शुक्रवार, २४ एप्रिल, २००९

शिवचरित्रमाला भाग १५६ ...आठवावा प्रताप !

शिवाजी महाराजांच्या मुंबईच्या समुद्रातील स्मारकावर महाराष्ट्रात बरंच वादळ घोंगावतयं. पण या स्मारकावरुन होणारा
गोंधळ काही नवीन नाही. पाच वर्षापूर्वीही याच गदारोळावर भाष्य करणारा हा अग्रलेख ...

..........................................

आणिकही धर्मकृत्ये चालती। आश्रित होउनि कितेक असती।
धन्य धन्य तुमची कीर्ति। विश्वी विस्तारली।।

समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सतराव्या शतकात केलेले हे वर्णन. काळाच्या ओघात संदर्भ बदलल्याने अनेक वर्णने अर्थहीन बनतात.

परंतु ' आश्रित होउनि कितेक असती ' हे वर्णन मात्र चारशे वर्षांनंतरही कित्येकांस लागू पडते. अशा मानसिकदृष्ट्या आश्रित असलेल्या आमदारांनी गुरुवारी विधान परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक करण्याच्या प्रश्ानवरून गदारोळ घातला व अखेर कमजोर सरकारकडून आश्वासनही मिळवले. शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधी पक्षांनी आपापली दुकाने चालवण्यासाठी जितका केला , तितका अन्य कुणा राष्ट्रपुरुषाचा केला गेला नसेल. शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक करण्यासाठी शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या सरकारच्या काळात एक समिती नेमण्यात आली.

या समितीने 1999 मध्ये अहवाल सादर केला खरा , पण दरम्यान युतीची सत्ता जाऊन विलासराव देशमुख यांचे सरकार सत्तेवर आले. समितीच्या अहवालावर विचार करण्यासाठी विलासरावांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक समिती नियुक्त झाली. या समितीने शिवरायांचेे स्मारक मुंबईत करण्याऐवजी ते रायगड किंवा शिवनेरीवर करावे , असे सुचवले. शिवाजी महाराजांचे नाव घेताच ज्यांचे बाहू फुरफुरू लागतात , अशा मंडळींचे यामुळे पित्त खवळणे स्वाभाविकच आहे. वास्तविक विलासरावांच्या समितीचा निर्णय कटू असला , तरी योग्यच म्हणावा लागेल.

मुंबईत शिवाजी महाराजांचे तीन अश्वारूढ पुतळे आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ व मध्य रेल्वेचे मुख्य स्टेशन बोरीबंदर यांना शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचे नाव बदलून त्यालाही महाराजांचे नाव देण्यात आले. याखेरीज छोटी-मोठी स्मारके आहेतच. याहून आणखी स्मारक करायचे म्हणजे काय करायचे ? चौकाचौकात पुतळे उभारल्याने चिमण्याकावळ्यांचीच सोय होते व इमारती आणि रस्त्यांना नावे देऊन आद्याक्षरांचे शॉर्टफॉर्म होऊन थोर नेत्यांच्या स्मरणापेक्षा विस्मरणच अधिक होते. पण शिवराय गेल्यानंतरही त्यांचेच आश्रित होऊन आपली उपजीविका करणाऱ्यांना इतके भान कुठले ? त्यामुळेच विधान परिषदेत गदारोळ झाला व अखेर सामान्य प्रशासन राज्यमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांना या समितीच्या शिफारशींचा पुर्नविचार करण्याचे आश्वासन द्यावे लागले.

म्हणजे आता आणखी एका समितीची सोय झाली. हे असे किती काळ करून जनतेची फसवणूक करत राहणार ? शिवाजी हा रयतेचा राजा. आज महाराष्ट्रातील रयत एका बाजूला दुष्काळ व वीज टंचाई आणि दुसऱ्या बाजूला भयानक बेकारी यांच्या दुष्टचक्रात पिसून निघत असताना , शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य चालवणारे मात्र त्यांच्या स्मारकाचे लोणी कसे खाता येईल , याचाच विचार करत राहिले आहेत. छत्रपती आज असते , तर आपल्या स्मारकाच्या मागणीसाठी सभागृहाचा वेळ फुकट घालवणाऱ्यांनाच मणामणाच्या बेड्या घालून त्यांचा कडेलोट करण्याच्या आज्ञा त्यांनी दिल्या असत्या.

ज्यांना छत्रपतींच्या स्मारकाचा इतका कळवळा आला आहे , त्यांनी एकवार शिवनेरीवर किंवा पायात त्राण आणि उरात दम असल्यास रायगडावर जाऊन यावे. शिवस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक वास्तूंची जी परवड झाली आहे , ती नजरेखालून घालावी. शिवनेरीची अवस्था इतकी वाईट की , गडावर एकही माहिती फलक नीट अवस्थेत नाही. जे पर्यटक शिवप्रेमाने शिवनेरीवर येतात , त्यांना ठीक माहिती देण्यासाठी एकही अधिकृत वाटाड्या नाही. रायगडाची अवस्थाही फारशी चांगली नाही. या गोष्टी आमदारांना ठाऊक नसतीलच , असे नाही.

पण रायगड वा शिवनेरी अथवा अन्य गड-किल्ले दुरुस्त केल्याने त्यांना काय फायदा ? मुंबईत स्मारक केले , तर त्याची पायाभरणी , उद्घाटन , नंतर दरवषीर् वर्धापनदिन यानिमित्ताने मिरवता येणे शक्य आहे. शिवाय शिवाजी महाराजांसाठी ' लढण्याचे ' भांडवल करून पुढील निवडणुकीत भाबड्या शिवप्रेमींकडे मताचा जोगवाही मागता येईल. राजकारणात राहायचे आणि कायम सत्तेचीच गणिते मांडायची , तर हा विचार योग्यच म्हणावा लागेल. पण आपले लोकप्रतिनिधी शिवाजी महाराजांच्या नावाचेही ' माकेर्टिंग ' करत आहेत , हे जनतेला ज्या दिवशी कळेल , त्या दिवशी या तथाकथित ' राष्ट्रवादीं ' ची ते कशा पद्धतीने संभावना करतील , याचा विचारच केलेला बरा.

समर्थांनी म्हटले की , ' शिवराजाचे आठवावे रूप। शिवराजाचा आठवावा साक्षेप। शिवराजाचा आठवावा प्रताप। भूमंडळी।। ' महाराजांच्या मानसिक आश्रितांना हे उमगले नाही , तर जनताच त्यांना शिवराजांच्या प्रतापाची प्रचीती आणून देईल. थोडक्यात , अद्याप वेळ गेलेली नाही. शिवाजी महाराजांचे ' आंतरराष्ट्रीय ' ख्यातीचे स्मारक मुंबईतच उभारण्याचा दुराग्रह धरण्याऐवजी रायगड , शिवनेरीसारख्या किल्ल्यांची डागडुजी करून ती उत्तम पर्यटनस्थळे बनवावीत व तेथे सैनिकी प्रशिक्षणासारखी व्यवस्था करावी , हेच उत्तम.

शिवचरित्रमाला भाग १५५ शिवरायांचा आठवावा साक्षेप.

शिवराय हे धर्मनिरपेक्षतेचे नायकच नव्हे , तर महानायक होते. आज ते सामाजिक परिवर्तनाचे प्
रतीक बनायला हवे होते. पण , त्यांच्या राजवटीला धामिर्क परिमाण देऊन त्यांना ' मुस्लिमविरोधी हिंदूधर्मरक्षक ' बनवले जात आहे... शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने हे खडे बोल...
........................................
- बापू म. राऊत

आज देश कधी नव्हे एवढ्या धर्मचक्रव्यूहात सापडला आहे. धर्माच्या नावाने मत्सरभावना वाढीस लावल्या जात आहे. राजकीय सत्तेसाठी धूर्त मंडळी धर्माचा वापर करून दंगली करताहेत. आणि हे करताना ' शिवाजी महाराज की जय ' म्हणून घरांना आगी लावतात हे फारच क्लेशकारक आहे. शिवरायांला कट्टर धर्मश्ाद्ध ठरवून , त्यांच्या विचाराची मोडतोड करून समाजात विष पेरण्यात धूर्त मंडळी यशस्वी होत आहेत. शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्षतेचे नायकच नव्हे , तर महानायक होते. त्यांच्या राजवटीला धामिर्क परिमाण दिले जात आहे. ते मुस्लिमविरोधी व हिंदूधर्मरक्षक होते , असे सांगण्यात येत आहे.

पण , शिवराय कधीही मुस्लिमविरोधी नव्हते. त्यांच्या पदरी , तेही मोठमोठ्या हुद्द्यांवर अनेक मुसलमान सरदार , वतनदार होते. त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान होता , आरमाराचा प्रमुख दर्यासारंग दौलत खान होता , अंगरक्षक मुसलमान होता , तर अफझलखानाचा अंगरक्षक व वकील कृष्णाजी भास्कर कुलकणीर् होता. याचा भावार्थ असा की , त्यावेळी समाजाची फाळणी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी नव्हती. जे शिवरायांचे मुस्लिम सैन्य होते ते मोगलांविरुद्ध लढे , तर मुसलमान राज्याच्या पदरी असलेले हिंदू सैनिक शिवरायांविरुद्ध लढत.

इतिहासकार काफी खान म्हणतात की , शिवराय आपल्या सैनिकांना मशीद , कुराण व बायबल यांचा कधीही अपमान करू देत नसे. स्वारीवर असताना बायबल किंवा कुराण आढळले तर ते मोठ्या आदरपूर्वक जवळ घेत व सैन्यात मुस्लिम व ख्रिश्चनांना नोकरी देत असत. फ्रेंच प्रवासी बनीर्यर याने म्हटले आहे की , शिवरायांनी कांपुचियन मिशनरी फादर अब्रोस याच्या घराचे व इतर वस्तूंचे मोठ्या आदराने रक्षण केले. शिवाजी महाराजांनी म्हटले होते की , फेंच पादरी ही चांगली माणसे असतात , त्यांना उपसर्ग होता कामा नये. परंतु , आज त्यांच्या नावाचा उद्घोष करणारे ख्रिश्चन मिशनऱ्यांवर हल्ले करतात , नन्सवर बलात्कार करतात. महाराजांच्या गुरूंपैकी संत याकूब बाबा हे मुस्लिम संतही होते. हे पाहता , खरेतर आज शिवराय सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक बनायला हवे होते. पण , त्यांना हिंदुत्ववाद्याच्या हातातील मुस्लिमविरोधी अमोघ हत्याराची अवकळा आणली जात आहे. मुस्लिम धर्माविरुद्ध आपली मते प्रस्थापित करण्यासाठी जे महाराजांच्या नावाचा वापर करतात , त्यांना सामान्य लोकांनी सुनावले पाहिजे की , शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेत राजा म्हणून कधीही धर्मावरून भेद केला नाही. आपल्या धर्माइतकाच दुसऱ्याचा धर्मही श्ाेष्ठ व उच्च आहे असे त्यांचे मत होते.

शिवराय इतर मराठा सरदारांप्रमाणे मोगल सेनेचे मांडलिक बनले नाहीत. ते परकीय सत्तेच्या विरोधात संघर्षरत राहिले. वारसा हक्काने ते राजा बनले नव्हते , तर बुद्धीच्या व तलवारीच्या जोरावर राज्य स्थापन केले होते. ते शूर लढवय्ये व कुशल संघटक होते.

पण आज शिवरायांबद्दल काही संघटना खोटा इतिहास लोकांना सांगत आहेत. शिवरायांच्या प्रखर बुद्धीला व पराक्रमाला ते नाकारत आहेत. दांभिक माणसे शिवाजीच्या यशाचे श्ाेय अध्यात्म व भवानीदेवीला देत आहेत. शिवाजी महाराजांना भवानी प्रसन्न झाली , म्हणून ते यशस्वी झाले , असे भोळ्याभाबड्या लोकांना सांगण्यात येत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की , भवानी तलवार म्हणून जिचा गाजावाजा करतात ती तलवार पोर्तुगीज बनावटीची होती.

सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन जाण्याच्या महाराजांच्या प्रयत्नांना ब्राह्माण कारकुनांचा विरोध असे. राज्याभिषेका-नंतर शिवरायांनी सामाजिक सुधारणांना गती दिली होती , पण , त्यांनाही ब्राह्माणांकडून विरोध झाला. तेव्हा महाराजांनी ' ब्राह्माण म्हणोनी कोणाचा मुलहीजा करणार नाही ' अशी सक्त ताकीद दिली होती.

हिंदूधर्मरक्षक म्हणून शिवाजीला मिरवणाऱ्या मतलबी लोकांनी विसरू नये की , याच हिंदू धर्माने व त्याच्या रक्षकांनी शिवाजीच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. 44 व्या वषीर् मुंज व एकदा झालेला विवाह दुसऱ्यांदा करावयास लावला होता. महाराजांना वठणीवर आणण्यासाठी औरंगजेबाने जयसिंगास महाराष्ट्रात पाठविले होते. शिवाजीवर विजय कसा मिळवावा या चिंतेत तो असताना इथल्या ब्राह्माणांनी त्यासाठी देवीप्रयोगी अनुष्ठाने व कोटचंडी यज्ञ करण्याचा सल्ला दिला होता. एकीकडे शिवराय मोगल साम्राज्यशाहीची मृत्युघंटा वाजवीत होते , तर दुसरीकडे महाराष्ट्रातील भिक्षुकशाही मात्र धामिर्क प्रतिक्रांतीद्वारे मोगल साम्राज्यशाहीचे मरण लांबणीवर टाकत होती.

शिवरायांच्या संघर्षकाळात त्यांचे सर्व सैनिक मावळे होते. त्यांत आदिवासी , कुणबी , अस्पृश्य व मुस्लिम होते. या सर्व मावळ्यांना शिवाजीने ' मराठा ' बनविले , असे ग्रँट डफ यांच्या ग्रंथात नमूद केले आहे. शिवरायांनी स्त्रियांचा मान राखला होता. शिवाजीच्या काळी गोरगरीबांच्या लेकी-सुना या पाटील-वतनदाराच्या उपभोगवस्तू होत्या. पण शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन फार वेगळा होता. 1678 साली सकुजी गायकवाड या सेनापतीने सावित्रीबाई देसाई या किल्लेदार बाईस हरवून विजयाच्या उन्मादात तिच्यावर बलात्कार केला. हे शिवरायांना समजले , तेव्ह त्यांनी सकुजी गायकवाडचे डोळे काढावयास लावून जन्मभर तुरुंगात टाकले.

एकदा राज्याच्या पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या मुलीला सर्वांसमक्ष उचलून नेली व उपभोगली , तेव्हा शरमेने तिने जीव दिला. महाराजांनी पाटलाला मुसक्या लावून पुण्यात आणले गेले व त्याचे हातपाय तोडले. रयतेच्या अब्रूचे रक्षण करणाऱ्या शिवाजीचा आदर्श त्याचे उठसूठ नाव घेणारे पाळतात काय ? अत्याचाऱ्यास शिक्षा होते काय ?

तथाकथित शिवभक्त व कट्टर हिंदुत्ववादी शिवाजीचा हा आदर्श पाळून त्यांच्या डोक्यावर मानाचा तुरा लावतील काय ?

शिवचरित्रमाला भाग १५४ आधुनिक त्रिमूर्ती.

भारतीय राजकारणात छत्रपती शिवाजी , महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही
आधुनिक त्रिमूर्ती आहे. त्यांच्यातल्या या सूत्राची ओळख करुन देणारा हा लेख...

.............................

- ज्ञानेश महाराव

माणसाचा मोठेपणा त्याच्या सावलीवरून ठरतो. ही सावली त्याच्या कार्य-स्मरणाची असते. भारतीय राजकारणात अनंत व्यक्तिमत्त्वांनी आपल्या कार्य-कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय. परंतु त्या सर्वांत छत्रपती शिवराय , महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा प्रभाव अजोड आहे. या तिघांच्या नेतृत्वात , कर्तृत्वात असं कोणतं वेगळेपण होतं ? हे तिघेही लोकनेते होते. तथापि , त्यांच्या नेतृत्वाला निश्चित विचारतत्त्वांची बैठक होती आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा आग्रही ध्यास होता. लोकनेतृत्व करायचं तर तत्त्वं गुंडाळून ठेवावी लागतात आणि तत्त्वांचा आग्रह धरायचा तर लोक मागे येत नाहीत , असा भारतीय समाजकारणाचा इतिहास आहे. परंतु हे तीन लोकनेते या इतिहासास अपवाद ठरले , म्हणून त्यांचे कार्य ऐतिहासिक झाले.

छत्रपतींनी साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदवी राज्याचीच नव्हे , तर स्वराज्याची कल्पना मांडून प्रत्यक्षात आणली. महात्मा गांधींनी ब्रिटिशांना ' चले जाव ' म्हणतानाच येणाऱ्या स्वातंत्र्यात लोकस्वातंत्र्याचा आग्रह धरला. डॉ. आंबेडकरांनी तर सामाजिक समतेच्या प्रतिष्ठापनेसाठी आयुष्याचाच होम केला. भारताच्या प्रजासत्ताक लोकशाहीचं सार या त्रिमूतीर्ंच्या स्वराज्य , स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांत आहे. या तीन तत्त्वांची गुंफण आणि त्यातून निर्माण झालेली भारतीय लोकशाही हेच या त्रिमूर्तींचं लोकोत्तर कार्य आहे ; परंतु हेच कार्य विसरून या राष्ट्रपुरुषांना वेगवेगळं करून पुजलं-भजलं जातंय. ते गैर आहे. आज या राष्ट्रपुरुषांना मानणाऱ्यात फार मोठं वैचारिक अंतर आहे. ते त्यांच्या कार्याचा घोर अपमान करणारे आहे. ' डॉ. आंबेडकरांचा विजय असो ' म्हणताना ' जय शिवाजी! जय गांधीजी ' असाही गजर व्हायलाच हवा. तसंच ' शिवाजीमहाराज की जय ' चा नारा लगावताना महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांचाही जयजयकार करण्यास विसरू नये.

या तिघांचं जीवनकार्य हे राष्ट्रउभारणीचं शास्त्र आहे. तथापि , त्याचा संस्कार करवून घेण्याऐवजी त्यांची नावं शस्त्रासारखी एकमेकांविरोधात वापरली जात आहेत. महात्माजी काँग्रेसवाल्यांचे , डॉ. आंबेडकर दलितांचे आणि शिवराय दोघांनाही विरोध करणाऱ्यांचे ; अशी या विभागणी झालीय. ती राजकीय स्वार्थासाठी आहे. त्यामुळे समाजात अहंकार बळावतोय , मूर्खपणा वाढतोय.

महात्माजी आणि आंबेडकर या दोघांनीही शिवरायांच्या समताधिष्ठित राज्यपद्धतीला आदर्श मानलं आहे. खेडे स्वयंपूर्ण व्हावे , ग्रामविकास व्हावा या गांधीविचारांची बीजे शिवशाहीत आहेत. शिवरायांच्या भूमीत कार्यर्कत्यांचं मोहोळ आहे म्हणून गांधीजी साबरमतीचा आश्रम बंद करून र्वध्याला आले. काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारताच ' शिवाजीमहाराज की जय! तिलकमहाराज की जय! ' म्हणत भारतभर फिरले. महात्माजींना आंबेडकरांच्या कार्याबद्दलही आस्था होती. दोघांत वैचारिक मतभेद होते. कारण दोघांचे मार्ग भिन्न होते. परंतु उद्दिष्ट एकच- मानवतेचं रक्षण व मानवतावादाला बढावा देणे हेच असल्यामुळे उभयतांना परस्परांबद्दल आस्था होती. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्धधर्म स्वीकारल्यानंतर दुसऱ्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. आंबेडकर म्हणाले , ' आज मी समाधानी आहे. गांधींना दिलेलं आश्वासन मी पूर्ण केलंय. '

डॉ. आंबेडकरांच्या नियोजित ग्रंथलेखनात महात्मा फुले यांच्या चरित्राप्रमाणे महात्मा गांधींच्याही चरित्राचा समावेश होता. ते जाहीरपणे म्हणाले होते , ' माझ्यापेक्षा गांधींना अधिक कोण ओळखतं ? म्हणून मीच त्यांचं चरित्र लिहिणार आहे. ' गांधीजींच्या जिवाचीही चिंता आंबेडकरांना होती. त्यांनी गांधींना अनेकदा सावधही केलं होतं. ते गांधींना म्हणालेही होते , ' एक वैश्य , बनिया ब्राह्माणांसकट सर्वांचे नेतृत्व करतो , ही गोष्ट चातुर्वणीर् ब्राह्माणांना माहीत नाही , असं समजू नका ; पण एक गोष्ट तेवढीच खरी की , जोवर तुम्ही ब्राह्माणांचे हितसंबंध जोपासता तोवर तुमच्या महात्मापणाला धोका नाही. ज्या दिवशी तुम्ही ब्राह्माणांच्या हिताला बाधा आणाल , तेव्हा तुमची काय गत होईल , ते मी सांगण्याची गरज नाही. ' हे शब्द नथुरामने खरे केले. गांधींबद्दल आंबेडकरांच्या मनात असलेली ही आस्था त्यांच्या अनुयायांनीही आपल्याला रुजवायला पाहिजे होती. सत्तास्वार्थासाठी दलित नेत्यांकरवी दलित समाजाला वापरणारी काँग्रेस वाईट , म्हणून काँग्रेस ज्यांना आपल्या मोठेपणासाठी वापरते ते गांधीजीही वाईट , हा अविचार आंबेडकरांना मानणाऱ्यांनी झटकला पाहिजे.

डॉ. आंबेडकरांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल दुरावा असण्याचं कारणच नव्हतं. कारण सामाजिक समानतेच्या बाबतीत शिवाजी महाराज काळाच्या खूप पुढे होते. त्यांनी महार-मांग या शूर जातींतील वीरांना गडकरी , सैन्याधिकारी पदी नेमून त्यांचा सन्मान केला होता. शिवशाही स्थापताना त्यांनी जातीचा अधिकार मोडून काढला. गुणांना , कर्तबगारीला श्रेष्ठ मानलं. म्हणूनच वाई परगण्यात नागेवाडीची पाटीलकी नागनाक महाराला मिळाली. अष्टप्रधान मंडळात वेगवेगळ्या जातींच्या मंडळींची सारख्याच उंचीची बैठक पाहून देशमुखांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हा महाराज कडाडले , ' शिवशाहीत सर्वच बैठका एकाच उंचीच्या असतील , एकच फक्त त्यापेक्षा उंच असेल. ते जनताजनार्दनाने दिलेलं राजसिंहासन. ' रयतेचा राजा असा शिवरायांचा लौकिक होता. जनतेच्या सुख-दु:खांची त्यांना जाण होती , तसंच आपल्या जबाबदारीचंही भान होतं. लोकनेते म्हणवून घेणाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे.

शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी बरेच किल्ले जिंकले , नवे किल्ले बांधले. पण तिथे त्यांनी आपल्या नावाचा शिलालेख नाही बसवला. त्यांचा पुतळाही त्यांच्या निधनानंतर अडीचशे वर्षांनी आकारास आला. याउलट स. का. पाटलांसारख्यांनी आपल्या हयातीतच ब्राँझचा टोलेजंग पुतळा तयार करवून मुंबईत ठाकूरद्वारच्या उद्यानात बसवला. स. का. पाटील जाऊन पंचवीसेक वर्षंच झालीत , पण त्यांचं नाव विस्मरणात गेलेय. मात्र शिवरायांंचा पराक्रम प्रथम कळतो आणि त्यांचा भव्य पुतळा पाहूनही त्यांचा पराक्रम श्रेष्ठच राहतो.

महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्या पराक्रमाची थोरवीही अशीच आहे. ही माणसं दगडाच्या इतिहासासाठी नव्हती. ही दगडातून इतिहास निर्माण करणारी माणसं होती. ती वाटून घेण्यासाठी नाहीत. संपन्न भविष्याची वाट दाखवण्यासाठी आहेत. त्या तिघांपुढे एकाच वेळी नतमस्तक होणं , हीच खरी त्यांना आदरांजली आहे , त्यांच्या विचारतत्त्वाची आचारक्रांती आहे.

शिवचरित्रमाला भाग 154

शिवचरित्रमाला भाग १५३ महाराष्ट्रात तीन शिवजयंती उत्सव का होतात?

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन वेगवेगळ्या दिवशी साज-या केल्या जातात. त्या का यांची
माहिती...

१.बखरकारांनी निर्देशित केलेली वैशाख शुद्ध पंचमी शके १५४९ ही शिवजन्मतिथी इतर पुरावे मिळेपर्यंत संशोधकांनी प्रमाण मानली होती. काही पुराणमतवादी नवीन जन्मतिथी पुराव्यांशी सहमत नाहीत. म्हणून ते लोक त्या तिथीला शिवजयंती उत्सव करतात.

२.जेधे शकावलीनुसार फाल्गुन वद्य तृतिय शके १५५१ ही शिवजन्मतिथी बहुतांशी जुन्या नव्या संशोधकांना मान्य आहे. शिवकाळात इंग्रजी कालगणना हिंदुस्तानात प्रतलीत नव्हती. शिवराय हिंदूधर्माभिमानी होते. प्रभु रामचंद्र भगवान श्रीकृष्ण या सारख्या दैवतांत शिवरायांचे स्थान मानुन हिंदुधर्माभिमानी बहुतांशी या तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करतात.

३. सध्या हिंदुस्थानच्या सर्व सरकारी, नीम सरकारी, नागरी, आर्थिक, शैक्षणिक कारभार इंग्रजी कालगणनेनुसार चालतो. या देशांतील दिनदर्शिका इंग्रजी कालगणनेनुसार तयार केल्या जातात. ३७५ वर्षापूर्वी फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ ही हिंदु कालगणनेची शिवजन्म तिथी, इंग्रजी कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी आली होती. ती सरकारमान्य केली गेली. म्हणून सरकार व त्याच्याशी संबंधीत निरनिराळी अनुशासनालये यांच्यात एक वाक्यता राखण्यासाठी १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. तो शासकीय संमत सार्वजनिक सुट्टीचा असतो.

(अप्पा परब यांच्या ‘ शिवजन्म ’ या पुस्तकामधून साभार)

शिवचरित्रमाला भाग १५२ महाराजांचे निष्ठावंत मुस्लिम सरदार.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माला स्थान नव्हते. त्यांच्या राज्यात जीवाला जीव देणारे मुस्लिम सरदार हो
ते आणि त्यांना कायमच मानाचे स्थान मिळाले. महराजांच्या निष्ठावंत मुस्लिम सरदारांची ही ऐतिहासिक कामगिरी...

सिद्दी हिलाल
घोडदळातील सेनापती सहाय्यक
पन्हाळगडाच्या वेढ्यात (२ मार्च १६६०) शिवरायांच्या सुटकेसाठी युद्ध केले.
उमराणीजवळ बहलोल खानाशी लढून (१५ एप्रिल १६७३) त्याला शरण येण्यास भाग पाडले.

सिद्दी वाहवाह (सिद्दी हिलालचा पुत्र)
घोडदळातील सरदार
सिद्दी जोहरशी झालेल्या लढाईत जखमी (२ मार्च १६६०) आणि कैद.

सिद्दी इब्राहिम
शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, लष्कराचा हजारी, फोंड्याचा किल्लेदार
अफजलखानाच्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून त्याने कामगिरी (१९ नोव्हेंबर १६५९) चोख पार पाडली.
सुरुंग लावून फोंड्याचा किल्ला घेतला (एप्रिल १६७५) आणि त्यावर स्वराज्याचे निशाण फडकावले.

नूरखान बेग
स्वराज्याचा पहिला सरनोबत
२१ मार्च १६५७ रोजी स्वराज्याचा पहिला सरनोबत होण्याचा मान पटकावला.
दिड लाखाच्या सैन्याचे नेतृत्व करण्याची कामगिरी चोख पार पाडली.

मदारी मेहतर
विश्वासू सेवक
आग्रा येथील बंदीवासातून पळण्यासाठी (१७ ऑगस्ट १६६६) शिवरायांना सर्वतोपरी मदत.

काझी हैदर
शिवाजी महाराजांचा वकील आणि सचिव
१६७० पासून १६७३ पर्यंत शिवाजी महाराजांचा वकील म्हणून काम पाहिले.
खास सचिव आणि फारसी पत्रलेखक म्हणून काम पाहिले.

शमाखान
सरदार
कोंढाणा किल्ला स्वराज्यात येताच (फेब्रुवारी १६७०) आसपासचे मोगलांचे किल्ले आणि ठाणी जिंकून घेतली.

सिद्दी अंबर वहाब
हवालदार
जुलै १६४७ मध्ये कोंढाणा सर करताना मोठा पराक्रम गाजवला

हुसेनखान मियाना
लष्करातील अधिकारी
मसौदखानाच्या अदोनी प्रांत हल्ला करुन उध्वस्त केला.
बिळगी, जामखिंड, धारवाड (मार्च १६७९) जिंकले.

रुस्तमेजनमा
शिवाजी महाराजांचा खास मित्र
विजापूर येथील गुप्त बातम्या पाठवण्याचे काम चोख पार पाडले.
हुबळीच्या लुटीत कामगिरी (६ जानेवारी १६६५) चोख पार पाडली.
नेताजी पालकर यांना मदत (१८ मार्च १६६३) केली.
सिद्दी मसऊद चालून येत असल्याचे पाहून शिवाजी महाराजांना सावध केले.

दर्यासारंग
आरमाराचा पहिला सुभेदार
खांदेरीवर १६७९ मध्ये विजय मिळवला.
बसनूर ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी १६८५ या काळात लुटले.

इब्राहीम खान
आरमारातील अधिकारी
खांदेरी (१६७९) आणि बसनूरच्या ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी १६८५ या काळात झालेल्या लढाईत परक्राम केला.

दौलतखान
आरमाराचा प्रमुख (सुभेदार)
उंदेरीवर हल्ला (२६ जानेवारी १६८०)
खांदेरीच्या लढाईत पराक्रम (१६७८)
सिद्दी संबुळचा पराभव (४ एप्रिल १६७४)

सिद्दी मिस्त्री
आरमारातील अधिकारी
खांदेरी (१६७९), उंदेरी (१६८०), सिद्दी संबुळविरुद्धच्या लढाईत (१६७४) पराक्रम गाजवला.

सुलतान खान
आरमाराचा सुभेदार
शिवाजी महाराजांच्या काळात अधिकारी आणि १६८१ मध्ये सुभेदार.

दाऊतखान
आरमाराचा सुभेदार
अनेक आरमारी लढायांमध्ये पराक्रम गाजवला.
सुलतान खान नंतर सुभेदार झाला.
पोर्तुगीजांकडून दारुगोळा मिळवण्यात यशस्वी झाला.

इब्राहिम खान
तोफखान्याचा प्रमुख
स्वराज्यातील तोफखान्याचा प्रमुख.
डोंगरी किल्ल्याच्या लढाईमध्ये तोफखान्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली.

विजापूर आणि गोवळकोंड्यावरुन स्वराज्यात आलेले ७०० पठाण
पायदळ आणि घोडदळ
१६५८ पासून स्वराज्याची निष्ठापूर्वक सेवा केली. अखेरपर्यंत बेईमानी केली नाही.

घोडदळातील चार मोगली पथके
घोडदळातील सरदार आणि सैनिक
मोगलांना सोडून २६ ऑक्टोबर १६७२ मध्ये आलेल्या या वीरांनी स्वराज्याची निष्ठेने सेवा केली.

(प्रेम हनवते यांच्या 'शिवरायांच्या निष्ठावंत मुस्लिम सैनिक' या पुस्तकामधून...)

शिवचरित्रमाला भाग १५१ महाराजांनी राज्याभिषेक का करवून घेतला?

रणजीत देसाई यांच्या ‘ श्रीमान योगी ’ या पुस्तकाची नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेली प्रस्तावना ही श
िवचरित्राचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. याच प्रस्तावनेत कुरुंदकरांनी महाराजांनी राज्याभिषेक का करवून घेतला ते सांगितले आहे. तो भाग या प्रस्तावनेतून जसाच्या तसा...............................................

इ. स. १६७४ ला शिवाजीने स्वतःला राज्याभिषेक करण्यासाठी हजार प्रयत्न करून, आपले क्षत्रियत्व त्याने सिद्ध केले. मुंज केली. प्रायश्चित्तं घेतली. स्वतःच्या पत्निंशीच नव्याने लग्ने केली. अभिषेकाचा इतका खटाटोप शिवाजीने का केला असा एक प्रश्न आहे. बेंद्रे यांचे म्हणणे असे की, ब्राह्मण गुन्हेगारांना शासन करणे, धार्मिक प्रश्नावर निकाल देणे हा अधिकार यावा म्हणून शिवाजीने राज्याभिषेक करून घेतला. माझे म्हणणे असे की, तो काळ धार्मिक प्रभाव आणइ वर्चस्वाचा काळ आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राज्याभिषेकाला पावित्र्य आणि प्रतिष्ठा आहे. राज म्हणजे मुसलमान, ही त्यावेळची समजूत आहे.

दिल्लीपती हा सर्व भारताचा स्वयंभू सम्राट मानला जाई. यामुळे बहामनी घराणे वैभवात असतानाही जनतेला व खुद्द बहामनी वजीरांना आपल्या राज्याचा सम्राट दिल्लीपती व त्याचा अधिपती इराणच खलीफा वाटे. भारताचे अधिपत्य मिळाल्यानंतरही हे अधिपत्य इराणकडून मान्य करून घेणे अल्लाउद्दिनला इष्ट वाटले. औरंगजेबाच्या वेळी खलीफा तुर्की होता. त्याची मान्यता आपल्या अधिपत्याला मिळावी याचा अटोकाट प्रयत्न अलमगीरने केला. शेवटी ती मिळाली तेव्हा, आनंदोत्सव दरबार केला. आदिलशाही, कुतुबशाही, राजांना व सरदारांनासुद्धा दिल्लीपती हा आपल्या पादशाहीचा सम्राट वाटे. शिवाजीच्या वेळी अनेक रजपूत राजे होते.

त्यांचे मंचकारोहण होई व तख्तनशीनीचा समारंभही होई. राज्याभिषेक नव्हता. विजयनगरचे साम्राज्य स्थापन झाले. वैभवाला चढले. पण वैदिक विधिपूर्वक राज्याभिषेक नाही. इ. स. १००० च्या नंतर हा वैदिक विधीच लुप्त झाला होता. गागाभट्टाने धर्मग्रंथ पाहून तो नव्याने सिद्ध केला व शिवाजीला राज्याभिषेक केला. ही एक क्रांतिकारक घटना होती. एकीकडे राम, नल, युधिष्ठिर, विक्रमादित्य या परंपरेशी या कृतीने शिवाजी आपला सांधा जोडीत होता. दुसरीकडे अखिल भारतातील हिंदुंच्या धर्मनिष्ठा व धर्माचे सारे पूज्यत्व व पावित्र्य स्वतःमागे उभे करीत होता. आमच्या धर्मशास्त्राप्रमाणे सत्य युगात चार वर्ण असतात.

द्वापारयुगात वर्णसंकराला आरंभ होतो. त्रेतायुगात तीन वर्ण राहून संकर वाढतो. कलीयुगात ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण राहतात. आमच्या पुराणांप्रमाणे नंद घराणे संपले आणि क्षत्रिय संपले. तिथून पुढे शूद्रराजे आरंभ झाले. शिवाजी जणू इतिहासाचे चाक मुस्लीम पूर्व जागेपर्यंत मागे सरकवून हिंदुंच्या वेदपुराणांचा, स्मृतींचा व सर्व हिंदू वैभवाचा स्वतःशी सांधा जोडून नवे युग सुरू झाल्याची द्वाही फिरवू इच्छित होता. शिवराज्याभिषेकाकडे तात्कालिक सोयीचा भाग म्हणून न पाहता, त्या मागची भव्यता समजून घेतली पाहिजे. अभिषेक-विधी बेंद्रे यांनी संपादन केला आहे. आपण आपल्या कादंबरीत या प्रसंगाची सर्व भव्य पवित्र भूमिका ठसठशीतपणे मांडावी असे मला वाटते.

स्वतःला वैदिक मंत्रांनी अभिषिक्त करून घेण्याची कल्पना शिवाजीच्या मनात केव्हापासून आली असावी ? मला वाटते, ती फार पूर्वीपासून असावी. कारण त्याने प्रधानाचा शिक्का असा घेतला आहे - शिवनगरपती हर्ष निधान सामराज मतीमत् प्रधान. हा शिक्का १६५३ पासूनचा आहे. यातील हर्षनिधान या विशेषणाला संस्कृत काव्य वाड्मयाची पार्श्वभूमी आहे. अभिषिक्त राजा म्हणजे सर्वांस अभय व न्यायाची हमी, प्रजेच्या नियमांची व सुखाची हमी. मात्सन्यायातील दुःखांपासून प्रजेची सुटका, अशी वर्णने कौटिल्यापासून आहेत. काव्यातही आहेत. अर्थात हे एक माझे अनुमान.

शुक्रवार, १७ एप्रिल, २००९

शिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत !


सूर्यालाही तेजोवलय असते. महाराज शिवाजीराजे यांच्याही जीवनाला एक विलक्षण तेजोवलय होते. ते होते जिजाऊसाहेबांचे. कर्तृत्वाच्या प्रचंड दुदुभीनिनादाच्या मागे सनईचौघडा वाजत असावा तशीच शिवाजीमहाराजांच्या जीवनाच्या मागे जिजाऊसाहेबांची सनई निनादत होती. जिजाऊसाहेब हे एक विलक्षण प्रेरक असे सार्मथ्य होते. महाराजांना जन्मापासून सर्वात जास्त मायेचा आशीर्वाद लाभला तो आईचाच. त्यांना उदात्त, उत्कट आणि गगनालाही ठेंगणी ठरविणारी महत्वाकांक्षी स्वप्ने वयाच्या अगदी लहानपणापासूनच पडू लागली. ती आईच्या सहवासातच. महाराज लहानपणापासूनच खूप-खूप मोठे झाले.

त्यांचे प्रेरणास्थान पाठीवरून फिरणाऱ्या आईच्या मायेच्या हातातच होते. अगदी अलिप्त मनाने या आईच्या आणि मुलाच्या जीवनाचा अभ्यास केला तर जिजाऊसाहेबांची कधी दृश्य तर कधी अदृश्य, म्हणजेच कधी व्यक्त झालेली तर कधी अव्यक्त राहिलेली प्रेरक शक्ती अभ्यासकांच्या प्रत्ययास येते. प्रतिपच्चंद लेखेव ही महाराजांची विश्ववंद्य मुदा केव्हा निर्माण झाली? आज तरी या मुदेचे अस्सल पत्र इ. स. १६३९ चे सापडले आहे. पण जिजाऊसाहेबांच्या बरोबर बोट धरून शिवाजीराजे पुण्यास वडिलांच्या जहागीरीचा अधिकृत अधिकारी म्हणून आले त्याचवेळी, म्हणजे इ. स १६३७च्या अगदी प्रारंभी ही प्रतिपच्चंद लेखेव मुदा निर्माण केली गेली असली पाहिजे.

या मुदेतील नम्र पण उत्तुंग ध्येयवाद खरोखरच गगनाला गवसणी घालणारा आहे. शुद्ध, संस्कृत भाषेत असलेली ही कविताबद्ध मुदा प्रत्यक्षात कोणा संस्कृत जाणकार कवीकडून जिजाऊसाहेबांनी तयार करवून घेतली असेल. पण त्यातील अत्यंत नेटका आणि तेवढाच प्रखर आदर्श ध्येयवाद या बालशिवाजीराजापुढे अन् अवघ्या युवा विश्वापुढे कोणी मांडला असावा? जिजाऊसाहेबांनीच. या आईचे जेवढे काही कार्य आणि कर्तृत्व आपणास अस्सल कागदोपत्री उपलब्ध आहे ते वाचल्यावर आणि त्याचे चिंतन केल्यावर हे आपणास निश्चित पटेल. आपणच विचार करून ठरवा. वयाच्या अवघ्या कोवळेपणापासूनच महाराजांचे मन कसा आणि कोणता विचार करत होते?

तो विचार होता क्रांतिकारक बंडाचा. स्वातंत्र्याचा. आदिलशहा बादशहाचे पहिले फर्मान या स्वातंत्र्यबंडाच्या विरोधात सुटले ते दि. ११ एप्रिल १६४१ चे आहे. महाराज त्यावेळी अकरा वर्षाचे आहेत. इतक्या लहान वयात प्रचंड सुलतानी सत्तांविरूद्ध स्वातंत्र्ययुद्धाचा विचार आणि नेतृत्व करणारा जगाच्या इतिहासात शिवाजीराजांशिवाय आणखी कोणी आहे का? एक मुलगा हे बंड करतो आहे. या बंडाची प्रेरणा त्या प्रतिपच्चंद लेखेव मुदेत आहे. या मुदेमागे उभ्या आहेत जिजाऊसाहेब. पहा पटते का. घरातील वडिलधारी व्यक्ती म्हणून सर्व अधिकार जिजाऊसाहेबांच्याच हातात होते. राजांना शिकवित.. शिकवित सर्व कारभार त्याच पहात होत्या.

पण तो शिवाजीराजांच्या नावाने. न कचरता प्रत्येक भयंकर संकटला तोंड देणारी ही आई आणि तिची सतत कणखरपणे टिकून राहिलेली मानसिकता आपण विचारात घेतली तरच हे सारे पटेल. जिजाऊसाहेब जरूर त्याच वेळी राज्यकारभारात सल्लामसलत देताना दिसतात. अफजलखानाचा पुरता म्हणजे निर्णायक सूड घेण्याचा सल्ला राजांना देतात. प्रसंगी सिद्दी जोहारविरुद्ध युद्धावर जाण्याची स्वत: तयारी करतात, आग्ऱ्यास जाऊन राजकारण फते करून या म्हणून राजांना या अवघड राजकारणात पाठबळ देतात, आग्रा प्रसंगीचा स्वराज्याचा राज्यकारभार स्वत: जातीने सांभाळतात आणि प्रसंगी शाहीस्तेखानासारख्या अतिबळाच्या शत्रूविरुद्ध स्वराज्याची उत्तर सरहद्द सांभाळतात हे आपण पाहिले की या आईच कणखर मन आपल्या लक्षात येते.

अत्यंत साध्या आणि सात्विक आचार विचाराच्या या आईचा संस्कार किती प्रभावी ठरला हे शिवचरित्राच्याच साक्षीवरून लक्षात येते. महाराज आग्ऱ्याहून आल्यानंतर जिजाऊसाहेबांनी राज्यकारभारात प्रत्यक्ष कुठेच भाग घेतलेला दिसत नाही. पण आईपणाच्या नात्याने स्वराज्याच्या संघटनेवर त्यांची सतत पाखर दिसते. विठोजीनाईक शिळमकर वा तानाजी मालुसरे यांच्या बाबतीत त्यांनी दाखविलेली मायाममता अगदी बोलकी आहे. त्यांच्या उद्दात आचारविचारांचा प्रभाव तेजोवलयासारखा शिवाजीमहाराजांच्या जीवनात दिसून येतो. जिजाऊसाहेब मरण पावल्या आणि महाराजांचा आनंद कायमचा मावळला.

जिजाऊसाहेबांच्या मरणानंतर त्यांच्या खाजगी खजिन्यात पंचवीस लाख होन म्हणजे सुमारे एक कोटी रुपये शिलकीत ठेवलेले लक्षात आले. ही नोंदही बोलकी आहे. इंग्लडच्या इतिहासात, 'ओ जॉर्ज, यू ट्राय टू बी ए रिअल किंग' असं सांगणाऱ्या एका इंग्लिश राजमातेचं अपार कौतुक केलं जातं. वास्तविक या जॉर्जचा संघर्ष होता स्वत:च्याच पार्लमेंटशी. कोणा आक्रमक परकीय शत्रूशी नव्हे. नेपोलियनच्या आईचही कौतुक फ्रेंच चित्रकारांनी कलाकृतीत रंगविले. अशी आणखीही काही उदाहरणे देता येतील.

आमचे मात्र जिजाऊसाहेबांच्या उदात्त आणि प्रेरक अन् तेवढ्याच उपभोगविन्मुख अन् प्रसिद्धीविन्मुख चरित्राकडे जेवढे चिंतनपूर्वक लक्ष जावयास हवे आहे तेवढे गेलेले नाही. रायगडावर पाचाड येथे जिजाऊसाहेबांची समाधी महाराजांच्याच वेळी बांधली गेली. अगदी साधी समाधी. पण तीही पुढे कोसळली. फलटणच्या श्ाीमंत मालोजीराजे आणि श्ाीमंत सौ. लक्ष्मीबाई राणीसाहेब यांनी या समाधीचा जीणोर्द्धार केला. म्हणूनच ही समाधी आज आपल्यापुढे उभी आहे.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान!

शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यान
ंतर बहुधा दुसऱ्याच दिवशी जिजाऊसाहेबांना रायगडावरून खाली पाचाड गावातील वाड्यात आणण्यात आले. त्यांची प्रकृती बरी नव्हतीच. त्यांनी पाचाडला अंथरुण धरले. हे त्यांचे अंथरुण शेवटचेच होते. वार्धक्याने त्या पूर्ण थकल्या होत्या. त्यांचे वय यावेळी ७४ किंवा ७५ असावे. त्या आता कृतार्थ मनाने मृत्यूला सामोऱ्या जात होत्या.

शिवाजीमहाराजांपेक्षा जिजाऊसाहेबांचे जीवन खडतर गेले होते. त्यांनी आयुष्यभर चिंतेतच दिवस काढले. ती त्यांची चिंता होती. स्वराज्याची , रयतेची आणि शिवाजीराजांची. प्राणावर बेतणारी संकटे महाराजांवर येत होती. मृत्यूच्या ओठावरच महाराज स्वराज्यासाठी लपंडाव खेळत होते. मृत्यूने जीभ फिरवली असती तर हा आट्यापाट्यांचा डाव मृत्यूने त्यांच्या सवंगड्यांसह गिळून टाकला असता. पण प्रत्येकवेळी महाराजांचा जणू पुनर्जन्मच होत गेला. पण त्या पुनर्जन्माच्या भयंकर प्रसूतीवेदना जिजाऊसाहेबांना सहन कराव्या लागल्या. त्या त्यांनी सहन केल्या , न कण्हता , न विव्हळता. जिजाऊसाहेब सतत चिंतेच्या चितेत उभ्या जळतच राहिल्या. आता शेवटचे जळणे त्या मानाने अगदीच शांत आणि शीतल ठरणार होते. या त्यांच्या अखेरच्या दहा-बारा दिवसांचा तब्बेतीचा तपशील कोणी लिहून ठेवलेला सापडत नाही. पण त्या नक्कीच शांत होत्या. कृतार्थ होत्या. प्रसन्न होत्या. त्यांनी अपार दानधर्म केला होता.

त्यांनी सर्वात मोठे दान या महाराष्ट्राला आणि भारतवर्षाला दिले होते. त्यांनी सूर्यपराक्रमी छत्रपती या भूमीला दिला होता. त्यांच्या शिवनेरीवरील अंगाई गीतांचे वेदमंत्र झाले होते. त्यांच्या आसवांच्या सप्तगंगा झाल्या होत्या. त्यांच्या हृदयाचे सिंहासन झाले होते. त्यांच्या मायेचे छत्र झाले होते. त्या तृप्त होत्या. दिवसा दिवसाने ज्योत मंदावत होती. तेल संपले होते. ज्योत जळत होती फक्त.

आपण जिजाऊसाहेबांच्या कथा अत्यंत आवडीने ऐकतो , सांगतो. पण त्या कथांच्यामागे केवढी व्यथा धगधगत होती , याचा आपण कधी विचार करतो का ?

कधीकधी मनात दडलेला कवी जागा होतो आणि विचार करू लागतो. ज्याक्षणी महाराज शिवाजीराजे सोन्याच्या सिंहासनावर आरूढ झाले आणि त्यांच्या मस्तकावर छत्र धरले गेले त्याक्षणी राजसभेत आनंदकल्लोळ उसळला. लोकांचे चौघडे झडू लागले. हे इतिहासाला माहितच आहे पण त्याक्षणी जिजाऊसाहेबांच्या डोळ्यांना समोर काय दिसले असेल ? काहीच दिसले नसेल आनंदाश्रूंच्या डोहात कलियामर्दन करणारा योगेश्वर त्यांना दिसला असेल. अर्जुनाचे सारथ्य करणारा श्रीकृष्ण दिसला असेल.

जिजाऊसाहेब आता निघाल्या होत्या. दहा वर्षांपूवीर् शहाजीराजे मरण पावले , तेव्हा त्या सती जायला निघाल्या होत्या. महाराजांनी त्यांना कळवळून गळामिठी घालून रडून आकांत करून परत आणले होते. पण आता मात्र ते अशक्य होते.

दिनांक १७ जून , बुधवारचा दिवस मावळला रात्र झाली , अंधार दाटत गेला , काळोखाने पृथ्वी गिळली. एक ज्योत मंदमंद होत गेली आणि जिजाऊसाहेबांनी डोळे मिटले. महाराजांच्या आणि महाराष्ट्राच्या आऊसाहेब गेल्या. महाराजांच्या मनात त्याक्षणी जो आकांत उसळला असेल तो अंदाजाने तरी शब्दात सांगता येणे शक्य आहे का ?

ती अखेरची यात्रा निघाली असेल. आऊसाहेबांचा देह पालखीत ठेवला गेला असेल. कैलासाच्या दिशेने पालखी चालू लागली असेल. महाराजांनी अखेरचे दंडवत आऊसाहेबांना घातले असेल. त्यावेळी त्यांच्या ओठातून कोणते शब्द उमटले असतील ? इतिहासाला काहीच माहीत नाही. त्याला काहीच ऐकू आलेले नाही. पण असं वाटतं की , महाराज पुटपुटले असतील ,

' इष्ट कार्य प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनायच ' ज्वाला आकाशाला पोहोचल्या.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा

राज्याभिषेकाच्या दरबारात इंग्रज वकील हजर होता. त्याने महाराजांस नम्रतेने नजराणा अर्पण केला. त्याने एक सुंदर खुर्ची गडावर आणली होती. ती त्याने दुसऱ्या दिवशी (दि. ७ जून) राजवाड्यात नेऊन महाराजांस नजर केली. सारा सोहळा अत्यंत आनंदात आणि वैभवात साजरा झाला. आलेल्या प्रत्येक पाहुण्यास कोणत्या ना कोणत्या स्वरूपात महाराजांनी प्रतिआहेर म्हणून काही ना काही देण्याची योजना केली होती. कडेवरील लहान मुलांच्या हातातही काही ना काही (बहुदा पैसे) देण्यात आले.

देवराई होन , प्रतापराई होन आणि शिवराई होन ही नाणी सोन्यात पाडण्यात आली होती. सर्वच नाण्यावर एका बाजूस ' श्रीराजा शिव ' आणि दुसऱ्या बाजूस ' छत्रपती ' अशी अक्षरे होती. शिवराई नाणे तांब्याचे होते. याशिवाय फलम आणि चक्र या नावाची दोन नाणी होती. या दोन नाण्यांचे कागदोपत्री उल्लेख वा हिशेब सापडतात. पण प्रत्यक्षात एकही फलम आणि चक्र नाणे अद्याप सापडलेले नाही. या नाण्यांचे एकमेकांशी कोष्टकात नेमके काय नाते होते तेही लक्षात येत नाही.

राज्याभिषेक सोहाळ्यात प्रत्यक्ष वापरलेली सुवर्ण सिंहासनापासून गळ्यातील कवड्याच्या माळेपर्यंत प्रत्येक वस्तूला केवढे ऐतिहासिक मोल आणि महत्त्व आहे! हे महान राष्ट्रीय धन आजपर्यंत प्राणापलिकडे जपले जावयास हवे होते. महाराजांच्या कमरेचा रत्नजडित ' दाब ' म्हणजे कमरपट्टा आजच्या किंमतीने कल्पनेपलिकडचाच ठरावा. इ. १८९० पर्यंत तो अस्तित्त्वातही होता. पण पुढे काय झाले ते इतिहासास माहीत नाही. पण ही सारी राष्ट्रीय संपत्ती आज असती , तर त्यातील प्रेरणा ही अनमोल ठरली असती.

आज श्रीमंत महाराज छत्रपती उदयनमहाराज यांनी मात्र अतिशय दक्षतेने शिवछत्रपती महाराजांची भवानी तलवार , सोन्याचा एक होन , महाराजांचे रोजच्या पूजेतील शिवलिंग (बाण) आणि श्री समर्थ रामदासस्वामींच्या लहान आकाराच्या पादुका राजवाड्यात सांभाळल्या आहेत. तसेच लंडनमध्ये बकींग हॅम पॅलेसमध्ये एक अतिशय मौल्यवान रत्नजडित मुठीची तलवार फारच चांगल्यारितीने ठेवलेली आहे. ती तलवार भवानी तलवार नाही. तिचे नाव जगदंबा असे आहे. पण तीही तलवार थोरल्या शिवाजी महाराजांचीच आहे , यात शंका नाही. तसेच महाराजांचे पोलादी. वाघनख लंडनमध्ये व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहे.

राष्ट्रीय महत्त्वाच्या वस्तू आणि वास्तू केवढ्या दिमाखात जपल्या जातात हे युरोपिय देशात पाहावे. विशेषत: रशिया आणि इंग्लंडमध्ये हा दिमाख आपल्याला विस्मित करणारा आहे. लंडनच्या टॉवर ऑफ लंडन या भुईकोट किल्ल्यात इंग्लिश राजा राण्यांचे जडावाचे दागिने आणि वस्त्रे फार फार दिमाखाने ठेवलेली आहेत. आपला कोहिनूर हिरा तिथेच आहे. इंग्लंडच्या राजाराणीला राज्याभिषेक जेथे केला जातो , तेथे सिंहासनाच्या पुढे ठेवलेले एक फरशीचा म्हणजे पाषाणाचा , जरा तुटलेला , पायरीसारखा तुकडा काही वर्षांपूवीर् अचानक नाहिसा झाला.

सारे इंग्लिश राष्ट्र कळवळले. अस्वस्थ झाले. एकच शोधाशोध युद्धपातळीवरून चालू झाली. पण चारदोन दिवसातच ती तुटकी फरशी सापडली. अन् मग आनंदीआनंद! आमच्याकडे कवींद रविंदनाथ टागोरांचे नोबेल पारितोषिक हरविले. आपणही यथाशक्ती हळहळले. पण चहाच्या कपातील चहासुद्धा हलला नाही. मग त्यात त्सुनामी लाटा कुठून उठणार ? रशियात साम्यवादी क्रांती झाली. झार राजाराणी संपले. कम्युनिस्ट राज्य आले. पण रशियाच्या राजघराण्याचे राजमुकुट , राजदंड आणि अन्य जडजवाहिरांचे अलंकार रशियाच्या राष्ट्रीय म्युझियममध्ये गुपितासारखे सांभाळून जपून ठेवले आहेत. ते फक्त रशियन नागरिकांनाच पाहण्याचा मान आहे. इतरांना ते पाहता येत नाहीत.

आता निदान या सर्व राजचिन्हांच्या प्रतिकृती करून त्या म्युझियममध्ये ठेवल्या पाहिजेत. महाराजांच्या उजव्या हाताचा , चंदनाच्या गंधात हात (पंजा) बुडवून कागदावर उमटवलेला ठसा सापडला आहे. म्हसवडचे राजे माने यांना महाराजांनी त्याकाळी ' पंजाच्या डौलाचे ' जे अभयपत्र पाठविले , त्या पत्राच्या माथ्यावर हा चंदनातील पंजा उमटवलेला आहे. तो साताऱ्याच्या म्युझियममध्ये आहे.

राज्याभिषेकाचा सोहळा पूर्ण झाला. काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ भरलेले असायचे. गडावरील हवा ही अशी पावसाळी. म्हणून महाराज जिजाऊसाहेबांना गडावरून खाली पाचाड गावात असलेल्या वाड्यात घेऊन आले. त्या अतिशय थकलेल्या होत्या. त्यांचं अंत:करण तृप्त होतं. महाराजांनी आपल्या दोन्ही मातांची सर्वस्व ओतून सेवा केली होती. थोरली माता ही जन्मभूमी , स्वराज्यभूमी आणि धाकटी माता प्रत्यक्ष जन्मदायी पुण्यश्लोक जिजाऊसाहेब. तिनेच या मातृभूमीला छात्रचामरांकीत गजराज राजचिन्हांकित सुवर्णसिंहासनाधिष्टीत क्षत्रिय कुलावतांस छत्रपती राजा दिला. सारे सारे मातृऋण फेडिले. आता अखेरच्या दिवसांतही राजा मातृसेवेत मग्न होता.

दिवसादिवसाने आऊसाहेबांची प्रकृती क्षीण होत होती.

रायगडावरील बाकीची कामेधामे कारभारी मंडळी पाहात होती. पाहुणे परतत होते. रायगड नकळत सुन्न झाला होता. ऐन पावसातही राज्याभिषेकाच्या मांडवझळा दाहत होत्या. राज्याभिषेकाचा आनंद कमी होत नव्हता. पण गंभीर होत होता.

अखेरच्या प्रवासासाठी जिजाऊसाहेबांनी प्रस्थान ठेविले होते. जणू रायगडाचे बुरुज मुक्या शब्दात आऊसाहेबांना विचारीत होते , ' आऊसाहेब , आपण निघालात! पुन्हा परत कधी येणार ?'
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १४७ 'मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली'

संत वाङ्मयातील ज्ञानेश्वरीचा वा श्रीतुकाराम महाराजांच्या गाथेचा सप्ताह चालावा किंवा शौर्यदर्शी खेळांचा महोत्सव साजरा होत राहावा किंवा एखादा यज्ञ चालावा तशाच प्रकारचा हा राज्याभिषेक सोहाळा रायगडावर चालू होता. आनंदाच्या डोही आनंदाचे तरंग उमटत होते. अजि सोनियाचा दिनु , वषेर् अमृताचा घनु या वचनांची साक्षात अनुभववृष्टी रायगड अनुभवित होता. यज्ञ करणारा यजमान राजा प्राचीन काळी ज्या पद्धतीने आठ-दहा दिवस व्रतस्थ राहत असे , तसेच महाराज या सप्ताहात अहोरात्र व्रतस्थ राहिले होते. खरं म्हणजे , त्यांचं सारं आयुष्यच व्रतस्थ होतं.

राज्याभिषेकाचे विधी दोन प्रकारचे. प्रथम विधी अभिषेकाचा. त्यात पंचामृत आणि सर्व गंगोदके अन् समुदोदके यांनी अभिषेक हा अभिषेक म्हणजेच राज्याभिषेक. हा विधी राजवाड्यात आतील भागात , मोठ्या दालनात करण्यात येणार होता. या कार्यक्रमाला अष्टप्रधान , राजमंडळातील सरदार आणि राजकुटुंबाचे नातलग उपस्थित राहणार होते. सर्वसामान्य मंडळींना या कार्यक्रमात स्थान अपेक्षित नव्हते. पण अभिषेकानंतर राऱ्यारोहण म्हणजेच सिंहासनारोहण हा विधी तमाम उपस्थितांसाठी खुला राहणार होता.

पहाटे सुमारे तीन वाजल्यापासूनच या सोहळ्यास प्रारंभ झाला. वार्धक्याने वाकलेल्या जिजाऊसाहेब हा सर्वच सोहाळा पहात होत्या. इलियड या डच प्रतिनिधीने म्हटले आहे की , राजाची वयोवृद्ध आई एका जागी बसून हे सर्व पाहत होती.

महाराजांच्या महाराणी साहेबांच्या आणि युवराजांच्या मस्तकावरून जेव्हा भारतातील सप्तगंगाच्या धारा घळघळल्या असतील , तेव्हा महाराजांना काय वाटले असेल ? गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी यातील एकही नदी स्वराज्यात नव्हती. फक्त गोदावरीचा जन्म त्र्यंबकेश्वरला होत होता. पण ही गंगा कशीबशी नासिकपर्यंत येते न येते तोच पूर्व दिशेस तिला मोगलाई पारतंत्र्यात प्रवेश करावा लागत होता. महाराजांच्या कानाशेजारून घळघळताना या गंगा राजाला म्हणाल्या असतील का , ' राजा , तू आम्हाला माहेरी आणलंस रे! खूप आनंद झालाय. पण आमचं सारं जीवन पारतंत्र्यात चाललंय रे! तू आम्हाला मुक्त कधी करणार! '

हे सारे विचार तुमचे आमचे आहेत. हे खरंच आहे. म्हणजेच या देशाचेही आहेत हे ही खरंच ना! महाराजांनी एकदा रावजी सोमनाथ पत्की या आपल्या अधिकाऱ्याशी बोलताना म्हटलं की , सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापावेतो हा आपला मुलुख पूर्ण स्वतंत्र करावा , अशीच माझी इच्छा आहे.

राज्याभिषेकाचा मंत्रतंत्रयुक्त सोहळा पूर्ण झाला आणि महाराज , महाराणी अन् युवराज वस्त्रालंकार धारण करून राऱ्यारोहणाकरिता राजसभेकडे जाण्यास सिद्ध झाले. त्यांनी कुलदेवतांना देवघरात नमस्कार केला. वडिलधाऱ्यांना आता नमस्कार करावयाचा. कोण कोण आणि वडिलधारे ? बाजी पासलकर ? कान्होजी नाईक जेधे ? सोनो विश्वनाथ डबीर ? आणखीन कोणी कोण ? पण ही सर्व वडिलधारी मंडळी केव्हाच स्वर्गवासी झाली होती. होत्या पुण्यश्लोक जिजाऊसाहेब. महाराजांनी त्यांना वंदन केले.

महाराज पहाटेच्या प्रकाशात अन् मशालींच्या उजेडात राजसभेत सिंहासनापाशी आले. पूवेर्कडे तोंड करून सिंहासनापाशी उभे राहिले. बरोब्बर समोर पूवेर्स दोन किल्ल्यांची शिखरे दूरवर , निळ्या आकाशावर दिसत होती. एक होता राजगड. दुसरा होता तोरणा.

स्वराज्याचा अगदी प्रारंभ याच दोन गडांच्या अंगाखांद्यावर महाराजांनी केला होता. आग्रा भेटीच्या राजकारणापर्यंत महाराजांनी सगळी राजकायेर् , कारस्थाने आणि मोहिमा या राजगडावरूनच केली होती. राजगड शुभलक्षणी ठरला होता. बलाढ्य तर होताच. पण राज्याभिषेक मान मिळत होता , रायगडाला राजधानीचा सन्मान लाथत होता , रायगडाला तो समोरचा राजगड किंचितही हेवादावा न करता , महाराजांचा रायगडावरचा सोहळा नगाऱ्यांच्या दणदणाटात आणि तोफा बंदुकांच्या धडधडाटा , खळखळून जणू हसत बघत उभा होता. रायगड म्हणजे राजगडाचा भाऊच. मन कसं भरतासारखं असावं. राजगडाचं तसंच होतं. पराक्रमाची शर्थ करणाऱ्या असंख्य मावळ्यांना रायगडावरील राज्याभिषेकाला उपस्थित राहता आलं नव्हतं. ते जमणारही नव्हतं. त्यांना आपापल्या जागीच गस्त पहारे करीत उभं राहावं लागणार होतं. कोणीही नियम मोडून रायगडाकडे धावत नव्हता. अन् यातच या मावळ्यांत असलेलं ' शिवाजीपण ' व्यक्त होत नव्हतं काय ?

विशाल मंदिर उभं राहणे हे महत्त्वाचे कळस कुणी व्हायचे अन् मंदिराच्या पायात कायमचे कुणी राहायचे. हा प्रश्ान् या मावळ्यांच्या दृष्टीने अगदी गौण. राष्ट्रनिमिर्ती याच आराधनेतून होत असते.

महाराज उभे होते. त्यांच्या उजव्या हाती सोन्याची विष्णुची छोटी मूतीर् होती. दुसऱ्या हाती धनुष्य होते. वेदमंत्रघोष चालू होता. मुहूर्ताची घटका बुडाली आणि कुलोपाध्याय अन् अध्वर्यू गागाभट्ट यांनी महाराजांना सिंहासनावर आरूढ होण्याची खूण केली. ते आरूढ झाले आणि एकच जयघोष निनादला , ' महाराज क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधिश्वर राजा शिवछत्रपती की जय! '

प्रचंड आनंद कल्लोळ उसळला. फुले , अक्षता , लाह्या बत्तासे , बिल्वदळे , तुलसीपत्रे इत्यादींची मंगलवृष्टी सतत होत राहिली. वाद्ये आणि तोफा दणाणू लागल्या. कलावंत गाऊ नाचू लागले. चवऱ्या मोचेर्ले सिंहासनाशेजारी झळाळू लागले. भगवे झेंडे आणि राजचिन्हे डोलू लागली. सार्वभौमत्त्वाचा दिमाखात छत्र झगमगत होते. हा सोहळा पाहताना राजमाता जिजाऊसाहेबांना काय वाटलं असेल , ते कोणच्या शब्दात सांगायचं ? इथे सरस्वती आणि बृहस्पतीही अवाक् होतात. आऊसाहेबांनी याचसाठी केला होता अट्टाहास. आपल्याच एका मनाला वाटतंय की , हा सोहाळा बघावयास प्रत्यक्ष शहाजीराजे महाराजसाहेब यावेळी हवे होते. पण लगेच सावध होणारे दुसरे मन म्हणते , नाही रे वेड्या , जर शहाजीराजे यावेळी असते , तर शिवाजीमहाराजांनी तीर्थरूप शहाजीराजांना आणि तीर्थरूप सकलसौभाग्यसंपन्न जिजाऊसाहेबांनाच हा राज्याभिषेक केला असता अन् त्यांच्या मस्तकावर छत्र धरले असते. चवऱ्या मोचेर्ले ढाळले असते. शहाजीराजे नव्हते , म्हणूनच तर महाराजांना स्वत:लाच छत्रपती व्हावं लागलं ना!

महाराज नंतर मिरवणुकीने हत्तीवरून देवदर्शनास गेले. परतल्यावर त्यांनी आऊसाहेबांना वंदन केले , अन् म्हणाले , ' आऊसाहेब ' हे सर्व तुमच्या आशीर्वादानेच प्राप्त जाहले! '

आणि सार्वभौम छत्रपती शिवाजीराजा आईशेजारी बसला , आता त्याचे तेच एकमेव आराध्य दैवत उरले होते.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले!

राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या आप्तइष्ट मित्र , सेवक , अधिकारी , कलावंत , पंडित आणि पाहुणे यांची संख्या किती होती ? त्या काळाच्या मानाने ती प्रचंड होती. कुणी म्हटलंय , ८० हजार कुणी म्हटलंय ५० हजार गृहीत धरली तरी ती प्रचंडच आहे. आपल्या हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींना वंदन करण्यास एवढे लोक आले होते. आजही आम्हाला ऊर भरून आनंद होतो , की १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी दिल्लीत लाल किल्ल्याच्या समोर अवघ्या भारतातून सहस्त्र लोकगंगांचे प्रवाह खळाळत , धावत येतात. शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आणि आमच्या आजच्या स्वातंत्र्यसोहोळ्यांचे महत्त्व एकच आहे. आम्ही पूर्णपणे सार्वभौम स्वतंत्र आहोत या भावनेची आणि जाणीवेची किंमत किती मोठी आहे हे कोणत्या शब्दात सांगावं!

अरे , इंदधनुष्याचा तराजू घ्या , तो कल्पवृक्षाच्या फांदीला टांगा , त्याला एक पारडे लावा इंदसभेचे अन् दुसरे पारडे लावा नंदनवनाचे. अन् मग त्यातल्या एका पारड्यात विश्वातील सर्व सुख आणि सर्व वैभव टाका. अन् दुसऱ्या पारड्यात स्वातंत्र्य टाका. ते स्वातंत्र्याचं पारडं इतकं जड होईल की , सुखवैभवांचं दुसरं पारड आकाशात भिरकावलं जाईल. जगातील सारी स्वतंत्र राष्ट्र आपापल्या स्वातंत्र्याचं लेणं केवढ्या दिमाखात मिरवतात आणि जपतात. ब्रिटीश पोरं नाचत गात म्हणतात , ' ब्रिटन नेव्हर बी एस्लेव्ह ब्रिटन रुल्स द वेव्हज् ' आम्हीही शिवाजीमहाराजांप्रमा णे जन्मजात स्वराज्यानिष्ठच असणारच.

या राज्याभिषेक सोहाळ्यात एक विधी फार मामिर्क होता. तो म्हणजे शुभलक्षणी अश्वांच्या रथात धनुष्यबाण जोडून महाराज उभे राहिले , सरसेनापतीनी सारथ्य केलं आणि महाराज दिग्विजयास निघाले. म्हणजे नेमकं काय केलं ? या रथातून जनसमुदायाच्या उपस्थितीत महाराज रायगडावरच्या राजरस्त्याने सुमारे सातआठशे पावले गेले. हे दिग्विजयाकरता केलेले शिलंगण प्रतीकात्मक किंवा प्रातिनिधीक होते. या शिलंगणाचा आत्मा लक्षात घेतला पाहिजे. तो स्पष्ट आहे. स्वराज्याच्या विस्ताराकरीता साधर्माच्या रक्षणाकरीता प्रजाजनांच्या कल्याणाकरिता , पुरुषार्थ गाजविण्याकरिता राज्युधुरिणांनी सतत राष्ट्र जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सीमोल्लंघन केलेच पाहिजे. महत्त्वाकांक्षा धरलीच पाहिजे. त्या आकांक्षापुढे गगनांहूनही उत्तुंग असलीच पाहिजे. त्या आकांक्षेपुढे गगनही ठेंगणे ठरलेच पाहिजे. त्याकरिता हे प्रतीकात्मक प्रदर्शन आणि निदर्शन.

राज्यशास्त्राप्रमाणे आणि धर्माज्ञेप्रमाणे महाराजांनी भूमीपूजा , जलपूजा , ध्वजपूजा , शास्त्रपूजा , अश्वपूजा , गजपूजा , सवत्सधेनुपूजा , धनपूजा इत्यादी या सर्व देवतांच्या पूजा केल्या. सर्वात मोठी पूजा त्यांच्या हृदयाच्या गाभाऱ्यात चालू होती. अन् ती होती मातृपूजा.

किल्ले कोटांवरील , सुभे परगण्यांवरील आणि आरमारावरील ज्येष्ठ पदाधिकारी गडावर आले होते. राजदुंदुभी त्रिकाळ झडत होत्या. सारा रायगड आनंदाने दुधासारखा ऊतू जात होता. पण स्वराज्यात गावोगाव राहणाऱ्या अशा असंख्य विधवा स्त्रिया नक्कीच होत्या , की ज्याच्या पतींनी स्वराज्यासाठी रणांगणात प्राण अर्पण केले होते. त्या सकल सौभाग्यसंपन्न अखंडित लक्ष्मीअलंकृत विधवांना काय वाटत असेल या राज्याभिषेकाच्या वार्ता आणि वर्णन ऐकून ? आनंदच. मनातून त्या म्हणत असतील का , हे जगदंबे , ' क्षण एकच कर मजला सधवा ' एकच क्षण मळवट भरते , रायगडावर जाते , राजाला ओवाळते. घरी आल्यावर पदराने मळवट पुसते.

दिवस असे पावसाचे. मोठ्या मुश्किलीने पर्जनराजा वरुणाने आपले आनंदाश्रू रोखून धरले होते. सोहोळ्याचा विरस होऊ नये म्हणून पाऊस पडला नाही.

बांधकाम खात्याचे सुभेदार हिराजी इंदुरकर यांनी गडावर केलेली सर्व बांधकामे अतिशय भव्य सुबक पण साधी केली होती. राजसभेच्या प्रवेशद्वारावर दोन मोठी कमळे दगडावर कोरली होती. कमळ हे शांततेचे आणि लक्ष्मीचे प्रतीक. त्या कमळांच्याच जवळ दोन सिंह कोरले होते. त्या शिल्पातील सिंह आपल्या एकेका पायाखाली एकेक हत्ती दाबून रगडीत होता. अन् शेपटीतही एक हत्ती धरून तो भिरकावणार होता! हे कशाचे प्रतीक ? हे शक्तीचे प्रतीक. चार पादशाह्या अन् चार वैरी पायाखाली चिरडून शेपटीत जणू मुंबईकर इंग्रजांना पकडून हे स्वराज्याचे सिंह आपलं शक्तीप्रदर्शन करत आहेत असाच भास होतो.

राजसभेचे बांधकाम हिराजीने अतिशय कौशल्याने केले होते. त्या विशाल सभेत सिंहासनापाशी उभे राहून अगदी साध्या आवाजात काही बोलले , तरी साऱ्या दहा हजारांच्या राजसभेला स्पष्ट ऐकू जावे असे अॅक्सॉस्टीक्स हिराजीने साधले होते. या निमित्ताने हिराजीने केलेल्या बांधकामांचा तपशील सांगणारा एक सुंदर संस्कृत श्लोकबद्ध शिलालेख श्रीजगदीश्वराच्या मंदिराच्या नगारखान्याशेजारी भिंतीवर कोरला. त्यात त्याने शेवटची ओळ कोरलीय ,

' यावच्चंददिवाक रौ विलसत तावत् समुद्यजृंभते '
म्हणजे अस्मानात चंदसूर्य जोपर्यंत तळपताहेत , तोपर्यंत हे रायगडचे वैभव टिकेल.

मंदिराच्या प्रवेशपायरीवर त्याने पाचच शब्द शिलालेखात कोरले आहेत.
' सेवेचे ठाई तत्पर हिराजी इंदुरकर '

राजाच्या आणि प्रजेच्या पायीचे धूलीकण आपल्या नावावर पडावेत हाच यातील हेतू.

आता राज्याभिषेक अगदी उद्याच्या पहाटेवर येऊन ठेपला. जिजाऊसाहेबांचे पहाटेचे स्वप्न पूर्ण होणार होते , खरे ठरणार होते.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा

दि. २९ मे १६७४ यादिवशी सकाळी महाराजांची मुंज करण्यात आली. म्हणजेच त्या महान विश्वामित्रप्रणित गायत्री मंत्राचा अधिकार संस्कारपूर्वक ' बटु ' स देण्यात आला. मुंजबटु ४४ वर्षांचा होता! महाराजांची यापूवीर्च आठ लग्ने झाली होती. त्यांना सहा मुली , दोन पुत्र आणि मुलींकडून काही नातवंडेही होती. इतका सगळा संसार झाला होता.

फक्त मुंज राहिली होती. साडेतीनशे वर्षांपूवीर्पासून स्वातंत्र्य हरपल्यामुळे महाराष्ट्रातील क्षत्रिय घराण्यांचेही अनेक मोलाचे पवित्र धामिर्क संस्कार लुप्त झाले होते. वास्तविक महाराजांचे भोसले घराणे अशाच थोर राजघराण्यांपैकीच क्षत्रिय कुलावतांस होते. त्यांच्या घराण्याला ' राजा ' ही क्षत्रिय पदवी परंपरेनी चालूच होती. महाराजांचे पणजोबा बाबाजीराजे भोसले यांनाही कागदोपत्रीसुद्धा राजे हीच पदवी वापरली जात होती. भोसले नातेसंबंध फलटणच्या पवार कुलोत्पन्न नाईक निंबाळकर या ज्येष्ठ राजघराण्याशी आणि जाधवराव आदि उच्चकुलीन क्षत्रिय घराण्यांशीही होते.

परंपरेने असे मानले जात होते की , हे भोसले घराणे चितोडच्या सिसोदिया घराण्याचीच एक शाखा महाराष्ट्रात आली , त्यातीलच ते आहे. स्वत: महाराजही तसेच म्हणत असत. पुढच्या काळात छत्रपती शाहू महाराजांना दत्तक पुत्र घेण्याची वेळ आली , त्यावेळी चितोडच्याच राजघराण्यातील एका मुलाला छत्रपती शाहू महाराजांच्या मांडीवर दत्तक द्यावयाचा विचार चालू होता. याचा अर्थच असा , की त्यावेळी चितोड महाराणा सिसोदिया घराणे आणि छत्रपतींचे भोसले राजघराणे हे एकाच रक्ताचे आहे हे मान्य होते.

मुद्दा असा , की शिवाजीमहाराज हे कुलपरंपरेनेच क्षत्रिय कुलावतांस होते. त्यांना धर्मशास्त्राप्रमाणेही वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करण्याचा अधिकार होता. सर्वात महत्त्वाचा मुद्दा तर असाच ठरावा की , आयुष्यभर हातात तलवार घेऊन ज्याने रयतेचे रक्षण , पालनपोषण आणि स्वातंत्र्य हेच व्रत आचरिले , धर्म , संस्कृती आणि अस्मिता यांच्याकरिता रक्त आणि स्वेद सतत गाळले असा महापुरुष कोणत्याही जातीधर्मात जन्माला आला , तरीही तो क्षत्रिय कुलावंतांसच की! नाही का ?

मुंजीनंतर लग्न! शास्त्राप्रमाणे लग्नाचा विधी आता करणे आवश्यकच होते. येथे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे , की यावेळी जर महाराजांनी आणखी एक नवे कोरे लग्न करावयाचे ठरविले असते , तर महाराष्ट्रातील कोणत्याही क्षत्रिय कुलावतांस घराण्यातील आईबापांनी आपली मुलगी महाराजांना वधू म्हणून दिलीच असती. पण तत्कालीन बालविवाह पद्धतीमुळे कोणत्याही नवऱ्यामुलीचे वय सात आठ नऊ फारतर दहा वर्षाचे असावयाचे.

महाराजांचे वय यावेळी ४४ होते. म्हणजे नव्या लग्नातील अशा बालिकेशी महाराजांनी लग्न करावयाची वेळ येणार. महाराजांच्या विवेकी मनाला हा जरठ कुमारी विवाह पटणे कधी शक्यच नव्हते. मुंजीनंतर लग्न झालेच पाहिजे हे राज्याभिषेकाकरिता आवश्यकच होते. पण मग आता ? महाराजांनी आणि शास्त्रीमंडळींनी यावर तोड काढली. ती म्हणजे राणी सोयराबाईसाहेब यांच्याशीच पुन्हा विवाह करावयाचा. म्हणजे विवाहसंस्कार करावयाचा. यावेळी सोयराबाईसाहेबांचा राजारामराजे हा पुत्र चार वर्षाचा झालेला होता!

सोयराबाईसाहेबांशी महाराजांचे दि. ३० मे रोजी लग्न करण्यात आले. पुतळाबाईसाहेब आणि सकवारबाईसाहेब या महाराजांच्या राण्यांशीही असेच विधीपूर्वक विवाह करण्यात आले. या एकूण मुंज आणि लग्न प्रकरणातून महाराजांचे जे विवेकी , सुसंस्कृत आणि सामाजिक मन दिसून येते , त्याचा आपण कधी विचार करतो का ? पुरोगामी सुधारणा तावातावाने मांडणारी मंडळीही बहुदा , निदान अनेकदा नेमके उलटे आचरण करताना आजच्या काळातही दिसतात. हे पाहिले की , शिवाजीमहाराजांच्या जोडीला विचाराप्रमाणेच सामाजिक आचरण करणारे म. फुले अन् अण्णासाहेब कवेर् यांच्यापुढे आपली मान आदराने लवते. ज्या काळात दलितांची सावलीही आम्हाला आगीसारखी झोंबत होती , अशा काळात ज्योतिबांनी आपल्या स्वत:च्या घरातील पिण्याच्या पाण्याचा पाणवठा दलितांना अन् सर्वांनाच मुक्त केला हेाता. आजच्याकाळात ही गोष्ट तुम्हाआम्हाला किरकोळच वाटेल. पण त्या काळात ती प्रक्षोभक होती.

इथेच एक गोष्ट सांगितली पाहिजे की , तत्कालीन रिवाजाप्रमाणे अनेकजणांच्या जनानखान्यात नाटकशाळा असतच. नाटकशाळा म्हणजे रखेली. पण महाराजांच्या राणीवंशात अशी एकही नाटकशाळा नव्हती. असती तरी कोणीही त्यांना दोष दिला नसता. पण नव्हतीच. या गोष्टीचाही आपण विचार केला पाहिजे. महाराजांची जी लग्ने झाली. (एकूण आठ) त्यातील सईबाईसाहेब आणि सोयराबाईसाहेब यांच्या पुढची सहा लग्ने ' पोलिटिकल मॅरेजेस ' असावीत असे दिसते.

उत्तरकालीन एका शिवादिग्विजय नावाच्या बखरीत ( लेखनकाल इ. १८१३ ) महाराजांच्या उपस्त्रिया म्हणून मनोहरबाई आणि मनसंतोषबाई अशी दोन नावे आलेली आहेत. त्याला समकालीन अस्सल कागदपत्रांचा अजिबात पुरावा नाही.

दि. ४ जून १६७४ या दिवशी महाराजांची सुवर्णतुळा करण्यात आली. यावेळी महाराजांचे वजन किती भरले हे हेन्री ऑक्झिंडेन या इंग्रज वकीलाने लिहून ठेवले आहे. १६० पौंड वजन भरले. हेन्रीने नक्कीच विचारणा करून ही नोंद केलेली आहे. आमच्यापैकी कोणीही अशी अन् अशाप्रकारची नोंद केलेली नाही येथेच त्यांच्या आमच्यातला फरक लक्षात येतो.

सोन्याप्रमाणेच इतर २३ पदार्थांनी महाराजांची तुळा करण्यात आली. याला ' तुलापुरुषदान ' असे म्हणतात. सोळा महा दानांपैकी हे तुलापुरुषदान आहे. हे सर्व नंतर सत्पात्र लोकांना दान म्हणून वाटून टाकावयाचे असते. तसे केले.

सुवर्णतुळेत महाराजांचे वजन १६० पैंड भरले , म्हणून हेन्रीने नोंदविले आहे. पण अभ्यासानंतर असे वाटते की , महाराजांचे वजन १६० पेक्षा कमी असावे. कारण महाराजांच्या अंगावर अलंकार आणि वस्त्रे होती. हातापायांत सोन्याचे तोडे होते. कमरेला शस्त्र म्हणजे तलवार आणि कट्यार असणारच. उजव्या हातात श्रीविष्णुची सोन्याची मूतीर् असणारच. या सर्वांचे वजन वजा करावे लागेल. असे वाटते की , ही वजाबाकी केली , तर महाराजांचे वजन सुमारे १४५ पौंड असावे. सोन्याच्या पारड्यात महाराजांचे शिवराई होन तुळेसाठी घातले होते. एका होनाचे वजन सामान्यत: अडीच ग्रॅम होते. त्यावरून हेन्रीने कॅल्क्युलेशन केले असावे. अन्य धामिर्क विधी चालूच होते. प्रत्यक्ष अभिषेक आणि नंतर राऱ्यारोहण होणार होते , दोन दिवसांनी दि. ६ जून १६७४ .
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला

इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झिंडेन मुंबईहून रायगडास येण्यास निघाला. तो दि. १३ मे रोजी कोरलई जवळच्या आगरकोट या पोर्तुगीज ठाण्यात येऊन पोहोचला. त्याचेबरोबर आठ माणसे होती. त्यात एक श्यामजी नावाचा गुजराथी व्यापारी होता. राज्याभिषेकाचा मुहूर्त होता दि. ६ जून १६७४ . म्हणजे हेन्री खूपच लौकर निघाला होता का ? कारण त्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारीहिताची काही कामे शिवाजी महाराजांकडून मंजुरी मिळवून करावयाची होती.

हेन्री आगरकोटला दि. १३ मे रोजी दिवस मावळताना पोहोचला , तेव्हा आगरकोटाला असलेले प्रवेशद्वार म्हणजे वेस बंद झालेली होती. रहदारी बंद! हेन्रीला मुद्दाम ही वेस उघडून आत घेण्यात आले. तेव्हा त्याने आगरकोटच्या पोर्तुगीज डेप्युटी गव्हर्नरला सहज विचारले , की ' अजून दिवस पूर्ण मावळला नाही. तरीही आपण वेशीचे दरवाजे बंद का करता ? त्यावर डे. गव्हर्नरने उत्तर दिले की , ' अहो , तशी काळजी आम्हाला घ्यावीच लागते. कारण तो शिवाजी केव्हा आमच्यावर झडप घालील अन् आगरकोटात शिरेल याचा नेम नाही. म्हणून आम्ही ही दक्षता घेतो. ' यातच शिवाजी महाराजांचा दरारा आणि दहशत केवढी होती हे व्यक्त होते.

नंतर हेन्री रायगडावर पाचाड या छोट्या गावी येऊन पोहोचला. रायगडच्या निम्म्या डोंगरावर हे पाचाड गाव आहे. हेन्रीची उतरण्याची व्यवस्था रामचंद निलकंठ अमात्य यांनी तेथे केली होती. दि. १९ मे १६७४ या दिवशीची ही गोष्ट. हेन्रीने मराठी अधिकाऱ्यांस विचारले की , ' शिवाजीराजे यांना लौकर भेटावयाचे आहे. पुढे राज्याभिषेकाच्या गदीर्त ते जमणार नाही. तरी ते आम्हांस केव्हा भेटू शकतील ?' त्यावर अधिकाऱ्याने उत्तर दिले की , ' महाराज प्रतापगडावर श्रीभवानी देवीच्या दर्शनासाठी निघाले आहेत. चार दिवसांनी परततील. भेटतील. '

खरोखरच महाराज पालखीतून गडावरून प्रतापगडाकडे निघाले होते. राज्याभिषेकापूवीर् श्रीभवानी देवीचे दर्शन घेऊन तिला सुवर्णछत्र आणि अलंकार अर्पण करण्यासाठी महाराज प्रतापगडास गेले. दि. २१ रोजी त्यांनी श्रींची यशासांग महापूजा केली. विश्वनाथभट्ट हडप यांनी पूजाविधी समंत्र केला. श्रीदेवीस सोन्याचे छत्र आणि अत्यंत मौल्यवान असे अलंकार महाराजांनी अर्पण केले.

महाराज दि. २२ मे रोजी रायगडास परतले. हेन्री वकील वाटच पाहात होता. त्याच्याबरोबर नारायण शेवणी सुखटणकर हा दुभाषा वकील आलेला होता. आधी ठरवून हेन्री महाराजांचे भेटीस गेला. त्याने व्यापारविषयक सतरा कलमांचा एक मसुदा अमात्यांच्या हस्ते महाराजांस सादर केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या काही मागण्या विनंतीच्या शब्दात त्यात होत्या. त्यात शेवटचे कलम असे होते की , ईस्ट इंडिया कंपनीची नाणी मराठी राज्यातही चालावीत! महाराजांनी हे नेमके कलम ताबडतोब नामंजूर केले. त्यांची सावधता आणि दक्षता येथे चटकन दिसून येते. बाकीची कलमे थोड्याफार फरकाने त्यांनी मंजूर केली.

हेन्री डायरी लिहीत होता. त्याने आगरकोटपासून पुढे रायगडावर झालेल्या आणि पाहिलेल्या राज्याभिषेकापर्यंत जेजे घडलेले पाहिलेले ते डायरीत लिहून ठेवले आहे. ही डायरी सध्या लंडनच्या इंडिया ऑफिस लायब्ररीत मला पाहावयास मिळाली. त्या डायरीत हेन्रीची साक्षेपी दृष्टी दिसून येते.

रायगड आणि पाचाड पाहुण्यांनी फुलू लागला. पाचाडास महाराजांनी एक मोठा भुईकोट वाडा बांधलेला होता तो मुख्यत: जिजाऊसाहेबांसाठी होता. या वेळी जिजाऊसाहेब खूपच थकलेल्या होत्या. त्यांची सर्व आस्था आणि व्यवस्था पाहण्यासाठी नारायण त्र्यंबक पिंगळे या नावाचा अधिकारी नेमलेला होता. राज्याभिषेक सोहाळ्यासाठी अर्थातच जिजाऊसाहेबांचा मुक्काम रायगडावरील वाड्यात होता.

हे दिवस ज्येष्ठाच्या प्रारंभीचे होते. अधूनमधून पाऊस पडतही होता. त्याच्या नोंदी आहेत. वैशाखात इंग्रजांचे इतर दोन वकील रायगडावर महाराजांच्या भेटीस येऊन गेले होते. त्यावेळी पावसाने त्यांना चांगलेच गाठले. त्या वकीलांच्या बाबतीत घडलेली एक गोष्ट सांगतो. ते वकील बोलणी करण्याकरता जेव्हा मुंबईहून रायगडावर येण्यास निघाले , तेव्हा मुंबईच्या इंग्रज डेप्युटी गव्हर्नरने वाटेवरच त्यांना एक लेखी निरोप पाठविला की , ' त्या शिवाजीराजाशी अतिशय सावधपणाने बोला. ' इंग्रजांची शिवाजीमहाराजांच्या बाबतीतली ही दक्षता फारच लक्षवेधी आहे नाही!

रायगडावरील धामिर्क विधींना लवकरच प्रारंभ झाला. श्रीप्राणप्रतिष्ठा आणि नांदीश्राद्ध इत्यादी विधी सुरू झाले. गागाभट्ट आवश्यक तेथे मार्गदर्शन करत होते. कुलउपाध्याय राजोपाध्ये मुख्य पौरोहित्य करीत होते. यावेळी निश्चलपुरी गोसावी हेही आपल्या शिष्यगणांसह गडावर होते. त्यांनी पूवीर्पासून केेलेल्या अपशकुनविषयक सूचना महाराजांनी शांतपणे ऐकून घेतल्या पण ठरविलेल्या संस्कारविधींत बदल केला नाही. अपशकुन वगैरे कल्पनांवर महाराजांचा विश्वासच नव्हता. ते अंधश्रद्ध नव्हते.

हेन्री ऑक्झिंडेन आपल्या डायरीत सर्व सोहाळ्याचे वर्णन विचारपूस करून लिहीत होता. डच प्रतिनिधी इलियड यानेही काही लिहिलेले सापडले आहे. पण आमच्या मंडळींनी या अलौकिक महत्त्वाच्या ऐतिहासिक सोहाळ्याचे यथासांग वर्णन करून ठेवलेले नाही. निदान अद्यापतरी तसे सापडलेले नाही. लौकरच महाराजांची मुंज होणार होती! या वेळी महाराजांचे वय ४४ वर्षांचे होते.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १४३ रायगड राजसाज सजला

रायगडावर राज्यभिषेकाची तयारी अत्यंत योजनाबद्ध आणि शिस्तबद्ध रीतीने सुरू होती. गागाभट्ट हे महापंडित राज्यभिषेक विधीचे प्रमुख अध्वर्यू होते. पण राजघराण्याचे धामिर्क विधीसंस्कार करण्याचे काम भोसल्यांचे कुलोपाध्याय आणि राजोपाध्याय आवीर्कर यांचेच होते. सर्व विधी या बाळंभट्ट राजोपाध्याय यांनीच उपाध्याय या नात्याने केले. मार्गदर्शक होते , गागाभट्ट. गागाभट्टांनी या सर्व राजसंस्कारांची एक लिखित संहिता संस्कृतमध्ये गंथरूपाने तयार केली. या गंथाचे नाव ' राजाभिषेक प्रयोग. '

या ' राजाभिषेक प्रयोग ' या हस्तलिखित गंथाची एक प्रत बिकानेरच्या ( राजस्थान) अनुप संस्कृत गंथालयात पाहावयास मिळाली. हीच प्रत प्रत्यक्ष गागाभट्टांच्या हातची मूळ प्रत असावी , असा तर्क आहे. प्रत्येक विधी कसा आणि केव्हा करावयाचा याचा तो तपशीलवार आराखडा आहे.

सुपारीपासून हत्तीपर्यंत आणि हळकुंडापासून होमकुंडापर्यंत , तसेच दर्भासनापासून सिंहासनापर्यंत सर्व गोष्टी दक्षतापूर्वक सिद्ध होत होत्या. ती ती कामे त्या त्या अधिकारी व्यक्तींवर सोपविण्यात आली होती. सोन्याचे बत्तीस मण वजनाचे सिंहासन तयार करण्याचे काम पोलादपूरच्या (जि. रायगड) रामाजी दत्तो चित्रे या अत्यंत विश्वासू जामदाराकडे सोपविले होते. जामदार म्हणजे सोने चांदी आणि जडजवाहीर याचा खजिना सांभाळणारा अधिकारी. अत्यंत मौल्यवान अगणित नवरत्ने सिंहासनावर जडवून , अनेक सांस्कृतिक शुभचिन्हेही त्यावर कोरावयाची होती. सोन्याची इतर राजचिन्हेही तयार होऊ लागली.

चारही दिशांना राजगडावरून माणसे रवाना झाली. सप्तगंगांची आणि पूर्व , पश्चिम आणि दक्षिण समुदांची उदके आणण्यासाठी कलश घेऊन माणसे मागीर् लागली होती. हे पाणी कशाकरता ? रायगडावर काय पाण्याला तोटा होता ? अन् सप्तगंगांचं उदक आणि रायगडावरचं तळ्यातील पाणी काय वेगळं होतं ? शेवटी सारं ।।२ह्र च ना ? मग इतक्या लांबलांबच्या नद्यांचं पाणी आणण्याचा खटाटोप कशासाठी ? अशासाठी की , हा देवदेवतांचा आणि ऋषीमुनींचा प्राचीनतम भारतदेश एक आहे. या सर्व गंगा आमच्या माता आहेत. प्रातिनिधिक रूपाने त्या रायगडावर येऊन आपल्या सुपुत्राला अभिषेक करणार आहेत , हा त्यातील मंगलतम आणि राष्ट्रीय अर्थ.

विख्यात तीर्थक्षेत्रांतील देवदेवतांनाही निमंत्रणपत्रे जाणार होती. ती गेली. विजापूर , गोवळकोंड , मुंबईकर इंग्रज , जंजिरेकर सिद्दी , गोवेकर फिरंगी आणि औरंगजेब यांना निमंत्रण गेली असतील का ? रिवाजाप्रमाणे गेलीच असतील असे वाटते. पण एका इंग्रजाशिवाय आणि एका डच वकिलाशिवाय या राज्याभिषेकाला अन्य कुणाचे प्रतिनिधी वा पत्रे आल्याचा एकही पुरावा अद्याप मिळालेला नाही. पण निमंत्रणे गेलीच असतील. इंग्रजांचा वकील हेन्री ऑग्झिंडेन आणि वेंगुलेर्कर डच वखारींचा प्रतिनिधी इलियड हे राज्यभिषेकास हजरच होते.

पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त आणि बडवे असलेले प्रल्हाद शिवाजी बडवेपाटील यांनाही एक पत्र गेले होते. ते पत्र या बडवे घराण्यात जपून ठेवलेले होते. पण त्यांच्या वंशजांनी ते पत्र एका इतिहास संशोधकास अभ्यासासाठी विश्वासाने दिले ते पत्र गहाळ झाले. काय बोलावे ?

अभिषेकाकरिता सोन्याचे , चांदीचे , तांब्याचे आणि मृत्तिकेचे अनेक कलश तयार करण्यात आले. ते शतछिदान्वित होते. म्हणजे शंभर शंभर छिदे असलेले होते. पंचामृत आणि गंगोदके यांनी या कलशातून महाराजांवर अभिषेक व्हावयाचा होता. प्राचीनतम भारतीय संस्कृतीचा , परंपरेचा आणि अस्मितेचा आविष्कार साक्षात डोळ्यांनी पाहण्याचे आणि कानांनी ऐकण्याचे भाग्य स्वराज्याला साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर रायगडावर लाभणार होते. विद्वानांना आणि कलावंतांना राज्याभिषेकाच्या राजसभेत शूर सरदारांच्या इतकेच मानाचे स्थान होते. गाणारे , नाचणारे , वाद्ये वाजविणारे कलाकार याकरिता गडावर आले आणि येत होते. स्वत्त्वाचा आविष्कार प्रकट करणाऱ्या अनेक गोष्टी यानिमित्ताने रायगडावर चालू होत्या. छत्रपतींच्या नावाची सोन्याची आणि तांब्याची नाणी पाडली जात होती. रघुनाथपंडित अमात्य आणि धुंडिराज व्यास या विद्वानांना राज्यव्यवहार कोश म्हणजेच राज्यव्यवहारात आपल्याच भाषेत शब्द देऊन त्याची एक प्रकारे ' डिक्शनरी ' तयार करण्याचे काम सांगितले होते. इ. १९४७ मध्ये आपण स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान पं. नेहरू यांनीही डॉ. रघुवीरसिंग या पंडितांना पदनामकोश म्हणजेच भारतीय शब्दात राज्यव्यवहाराची डिक्शनरी तयार करण्याचे काम सांगितले आणि त्यांनी केले , हे आपणास माहीतच आहे. शिवकालीन राज्यव्यवहार कोशातील हे शब्द पाहा. मुजुमदार हा फासीर् शब्द त्याला प्रतिशब्द दिला अमात्य , सुरनीसाला म्हटले पंतसचिव. सरनौबताला म्हटले सरसेनापती , इत्यादी.

राजमुदा होती तीच ठेवली. ' प्रतिपश्चंदलेखेव... ' या वेळी एक नवीन राजमुदा तयार करण्यात आली होती ; मात्र ती कधीही पुढे वापरली गेली नाही.

या निमित्ताने राजसभा आणि अन्य जरूर ती बांधकामे हिराजी इंदुलकर यांनी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे सिद्ध केली. राजदुंदुभीगृह म्हणजे नगारखाना , भव्य आणि सुंदर उभा राहिला. आजही तो उभा आहे.

अनेक राजचिन्हे सिद्ध झाली. सोन्याच्या सुंदर दंडावर तराजू , सोन्याचा मासा , ध्वज , नक्षत्रमाळा , अश्वपुच्छ , राजदंड , अब्दागिऱ्या , मोचेर्ले , चवऱ्या , पंखे , कलमदान , सोन्याचे हातापायातील तोडे , जडावाचे कमरपट्टे इत्यादींचा जिन्नसखाना तयार झाला. यातील सोन्याचा मासा लावलेल्या राजचिन्हाला म्हणत माहीमरातब. स्वराज्याची सत्ता समुदावरही आहे याचे हे प्रतीकचिन्ह. या सर्व चिन्हांत मुख्य होते राजसिंहासन. ते उत्कृष्ट प्रकारे रामाजी दत्तो चित्रे यांनी कुशल सोनारांकडून तयार करवून घेतले होते. त्याला दोन सिंह होते. चार पाय होते. एक चरणासन होते. सिंहासनावर आठ सुबक खांबांची मेघडंबरी होती. छत्रपतीपदाचे मुख्य चिन्ह म्हणजे छत्र. तेही सुवर्णदंडाचे आणि झालरदार कनातीचे होते.

यानिमित्ताने एक नवे बिरुद म्हणजे पदवी महाराजांनी धारण केली. ती म्हणजे क्षत्रिय कुलावतांस. राजाची पदवी ही राष्ट्राचीच पदवी असते. हे हिंदवी स्वराज्याच क्षत्रिय कुलावतांस आहे हाच याचा आशय होता. चाणक्याचे वेळी नंद राजघराणे पूर्णपणे संपले. त्यातूनच एक विक्षिप्त कल्पना रूढ झाली , की भारतात आता कुणीही क्षत्रिय उरला नाही. उरले फक्त त्रैवणिर्क. ही कल्पना जितकी चुकीची होती , तितकीच राष्ट्रघातकीही होती. महाराजांनी आवर्जून ही क्षत्रिय कुलावतांस पदवी स्वीकारली ती , एवढ्याकरता की , हे राष्ट्र क्षत्रियांच्या तेजामुळे अजिंक्य आहे. किंबहुना या राष्ट्रातील प्रत्येकजण राष्ट्रासाठी शस्त्रधारी सैनिकच आहे. एका अर्वाचीन विद्वानाने या आशयाची दोन ओळीची कविता लिहिली.

स्वातंत्र्येण स्वधमेर्ण नित्यं शस्त्रच्छ जीवनम्
राष्ट्रभ्भवनोन्मुखताचा सौ महाराष्ट्रस्य संस्कृती:।
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या निदान पहिल्या दोन पिढ्यांना उपभोगी , सुखवस्तू जीवन जगण्यास अवधीच मिळणार नाही. याच दृष्टीने शिवकालीन हिंदवी स्वराज्याची पहिली पन्नास वर्षे कशी गेली , याची बेरीज वजाबाकी योग्य तुलनेने आपण केली पाहिजे. आजच्या आपल्या स्वराज्याची गेल्या पन्नास वर्षांत सर्वच क्षेत्रात प्रगती निश्चित झाली आहे. पण गती मात्र कमी पडली , अन् पडत आहे हेही उघड आहे. याकरता इतिहासाचा अभ्यास आणि उपयोग केला पाहिजे. अशा अभ्यासासाठी शिवकाळात साधने फारच कमी होती. दळणवळण तर फारच अवघड होते. महाराजांची मानसिकता सूक्ष्मपणे लक्षात घेतली , तर असे वाटते की , युरोपीय प्रगत वैज्ञानिक देशांचा अभ्यास करण्यासाठी महाराजांनी आपली माणसे नक्की पाठविली असती. हा तर्क मी साधार करीत आहे. पाहा पटतो का! मराठी आरमार युरोपियनांच्या आरमारापेक्षाही सुसज्ज आणि बलाढ्य असावे असा त्यांचा सतत जागता प्रयत्न दिसून येतो. माझ्या तर्कातील हा एक महत्त्वाचा टप्पा.

राज्याभिषेकाची तयारी रायगडावर सुरू झाली. हो , तयारी सुमारे वर्षभर आधी सुरू झाली. याच काळात पण प्रारंभी एक प्रकरण घडले. एक अध्यात्ममार्गी सत्पुरुष रायगडावरती आले. ते स्वत: होऊन आलेले दिसतात. त्यांना महाराजांनी मुद्दाम बोलावून घेतलेले दिसत नाही. यांचे नाव निश्चलपुरी गोसावी. त्यांच्याबरोबर थोडाफार शिष्यसमुदायही होता. त्यात गोविंदभट्ट बवेर् या नावाचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेले शिष्यही होते. त्यांनी राज्याभिषेकपूर्व रायगडावरील निश्चलपुरी गोसावी यांचे वास्तव्य आणि त्यात घडलेल्या घटना एक गंथ संस्कृतमध्ये लिहून नमूद केल्या आहेत. या ग्रंथाचे नाव , ' राज्याभिषेक कल्पतरू. '

रायगडावर आल्यावर निश्चलपुरींना दिसून आले की , गागाभट्टांच्या मार्गदर्शनाखाली राज्याभिषेकाची तयारी चालू आहे. हे निश्चलपुरी स्वत: पारमाथिर्क साधक होते. ते तांत्रिक होते. म्हणजे मंत्र , तंत्र , उतारे , पशु बलिदान इत्यादी मार्गांनी त्यांची तांत्रिक योगसाधना असे. त्यांच्या मनांत एक कल्पना अशी आली की , शिवाजी महाराजांनी आपला संकल्पित राज्याभिषेक हा वैदिक पद्धतीने करून घेऊ नये , तर तो तांत्रिक पद्धतीने करून घ्यावा.

महाराज , राज्योपाध्ये बाळंभट्ट आवीर्कर आणि वेदमूतीर् गागाभट्ट यांच्या मनात सहज स्वाभाविक विचार होता की , प्राचीन काळापासून परंपरेने रघुराजा , प्रभू रामचंद , युधिष्ठिर इत्यादी महान राजपुरुषांना , महान ऋषीमुनींनी ज्या वैदिक पद्धतीने राज्याभिषेक केले , त्याच परंपरेप्रमाणे राजगडावरील हा राज्याभिषेक सोहाळा व्हावा. पण निश्चलपुरींना हे मान्य नव्हते. त्यांनी महाराजांना सतत आग्रहाने म्हटले की , ' मी सांगतो त्याच पद्धतीने म्हणजेच तांत्रिक पद्धतीने तुम्ही राज्याभिषेक करून घ्या. '

महाराजांना हे उगीचच धर्मसंकट पुढे आले. पण वाद न घालता महाराजांनी यात अगदी शांत , विचारी भूमिका ठेवली. प्राचीन पुण्यश्लोकराजपुरुषांचा आणि तपस्वी ऋषींचा मार्ग अवलंबायाचा की , हा तांत्रिक मार्ग स्वीकारावयाचा हा प्रश्ान् त्यांच्यापुढे होता.

महाराजांनी गागाभट्टांच्या प्राचीन वैदिक परंपरेप्रमाणेच हा राज्याभिषेकाचा राज्यसंस्कार स्वीकारावयाचे ठरविले. पण या सुमारे सात आठ महिन्यांच्या कालखंडात त्यांनी निश्चलपुरींचा थोडासुद्धा अवमान केला नाही. अतिशय आदरानेच ते त्यांच्याशी वागले. याच कालखंडात प्रतापराव गुजर सरसेनापती यांचा नेसरीच्या खिंडीत युद्धात मृत्यू घडला.( दि. २४ फेब्रु. १६७४ ) महाराज अतिशय दु:खी झाले. निश्चलपुरी महाराजांना म्हणाले , ' महाराज , ही घटना म्हणजे नियतीने तुम्हाला दिलेला इशारा आहे. सरसेनापतीचा मृत्यु म्हणजे अपशकुनच आहे , तरी तुम्ही माझ्याच पद्धतीने हा राज्याभिषेक करा. '

महाराजांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पण तयारी मात्र चालू होती. तशीच चालू ठेवली.

पुढच्याच महिन्यात दि. १९ मार्च १६७४ या दिवशी महाराजांच्या एक राणीसाहेब , काशीबाईसाहेब या अचानक मृत्यू पावल्या. याहीवेळी निश्चलपुरींनी महाराजांना ' हा अपशकुन आहे , अजूनही विचार करा ' असा इशारा दिला , तरीही महाराज शांतच राहिले. पुढे तर किरकोळ अपशकुनांची मालिका त्यांचेकडून महाराजांपुढे येत गेली. एके दिवशी गडावरील राजप्रासादाला मधमाश्यांचे आग्यामोहोळ लागले. हाही त्यांना अपशकुन वाटला. दुसऱ्या एका दिवशी आभाळात पक्ष्यांचा थवा उडत चाललेला पाहून त्यांनी महाराजांना म्हटले की , या मार्गाने हे पक्षी उडत जाणे हे अपशकुनी आहे. अर्थात महाराज मात्र शांतच आणि असेच अपशकुन ते मांडीत राहिले. त्यांनी सांगितलेला शेवटचा अपशकुन असा. एका होमहवनाचे प्रसंगी महाराज होमापुढे बसले होते. मंत्र चालू होते. महाराजांचे राजोपाध्याय बाळंभट्ट हे तेथेच बसले होते. एवढ्यात अचानक वरच्या पटईला ( सिलिंगला) असलेल्या नक्षीतील एक लहानसे लाकडी कमळ निसटले आणि ते राजोपाध्यायांच्या तोंडावरच पडले. त्यांना जरा भोवळ आली. थोडेसे लागले. पण धामिर्क कार्यक्रम चालूच राहिले. निश्चलपुरी महाराजांना म्हणाले की , ' हा अपशकुन आहे. अजूनही विचार करा आणि हे वैदिक सोहळे थांबवून माझ्या सूचनेप्रमाणे सर्व करा. '

पण तरीही महाराज शांतच राहिले. सर्व विधी , संस्कार आणि राज्याभिषेक सोहळा पूर्ण पार पडला. महाराज छत्रपती झाले.

निश्चलपुरी आपल्या मनाप्रमाणे न झाल्यामुळे फारच नाराज झाले आणि नंतर महाराजांना म्हणाले , ' तुम्ही माझे ऐकले नाहीत. हा तुमचा राज्याभिषेक अशास्त्रीय झाला आहे. तुम्हाला लौकरच त्याचे प्रत्यंतर येईल. ' असे म्हणून निश्चलपुरी रायगडावरून निघून गेले. हे प्रकरण आपणापुढे थोडक्यात पण नेमके विषयबद्ध सांगितले आहे. पण आपणही याचा अभ्यास करावा. या विषयावर विस्तृत लेखन केले आहे. समकालीन ' राज्याभिषेक कल्पतरू ' हा गोविंदभट्ट बवेर् यांचा गंथही उपलब्ध आहे. शिवाय अनेकांनी आपापली मते मांडली आहेत. या सर्वांचा आपण अभ्यास करून आपले मत ठरवावे.

महाराजांच्या या प्रकरणातील भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटते ? मला मात्र असे वाटते की , महाराजांच्या मनात निश्चलपुरींनाही नाराज करावयाचे नसावे. प्राचीन परंपरेप्रमाणे राज्याभिषेक करावा आणि नंतर वेगळ्या मुहूर्तावर निश्चलपुरी यांच्या म्हणण्याप्रमाणे तांत्रिक राज्यभिषेकसुद्धा करून टाकावा , असे वाटते. कारण तसा तांत्रिक राज्याभिषेक नंतर दि. २४ सप्टेंबर १६७४ , अश्विन शुुद्ध पंचमी या दिवशी महाराजांनी याच निश्चलपुरींकडून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रायगडावर करवून घेतला. हा तांत्रिक विधी तसा फार थोड्या वेळातच पूर्ण झाला. निश्चलपुरींनाही बरे वाटले. पण दुसऱ्याच दिवशी (दि. २५ सप्टेंबर) प्रतापगडावर आकाशातून वीज कोसळली आणि एक हत्ती आणि काही घोडे या घाताने मरण पावले. यावर निश्चलपुरी काय म्हणाले ते इतिहासाला माहीत नाही. आपणास काय वाटते ?
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय

माणसाला फुकट मिळालं की त्याची किंमत कळत नाही. त्याचा बाजारभाव समजतो , तसंच उपयोग आणि उपभोगही समजतो. पण महत्त्व आणि पावित्र्य समजत नाही. हिंदवी स्वराज्य असे नव्हतेच. कमालीच्या त्यागाने आणि अविश्रांत कष्टाने ते मिळविले गेले होते. मिळवणारी मावळी मंडळी अगदी साधी आणि सामान्य होती. पण त्यांचे मन हनुमंतासारखे होते. छाती फाडली , तर त्यात त्यांचा राजा , राज्य आणि ध्वजच दिसावा. एकेका घरातली एकेक माणसं इषेर्नं आणि हौसेनं कष्टत होती. मरत होती. अशीही असंख्य मावळी घरं होती की , त्या घरातील दोन-दोन किंवा तीन-तीन माणसं अशीच मरत होती. म्हणूनच एक अजिंक्य हिंदवी स्वराज्य एका राष्ट्रपुरुषाने उभे केले.

अजिंक्य स्वराज्य ? होय , अजिंक्य. महाराजांच्या मृत्यूनंतर एक कर्दनकाळ , औरंगजेब आपल्या सर्व सार्मथ्यानिशी हे स्वराज्य गिळायला महाराष्ट्रात उतरला. अखंड पंचवीस वषेर् तो इथे यमदूतासारखा राबत होता. काय झाले त्याचे ? हे स्वराज्य बुडाले का ? नाही. औरंगजेबच बुडाला. मोगली साम्राज्यही बुडण्याच्या मार्गाला लागले. हे कोणामुळे ? कोणाच्या शिकवणुकीमुळे ? हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीमुळेच ना! शिवचरित्रातून तेच शिकावयाचे आहे. नागपूर येथे धनवटे प्रासादावर शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा स्थापन करण्यात आला ; त्यावेळी पं. जवाहरलाल नेहरू म्हणाले की , ' जगाच्या पाठीवर पारतंत्र्यात पडलेल्या एखाद्या राष्ट्राला स्वतंत्र व्हावयाचे असेल आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समर्थ व्हावयाचे असेल , तर त्या राष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवावा. '

हे अक्षरश: खरे आहे जीर्णशीर्ण स्थितीतून , गुलामगिरीतून आपले राष्ट्र स्वतंत्र झाले. ते बलाढ्य करावयाचे असेल , तर आदर्श असावा महाराजांचा.

सतत २७ - २८ वषेर् अविश्रांत श्रम आणि त्याग केल्यानंतरच राज्याभिषेकाचा विचार रायगडावर अंकुरला. या निमिर्तीच्या कालखंडात अत्यंत गरजेची कामे आणि प्रकल्प महाराजांनी हाती घेतलेले दिसतात. भव्य महाल किंवा उपभोगप्रधान अशा कोणत्याही वस्तू- वास्तू निमिर्तीकडे लक्षही दिले नाही. जीर्णशीर्ण अवस्थेतून मराठी मुलुख अति कष्टाने स्वतंत्र होत आहे , आता पहिल्या दोन पिढ्यांना तरी चंगळबाजीपासून हजार पावलं दूरच राहिलं पाहिजे , असा विचार महाराजांच्या कृतीत दिसून येतो. महाराज चंगळबाजीला शत्रूच मानत असावेत. ' आत्ता , या क्षणी स्वराज्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे ' हाच विचार त्यांच्या आचरणात दिसून येतो.

मग राज्याभिषेक करून घेणं , ही चंगळबाजी नव्हती का ? नव्हती. ते कर्तव्यच होते. सार्वभौमत्त्वाची ती महापूजा होती. त्या राज्याभिषेक सोहाळ्याचा परिणाम वर्तमान आणि भावी काळातील सर्व पिढ्यांवर प्रभावाने होणार होता. तो कोणा एका व्यक्तीच्या कौतुकाचा स्तुती सोहळा नव्हता. ते होते स्वातंत्र्याचे सामूहिक गौरवगान. इंदप्रस्थ , चितोड , देवगिरी , कर्णावती , वारंगळ , विजयनगर , द्वारसमुद , पाटलीपुत्र , गोपकपट्टण (गोवा) श्रीनगर आदि सर्व भारतीय स्वराज्यांच्या राजधान्यांवर बंडाची स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणारी फुंकर या रायगडावरील राज्याभिषेकाने पडणार होती. पडावी अशी अपेक्षा होती. बुंदेलखंडातील भंगलेल्या सिंहासनावर आणि चेतलेल्या छत्रसालावर ही फुंकर आधीच पडलीही होती. बुंदलेखंडात एक नवे हिंदवी स्वराज्य आणि सिंहासन उदयाला आले होते.

सिंधू नदीच्या उगमापासून कावेरी नदीच्या पैलतीरापावेतो , म्हणजेच आसेतु हिमाचल हा संपूर्ण देश स्वतंत्र , सार्वभौम , बलशाली व्हावा हे मनोगत महाराजांनी स्वत:च बोलून दाखविले होते ना!

राज्याभिषेकाचा मुहूर्तही ठरला. शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ , शुद्ध त्रयोदशी , आनंदनाम संवत्सर , म्हणजेच ६ जून १६७४ . महाराज राज्याभिषिक्त छत्रपती होणार याच्या वार्ता हळुहळू सर्वत्र पोहोचू लागल्या.

याचवेळी घडलेली एक गंमत सांगतो. कॉस्म- द-गार्द या नावाचा एक पोर्तुगीज कोकणातून भूमार्गाने गोव्याकडे जात होता. त्याला या प्रवासात ही बातमी समजली. मार्गावरती तो एका खेड्याजवळच्या झाडीत विश्रांतीकरता उतरला. भोवतालची मराठी दहापाच खेडुत माणसे सहज गार्दच्या जवळ जमली. एक गोरा फिरंगी आपल्याला दिसतोय , एवढाच त्यात कुतूहलाचा भाग असावा. गार्दने त्या जमलेल्या लोकांना आपल्या मोडक्या तोडक्या भाषेत म्हटले की , ' तुमचा शिवाजीराजा लवकरच सिंहासनावर बसणार आहे , हे तुम्हाला माहिती आहे का ?' ही गोड गोष्ट त्या खेडुतांना प्रथमच समजत होती. पण आपला राजा आता रामाप्रमाणे सिंहासनावर बसणार , एवढे त्यांना नक्कीच उमजले अन् ती माणसं विलक्षण आनंदली. ही एक सूचक कथा मराठी मनाचा कानोसा घेणारी नाही का ? साध्या भोळ्या खेड्यातील माणसांनाही हा राज्याभिषेकाचा आनंद समजला , जाणवला होता.

आपण सार्वभौम , स्वतंत्र स्वराज्याचे प्रजानन आहोत , राज्यकतेर्च आहोत , सेवक आहोत याची जाणीव प्रत्येक लहानमोठ्या वयाच्या माणसाला होण्याची आवश्यकता असतेच. प्रथम हेच कळावे. नंतर कळावे , राष्ट्र म्हणजे काय ? माझे राष्ट्रपती कोण आहेत. पंतप्रधान कोण. माझी राज्यघटना , माझी संसद , माझा राष्ट्रध्वज , माझे राष्ट्रगीत इत्यादी अष्टांग राष्ट्राचा परिचय यथासांग व्हावा. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे अर्वाचीन भरतखंडाचा पहिला स्वातंत्र्यदिन.
-बाबासाहेब पुरंदरे

शनिवार, ११ एप्रिल, २००९

शिवचरित्रमाला भाग १४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी

काशीहून गागाभट्ट नासिकला आले. महाराजांनी त्यांना आणण्याकरिता पालखी पाठविली. दरबारातील चार थोर मंडळी सामोरी पाठविली. सन्मानपूर्वक त्यांना रायगडावर आणण्यात आले. महाराजांनी मधुपर्कपूर्वक या महापंडिताचे गडावर स्वागत केले. त्यांचा मुक्काम गडावर होता. प्रवासात आणि गडावर गागाभट्टांना स्वराज्याचे रूप स्पष्ट दिसत होते. महाराजांनी आपल्या असंख्य कर्तबगार , शूर , निष्ठावंत आणि त्यागी जीवलगांच्या सहकार्याने निर्माण केलेले एक सार्वभौम राष्ट्र जाणत्या मनाला स्पष्ट दिसत होते.

या हिंदवी स्वराज्यात अनेक क्रांतीकारक घटना घडल्या होत्या , घडत होत्या. तेहरानपासून काबूलपर्यंत आणि खैबरपासून दिल्लीपर्यंत मराठी स्वराज्याचा दरारा सुलतानांना हादरे देत होता. दक्षिणेतील पातशाह्या निष्प्रभ झाल्या होत्या. इंग्रज , फिरंगी अन् सिद्दी आपले प्राण कसे वाचवायचे , याच चिंतेने ग्रस्त , पण दक्ष होते. अत्यंत शिस्तबद्ध अधिकारीवर्ग आणि राजकारणी मुत्सद्दी राज्यकर्तव्यात तत्पर होते. यादव , कदंब , शिलाहार , विजयनगर , वारंगळ , द्वारसमुद यांच्या उज्ज्वल परंपरेत आज रायगड आणि महाराज शिवाजीराजे निविर्वाद शोभत होते.

मग उणीव कशात होती ? कशातच नव्हती. फक्त एका अलंकाराची उणीव होती. तो अलंकार म्हणजे राजसिंहासन. छत्रचामरांकित राजसिंहास न. त्या सिंहासनाची स्वराज्याला नितांत गरज होती. कारण त्याशिवाय सार्वभौम चक्रवतीर् राज्याचा मान आणि स्थान जगातील आणि स्वदेशातीलही लोक देत नव्हते. देणार नव्हते. हा केवळ संस्कार होता. पण त्याची जगाच्या व्यवहारात अत्यंत मोठी किंमत होती. राज्याभिषेक हा उपभोग नव्हता. ते राष्ट्रीय कर्तव्य होते. जोपर्यंत सिंहासनावर राज्याभिषेक होत नाही , तोपर्यंत जग या थोर सूर्यपराक्रमी मी पुण्यश्ाोक महामानवाला ' राज्यकर्ता ' समजणार होते , पण ' भूपतिराजा ' म्हणणार नव्हते.

एक आठवण सांगतो. महाराज औरंगजेबाला भेटायला आग्ऱ्यास जाण्यास निघाले. ( दि. ५ मार्च १६६६ ) त्यावेळी स्वराज्यातील एक नागरिक महाराजांना भेटावयास राजगडावर आला. त्याचे नाव नरसिंहभट्ट चाकालेकर. हा कुणी महापंडित , अभ्यासक , विचारवंत , दष्टा , समाजधुरीण नव्हता. होता तो एक सामान्य भिक्षुक. पण तरीही त्यावेळच्या एकूण संपूर्ण समाजात शिक्षणाच्या दृष्टीने दोनच पावलं का होईना , पण थोडा पुढे होता ना! तो महाराजांना एक विनंती करावयास आला होता. विनंती कोणती ? तो म्हणतोय , ' महाराज , माझ्या जमीनजुमल्याचे आणि घरादाराचे सरकारमान्यतेची , तुमच्या शिक्कामोर्तबीचे कागदपत्र माझ्यापाशी आहेतच. पण आपण आता औरंगजेब बादशाहास भेटावयास जात आहात , तरी माझ्या या जमीनजुमल्यास औरंगजेब बादशाहाच्याही मान्यतेची संदापत्रे आपण येताना घेऊन या. ' हा त्याच्या म्हणण्याचा आशय.

काय म्हणावे या प्रकाराला ? कपाळाला हात लावून रडावे ? स्वराज्यात राहणारा , जरासा का होईना पण शहाणपण मिरविणारा एक वेदमूतीर् औरंगजेबाच्या मान्यतेचे कागदपत्र आणायला महाराजांनाच विनवतोय. त्याला महाराजांचा हा स्वराज्यनिमिर्तीचा प्रकल्प समजलाच नाही ? बाजी पासलकर , बाजीप्रभू , मुरारबाजी इत्यादी वीरपुरुष कशाकरता मेले , जळत जळत पराक्रम गाजविणारे मावळे कशाकरता लढताहेत अन् मरताहेत हे त्याला समजलेच नाही ?

नाहीच समजलं त्याला ? अन् असे न समजणारे अंजान जीव नेहमीच जगात असतात. त्यांना सार्वभौमत्त्व , स्वराज्याचे महत्त्व , स्वातंत्र्याचे अभिमानी जीवन अन् त्याकरिता आपलेही काही कर्तव्य असते , हे दर्शनानी अन् प्रदर्शनाने शिकवावे लागते. आम्ही जन्मजात देशभक्त नाहीच. आम्ही जन्मजात गुलामच. यातून बाहेर काढण्याकरिता त्या शिवाजीराजाने महाप्रकल्प मांडला. तो साऱ्या जगाला अन् आमच्याही देशाला समजावून सांगण्याकरिता , नेमका अर्थ त्याचा पटवून देण्याकरिता एका राजसंस्काराचे दर्शन आणि प्रदर्शन घडविणे नितांत आवश्यक होते , ते उपभोग म्हणून नव्हे , तर कर्तव्य म्हणून आवश्यक होते. ते म्हणजे सार्वभौम , छत्रचामरांकित सुवर्ण सिंहासनावर आरोहण. म्हणजेच राज्याभिषेक.

पण केवळ कर्तव्यातच अर्ध्यदान करण्यासाठी उभ्या असलेल्या त्या महान योगी शिवाजीराजांना सिंहासन , छत्रचामरे , राज्याभिषेक इत्यादी गोष्टींची अभिलाषा तर नव्हतीच , कधीच नव्हती. पण त्यांना त्याची आठवणही होत नव्हती. हा राजा शिबी राजाचा वारस होता. तो जनकाचा वारस होता. तो रघुराजाचा वारस होता. हे सारं अभ्यासपूर्वक , मनन आणि चिंतनपूर्वक समजावून घेण्याची बौद्धिक ऐपत आमच्यापाशी असायची आवश्यकता होती आणि आहे. कोणा बादशाहाने आम्हाला त्याच्या सेवेसाठी एखादी पदवी दिली , तर त्या पदवीचा आम्हाला अभिमान वाटावा ? पण अशी पदवीधर मंडळी बादशाही जगात त्यावेळी नांदत होती. ही मंडळी महाराजांच्या बाबतीत म्हणत होती , ' राजे आम्ही पातशाहाने आम्हास किताब दिले. मानमरातब दिले. ' अशा जगाला एकच उत्तर देणे आवश्यक होते. ते म्हणजे राज्याभिषेक.

या राज्याभिषेकाची विचारसरणी कोणाही विचारवंताला सहज पटण्यासारखी होती. महाराजांनाही ती तत्त्वत: नक्कीच पटलेली होती. पण राज्याभिषेकातील तो गौरव , ती प्रशस्ती , तो मोठेपणा महाराजांच्या मनाला रुचतच नव्हता. ते हिंदवी स्वराज्याचे उपभोगशून्य स्वामी होते. पण स्वत: जीवन जगत होते. हिंदवी स्वराज्याचे एक साधे पण कठोर सेवाव्रती प्रजानन म्हणून. ते सविनय नम्र स्वराज्यसेवक होते. पण नरसिंहभट्ट चाकालेकरासारखी काही विचित्र , विक्षिप्त अन् अविवेकी उदाहरणे त्यांनी अनुभविली होती.

अखेर कर्तव्य म्हणूनच महाराजांनी राज्याभिषेकाला आणि सोहळ्याला , कठोर मनाने मान्यता दिली. राज्याभिषेक ठरला!
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.

चिंचवडच्या श्रीमोरया गोसावी यांचे पुत्र चिंतामणी महाराज आणि नातू नारायण महाराज देव या तीनही पिढ्यांतील गणेशभक्तीबद्दल भोसले राजघराण्यात नितांत आदरभाव होता. चिंतामणी महाराज आणि नारायण महाराज हे तर शिवाजीमहाराजांच्या अगदी समकालीन होते. श्रीमोरया गोसावी हे योगी होते. त्यांनी चिंचवडला संजीवन समाधी घेतली. या गणेशभक्तांबद्दल स्वराज्यस्थापनेपूवी र्च्या काही मराठी सरदार जहागीरदारांनी आपला भक्तिभाव चिंचवड देवस्थानाला जमिनी , पैसे , दागिने आणि काही इनामी हक्क प्रदान करून व्यक्त केला होता.

येथे नेमकेच सांगायचे , तर श्रीनारायण महाराज देव यांना कुलाबा कोकणातील काही बाजारपेठेच्या गावातून पडत्या भावाने तांदूळ , नारळ , सुपारी , मीठ इत्यादी कोकणी माल खरेदी करण्याचा हक्क मिळालेला होता. म्हणजे समजा , देवमहाराजांना काही खंडी तांदूळ हवा असेल , तर तो बाजारभावापेक्षाही खूपच कमी भावाने परस्पर शेतकऱ्यांकडून वा व्यापारी दुकानदारांकडून खरेदी करण्याचा हक्क श्रीदेवांना मिळालेला होता.

हा माल खरेदी करण्याकरता दरवर्षी श्रीदेवांचे कारकून आणि नोकर कोकणात जात असत. हा माल कोणा एकाच मालकाकडून सर्वच्यासर्व खरेदी न करता अनेकांकडून मिळून तो खरेदी करण्याचा विवेकी व्यवहार श्रीदेवांचे कारकून नक्कीच सांभाळत असत हे उघड आहे. अशा देणग्यांना आणि अधिकारांना (हक्क) प्रत्यक्ष बादशाही मान्यता घ्यावी लागे. ती निजामशाह किंवा आदिलशाह यांची असे. हे बादशाह तशी मान्यता देत असत. दरवर्षी श्रीदेवांचे नोकर कुलाबा भागात उतरून हा हक्क बजावीत आणि माल बैलांवर लादून घाटावर चिंचवडला आणीत असत.

श्री योगी मोरयागोसावी यांची पुण्यतिथी मार्गशीर्ष वद्य षष्ठीस साजरी होत असे. अन् आजही होते. त्यानिमित्त यात्रेकरूंना भंडारा म्हणजे अन्नदान होई. हजारो लोक येथे भोजन करीत. श्रीदेव या भंडाऱ्याकरिता हा कोकणातील माल उपयोगात आणीत असत. पुढे (१६५७ पासून) स्वराज्याची सत्ता या कुलाबा भागात प्रस्थापित झाली. स्वराज्याचे कायदे सुरू झाले. दरवषीर्प्रमाणे श्रीदेवांचे कारकून चिंचवडहून श्रीदेवांच्या आज्ञेप्रमाणे कुलाबा भागातील माल पडत्या भावाने खरेदी करण्यासाठी कोकणात आले. तेथील मराठी स्वराज्याच्या सुभेदाराने या कारकुनांना सांगितले की , ' पडत्या भावाने तुम्हांस माल खरेदी करता येणार नाही '

श्रीदेवांची कारकून मंडळी विस्मितच झाली. बादशाही अमलात देवस्थानकरता आम्हाला मिळालेले हक्क मराठी स्वराज्य आल्यावर काढून घेतले जावेत ? काय आश्चर्य ? हे हिंदवी स्वराज्य श्रीच्या इच्छेने आणि आशीर्वादानेच निर्माण झाले ना ?

स्वराज्याच्या अंमलदाराने अशी बंदी घातली आहे असे या कारकुनांनी श्री देवमहाराजांना चिंचवडला पत्र पाठवून कळविले. श्री नारायणमहाराज देवही चकीत झाले. त्यांनी राजगडास शिवाजीमहाराजांकडे तक्रारीचे पत्र पाठविले की , ' देवकार्यासाठी मिळालेला पडत्या भावाने माल खरेदी करण्याचा हक्क शिवशाहीत रद्द व्हावा ? ये कैसे ?'

महाराजांनी श्रीदेवांचे हे पत्र आल्यावर उत्तर म्हणजे राजाज्ञापत्र चिंचवडास पाठविले की , ' स्वराज्यात असे हक्क कोणासही दिले जाणार नाहीत. पूवीर् दिलेले असतील , तर ते अमानत म्हणजे रद्द करण्यात येतील. कारण पडत्या भावाने माल खरेदी केला , तर शेतकऱ्यांचे वा दुकानदारांचे नुकसानच होते. म्हणून हा हक्क रद्द करण्यात आला आहे. तसेच त्यावरील जकातही वसूल केली जाईल माफ होणार नाही. ' या राजाज्ञेची अमलबजावणीही झाली. स्वराज्याचा कारभार असा होता.

पण महाराजांची श्रीगणेशावर आणि देवस्थानावर पूर्ण भक्ती होती. महाराजांनी श्री नारायण महाराज देव यांना कळविले की , ' कोकणातून शेतकऱ्यांकडून आणि व्यापाऱ्यांकडून जो आणि जितका माल आपण पडत्या भावाने खरेदी करीत होता , तेवढा माल श्रीचे अन्नदान आणि भंडाऱ्याकरिता सरकारी कोठारातून चिंचवडास विनामूल्य , दरवषीर् सुपूर्त केला जाईल. ' शिवाजी महाराज असे होते आणि हिंदवी स्वराज्य म्हणजे शिवशाहीही अशी होती. आचारशीळ , विचारशीळ , दानशीळ , धर्मशीळ सर्वज्ञपणे सुशीळ , सकळांठायी!

असाच एक प्रश्न् कोकणात मिठागरांच्या बाबतीत निर्माण झाला. हा प्रश्ान् गोव्याच्या धूर्त पोर्तुगीज फिरंग्यांनी निर्माण केला. स्वराज्यातील आगरी समाजाची आणि काही इतर समाजाचीही खायचे मीठ तयार करणारी मिठागरे होती. मिठागरे म्हणजे मिठाची शेती. त्याचे असे झाले की , या धूर्त पोर्तुगीजांनी त्यांच्या पोर्तुगीज देशात तयार होणारे मीठ गोव्यात आणावयास सुरुवात केली. हे पांढरे दाणेदार मीठ पोर्तुगीजांनी अगदी कमी किंमतीत कोकणात विकावयास सुरुवात केली. मीठ चांगले होते. ते अगदी स्वस्त भावात विक्रीस आल्यावर कोकणातच तयार होणारे आगरी लोकांचे स्वदेशी मीठ कोण विकत घेणार ? मुक्त बाजारपेठ स्वराज्यात असल्यामुळे पोर्तुगीज लोक आपले मीठ विकू लागले. याचा परिणाम उघड होता. तो म्हणजे स्वराज्यातील आमची मिठागरे तोट्यात जाणार आणि आगरी लोकांचा धंदा बुडणार. स्वराज्याचेही नुकसान होणार. हे महाराजांच्या त्वरित लक्षात आले. शिष्टमंडळे राजगडावर आणावी लागली नाहीत. महाराजांनी आज्ञापत्रे काढून या पोर्तुगीज मीठावर जबरदस्त कर बसवला. त्यामुळे गोव्याचे मीठ स्वराज्यात येणे ताबडतोब अन् आपोआप बंद झाले. स्वराज्यातील उद्योगधंद्यांना संरक्षण देण्याची महाराजांची ही दक्षता होती. ही दक्षता व्यापारपेठेत आणि करवसुली खात्यातही जपली जात होती.

चांभार म्हणजे चर्मकार. हे लष्काराच्या अतिशय उपयोगी पडणारे लोक. करवसुली आणि जकात स्वराज्यात रोख पैशांत घेतली जात असे. या चर्मकारांकडूनही तशीच घेण्यात येई. पण खेड्यापाड्यातील आणि सर्वच चर्मकारांना रोख पैसे कर म्हणून देणे शक्य होईना. महाराजांनी आज्ञापत्रक काढून आपल्या अंमलदारास लिहिले की , ' ज्यांना रोख रकमेने कर देता येणे शक्य नसेल , त्या चर्मकारांकडून तेवढ्या किंमतीचे जिन्नस सरकारात घ्यावेत. रोख पैशाचा आग्रह धरू नये. आपल्या शिलेदारांस कातड्याच्या खोगीरांची , पादत्राणांची आणि इतर कातडी वस्तूंची गरज असतेच. तरी ते जिन्नस घ्यावेत. ' त्याप्रमाणे चर्मकारांना मोठी बाजारपेठही मिळाली आणि त्यांची अडचणही दूर झाली. असा व्यवहार तराळ , मातंग , धनगर , लोहार , कुंभार वगैरे मंडळींच्या व्यवसायातही महाराजांनी अमलात आणला असावाच. मात्र त्या संबंधीचे कागद अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.

राजाचे लक्ष असे स्वराज्यावर आणि रयतेवर चौफेर होते. असे लक्ष बादशाही अंमलात नव्हते. उलट काही कर शाही धर्माचे नसलेल्या लोकांवर लादले जात असत. हा फरक स्वराज्य आणि मोगलाई यातील आहे.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे?

शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर नेहमीच स्मितहास्य तरळत असे , असे अनेक स्वकीय आणि परकीय भेटीकारांनी लिहून ठेवले आहे. आपल्याला आजही महाराजांच्या व्यक्तिमत्वाबद्दल कुतूहल असते. समर्थांनीही आवर्जून लिहिले आहे की , ' शिवरायाचे आठवावे रूप '. रूपानं महाराज कसे होते ? सावळे की गोरे ? काही युरोपीय भेटीकारांनीही महाराजांना गौरवर्णाचे म्हटले आहे. त्याअथीर् ते अगदी कोकणस्थी गोऱ्या रंगाचे नसले , तरी अधिक जवळ गव्हाळ रंगाचे असावेत. मुंबईच्या शिवछत्रपती म्युझियममध्ये ( पूवीर्चे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) महाराजांचे एक उभे रंगीत चित्र ( मिनिएचर) आहे.

त्यात महाराजांचा रंग सावळा दाखविलेला आहे. हे चित्र चित्रकाराने इ.स. १७०० च्या जरा नंतरच्या काळात चितारलेले असावे , असे तज्ज्ञांचे मत आहे. चक्क काळ्या रंगात पं. जवाहरलाल नेहरू यांचीही चित्रे चित्रकारांनी काढलेली आहेत. पण नेहरूंचे गोरे देखणेपण आपण प्रत्यक्ष पाहिलेले आहे. चित्रकाराने काळ्या वा वेगळ्या रंगात चित्र काढले , ही त्या चित्रकाराची शैली आहे. तसेच महाराजांचे मुंबईचे हे चित्र आहे. हे चित्र मूळ साताऱ्याच्या छत्रपती महाराजांच्या वाड्यातूनच विश्राम मावजी या इतिहासप्रेमी गृहस्थांना मिळाले. हा राजघराण्याचा आणि छत्रपतींच्या राजवाड्याचा चित्र प्राप्तीधागा लक्षात येतोच. युरोपीय लोक सगळ्याच भारतीयांना ' काळे ' म्हणतात. पण त्यांनीही महाराजांना गौर रंगाचे सटिर्फिकेट दिलेले पाहून महाराजांच्या गव्हाळ मराठी गौरवर्णाची ओळख पटते.

महाराज आग्ऱ्याला गेले , तेव्हा त्यांना शहरात प्रवेश करताना परकालदास या नावाच्या राजपूत राजकीय प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहिले. त्यानेही आपल्या एका पत्रात महाराजांचे वर्णन लिहिले आहे. तो म्हणतो , ' शिवाजीराजे तेजस्वी आणि अस्सल राजपूतासारखे दिसतात. ' औरंगजेबाच्या दरबारात अपमान झाल्यामुळे महाराज संतापले. तेव्हा ते कसे धगागलेले दिसले , याचेही वर्णन राजपूत प्रतिनिधीच्या पत्रात सापडते. महाराजांच्या दृष्टीत विलक्षण त्वरा होती. महाराजांच्या सहवासात राहिलेल्या परमानंद गोविंद कविंदाने महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन शिवभारतात लिहून ठेवले आहे. एकाच वाक्यात सांगायचे तर त्याचे सार , महाराज राजकुलीन , तेजस्वी , तडफदार , प्रभावी आणि सावध व्यक्तिमत्त्वाचे होते. ऐतिहासिक कागदपत्रांतून आणि विशेषत: त्यांनी लिहिलेल्या पत्रांतील भाषेतून त्यांचे व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यापुढे असेच जाणवते. राजेपणाचे त्यांचे दर्शन अगदी सहज जन्मजात दिसते. त्यात कृत्रिमता वा बनावट आव दिसत नाही. छत्रपती , सिंहासनाधीश्वर , क्षत्रिय कुलावतांस , महाराजा या राजविशेषणांचे ' बेअरिंग ' महाराज अगदी सहज , आपादमस्तक सांभाळत होते. राजेपण वा राणीपण एवढ्या तोलामोलाने व्यक्तिमत्त्वात सांभाळणे , हे योगसाधना करण्याइतकेच अवघड आहे.

महाराज तेजावरच्या प्रवासात असताना एका छावणीत पाँडिचेरीचा माटिर्न नावाचा फेंच प्रतिनिधी महाराजांस भेटावयास आला. भेटीच्या शामियान्यात तो थोडा आधीच उपस्थित झाला. या शामियान्यात महाराज नंतर प्रवेशले. माटिर्नने शामियान्यातील त्या सदरेचे (छोट्या दरबाराचे) वर्णन लिहून ठेवले आहे. प्रत्यक्ष महाराज शामियान्यात कसे प्रवेशले अन् त्यावेळी दरबारी लोक (मराठे सरदार) कसे उभे राहिले आणि त्यांनी कशी राजआदब सांभाळली ते लिहून ठेवले आहे. महाराज चालत राजमसनदीपर्यंत आले आणि बसले याचे फार सुंदर वास्तवपूर्ण चित्र त्याने शब्दांकित केले आहे. ते वाचताना समार्थांचेच शब्द आठवतात. ' शिवरायाचे कैसे बोलणे , शिवरायाचे कैसे चालणे , शिवरायाची सलगी देणे कैसे असे ' त्याची चुणूक माटिर्नच्या शब्दांतून व्यक्त होते. आमची ' मराठा राजसंस्कृती ' खरोखर फार उदात्त आहे. आम्ही कोणी आज शिरपेच तुरे घालणारे राजेमहाराजे नाही. पण आम्ही आपापल्या आमच्या जीवनात मर्यादित राजेच आहोत ना ? ते खानदानी मराठी संस्कृतीचे देखणेपण अकृत्रिमरित्या आम्ही सांभाळलेच पाहिजे. ती आमची जबाबदारी आहे. शिवचरित्रातून आणि जिजाऊसाहेबांच्या चरित्रातून हे शिकता येते.

महाराजांच्या वेशभूषेबद्दल आपण पूवीर् पाहिलेच. परमानंद कविंदाने लिहिले आहे त्यात एक मामिर्क नोंद केली आहे. अफझलखानाच्या भेटीला जातानाचे महाराजांचे वर्णन करताना तो लिहितो की , ' महाराजांची दाढी कात्रीने नीटनेटकी केलेली होती. ' ही गोष्ट तशी अगदी किरकोळ आहे. पण त्यातून त्यांचा ' एस्थेटिक सेन्स ' दिसून येतो.

महाराजांची जुनी चित्रे उपलब्ध आहेत. त्यात ब्रिटिश म्युझियम लायब्ररी , लंडन येथील चित्रांत महाराजांनी थोडेसे उभे गंध कपाळावर लावलेले असावे की काय , असा भास होतो. पण अन्य चित्रांत गंध लावलेले कुठेही दिसत नाही. ही चित्रे प्रोफाइल आहेत. पण कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमधील म्युझियममध्ये आणि हैदराबादच्या सालारजंग म्युझियममध्ये महाराजांचे एकेक चित्र आहे. ही दोन्ही चित्रे समोरून , जरा कोनात काढलेली आहेत. अशा चित्रांना ' तीन चष्मी चित्र ' म्हणत. यात व्यक्तीचे दोन डोळे आणि एक कान दिसतो. कोल्हापूर आणि हैदराबाद येथील चित्रे अशीच तीन चष्मी आहेत. त्या चित्रांत महाराजांचे कपाळ समोरून दिसते , पण कपाळावर कोणत्याही प्रकाराचे वा आकाराचे गंध लावलेले दिसत नाही. सणसमारंभ , पूजाअर्चा वा राज्याभिषेकासारखा सोहळा चालू असताना महाराजांच्या कपाळावर नक्कीच गंध आणि कुंकुमतिलक असणारच. पण दैनंदिन जीवनात तसा होता की नव्हता , हे चित्रात वा कोणत्याही पत्रात दिसत नाही.

वेशभूषेच्या संदर्भात महाराजांच्या बाबतीत घडलेली एक गंमत सांगतो. महाराज एकदा राजापूर शहरात पालखीतून चालले होते. सांगाती थोडेफार सैनिक होते. रस्त्याने पालखी जात असताना दोन्ही बाजूंना नागरिक मंडळी स्वारी बघत होती. त्यातच एक- दोन इंग्रज उभे होते. राजापुरात ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी वखार होती , हे आपणांस माहीतच आहे. पालखी चालत असताना महाराजांचे सहज लक्ष त्या इंग्रज पुरुषांकडे गेले. इंग्रजांची वेशभूषा अर्थात इंग्रजीच होती. त्यांनी डोक्याला केसांचा टोप ( विग) घातलेला होता. महाराजांच्या मनात हे वेगळेच केस पाहून कुतूहल निर्माण झाले. महाराजांनी पालखी मुद्दाम त्या इंग्रजांच्या जवळून नेली. थांबविली. अन् त्यांनी त्या इंग्रजांच्या कानाशेजारी आपल्या हाताने केसात बोटांनी चाचपून पाहिले. अन् महाराजांच्या लक्षात आले की , हे केस वरून लावलेले आहेत. नैसगिर्क नाहीत. त्यांना गंमत वाटली. इंग्रजांनाही गंमत वाटली. पालखी पुढे गेली.

आग्ऱ्यात महाराजांनी आपल्या वकिलांमार्फत आग्ऱ्याच्या बाजारातून काही जडजवाहीर आणि मौल्यवान कापडचोपडही खरेदी केले होते. त्यावरून महाराजांना वेशभूषेबद्दल नक्कीच थोडीफार तरी आवड होती असे दिसते.

महाराजांच्या अंतरी नाना कळा होत्या. पण वेष बावळा नव्हता! नीटनेटकेपणा असलाच पाहिजे. साधेपणाही पाहिजे. बावळेपणा असता कामा नये.

महाराजांनी आपल्या खाश्या जिलेबीस ( म्हणजे सैन्याच्या खास राजपथकास) चेकसारखे पोषाख केले होते ? अशी नोंद आहे. म्हणजेच युनिफॉर्मची कल्पना त्यांच्या मनात निश्चित होती.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर!

साल्हेर! आपल्या इतिहासात विशेषत: इ. १२९६ पासून पुढे रक्तपाताने लाल झालेली पानेच जास्त दिसतात. पण शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा प्रारंभ करून उघडउघड युद्धकांडच सुरू केले नाही का ? पण या स्वातंत्र्ययुद्धकांडाचा इतिहास वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते , की महाराजांनी करावे लागले तिथे युद्ध केलेच , पण शक्यतेवढा रक्तपात टाळण्याचाही प्रयत्न केला. या शिवस्वराज्य पर्वाला सुरुवात झाली. इ. १६४६ मध्ये. पण तोरणा , कोरीगड , पुरंदर हे किल्ले रक्ताचा थेंबही न सांडता त्यांनी स्वराज्यात आणले.

इतकेच काय , पण सिंहगडसारखा किल्ला सिद्दी अंबर वाहब या आदिलशाही किल्लेदाराच्या हातून ' कारस्थाने करोन ' महाराजांच्या बापूजी मुदगल नऱ्हेकर याने स्वराज्यात आणला. प्रत्यक्ष पहिली लढाई महाराजांना करावी लागली , ती दि. ८ ऑगस्ट १६४८ या दिवशी आणि या आठवड्यात. विजापूरचा सरदार फत्तेखान शिरवळ आणि पुरंदर या किल्ल्यांवर चालून आला. त्यावेळी महाराजांनी त्याच्या खळद बेलसरवर असलेल्या (ता. पुरंदर) छावणीवर पहिला अचानक छापा घातला. लढाई झाली. पण या गनिमी काव्याच्या छाप्यात रक्तपात किंवा मृत्यू त्यामानाने बेतानेच घडले. अंतिम विजय महाराजांचाच झाला. एकूण लढाया तीन ठिकाणी झाल्या. शिरवळ , बेलसर आणि पुरंदर गड.

पुढच्या काळातही झालेल्या लढायांचा अभ्यास केला , तर असेच दिसेल , याचे मर्म महाराजांच्या क्रांतीकारक युद्धपद्धतीत आहे. ती युद्धपद्धती गनिमी काव्याची , छाप्यांची , मनुष्यबळ बचावून शत्रूला पराभूत करण्याचे हे तंत्र म्हणजे गनिमी कावा.

पहिली खूप मोठी लढाई ठरली ती प्रतापगडाची. ( दि. १० नोव्हेंबर १६५९ ) या युद्धातही शत्रूची महाराजांनी कत्तल केली नाही. त्यांचा मावळ्यांना आदेशच होता की , ' लढत्या हशमास मारावे ' म्हणजेच न लढत्या शत्रूला मारू नये. त्याला निशस्त्र करावे. जरुर तर कैद करावे. पळाल्यास पळू द्यावे. कत्तलबाजी ही महाराजांची संस्कृतीच नव्हती. प्रतापगड विजयानंतर पुढे पाऊण महिना महाराज सतत आदिलशाही मुलुख आणि किल्ले घेत पन्हाळा , विशाळगड प्रदेशापर्यंत पोहोचले. हा प्रदेश दौडत्या छापेगिरीने महाराजांनी काबीज केला. शत्रू शरण आल्यावर आणि उद्दिष्ट साध्य झाल्यावर शरणागतांना ठार मारण्याची हौस त्यांना नव्हती. अकबराने राणा प्रतापांचा चितोडगड जिंकल्यावरही गडावरच्या राजपुतांची मोठी कत्तल केल्याची नोंद आहे. अशा नोंदी शाही इतिहासात खूपच आहेत. शिव इतिहासात नाहीत , हे सांस्कृतिक फरक होय.

एक तर महाराजांच्या चढाया आणि लढाया या अचानक छाप्यांच्या असल्यामुळे रक्तपात कमी घडले. त्यातही शरण आलेल्या लोकांना , शक्य असेल तर आपल्याच स्वराज्यसेनेत सामील करून घेण्याची महाराजांची मनोवृत्ती होती. उदाहरणार्थ अफझलखान पराभवानंतर खानाच्या फौजेतील नाईकजी पांढरे , नाईकजी खराटे , कल्याणजी जाधव , सिद्दी हिलाल खान , वाहवाह खान आदि खानपक्षाचे सरदार महाराजांना शरण आले आणि सामीलही झाले. अशी उदाहरणे आणखीही सांगता येतील.

मोठ्या प्रमाणावर मोकळ्या मैदानात महाराजांनी युद्धे करण्याचे शक्यतोवर टाळलेलेच दिसते. पण तरीही काही लढाया कराव्याच लागल्या. वणी दिंडोरीची लढाई ( दि. १५ नोव्हें १६७० ) आणि त्याहून मोठी लढाई साल्हेरची , ही लढाई नव्हे , हे युद्धच मोगलांची फौज लाखाच्या आसपास होती. मराठी फौज त्यांच्या सुमारे निम्मीच. पण युद्ध घनघोर झाले. साल्हेरचे युद्ध क्रांतीकारक म्हणावे लागेल. कर्नाटकच्या शेवटच्या विजयनगर सम्राट रामराजाचा पराभव दक्षिणेतील सुलतानांनी राक्षसतागडीच्या प्रचंड युद्धात केला. (इ. १५६५ ) हे युद्ध भयानकच झाले. याला जंगे-ए-आझम राक्षसतागडी असे म्हणतात. यात रामराजासह प्रचंड कानडी फौज मारली गेली. सुलतानांचा जय झाला. या लढाईची दहशत कर्नाटकावर एवढी प्रचंड बसली की , विजयनगरचे साम्राज्य राजधानीसकट उद्ध्वस्त झाले. संपले. ती दहशत महाराष्ट्रावरही होतीच. पण महाराजांनी अतिसावधपणाने सपाटीवरच्या लढाया शक्यतो टाळल्याच. कारण मनुष्यबळ आणि युद्धसाहित्य अगदी कमी होते ना , म्हणून. पण साल्हेरचे युद्ध अटळ होते. जर साल्हेरच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला असता , तर ? तर १७६१ चे पानिपत १६७३ मध्येच घडले असते. पण प्रतापराव , मोरोपंत , सूर्यराव काकडे , इत्यादी सेनानींनी हे भयंकर लंकायुद्ध जिंकले. मराठी स्वराज्य अधिक बलाढ्य झाले. वाढले.

ज १७६१ चे पानिपत मराठ्यांनी जिंकले असते तर ? तर मराठी झेंडा अटकेच्या पलिकडे अन् खैबरच्याही पलिकडे काबूल कंदहारपर्यंत जाऊन पोहोचला असता. पाहा पटते का!

साल्हेरच्या युद्धात जय मिळाला , पण आनंदाच्याबरोबर युद्धातील विजय दु:ख घेऊनच येतो. या युद्धात महाराजांचा एक अत्यंत आवडता , शूर जिवलग सूर्याजी काकडे हा मारला गेला. महाराजांना अपार दु:ख झाले. त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले , ' माझा सूर्याराऊ पडिला. तो जैसा भारतीचा कर्ण होता. '

उपाय काय ? अखेर हा युद्धधर्म आहे. सूर्यराव काकडे हे पुरंदर तालुक्यातील पांगारे गावचे शिलेदार फार मातब्बर. त्यांच्या घराण्याला ' दिनकरराव ' अशी पदवी होती. सूर्यराव साल्हेरच्या रणांगणावर पडले. सूर्यमंडळच भेदून गेले. या काकडे घराण्याने स्वराज्यात अपार पराक्रम गाजविला. प्रतापगडचे युद्धाचे वेळी खासा प्रतापगड किल्ला सांभाळण्याचे काम याच घराण्यातील गोरखोजी काकडे यांच्यावर सोपविले होते. ते त्यांनीही चोख पार पाडले.

साल्हेरच्या युद्धाचा औरंगजेबाच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. तो दु:खीही झाला आणि संतप्तही झाला. उपयोग अर्थात दोन्हीचाही नाही.

कोणा एका अज्ञात मराठी कवीने चारच ओळीची एक कविता औरंगजेबाच्या मनस्थितीचे वर्णन करण्यासाठी लिहून ठेवलेली आहे ,

सरितपतीचे जल मोजवेना
माध्यान्हीचा भास्कर पाहवेना
मुठीत वैश्वानर साहवेना
तैसा शिवाजीनृप जिंकवेना!
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व

शिवाजी महाराज हे स्वराज्य संस्थापक होते. पण तेही या स्वराज्याचे प्रजाजनच होते. राजेपण , नेतेपण आणि मार्गदर्शक गुरूपण या महाराजांच्या वाट्याला आलेल्या भूमिका होत्या. त्या त्यांनी आदर्शपणे पार पाडल्या. सत्ताधीश असूनही जाणत्यांच्या आणि कर्तबगारांच्या पुढे ते सविनय होते. अहंकार आणि उद्धटपणा त्यांना कधीही शिवला नाही. मधमाश्यांप्रमाणे शंभर प्रकारची माणसं त्यांच्याभोवती मोहोळासारखी जमा झाली. त्यांचा त्यांनी त्यांच्या योग्यतेप्रमाणे उपयोग केला. या साऱ्यांना सांभाळण्याचं काम सोपं होतं का ? जिजाऊसाहेब ते काम जाणीवपूर्वक ममतेने आणि मनापासून कळवळ्याने करीत होत्या. माणसांशी वागणं ही त्यांची ' पॉलिसी ' नव्हती. प्रेम हा त्यांचा स्थायीभाव होता. सध्याच्या काळात लोकप्रतिनिधित्त्व करणाऱ्या संसदेपासून ग्रामपंचायतीपर्यंतच्या कार्यर्कत्यांनी जिजाऊसाहेबांच्या नेतृत्वाचा म्हणजेच मातृत्त्वाचाच अभ्यास करावा. त्या उत्कृष्ट संघटक होत्या.

शाही धुमाकुळात उद्ध्वस्त झालेल्या पुणे शहरात त्या प्रथम राहावयास आल्यावर ( इ. १६३७ पासून पुढे) त्यांनी पुण्याभोवतीच्या छत्तीस गावात एकूणच कर्यात मावळात त्यांनी अक्षरश: दारिद्याने आणि हालअपेष्टांनी गांजलेल्या दीनवाण्या जनतेला आईसारखा आधार दिला. आंबील ओढ्याच्या काठावरील ढोर समाजाला त्यांनी निर्धास्त निवारा दिला. बेकार हातांना काम दिले , काम करणाऱ्या हातांना दाम दिले. प्रतिष्ठीत गुंडांचा सफाईने बंदोबस्त केला. प्रसंगी या अतिरेकी छळवादी गुंडांना त्यांनी ठार मारावयासही कमी केले नाही. उदाहरणार्थ फुलजी नाईक शिळमकर आणि कृष्णाजी नाईक बांदल. यांना शब्दांचे शहाणपण समजेना. त्यांना त्यांनी तलवारीनेच धडा दिला. त्यांच्या इतक्या कडकपणाचाही लोकांनी नेमका अर्थ लक्षात घेतला.

लोक जिजाऊसाहेबांच्या पाठिशीच उभे राहिले. कोणीही त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला नाही! याच शिळमकर , बांदल आणखीन बऱ्याच दांडगाईवाल्या माणसांच्या घरातील गणगोणाने महाराजांच्या सांगाती स्वराज्यासाठी बेलभंडार उचलून शपथा घेतल्या. ते महाराजांचे जिवलग बनले. हे सारे श्रेय जिजाऊसाहेबांच्या ममतेला आहे. त्याही अशा मोठ्या मनाच्या की , चुकल्यामाकलेल्यांच्या रांजणातील पूवीर्चे खडे मोजत बसल्या नाहीत.

जरा पुढची एक गोष्ट सांगतो. मसूरच्या जगदाळ्यांनी आदिलशाहीची परंपरेनं चाकरी केली. अर्थात महाराजांना विरोध करणं त्यांना भागच पडलं. महादाजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफझलखानाच्या सांगाती प्रतापगडच्या आखाड्यात उतरले. त्यात खान संपला. शाही फौजेची दाणादाण उडाली. त्यात महादजी जगदाळे तळबीड गावाजवळ महाराजांचे हाती जिता गवसला. महाराजांनी त्याचे हात तोडले. याच महादाजीला आठदहा वर्षाचा पोरगा होता. जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेनं या पोराला आपल्यापाशी सांभाळला. त्याला शहाणा केला. तो स्वराज्याचाच झाला. अशी ही आई होती.

उद्ध्वस्त झालेलं पुणं आणि परगणा जिजाऊसाहेबांनी संसारासारखा सजविला. पावसाळ्यात चवताळून सैरावैरा वाहणाऱ्या आंबील ओढ्याला त्यांनी पर्वतीजवळ पक्का बंधारा घातला. शेतीवाडीचा खडक माळ करून टाकणाऱ्या आणि जीवितहानी करणाऱ्या या आंबील ओढ्याला त्यांनी शिस्तीची वाहतूक दिली. लोकांना न्याय दिला. शेतकऱ्यांना सर्व तऱ्हेची मदत केली अन् माणसं महाराजांच्या धाडसी उद्योगात हौसेनं सामील झाली.

नुस्त्या घोषणा करून माणसं पाठीमागे येत नाहीत. जोरदार घोषणा ऐकून चार दिवस येतातही. पण पाचवे दिवशी निघूनही जातात. लोकांना भरवसा हवा असतो. त्यांना प्रत्यय हवा असतो. आऊसाहेबांनी मावळ्यांना शिवराज्याचा प्रत्यय आणून दिला. म्हणून मी म्हटलं , की सध्याच्या आमच्या या नव्या हिंदवी स्वराज्यातील निवडून येणाऱ्या अन् न येणाऱ्याही लोकप्रतिनिधींनी जिजाऊसाहेबांच्या कार्यपद्धतीच्या आणि अंत:करणाचा अभ्यास करावा. निवडून आल्यावर पाच वषेर् फरारी होण्याची प्रथा बंद करावी.

एका ऐतिहासिक कागदात आलेली एक गंमत सांगतो. कागद जरा शिवोत्तरकालीन आहे. पण लक्षात घेण्यासारखा आहे. त्यातील आशय असा तानाजी मालुसऱ्याच्या घरी रायबाचं लगीन निघाले. तो राजगडावर महाराजांकडे भेटायास आला. खरं म्हणजे लग्नाचं आवतण द्यावयासच आला. पण सिंहगड काबीज करण्याच्या गोष्टी महाराजांपुढे चाललेल्या दिसताच त्याने पोराच्या लग्नाचा विचारही कळू न देता , ' सिंहगड मीच घेतो ' म्हणून सुपारी उचलली. ही गोष्ट जिजाऊसाहेबांना गडावरच समजली. चांगलं वाटलं. पण थोड्याच वेळात त्यांना कळलं की , तानाजीच्या घरी लगीन निघालंय. पण तो बोललाच नाही. तेव्हा मी आणि महाराजही तानाजीला म्हणाले , की ' सिंहगड कोंढाणा कुणीही घेईल. तू तुझ्या पोराचं लगीन साजरं कर. ' तेव्हाचं तानाजीचं उत्तर मराठ्यांच्या इतिहासात महाकाव्यासारखं चिरंजीव होऊन बसलंय. तानाजी म्हणाला , ' आधी लगीन कोंढाण्याचं '.

नंतर कोंढाण्याची मोहिम निश्चित झाली. मायेच्या हक्कानं तानाजी आपल्या अनेक मावळ्यांनिशी जिजाऊसाहेबांच्या खाश्या ओसरीवर जेवण करायला गेला. तो अन् सारे पानावर जेवायला बसलेही. अन् तानाजी मोठ्यानं म्हणाला , ' आम्हाला आऊसाहेबानं स्वत:च्या हातानं पंगतीत वाढलं पाहिजे. ' केवढा हा हट्ट. जिजाऊसाहेबांनी चार घास पंगतीत वाढले. वाढता वाढता आऊसाहेब दमल्या. तेव्हा तानाजी सर्वांना म्हणाला , ' आई दमली , आता कुणी तिनं जेवायला वाढायचा हट्ट धरू नका. ' जेवणे झाली. तानाजीसह सर्वांनी आपापली खरकटी पत्रावळ उचलली अन् तटाखाली टाकली.

तानाजीनं निघताना आऊसाहेबांच्या पावलांवर आपलं डोक ठेवलं अन् दंडवत घातला. त्याने आपल्या डोईचं पागोटं आऊसाहेबांच्या पावलावर ठेवलं. आऊसाहेबांनी ते पागोटं उचलून तानाजीच्या डोईस घातलं आणि त्याचा आलाबला घेतला. ( म्हणजे त्याच्या कानागालावरून हात फिरवून आऊसाहेबांनी स्वत:च्या कानशिलावर बोटे मोडली) त्याची दृष्ट काढली.

नंतर तानाजी मोहिमेवर गेला. माघ वद्य नवमीच्या मध्यान्नरात्री सिंहगडावर भयंकर झटापट झाली. तानाजी पडला. पण गड काबीज झाला. तानाजीचं प्रेत पालखीत घालून सिंहगडावरून राजगडास आणलं आऊसाहेबांना माहीत नव्हतं. कोण करणार धाडस सांगण्याचं ? आऊसाहेबांनी पालखी येताना पाहून कौतुकच केलं. कौतुकाचं बोलल्या. पण नंतर लक्षात आलं , की पालखीत प्रेत आहे. आऊसाहेबांनी ते पाहून अपार शोक मांडला. या सगळ्या घटनांवरून जिजाबाई समजते. तिची मायाममता समजते. तिचं नेतृत्व आणि मातृत्व समजतं.

ही हकीकत असलेला कागद कै. य. न. केळकर यांना संशोधनात गवसला.
-बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.

स्वराज्याचे एक विलक्षण मोलाचे सूत्र महाराजांनी आणि जिजाऊसाहेबांनी अगदी प्रारंभापासून , कटाक्षाने सांभाळले होते. ते म्हणजे , स्वराज्यात लायकीप्रमाणे काम मिळेल. लायकीप्रमाणे दाम मिळेल. लायकीप्रमाणे स्थान मिळेल. हेच सूत्र फ्रान्सच्या नेपोलियनला पूर्णपणे सांभाळता आले नाही. जिंकलेल्या नवनवीन प्रदेशावर नेमायला नेपोलियनला नातलग , सगेसोयरे अपुरे पडले. त्यामुळे गुणवत्ता ढासळली. अखेर सम्राट झालेला नेपोलियन ब्रिटीशांचा कैदी म्हणूनच तुरुंगात मरण पावला.

पण योग्य लायकी असलेल्या नातलगालाही टाळायचे का ? तसेही महाराजांनी केले नाही. त्यांचे थोडेेसेच पण फार मोठ्या योग्यतेचे नातलग अधिकारपदावर होते.

अभ्यासकांचे विशेष लक्ष वेधते ते काही व्यक्तींवर. उदाहरणार्थ बहिजीर् नाईक. हा बहिजीर् रामोशी समाजातील होता. पण योग्यतेने राजकुमारच ठरावा , असा महाराजांच्या काळजाचा तुकडा होता. तो अत्यंत धाडसी , अत्यंत बुद्धिमान , अत्यंत विश्वासू , तिखट कानाचा आणि शत्रूच्या काळजातलही गुपित शोधून काढणाऱ्या भेदक डोळ्याचा , बहिरी ससाणा होता. महाराजांनी त्याला नजरबाज खात्याचा सुभेदार नेमले होते. सुभेदार म्हणजे त्या खात्याचा सर्वश्रेष्ठ अधिकारी. हेरखात्याचा मुख्य अधिकारी होणे ही सामान्य गोष्ट आहे का ? त्याची बुद्धिमत्ता आणि चातुर्यप्रतिभा असामान्यच होती. अनुभवाने ती असामान्यच ठरली. वास्तविक रामोशी समाज हा लोकांनी ( अन् पुढच्या काळात ब्रिटीशांनी) गुन्हेगारच ठरवून टाकला. पण त्यातील हिरे आणि मोती महाराजांनी अचूक निवडले. किल्ल्यांच्या संरक्षणासाठी आणि दौडत्या सैन्यातही महाराजांनी रामोशी ' नाईक ' मंडळी आवर्जून नेमली.

जरा थोडे विषयांतर करून पुढचे बोलतो. स्वराज्य बुडून इंग्रजी अंमल आल्यानंतरच आमच्या पुरंदरच्या परिसरातला भिवडी गावचा एक तरुण होता , उमाजी नाईक रामोशी. त्याचे आडनांव खोमणे. सारे मराठी स्वराज्य बुडाले , म्हणजे आम्हीच बुडवले. हा उमाजी नाईक एकटा स्वराज्य मिळविण्याकरता इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र उठला. चार जिवलग मिळविले. आणि इंग्रजांचे राज्य उलथून पाडण्याकरता हा रामोशी आपल्या दोन पुत्रांनिशी उठला. त्याच्या एका मुलाचे नाव होते , तुका. दुसऱ्याचे नाव होते म्हंकाळा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की , या उमाजी नाईकाने उभारलेले बंड. इंग्रजांचे राज्य मोडून , शिवाजीराजा छत्रपतीचे राज्य स्थापन करण्याचा त्याचा तळमळीचा हेतू होता. शिवाजीमहाराजांना बाकी सारे जण विसरले. एका उमाजी नाईकाच्या काळजात महाराज विसावले होते. शिवाजीराजे या शब्दाचे सार्मथ्य किती मोठे होते आणि आहे हे एका रामोशालाच समजले. आम्हाला केव्हा समजणार ? होय. आम्हालाही माहिती आहे की , कॅप्टन मॅकींगटॉश या इंग्रज अधिकाऱ्याने उमाजी नाईकाला पडकले अन् फाशीही दिली. पण त्याच कॅप्टनने उमाजी नाईकाचे चरित्र लिहिले. छापले. त्यात तो कॅप्टन म्हणतो , ' हा उमाजी म्हणजे अपयश पावलेला शिवाजीराजाच होता. ' मन भावना आणि त्याप्रमाणे कर्तबगारी ही जातीवर अवलंबून नसते. बहिजीर् नाईक आणि उमाजी नाईक हे सारखेच. एक यशस्वी झाला , दुसरा दुदैर्वाने अयशस्वी ठरला. दोघेही शिवसैनिकच.

दिलेरखान पठाणाशी पुरंदरचा किल्ला साडेतीन महिने सतत लढत होता. दिलेरखानला पुरंदर जिंकून घेता आला नाही. त्या पुरंदरावर रामोशी होते , महार होते , धनगर होते , मराठा होते , मातंग होते , कोळी होते , कोण नव्हते ? सर्वजणांची जात एकच होती. ती म्हणजे शिवसैनिक. चंदपूर , गडचिरोलीपासून कारवार , गोकर्णापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रातील अगणित समाजसमुहातील माणसे महाराजांनी निवडून गोळा केली. त्यात धर्म , पंथ , सांप्रदाय , जाती- जमाती , भाषा , रीतरिवाज कधीही मोजले नाहीत. राष्ट्र उभे करावयाचे असेल , तर लक्षात घ्यावा लागतो , फक्त राष्ट्रधर्मच. अन् निर्माण करावे लागते राष्ट्रीय चारित्र्य. स्वराज्याचा पहिला पायदळ सेनापती होता नूर बेग. आरमाराचा एक जबर सेनानी होता दौलतखान. साताऱ्याजवळच्या वैराटगड या किल्ल्याचा किल्लेदार होता एक नाईक. एक गोष्ट लक्षात येते की , शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा इतिहास म्हणजे सर्व समाज शक्तींचा वापर. मित्रांनो , महाराष्ट्राच्या एका महाकवीच्या ओळी सतत डोळ्यापुढे येतात. तो कवी म्हणतोय , ' हातात हात घेऊन , हृदयास हृदय जोडून , ऐक्याचा मंत्र जपून ' आपला देश म्हणजे बलसागर राष्ट्र उभे करूया. शिवरायांच्या तत्त्वज्ञानाचे आणि इतिहासाचे तरी दुसरे कोणते सार आहे ?
-बाबासाहेब पुरंदरे