होय. फक्त साठच सैनिकांच्यानिशी कोंडाजी पन्हाळ्याकडे निघाला. आता मात्र कमाल झाली. फक्त साठ हत्यारबंद ? पन्हाळ्यावर होते आदिलशाहीचे जवळजवळ दोन हजार हशम. पूर्वी (दि. १६ जाने. १६६६ ) प्रत्यक्ष महाराजांनी आपल्या सुमारे तीन हजार मावळ्यांनिशी पूवेर्च्या बाजूने पन्हाळ्यावर मुसंडी मारली होती. ती साधली नाही.
फार मोठी हानी पत्करून त्यांना माघार घ्यावी लागली. फार पूवीर् इ. १६६० ( मार्च ते सप्टेंबर) सिद्दी जौहराने पन्हाळ्याला केवढा प्रचंड गराडा घातला होता , आठवतो ना! त्याही वेळी जौहरला गड फोडता आला नाही. अशी या पन्हाळ्याची ताकद. त्या पन्हाळ्यावर आता कोंडाजी अवघी साठ मनगटं घेऊन चाल करणार होता! आश्चर्य. कोंडाजीने मागे ठेवलेली मराठी टोळी गडापासून सुमारे आठ कि.मी. वर बांदिवडे गाव अन् नवरानवरीचा डोंगर यांच्या जवळपास ठेवली असावी.
कोंडाजी निघाला. त्याच्या साठांच्या मुठीत हत्यारं होतीच शिवाय अनेकांच्यापाशी कणेर् होते. कर्णा म्हणजे धोत्र्याच्या फुलासारखे किंवा सनईच्या आकारासारखे सुमारे पाच-सहा फूट लांबीचे पितळी वाद्य. शिंगासारखेच ते फुंकायचे. त्याचा आवाज भोम् भोम् भोम् भोम् भोम् असा होतो. हे रणवाद्यच आहे. याला भेरी असेही म्हणतात. आवाज मोठा होतो. अंगावर शहारे आणणारा.
अगदी योजून कोंडाजीने हे कर्णे बरोबर घेतले त्याने मागच्या आपल्या टोळीला राखीव फौजेसारखे ( रिर्झव्ह फोर्स) ठेवले. जणू अंधार पोखरीत कोंडाजी पन्हाळगडाच्या दक्षिण बाजूकडे निघाला. घडीभरात पोहोचला. समोर अंधारात पन्हाळा काळाकभिन्न दिसत होता. सरळ कडा. आपल्या सैनिकांना सर्व सूचना आणि इशारे त्याने देऊन ठेवले होते. कोंडाजीने तो कडा चढावयास सुरुवात केली. मागोमाग साठांची माळही हातापायांच्या बोटांचा खाचीकपारीत उपयोग करून वर चढू लागली. हा हा म्हणता साठांची ही ' प्रचंड फौज ' गडाच्या माथ्यावर पोहोचली. या बाजूला गडावर शाही हशमांचे पहारेच नव्हते. गड सुसरीसारखा सुस्तावला होता. सर्वजण वर पोहोचल्यावर ठरविल्याप्रमाणे कोंडाजीने गडाच्या मुख्य म्हणजे पूर्व बाजूस हल्ला चढविण्यासाठी आपल्या लोकांना , विशेषत: कणेर्वाल्या अनेक हशमांना इशारा केला , फुंका. फुंका. म्हणून कर्णे फुंकण्याचा.
फुंका ? अहो गडावर दोन हजार माणसांचा शत्रू. अन् कोंडाजी आपल्या साठांना म्हणतोय फुंका , फुंका ? अन् मग त्या दोन हजारांनी फुंकलं तर ? पण कोंडाजीचा शवच अतोनात धाडसी आणि कणेर् वाजायला सुरुवात झाली. बाकीचे सैनिकही गर्जू लागले , हर हर महादेव! हर हर महादेव! ज्योतिबाचा चांगभलं! तुळजाभवानी की जय! येळकोट येळकोट जयमल्हार! आणि हे सारे मराठे गडावरच्या दिसेल त्या अन् असेल तिथल्या शत्रू सैनिकांवर वादळासारखे तुटून पडले. आवाज भणाणत होता. गर्जना टिपेला जात होत्या. गड खडबडून उठला. या अचानक आलेल्या हल्ल्याने ते गोंधळलेच. भर रात्री वाद्य वाजवीत गनीम गडात घुसला तरी कसा ? आवाज तर फार मोठा होतोय. म्हणजे मराठे आहेत तरी किती ? या साऱ्याच शंकांनी शत्रूचं सैन्य गडबडलं. कापाकापी जत्रेसारखी सुरू झाली. एकच बेशिस्त गोंधळ अन् पळापळ सुरू झाली. गडाचा किल्लेदार बाबूखान एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर निर्धास्त आरामात होता. त्याला हा अचानक उडालेला गोंधळ आणि र्कण्यांच्या आवाज ऐकू आला. तो उठला. महालाच्या झरोक्यातून बाहेर डोकावला. आणि त्याने मोठमोठ्याने ओरडून विचारायला सुरुवात केली.
' कौन सिंग फुंकता है ? कौन ? कौन ?'
आता कोण सांगणार. शत्रू आलाय हे उघड होतं. स्वत: बाबूखान हत्यारानिशी त्या हवेलीतून धावत सुटला. अन् युद्धाच्या गदीर्वर तो आला. झुंजू लागला.
याचवेळी गडाचा मुख्य सबनीस नागो पंडित गडावर प्रारंभी झुंजत होता. पण तो मराठ्यांचा आवेश पाहून त्या अंधारात तो गडबडलाच. त्याला आणि खरं म्हणजे सर्वच बादशाही सैनिकांना वाटू लागलं की , मराठे संख्येनं खूप असावेत. नागो पंडित तर पळतच सुटला. एकटाच नव्हे तर आपल्याबरोबरचा सारा शाही सैनिकांचा जमाव घेऊन पळत सुटला. सुमारे चारशे सैनिक त्याच्याबरोबर होते. हा नागोबा आपल्या सैनिकांना उद्देशून ओरडत होता , ' पळा , पळा , गनीम अफाट आहे. जीव वाचवा. पळा. '
याचा परिणाम बाकीच्याही असंख्य सैनिकांवर झाला. तेही पळत सुटले , गडाच्या पूर्व दरवाजाकडे. ऐन रणांगणात गडावरच्या तोफांचा उपयोग अशावेळी कसा करणार अन् कोण करणार.
आता गाठ पडली कोंडाजीची बाबूखानाशी. बाबूखानशाही इमानाने लढत होता. या साऱ्या अचानक प्रकाराने त्याची मनस्थिती आता केवळ लढता लढता मरायचेच असं ठरविल्यासारखी झाली होती. आपली शाही फौज सावरून मराठ्यांवर हल्ला करावा हे जमणे आता केवळ अशक्य होते. या अचानक हल्ल्याचा म्हणजेच गनिमी काव्यातील ' सरप्राईज अॅटॅक ' चा हा अचूक परिणाम. कोंडाजीला साधला होता. बाबूखानाच्या दुदैर्वी अन् कमनशिबी किल्लेदारीवर कोसळला होता. त्यातच त्याच्या इमानी पण दुदैर्वी नशिबाने घात केला. बाबूखान कोंडाजी फर्जंदाच्या हातून ठार मारला गेला.
ठरले होते त्याचप्रमाणे कोंडाजीचे डाव सर होत गेले. आता तो आणि त्याचे साथीदार मराठे मोठमोठ्याने ओरडून शत्रू सैनिकांना दरडावून म्हणू लागले , ' हत्यारं टाका. नाहीतर आमची मागून फार मोठी मराठी फौज येतेच आहे. तुम्हा सर्वांची कत्तल उडेल. मुकाट हत्यारं टाका. '
या साऱ्या प्रकारचा परिणाम शत्रूवर झालाच. त्यांचा किल्लेदारही पडला होता. आणि ते सैनिक खरोखरच हत्यारं टाकून शरण येऊ लागले. निशस्त्र झालेल्या सैनिकांचीही संख्या या साठांच्या मानाने खूपच होती का! तरीही हत्यारं टाकून अंधारात ते बाजूला झाले. त्यांच्या नशिबी अंधारच होता. पन्हाळगड काबीज झाला होता.
मागे ठेवलेली दोनशेचाळीस मराठ्यांची ' प्रचंड ' फौज निरोप जाताच पन्हाळगडावर आली.
उजाडत गेले आणि मग निशस्त्र झालेल्या पण मोठ्या संख्येने असलेल्या या हतबल शाही हशमांना दिसून आले की , मूठभर लोकांनी आपला फजितवाडा केला. आपल्याला बावळट बनविले. किल्ला पूर्णपणे कब्जात आला होता. झेंडे लागले होते. कणेर् वाजतच होते. कोंडाजीने रायगडाकडे ही विजयाची बातमी कळविण्यासाठी महाराजांकडे घोडेस्वार पिटाळला.
केवढी युक्तीबाज शक्ती कोंडाजीने दाखविली. अवघ्या , ' साठी लोकांनसी कोंडाजी फर्जंदाने भेदेकरोन पन्हाळा कब्जा केला. ' हे गनिमी काव्याचे बळ. हे स्वराज्यनिष्ठेचे बळ. हे महत्त्वाकांक्षेचे बळ. खरोखरच या महत्त्वाकांक्षेपुढे ते उंच उंच गगन ठेंगणे पडत होते. आजच्या काळातल्या अग्निबाणासारखे ते सुसाट सुटून ग्रहनक्षत्रांचा वेध घेऊ पाहात होते.
-बाबासाहेब पुरंदरे
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा