-
बुधवार, २१ ऑक्टोबर, २००९
पत्रकारिता
कोणे एकेकाळी एखाद्या इमारतीच्या भिंतीवर ‘डोंगरे बालामृत पिऊन मुले गुटगुटीत होतात’ अशा काळ्या-पिवळ्या जाहिरातीच्या खाली ‘उंदीर आणि झुरळी मारण्याचे प्रभावी औषध’ असं अनाकलनीय निवेदन.. असंच जनसंपर्काचं ओबडधोबड आणि बटबटीत स्वरूप असायचं! आज मात्र दोन-अडीच वर्षाची मुलं आपल्या सदनिकेच्या दिवाणखान्यात सर्व व्यावसायिक जाहिराती तोंडपाठ म्हणताना पाहून साहजिकच मनात विचार येतो की, काळ किती झपाटय़ानं बदलला आणि प्रत्यही बदलत आहे. टपाल माध्यमातून आठ-पंधरा दिवसांनी मिळणारी बातमी दूरध्वनीमुळे आज तात्काळ कानी पडते. घटना घडून गेल्यानंतर समजणारा वृत्तपत्र वृत्तांत आता दूरदर्शनवर जिवंत पाहायला मिळतो. इंटरनेटच्या साक्षात्कारानं तर ‘मास कम्युनिकेशन’ म्हणजे जनसंपर्क आज अक्षरश: चुटकीच्या अंतरावर आपलं जीवन व्यापून राहिला आहे. तरीसुद्धा या क्षेत्रातील अभ्यासक्रम कित्येकांना अज्ञातच राहिले आहेत. शिवाय या अभ्यासक्रमांसाठी कोणत्या प्रकारची मानसिक क्षमता लागते याचा नीट अंदाज न घेता ‘स्कोप’, ‘डिमांड’ आणि ‘र्सटटी’ अशा शंकांचा त्रिकोण गळ्यात अडकवून आजचे अनेक इच्छुक ‘जर्नालिझम माझ्यासारख्याला जमेल का?’, ‘अॅडव्हर्टायझिंगमध्ये कॉम्पिटिशन खूपच आहे का हो?’ किंवा ‘जनसंपर्क माध्यम फार काळ जॉब सॅटिसॅफ्शन देतात का?’ अशांसारखे प्रश्न विचारतात. मास कम्युनिकेशन क्षेत्रातील पत्रकारिता, जाहिरातकला आणि जनसंपर्क यातील अभ्यासक्रम एकमेकांशी संलग्न आणि काहीसे पूरकही आहेत; म्हणूनच त्यांचा स्वीकार करण्यापूर्वी इच्छुकांनी एकदा स्वत:च आपल्या व्यक्तिमत्त्वाचं परीक्षण करणं आवश्यक आहे. हे अभ्यासक्रम घेतल्यानंतर ते यशस्वीपणे राबविण्यासाठी एक प्रकारचं स्वानंदी, स्वाध्यायी आणि बहुढंगी व्यक्तिमत्त्व विकसित करण्याची मानसिकता प्रत्येकानं आवर्जून सांभाळली पाहिजे. उत्कृष्ट पत्रकार होण्यासाठी लेखन व वक्तृत्वासह भाषेवर प्रभुत्व, लघुलेखन, टंकलेखन आणि आता संगणक माध्यमाची उत्तम माहिती, प्रदीर्घ आणि वैविध्यपूर्ण वाचन करून सामान्यज्ञान वाढविण्याबद्दल जिज्ञासा आणि छायाचित्रणशास्त्राची आवश्यक तेवढी माहिती या गोष्टींना अजिबात पर्याय नाही. थोडक्यात पत्रकार हा टीपकागदासारखा असावा. समोर येणारं कडू-गोड सारंच काही त्याला व्यवस्थित टिपून घेता यायला हवं. त्याच्यावर आवश्यक ते संस्कार करून त्यातून वाचकांच्या अंत:करणापर्यंत पोहोचण्याची किमया त्याला साधता यायला हवी. जाहिरातकलातज्ज्ञ होण्यासाठी प्रश्नप्य उत्पादनाचं प्रयोजन, व्यक्तिमत्त्व आणि परिणामकारकता यांचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास करण्याची तयारी हवी. तद्वतच आपल्या ग्राहकांशी बाजारपेठेबद्दल वास्तविक चर्चा करणं, बाजारपेठांचं सर्वेक्षण घडवून आणणं, ग्राहकांच्या उत्पादनाचं सादरीकरण अशा तऱ्हेने करणं की त्यातून स्वाभाविकपणे ग्राहक राजा खूश होऊन जावा, अशा प्रकारची विविध कार्ये निश्चित वेळात प्रभावीपणे पार पाडता यायला हवीत. अॅडव्हर्टायझिंग म्हणजे कॉपीरायटिंग असं समजण्याचे दिवस आता संपले आहेत. जनसंपर्कासाठी उपलब्ध माध्यमांची सखोल माहिती, त्यात कालमानानुसार त्वरेनं बदल घडवून आणण्याइतपत दूरदर्शित्व, जनताभिमुख स्वभाव, उमदी विचारसरणी आणि सातत्याने नावीन्याकडे कल्पक दृष्टीने पाहण्याची मानसिक तयारी एवढी शिदोरी हवीच!
प्रसारमाध्यमांची जननी म्हणून पत्रकारितेकडे मोठय़ा आदराने पाहिले जाते. पत्रकारितेमध्ये वृत्तसंकलन, लेखन, संपादन, छायाचित्रकारिता, वृत्तप्रसारण इ. बाबींचा समावेश होतो. पत्रकारितेमध्ये एखाद्या वृत्तसंस्थेत नोकरी अथवा मुक्त पत्रकार म्हणून काम करता येते. (स्थानिक, क्षेत्रीय, भाषिक, इंग्रजी, राष्ट्रीय वृत्तसंस्था) अथवा इतर नियतकालिके उदा. साप्ताहिक, पाक्षिक त्याचप्रमाणे दृक्श्राव्य (इलेक्ट्रॉनिक मीडिया) माध्यमातून काम करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. वृत्तपत्र व्यवसायाचे स्वरूप, महत्त्व, सर्वसाधारण ओळख, वृत्तपत्र पत्रकारांसाठीची आचारसंहिता, वृत्तसंस्था, आक्षेपार्ह जाहिरातीचा कायदा, पहिला वृत्तपत्र आयोग, वृत्तपत्र कार्यालयातील विभाग, बातमीदाराकडे कोणते गुण असावेत, बातमीचे प्रकार, डी.टी.पी., जाहिरात, मुद्रितशोधन इ. बाबींचा अभ्यासक्रमात समावेश होतो.
कामाचे स्वरूप/वातावरण : बातमीदारांना विशिष्ट विषयांवरील वृत्तसंकलन अथवा त्या त्या विषयातील बातमीचा वेध घेण्यासाठी कामाची जबाबदारी दिली जाते. त्याचप्रमाणे बातमीची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.
विशेष प्रतिनिधी : परदेश, राजकीय, सामाजिक घडामोडी, कोर्ट, क्रीडा अथवा त्या त्या विषयाशी संबंधित शहरातील बातम्या, त्यांचे विश्लेषण करणे इ. जबाबदारी विशेष प्रतिनिधींवर असते. बातमीदार आणि विशेष प्रतिनिधींना अतिशय व्यस्त कामाचे स्वरूप असते. त्यांना ठराविक वेळेतच आपले काम पूर्ण करावे लागते.
स्तंभलेखक : स्तंभलेखकांना नियमितपणाने एका विशिष्ट विषयावर विश्लेषणात्मक लेख लिहावा लागतो.
फिचर रायटर्स : विविध विषयांवर संशोधनात्मक, अभ्यासपूर्ण लेख तयार करणे यासाठी कालमर्यादा असते; परंतु त्यांना पुरेसा वेळ दिला जातो व शब्दमर्यादा निश्चित केली जाते. यात पुस्तक परीक्षणे, चित्रपट अथवा ध्वनिचित्रफीत रसग्रहण, टी.व्ही. आणि रेडिओ प्रश्नेग्रॅम, सीडीज्, ऑडिओ-व्हिडीओ कॅसेटस् परीक्षण, वेबसाइटस् इ. अनेक गोष्टींचा समावेश होतो.
उपसंपादक : बातमीदारांनी दिलेल्या बातमीची सत्यासत्यता पडताळणे, संपादन करणे, शक्य असल्यास बातमीचे पुनर्लेखन करणे, बातमीचा मथळा ठरविणे, एखादी बातमी अद्ययावत करणे, आवश्यकता वाटल्यास पानाचा लेआऊट बदलणे इ. स्वरूपाची कामे उपसंपादकांना करावी लागतात.
मुख्य संपादक : धोरणात्मक आणि वृत्तपत्रात/ प्रकाशनात प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराची जबाबदारी सांभाळावी लागते.
मुक्त पत्रकार : मुक्त पत्रकार म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती या कुठल्याही संस्थेला बांधील नसतात. त्यांना त्यांच्या कामासाठी स्वत:च बाजारपेठ शोधावी लागते.
आवश्यक कौशल्य, दृष्टिकोन : या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींकडे बहुश्रुतता विविध विषयांवरील गुणवत्तापूर्ण वाचन, स्वत:चे मत स्पष्ट शब्दात लिहिण्याची क्षमता, एखाद्या घटनेचे विश्लेषण करण्याची क्षमता, प्रसंगी संशोधनात्मक काम करण्याची मनाची तयारी, सामाजिक भान, वेळेचे बंधन पाळण्याची हातोटी, उत्कृष्ट आकलन क्षमता, मातृभाषेबरोबरच इंग्रजी, हिंदी तसेच शक्य तितक्या इतर भाषेचे ज्ञान असणे, काम करण्याच्या दृष्टीने सोयीचे जाते. वृत्तपत्र/ प्रकाशन व्यवसायाची आवड व त्याचे थोडेफार ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रवास व चौफेर, चौकस बुद्धिमत्ता आणि कष्ट करण्याची मनाची तयारी आवश्यक आहे.
प्रशिक्षण : देशातील बहुतेक विद्यापीठांमध्ये या विषयीचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. पदवी अथवा पदविका अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. Print Media,Electronic Media यांची कार्यपद्धती भिन्न असली तरी पत्रकारितेची तत्त्वे एकच असल्यामुळे उमेदवारांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण घेण्याची सधी उपलब्ध होऊ शकते. ग्रॅज्युएशननंतर मास कम्युनिकेशन या विषयात उमेदवार प्रवेश घेऊ शकतात.
आता आपण या क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रमांची थोडक्यात ओळख करून घेऊ :
१) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन : भारत सरकारच्या इन्फर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मंत्रालयाच्या अधिपत्याखालील ही एक स्वायत्त संस्था असून या संस्थेत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यम/ जाहिरात विभागात काम करणाऱ्या संपर्क व्यावसायिकांसाठी अल्पावधीचे प्रशिक्षणवर्ग आहेत. शिवाय वर्षातून दोन वेळा या अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाते. या संस्थेमध्ये ओरिएन्टेशन कोर्स फॉर ऑफिसर्स ऑफ दि इंडियन इन्फर्मेशन सव्र्हिस, ब्रॉडकास्ट जर्नालिझम कोर्स फॉर पर्सोनेल ऑफ आकाशवाणी आणि दूरदर्शन आणि डिप्लोमा कोर्स इन न्यूज एजन्सी जर्नालिझम फॉर नॉनअलाइज्ड कंट्रीज असे तीन अभ्यासक्रम राबविले जातात. शिवाय पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन जर्नालिझम हा अभ्यासक्रम सर्व पदवीधारकांसाठी खुला आहे. यांची माध्यमे इंग्रजी आणि हिंदी आहेत. त्याव्यतिरिक्त डिप्लोमा इन अॅडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन्स हा एक कोर्स आहे. या सर्वाचा कालावधी आठ महिने आहे. परीक्षा आणि मुलाखत दिल्ली मुक्कामी देऊन प्रवेश घ्यावा लागतो. मागणीनुसार परीक्षा केंद्र मुंबईमध्ये येते. फ्रीशिप्स आणि शिष्यवृत्त्या आहेत. संपर्क : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, अरुणा असफअली मार्ग, नवी दिल्ली- ११००६७.
२) मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटर, जमिया मिलिया इस्लामिया, जमियानगर, नवी दिल्ली- ११००२५ कोर्स : एम. ए. (मास कम्युनिकेशन) कालावधी : दोन वर्षे प्रवेशपात्रता : पदवीधर
३) डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, पुणे विद्यापीठ, रानडे इन्स्टिटय़ूट, फग्र्युसन कॉलेज रस्ता, पुणे- ४११००४ प्रवेशपात्रता : पदवीधर कालावधी : एक वर्ष जर्नालिझम (मराठी) कालावधी : सहा महिने प्रवेशपात्रता : बारावी पास (इंग्रजीसह)
४) गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करियर एज्युकेशन, विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ, मुंबई- ४०००९८. कालावधी : एक वर्षाचा अंशकालीन पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशपात्रता : पदवीधर
५) एस. एन. डी. टी. वुमेन्स युनिव्हर्सिटी, पाटकर मार्ग, चर्चगेट, मुंबई- २१. कोर्स : जर्नालिझम (मराठी)
६) एम. आय. टी. स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर स्टडीज, १२४, पौड रोड, कोथरूड, पुणे- ४११०३८ एक वर्षाचा अंशकालीन डिप्लोमा इन अॅडव्हर्टायझिंग अँड कम्युनिकेशन्स मॅनेजमेंट प्रवेशपात्रता : पदवीधर
७) मुंबई मराठी पत्रकार संघ : संघाच्या वतीने मराठी भाषेत पदविका (पदवीधरांसाठी) आणि प्रमाणपत्र (बारावी उत्तीर्णांसाठी)अभ्यासक्रम चालविण्यात येतात. यंदाचे अभ्यासवर्गाचे १०वे वर्ष असून १३ ऑगस्टपासून हे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. दर गुरुवारी आणि शुक्रवारी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत चालणाऱ्या या अभ्यासवर्गांना ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शन करतात. अधिक माहितीसाठी, पत्रकार भवन, मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान, महापालिका मार्ग येथे प्रत्यक्ष किंवा २२६२०४५१, २२७०४१८९ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन या विषयात अंशकालीन पदविका देणाऱ्या मुंबईतील काही संस्था :
८) भारतीय विद्याभवन चौपाटी, मुंबई- ४००००७.
९) बॉम्बे कॉलेज ऑफ जर्नालिझम,
के. सी. कॉलेज इमारत, चर्चगेट, मुबई- ४०००२०.
१०) बॉम्बे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, दिनशा वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई- ४०००२०.
११) देहली इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अँड सव्र्हिसेस २६३, दादाभाई नवरोजी मार्ग, फोर्ट, मुंबई- ४००००१.
१२) हरकिसन मेहता फाऊंडेशन इन्स्टिटय़ूट ऑफ जर्नालिझम,
नरसी-मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स, विलेपार्ले, मुंबई
१३) हॉर्निमन कॉलेज ऑफ जर्नालिझम, माटुंगा, मुंबई
१४) मराठी वृत्तपत्र लेखक संघ, शिंदेवाडी, पालन मार्ग, दादर, मुंबई- ४०००१४.
१५) सेंट झेविअर्स इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन, मुंबई- १.
१६) सोफिया कॉलेज (बी. के. सोमाणी पॉलिटेक्निक) भुलाभाई देसाई रोड, मुंबई- ४०००२६.
१७) सोमैया इन्स्टिटय़ूट ऑफ जर्नालिझम अँड मास कम्यु. विद्याविहार, मुंबई- ४०००७७.
१८) सिद्धार्थ कॉलेज ऑफ मास कम्युनिकेशन, आनंद भवन, दादाभाई नवरोजी मार्ग, मुंबई- ४००००१.
१९) पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अँड प्रश्नेफेशनल स्टडीज.
२०)मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (प.), मुंबई- ४०००८०.
याव्यतिरिक्त अनेक खाजगी संस्था व शिवाय भारतातील कित्येक विद्यापीठात पत्रव्यवहाराद्वारेसुद्धा काही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अनेक माध्यमं, असंख्य उत्पादनं आणि विशाल पसरलेला आपला भारत देश अशा परिस्थितीत स्पर्धात्मक युगाची साक्ष ठेवून ‘मास कम्युनिकेशन’ या क्षेत्रातले व्यवसाय एक प्रकारे चलनी नाणंच ठरणार आहे. सृजन आणि कल्पक विद्यार्थ्यांनी या व्यवसायातील आव्हानं अवश्य स्वीकारावीत.
पुष्कर मुंडले
९९६९४६३६१०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा