शुक्रवार, २८ ऑगस्ट, २००९

बाप्पा रे!

तुला हाक मारताना आताच्या प्रथेप्रमाणं प्रिय म्हणावं की तीर्थरूप म्हणावं याचा निर्णय करता आला नाही. मग ठरवलं तुला हाकच मारायची. तीसुद्धा एकेरी. कारण त्यातून जवळीक साधल्याचा आभास निर्माण करता येतोच; शिवाय आताच्या काळाला धरूनही होतं. आता कुणाशीही पटकन एकेरीत बोलण्याचीच रीत आहे. टेलिव्हिजनवर किंवा जाहीर कार्यक्रमात 'मोठ्या' माणसाची मुलाखत घेताना असं एकेरी बोलून आपलंही वजन वाढवता येतं. ही दाखवेगिरी आहे, असं तू म्हणशीलच. पण अशी दाखवेगिरी करूनच आता सर्वकाही साध्य करता येतं.

बाप्पा रे! कोणे एकेकाळी भादपद महिन्याच्या शुद्ध चतुथीर्ला तू घरोघरी यायचास. धुंवाधार पावसानं हवाही ओलीगच्च झालेली असायची आणि आसमंत हिरवागार. श्रावणसरींचा गोडवा आणि मधूनच पडणारे उन्हाचे उबदार सोनेरी कवडसे यांची मोहक चित्रं मनात ताजी असतानाच तुझं आगमन व्हायचं. घर आनंदानं भरून जायचं. पाव्हणा म्हणूनच तू यायचास आणि पाव्हण्यासारखाचा राहून निघून जायचास. पुढच्या वषीर् लवकर येण्याचं आश्वासन मुलांच्या मनात पेरून जायचास. तुझं येणं-जाणं असं सहज होतं. पण बाळ गंगाधर टिळक नावाच्या माणसाला लोकांना एकत्र करण्याचा हुकमी एक्का म्हणून तूच चांगला वाटलास. घराघरातल्या देवघरातच राहून गुपचूप परत जाणारा तू सार्वजनिक ठिकाणी राहू लागलास. तुझं असं एका मर्यादित अर्थानं सामाजिकीकरण होणं ही काळाचीच गरज होती. देवाचं असं सार्वत्रिकीकरण तेव्हा आवश्यकच होतं. पण तेव्हाच का; आताही काही काही बातम्या ऐकल्या की अशा सार्वत्रिकीकरणाची आजही गरज आहे, असं तीव्रतेनं वाटतं बरं. पण आता अशा सार्वत्रिकीकरणाऐवजी राजकीयीकरण करणंच अनेकांच्या उपयोगाचं असतं. अशी गरज अधिकाधिक भासू लागली तेव्हापासून तुझ्या आगमनालाच एक बटबटीत रूप येऊ लागलं.

बाप्पा रे! लहानपणापासून ऐकत आलो की तु बुद्धीची, कलेची देवता आहेस. ज्ञानेश्वर माऊलीनं भगवद्गीतेवरील आपलं भाष्य 'मऱ्हाटी' बोलीत सुरू करताना सुरुवातीला २१ ओव्यांमध्ये तुझंच स्मरण केलं. 'अकार चरण युगुल। उकार उदर विशाल। मकार महामंडल। मस्तकाकारे।। हे तिन्ही एकवटले। तेथ शब्द ब्रह्मा कवळले। ते मिया श्रीगुरूकृपा नमिले। आदिबीज।। आता अभिनववाग्विलासिनी। जे चातुर्यार्थ कलाकामिनी। ते श्रीशारदा विश्वमोहिनी। नमिली मिया।। ' असं तुझं वर्णन करून तुला दंडवत घातला. गीतेवरचं ते मऱ्हाटी भाषेतलं भाष्य ही त्या काळातली बंडखोरी होती. संस्कृतातलं धन प्राकृतात आणून जनसामान्यांसाठी खुलं करणं हा विदोहच होता. पण आम्ही मुदलातलं विसरलो आणि ज्ञानेश्वरीची पूजा करण्यातच धन्यता मानू लागलो. भावार्थ नजरेआड करायचा आणि बाह्योपचारालाच महत्त्व देऊन त्यातच गुुंतून पडायचं ही तशी आमची जुनीच रीत. वाईट एवढंच वाटतं की तीच रीत अजूनही चालू आहे.

बाप्पा रे! हे एकविसावे शतक. तुला २१ आकडा प्रिय. दुर्वा व्हायच्या त्या २१. मोदक अर्पण करायचे ते २१. अथर्वशीर्ष म्हणायचं तेही किमान एकवीसदा! जो आकडा तुला प्रिय तोच आकडा धारण करणारं शतक सध्या चालू आहे. आता या शतकात तरी आम्हाला चांगली बुद्धी दे. ज्ञानाची कास धरण्याची वृत्ती दे. विश्लेषक नजर दे. नवीन ते ग्रहण करण्याची क्षमता दे. आजचे प्रश्न समजून घेण्याची कुवत दे. जात आणि धर्म या गोष्टी वैयक्तिक जीवनापुरत्याच ठेवण्याची उपरती सगळ्यांनाच होऊ दे. आमच्या राजकारण्यांना, नाही रे बाप्पा; सत्ताकारण्यांना दूरवरचं बघण्याची दृष्टी दे. तुझा उत्सव हा मन प्रसन्न करणारा होऊ दे. प्रदूषण आणि पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शेती आणि पाणी या विषयाचं महत्त्व साऱ्या साऱ्यांना उमजू दे!

बाप्पा रे! तुझ्या तीर्थरूपांच्या आवडत्या चंदावर आम्ही पोचलो आहोत; मंगळावर जाण्याची तयारी करतो आहोत. केवळ अवकाशविज्ञानातच नाही, तर विज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये आम्ही प्रगती करत आहोत. पण प्रगतीची ही कवाडं महानगरांपुरतीच आहेत. ती खेड्यापाड्यांतही पोचायला हवीत. आधुनिक आयुविर्ज्ञानाचे फायदे अगदी आडबाजूच्या खेड्यात राहणाऱ्याला सामान्य माणसालाही मिळू देत. त्यासाठी आम्हाला बळ दे. येणाऱ्या दुष्काळाला तोंड देण्याची शक्ती दे. पुन्हा अशी वेळ येऊ नये म्हणून प्रदूषण कमी करण्याची, अधिकाधिक झाडं लावण्याची, तिवरांचं रक्षण करण्याची, पाणथळ जागा वाचवण्याची, खाड्यांमध्ये भराव न घालण्याची, प्लास्टिकच्या पिशव्यांना दूर ठेवण्याची, थमोर्कोलच्या आराशीला बाजूला सारण्याची बुद्धी आम्हाला दे. थोडक्यात, आमची जीवनशैली सुधारण्याची उपरती आम्हाला होऊ दे. इतकं करशील ना रे बाप्पा?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: