दिलेरखान हा मोगल सेनापती पठाण होता। पण् त्याची निष्ठा सर्वस्वी औरंगजेबाच्या पायाशी होती। वास्तविक पठाण जमातीचे मोगलांशी वैरच होते. कारण दिल्लीची सत्ता पठाण वंशाकडून खेचून घेऊन बाबर हा दिल्लीचा पहिला मोगल बादशाह झाला होता. पण हे आसले काही नाते लक्षातही न घेता दिलेरखान त्यांची सेवा करीत होता. इतकी तळमळून अहोरात्र शाही चाकरी करणारा माणूस राजपुतांच्याशिवाय इतर कोणत्याही समुदायात मिळणे अशक्य होते. औरंगजेबाच्या मनात संशयाने कायमचेच कुरुप केलेले होते. त्याचा कोणावरही विश्वास नसायचा.
स्वत:च्या मुलामुलींवर तर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. मिर्झाराजांवरही नव्हता. पण त्याचे राजपुती कर्तृत्त्व , शौर्य आणि मोगल बादशाहीबद्दलची स्वामीनिष्ठा औरंगजेब जाणून होता. म्हणूनच मिर्झाराजांवर त्याने महाराष्ट्रावरील मोहिम सोपविली. पण तिथेही संशयी स्वभाव व्यक्त झालाच. मिर्झा व सीवा दोघेही राजपूत. ते कदाचित आपल्या- विरुद्ध एक झाले तर ? आपली नुकसानी झाली तर ? म्हणून मिर्झावर सावध लक्ष ठेवण्यासाठीच औरंगजेबाने दिलेरला या मोहिमेत बरोबर दिले होते. हे मिर्झाराजाने ओळखले होते. म्हणूनच अनेकदा मतभेद आणि अवमान गिळून टाकून मिर्झा दिलेरच्या कलाकलाने वागत होता. पुरंदरच्या वेढ्यात मिर्झा आणि दिलेर यांचे अनेकदा खटके उडाले. मिर्झाने शक्य तेवढे स्वत:ला सावरीत सावरीत अलगद पडते घेतलेले दिसून येते.
दिलेरखान पुरंदरसाठी अत्यंत नेटाने हट्टाला पेटला होता. त्याचे एकूण या मोहिमेतील वर्तन पाहिले की , दुसऱ्या महायुद्धातील एखाद्या जनरल पॅटनची किंबहुना हिटलरचीच आठवण होते. पण येथे दिलेरच्या बाबतीत ते वर्तन कौतुकाचेच वाटते.
पुरंदरच्या पूर्व पहाडावर असलेल्या ' काला बुरुजावर ' दिलेरने मोठ्या कष्टाने तोफा डागल्या व मारा सुरू केला. पण मराठ्यांच्या या बुरुजावर असलेल्या दारुच्या साठ्याचा स्फोट झाला अन् बुरुज उडाला. ऐंशी मराठे हशम एका रकमेने उडाले. ठार झाले. दिलेरला हे अचानक यश मिळाले. आनंदाच्या भरात किंचितही न रेंगाळता त्याने ताबडतोब या खिंडारावर आपल्या फौजेचा एल्गार केला. स्वत: दिलेरखान उभा होता. त्याला वाटले की , आपण किल्ल्यात घुसणार , नक्की आत्ताच किल्ला मिळणार. पण मराठे तेवढेच अक्राळविक्राळ होते. काळा बुरुज उडालेला , ऐंशी मराठी माणसं चिंधड्या झालेली समोर दिसूनही मराठे कचरले नाहीत. त्यांनी मागेच असलेल्या सफेद बुरुजावरून या मोगली हल्ल्यावर जबर प्रतिहल्ला चढविला. तो एवढा तिखट होता की , हल्ला करणारे मोगल माघारा पळत सुटले. ही मराठी जिद्द पाहून दिलेर चकीत झाला. पण तेवढाच भयंकर संतापला. अन् मग तो संताप पुरंदरावर त्याने आगीसारखा ओकावयास सुरुवात केली. काळ सरकत होता. दिवस उलटत होते. पण दिलेरच्या काळजात निराशेची रात्र होतच नव्हती. गडही मिळतच नव्हता. तेव्हा दिलेरने आपल्या सेनाधिकारी सरदारांसमोर संतापून आपली पगडी घालणार नाही. असा हा हट्टी , संतापी दिलेर , औरंगजेबाला असे सरदार मिळाले पण ते त्याला सांभाळता आले नाहीत. माणसं कशी सांभाळावीत , त्यासाठी आपल्या काळजाचा तुकडा कापून द्यावा लागला तरी तो द्यावाच हे शिकावं शिवाजीराजांकडून औरंगजेबाला हे कसं जमणार ?
अखेरपर्यंत पुरंदरगड दिलेरला जिंकून घेता आलाच नाही. गडावर मराठी सैन्याला नेता नव्हता. मुरार बाजी ठार झाले होते. तरीही पुरंदर झुंजतच होता. नेता नसतानाही एक दिलाने , एक मनाने आणि एक निष्ठेने अशी मरणाच्या तोंडावर उभे राहून झुंजणारी माणसं स्वराज्याला महाराजांनी घडविली. खऱ्या अर्थानं पुरंदरावर यावेळी लोकशाही होती. खऱ्या अर्थानं लोकशाही यशस्वी होते ती अशीच. आपसांत क्षुद , स्वाथीर् भांडणे भांडून नव्हे!
आमच्या लोकशाहीचे दर्शन लोकसभेत आणि विधानसभेत आपल्याला नेहमीच घडते. आपण पावन होऊन जातो.
दिलेर आणि मिर्झाराजे हे दोघेही औरंगजेबाकरीता आणि मोगली तख्ताकरीता जिवाचं रान करीत होते. या दोघांच्याही आयुष्याची अखेर कशी झाली ? हताश आणि दु:खमय. याच मिर्झाराजाला औरंगजेबाने उदयराज मुन्शी या , मिर्झाराजाच्याच नोकराकडून विष घालून पुढे (दि. ११ जुलै १६६७ ) बुऱ्हाणपूर येथे मारले. आणि दिलेरचं काय झालं ? आयुष्यभर त्याने औरंगजेबाची जीव उगाळून सेवा केली. पुढे संभाजीराजांच्या विरुद्ध मांडलेल्या युद्धात दिलेर असाच लढत होता. मराठे हरत नव्हते. मोगलांना यश मिळत नव्हते. चिडलेल्या औरंगजेबाने दिलेरलाच दोष दिला. ' तुमच्याच अंगचोरपणामुळे आपण हार खातो आहोत ' असा आरोप औरंगजेबाने घेतला. (इ. १६८५ ) त्यावेळी दिलेरनं मान खाली घातली. त्याला काय यातना झाल्या असतील त्या त्यालाच ठाऊक. आयुष्यभर ज्याची सेवा केली , तो आपल्याला अंगचोर म्हणतोय.
दिलेरने आपल्या तंबूत एकांती विषय पिऊन आत्महत्या केली. हे पाहिल्यावर आठवावेत शिवाजीराजे. त्यांचे कैसे बोलणे होते ? कैसे चालणे होते ? त्यांची सलगी देणे कैसे असे ? तानाजी , कान्होजी जेधे , जिवा महाला , बाजी प्रभू , दौलतखान , बाळ प्रभू चिटणीस , येसबा दाभाडे , धाराऊ गाडे , हिरोजी फर्जद अन् असेच कितीतरी हिरे आणि हिरकण्या महाराजांच्या हृदयातच जाऊन बसलेल्या दिसतात. प्रेम ही एक अलौकिक शक्ती आहे. ती नेत्यांनी अन् अनुयायांनीही कधी विसरू नये. तिचं दर्शन घडावं. प्रदर्शन करू नये. स्वाथीर् व्यत्यय कामामध्ये येऊ नयेत. यशाचे प्रत्यय यावेत. खरे प्रेम अबोलच असते. ऐसी कळवळ्याची जाती , लाभाविण करिती प्रिती. शिवकाल म्हणजे ठायी ठायी या प्रेमाचा प्रत्यय.
- बाबासाहेब पुरंदरे
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा