बुधवार, १८ नोव्हेंबर, २००९

इंटरव्ह्यू टिप्स.

इंटरव्ह्यूला जाताना आपल्याला काय विचारणार, याचा अंदाज आपल्याला करता येत नाही. त्यामुळेच आपल्या डोक्यात अनेक गोष्टींची जुळवाजुळव सुरू असते. कोणत्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं याची उजळणी आपण करत असतो. पण अनेकदा एकदम वेगळाच प्रश्न विचारला जातो आणि आपली दांडी गुल होते. म्हणून काही प्रश्नांचा अंदाज दिलाय आणि त्यावर तुम्ही काय उत्तर द्यायचं याचा सल्लाही...

* तुमच्याविषयी काही सांगा...
अनेकदा हा पहिलाच प्रश्न तुमच्या मनात प्रचंड गोंधळ उडवून टाकतो. आपल्याविषयी नेमकं काय सांगणं समोरच्या व्यक्तीला अपेक्षित आहे, याचा अंदाज करणं कठीण होतं आणि सगळंच अवघड होऊन बसतं. त्यामुळेच तुम्ही आपल्याविषयी काय सांगायचं याची तयारी करा. पण बोलताना मात्र आधीच ठरवून ठेवलेलं बोलतोय, अस जाणवू देऊ नका. शक्यतो आपण कोणत्या प्रकारच्या कामासाठी इथे मुलाखत द्यायला आलोय, हे लक्षात ठेवून त्या संबंधित गोष्टी बोला. तुम्ही आतापर्यंत काय काम केलंय आणि सध्या कोणतं काम करताहेत, हे सांगा.

* तुमची आधीची नोकरी सोडण्याचं कारण काय?
कारण काहीही असो, पण शक्यतो पॉझिटीव बोला. तुम्ही तिथले प्रॉब्लेम सांगताना स्वत:च्या चुकाही सांगून टाकाल. त्यावरून तुमचं मॅनेजमेंटशी पटलेलं नाही, हे त्यांच्या लक्षात येईल. बोलताना स्मितहास्य कायम ठेवा. तुमच्या करिअरच्या दृष्टीने नवा जॉब फायद्याचा ठरेल किंवा ही संधी आपल्याला चांगला करिअर प्रॉस्पेक्ट्स देईल, म्हणून आपण इथे आलो आहोत, हे सांगायला विसरू नका.

* या क्षेत्रातील अनुभव सांगा.
तुमचा संबंधित क्षेत्रातील स्पेसिफिक अनुभव सांगा. उगाच तीर मारू नका. बढाया मारण्यापेक्षा आपला अनुभव तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला आलेल्या पदासाठी उपयोगी ठरणारा असेल, असंच बोला.

* तुम्ही यशस्वी व्हाल असं वाटतंय?
होय... असं उत्तर ठामपणे द्या. शिवाय का, हे थोडक्यात सांगा. तुम्ही आपल्या आयुष्यात काही गोल सेट केले आहेत, त्याप्रमाणे आपण वाटचाल करत आहोत. त्यानुसार पुढे जाण्यासाठी मेहनत आणि प्रयत्न करणार असं सांगितल्यास ते जास्त प्रभावी ठरेल.

* तुमच्या सहकाऱ्यांशी तुमचे संबंध कसे आहेत?
हा प्रश्न तुमचं टीममध्ये काम कसं असेल, याचा अंदाज घेण्यासाठी असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या सहकाऱ्यांविषयी टीका करणं टाळा. उलट टीममध्ये काम करताना आपलं काम प्रभावी होतं हे सांगायला विसरू नका. त्यामुळे तुमच्याविषयी नक्कीच अनुकूल मत तयार होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: