठाणाशी पुरंदरचा किल्ला साडेतीन महिने सतत लढत होता. दिलेरखानला पुरंदर जिंकून घेता आला नाही. त्या पुरंदरावर रामोशी होते , महार होते , धनगर होते , मराठा होते , मातंग होते , कोळी होते , कोण नव्हते ? सर्वजणांची जात एकच होती. ती म्हणजे शिवसैनिक. चंदपूर , गडचिरोलीपासून कारवार , गोकर्णापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रातील अगणित समाजसमुहातील माणसे महाराजांनी निवडून गोळा केली. त्यात धर्म , पंथ , सांप्रदाय , जाती- जमाती , भाषा , रीतरिवाज कधीही मोजले नाहीत. राष्ट्र उभे करावयाचे असेल , तर लक्षात घ्यावा लागतो , फक्त राष्ट्रधर्मच. अन् निर्माण करावे लागते राष्ट्रीय चारित्र्य. स्वराज्याचा पहिला पायदळ सेनापती होता नूर बेग. आरमाराचा एक जबर सेनानी होता दौलतखान. साताऱ्याजवळच्या वैराटगड या किल्ल्याचा किल्लेदार होता एक नाईक. एक गोष्ट लक्षात येते की , शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा इतिहास म्हणजे सर्व समाज शक्तींचा वापर. मित्रांनो , महाराष्ट्राच्या एका महाकवीच्या ओळी सतत डोळ्यापुढे येतात. तो कवी म्हणतोय , ' हातात हात घेऊन , हृदयास हृदय जोडून , ऐक्याचा मंत्र जपून ' आपला देश म्हणजे बलसागर राष्ट्र उभे करूया. शिवरायांच्या तत्त्वज्ञानाचे आणि इतिहासाचे तरी दुसरे कोणते सार आहे ?
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती

हिंदवी स्वराज्याची सुरुवात शून्यातून झाली. अगदी गरीब अशा मावळी शेतकऱ्यांच्या , गावकामगारांच्या आणि कोणतीतरी मजुरी करणाऱ्या ' बिगाऱ्यां ' च्या संघटनेतूनच महाराजांनी आणि विलक्षण संघटन कौशल्य असलेल्या जिजाऊसाहेबांनी हा धाडसी डाव मांडला. माणसं म्हटली की , स्वभावाचे आणि गुणदोषांचे असंख्य प्रकार आलेच. या सर्वांना एका ओळंब्यात आणून , धाडसी आणि अति अवघड विश्वासाची कामे करवून घेणे , म्हणजे आवळ्याभोपळ्याची एकत्र मोट बांधण्याइतकेच अवघड काम होते. त्यात पुन्हा स्वाथीर् आणि गुन्हेगार प्रकृतीची माणसे थोडीफार तरी असणारच. आंबेमोहोर तांदळात खडे निघतातच की , ते शिजत नाहीत. आधीच वेचून काढावे लागतात. माणसांचेही तसेच. म्हणूनच या मायलेकरांनी या सर्व माणसांची निवडपाखड करून , जिवावरची कामंसुद्धा करवून घेण्यासाठी केवढं कौशल्य दाखवलं असेल ?

पण त्यात ही मायलेकरे यशस्वी ठरली. ती इतकी , की स्वराज्याची सर्वात मोठी धनदौलत म्हणजे ही माणसेच होती. ती सामान्य होती. पण त्यांनी असामान्य इतिहास घडविला. महाराजांची ही माणसं म्हणजे स्वराज्याची हुकमी शक्ती. एकवेळ बंदुकीची गोळी उडायला उशीर होईल , पण ही माणसं आपापल्या कामात निमिषभरही उडी घ्यायला उशीर करीत नव्हती. सबबी सांगत नव्हती. अखेर मोठी कामे , मोठ्या संस्था , मोठ्या राष्ट्रीय जबाबदारीच्या संघटना , गुप्त प्रयोगशाळा , गुप्त शस्त्रास्त्रांचे संशोधन आणि निमिर्ती... राजकारणाचे सर्वात महत्त्वाचे गुप्त खलबतखाने अशा सर्व ठिकाणी अशी हुकमी , विश्वासाची माणसेच लागतात. महाराजांनी अनेकांना पदव्या दिलेल्या आढळून येतात. त्यातील ' विश्वासराव ' ही पदवी किती मोलाची बघा! गायकवाड घराण्यातील कृष्णराव नावाच्या एका जिवलगाला महाराजांनी विश्वासराव ही पदवी दिलेली होती. युवराज संभाजीराजांना आग्रा प्रसंगात मथुरेमध्ये ज्यांच्या घरी महाराजांनी ठेवले होते , त्या मथुरे कुटुंबालाच त्यांनी ' विश्वासराव ' ही पदवी दिली होती. अत्यंत विश्वासू आणि कर्तबगार अशा काही सरदारांना आणि मंत्र्यांना त्यांनी ' सकलराज्य कार्य धुरंधर ' आणि ' विश्वासनिधी ' या पदव्या दिल्या होत्या. अनेक कोहिनूर हिऱ्यांचा कंठा गळ्यात पडण्यापेक्षाही महाराजांच्या हातून अशा मोलाच्या पदवीची बक्षिसी भाळी मिरवताना या सगळ्या विश्वासू जिवलगांना केवढा अभिमान वाटत असेल! पदवी स्वीकारून नंतर सवडीनुसार , संधी साधून ती परत केल्याचे एकही उदाहरण नाही! महाराजांनीही पदव्यांची स्वस्ताई खैरात केली नाही.

महाराजांनी कौतुकाकरिता कर्तबगारांना मानाच्या सार्थ पदव्या दिल्या. बक्षिसे , पारितोषिके दिली नाहीत. वंशपरंपरा कोणालाही , कोणतेही पद दिले नाही. या चुका स्वराज्याला म्हणजेच राष्ट्राला किती बाधतात , याची आधीच्या इतिहासावरून महाराजांना पुरेपूर जाणीव झालेली होती. पैसे किंवा अधिकारपदे देऊन माणसांची खरेदी विक्री महाराजांनी कधीही केली नाही. ऐन अफझलखान प्रसंगी विजापूरच्या बादशाहाने अफझलखानाच्या मार्फत महाराजांचे सरदार फोडून आपल्या शाही पक्षात आणण्याचे कितीतरी प्रयत्न केले. पण फक्त एकच सरदार अफझलखानास सामील झाला. बाकी झाडून सगळे ' विश्वासराव ' ठरले. हुकमी जिवलग ठरले. त्यात कान्होजी जेधे , झुंजारराव मरळ , हैबतराव शिळमकर , दिनकरराव काकडे , विश्वासराव गायकवाड , हंबीरराव मोहिते , यशवंतराव पासलकर अशी ' पदवीधर ' बहाद्दरांची त्यांच्या पदव्यांनिशी किती नावे सांगू ? असे दाभाडे , मारणे , शितोळे , जगताप , पांगेरे , कंक , सकपाळ , महाले , प्रभूदेशपांडे अणि किती किती किती सांगू ? महाराजांचे हे सारे हुकमी विश्वासराव होते. यातील अनेक जिवलगांच्या अगदी तरुण मुलानातवंडांना अफझलखानाने अन् पुढे इतरही शाही सरदारांनी पत्रे पाठवून बक्षिसी , इनामे , जहागिऱ्या देण्याचे आमीष दाखविले. पण त्यातील एकाही बापाचा एकही पोरगा शत्रूला सामील झाला नाही. सगळ्या विश्वासरावांच्या पोटी विश्वासरावच जन्मले. वास्तविक त्या पोरांनी आपल्या बापाला म्हणायला हवं होतं की , ' बाबा , तुम्ही महाराजांच्याकडेच ऱ्हावा. म्या खानाकडं जातो. पुढं कुणाचं तरी ' गव्हन्मेर्ंट ' येईलच ना! आपलं काम झालं , म्हणजे झालं! ' असा अविश्वासू आणि बदफैली विचार कोणाही मावळी पोरानं केला नाही.

तरीही संपूर्ण शिवचरित्रात अन् नंतर छत्रपती शंभू चरित्रात आपल्याला अगदी तुरळक असे चारदोन काटेसराटे सापडतातच. पण लक्षात ठेवायचे , ते बाजी पासलकर , तानाजी , येसाजी , बहिजीर् , हिरोजी यांच्यासारख्या हिऱ्यामाणकांनाच.

आपल्या इतिहासात चंदन खूप आहे. कोळसाही आहे. यातील काय उगाळायचं ? चंदन की कोळसा ? पारखून सारंच घेऊ. अभ्यासपूर्वक. पण उगाळायचं चंदनच. कोळसा नाही. चंदनाचा कोळसा करून उगाळत बसण्याचा उद्योग तर कृतघ्नपणाचाच ठरेल. नकली दागिने जास्त चमकतात. अस्सल मंगळसूत्र पदराखाली झाकूनच असते.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श

महाराजांची चित्रकारांनी हातांनी काढलेली चित्रे काही उपलब्ध आहेत. त्यातील काही अगदी समकालीन आहेत. काही इ. १६८० नंतर पण नक्कीच पण नजिकच्याच काळात कॉपी केलेली असावीत. पण समकालीन चित्रे उपलब्ध आहेत आणि त्यावरून महाराजांचे रूप आपण पाहू शकतो , हाच आपला आनंद मोठा आहे. आता चित्रकार ज्या योग्यतेचा असेल , त्या त्याच्या योग्यतेप्रमाणेच चित्र तयार होणार. त्याची तुलना किंवा अपेक्षा आपण आजच्या कॅमेऱ्याशी करू शकत नाही. येथे मुद्दा असा , की महाराजांच्या अंगावर मस्तकापासून पावलांपर्यंत जी वस्त्रे दाखविलेली आहेत , ( याला सिरपाव म्हणतात) त्याचा आपल्याला थोडाफार परिचय होऊ शकतो.

पहिली व्यथा ही सांगितली पाहिजे की , या त्यांच्या वस्त्रांपैकी एकही वस्त्र विशेष आज उपलब्ध नाही. त्यांच्या मस्तकावरील पगडी किंवा पागोटे किंवा जिरेटोप जो चित्रात दिसतो , तो उत्तरेकडील आणि दक्षिणेकडीलही सुलतानी अंमलात दरबारी व्यक्ती जशा तऱ्हेचा वापरत असत , तसाच आहे. आज दिल्ली , राजपूत , कांगडा , लखनौ , गोवळकोंडा , तंजावर , विजापूर इत्यादी चित्रकलेच्या शैलीतील (स्कूल) अगणित चित्रे (मिनिएचर्स आणि म्युरल्स) उपलब्ध आहेत. त्यातील व्यक्तींची शिरोभूषणे आणि शिवाजी महाराजांचे शिरोभूषण यांत खूपच साम्य आहे. क्षत्रिय आणि विनक्षत्रिय शिरोभूषणांत थोडाफार फरक दिसतो. थोडक्यात सांगावयाचे झाले , तर महाराजांच्या शिरोभूषणाचे बादशाही शिरोभूषणाशी साम्य आढळते. तो त्या काळाचा परिणाम किंवा प्रभाव आहे.

महाराजांचा अंगरखा , जामा (कमरेचा छोटा शेला) चुस्त पायजमा (सुरवार) हा अशाच प्रकारचा बादशाही दरबारी पद्धतीचा दिसून येतो. रुमाल हाही पण त्यातीलच. अंगावरील शेला म्हणजेच उत्तरीय किंवा उपवस्त्र हे हिंदूपणाचे एक लक्षण होते. पण काही बादशाह आणि त्यांचे अहिंदू सरदारसुद्धा शेला किंवा उपरणे वापरीत असल्याचे जुन्या पेन्टिंग्जवरून सिद्ध होते. या बाबतीतही पालुपद हेच की महाराजांच्या वापरण्यातील एकही वस्त्रविशेष आज उपलब्ध नाही. हीच गोष्ट महाराजांच्या अंगावरील अलंकारांच्या बाबतीत म्हणता येते. कलगी , मोत्याचा तुरा , कानातील चौकडे , गळ्यातील मोजकेच पण मौल्यवान कंठे , दंडावरील बाजूबंद , बोटातील अंगठ्या , हातातील आणि पायातील सोन्याचा तोडा , हातातील सोन्याचे कडे , कंबरेचा नवरत्नजडीत कमरपट्टा पुरुषांच्या अशा कमरपट्ट्याला ' दाब ' असे म्हणत असत. शिवाजी महाराजांचे तीर्थरूप शहाजीराजे महाराजसाहेब ते तंजावराकडे दक्षिणेत असत. वेळोवेळी तेही शिवाजीमहाराजांकडे आणि जिजाऊसाहेबांकडे काही मौल्यवान वस्त्रे , वस्तू इत्यादी पाठवीत असत. अशी कृष्णाजी अनंत मजालसी याने नोंद केलेली आहे. आज या शिवकालीन वस्त्रालंकारांपैकी आणि अन्य आलेल्या नजराण्यांपैकी काही उपलब्ध नाही.

महाराज कवड्याची माळ श्रीभवानी देवीच्या पूजेच्या आणि आरतीच्या वेळी गळ्यात रिवाजाप्रमाणे , परंपरेप्रमाणे घालीत असत.

असेच अलंकार राणीवशाकडेही होते. त्याचप्रमाणे प्रतापगडच्या भवानीदेवीच्या आणि शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या अंगावरही होते. राज्याभिषेक करून छत्रपती म्हणून मस्तकावर छत्र धरण्यापूवीर् महाराजांनी स्वत: दि. २० मे १६७४ या दिवशी प्रतापगडावर जाऊन श्रीभवानीदेवीची षोड्षोपचारे यथासांग पूजा केली. त्यावेळी वेदमूतीर् विश्वनाथ भट्ट हडप हे पुजारी होते. श्रीभवानी देवीस महाराजांनी सोन्याचे आणि नवरत्नजडावाचे सर्व प्रकारचे अलंकार घातले. त्यात देवीच्या मस्तकावर सोन्याचे मौल्यवान झालरदार असे छत्र अर्पण केले. या छत्राचे वजन सव्वा मण होते. त्यावेळचे वजनाचे कोष्टक असे २४ तोळे म्हणजे १ शेर. १६ शेर म्हणजे १ मण. जुना तोळा सध्याच्या पावणेबारा ग्रॅमचा होता. श्रीच्या अंगावरील सर्व अलंकार आजच्या किंमतीने कोट्यवधी रुपयाचे भरतील. पण हे सर्व अलंकार इ. १९२९ मध्ये प्रतापगडावर झालेल्या पठाणी चोरीत चोरीस गेले. पुढे चोर सापडले पण चोरी संपलेली होती. महाराजांनी अर्पण केलेल्या श्रींच्या अलंकारांपैकी श्रींच्या पायातील , माणके जडविलेली दोन पैंजणे फक्त सध्या शिल्लक आहेत , असे समजते. ही चोरांची कृपाच म्हणायला हवी.

अशा चोऱ्या महाराष्ट्रात कितीतरी देवदेवस्थानात झालेल्या आहेत , हे आपण पाहतो आहोत. प्रतापगड , नरसिंगपूर , जेजुरी , कराड , औंध , पर्वती इत्यादी ठिकाणी चोऱ्या झाल्या. काय म्हणावे याला ? पूवीर् आमचे देव आणि देवता शूरवीरांना आणि वीरांगनांना पावत होत्या. विजय मिळत होते , वैभव वाढत होते. पण आता मात्र त्या चोरदरोडेखोरांनाच पावाव्यात का ? भक्त दुबळे बनले. देवांनी तरी काय करावे ? शिवस्पर्श एवढाच आज आपल्यापुढे ज्ञात आणि थोडासा उपलब्ध आहे.

नेहमी मनात विचार येतो , की शिवाजी महाराज ज्या ज्या गडांवर आणि गावाशहरांत फिरले आणि राहिले , अशा गावाशहरांची आणि गडांची आणि महाराजांच्या तेथील वास्तव्याची कागदोपत्रांच्या आधाराने तारीखवार यादी करता येईल. अवघड काहीच नाही. अशी यादी आपण करावी आणि अमुकअमुक ठिकाणी महाराज कोणत्या तिथीमितीस तेथे राहिले हे प्रसिद्ध करावे. म्हणजे त्या त्या ठिकाणच्या रहिवाशांना आणि विशेषत: तरुण विद्याथीर् विद्याथिर्नींना त्या शिवभेटीचा स्पर्शानंद घडेल. इतिहास जागता ठेवण्याकरिता या शिवस्पर्शाचा असा उपयोग झाला पाहिजे.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.

' शिवाजी महाराज ' हे दोन शब्द तुमच्या आमच्या मनाचे आणि तनाचे अविभाज्य घटक आहेत. अगदी जन्मापासून मरणापर्यंत या आपल्या राजाची साक्षात आठवण म्हणून त्याच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या अशा , त्याच्या स्वत:च्या वस्तू , वस्त्रे , शस्त्रे , चित्रे , हस्ताक्षरे , पत्रे आणखी काही आज आपल्याला उपलब्ध आहे का ? असेल तर ते कोठेकोठे आहे ? ते सर्वसामान्य नागरिकाला विशेषत: तुमच्या आमच्या मुलांना पाहावयास मिळेल का ? निदान त्याची प्रकाशचित्रे तरी मिळतील का ? महाराजांची विश्वसनीय अस्सल नाणी कोणती ? त्यातील समकालीन अस्सल कोणती ? उत्तरकालीन पेशवाईतील शिवनाणी कशी ओळखायची ? इत्यादी कितीतरी कुतुहली प्रश्न आपल्याला पडतात. त्या सर्वांचीच उत्तरे चोख देता येत नाहीत. कारण त्याचे पुरावे उपलब्ध नसतात. पण जे काही आहे , ते समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा सगळ्या वस्तू वास्तूंना ' शिवस्पर्श ' असे नाव देता येईल. असे शिवस्पर्श आज किती उपलब्ध आहेत ?

महाराजांनी स्वत: जे काही हाताळले अन् वापरले असे आज नक्की काय काय आहे ? पहिली वस्तू म्हणजे त्यांची भवानी तलवार. या तलवारीबद्दल प्रचंड कुतुहल अन् तेवढेच प्रेम सतत व्यक्त होत असते. ही तलवार साताऱ्याच्या जलमंदिर राजवाड्यात श्रीमंत छत्रपती राजे उदयनमहाराज भोसले यांच्या खास व्यवस्थेखाली , अत्यंत सुरक्षित बंदोबस्तात ठेवलेली आहे. ही तलवार भवानी तलवारच आहे , हे सिद्ध करावयास पुरावे आहेत. ते पुरावे वेळोवेळी प्रसिद्धही करण्यात आले आहेत. येथे माझ्या मते या क्षणापर्यंत ही तलवार भवानीच आहे एवढेच निश्चित सांगतो. अन्य विश्वसनीय पुरावे येथून पुढे उपलब्ध झाल्यास विचार करता येईलच. निर्णयही घेता येईलच.

लंडन येथील बंकींगहॅम पॅलेसमध्ये छत्रपती महाराजांच्या खास शस्त्रालयातील एक तलवार राणी एलिझाबेथ यांच्या राजसंग्रहालयात आहे. प्रिन्स ऑफ वेल्स पदावर असताना इंग्लंडचे राजे सातवे एडवर्ड हे इ. १८७५ मध्ये भारतात आले होते. त्यावेळी त्यांना कोल्हापूरच्या श्रीमंत छत्रपती शिवाजीमहाराजांनी भेटीदाखल ज्या मौल्यवान वस्तू दिल्या , त्यांत एक अत्यंत मौल्यवान आणि सुंदर अशी तलवारही दिली. या तलवारीचे नाव कोल्हापूर दरबाराच्या दप्तरखान्यांत ' जगदंबा ' म्हणून नमूद आहे. ही तलवार रत्नजडीत मुठीची आहे. त्यावर बहात्तर माणके आणि अगणित हिरे जडविलेले आहेत. या तलवारीची जी घडण आहे , त्याला फिरंग किंवा पट्टापान किंवा सडक किंवा सॅबर असे नावे आहे. ही तलवार शिवकालीन नक्कीच आहे. पण ती भवानी नाही. पण ती छत्रपती महाराजांच्या खास शिलेखानातील आहे. म्हणून असे वाटते की , हीही जगदंबा तलवार शककतेर् शिवाजी महाराज छत्रपती (इ. १६३० ते ८० ) यांनीही स्वत: वापरली असेल की काय ? तशी शक्यता असू शकते. म्हणूनच साताऱ्यातील असलेल्या भवानी तलवारीप्रमाणे करवीर छत्रपती महाराजांच्या शिलेखान्यात असलेल्या आणि सध्या बंकींगहॅम पॅलेस , लंडनमध्ये असलेल्या या जगदंबा तलवारीबद्दल तेवढेच प्रेम आणि भक्ती वाटणे हा आमचा सर्वांचा स्वभावधर्मच आहे. ही तलवार (जगदंबा) कोल्हापूर महाराजांची आहे. ती पुन्हा छत्रपती महाराज कोल्हापूर यांच्या राजवाड्यात परत यावी अशी सर्व जनतेचीच इच्छा आहे. ही जगदंबा तलवार बंकींगहॅम पॅलेसमध्ये अतिशय शानदार दिमाखात ठेवलेली आहे. (मी स्वत: ती पाहिली आहे) तशी आस्था आणि व्यवस्था ठेवण्याची थोडीफार सवय आम्हाला लागली तरीही खूप झाले.

शिवाजी महाराजांचे वाघनख लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहे. हे वाघनख उत्कृष्ट पोलादी आहे. हे लंडनला कोणी दिले ? त्याचा वेध आणि शोध घेतला , तर थोडा सुगावा लागतो. ग्रँड डफ हा इ. १८१८ ते २४ पर्यंत सातारा येथे इस्ट इंडिया कंपनीचा राजकीय प्रतिनिधी म्हणून नेमलेला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या आणि इस्ट इंडिया कंपनीच्या संबंधातले राजकीय व्यवहार तो पाहत असे. तो हुशार होता. तो प्रथम हित पाहत असे , ते आपल्या इंग्लंड देशाचे आणि इस्ट इंडिया कंपनीचे. त्याला इतिहासाचीही आवड होती. साताऱ्यातील वास्तव्यात मराठ्यांच्या इतिहासावर आणि त्यातल्यात्यात शिवकालावर लिहिण्याची त्याने आकांक्षा धरली आणि ती पूर्ण केली. त्याने लिहिलेला ' हिस्टरी ऑफ मराठाज ' हा गंथ म्हणजे मराठी इतिहासावर लिहिला गेलेला , कालक्रमानुसार असलेला पहिलाच गंथ आहे. म्हणून त्याला मराठी इतिहासाचा पहिला इतिहासग्रंथ लेखक हा मान दिला जातो. तो अत्यंत सावध लेखक आहे. त्याने छत्रपती प्रतापसिंह महाराजांशी मैत्रीचे संबंध ठेवून आपले काम सुविधेने साधले. त्याने बहुदा याच काळात शिवाजीमहाराजांची वाघनखे प्रतापसिंह महाराजांकडून भेट म्हणून मिळवली असावीत. ही वाघनखे त्याने इंग्लंडला जाताना बरोबर नेली. ती त्याच्या वंशजांकडेच होती. चार धारदार नखे असलेले हे पोलादी हत्यार अतिशय प्रमाणबद्ध आणि सुबक आहे. हे हत्यार डाव्या हाताच्या बोटात घालून वापरावयाचे आहे. ग्रँड डफच्या आजच्या वंशजाने (बहुदा तो ग्रँड डफचा पणतू किंवा खापरपणतू असावा) व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला हे हत्यार दान केले. अफझलखानच्या भेटीच्या वेळी महाराजांनी जे वाघनख नेले होते , तेच हे हत्यार. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वस्तूसूचीमध्ये ही माहिती अगदी त्रोटक अशी सूचित केली आहे.

महाराजांची जी समकालीन चित्रे (पेन्टिंग्ज) समकालीन चित्रकारांनी काढलेली म्हणून आज उपलब्ध आहेत , त्यातील काही चित्रांत महाराजांचे हातांत पट्टापान तलवार म्हणजेच सरळ पात्याची तलवार म्यानासह दाखविलेली दिसते. तसेच पोलादी पट्टा हातात घेतलेलाही दिसतो. तसेच कमरेला कट्यार (म्हणजे पेश कब्ज) खोवलेलीही दिसते. पण महाराजांचा हा पोलादी पट्टा आणि कट्यार आज उपलब्ध नाही. तसेच त्यांची ढाल आणि हातावरचे संरक्षक दस्ते (म्हणजे मनगटापासून कोपरापर्यंत दोन्ही हातांचे संरक्षण करणारे , दोन्ही हातांची धातूंची वेष्टणे) आज उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे महाराजांचे पोलादी चिलखत आणि पोलादी शिरस्त्राण आणि कापडी चिलखत आणि कापडी शिरस्त्राण होते. पण आज त्यातील काहीही उपलब्ध नाही.

याशिवाय त्यांच्या खास शिलेखान्यात (शस्त्रगारात) आणखीही काही हत्यारे असतीलच. त्यात भाला , विटे , धनुष्यबाण , खंजीर इत्यादी हत्यारे असणारच. अफझलखानाचे भेटीचे वेळी त्यांनी प्रत्यक्ष वापरलेला बिचवा होता. परंतु आता यातील काहीही उपलब्ध नाही. बंदुका , तमंचे (म्हणजे ठासणीची पिस्तुले) , कडाबिना (म्हणजे नरसावयासारखे तोंड असलेले मोठे पिस्तुल यात दारूबरोबरच अनेक गोळ्या ठासून ते उडवीत असत. त्या काळची जणू ही अनेक गोळ्या उडविणारी मशिनगनच) अशी विविध प्रकारची हत्यारे राजशास्त्रालयात नक्कीच असणार. पण महाराजांच्या राजशास्त्रालयाचा आज कोणताही भाग उपलब्ध नाही. धातूच्या हत्यारांना ' गोडे हत्यार ' असे म्हणत. अन् दारू ठासून वापरण्यास हत्यारांना ' उडते हत्यार ' असे म्हणत. एकूण शिवस्पशिर्त हत्यारांबाबत सध्या एवढेच सांगता येते.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही

इतिहासाचा , विशेषत: शिवकालाचा अभ्यास करताना मराठी योद्ध्यांची चकित करणारी बहाद्दुरी प्रथम डोळ्यापुढे येते. मुत्सद्दी बुद्धिवंतांची ऊटपटांग चातुर्यवती प्रतिभा आपल्याला चक्रावून टाकते. विद्वानांची बुद्धिवंत लेखनशैली आपल्याला हलवून जागे करते. शाहिरांची ललकारी आपल्याला शहारून टाकते. पण किल्ल्यांची बांधकामे , अतिअवघड ठिकाणी केलेली मोठ्या दरवाजांची वा सांदिसापटीत बेमालूम केलेली चोरवाटांची रचना पाहून तुमच्याआमच्या मनातले आश्चर्यही थक्क होते.

टनावारी वजनांचे दगडी चिरे या कामगारांनी घडविले तरी कसे अन् पाचपाच पुरुष उंचीवर नेऊन ओळंब्यात जडविले तरी कसे हे समजत नाही. मणावारी वजनांच्या मोठमोठ्या तुळ्या आणि फळ्या अखंड मापात दारा झरोक्यांना या सुतारांनी कशा फिट्ट बसविल्या असतील ? अशा अवजड कामात स्वराज्यातले कामगार मजूर , बेलदार , पाथरवट , गवंडी सुतार , लोहार इत्यादी मंडळी अतिशय कष्टाळू , काटक आणि तरबेज होती. तेवढीच ती अंतर्मनातून कल्पक , अभिमानी आणि निष्ठावंत होती.

हे किल्ल्यांवरील अवघड काम करीत असतांना अनेकदा अपघातही होत आणि या कामगारांना प्राणाची किंमत मोजावी लागे. अनेकजण जायबंदीही होत. या सर्वच अज्ञात कामगारांशी महाराज अत्यंत मायेने कृतज्ञ असत. आज आपणही आपल्या आजच्या हिंदवी स्वराज्यात निरनिराळे राष्ट्रीय प्रकल्प साकार करीत आलो आहोत. कोयनेचे धरण म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली कामधेनूच आहे. हे धरण बांधताना कितीतरी कामगार कायमचे जायबंदी झाले आणि सुमारे चाळीस कामगार काम करताकरता झालेल्या अपघातात ठार झाले. या सर्वांची नावे कोयनेच्या बांधकामात एका शांत आणि एकांत जागी शिलालेखात कोरून ठेवली आहेत. आम्ही शाळा कॉलेजातील तरुण सहलीला कोयनेच्या धरणावर जातो.

या कार्यांगणी प्राण अर्पण केलेल्या या शूर धाडसी कामगारवीरांची तुम्हा आम्हाला आठवण होते का ? आम्ही त्या जलाशयाची रम्य गंमत आणि आनंद मनसोक्त लुटावा. तेथे गावं , नाचावं , खेळावं पण या कार्यांगणी पडलेल्या वा घायाळ झालेल्या कामगारवीरांना साष्टांग दंडवत घालण्यास विसरू नये. आज तुमच्या आमच्या कारखान्यांत आणि घरात कोयनेची वीज प्रकाशतीय , ती त्यांच्यामुळे. कारगिलच्या रणांगणावरील वीरांइतकेच याही वीरांचे मोल स्वगीर्य आणि अविस्मरणीय आहे.

अन् मग आता समजेल , की आज तीनतीनशे चारचारशे वर्षांहूनही वयोवृद्ध झालेल्या शिवकालीन गडकोटांची आणि त्यांच्या अज्ञात कामगारांची महत्ता किती थोर आहे , वंदनीय आहे , पूजनीय आहे. या गडकोटांवर वेडेवाकडे माकडचाळे कधीच करणार नाही. आमची नावे गावे त्यावर लिहून ठेवणार नाही. त्या चिऱ्यांचा आणि त्याच्या कामगार हिऱ्यांचा आम्ही मुजरा करून , दंडवत घालून आदरच करू. पूवीर् औरंगजेबासारख्या कर्दनकाळाशी टक्कर देत हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणारे हे तट आणि बुरुज केविलवाणे होऊन बसले आहेत.

तुम्हाआम्हा तरुणांची झुंड वेडीवाकडी , घाणेरडी गाणी गात येताना पाहून हे तटकोट अन् बुरुज मनातून भयभीत होऊन , असहाय्य नजरेने आपल्याकडे बघताहेत. अन् म्हणत आहेत , ' बाळांनो , नका रे आम्हा म्हाताऱ्यांची अशी टवाळी अन् मानहानी करू. ' अरे , एके काळी त्या थोरल्या राजानं आमच्या कडेखांद्यावर मायेने हात फिरविला. कुठं आम्हाला जखम झाली असली तर त्यानं ती चुन्यानं. अन् कुठं कुठं तर शिश्यानं बुजवली. आता तुम्ही आमच्याकरता काही केलं नाही तरी चालेल. पण आम्हाला तुमची नावं लिहून अन् आमचे चिरे खिळाखेळे करीत वरून ढकलून घायाळ करू नका. गुटखे खाऊन आमच्या अंगाखांद्यावर अन् तोंडावर थंुकू नका. सिगरेटी अन् ब्राऊनशुगर फुंकून थोटकं आमच्या अंगावर टाकू नका. पाया पडतो , देवा तुमच्या.

अन् खरंच नाही का हे ? एके काळी शिवाजीराजांच्या जिवलग कामगारांनी बांधलेल्या आणि जपलेल्या या तटाकोटांची अवहेलना आम्हीच करतो आहोत. वास्तविक हे तटकोट म्हणजे त्या शूर कामगारांची खडी स्मारके आहेत. आम्ही तरुणांनी या तटाकोटांवर ऑईल पेंटांनी आपली नावे लिहिण्याऐवजी ती , सूयोर्दयापासून सूर्यास्तापर्यंत पसरलेल्या विशाल आकाशात स्वराज्याचे वैमानिक बनून , पराक्रम करून नक्षत्रताऱ्यांच्या अक्षरांनी लिहिली पाहिजेत.

शिवकालीन कामगारांचे धैर्य कितीतरी वेळा दिसून आलेले आहे. कांसा बेटावरील पद्मदुर्ग बांधताना आणि खांदेरी बेटावरील तट बांधताना जंजिरेकर हबश्यांच्या आणि मुंबईकर इंग्रजांच्या तोफाबंदुकांना न जुमानता , न घाबरता कोकणच्या कामगारांनी हे दोन किल्ले उभे केले. ते मेले पण मरेपर्यंत बांधकाम करीत राहिले. अशीच मोलाची कामगिरी गलबतांचे बांधकाम करणाऱ्या कामगारांनी अन् लोहार सुतारांनी केली.

या साऱ्या बांधकामात कामगारांनी कुठे कुठे गणपती , मारुती , कालभैरव , भवानी , खंडोबा या देवदेवतांच्या मूतीर् कोरलेल्या आढळतात , तर कुठे सुसरी , मगरी आणि घोरपडी यांच्याही आकृती कोरलेल्या दिसतात. या त्यांच्या हौशी शिल्पकलेत त्यांचे लढाऊ मन व्यक्त होते.

एकदा मला एका (इ. १९६१ ) वषीर् भिईचा पोलादाचा आपला राष्ट्रीय कारखाना पाहण्याचा योग आला. सर्वत्र लोखंड दिसत होते. तेथे काम करीत असलेल्या माझ्या एका इंजिनीयर मित्राला मी विचारले ' हा कारखाना रशियन इंजिनीयर्सनी भारतासाठी उभारला , आता तो आपलीच सर्व यंत्रज्ञ , तंत्रज्ञ आणि कामगार मंडळी चालवीत आहेत. आपले हे सगळे कामगार अन् जाणकार लोक कसं काय काम करीत आहेत ?'

त्यावर त्या माझ्या मित्राने , काहीच शब्दात न बोलता अवतीभवती सर्वत्र पडलेल्या लोखंडी साहित्याकडे बोट फिरवीत माझे लक्ष वेधले. या लोखंडी वस्तूंवर खडूने असंख्य ठिकाणी लिहिले होते , ' रघुपति राघव राजाराम

जितना पैसा उतना काम. '

नव्याने नुकताच कारखाना सुरू झाला होता. पगारवाढीच्या मागणीसाठी आंदोलनेही सुरू झाली होती.

रघुपति राघव राजाराम , जितना पैसा उतना काम.

माझ्या मनाला कामगारांची मागणी उमजली , समजली पण त्याचबरोबर मनात आलं , की इथंच काय पण अवघ्या देशात आम्ही जितना पैसा उतना काम करतोच का ? तेवढं केलं तरी रघुपति राघव रामासाठी सेतू बांधणाऱ्या वानरांचं मोल आणि महत्त्व आम्हाला लाभेल.
-बाबासाहेब पुरंदरे