उदात्त आणि उत्कट महत्वाकांक्षी गरुडझेपेपुढे आकाशही ठेंगणं ठरलेलं इतिहासानं पाहिलं। साडेतीनशे वर्षांपूवीर् या मराठी मातीवर नांगराला गाढवं जुंपून तो इथं फिरवला। आदिलशाही फौजा घोडे उधळीत चारही वेशींवरून पुण्यात घुसल्या. घरंदारं पेटली. किंकाळ्या उठल्या , सैरावैरा धावणाऱ्यांची प्रेतं पडली. शाही फौजांनी पुण्याचा कसबा बेचिराख केला. फुटक्या कवड्या आणि तुटक्या वहाणांची तोरणं लटकवून अन् एक भली मोठी लोखंडी पहार भर रस्त्यात ठोकून शाही फौजा विजापुरास परतल्या. उरलं कुत्र्यांचं रडणं अन् घारी , गिधाडांचं आभाळात भिरभिरणं. पुण्याचं स्मशान झालं. अशी सहा वर्षं लोटली. शहाजीराजे भोसल्यांच्या पुणे जहागिरीचा उकिरडा झाला आणि सहा वर्षांनंतर पुण्यात शहाजीराजांची राणी आणि मुलगा मावळी घोडेस्वारांच्या तुकडीनिशी प्रवेशले. (इ. स. १६ 3 ७ , बहुदा उन्हाळ्यात) पुणं भकासच होतं. दहा-पाच घरं जीव धरून जगत होती.
पुण्याची ही मसणावट झालेली पाहून आऊसाहेबांचं काळीज करपलं। पुण्याच्या मालकिणीला राहण्यापुरतीही स्वत:ची ओसरी उरली नव्हती. झांबरे पाटलांच्या वाड्यांच्या वळचणीला या राजगृहिणीला बिऱ्हाड थाटावं लागलं. पण त्या क्षणालाच जिजाऊसाहेबांच्या व्याकुळ काळजातून अबोल संकल्प उमलू लागले. या पुण्याचं आणि परगण्याचं रूपांतर आम्ही करू!
चार दिस , चार रात्री उलटल्या आणि आऊसाहेबांनी सण साजरा करावा तशी पहिली ओंजळ वाहिली , ती पुण्यातल्या मोडून-तोडून गेलेल्या कसबा गणपतीच्या देवळात। पहिला जीणोर्द्धार सुरू झाला , तो या गणेशाच्या मंदिरापासून. पुण्यातली भाजून पोळून निघालेली आठ घरं अन् बारा दारं किलकिली झाली. त्यांची आशा पालवली. घरातली माणसं रस्त्यावर आली. कसबा गणपती दुर्वाफुलांनी प्रथमच इतका सजला- पुजलेला पाहून आयाबायांना नक्कीच असं वाटलं की , ही मायलेकरं म्हणजे गौरीगणपतीच पुण्यात आले.
जिजाऊसाहेबांनी आज्ञा करावी अन् सर्वांनी हौसेनं ती झेलावी , असा भोंडला पुण्यात सुरू झाला। पुणं पुन्हा सजू लागलं. आऊसाहेबांच्या खास नजरेखाली एकेक नवानवा सजवणुकीचा डाव मुठेच्या वाहत्या काठावर रंगू लागला. पुण्यातली लोखंडी शाही पहार केव्हाच उखडली गेली आणि एक दिवस हलगी-ताशांच्या कडकडाटात नांगराने बैल सजले. नांगर जुंपण्यात आला. नांगराला फाळ लावला होता , सोन्याचा. खरं खरं सोनं बावनकशी. आणि पुण्याच्या भुईवर सोन्याचा नांगर पाचपन्नास पावलं नांगरण्यासाठी फिरला. याच भुईवर सहा वर्षांपूवीर् विजापूरच्या वजीर खवासखानाच्या हुकुमानं गाढव जुंपलेला नांगर फिरला होता. तरुणांच्या महत्वाकांक्षा जणू ढोल-लेझिमीच्या तालावर सहा वर्षांच्या शिवबाच्या आणि आऊसाहेबांच्या सोन्याच्या नांगराभोवती फेर धरून उसळत नाचत होत्या. ती सुखावलेली मराठी जमीन जणू म्हणत होती , ' पोरांनो मनांत आणा , तुम्ही वाट्टेल ते करू शकाल. या मातीत मन मिसळलंत की , मोती पिकतील '.
अन् खरंच पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं। माणसं आपण होऊन कामाला लागली. बारा बलुतेदार अन् गावकामगार स्वत:चा संसार सजवावा तसं घाम गाळीत काम करू लागले. न्यायनिवाडे करायला स्वत: आऊसाहेब जातीनं सदरेवर बसू लागल्या. न्याय अगदी समतोल. तराजूच्या काट्यावर माशीही बसत नव्हती. आऊसाहेबांनी या काळात दिलेल्या न्यायनिवाड्याचे दस्तऐवज गवसलेत!
पुण्याच्या पर्वती गावालगतचा आंबिल ओढा फारच बंडखोर। पावसाळ्यात असा तुफान भरून वाहायचा की , अवतीभवतीची शेती अन् झोपड्या , खोपटं पार धुवून घेऊन जायचा। हे दुखणं पुण्याला कायमचंच होतं. आऊसाहेबांनी पर्वतीच्याजवळ (सध्याच्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याच्या पश्चिमेस) या ओढ्याला बांध घातला. चिरेबंदी , चांगला सहा हात रुंद , सत्तर हात लांब अन् पंचवीस हात उंच. आंबोली ओढ्याचा प्रवाह कात्रजच्या घाटातून थेट उत्तरेला पुणे शहराला खेटून नदीला मिळत असे. हा प्रवाह या बांधामुळे वळवून घेऊन पश्चिमेकडे ( सध्याच्या दांडेकर पुलाखालून) मुठा नदीत सोडण्यात आला.
पुण्याच्या अवतीभवती सगळे मावळी डोंगर। जंगल अफाट। गेल्या सहा वर्षांत वाघांचा , बिबट्यांचा अन् लांडग्या- कोल्हांचा धुमाकूळ बादशाही सरदारांच्यापेक्षाही थैमान घालीत होता. ही रानटी जनावरं मारून काढून शेतकऱ्यांना निर्धास्त करायची फार गरज होती. आऊसाहेबांच्या लालमहालानं लोकांकरवी ही कामगिरी करवून घेतली. रानटी जनावरांचा धुमाकूळ थांबला.
पण प्रतिष्ठित गावगंडांचा धुमाकूळ थांबविणं जरा अवघडच होतं. आऊसाहेबांच्याच हुकुमानं कृष्णाजी नाईक , फुलजी नाईक , बाबाजी नाईक पाटील , इत्यादी दांडग्यांना जबर शिक्षा करून जरबेत आणलं , कुणाकुणाचे हातपायच तोडले. काय करावं ? प्रत्येकाला कुठे अन् किती शहाणं करीत बसावं ? तोही मूर्खपणाचं ठरतो. लालमहालातील मायलेकारांची स्वप्न आणि आकांक्षा गगनाला गवसण्या घालीत होत्या.!
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा