स्वत:च्या घरट्यापासून महाराज आपल्या तीनशे जिवलगांनिशी हजार मैल दूर , अनोळखी मुलुखात एका भयानक शत्रूच्या पंज्यात सापडले होते. औरंगजेब , ज्याच्या काळजाचा डाव विधात्यालाही लागलेला नव्हता. तो औरंगजेब महाराजांचा चोळामोळा करण्याचे डाव आखीत होता.
राजगडावर राजाच्या आईला याची कल्पना तरी असेल का ? ती थकलेली आई उत्तरेकडे नजर लावून माझी पाखरे कधी परत येतील म्हणून वाट पाहात होती. पण स्वत:वर पडलेली स्वराज्याची जबाबदारी किंचितही ढळू न देता. याचवेळी सिंधुदुर्ग किल्ल्याचे मालवणच्या समुदात बांधकाम चालू होते. मराठी आरमारावरचे आगरी , कोळी आणि भंडारी दर्यासारंग पोर्तुगीजांवर , जंजिऱ्याच्या सिद्दीवर आणि मुंबईकर इंग्रजांवर कडक लक्ष ठेवून होते. ' हा शिवाजीराजा आग्ऱ्यात अडकला आहे. हीच संधी त्याच्या राज्यावर आणि आरमारावर गिधाडी झडप घालायला अगदी अचूक आहे. ती त्याची म्हातारी काय करील आपल्याविरुद्ध ?' असा विचार या शत्रूंच्या मनात येणे अगदी सहज स्वाभाविक होते. पण त्या म्हातारीचे डोळे गरुडाच्या आईसारखे सरहद्दीवर अन समुदावर भिरभिरत होते. आरमारी मर्दांची तिला पुरेपूर पाठराखण होती. या आग्रा प्रकरणात एकही फितुरीचे वा कामचुकारपणाचे वा लाचखाऊपणाचे उदाहरण सापडत नाही. आपण विचार करावा. आपण तो कधीच करीत नाही.
आपण रमतो आणि दिपून जातो ते आग्रा प्रकरणातील महानाट्याने , त्यातील प्रतिभेने अन् त्यातील बुद्धिवैभवाने. या भयंकर राष्ट्रीय संकटकाळात स्वराज्यातली माणसे एका म्हातारीच्या नेतृत्त्वाखाली कशी वागली , कशी दक्ष राहिली याचा आपण विचारच करीत नाही. त्या काळाचा इतिहास पाहा. राज्यकर्ता संकटात सापडला किंवा राज्यापासून दहा पावले दूर गेला की त्याच्यामागे त्याच्या राज्यात बंडे झालीच म्हणून समजावे. फितुरी , हरामखोरी घडलीच म्हणून समजा. पण महाराज राजगडावरून निघाल्यापासून सव्वा सहा महिने हजार मैल दूर जाऊन पडले होते , तरीही स्वराज्याचा कारभार ती म्हातारी आणि तिची हजारो मराठी पोरंबाळं चोख करीत होती. यालाच म्हणतात राष्ट्रीय चारित्र्य. आठवतं का ? चीनने भारतावर आक्रमण केले. तेव्हा तेजपूरचे म्हणजे आपल्या सरहद्दीवरचे कमिशनरसकट सर्व अधिकारी पळून गेले म्हणे! इथं कळते आमच्या म्हातारीची योग्यता. आमच्या तीन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाची योग्यता. हुजूरपासून हुजऱ्यापर्यंत सर्वांचीच योग्यता.
तपशीलवार पुरावे देणारी कागदपत्रे नक्की बिकानेरच्या राजस्थानी पुरातत्त्व विभागात हजारांनी उपलब्ध आहेत. त्याचा अभ्यास करायला माणसे मिळत नाहीत. काय करावे ? आत्तापर्यंत डॉ. जदुनाथ सरकार , डॉ. महाराजकुमार रघुवीरसिंह आणि प्रा. गणेश हरी खरे आणि सेतुमाधवराव पगडी यांनी बरीचशी कागदपत्रे या दप्तरखान्यातून मिळवून प्रसिद्ध केली अहेत. तीही वाचायला अभ्यासक कुठे आहेत ? काय करावे ?
असू द्या! महाराज संचित होते. रामसिंहाने काबूलवरच्या स्वारीवर जाण्याचा दिलेला हुकुम महाराजांच्या कानावर घातला. त्याची स्वत:ची मनस्थिती केवढी बेचैन होती. औरंगजेबी डाव ऐकून महाराजही कमालीचे अस्वस्थ झाले. खैबरखिंडीच्या आसपास आपला खून पाडण्याचा हा डाव आहे हे उघड त्यांच्या लक्षात आले. पण काय करणार ?
औरंगजेबाने रामसिंगला असे सांगितले की , जखीरा आणि शिवंदी याची पूर्वतयारी करून , दरबारच्या ज्योतिषाने मुहूर्त दिला की तू सीवासह (शुजाअतखानासह) कूच कर. तोपर्यंत थांब. '
म्हणजे सुमारे आठवडाभर. तेवढेच मरण पुढे सरकले म्हणायचे! इथे एका गोष्टीची आठवण दिली पाहिजे. औरंगजेबाने आपल्या काही सरदारांना अशी आज्ञा देऊन ठेवली होती की , ' तुम्ही थोड्या थोड्या जणांनी दिवसातून केव्हा तरी एकदा जाऊन सीवाला भेटत चला. तो काय काय बोलतो ते मला नंतर सांगा. राजे. ' त्याप्रमाणे दोन वा तीन चार सरदार आळीपाळीने महाराजांना भेटावयास येतच होते. महाराज त्यांच्याशी अगदी चांगल्या खानदानी पद्धतीने बोलत वागत होते. रोज.
याच चारदोन दिवसांत एक बातमी. बहुदा ही बातमी मराठी वकीलाकडूनच महाराजांना समजली असावी. बातमी अशी की , औरंगजेबाने मिर्झाराजा जयसिंहाच्या नावाने तीन परगण्यांची जादा जहागीर बहाल केली. ही जहागीर मिर्झाराजांच्या एकूण सेवेबद्दल होती.
ही बातमी ऐकून महाराज चिडले. थोड्याच वेळात रामसिंह शामियान्यात त्यांना भेटावयास आला. तेव्हा महाराज चिडून त्याला म्हणाले , ' झालं तुमच्या बादशाही सेवेचं सार्थक ? आम्हाला (फसवून) इथे आग्ऱ्यात आणण्याची कामगिरी तुमच्या वडिलांनी केली. त्याबद्दल हे तीन परगणे तुम्हाला जादा जहागीर मिळाले. '
महाराज रागावले होते. रामसिंह हे पाहून अगदी व्याकूळ झाला. त्याचा त्यात काय दोष होता ? मिर्झाराजांनीही शिवाजीराजांना आग्ऱ्यात आणून बादशाहाच्या तडाख्यात अडकविले असाही काही भाग नव्हता. होता तो मिर्झाराजांचा सद्भावच. ही जहागीर मिर्झाराजांनी स्वत: मागितलेलीही नव्हती.
पण महाराज संतापले हेही सहज स्वाभाविक होते. रामसिंह मात्र व्याकुळ झाला होता. त्याला काय बोलावे ते समजेना. क्षणाभराने महाराजच शांत झाले. त्यांनीही जाणले. रामसिंह आपल्यावर किती प्रेम करतो आणि राजपुती शब्दाकरिता किती सावध राहतो हे त्यांनी ओळखले होते. महाराजांनीच रामसिंहला म्हटले , ' भाईजी , मी रागावलो. तुम्ही विसरून जा. '
आठवडाभरात जावे लागणार होते. खैबरखिंडीच्या जबड्यात!
- बाबासाहेब पुरंदरे
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा