रणजीत देसाई यांच्या ‘ श्रीमान योगी ’ या पुस्तकाची नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेली प्रस्तावना ही श
िवचरित्राचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. याच प्रस्तावनेत कुरुंदकरांनी महाराजांनी राज्याभिषेक का करवून घेतला ते सांगितले आहे. तो भाग या प्रस्तावनेतून जसाच्या तसा...............................................
इ. स. १६७४ ला शिवाजीने स्वतःला राज्याभिषेक करण्यासाठी हजार प्रयत्न करून, आपले क्षत्रियत्व त्याने सिद्ध केले. मुंज केली. प्रायश्चित्तं घेतली. स्वतःच्या पत्निंशीच नव्याने लग्ने केली. अभिषेकाचा इतका खटाटोप शिवाजीने का केला असा एक प्रश्न आहे. बेंद्रे यांचे म्हणणे असे की, ब्राह्मण गुन्हेगारांना शासन करणे, धार्मिक प्रश्नावर निकाल देणे हा अधिकार यावा म्हणून शिवाजीने राज्याभिषेक करून घेतला. माझे म्हणणे असे की, तो काळ धार्मिक प्रभाव आणइ वर्चस्वाचा काळ आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राज्याभिषेकाला पावित्र्य आणि प्रतिष्ठा आहे. राज म्हणजे मुसलमान, ही त्यावेळची समजूत आहे.
दिल्लीपती हा सर्व भारताचा स्वयंभू सम्राट मानला जाई. यामुळे बहामनी घराणे वैभवात असतानाही जनतेला व खुद्द बहामनी वजीरांना आपल्या राज्याचा सम्राट दिल्लीपती व त्याचा अधिपती इराणच खलीफा वाटे. भारताचे अधिपत्य मिळाल्यानंतरही हे अधिपत्य इराणकडून मान्य करून घेणे अल्लाउद्दिनला इष्ट वाटले. औरंगजेबाच्या वेळी खलीफा तुर्की होता. त्याची मान्यता आपल्या अधिपत्याला मिळावी याचा अटोकाट प्रयत्न अलमगीरने केला. शेवटी ती मिळाली तेव्हा, आनंदोत्सव दरबार केला. आदिलशाही, कुतुबशाही, राजांना व सरदारांनासुद्धा दिल्लीपती हा आपल्या पादशाहीचा सम्राट वाटे. शिवाजीच्या वेळी अनेक रजपूत राजे होते.
त्यांचे मंचकारोहण होई व तख्तनशीनीचा समारंभही होई. राज्याभिषेक नव्हता. विजयनगरचे साम्राज्य स्थापन झाले. वैभवाला चढले. पण वैदिक विधिपूर्वक राज्याभिषेक नाही. इ. स. १००० च्या नंतर हा वैदिक विधीच लुप्त झाला होता. गागाभट्टाने धर्मग्रंथ पाहून तो नव्याने सिद्ध केला व शिवाजीला राज्याभिषेक केला. ही एक क्रांतिकारक घटना होती. एकीकडे राम, नल, युधिष्ठिर, विक्रमादित्य या परंपरेशी या कृतीने शिवाजी आपला सांधा जोडीत होता. दुसरीकडे अखिल भारतातील हिंदुंच्या धर्मनिष्ठा व धर्माचे सारे पूज्यत्व व पावित्र्य स्वतःमागे उभे करीत होता. आमच्या धर्मशास्त्राप्रमाणे सत्य युगात चार वर्ण असतात.
द्वापारयुगात वर्णसंकराला आरंभ होतो. त्रेतायुगात तीन वर्ण राहून संकर वाढतो. कलीयुगात ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण राहतात. आमच्या पुराणांप्रमाणे नंद घराणे संपले आणि क्षत्रिय संपले. तिथून पुढे शूद्रराजे आरंभ झाले. शिवाजी जणू इतिहासाचे चाक मुस्लीम पूर्व जागेपर्यंत मागे सरकवून हिंदुंच्या वेदपुराणांचा, स्मृतींचा व सर्व हिंदू वैभवाचा स्वतःशी सांधा जोडून नवे युग सुरू झाल्याची द्वाही फिरवू इच्छित होता. शिवराज्याभिषेकाकडे तात्कालिक सोयीचा भाग म्हणून न पाहता, त्या मागची भव्यता समजून घेतली पाहिजे. अभिषेक-विधी बेंद्रे यांनी संपादन केला आहे. आपण आपल्या कादंबरीत या प्रसंगाची सर्व भव्य पवित्र भूमिका ठसठशीतपणे मांडावी असे मला वाटते.
स्वतःला वैदिक मंत्रांनी अभिषिक्त करून घेण्याची कल्पना शिवाजीच्या मनात केव्हापासून आली असावी ? मला वाटते, ती फार पूर्वीपासून असावी. कारण त्याने प्रधानाचा शिक्का असा घेतला आहे - शिवनगरपती हर्ष निधान सामराज मतीमत् प्रधान. हा शिक्का १६५३ पासूनचा आहे. यातील हर्षनिधान या विशेषणाला संस्कृत काव्य वाड्मयाची पार्श्वभूमी आहे. अभिषिक्त राजा म्हणजे सर्वांस अभय व न्यायाची हमी, प्रजेच्या नियमांची व सुखाची हमी. मात्सन्यायातील दुःखांपासून प्रजेची सुटका, अशी वर्णने कौटिल्यापासून आहेत. काव्यातही आहेत. अर्थात हे एक माझे अनुमान.
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा