यावें... शिवपार्वतीनंदना, आपले स्वागत असो! दैत्यदानवकंदना, आपलं आगमन आम्हाला कल्याणकारी ठरो. गजवदना, मूषकवाहना आम्ही अधीर मनाने तुमच्या आगमनाची केव्हापासून वाटत पाहातो आहोत. आपण यावे, आम्ही आनंदाने आणि परमभक्तीने तुमच्यासमोर नतमस्तक होण्यास आतुरलो आहोत.
आमच्याप्रमाणे आमच्या गेल्या कित्येक पिढ्या तुमच्यासमोर अशाच किंबहूना यापेक्षा अधिक भक्तिभावनेने नतमस्तक होत आल्या आहेत. गेली किती शतकंहा तुमचा उत्सव अखिल हिंदूमात्र उत्साहात, आनंदात घरोघरी साजरा करत आले आहेत त्याची तर गणतीच नाही. हे गणराया, कुठल्याही पंथाचा, कुठल्याही जातीचा हिंदू तुम्हाला निरंतर पिढ्यानुपिढ्या वंदन करत आला आहे. तुमचं भजन-पूजन गेली हजारो वर्षं या भारतभूमीत निनादतं आहे. आपली म्हणजे गजाननाची मूतीर् घरातल्या मखरातून सार्वजनिक मैदानात आणणारे लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला तुमचा उत्सव आता यावषीर् ११६ वर्षांचा झाला. केवळ पाच उत्सवांनी सुरू झालेली ही उज्ज्वल परंपरा आणि प्रथा आता पन्नास हजार एवढी प्रचंड संख्या गाठण्याएवढी विशाल झाली आहे. हा उत्सव महाराष्ट्रात सुरू झाला आणि महाराष्ट्रातच वाढला. असं सांगतात की, इतक्या मोठ्या प्रमाणात सातत्याने दहा-अकरा दिवस चालणारा दुसरा उत्सव जगाच्या पाठीवर कुठेही नाही. या उत्सवात मुख्यत: तरुण भाग घेतात. तुमच्या भक्तीभावनेने देहभान विसरतात. त्यांच्या हातून क्वचित काही आगळीक घडली की त्याचा गाजावाजा केला जातो. काही आगळीक होऊ नये म्हणून सर्वप्रकारची दक्षता घेतली पाहिजे हे खरंच! पण उत्सवी वातावरण म्हटलं की, उत्साहाला उधाण आल्याशिवाय कसं राहिल आणि उधाण समुदाचं काय किंवा माणसाच्या मनातल्या आनंदाचं काय, कधी कधी सीमारेषेचं उल्लंघन करणारच. तुमच्या उत्सवाचं योगदान इतकं प्रचंड आहे की, त्या जोरावरच उत्साही कार्यर्कत्यांकडे थोडं क्षमाशील दृष्टीने पाहिलं जातं.
या प्रदीर्घ काळात कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या भक्तीत एवढाही उणेपणा येऊ दिला नाही. कधी अन्नधान्याची टंचाई, कधी वर्षादेवतेचा रूसवा, कधी गगनाला भिडणारी महागाई तर कधी देशाच्या सीमेवर जमणारे युद्घाचे ढग आणि कधीकधी तर लोकशाहीच्या नावाखाली चालणाऱ्या निवडणुकीच्या गदारोळामुळे गढुळलेलं वातावरण... या आणि यासारख्या अनेक चिंता-विवंचना पाचवीलाच पूजलेल्या असतानासुद्घा तुमची चतुथीर् मात्र आम्ही मनापासून, आनंदाने साजरी करत आलो आहोत. 'सुखकर्ता दु:खहर्ता' ही तुमची श्रीसमर्थ रामदासस्वामींनी लिहिलेली आरती आम्ही गेली साडेतीनशे वर्षं मनापासून म्हणतो आहोत. 'अथर्वशीर्षा'ची आवर्तनं, सहस्त्रावर्तनं उत्सवात नित्यश: होत आहेत. तुमचा अवाढव्य देह आणि त्या देहावर विराजमान झालेलं गजराजाचं मस्तक अनेकांच्या कुतूहलाचा विषय. माणसाच्या देहावर हत्तीचं मस्तक बसेलच कसं, असा प्रश्न मोठमोठ्या विचारवंताना, संशोधकांना गेली अनेक वर्षं, अनेक तपं सतावतो आहे. पण 'अथर्वशीर्ष' ह्याचा एक अर्थ 'अ-थर्व', न थरथरणारं शीर्ष म्हणजे डोकं.. अथर्वशीर्षाचं पठण मानसिक शांतता आणि बौद्घिक स्थिरता देते असा निर्वाळा आहे. आता शीर्ष म्हणजे डोकं स्थिर राहायला हवं असेल तर ते तसंच वजनदार नको काय? येणाऱ्या आणि येऊ घातलेल्या सर्व अडीअडचणींना शांत डोक्याने सामोरं जायचं असेल तर डोकं तसं भरभक्कम पाहिजेच.
कोणी कोणी सांगतात, अथर्वशीर्ष हे मंत्रगर्भ स्तोत्र अथर्ववेदाच्या परिशिष्टात आहे. म्हणजे एकापरीने शीर्षस्थानी आहे. म्हणून त्याचं नाव 'अथर्वशीर्ष'. असेलही, कोणी काही, कोणी काही अनुमाने काढून त्यानुसार तुमच्याकडे पाहतात. कोणी म्हणतात, तुम्ही शेतकऱ्यांचे आवडते आहात. तुमचा शेतकऱ्यांवर लोभ आहे. म्हणून भाताच्या लोंब्या असाव्यात तशी तुमची सोंड आहे आणि धान्य पाखडण्यासाठी ज्या सुपांचा उपयोग केला जातो तसे तुमचे कान आहेत. म्हणून तर तुम्हाला 'शूर्पकर्ण' असंही म्हणतात. पण एक गोष्ट खरी, तुमचं आगळंवेगळंं रूप, चार हात, 'लंबोदर' म्हणजे मोठं पोट, गजमुख हा सगळा काही वेगळाच प्रकार आहे.
कोणी सांगतात, तुम्ही मूळचं आर्यांचं दैवत नाही. तुमच्या स्वरूपाची मूळ संकल्पना 'विघ्नहर्ता' म्हणून नव्हे, तर 'विघ्नकर्ता' म्हणून झाली. अजूनही अगदीच अल्प प्रमाणात असणारे काही लोक तुम्हाला 'विघ्नकर्ता' म्हणून ओळखतात आणि तुम्हाला वचकतात, बिचकतात. मात्र गेल्या हजारो वर्षांच्या प्रवासात तुमचा 'विघ्नकर्ता' हा स्वभाव कुठे कधीकाळी असलाच तर तो आता पूर्णत: दूर झाला आणि आपलं बळ वापरून भक्तभाविकांची विघ्नं, संकटं दूर कशी करावीत, त्यांच्या आधी व्याधींचं निरसन कसं करावं या गोष्टीकडेच आपण अधिक ध्यान दिलंत. आम्हाला याचा अनुभव आहेच. पण आमची तुमच्यावर असलेली भक्ती त्या अनुभवासाठी हपापलेली नाही. तुमच्यावर आमचं मनापासून प्रेम आहे. तुमचे पाय आमच्या घराला लागावेत म्हणून कितीतरी आधीपासूनच तुमच्या आगमनाकडे आम्ही डोळे लावून असतो. तुम्ही आल्यावर तुमची काळजी आम्ही मनापासून घेतो. तुमच्या मूतीर्ला एवढीही इजा पोहोचू नये म्हणून आमच्या जीवाची तळमळ अखंडपणे चालू असते आणि आम्ही तुमच्या भक्तांनी तुमच्यावरची भक्तीपोटी किती आघात सोसले, तुमचे भक्त कोणाकोणाशी आणि कसे कसे लढले हे तर तुम्ही जाणताच.
गोव्यात चारशे वर्षांपूवीर् पोर्तुगीजांच्या राजवट जेव्हा स्थिरावली, तेव्हा त्यांनी तुमचा उत्सव होऊ नये म्हणून जीवघेणी बंधनं तुमच्या भक्तांवर लादली. त्याआधी असलेलं मोगली वातावरण तुमच्या भक्तांना छळत होतेच. पोर्तुगीजांनी मोगलाला पिटाळून लावलं आणि सुरुवातीची काही वर्षं तुमच्या पूजन-अर्चनाबाबत उदार धोरण दाखवलं. पण थोडीशी स्थिरस्थावरता येताच त्यांनी आपलं खरं रूप बाहेर काढलं आणि उत्सवात गणेशपूजन करणाऱ्याला देहदंडाची शिक्षा फर्मावली आणि तो देहदंडही असातसा नाही. गणेशभक्ताला अक्षरश: आगीच्या लोळात ढकलून देऊन त्याला तीव्र यातना देण्याचा अघोरी प्रकार सुरू केला. एवढ्यानेही काही झालं नाही. इतक्या हालअपेष्टा समोर दिसत असतानासुद्धा तुमच्या भक्तांनी गुपचुपपणे तुमचं पूजन चालूच ठेवलं होतं. मूतीर् घडवणं आणि घरात आणणं अवघडच होतं. म्हणून तुमचं एखादं चित्र पेटीच्या झाकणाच्या आतल्या बाजूला लावायचं आणि घराची दारं-खिडक्या बंद करून ती पेटी उघडून मनापासून तुमचं पूजन करायचं आणि हलक्या आवाजात तुमची आरती म्हणावयाची, मंत्रपुष्पांजलीचा उच्चार करायचा. आजदेखील कागदावरच्या चित्राची परंपरा क्वचित कुठे आढळतेे आणि तिथे मूतीर्ऐवजी कागदाच्या चित्राचं पूजन केलं जातं. हे असंच, कदाचित इतकं तीव्र नसलं तरी हालअपेष्टा भोगायला लावणारे प्रसंग अनेकदा आले. तुमची चेष्टाकुचेष्टा अन्य धमिर्यांकडून नाठाळपणे केली गेली. पण त्या निंदेचंही तुम्ही आणि तुमच्या भक्तांनी स्वागतच केलं. तुम्ही तर ही निंदेची उत्तरं आपल्या विशाल कानाआड करत आलात.
आम्ही महाराष्ट्रीय लोक तुम्हाला जे मानतो त्याची पाळंमुळं फार पुरातन काळापर्यंत गेलेली असली तरी सात-आठशे वर्षांपूवीर् ज्ञानेश्वरमहाराजांनी अध्यात्म क्षेत्रातलं उच्चतम तत्त्वज्ञान आपल्या मराठी भाषेत आणलं ते 'ँ़ नमोजी आद्या' अशा अजरामर शब्दांनी तुमचे स्मरण करून! गेली कित्येक शतकं जेव्हा जेव्हा काही नव्या कार्याला प्रारंभ केला जातोे तेव्हा 'प्रारंभी विनंती करू गणपती' असंच आम्ही म्हणतो. सुमधुर संगीतामुळे मराठी भाषेत चिरतरूण राहिलेलं संगीत नाटक 'सौभद' लिहिताना अण्णासाहेब किलोर्स्करांसारख्या मराठी रंगभूमीच्या आद्य दिग्गज नाटककाराची मती कुंठित झाली. त्यांना काही सूचेना, नाटक अर्ध्यावर थांबलं. अण्णांंना मुंबईच्या एका दुकानात तुमच्या मूतीर्चं दर्शन झालं आणि काय आश्चर्य, तत्क्षणी त्यांना पुढची कथा सुचली. अण्णांनी झपाट्याने नाटक पूर्ण करून महाराष्ट्रशारदेच्या चरणी अर्पण केलं. पुढल्या शे-पन्नास पिढ्या या नाटकाचा मनमुराद आनंद लुटत आल्या. घरातल्या दारावरच्या गणेशपट्टीपासून ज्या घरात तुमचं चित्र नाही, ज्या देवघरात तुमची मूतीर् नाही असं कोणतंही घर वा देवघर सापडणार नाही. अगदी आजकालची फ्लॅटसंस्कृतीही याला अपवाद नाही. आम्ही तुमच्याशी किती एकरूप झालो आहोत म्हणून सांगू! आताच्या जीन्स-टीशर्टच्या युगात वावरणारी मुलं-मुली तुमच्या मंदिरासमोरच्या लांबच लांब रांगेत तासन्तास तिष्ठत उभी असलेली दिसतात. ते काय मनात भक्तिभाव असल्याशिवाय? त्यांना काही प्रचिती आल्याशिवाय का? असा तुमचा महिमा आमच्या मनोमनी रूजला आहे. यावे गणेशदेवा! सुखकर्ता दु:खहर्ता हे आपलं बिरूद सार्थ करण्याकरता यावं.
बा अदब, बा मुलाहिजा, होश्शियार, श्रीगणेशजी आ रहे है, निगाह रक्खो होश्शियार!
-ज्योर्तिभास्कर जयंत साळगावकर
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा