गुरुवार, २७ ऑगस्ट, २००९

हे तरुणांनीच बदलायला हवं.


आज गणेशोत्सवाचं रूप बदलायची जबाबदारी तरुणांवर आहे. कारण हा उत्सव त्यांचा आहे. ते करू शकतील अशा गोष्टीही भरपूर आहेत.
......


मला तरुणांच्या ओठावर कोणते गीत आहे सांगा, मी त्या देशाचं भवितव्य सांगतो असं कोणी विचारवंत सांगून गेला आहे. अत्यंत समर्पक असे हे उद्गार. दरवषीर् मुंबईत, गोविंदा, गणेशोत्सव अशा दरवषीर् होणाऱ्या कार्यक्रमांच्या वेळी या वचनाची आठवण येते. मुळात उत्सव म्हटलं की, सळसळती तरुणाईच डोळयासमोर येते. अगदी आयोजनापासून ते सांगता होईपर्यंत. यात ज्येष्ठांचा सहभाग अर्थातच असतो, पण त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा असते. सारी धावपळ, दगदग, आयोजन ही जबाबदारी तरुणांची असायला हवी.

मुंबईत तरी, हे उत्सव म्हटलं की तरुणच डोळयासमोर येतात ही सकारात्मक बाब आहे. उत्सव कदाचित एखादा दिवस किंवा नऊ दिवस किंवा दहा दिवस रंगणारा असो, साधारण १६ ते ३० वर्षं वयोगटातील युवक सर्वत्र दिसतात. बेभान होऊन नाचताना किंवा रात्रभर जागरण करून पुन्हा पहाटे कामाला लागणारा असा हा तरुणांचा गट असतो. यांच्यामुळेच हे उत्सव दणक्यात होतात हेही मान्य करायला हवं. पण गेल्या काही वर्षांत हे उत्सव अधिकाधिक त्रासदायक होऊ लागले आहेत अशाही तक्रारी होत आहेत. अनेकदा नियम, कायदे धाब्यावर बसवून ते साजरे होताना दिसतात. असं होत असेल तर त्याचीही जबाबदारी तरुणांनी स्वीकारावी लागेल. आपल्याकडे उत्सव म्हणजे, भरपूर सजावट, भपना, अमाप खर्च असे समीकरण होऊन बसले आहेत. यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचं समर्थन असं असतं की, आम्ही वर्षभर उत्सव साजरे करत नाहीत, तेव्हा थोडा त्रास झाला तर काय बिघडतं? कोणी याबाबत विरोधी आवाज उठवला तर काही वेळा धमक्यापर्यंत मजल जाते.

यात एक बाब लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे, वर्षभर समाजाचा कोणता ना कोणता घटक आपापले उत्सव साजरे करत असतो. प्रत्येकाने अशी भूमिका घेतली तर वर्षभर लोकांना त्रास सहन करावा लागेल. नको ती गाणी मोठमोठ्याने लावताना कोणीतरी वृद्ध, बालक झोपलं असेल, कोणी विद्याथीर् अभ्यास करत असेल, कोणाकडे शोककार घटना घडली असेल याचाही तरुणांनी विचार करायला हवा. आपल्या हौसेची किंमत इतरांनी का मोजावी असा प्रश्ान् निर्माण होतो.

काही ठिकाणी मंडळाच्या पैशाचे हिशेब लागत नाहीत, किती वर्गणी जमा झाली हे कळत नाही अशा तक्रारीही होतात. असं होणं अर्थातच तरुणांना शोभादायक नाही. या अशा उत्सवांच्या निमित्ताने, अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. उत्सवादरम्यान ते अमलात येतात पण असं कार्य वर्षानुवर्षं कसे करता येतील याचा विचार होत नाही.

तरुणांनी आपली शक्ती कशी कामी लावायची हे ठरवायला हवं. आज मराठी तरु ण लष्करात जात नाही, अशी तक्रार आहे. यावर, साहसाची आवड असणाऱ्यांना याकडे उद्युक्त करण्याचं काम या तरुण कार्यर्कत्यांनी करायला हवं. गरीब वस्तीत शिक्षणाची आच आहे, पण पैशाअभावी ती साध्य करता येत नाही ही स्थिती असणारे अनेक असतात. ही मंडळं, तरुण त्यांच्यापर्यंत कसे पोहोचतील याचा विचार व्हायला हवा.

अनेक मंडळं आपापल्या परीने काम करत असतात, पण तरीही एकंदर चित्र अधिक आशादायक करता येईल. पण असंही दिसतं की, अनेक तरुण कोणत्या का कोणत्या राजकीय पक्षांनी बांधलेले असतात. राजकीय पक्षांचा कार्यक्रम मर्यादित असतो. त्यांना ही शक्ती सत्ता मिळवण्यासाठी, आंदोलने करण्यासाठी वापरायची असते. पण लोकांना भेडसावणाऱ्या रोजच्या समस्यांना हात घालावं असं त्यांना वाटत नाही. साधं उदाहरण म्हणजे, मुंबईतले रस्ते सुमार दर्जाचे आहेत. श्री गणेशाला याच रस्त्यावरून यावं लागतं आणि विसर्जनाचा प्रवासही ठेचकाळत करावा लागतो. पण अशा मंडळांच्या तरुणांनी एकत्र येऊन आवाज उठवल्याचं दिसत नाही, राजकीय पक्षांना हा कार्यक्रम घ्यायला भाग पाडलं जात नाही. याला कारण बहुसंख्य तरुण राजकीय पक्षांकडे झुकलेले असतात, स्थानिक नगरसेवक, आमदार, अशांनी त्यांना बांधून ठेवलेलं असतं.

आज अनेक समस्या सामान्य माणसाला भेडसावत आहेत. हे बहुतेक तरुण याच घरांतून आलेेले असतात. त्यांनी आपली शक्ती आणि युक्ती केवळ उत्सवाचं आयोजन करण्यात दवडण्यात काय अर्थ आहे? उदाहरणच द्यायचं झालं तर, लोकलमधून येत असताना, भजनी मंडळ एका डब्यात जोरजोरात टाळ वाजवत आणि कर्कश्श स्वरात भजनं म्हणत असतात. यात अनेक तरुण असतात. अशा प्रकारे, इतरांना उपदव ठरून देव पावत नाही हे त्यांना कळत नसेल का? रेल्वेचा डबा ही आपली खाजगी मालमत्ता नाही हे त्यांना कळत नसावं? पण दिशा चुकलेले असे युवक उत्सवात वावरत असतात.

हे उत्सवच नव्हे तर, एकंदर सर्वत्र शिस्त, शांतता येईल याची जबाबदारी या युवकांवर आहे. त्यामुळे या युवकांचं कार्य सांगा, मी शहराचं भवितव्य सांगतो, असं म्हणायला हवं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: