१. त्याच्या नावाचा टॅटू तुमच्या मानेवर काढून घ्या आणि एकांतात त्याला हलकेच केस बाजूला करून दाखवा.
२. मित्र-मैत्रीणींसोबत तुम्ही गप्पागोष्टी करत असताना, त्यांच्या नकळत त्याचं लक्ष वेधून घेऊन ’लव्ह यू’ म्हटल्यासारखी ओठांची नुसती हालचाल करा.
३. तुम्ही बाईकवर त्याच्या मागे बसला असाल, तर त्याच्या मानेवर एक हलकासा किस करा.
४. तुम्ही कधी तरी सहज म्हणून त्याच्यासोबत काढलेला फोटो फ्रेम करून त्याला गिफ्ट म्हणून द्या.
५. तो दहा-बारा दिवसांसाठी टूरवर चालला असेल, तर त्याच्या बॅगमधे गुपचूप एखादं छोटसं गिफ्ट ठेवून द्या.
६. तुम्हाला कविता, चारोळ्या लिहिणं जमत असेल, तर त्याची स्तुती करणारं काव्य जरूर लिहून त्याला दाखवा.
७. जर तुमचं लग्न झालेलं असेल, तर दिवसभराच्या कामानंतर तो घरी आल्यावर त्याच्यासाठी आंघोळीला छान कोमट पाणी तयार ठेवा. ऍरोमा ऑईल नसेल, तर अगरबत्ती लावा. एखादी मंद संगीताची धून सुरू ठेवा आणि कोमट पाण्याने त्याला आंघोळ घाला. (हे फक्त पाडव्यालाच करायचं असतं, असं कुणी सांगितलं?) आंघोळीनंतर तुमच्या हातचं सुग्रास जेवण जेवल्यावर स्वारीला स्वर्ग दोन बोटे उरलेला असेल.
८. घरातील वीज गेलेली असताना, वीज कंपनीच्या नावानं बोटं मोडण्यापेक्षा, घरातल्या घरातच त्याच्यासोबत कॅंडल लाईट करा. असं डिनर तुम्ही सरप्राईज म्हणूनही देऊ शकता.
९. दिवे गेलेले असताना, घरात तुम्ही दोघंच असाल तर छानच पण जर तुम्ही कुटुंबात रहात असाल आणि दिवे गेलेल्याक्षणी तुम्ही त्याच्या जवळ असाल, तर काय करायचं हे मी तुम्हाला सांगायला हवं का?
१०. त्याच्या वाढदिवशी त्याला ऑफिसमधे एक छानसा बुके पाठवून द्या. तो नुसताच खूष होणार नाही तर ऑफिसच्या लोकांमधेही चांगलाच भाव खाऊन जाईल.
११. तो ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्राशी संबंध असलेलं एखादं बहुचर्चित पुस्तक त्याला गिफ्ट म्हणून द्या.
१२. पावसाळ्य़ात तुमच्या दोघांकडेही छत्र्या असल्या, तरी तुमची छत्री तुम्ही पर्सच्याबाहेर काढलीच पाहिजे असा काही नियम नाही. पावसाळ्यात एकाच छत्रीतून अर्धवट ओलेतं होत चालण्याची मजा काही औरच असते.
१३. कधीतरी त्याला अचानक जवळ बोलावून त्याच्या कानात ’आय लव्ह यू’ असं कुजबुजून सांगा. हे तीन शब्द जादू करून जातात.
१४. शक्य असल्यास त्याला लहानपणी त्याच्या घरचे त्याला कोणत्या नावाने हाक मारायचे हे जाणून घ्या. त्याला ते नाव आवडत असेल, तर त्याच नावाने त्याला हाक मारत चला.
या अशा कितीतरी निरनिराळ्या कल्पनांनी तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन रंग भरू शकता. निरोगी असताना हे रंग भरणं सोपं आहे पण तुमचा जोडीदार आजारी पडला असेल, तर तुम्ही काय कराल?
१. शक्य असेल, तर तुम्ही सुटी काढा. त्याच्यासोबत दिवस घालवा. अशा वेळी तुम्ही त्याचा हात हातात धरून बसणं ,त्याला लवकर बरं करण्यासाठी मदत करू शकेल. तुम्ही करून दिलेली साधी पेजसुद्धा त्याच्यासाठी अमृतासारखी असेल.
२. "तरी मी सांगितलं होतं तुला...." अशाप्रकारची लेक्चरबाजी फोनवरून करण्याऐवजी त्याच्या तब्येतीची विचारपूस करा. तुम्हाला त्याच्या जवळ बसणं शक्य नसेल, तर अधूनमधून त्याला एस.एम.एस. पाठवत रहा.
या आयडीयांसोबत मला काही टीप्स तुम्हाला द्यायला आवडतील.
१. मुलींना तारखा लक्षात ठेवण्याची वाईट खोड असते. त्या कसल्या कसल्या तारखा लक्षात ठेवतील त्याचा काही नेम नाही. पहिली भेट, पहिलं स्माईल, पहिल्यांदा एकत्र खाल्लेलं आईसक्रिम, पहिलं भांडण.. इ.इ. बरं, इतकं करून भागत नाही आपल्या मित्राला/नव-यालाही या तारखा लक्षात असाव्यात असं त्यांना वाटतं आणि इथेच त्या चुकतात. पुरूषांना असल्या तारखा अजिबात लक्षात रहात नाहीत. (ज्याच्या लक्षात रहातात, तो सुदैवी). तुमचा वाढदिवस, तुमच्या लग्नाचा वाढदिवस या तारखांचाही त्याला केव्हा केव्हा विसर पडू शकतो. तर तुमच्या जोडीदाराकडून अशा तारखा लक्षात ठेवण्याची अपेक्षा करू नका. नेमका याच्या उलट विचार करा. तुमचं पहिलं भांडण केव्हा झालं होतं, हे जर खरंच तुमच्या नि त्याच्या लक्षात असेल, तर त्या दिवशी मुद्दाम त्याला फुलांचा बुके भेट द्या. "गेल्या वर्षी/गेल्या महिन्यात याच तारखेला तुझ्या माझ्यात दरी निर्माण झाली होती. आज आपण फुलांनी ती पोकळी भरून काढू या." असा संदेश त्या फुलांसोबत पाठवलात, तर त्या तारखेचे सर्व वाईट संदर्भच बदलून जातील.
२. तुम्हाला त्याला एखादं गिफ्ट द्यायचं आहे आणि तुम्हाला कळत नाहिये की काय गिफ्ट द्यावं, म्हणून तुम्ही जर तुमच्या दुस-या एखाद्या मित्राची मदत घेतलीत, तर हे चुकुनही तुमच्या जीवलगाला सांगू नका. मत्सर केवळ स्त्रियांनाच जमतो असं नाही.
३. त्याला भरपूर मैत्रीणी असतील, तर त्या मैत्रीणींचा मत्सर करण्यापेक्षा त्या मैत्रीणींच्यासमोर त्याला एखादं गिफ्ट द्या किंवा प्रेमाचा संदेश असलेलं ग्रिटींग कार्ड द्या. तुमच्या मत्सरापेक्षाही त्याच्या मैत्रीणींसमोर तुम्ही व्यक्त केलेलं प्रेम त्याला जास्त भावेल.
प्रेमाला वयाचं बंधन नसतं. तुमचं तुमच्या जोडीदारावर प्रेम आहे आणि तुम्ही ते व्यक्त करता, हे सर्वात महत्त्वाचं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा