मंगळवार, २४ फेब्रुवारी, २००९

शिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश

महाराज आग्र्यापासून सुमारे १५ कि. मी. अंतरावर जाऊन पोहोचले. औरंगाबादेनंतर येथे पोहोचेपर्यंत कोणताही खटकणारा प्रकार प्रवासात घडला नाही. पण महाराजांच्या मनाला भीमानदी ओलांडल्यापासून ते थेट आग्र्यात पोहोचेपर्यंत एकच गोष्ट सतत खटकत असली पाहिजे. जळजळीत पित्त उफाळून यावं तशी त्यांची मनस्थिती होत असली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे या भूमीची आणि भूमीपुत्रांची दुर्दशा , गुलामगिरी , लाचारी आणि तरीही मोगली तख्तापुढे कमरेपर्यंत वाकणारी मुजरेगिरी. गीता सांगणारा श्रीकृष्ण याच भागात जन्मला ना! वावरला ना! त्याच्या गीतेतल्या एकाही काना , मात्रा , वेलांटीने या मोगलांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध पुकारू नये ? फक्त एकच अपवाद. अरवली पर्वतातला महाराणा प्रतापसिंह. तोही अनेकांच्या दृष्टीने भारतीय एकात्मतेला बाधा आणणाराच ठरला ना ? अखेर प्रश्ान् पडतो , स्वदेश म्हणजे काय ? स्वराज्य म्हणजे काय ? ' स्व ' म्हणजेच काय ?

महाराजांचा सर्व आटापिटा या ' स्व ' साठी नव्हता का ?

औरंगजेबाच्या वाढदिवसाची तारीख होती १२ मे १६६६ . त्याने तीन दिवस आधीच रामसिंग आणि मुखलीसखान यांना हुकूम केला की , ' शिवाजीराजे वाढदिवसाच्या दरबाराला हाजिर राहिले पाहिजेत. त्यादृष्टीने राजांना कळवा. म्हणजे ते आदल्याच दिवशी (दि. ११ मे रोजी आग्ऱ्याजवळ येऊन पोहोचू शकतील. त्याप्रमाणे रामसिंगने तातडीने महाराजांच्या वाटेवर स्वार पाठविले आणि कळविले की , वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आपण आग्ऱ्यापर्यंत येऊन पोहोचावे. महाराज त्याप्रमाणे खरोखरच दक्षता घेऊन आग्ऱ्यापासून जवळच सुमारे १० कि. मी. वर दिवस मावळता येऊन पोहोचले. याच ठिकाणी फक्त एक धर्मशाळा होती. तिचे नाव मुलुकचंदकी सराई.

महाराजांच्या या टप्प्यावरील आगमनाची वार्ता रामसिंग आणि मुखलिस यांना वेळेवर समजली. ते त्याप्रमाणे महाराजांच्या स्वागताकरिता साजसरंजामानिशी निघाले. ते निघणार एवढ्यात प्रत्यक्ष औरंगजेबाने या दोघांना समोर बोलावून घेतले आणि हुकूम केला की , ' या क्षणापासून सलीमगड महालाची गस्त पहारेदारी तुमच्यावर सोपविली आहे. ' सलीमगड महाल आग्ऱ्याच्या किल्ल्यातच आहे. बादशाहाचे आपल्या कुटुंबासह वास्तव्य त्यात होते.

सलीमगडची गस्त म्हणजे रात्रंदिवस पहाऱ्याची जबाबदारी कोणा ना कोणातरी महत्त्वाच्या सरदारांवरच सोपविली जात असे. ही परंपराच होती. पण एका बाजूने रामसिंग आणि मुखलिस यांना शिवाजीराजांच्या स्वागताची जबाबदारी बादशाहाने फर्मावली होती अन् त्याचवेळी त्याने महालावर गस्त घालण्याचीही जबाबदारी या दोघांवर सोपविली. दोघेही अवाक् झाले. बादशाहापुढे बोलता येत नसे. शिवाजीराजांच्या स्वागताला जाण्याचा सारा सरंजाम रद्द करून मुकाट्याने हे दोघे (अर्थात आपल्या सैन्यानिशी) सलीमगड महालाच्या गस्तीवर दाखल झाले. हा शिवाजीमहाराजांच्या स्वागताच्या सोहोळ्याची मुद्दाम फजिती करण्याकरिता बादशाहाने योजलेला डाव. महाराज तर सराईपाशी येऊन पोहोचले होते. आपल्या स्वागताला शाही प्रतिनिधी , आपल्या योग्यतेस शोभेल अशा पद्धतीने आणि शाही रिवाजांप्रमाणे नक्कीच येणार ही महाराजांची अगदी रास्त अपेक्षा होती. पण रामसिंगने पाठविलेला लाला गिरीधरलाल मुन्शी या नावाचा एक सामान्य कारकून एकटा महाराजांना भेटावयास आला. त्याने नम्रतापूर्वक महाराजांना म्हटले की , ' जरा व्यवस्थेत अचानक घोटाळा झाला आहे. तरी आपल्या स्वागतास उद्या सकाळी ( दि. १२ मे) शाही सरंजाम येईलच. तूर्त आजची रात्र आपण येथेच काढावी. महाराजांना हे खटकले. एवढ्या मोठ्या शाही दरबारात अशी अनास्था असावी ?

एकूण राजगडावरून निघाल्यापासून महाराजांच्या बाबतीत मोगलांकडून घडलेला हा दुसरा राजनैतिक अपमान , पहिला औरंगाबादेस. दुसरा येथे.

पण महाराजांनी तोही गिळला. समजूतदारपणे त्यांनी एक रात्र इथेच काढली.

दि. १२ मे बादशाहाचा वाढदिवस उगवला. सामान्यपणे सकाळी १० चे सुमारास हा वाढदिवसाचा कार्यक्रम आग्रा किल्ल्यात सुुरू होणार होता. म्हणजेच महाराज आणि संभाजीराजे यांना किल्ल्यात सुमारे १० वाजता पोहोचणे जरूर होते. पण बादशाहाने सलीमगडची गस्त सोडून रामसिंगला आणि मुखलिसखानला महाराजांच्या स्वागतास जाण्याची अनुज्ञा दिलीच नाही. त्याला महाराजांचा एक वेगळाच नाटकी देखावा करून घेण्याची इच्छा होती. ती म्हणजे शिवाजीराजे दरबारात उशीरा यावेत. ते आलेले दरबाऱ्यांना जाणवावेत. तेथे महाराजांनी आणि संभाजीराजांनी आपणास केलेले मुजरे आणि अर्पण केलेले नजराणे सर्वांस दिसावेत. शिवाजीसारखा भयंकर माणूस तख्तापुढे कसा वाकतो याचे कौतुक लोकांनी पाहावे ही औरंगजेबाची खरी इच्छा आणि योजना होती. म्हणून त्याने प्रत्यक्ष दरबार सुरू झाल्यानंतर शिवाजीराजांना घेण्यासाठी रामसिंग आणि मुखलिसखान यांना पाठविले. तोपर्यंत उशीर खूप झाला. त्यातून पुन्हा रस्ते चुकल्यामुळे महाराजांना आणण्यास रामसिंगलाही उशीर झाला. अनेक घोटाळे झाले. अखेर महाराजांची वाट तरी किती पाहायची , म्हणून निरुपायाने , स्वत:च्याच चुकीमुळे औरंगजेबाचा हा नाटकाचा डाव फसला. दरबार संपवावा लागला. महाराज जेव्हा आग्ऱ्याच्या किल्ल्यात प्रवेशले तेव्हा झणझणीत दुपार झाली होती. रामसिंग आणि मुखलिस त्यांच्याबरोबर होते. इतर कोणीही मराठा वकील वा अधिकारी समवेत नव्हता. यावेळी बादशाहाचे दोन दरबार संपले होते. पहिला दिवाण-ए- आम. दुसरा दिवाण-ए-खास. तिसरा एक दरबार भरत असे. त्या रिवाजाप्रमाणे बादशाह घुशलखान्यात येऊन बसला. समोर सरदारांच्या रांगा उभ्या राहिल्या. बादशाहाच्या अगदी समोर आणि सरदारांच्या मधून सरळ रेघेत पाण्याचा आयताकृती सुंदर हौद आणि त्यात एका ओळीत अनेक कारंजी होती. येथे सिंहासन नव्हते. बादशाह मसनदीवर बसला होता. घुशलखाना म्हणजे स्नान करण्याची जागा. पण ही शाही बाथरुम म्हणजे एक मोठा थोरला दिवाणखानाच होता. आजही तो आहे. बादशाहाची मसनद जरा उंचावर होती. डाव्या उजव्या बाजूस त्याचे ज्येष्ठ अधिकारी उभे होते. त्यात अर्जबेगी होता.

महाराजांना घेऊन रामसिंग समोर आला. अकीलखान नावाच्या सरदाराने महाराजांना अदबीने ' यावे ' असे म्हटले. महाराज आणि संभाजीराजे अन् सत्कानजराण्याची ताटे घेतलेले दोन नोकर असे औरंगजेबाच्या पुढे गेले. शाही आसनापासून महाराज बहुदा सात- आठ फुटांवर पोहोचले. बादशाहाने त्यांच्याकडे बघितलेसुद्धा नाही. एका शब्दानेही बोलणे , चौकशी करणे , निदान चेहऱ्यावर स्मित व्यक्त करणे हे सुद्धा औरंगजेबाच्या विचित्र स्वभावाला यावेळी परवडले नाही. तो जपमाळ ओढीत होता. महाराजांनी आणि संभाजीराजांनी रिवाजाप्रमाणे बादशाहास तीन वेळा मुजरा (कुनिर्सात) केला आणि सत्कानजराण्याची ताटे बादशाहापुढे सादर केली. बादशाह काही बोलतील अशी स्वाभाविक अपेक्षा होती. पण तो अगदी ठप्प होता. नंतर लगेच त्याने अकिलखानास फर्मावले की , यांना जागेवर सुपूर्द करा.

हा साराच शाही वर्तनाचा प्रकार अपमानकारक होता. पाचशे कोसावरून आपल्या भेटीस आलेल्या एका दिलदार समशेरबहाद्दराचं कालपासून आतापर्यंत हे असं स्वागत होत होतं. आश्चर्यच! महाराजांना समोरच्या सरदारांतील जरा मागच्या रांगेत अकीलने नेऊन उभे केले. शंभूराजे शेजारीच. नंतर बादशाहाने एकमागोमाग एक अशा चौघा बड्या दरबाऱ्यांना मानाची खिलत (आहेर) सुपूर्द केली. त्यात महाराजांना अजिबात वगळले. हाही केवढा अपमान होता! त्यात पुन्हा महाराजांच्याच पुढच्या एका रांगेत जोधपूरचा जसवंतसिंह उभा होता. अर्थातच त्याची पाठ महाराजांकडे होती. त्यालाही मानाची खिलत देण्यात आली. याच जसवंतसिंहाचा सिंहगडावरच्या मराठ्यांनी सपाटून पराभव केला होता. ( दि. २८ मे १६६४ ) जसवंतसिंहालाही पाठीवर जखमा झाल्या होत्या. तो सैन्यासह पळत सुटला म्हणून बचावला. त्याचा आत्ता बादशाह महाराजांच्या देखत सत्कार करीत होता. अन् सन्मानाचे पाहुणे म्हणून आलेल्या महाराजांकडे पुरेपूर दुर्लक्ष करीत होता. हा केवढा अपमान!

- बाबासाहेब पुरंदरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: