बुधवार, १८ मार्च, २००९

शिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.

महाराजांचं लक्ष चौफेर होतं. पण सर्वात जास्त लक्ष
कोकण किनाऱ्यावर होतं. हाबशी , अरब आणि तमाम युरोपीय टोपीवाले कोणच्याक्षणी आपल्या या कोकण किनाऱ्यावर येतील , याचा नेम नव्हता. पोर्तुगीज आणि सिद्दी , इंग्रज आणि डच हे असेच आले नाहीत का ? सिद्दी , पोर्तुगीज आणि मुंबईकर इंग्रज हे असेच अचानक आमच्या भूमीवर राज्य थाटून बसले नाहीत का ? म्हणून महाराज अतिशय सावध होते आणि या राज्य थाटून बसलेल्या परकीय गनिमांना तळामुळासकट उखडून काढण्याचा ते सतत विचार आणि प्रयत्न करत होते.

आताही महाराजांच्या मनांत जंजिरेकर हाबश्यांच्या विरुद्ध कडवा कावा करण्याचा विचार आला. पण पूर्वतयारी उत्तम करून आणि जय्यत तयारीनिशी.

जंजिऱ्याच्याच समुदात उत्तर दिशेला सुमारे पाच कि.मीवर एक बेट आहे. बेटाचे नाव कांसा. या बेटावर आपण सागरी किल्ला बांधावा , असा विचार त्यांचे मनांत आला. तो उत्तम नौकातळ ठरेल अन् उत्तरेकडून जंजिऱ्याला गळफास लावता येईल असा त्यांचा बिनचूक आरमारी विचार होता.

महाराजांचे एक जबर वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे लष्करी गुप्तता. सगळा डाव डोक्यात पक्का तयार ठेवायचा अन् मग अगदी संबंधितांना तो समजावून सांगायला अन् मग त्याची मोहिम सुरू करायची , हा महाराजांचा स्वभावच बनला होता. त्यांच्या आयुष्यात या गुप्ततेला अतिशय महत्त्व होतं. त्यामुळेच त्यांचा गनिमी कावा अधिकाधिक यशस्वी झालेला दिसून येतो. एखाद्या मोहिमेत समजा माघार घ्यावी लागली किंवा चक्क पराभवच झाला , तर लगेच पुढे काय करायचे याचे राजकारण बुद्धिबळाच्या डावासारखे त्यांच्या मनांत आधीच मांडलेले असे. यात क्वचित प्रसंगीच फसगत होतही असे. पण ती क्वचितच.

आताही महाराजांच्या मनांत कांसा बेटावर किल्ला बांधण्यासाठी जरा दीर्घकाळ खाणारी योजना आली. समोरच जंजिऱ्याच्या सिद्दीसारखा वाघ आ करून बसलाय. वायव्य दिशेला मुंबईकर इंग्रज बसलेत. आगरकोटला पोर्तुगीजांचे एक लष्करी पॉकेट आहेच. अशा परिस्थितीत दगडाधोंड्याचा एक लष्करी किल्ला बेटावर बांधायचा आहे. भोवतालचे शत्रू गप्प बसणार नाहीत. विरोध होईल. हा सारा विचार करून महाराजांनी कांसा बेटाची योजना स्वराज्यातील कोकणी किनाऱ्यावर पूर्वयोजनेने केली. म्हणजेच गवंडी , लोहार , सुतार , बेलदार , मजूर आणि बांधकाम करवून घेणारे जाणते सिव्हील इंजिनीयर्स हे आधीपासून निश्चित केले. अन् हे बांधकाम सुरू झाल्यापासून संपेपर्यंत उत्तम चालावे याकरता इतर बंदरातून सतत जरुर त्या साहित्याचा आणि अन्नधान्याचा पुरवठा करणारी लहानमोठी गलबते सुसज्ज ठेवली. कामगारांना कोणत्याही बाबतीत तुटवडा किंवा हालअपेष्ट वा उपासमार होऊ नये याची जय्यत पूर्वतयारी महाराजांनी अगदी गुप्तरितीने आधी तयार ठेवली.

अन् एके दिवशी ही सर्वच यंत्रणा रात्रीचे वेळी आपापल्या जागेवरून ठरलेल्या योजनेनुसार कामाला लागली. कांसा बेटावर कामगार अचानक उतरले. आरमारी मचव्यांचा संरक्षणासाठी बेटाभोवती सुसज्ज गराडा पडला. औषधे , जळाऊ सरपण , निवाऱ्याकरता तंबूराहुट्या , शंभर प्रकारची कामेधामे करण्याकरिता लागणारे कामाठी मजूर , रात्री मशाली अन् तेलदिव्यांची व्यवस्था , स्वच्छ पाणी इत्यादी प्रत्येक गोष्टीची तरतूद आधी सुसज्ज ठेवली होती , ती कामाला लागली. अन् दुसऱ्याच दिवशी उजाडता उजाडता , जंजिऱ्याच्या किल्ल्यावरून हाबश्यांना दिसून आले , की कांसा बेटावर मराठे रातोरात अचानक उतरले आहेत. अन् अकस्मात त्यांनी किल्ला बांधायलाही प्रारंभ केला आहे. हाबशी थक्कच झाले.

इथे एक आठवण होते. दुसऱ्या महायुद्धात (इ. १९३९ ते १९४५ ) जर्मनीने काही देश उदाहरणार्थ नॉवेर् , इतके अचानक आणि अकस्मात काबीज केले , की त्या देशातल्या हवामानालाही उमगले नसावेत.

हीच अचानकता आणि आकस्मिकता महाराजांच्या लष्करी हालचालीत होती. नेहमीच होती.

कांसा बेटावरचे बांधकाम सुरू झाले. सिद्दीच्याही आरमारी दांडगाया सुरू झाल्या. पण बांधकाम निवेर्ध चालू राहिले. याचे मुख्य कारण सर्वचजण निष्ठेचे होते. आपापल्या कामांत तत्पर आणि तरबेज होते. त्यांना लागणारी प्रत्येक गोष्ट विनाविलंब पुरविणारी व्यवस्था चोख होती. भोवतीचे संरक्षक आगरी , कोळी , भंडारी आरमारी सैनिक सुसरीसारखे जागे होते.

याचवेळी एक विलक्षण घटना घडली. कांसा बेटावर पुरवठा करण्याकरिता महाराज गुप्तरितीने अत्यंत योजनापूर्वक ठिकठिकाणच्या बंदरांना हुकुम पाठवीत असत. मग तेथून तो माल सुखरूप बेटावर पोहोचण्याकरिता गलबते सिद्ध असत. ती गलबते योग्य वेळी निघत आणि योग्यरितीने बेटांवर पोहोचत. मधे आधे शत्रूने म्हणजे सिद्दींनी काही घातपात केला तरी इतर मार्गानी येणारी गलबते बेटावर पोहोचत. कामगारांची अडचण होत नसे.

एकदा महाराजांनी दौलतखान आणि दर्यासारंग या आपल्या आरमारी सरदारांना गुप्त हुकुम पाठवला की , ' केळशीचे बंदरात रसद (पुरवठा) तयार असेल. ती अमूक दिवशी , अमूक वेळेला तुम्ही तेथे पोहोचून ती ताब्यात घ्या. तुमच्या गलबतावर चढवा व कांसा बेटावर दक्षतापूर्वक पोहोचती करा. '

हे काम जोखमीचे युद्धकाळात तर फार फार दक्षतेने करण्याचे.

असाच हुकुम राजापूरजवळच्या प्रभावनवळांच्या सुभेदार जीवाजी विनायक यांस महाराजांनी गुप्तरितीने पाठवला. हे काम जोखमीचे. अन्नधान्य , सरपण व इतर साहित्य केळशीच्या बंदरात ठरल्या दिवशी वेळेलाच पोहोचविण्याची जबाबदारी जिवाजी विनायक यांच्यावर आली.

ठरल्यादिवशी , ठरल्यावेळीच हा माल नेण्यासाठी दौलतखान आणि दर्यासारंग मराठी गलबते घेऊन केळशीचे बंदर बिनचूक दाखल झाले. पण जिवाजी विनायक हे आलेलेच नव्हते. अर्थात रसदही तयार नव्हती. दौलतखान गोंधळला. ठरल्याप्रमाणे घडत नाही याचा अर्थच त्याला कळेना. एवढंच कळत होतं की यांत स्वराज्यकामाचा घात आहे. नुकसान आहे.

दौलतखानाने आणि दर्यासारंगने चार घडी वाट पाहिली , तरीही जिवाजी विनायकाचे मदतीचे काफिले येताना दिसेचनात. आता ?
-बाबासाहेब पुरंदरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: