जीवनात संकटे कोणावर येत नाहीत ? सुख-दु:खाच्या धाग्यांनी प्रत्येकाचे जीवन विणलेलेच असते। प्रखर तेजस्वी सूर्यालाही ग्रहणकाळ अटळ असतो। आता स्वराज्यावरही एक महाप्रचंड आक्रमण येऊ घातले होते. दिल्लीत औरंगजेब अशा मोठ्या मोहिमेची योजना करीत होता. ही त्याची स्वराज्यावरील मोहिम जणू निर्णायक ठरणार आहे , असा प्रचंड आखाडा तो मांडीत होता. खरोखरच हे लहानसं हिंदवी स्वराज्य या मोगली मोहिमेत टिकणार की संपणार असाच जबडा औरंगजेबाने उघडला होता. प्रचंड सैन्य , तोफखाना , हत्ती , युद्धसाहित्य , खजाना दक्षिणेवर जणू फुटलेल्या प्रचंड धरणासारखा लोटावयाचा हा आराखडा होता. म्हणजे त्याच चुका पुन्हा एकदा औरंगजेब करीत नव्हता का ? तळहाताएवढ्या शिवस्वराज्याचा आणि मूठभर शिवसैन्याचा समूळ नाश करण्याकरीता हे अफाट बळ महाराष्ट्रावर पाठविले की , आपले काम चोख होणार. आपण फक्त वाट पाहायची , मोगली झेंडा शिवाजीच्या राजगडावर फडकल्याच्या बातमीची आणि तो शिवाजी मारला गेल्याची किंवा कैद केल्याची. आपण अलमगीर आहोत. सीवा एक भुरटा दंगेखोर आहे. असेच मूल्यमापन प्रारंभापासून (ते स्वत:च्या अंतापर्यंत) औरंगजेब करीत होता. बळाने बुद्धिचा पराभव करता येतो अशी त्याची कल्पना होती. इथेच तो चुकत होता. अन् आजही अनेकजण अशाच चुका करतात. हिटलरने चचिर्लच्या बाबतीत आणि अमेरिकने व्हिएतनामच्या बाबतीत अशीच चूक केली. परिणाम जगाला दिसून आला. औरंगजेब हीच चूक आत्ता ( इ. १६६५ ) नव्याने करीत होता. प्रचंड युद्धसाहित्य आणि सेना असूनही शाहिस्तेखानचा पराभव का झाला याचा त्याने थोडासुद्धा विचार केलेला दिसत नाही. शिवाजीमहाराजांचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती योगेश्वर श्रीकृष्णाच्या ( कागदावर न रेखलेल्या पण कृतीत आणलेल्या) चक्रव्यूहाइतकी अभेद्य आणि आत्मविश्वासू होती. या शिवनीतीचा आणि शिवकार्याचा पराभव करण्याची ताकद कोणत्याही शत्रूकडे नव्हती. तिचा पराभवच करावयाचा असेल तर त्यांचेच लेक करू शकतील. अन् त्यांच्याच लोकांनी या शिवनीतीचा आणि शिवस्वराज्यकार्याचा घात केलेला पुढे आपल्याला दिसून येत नाही का ?
आज इतिहासात उभा दिसतो आहे तो असाच औरंगजेब। शिवाजीराजा न समजलेला महान शत्रू.
पुन्हा एकदा प्रचंड सैन्य दक्षिणेवर निघाले। औरंगजेबाने एक गोष्ट मात्र मोलाची केली. त्याने विवेकी , अनुभवी आणि बुद्धिमान असा सेनापती नेमला. त्याचे नाव मिर्झाराजा जयसिंग. हा एकमेव सेनापती असा आहे की ज्याने शिवाजी महाराजांच्या युद्धपद्धतीचा शिवअनुयायांचा आणि शिवमुलुखाचा बराच विचार केलेला आहे. पण त्यातही औरंगजेबाने आपल्या संशयी स्वभावाप्रमाणे दिलेरखान पठाण या जबरदस्त सरदारास जवळजवळ बरोबरीचे अधिकार देऊन मिर्झाराजांबरोबर पाठविले. दिलेरखान हा जबर योद्धा आहे. पण त्याला डोके कमी आहे. ते पुढे दिसून येईलच. औरंगजेबाने शिवाजीराजांविरुद्ध मिर्झाराजा आणि दिलेर यांना पाठविले. म्हणजेच तीन पायांची शर्यत खेळायला एकमेकांचे एकेक पाय एकत्र बांधून धावायला पाठविले.
स्वराज्यावरील हाच तो ग्रहणकाळ. हे ग्रहण क्षणिक की खग्रास हे काळ ठरविणार होता. नव्हे , स्वराज्यच ते ठरविणार होते. म्हणजेच स्वराज्यातील जनता आणि रणांगणावरचे मराठी सैनिक. नक्की आकडे माहित नाहीत. पण सुमारे दीड ते पावणेदोन लाख फौज या मोगली मोहिमेत आहे. इतर मोहिमांपेक्षा या मोहिमेत एकच गोष्ट (प्रकर्षाने) दिसून येते की , मिर्झा आणि दिलेर यांच्याबरोबर जनानखान नाही. मिर्झाराजे आणि दिलेर इ. १६६४ , ऑक्टोबर २९ नंतर मोहिमशीर झाले.
विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की , या प्रचंड आक्रमणाच्या वार्ता महाराजांना समजत होत्या. त्यांना पुरेपूर कल्पना होती. ते सावध होते. याच काळात त्यांनी एक साधे गणित मांडलेले दिसते की , ही मोगली लाट (इ. १६६४ ) च्या दिवाळीच्या दिवसांत दिल्लीहून निघतेय. ती आपल्या सरहद्दीवर येऊन पोहोचायला , म्हणजेच पुण्यावर पोहोचायला अजून पाच महिने लागणार आहेत , हे निश्चित. तेवढ्या वेळेत इतर काही कामे उरकता येतील. म्हणून महाराजांनी कर्नाटक सागरी किनाऱ्यावरील कारवार , मर्जा , अंकोळा , भटकळ , सदाशिवगड आणि बसनूर इत्यादी महत्त्वाची आदिलशाही ठाणी गिळून टाकण्याची योजना केली. आपल्या उत्तर आणि पूर्व स्वराज्यसरहद्दीची चिंता त्यांना नव्हतीच. पुरंदर , लोहगड , माहुलीगड , कसाराघाट इत्यादी ठाणी सुसज्जच होती. कोकणी सौंगड्यांच्या पूर्ण भरवशावर ते कोकणात निर्धास्त होते. महाराजांनी याचवेळी येत असलेल्या सूर्यग्रहणाचे दिवशी एक दानसोहळा करावयाचे योजिले. दि. ६ जाने. १६६५ , पौष वद्य आमावस्या या दिवशी सूर्यग्रहण होते. महाबळेश्वर येथे त्यांनी आपल्या आईची म्हणजेच जिजाऊसाहेबांची सोन्याने तुळा केली. हे सर्व धन दानधर्मात खर्च करावयाचे असते. ते केले. महाराज दि. ८ फेब्रुवारीस मालवणांस आले. पूर्वयोजनेने आरमार बंदरात सिद्ध होते. महाराज गलबतावर चढले. कारवारवरील ही त्यांची मोहिम आरमारातून होणार होती. त्यांच्या आयुष्यातील ही एकमेव आरमारी स्वारी. महाराज कारवारवर निघाले. मिर्झा राजा बुऱ्हाणपुरावरून औरंगाबादकडे सरकत होता. महाराजांनी सूर्यग्रहणाचेवेळी स्नाने , दाने , पूजाअर्चा केल्या होत्या. मिर्झाराजेही व्रतवैकल्ये करीत स्वराज्यावर येत होते. बगलामुखी कालरात्री या भवानीदेवीची त्यांनी होमहवनपूर्वक आराधना केली. पुढे शिवशंकराची कोटीलिंगार्चने अंत:करणपूर्वक केली. औरंगजेबाला यश मिळावे आणि शिवाजीराजाचा पूर्ण विनाश व्हावा ही मिर्झाराजांची श्रीचरणी प्रार्थना होती. एकाचे मन असे , दुसऱ्याचे मन तसे. तिसरे मन औरंगजेबाचे. त्याला शिवाजीराजेही नको होते अन् मिर्झाराजेही नको होते. या तीन मनांचा आम्ही कधीही अन् आजही अभ्यास केला नाही अन् करीतही नाही.
- बाबासाहेब पुरंदरे
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा