दारिद्य कोणाच्या वाट्याला आलं तर ते दु:खदायकच आहे. त्यानं प्रयत्नाला देव मानून उत्तम व्यवहारे धन जोडावे संसार गोड करावा. हौसेनं करावा. ज्याला हौस नाही त्यानं संसार आणि राज्यकारभार करूच नये.
अन् दारिद्याचा अभिमान धरणं हा तर गुन्हा आहे. शिवाजीराजांनी माणसांना कष्ट करण्याची चटक लावली. हौस निर्माण केली. म्हणूनच शिवकालीन पत्रात आणि शिवकालीन काही कवींच्या काव्यात सहज उल्लेख येऊन जातात की , ' हे राज्य श्रींच्या आशीर्वादाचं आहे ' ' राज्येश्रींचे राज्य म्हणजे देवताभूमी. ' एका विरकत बैराग्यानं तर म्हटलं की , ' अशुद्ध अन्न सेवो नये ' अशुद्ध अन्न म्हणजे ? अयोग्य , पापी , भ्रष्टाचारी मार्गाने मिळविलेली धनधान्य दौलत. तिचा उपभोग घेऊ नये. श्रमाने मिळवावे. श्रम म्हणजे देवपूजा. आम्हाला केवढी मोठी माणसं इतिहासात मिळाली पाहा! शिवाजीराजांसारखा विरक्त , उपभोगशून्य छत्रपती. चक्रवतीर्. जिजाऊसाहेबांच्यासारखी ' कादंबिनीव जगजीवनदान हेतू: ' असलेली आई , राजमाता. नव्हे स्वराज्यमाता आम्हाला या मराठी मातेनं दिली. या मायलेकरांच्या जीवनांत चंगळमंगळ अन् उधळपट्टी केल्याची एकही नोंद , उल्लेख गवसत नाही.
कादंबिनीव म्हणजे योगिनीप्रमाणे. धर्मपुरुष आम्हाला लाभले तेही सोन्यामोत्यांना ' मृत्तिकेसमान ' मानणारे श्रीतुकाराम महाराजांसारखे तोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी , जोवरी देखिला नाही दृष्टी तुकाराम. या शिवकाळातील सारेच संतसत्पुरुष असे होते. मठ करून ताठा करणारे नव्हते. जनतेच्या भाबड्या श्रद्धेचा उपयोग करून ' इस्टेटी ' निर्माण करणारे नव्हते. म्हणूनच रयत सुसंस्कारांच्या अभ्यंग स्नानात नहात होती. याचा अर्थ इथं शिवाजीराजांच्या पाच-दहा वर्षांच्या स्वराज्यकाळात अगदी स्वर्गलोक अवतरला असंही नव्हे. समाजाची गती ही सावकाशच असते. स्वराज्यपूर्व काळातील इथलं लोकजीवन किती केविलवाणं होतं. पण स्वराज्य वाढू लागल्यापासून तेच जीवन बदलत गेलं. माणसा खावया अन्न नाही अशी अवस्था असलेला मराठी मुलुख स्वराज्यात भरल्या कणगीला टेकून पोटभर भाकरतुकडा खाऊ लागला होता.
इ. स. १६६१ ची कोकण मोहिम संपवून महाराज राजगडास परतले. प्रतापगड ते पन्हाळगड या भयंकर कठीण युद्धकाळातून महाराज अगदी तावून सुलाखून बाहेर पडले होते. अजून शाहिस्तेखान पुण्यात होताच. स्वराज्याचे हेर पुण्यावरती घिरट्या घालीतच होते. त्याचे मोठे यश म्हणजे उंबरखिंडीत केलेला कारतलबखानचा दणदणीत पराभव. पण याच साऱ्या घाईगदीर्तून वेळ काढून महाराजांनी गडावर जखमनाम्याचा दरबार भरविला. जखमनामा म्हणजे ज्यांनी ज्यांनी युद्धात कामगिऱ्या केल्या त्या कर्तबगारांचे भर दरबारात भरघोस कौतुक. याच काळात अज्ञानदास उर्फ आगीनदास नावाचा एक नामवंत शाहीर मराठी मुलुखांत गाजतगर्जत होता. या कौतुकाच्या दरबारात महाराजांनी युक्तिबुद्धिवंतांचे छान कौतुक केले या शाहीराचेही. जेधे नाईकांना त्यांनी मानाचे तलवारीचे पहिले पान दिले. वकिलांना ओंजळी ओंजळीने होन आणि शेलापागोटी दिली. युद्धात जे खचीर् पडले त्यांच्या बायकापोरांना ' अडीचसेरी ' म्हणजे पेन्शन दिले. कोणालाही उणे पडू दिले नाही.
आज आपणही पाहतो ना! आपले राष्ट्रपती अशाच राष्ट्रवीरांना , लोकसेवकांना , कलावंतांना आणि संशोधकांना गौरवाची मानचिन्हे दिल्लीत सन्मानपूर्वक देतात. अशोकचक्र , परमवीरचक्र आणि आमच्यातील महामानवांना भारतरत्न अशासारखे शिरपेंच अर्पण करतात. महाराजांनीही आपल्या कतृत्त्ववंतांचं भरघोस कौतुक केलं नेहमीच.
अशाच काळात शाहिस्तेखानाच्या छावणीतून खानाचा भाचा नामदारखान हा कोकणातील पेण , पनवेलजवळच्या मिऱ्या डोंगर उर्फ मिरागड या किल्ल्यावर फौज घेऊन निघाला. राजगडावर खबरा आल्या. महाराजांना शिकारीची संधी आल्यासारखंच वाटलं असावं. ते महाडच्या बाजूने कोकणात उतरले. मिरागड उत्तरेस आहे आणि महाराजांनी मिऱ्या डोंगरावर हल्ला करणाऱ्या नामदारखानाला आणि त्याच्या शाही फौजेला अचानक हल्ला करून असं झोडपून काढलं की , जणू लोहार तापून लाल झालेल्या लोखंडावर दणादणा घाव घालतो तसं. नामदारखान आपल्या पूर्वपरंपरेप्रमाणे पळून गेला. सारी मोगली मोहिम साफ फसली. ही मोहिम इ. स. १६६२ च्या प्रारंभी झाली. नक्की तारीख सापडत नाही. या मोहिमेत स्वत: महाराज रणांगणावर झुंजत होते. महाराजांच्या या अविश्रांत परिश्रमांना काय म्हणावे ? महाराजांना विश्रांती सोसत नव्हती. त्यांच्या संपूर्ण जीवनात खास विश्रांतीकरता ते एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी दोनचार महिने जाऊन राहिल्याची नोंद सापडत नाही. स्वराज्यसाधनाची लगबग त्यांनी कैसी केली ?
-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा