शाहिस्तेखान पुण्यात आला (दि। ९ मे १६६० ) खानाने महाराष्ट्राच्या सरहद्दीवरून , म्हणजेच बुऱ्हाणपुरापासून कूच केले आणि तो पुण्यास आला. शिरवळ , सुपे , बारामती , सासवड ही अगदी छोटी भुईकोट ठाणी त्याला तात्पुरती मिळाली.
पुण्यात येऊन पोहोचायला त्याला साडेचार महिने लागले। एखाद्या मोठ्या शहराप्रमाणे असलेली त्याची छावणी हलत होती. चालत होती. पण पळत नव्हती. छावणीचा खर्च डोंगराएवढा होता. त्यामानाने मिळकत नगण्य होती. तीही शाश्वत नव्हती.
आज मिळत होती अन् उद्या पुन्हा मराठे ती काबीज करत होते। या साडेचार महिन्यांच्या काळात फक्त पुणं तेवढं नाव घेण्यासारखं ( फक्त नावच घेण्यासारखं!) खानाला मिळालं. अन् ते त्याच्या हातात टिकलं. पण बाकी खर्च परातभर आणि प्राप्ती दोन बोटाच्या चिमटीभर असा हा शाही कारभार होता. काहीतरी औरंगजेबाला करून दाखविलं पाहिजे म्हणूनच की काय त्याने पुण्यापासून नऊ कोसांवर (3 ० कि.मी.) असलेला चाकणचा भुईकोट जिंकायचं ठरविलं.
चाकणचा भुईकोट फिरंगोजी नरसाळा या नावाच्या शिवकिल्लेदाराच्या ताब्यात होता। चाकण कोटाचे क्षेत्रफळ कसंबसं अडीच एकरांचं होतं. किल्ल्यात कसेबसे तीन-सव्वातीनशे मावळे होते. हे एवढं टीचभर आकाराचं ठाणं जिंकायचा खानानं बेत केला.
२१ हजार फौज आणि मोठा तोफखाना घेऊन खान पुण्याहून चाकणला पोहोचला। तो दिवस होता २१ जून १६६० . या चार भिंताडांच्या चाकण कोटावर मोगली हल्ले सुरू झाली. अहोरात्र. एक महिना उलटला. किल्ल्याचा टवकाही उडू शकला नाही.
इथे एक गोष्ट लक्षात येते की , चाकणला खानाचा वेढा पडला। कोणत्याही बाजूने चाकणला मदत करणे जिजाऊसाहेबांस (मुक्काम राजगड) आणि नेताजी पालकरांसही (मुक्काम घोड्यावर) अशक्य होते. सर्व बाजूंनी चाकणचा संपर्क तुटला होता. चाकण एकांगी पडला होता. २१ हजार मोगली फौजेच्या आणि तोफांच्या गराड्यात , अंगठ्याच्या नखाएवढा चाकण सर्व मारा सहन करीत झुंजत होता. अखेर खानानं आपल्या छावणीपासून भुईकोटाच्या ईशान्य बुरुजापर्यंत जमिनीतून बोगदा खणला आणि किल्ल्यास एकाचवेळी खूप मोठा सुरुंग लावला. हे भुईखालचे भयंकर संकट किल्ल्यातील किल्लेदारास समजणे अशक्यच होते.
पण दि। १४ ऑगस्ट १६६० च्या मध्यरात्री अंदाजे (दोन अडीच वाजता) हा जमिनीखालून ठासलेला सुरुंग खानाने पेटविला. प्रचंड स्फोट झाला. ईशान्यबुरुज उडाला. खिंडार पडले. खानाची फौज कोटात घुसली. चाकणकोट खानाने काबीज केला. वेढा घातल्यापासून ५४ दिवसांनी खानाला यश मिळाले.
त्याचेही कौतुक वाटतेच पण काम , काळ , वेग , खर्च आणि फौज यांच्या पंचराशीकांत हे शिवराज्य जिंकायला खानाला किती तपे लागणार होती! या त्याच्या तपश्ययेर्चा भंग करण्यासाठी अनेक मोहांच्या आणि बेमालूम चुकांच्या अप्सरा त्याच्याभोवती नाचत होत्याच.
तिकडे पन्हाळ्याच्या वेढ्यातूनही महाराज धोंधों पावसातून विशाळगडकडे पसार झाले. सिद्दी जौहरसारखा अतिदक्ष शिस्तीचा , कठोर निष्ठेचा , इमानी आणि कडव्या कौशल्याचा सेनापती फसला. हे त्याचे अपयश एवढे असह्य आणि अपमानकारक होते की , त्याने अखेर विष पिऊन आत्महत्या केली.
महाराज पन्हाळ्याहून विशाळगडकडे सटकले तेव्हा त्यांच्याबरोबर अवघे सहाशे मावळे होते। अर्धा लाख शत्रू फौजेच्या अजगरी विळख्यातून राजे गेले. त्यांचा पाठलाग सिद्दी मसूद (जौहरचा जावई) करीत होता. त्यानेही महाराजांना गाठायची शिकस्त केली. पण आपल्या छातीचा बांध करून उभ्या असलेल्या बाजीप्रभू देशपांड्यांनी आणि सहाशे मावळ्यांनी राजा वाचविला. बाजीप्रभूंच्या बरोबर त्यांचा भाऊ फुलाजीप्रभू हाही झुंजत होता. महाराज विशाळ्यावर पोहोचले. राजा वाचला. राज्य वाचलं. झेंडा वाचला. बाजीप्रभू , फुलाजीप्रभू आणि काहीशे मावळे ठार झाले. (दि. १ 3 जुलै १६६० ) शिवा काशीद या नावाचा सैनिक महाराजांना वाचविण्यासाठी महाराजांचं सोंग घेऊन पालखीत बसला होता. तो सिद्दीला सापडला. हसत हसत हा शिवान्हावी सिद्दीच्या हत्याराखाली मरून गेला. राजे वाचले. राज्य वाचले.
काय हो ही माणसं! वेडी! ठार ठार वेडी! हसत हसत मेली. सख्ख्ये भाऊ मेले. किती साधी माणसं , किती सामान्य माणसं. होय! हाच शिवकालाचा वेगळेपणा आहे. सामान्य माणसांनी असामान्य इतिहास घडविला. महान राष्ट्र घडविले. हा कोण ? न्हावी! हा कोण ? भंडारी! हा कोण ? कुंभार! हा कोण ? माळी! हा कोण ? धनगर! हा कोण ? रामोशी! हा कोण ? महार! हा कोण ?... हा कोण ?..... हा कोण.... हे सारे मराठे! जो स्वराज्याकरता जगतो अन् मरतो , तो मराठाच. जो स्वराज्याला विरोध करतो , तो मोगल. सांगा बाळांनो तुम्ही शिवाजीराजांचे मराठे आहात की , औरंगजेबाचे मोगल ?
-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा