शिवाजी महाराजांनी इ. स. १६७० च्या प्रारंभापासून औरंगजेबाविरुद्ध सुरू केलेली मोहीम विलक्षण वादळी होती. एक शिवनेरी सोडला , तर पूर्वी तहात मोगलांना दिलेले तेवीसही किल्ले महाराजांनी परत घेतले. इतकेच नव्हे तर नाशिक जिल्ह्याचा उत्तर भाग महाराजांनी बहुतांशी स्वराज्यात आणला. महाराजांची ही मोहीम अतिशय अभ्यासनीय आहे. यातच दुसऱ्यांदा सुरतेवरचा खंडणी छापा होता. एक गोष्ट येथेही लक्षात येते की , महाराज सह्यादीच्या आश्रयाने स्वराज्याचा विस्तार करीत होते. कारण सह्यादीतील किल्ले हे संरक्षणाचे उत्कृष्ट साधन होते. येवले , मालेगाव आणि खानदेशचा पूर्व भाग हा सपाटीचा होता.
हा भाग आणि त्यालाच जोडून असलेला मराठवाडा व वऱ्हाड हे सपाटीचे भाग जर जिंकून घ्यावयाचे ठरविले , तर आत्ता घेता येतील. पण त्याच्या संरक्षणाकरिता भुईकोट किल्ले , जास्तीतजास्त फौज , तोफखाना आणि युद्धसाहित्य आता आपल्यापाशी मोगलांच्या मानाने खूपच कमी आहे , हे ओळखून महाराज सह्यादीवरील बळकट किल्ल्यांचा आश्रय घेत होते. किल्ले हेच आपले सर्वात मोठे बळ आहे , हे त्यांनी ओळखले होते. म्हणजेच आपल्या भौगोलिक बळाचा आणि गनिमी काव्याच्या क्रांतीकारक तंत्राचा उपयोग महाराजांनी अगदी हृदयाशी घट्ट धरला होता.
थोडं अधिक सांगतो. पाहा पटतं का. पेशवाईच्या अखेरच्या काळात याच किल्ल्यांचा आणि याच भौगोलिक प्रदेशाचा उपयोग जर पेशवे , शिंदे , पवार , होळकर इत्यादी सरदारांनी आणि बापू गोखले , यशवंतराव होळकर , कुंजीर , विंचूरकर , दाभाडे , त्र्यंबकजी डेंगळे , जिवबा दादा बक्षी आणि अशा कितीतरी कमालीच्या शूर सरदारांनी इंग्रजांच्या विरुद्ध केला असता , ही शिवयुद्धपद्धती आणि शिवयुद्धनीती एकवटून वापरली असती तर इंग्रजांना मंुबई सांभाळणेही अशक्य झाले असते. त्यांना अगदी खऱ्या अर्थाने पळता भुई थोडी झाली असती. व्हिएतनाममध्ये आत्ता आत्ता अमेरिकेसारख्या अतिबलाढ्य अन् जय्यत सुसज्ज अशा पैसेवाल्या देशाचीही दाणादाण एका हो ची मिन्ह या सेनापतीने उडवली तशी आम्ही मराठ्यांनी इंग्रजांची उडविली असती. पण आम्ही त्याकाळी शिवचरित्राचा अभ्यास केलाच नाही.
भूगोलाचे महत्त्व ओळखलेच नाही , राष्ट्रीय ऐक्याचा आम्हाला कधी गंधही लागला नाही. आमचा शनिवारवाडा गंुंतून पडला ' कामिनी काव्या ' त आणि सारे सरदार आपसांत भांडत बसले क्षुल्लक दाव्यात. फावले महाधूर्त शकुनी इंग्रजांचे. हा हा म्हणता आम्ही गुलाम बनलो. ऐक्याचे बळ , राष्ट्रीय अस्मितांचा अभिमान , अनुशासन , योजनाबद्ध आणि शिस्तबद्ध संस्था , सहकारी कारखाने , शिक्षणसंस्था आणि निदान स्वत:चे खासगी संसार तरी आम्ही धड चालविले असते ना! पण आम्ही आजही सगळे आजारीच पडलो आहोत. कारखाने आजारी , विद्यालये , महाविद्यालये आजारी , समाज आजारी , नेते आजारी , सरकार आजारी , सगळेच आजारी. त्यामुळे आमचा टीव्ही , रेडिओ आणि वृत्तपत्रे रोज कण्हतच असतात.
यावर एकच औषध आहे. शिवचरित्र. तेवढे शिवचरित्र शिका आणि शिकवा. सारे रोग बरे होतील. सारं नैराश्य संपेल.
हं! तर काय सांगत होतो! इ. स. १६७० पासूनची महाराजांची मोगल आणि आदिलशाहीविरुद्ध सुरू झालेली चढाई विलक्षण अभ्यासनीय आहे. क्वचित झालेले पराभव महाराजांनी उलटवून लावून विजय मिळवले आहेत.
आता औरंगजेबाची प्रतिक्रियाही लक्षात घेतली पाहिजे. त्यानेही महाराजांच्याविरुद्ध केलेल्या योजना आणि चढाया नि:संशय अचूक होत्या. त्याचे सरदार तरबेज अनुभवी होते. दाऊदखान कुरेशी , जसवंतसिंह राठोड , महाबतखान , बहाद्दूरखान , मोहकमसिंग , दिलेरखान इत्यादी. युद्धसाहित्याला तोटा नव्हताच. औरंगजेबाने ही इ. स. १६७० पासून पुढे तीन वषेर् राबविलेली आपली चढाईची योजना अशी होती की , खानदेशापासून ते पुरंदर तालुक्यापर्यंत असलेला , शिवाजी महाराजांच्या कब्जात गेलेला , संपूर्ण मुलुख जिंकून घ्यावयाचा. परंतु , एकच गोष्ट प्रथमच सांगून टाकावयास हरकत नाही की , त्याच्या सरदारांत एकोपा नव्हता.
त्यामुळे समन्वय कधीच साधला गेला नाही. सर्वत्र पराक्रमाची शर्थ करूनही मोगलांचे हे सेनापती पराभूत झाले. औरंगजेबाला दिल्लीत बसून या दक्षिणेतील मोहिमांची सूत्रे नीट चालविता आली नाहीत. तो चालत्या मोहिमेतून कधी जसवंतसिंहाला दिल्लीत बोलावून घेतो आहे तर कधी दिलेरखानसारख्या मोठ्या सेनापतीची दुसरीकडेच बदली करतो आहे. त्यातच त्याचेही दक्षिणेतील सेनापती आपसांतील मतभेदांमुळे वेगवेगळेच डावपेच खेळताहेत.
यातीलच एक प्रकार पाहा. अहिवंतगड (नाशिक जिल्हा) घेण्याकरिता महाबतखान आणि दाऊदखान कुरेशी हे एकवटून मराठ्यांविरुद्ध नेटाने तीन महिने झुंजले. अखेर मोठ्या शथीर्ने दाऊदखान अहिवंतगडात घुसू शकला. त्याने मराठ्यांचा पराभव करून गड जिंकला. हा गड जिंकण्याचे श्रेय महाबतखानाला मिळवायचे होते. पण दाऊदखान प्रथम किल्ल्यात शिरल्यामुळे विजयाचे श्रेय त्यालाच मिळाले आणि महाबतखान नाराज झाला. तो चिडला आणि सुरतेच्या दक्षिणेस असलेल्या पारनेरा नावाच्या किल्ल्यावर जाऊन बसला. ( जून १६७१ ) संपूर्ण पावसाळा तो तिथेच राहिला. या पावसाळ्यात त्याच्या सैन्याचे रोगराईमुळे व योग्य खाणेपिणे न मिळाल्यामुळे अतिशय हाल झाले. जनावरे फार मेली. पण स्वत: महाबतखान किल्ल्यात चैन करीत होता. त्याच्याबरोबर निरनिराळ्या देशांतून आणलेल्या चारशे सुंदर बायकांचा जनानखाना होता. अहिवंतगडाच्या विजयाचे श्रेय न मिळाल्यामुळे निराश झालेला महाबतखान पारनेरा गडावर अशी चैन करीत होता. आता सांगा!
असे बेजबाबदार सरदार लाभले तर तो औरंगजेब तरी काय करणार ? औरंगजेबाचे पराभव आणि महाराजांचे विजय अभ्यासले तर आजही आपल्याला यातून खूपखूपच शिकायला आणि आमची प्रांतिक राज्ये अन् सहकारी संस्था नीट चालवायला खूप अक्कल मिळणार आहे.
-बाबासाहेब पुरंदरे
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा