मध्यरात्रीच्या गाढ झोपेत असलेला लाल महाल आणि स्वाभाविकरित्या झोपेचीच पेंग येत असलेले पहारेकरी एकदम हल्ला झाल्यानंतर गोंधळून जावेत , त्यांनी केवळ आरडोओरडाच करावा आणि सैरभैर धावत पळत सुटावे हीच अपेक्षा या हल्ल्यामागे महाराजांची होती. केवळ ' केऑस ' काही मावळ्यांनी लाल महालाच्या मुख्य दरवाज्याच्या माथ्यावर असणाऱ्या नगारखान्यात घुसायचे ,
तेथे झोपलेल्या वाद्य वादकांना असेच एकदम उठवायचं आणि तेथील नगारे , कणेर् , तुताऱ्या , ताशे , मफेर् इत्यादी वाद्ये वाजवायला लावायचे हा आणखी एक गोंधळ उडवून देण्याचा प्रकार ठरविलेला होता. तो अगदी तसाच घडला. काही मावळे नगारखान्यात घुसले. त्यांनी त्या झोपलेल्या वादकांना कसे उठविले असेल याचा तर्क करता येतो. भूतपिशाच्चे जणू अचानक आपल्याला झोडपताहेत असेच त्या वादकांना वाटले असेल.
अर्धवट झोपेत ती घाबरलेली माणसं तेथील वाद्ये मराठ्यांच्या दमदाटीवरून जोरजोरात वाजवावयास लागली. काय घडतंय ते त्या वादकांना कळेचना. ते फक्त वाजवीत होते. कारण पाठिशी नागव्या तलवारीचे मावळे मारेकऱ्यासारखे उभे होते. लाल महालातील प्रचंड गोंधळात हा नगारखान्यातील प्रकार सर्वात विलक्षण कल्पक होता. अंधारात सारा महाल जागा होऊन ओरडत अन् किंकाळ्या फोडीत होता. त्यात स्त्रियांचा कल्लोळ भयंकरच होता.
सर्वांचाच या थक्क करणाऱ्या अचानक हल्ल्याने ( सरप्राईजअॅटॅक) किती गोंधळ उडाला असेल याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे घाबरून उठलेला शाहिस्तेखान स्वत: माडीवरून अंगणात सशस्त्र धावत आला. पण शस्त्र कोणचे होते ? धनुष्यबाण! अशावेळी कुणी धनुष्यबाण घेऊन धावेल काय ? तलवार , पट्टा किंवा निदान भाला तरी घेऊन माणूस समोरासमोर शत्रूवर हल्ला करावयास धावेल ना ? पण खान धनुष्यबाण घेऊन धावला. काय उपयोग ?
त्याचा मुलगा अबुल फतेखान हा जर त्याचवेळी अचानक आडवा आला नसता , तर महाराजांच्या हातून खान अंगणातच ठार झाला असता. पण पोरामुळे बाप वाचला. इथं या अबुल फतेखन पुत्राचं खरोखर कौतुकच वाटते. बापासाठी त्याने आपला प्राण खचीर् घातला.
खान मात्र आल्याजिन्याने धावत होता. महाराज आता त्याचा पाठलाग करीत होते. माडीवरती खानाच्या दालनाला लागून ( बहुदा) दक्षिणोत्तर असा एक मोठा दरुणी महाल होता. त्या मोठ्या दिवाणखाण्यात खानाच्या कुटुंबातील आणि अन्य काही स्त्रिया झोपलेल्या होत्या. त्या जाग्या होऊन मोठमोठ्याने ओरडत , किंकाळत होत्या. तिथे एकदोन जमिनीवरची शमादाने होती. त्याचा प्रकाश कितीसा असणार ? काय घडतंय याचा कोणालाच बोध होत नव्हता. फक्त घबराट उडाली होती.
खान पुढे आणि महाराज मागे असा प्रकार होता. गोंधळलेला खान केवळ जीव वाचविण्याकरताच पळत होता. पुसटत्या प्रकाशात महाराज खानाचा पाठलाग करीत होते. स्त्रियांच्या त्या दालनात खान शिरला. तेथे एक मोठा जाडसर पडदा (बाड) होता. खानाने घाईत तो हाताने उडवला. तो आत शिरला. महाराजांनी त्या बाडावर आपल्या धारदार तलवारीचा घाव घातला. पडदा फाटला गेला.
खान घाबरून धावत आल्याचे तेथील बायकांनी पाहिले. काहीतरी भयंकराहूनही भयंकर घडतंय या जाणिवेने त्या त्याहून भयंकर घाबरल्या. केवळ कल्लोळ! पडद्याला पडलेल्या भगदाडातून महाराजांची आकृती आत येताना स्त्रियांनी पाहिली. तिथं असलेली शमादाने कोणा शहाण्या स्त्रीने फुंकून विझविली. अधिकच अंधार झाला. महाराज आता अंदाजाने खानावर धावत होते. खान घाबरून एका खिडकीबाहेर घाईघाईत चढून खाली दबला. हा सुद्धा एकूण उपलब्ध असलेले पुरावे लक्षात घेऊन केलेला अंदाज आहे. महाराजांना वाटले खान येथेच आहे. म्हणून त्यांनी आपल्या तलवारीचा खाडकन घाव घातला. घाव लागल्याचे त्यांना जाणवले. त्यांना वाटले घाव वमीर् लागून खान मेला. अन् महाराज तेथून तडक आल्यावाटेने परत परतले.
संपूर्ण लाल महालाची वास्तु भयंकर कल्लोळाने दणाणत होती. त्यातच नगारखान्यातील वाद्यांचा कल्लोळ चालू होता.
महाराजांचा मुख्य उद्देश मात्र अंधारात अधांतरीच राहीला. खान बचावला. त्याची फक्त तीन बोटे , उजव्या हाताची तलवारीखाली तुटली.
आपले छाप्याचे काम फत्ते झाले असे समजून पूर्वयोजनेप्रमाणे महाराज आणि मावळे लाल महालातून निसटले. लाल महालाबाहेर या साऱ्या कल्लोळाने खडबडून उठलेले छावणीतील खूप मोगली सैनिक जमा झाले होते. त्यांना काहीच बोध होत नव्हता.
खूप मोठा तपशील उपलब्ध असलेले हे ' ऑपरेशन लाल महाल ' असे घडले. हा थोडक्यात अहवाल. मुख्य आहे तो निष्कर्ष. केवळ लष्करी सैनिकांनी आणि सेनाधिकाऱ्यांनीच या ऑपरेशनचा विचार करावा. चिंतन , मनन करावे , असे नाही. योजनाबद्ध काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येक विषयांतील प्रत्येक कार्यर्कत्याने या इतिहासाचा सूक्ष्मविचार करावा. वर्तमानकाळात याचा कल्पक योजना म्हणून उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही ? ' मॅनेजमेंट ' आणि प्रचंड प्रकल्प हाताळणाऱ्यांनी या लष्करी कथेचा अभ्यास करून पाहावा. त्यातून प्रेरणा , योजना आणि शेवटी यश काबीज करता येईल. पाहा पटते का ?
-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा