शुक्रवार, २४ एप्रिल, २००९

शिवचरित्रमाला भाग १५६ ...आठवावा प्रताप !

शिवाजी महाराजांच्या मुंबईच्या समुद्रातील स्मारकावर महाराष्ट्रात बरंच वादळ घोंगावतयं. पण या स्मारकावरुन होणारा
गोंधळ काही नवीन नाही. पाच वर्षापूर्वीही याच गदारोळावर भाष्य करणारा हा अग्रलेख ...

..........................................

आणिकही धर्मकृत्ये चालती। आश्रित होउनि कितेक असती।
धन्य धन्य तुमची कीर्ति। विश्वी विस्तारली।।

समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सतराव्या शतकात केलेले हे वर्णन. काळाच्या ओघात संदर्भ बदलल्याने अनेक वर्णने अर्थहीन बनतात.

परंतु ' आश्रित होउनि कितेक असती ' हे वर्णन मात्र चारशे वर्षांनंतरही कित्येकांस लागू पडते. अशा मानसिकदृष्ट्या आश्रित असलेल्या आमदारांनी गुरुवारी विधान परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक करण्याच्या प्रश्ानवरून गदारोळ घातला व अखेर कमजोर सरकारकडून आश्वासनही मिळवले. शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधी पक्षांनी आपापली दुकाने चालवण्यासाठी जितका केला , तितका अन्य कुणा राष्ट्रपुरुषाचा केला गेला नसेल. शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक करण्यासाठी शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या सरकारच्या काळात एक समिती नेमण्यात आली.

या समितीने 1999 मध्ये अहवाल सादर केला खरा , पण दरम्यान युतीची सत्ता जाऊन विलासराव देशमुख यांचे सरकार सत्तेवर आले. समितीच्या अहवालावर विचार करण्यासाठी विलासरावांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक समिती नियुक्त झाली. या समितीने शिवरायांचेे स्मारक मुंबईत करण्याऐवजी ते रायगड किंवा शिवनेरीवर करावे , असे सुचवले. शिवाजी महाराजांचे नाव घेताच ज्यांचे बाहू फुरफुरू लागतात , अशा मंडळींचे यामुळे पित्त खवळणे स्वाभाविकच आहे. वास्तविक विलासरावांच्या समितीचा निर्णय कटू असला , तरी योग्यच म्हणावा लागेल.

मुंबईत शिवाजी महाराजांचे तीन अश्वारूढ पुतळे आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ व मध्य रेल्वेचे मुख्य स्टेशन बोरीबंदर यांना शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचे नाव बदलून त्यालाही महाराजांचे नाव देण्यात आले. याखेरीज छोटी-मोठी स्मारके आहेतच. याहून आणखी स्मारक करायचे म्हणजे काय करायचे ? चौकाचौकात पुतळे उभारल्याने चिमण्याकावळ्यांचीच सोय होते व इमारती आणि रस्त्यांना नावे देऊन आद्याक्षरांचे शॉर्टफॉर्म होऊन थोर नेत्यांच्या स्मरणापेक्षा विस्मरणच अधिक होते. पण शिवराय गेल्यानंतरही त्यांचेच आश्रित होऊन आपली उपजीविका करणाऱ्यांना इतके भान कुठले ? त्यामुळेच विधान परिषदेत गदारोळ झाला व अखेर सामान्य प्रशासन राज्यमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांना या समितीच्या शिफारशींचा पुर्नविचार करण्याचे आश्वासन द्यावे लागले.

म्हणजे आता आणखी एका समितीची सोय झाली. हे असे किती काळ करून जनतेची फसवणूक करत राहणार ? शिवाजी हा रयतेचा राजा. आज महाराष्ट्रातील रयत एका बाजूला दुष्काळ व वीज टंचाई आणि दुसऱ्या बाजूला भयानक बेकारी यांच्या दुष्टचक्रात पिसून निघत असताना , शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य चालवणारे मात्र त्यांच्या स्मारकाचे लोणी कसे खाता येईल , याचाच विचार करत राहिले आहेत. छत्रपती आज असते , तर आपल्या स्मारकाच्या मागणीसाठी सभागृहाचा वेळ फुकट घालवणाऱ्यांनाच मणामणाच्या बेड्या घालून त्यांचा कडेलोट करण्याच्या आज्ञा त्यांनी दिल्या असत्या.

ज्यांना छत्रपतींच्या स्मारकाचा इतका कळवळा आला आहे , त्यांनी एकवार शिवनेरीवर किंवा पायात त्राण आणि उरात दम असल्यास रायगडावर जाऊन यावे. शिवस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक वास्तूंची जी परवड झाली आहे , ती नजरेखालून घालावी. शिवनेरीची अवस्था इतकी वाईट की , गडावर एकही माहिती फलक नीट अवस्थेत नाही. जे पर्यटक शिवप्रेमाने शिवनेरीवर येतात , त्यांना ठीक माहिती देण्यासाठी एकही अधिकृत वाटाड्या नाही. रायगडाची अवस्थाही फारशी चांगली नाही. या गोष्टी आमदारांना ठाऊक नसतीलच , असे नाही.

पण रायगड वा शिवनेरी अथवा अन्य गड-किल्ले दुरुस्त केल्याने त्यांना काय फायदा ? मुंबईत स्मारक केले , तर त्याची पायाभरणी , उद्घाटन , नंतर दरवषीर् वर्धापनदिन यानिमित्ताने मिरवता येणे शक्य आहे. शिवाय शिवाजी महाराजांसाठी ' लढण्याचे ' भांडवल करून पुढील निवडणुकीत भाबड्या शिवप्रेमींकडे मताचा जोगवाही मागता येईल. राजकारणात राहायचे आणि कायम सत्तेचीच गणिते मांडायची , तर हा विचार योग्यच म्हणावा लागेल. पण आपले लोकप्रतिनिधी शिवाजी महाराजांच्या नावाचेही ' माकेर्टिंग ' करत आहेत , हे जनतेला ज्या दिवशी कळेल , त्या दिवशी या तथाकथित ' राष्ट्रवादीं ' ची ते कशा पद्धतीने संभावना करतील , याचा विचारच केलेला बरा.

समर्थांनी म्हटले की , ' शिवराजाचे आठवावे रूप। शिवराजाचा आठवावा साक्षेप। शिवराजाचा आठवावा प्रताप। भूमंडळी।। ' महाराजांच्या मानसिक आश्रितांना हे उमगले नाही , तर जनताच त्यांना शिवराजांच्या प्रतापाची प्रचीती आणून देईल. थोडक्यात , अद्याप वेळ गेलेली नाही. शिवाजी महाराजांचे ' आंतरराष्ट्रीय ' ख्यातीचे स्मारक मुंबईतच उभारण्याचा दुराग्रह धरण्याऐवजी रायगड , शिवनेरीसारख्या किल्ल्यांची डागडुजी करून ती उत्तम पर्यटनस्थळे बनवावीत व तेथे सैनिकी प्रशिक्षणासारखी व्यवस्था करावी , हेच उत्तम.

1 टिप्पणी:

अमेय पत्की म्हणाले...

ही संपूर्ण लेखमाला ऑनलाईन वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले शतशः धन्यवाद.


ता.क. : आणि आपण ही लेखमाला संपूर्ण टाईप केली असल्यास कोपरापासून नमस्कार. . !!