गेल्या चार वर्षांत (इ. स. १६५९ ते ६२ ) असंख्य कर्तबगारांनी अपार कष्टानं , महाराजांच्या योजने आणि आसेप्रमाणे कर्तबगारीची शर्थ केली होती. त्यातील कित्येकजण रणांगणावर ठार झाले होते. जिवा महाला सकपाळ , रामाजी पांगेरे , शिवा काशीद , मायनाक भंडारी , बाजीप्रभू , कावजी मल्हार , बाजी पासलकर , वाघोजी तुपे , बाजी घोलप , अज्ञानदास शाहीर , कान्होजी जेधे आता किती जणांची नावं सांगू ? या स्वराज्यनिष्ठांच्या आणि कर्तबगारांच्या रांगाच्यारांगा महाराजांच्या पाठिशी उभ्या होत्या. त्यामुळेच स्वराज्य सुंदर आणि संपन्न बनत होतं. कुणाचं नाव विसरलं तरी स्वर्गातून माझ्यावर कुणी रागावणार नाही.
पण महाराज मात्र कुणालाही विसरत नव्हते. होते त्यांनाही अन् जे गेले त्यांनाही. शाहिस्तेखानाने उंबरखिंडीच्या लढाईनंतर पुढच्या लढाईची (म्हणजे पराभवाची) तयारी केली. त्याने कोकणातील ठाण्याजवळील कोहजगड नावाचा किल्ला घेण्यासाठी आपली फौज पाठविली. तीही मार खाऊन परतली. आपल्या लक्षात आलंय ना ? की , शाहिस्तेखान एका चाकणच्या मोहिमेशिवाय कुठल्याही मोहिमेवर स्वत: गेला नाही. अन् प्रत्येक मोहिमेमध्ये महाराज स्वत: भाग घेताहेत.
इ. स. १६६३ साल उजाडलं. शाहिस्तेखानानं स्वत: जातीने एक प्रचंड मोहिम योजिली. कोणती ? स्वत:च्या मुलीच्या लग्नाची! खरंच! आपल्या बहिणीच्या मुलाशी त्याने आपल्या मुलीचं लग्न ठरविलं. लग्न अर्थात पुण्यात , लष्करी छावणीत होणार होतं. लाल महालाचं मंगल कार्यालय झालं होतं. मुलाच्या आईचं नाव होतं. दहरआरा बेगम. ही अर्थात खानाची बहीणच. तिच्या नवऱ्याचं नाव जाफरखान. हा यावेळी प्रत्यक्ष औरंगजेबाचा मुख्य वजीर होता. तो या लग्नासाठी पुण्यास येणार होता. आला ही. प्रचंड लवाजमा. प्रचंड थाटमाट. वेगवेगळ्या लग्नीय समारंभांची रेलचेल. खाणंपिणं. सगळी छावणी लग्नात मग्न. शाहिस्तेखानाची केवढी ही टोलेजंग लग्नमोहिम!
अन् समोर दक्षिणेकडे अवघ्या पन्नास किलोमीटरवर एक ढाण्या वाघोबा जबडा पसरून झेप घेण्यासाठी पुढचे पंजे आपटीत होता ; त्याचं नाव शिवाजीराजा.
शाहिस्तेखानाचं हे काय चाललं होतं ? तो शिवाजीराजासारख्या महाभयंकर कर्दनकाळावर मोहिम काढून आला होता की , आपल्या पोरापोरींची छावणीत लग्न लावायला आला होता ? या खानाला विवेकशून्य , बेजबाबदार आणि चंगळबाज म्हणू नये तर काय म्हणावं ? त्याला शिवाजीराजा समजलाच नाही। त्याला गनिमी कावा उमजलाच नाही. त्याला इथला भूगोल कळलाच नाही. आता या मोगली चैनी पुढे बेचैन शिवाजीराजांचा आपण अभ्यास करावा. वास्तविक पुण्यात आल्यापासून एका चाकणशिवाय शाहिस्तेखानानं काय मिळविलं ? काहीही नाही. हा तीन वर्षाचा हिशोब. अन् आता मुलीचं अफाट खर्चानं लग्न. पुढं काय झालं ते मी सांगतोच. पण आपल्याला ते आधीच माहितीच आहे की! शाहिस्तेखानाची प्रचंड फटफजिती.
एक मात्र सांगितलं पाहिजे. खानानं स्वराज्याचं , त्याने कब्जात घेतलेल्या भागाचं फार नुकसान केलं. लूटमार , स्त्रियांची बेअब्रू , मंदिरांची नासधूस , खेड्यापाड्यांचा विध्वंस. मात्र आश्चर्य वाटतं की , पुण्यात तो जिथं राहत होता त्या लालमहाल वाड्याच्या अगदी जवळच असलेल्या कसबागणपती मंदिराला त्यानं उपदव दिला नाही. आळंदी , चिंचवड , देहू , थेऊर इत्यादी देवस्थानांनाही त्याने त्रास दिल्याची एकही नोंद सापडलेली नाही.
शाहिस्तेखानचे मूळ नाव अबू तालिब. तो इराणी होता. मिर्झा अमीर उल् उमरा हैबतजंग नबाब शाहिस्तेखान अबू तालिब हे त्याचं पदव्यासकट नाव. तो औरंगजेबाचा मामा होता. ' शाहिस्तेखान म्हणजे औरंगजेब बादशाहची दुसरी प्रतिमाच ' असं त्याचं वर्णन एका मराठी बखरीत आले आहे. पण औरंगजेबातला एकही सद्गुण या मामात दिसत नाही.
खानाकडचा लग्नसोहळा प्रचंड थाटामाटात दोनतीन आठवडे चालू होता। या संपूर्ण छावणीच्या अवस्थेची माहिती महाराजांना राजगडावर समजत होती. त्यांच्या मनात काहीतरी आपल्या बौद्धिक करामतीचा. उत्पटांग डाव ते खानावर टाकू पाहात होते. याचवेळी त्यांनी सोनो विश्वनाथ डबीर या आपल्या वयोवृद्ध वकीलांना पुण्यास खानाच्या भेटीसाठी पाठवावयाचे ठरविले. पाठविलेही. पण खानाने सोनो विश्वनाथांची भेट घ्यावयाचेच नाकारले. टाळले. या बिलंदर शिवाजीराजाच्या कलंदर वकिलांशी भेटायलाच नको. पूवीर् अफझलखान , सिद्दी जौहर , कारतलबखान यांची या मराठी वकिलांनी कशी दाणादाण उडविली हे त्याला नक्कीच माहिती होतं. तसे आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून असेल पण त्याने भेट नाकारली. म्हणजे परीक्षेला बसायलाच नको म्हणजे मग नापास होण्याची अजिबात भीती नसते.
सोनो विश्वनाथ राजगडास परत आले. काही घडलेच नाही त्यामुळेच या महाराजांच्या डावाचा उलगडा इतिहासाला होत नाही.
-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा