शिवाजीमहाराजांच्या मनावर अगदी लहानपणापासूनच धामिर्क संस्कार झालेले समजून येतात. त्यांच्या वयाची पहिली सहा वर्षे तर शहाजीराजांच्या सहवासात खूप धावपळतीतच गेली. शहाजीराजे निजामशाहीच्या रक्षणासाठी आणि राज्यकारभारही चालविण्यासाठी सतत शहाजहानच्या मोगली फौजेशी झुंजत होते. घोडदौड आणि लढाया यांतच त्यांचा काळ जात होता. जिजाऊसाहेब , तुकाऊसाहेब आणि कुटुंबिय मंडळी यांनाही सतत राजांच्या सांगाती राहावे लागत होते. छावणीचा मुक्काम पडेल , तेवढीच स्थिरता या कुटुंबाच्या वाट्याला येत होती. जिजाऊसाहेब या तर देवधर्मात रमणाऱ्याच होत्या. त्यांच्या सहवासात तोच भाव आणि स्वभाव चिरंजीव शिवाजीराजांच्यात उतरला. जिजाऊसाहेबांची विशेषत: भक्ती भवानीदेवीवर आणि गणपतीवर होती. शंभूमहादेव हे तर त्यांचे कुलदैवतच होते. शंभूभट राजोपाध्ये आणि अन्य काही आश्रित पुजारी आणि शागीर्द मंडळी , पुराणिक , ज्योतिषी आणि नित्यनैमित्तिक सणवार समारंभ आणि धामिर्क विधी यथासांग सांभाळणारी मंडळी राजकुटुंबाबरोबर असायचीच. या सर्व वातावरणाचा परिणाम आणि आईची शिकवण शिवाजीराजांच्या मनावर सतत संस्कार करीत राहिली.
पण एवढे सर्व असूनही शिवाजीराजे हे धामिर्क कर्मकांडात वा भाबड्या देवभोळ्या व्रतवैकल्यात अजिबात गुरफटलेले दिसत नाहीत. ते श्रद्धावंत निश्चित होते पण भिक्षुकी कर्मकांडात तासन्तास घालवणाऱ्या आणि नवसासायांसावर , शकुन अपशकुनांवर आणि मानीव शुभअशुभ भविष्यांवर त्यांचा विश्वास नसावा , असेच कागदोपत्री प्रत्ययास येते. त्यांची कारस्थाने आणि रणांगणे वद्यपक्षातील तिथ्या मिथ्यांना झालेली दिसतात. उदाहरणार्थ पन्हाळ्याची मोहिम वद्य त्रयोदशीला आहे , तर सुरतेवरची दुसरी स्वारी ऐन आमावस्येला आहे. समुदावरच्या स्वाऱ्या भरतीओहोटी पाहून आखलेल्या दिसतात. अन् अमुक अंतराच्या पलिकडे समुद प्रवास केला , तर धर्मच बुडतो ही भोळसट कल्पना महाराजांच्या मनात चुकुनही फिरकत नाही. त्यांचे आरमार आणि व्यापारी नौका मस्कतपर्यंत बिनधास्त जात. महाराजांनी , सौदागर करतात तसा व्यापार केला नाही. पण व्यापार करणाऱ्या कोकण किनाऱ्यावरील आपल्या लोकांना विरोधही केला नाही. संरक्षणच दिले.
महाराज रोज मितकाल पूजाअर्चा करीत असत. त्यांचे राजोपाध्ये , वैदिक पुजारी आणि भोपे व्यवस्थेस असत. केशव पंडित पुरोहित हा संस्कृतज्ञ विद्वान पुराणिक महाराजांना शक्य असेल तेवढ्या वेळेत पौराणिक ग्रंथातील विषय वाचून दाखवित असे. ( या केशव पंडिताने दंड निती नावाचा स्वत: एक ग्रंथही लिहिला.)
महाराजांच्या रोजच्या पूजेत एक सुंदर शिवलिंग म्हणजे बाण होता. महाराज मोहिमेवर वा प्रवासास जात , तेव्हाही हा बाण त्यांच्या बरोबर असे. अखेरपर्यंत हा बाण त्यांच्या सन्निध होता. हा बाण , म्हणजेच हे शिवलिंग अंदाजे पाऊण किलो वजनाचे आहे. बाणाचा रंग काहीसा भस्मीसावळा आहे. अर्थात हा बाण पाषाणाचा आहे. त्यावर अंगचीच जानव्यासारखी रेषा आहे. हा बाण इ. १६९९ पासून इ. १६७७ पर्यंत सिंहगडावर राजाराम महाराजांच्या समाधीपाशी नित्यपूजेत ठेवलेला होता. त्याची रोज पूजाअर्चा व नित्यनैमित्तिक उत्सवविधी साताऱ्याचे महाराज छत्रपती यांच्या राजघराण्यातूनच होत असे. इ. १९७७ मध्ये हा बाण श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे राजमातासाहेब यांनी सिंहगडावरून साताऱ्यास आणविला आणि आपल्या अदालत राजवाड्याच्या देवघरात तो ठेवून त्याची पूजाअर्चा चालू ठेवली. सध्या हा बाण साताऱ्यास अदालत राजवाड्यात देवघरातील पूजेतच आहे. शिवाजीमहाराजांच्या नित्य पूजेतील ही पवित्र ' स्मृती ' आज अतिशय आस्थापूर्वक सांभाळली जात आहे , म्हणून आवर्जून ही माहिती येथे नमूद करीत आहोत.हा शिवबाण महाराजांना कुणी दिला ?
कोठून मिळाला ? की , परंपरेनेच भोसले राजघराण्यात तो सांभाळीत आलेला आहे ? यातील काहीच नक्की सांगता येत नाही.
महाराजांनी प्रतापगडावर इ. १६६१ च्या श्रावण महिन्यांत अष्टभुजा महिषासुरमदिर्नी भवानीदेवीची स्थापना केली. त्यांची आणि सर्वच राजघराण्याची या देवीवर अपार भक्ती होती. महाराज स्वत:ला या भवानीदेवीचे ' भोपे ' म्हणजेच देवीचे सेवक समजत असत. आरतीचे वेळी महाराज भोपे म्हणून आरती करीत. अर्थात या उपचारात कवड्याच्या माळा , मळवट आणि हाती पेटलेला पोत आलाच. नवरात्रात आणि प्रत्येक महिन्याच्या पौणिर्मेस यथासांग पूजा आणि पालखीची प्रदक्षिणा होत असे. (परंपरेने हे सर्व आजही चालू आहे.)
या पूजाअर्चा आणि शिखरशिंगणापुरावरील शंभू महादेवाच्या व्यवस्थेत अतिशय आस्था आणि पावित्र्य सांभाळले जाई. पण त्यात उत्सवबाजीचे अवडंबर कधीच नसे. त्याला साधेपणा आणि मर्यादा होती. महाराजांच्या देवभक्तीला बुवाबाजी वा क्षेत्रबाजी चिकटली नाही. महाराज राज्यकतेर् तत्पर आणि सावध छत्रपती बनले. मठाधिपती झाले नाहीत. स्वराज्याच्या प्रचंच नेटका साधून त्यांनी परमार्थ केला. प्रतापगड , शिखर शिंगणापूर , तुळजापूर , पंढरपूर , जेजुरी , चिंचवड , मोरगांव , सप्तकोटीश्वर , श्रीशैलभ , पुणे कसबा गणपती आणि करवीर महालक्ष्मी आदि देवस्थानांविषयी त्यांची भक्ती आणि आस्था उत्तुंग होती. ती अबोल होती. त्यात जाहिरातबाजी नव्हती. हे सर्व देवतार्चन ते मितस्वरूपात करीत होते. पण त्यांचे सवोर्श्च दैवत होत , स्वराज्य आणि देवता होती सर्व प्रजा.
महाराज धामिर्क होते. श्रीभवानीचे ते भक्तही होते. पण मग त्यांचा आहार , व्यवहार आणि नैवेद्य काय होता ? नेमके म्हणावयाचे तर ते मांसाहारी होते का ? अपेयपान ते करीत होते का इत्यादी अनेक प्रश्ान् आपल्या डोळ्यापुढे येतात. पण त्या संबंधाचे अधिकृत पुरावे अजिबात मिळत नाही. हौस म्हणून किंवा खाण्यापिण्याची आवड म्हणून महाराजांनी मुद्दाम कधी हरणासश्यांची शिकार केल्याची एकही नोंद मिळत नाही. व्यसन तर राहोच , पण क्वचित निमित्तानेही त्यांनी मांसाहार केल्याचे उदाहरण अजूनतरी मिळालेली नाही. ते पंढरपूरचे माळकरी वैष्णव नव्हते , पण अघोरी शाक्तही नव्हते. अत्यंत साधे आणि सात्विक जीवन जगणारे पण वेळ आली की रौद तांडव करणारे अन् शत्रूचा वा अपराध्याचा शिरच्छेद करणारे भवानीपुत्र होते. शैव होते. वारकरीही होते. या भूमंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा दुसरा कोण होता ? तो सर्वच धर्मांचा आणि सांप्रदायांचा आदर करणारा पालक होता.
महाराजांच्या देवघरातले देव निजीर्व सोन्याचांदीचे नव्हते. तेे सजीव रक्तमांसाचे होते. महाराजांचे हृदय हाच त्या देवांचा देव्हारा होता.
- बाबासाहेब पुरंदरे
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा