शनिवार, ११ एप्रिल, २००९

शिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर!

साल्हेर! आपल्या इतिहासात विशेषत: इ. १२९६ पासून पुढे रक्तपाताने लाल झालेली पानेच जास्त दिसतात. पण शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा प्रारंभ करून उघडउघड युद्धकांडच सुरू केले नाही का ? पण या स्वातंत्र्ययुद्धकांडाचा इतिहास वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते , की महाराजांनी करावे लागले तिथे युद्ध केलेच , पण शक्यतेवढा रक्तपात टाळण्याचाही प्रयत्न केला. या शिवस्वराज्य पर्वाला सुरुवात झाली. इ. १६४६ मध्ये. पण तोरणा , कोरीगड , पुरंदर हे किल्ले रक्ताचा थेंबही न सांडता त्यांनी स्वराज्यात आणले.

इतकेच काय , पण सिंहगडसारखा किल्ला सिद्दी अंबर वाहब या आदिलशाही किल्लेदाराच्या हातून ' कारस्थाने करोन ' महाराजांच्या बापूजी मुदगल नऱ्हेकर याने स्वराज्यात आणला. प्रत्यक्ष पहिली लढाई महाराजांना करावी लागली , ती दि. ८ ऑगस्ट १६४८ या दिवशी आणि या आठवड्यात. विजापूरचा सरदार फत्तेखान शिरवळ आणि पुरंदर या किल्ल्यांवर चालून आला. त्यावेळी महाराजांनी त्याच्या खळद बेलसरवर असलेल्या (ता. पुरंदर) छावणीवर पहिला अचानक छापा घातला. लढाई झाली. पण या गनिमी काव्याच्या छाप्यात रक्तपात किंवा मृत्यू त्यामानाने बेतानेच घडले. अंतिम विजय महाराजांचाच झाला. एकूण लढाया तीन ठिकाणी झाल्या. शिरवळ , बेलसर आणि पुरंदर गड.

पुढच्या काळातही झालेल्या लढायांचा अभ्यास केला , तर असेच दिसेल , याचे मर्म महाराजांच्या क्रांतीकारक युद्धपद्धतीत आहे. ती युद्धपद्धती गनिमी काव्याची , छाप्यांची , मनुष्यबळ बचावून शत्रूला पराभूत करण्याचे हे तंत्र म्हणजे गनिमी कावा.

पहिली खूप मोठी लढाई ठरली ती प्रतापगडाची. ( दि. १० नोव्हेंबर १६५९ ) या युद्धातही शत्रूची महाराजांनी कत्तल केली नाही. त्यांचा मावळ्यांना आदेशच होता की , ' लढत्या हशमास मारावे ' म्हणजेच न लढत्या शत्रूला मारू नये. त्याला निशस्त्र करावे. जरुर तर कैद करावे. पळाल्यास पळू द्यावे. कत्तलबाजी ही महाराजांची संस्कृतीच नव्हती. प्रतापगड विजयानंतर पुढे पाऊण महिना महाराज सतत आदिलशाही मुलुख आणि किल्ले घेत पन्हाळा , विशाळगड प्रदेशापर्यंत पोहोचले. हा प्रदेश दौडत्या छापेगिरीने महाराजांनी काबीज केला. शत्रू शरण आल्यावर आणि उद्दिष्ट साध्य झाल्यावर शरणागतांना ठार मारण्याची हौस त्यांना नव्हती. अकबराने राणा प्रतापांचा चितोडगड जिंकल्यावरही गडावरच्या राजपुतांची मोठी कत्तल केल्याची नोंद आहे. अशा नोंदी शाही इतिहासात खूपच आहेत. शिव इतिहासात नाहीत , हे सांस्कृतिक फरक होय.

एक तर महाराजांच्या चढाया आणि लढाया या अचानक छाप्यांच्या असल्यामुळे रक्तपात कमी घडले. त्यातही शरण आलेल्या लोकांना , शक्य असेल तर आपल्याच स्वराज्यसेनेत सामील करून घेण्याची महाराजांची मनोवृत्ती होती. उदाहरणार्थ अफझलखान पराभवानंतर खानाच्या फौजेतील नाईकजी पांढरे , नाईकजी खराटे , कल्याणजी जाधव , सिद्दी हिलाल खान , वाहवाह खान आदि खानपक्षाचे सरदार महाराजांना शरण आले आणि सामीलही झाले. अशी उदाहरणे आणखीही सांगता येतील.

मोठ्या प्रमाणावर मोकळ्या मैदानात महाराजांनी युद्धे करण्याचे शक्यतोवर टाळलेलेच दिसते. पण तरीही काही लढाया कराव्याच लागल्या. वणी दिंडोरीची लढाई ( दि. १५ नोव्हें १६७० ) आणि त्याहून मोठी लढाई साल्हेरची , ही लढाई नव्हे , हे युद्धच मोगलांची फौज लाखाच्या आसपास होती. मराठी फौज त्यांच्या सुमारे निम्मीच. पण युद्ध घनघोर झाले. साल्हेरचे युद्ध क्रांतीकारक म्हणावे लागेल. कर्नाटकच्या शेवटच्या विजयनगर सम्राट रामराजाचा पराभव दक्षिणेतील सुलतानांनी राक्षसतागडीच्या प्रचंड युद्धात केला. (इ. १५६५ ) हे युद्ध भयानकच झाले. याला जंगे-ए-आझम राक्षसतागडी असे म्हणतात. यात रामराजासह प्रचंड कानडी फौज मारली गेली. सुलतानांचा जय झाला. या लढाईची दहशत कर्नाटकावर एवढी प्रचंड बसली की , विजयनगरचे साम्राज्य राजधानीसकट उद्ध्वस्त झाले. संपले. ती दहशत महाराष्ट्रावरही होतीच. पण महाराजांनी अतिसावधपणाने सपाटीवरच्या लढाया शक्यतो टाळल्याच. कारण मनुष्यबळ आणि युद्धसाहित्य अगदी कमी होते ना , म्हणून. पण साल्हेरचे युद्ध अटळ होते. जर साल्हेरच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला असता , तर ? तर १७६१ चे पानिपत १६७३ मध्येच घडले असते. पण प्रतापराव , मोरोपंत , सूर्यराव काकडे , इत्यादी सेनानींनी हे भयंकर लंकायुद्ध जिंकले. मराठी स्वराज्य अधिक बलाढ्य झाले. वाढले.

ज १७६१ चे पानिपत मराठ्यांनी जिंकले असते तर ? तर मराठी झेंडा अटकेच्या पलिकडे अन् खैबरच्याही पलिकडे काबूल कंदहारपर्यंत जाऊन पोहोचला असता. पाहा पटते का!

साल्हेरच्या युद्धात जय मिळाला , पण आनंदाच्याबरोबर युद्धातील विजय दु:ख घेऊनच येतो. या युद्धात महाराजांचा एक अत्यंत आवडता , शूर जिवलग सूर्याजी काकडे हा मारला गेला. महाराजांना अपार दु:ख झाले. त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले , ' माझा सूर्याराऊ पडिला. तो जैसा भारतीचा कर्ण होता. '

उपाय काय ? अखेर हा युद्धधर्म आहे. सूर्यराव काकडे हे पुरंदर तालुक्यातील पांगारे गावचे शिलेदार फार मातब्बर. त्यांच्या घराण्याला ' दिनकरराव ' अशी पदवी होती. सूर्यराव साल्हेरच्या रणांगणावर पडले. सूर्यमंडळच भेदून गेले. या काकडे घराण्याने स्वराज्यात अपार पराक्रम गाजविला. प्रतापगडचे युद्धाचे वेळी खासा प्रतापगड किल्ला सांभाळण्याचे काम याच घराण्यातील गोरखोजी काकडे यांच्यावर सोपविले होते. ते त्यांनीही चोख पार पाडले.

साल्हेरच्या युद्धाचा औरंगजेबाच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. तो दु:खीही झाला आणि संतप्तही झाला. उपयोग अर्थात दोन्हीचाही नाही.

कोणा एका अज्ञात मराठी कवीने चारच ओळीची एक कविता औरंगजेबाच्या मनस्थितीचे वर्णन करण्यासाठी लिहून ठेवलेली आहे ,

सरितपतीचे जल मोजवेना
माध्यान्हीचा भास्कर पाहवेना
मुठीत वैश्वानर साहवेना
तैसा शिवाजीनृप जिंकवेना!
-बाबासाहेब पुरंदरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: