पाच सप्टेंबर... दरवर्षी साजरा होणारा शिक्षकदिन कालच झाला. त्यानिमित्तानं शिक्षकांच्याप्रती आपल्याला असलेला आदर काल प्रत्येक विद्यार्थ्यानं व्यक्त केला
.. पण बाकीच्या दिवसांचं काय? शिक्षकांना आज मान मिळतो आहे का? 'शिक्षण हे गुणांधिष्ठित झाले आहे, ज्ञानाधिष्ठित नाही' हा काही या शिक्षकांचा दोष नाही. तरीही मनापासून शिकविणारे शिक्षक लक्षात राहतात... आयुष्यभर. आताच्या शिक्षणाबद्दल, शिक्षकदिनाबद्दल तुमचे काय मत आहे? क्लासला जादा महत्त्व आले नि शाळा-कॉलेजाचे महत्त्व कमी झाले ही वस्तुस्थिती आहे. मग आता शिक्षणाचे होणार तरी काय? याबाबत आपले मत कळविण्याचे आवाहन आम्ही केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातील निवडक पत्रं...
...............
दुष्टचक्राचे बळी!
पाच सप्टेंबरचा शिक्षक दिन कशासाठी तर त्या दिवशी तरी शिक्षकांशी काहीतरी संभाषण होईल ही आशा. साधारणत: शिक्षकांचे लक्ष आपल्या खाजगी शिकवणीकडे अथवा क्लासकडे असते. त्यामुळे शाळा, कॉलेजात शिकवणे नाममात्र आणि विद्याथीर्पण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मागे असल्याने त्यांना खाजगी क्लासशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे आता त्यांना शाळा, कॉलेजातील शिक्षकांची नावे माहीत नसतील; पण खाजगीत कोण काय शिकवतो याची इत्थंभूत माहिती असते. त्यामुळे शिक्षक शिकवत नाहीत म्हणून मुलांना शाळा-कॉलेजात शिकण्यात रस नाही आणि मुले खाजगी शिकवणीस जास्त महत्त्व देतात म्हणून शिक्षकांना उत्साह नाही, असे हे दुष्टचक्र आहे. सध्या शिक्षण हा एक व्यवसाय झाला आहे. शाळेच्या भरतीच्या वेळी देणगी द्यावी लागते आणि कॉलेजचा गोंधळ तर विचारू नका. त्यात एकापेक्षा एक विद्वान मंत्री. त्यामुळे पुरके गेले पाटील आले आणि विद्यार्थ्यांचे हाल जास्ती झाले.
- डॉ. विजकुमार रेगे, माहीम.
आधी समन्वय साधा
पूवीर् औपचारिक शिक्षणाबरोबर लोकशिक्षणाला प्राधान्य देणारे शिक्षक होते. परंतु आता खाजगी क्लास काढून पैसे कमाविणारे शिक्षकच अधिक सापडतात. आवड आणि वेळेची निकड हे शिक्षणाचे सुवर्णमध्य. सामाजिक, राजकीय, आथिर्क क्षेत्राचा विकास साधण्यासाठी शिक्षणाची अत्यंत गरज आहे. त्याकरिता शिक्षकांनी अध्यापन कार्यात स्वत:ला वाहून घेणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांशी शाळेत आणि शाळेबाहेर संवाद साधला गेला पाहिजे. परंतु शासनाने शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा बोजा लादला आहे. ही शिक्षणाची अधोगती आहे. आजही खेड्यात शिक्षकांना हगणदारी मुक्ती उपक्रमाला जुंपले जाते. त्यामुळे प्रशासन ग्रामविकास मंत्रालयाच्या अनुषंगाने शिक्षणाच्या प्राथमिकतेवर गदा आणत आहे. त्यामुळे विद्याथीर् मूलभूत प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहत आहेत. म्हणूनच शिक्षक आणि विद्याथीर् यांच्यात समन्वय साधला तरच शिक्षकदिन खऱ्या अर्थाने साजरा होईल.
- शिवदास शिरोडकर, लालबाग-मुंबई.
हा तर एक 'व्यवसाय'
शिक्षकांवर देशाचे सुजाण व सुसंस्कृत नागरिक बनविण्याची जबाबदारी अजूनपर्यंत होती; पण हल्लीच्या काळात शिक्षणक्षेत्राला व्यवसायाचा दर्जा लाभला आहे. आपल्या शिक्षण महषीर्ंनीच राज्यात सरकारकडून सर्व सवलती घेऊन आपापली विद्यापीठं व कॉलेजं उघडून शिक्षणाचा बाजार मांडला आहे. यात शिक्षकही व्यवसायिक व व्यवहारिक बनलेले आहेत. आताचे शिक्षणक्षेत्र म्हणजे पैसे कमाविण्याचे साधन बनले आहे. गुणाधिष्ठित शिक्षणामुळे पालकही वाईट मार्गाने भरपूर पैसा ओतून पाल्याच्या शिक्षणाची सोय करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची विचारसरणी बदलत आहे. शाळा, कॉलेजमधील शिक्षणापेक्षा क्लासच्या शिकवणीवर पालकांचा जास्त विश्वास बसला आहे. या विश्वासामुळे शिक्षकांचा शिकवण्याकडे व विद्यार्थ्यांचा शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेल्याने शिक्षणाचा दर्जा घसरत आहे.
- विवेक तवटे, कळवा.
संकुचित व्याख्या बदला
आजची आपली शिक्षणपद्धती स्पर्धात्मक आणि तांत्रिक कौशल्यावर आधारलेली आहे. व्यक्ती-व्यक्तीमध्ये सुसंवाद कसा निर्माण करता येईल, ही आजच्या शिक्षणापुढील खरी समस्या आहे. सतत वेगवेगळ्या तणावाखाली सारेचजण वावरत आहेत. आणि अशावेळी 'माणसाला स्वत:च्या मनाचं कार्य कसं चाललं हे समजून देणाऱ्या शिक्षणांची आज गरज आहे' असे थोर तत्त्वज्ञ जे. कृष्णमूतीर्ंनी म्हटले आहे. ते पुढे म्हणतात, ''आपण फक्त मुलांना कशाकशाचा विचार करायचा ते शिकवतो; पण विचार कसा करायचा हे मात्र शिकवत नाही.'' कारण विचार ही एक जिवन जगण्याची प्रक्रिया आहे. आपला प्रत्येक विचारच आपलं आयुष्य घडवत असतो. विचार, भावना व वर्तन या विषयीचं शास्त्रशुद्ध शिक्षण देणे अधिक गरजेचे आहे. भावनिकदृष्ट्या असुरक्षित वाटणाऱ्या आजच्या काळात आपापल्या व्यक्तिमत्त्वाचं, क्षमतांचं, उणिवांचं, आवडीचं आणि प्रवृत्तीचं आकलन करून देणारे शिक्षण आजच्या पिढीला अभिप्रेत आहे. आजच्या शिक्षकाने याचे भान राखले पाहिजे. लिहिणे-वाचणे आले म्हणजे शिक्षण झाले, ही शिक्षणाची संकुचित व्याख्या आहे. तर ज्ञानाविषयीची जिज्ञासा, समाजाविषयीची बांधिलकी, आपल्या प्राप्त कर्तव्याविषयी निष्ठा या गुणांचे संस्कार हेच खरे शिक्षण.
- मनोहर मुंबरकर, कणकवली.
ही तर मानवंदनाच
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमधूनच सर्वतोपरी प्रयत्न केले गेले पाहिजेत. कारण सध्याचे पालक दोघंही नोकऱ्या करत असतात. त्यामुळे मुलांचा अभ्यास व सामान्य ज्ञान, तसेच कला, खेळ, वक्तृत्व याकडे शाळांनीच लक्ष द्यावे. परंतु शाळेतही मोजक्या मुलांकडेच काही वेळा लक्ष दिले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. त्यामुळे शिक्षण व विद्याथीर् यांच्यातले नाते दृढ होईल. दोघांनाही एकेमकांबद्दल प्रेम व आदर वाटेल. चांगले शिकवणारे तसेच चांगल्या स्वभावाचे शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांना व पालकांना आवडतात. शाळा, कॉलेजांमध्ये विद्याथीर् घडत असतात. येथे त्यांच्या सर्वांगीण विकास होतो. त्यामुळेच शाळा, कॉलेज व क्लासेस् यांच्यात नेहमीच फरक राहील. क्लासेस्मध्ये शिक्षणाकडे/अभ्यासाकडे जास्त लक्ष दिले जाते. तेव्हा शिक्षक हा गुरू व अर्धा पालकच असतो आणि म्हणूनच नेहमी वंदनीय असतो. आणि म्हणूनच 'शिक्षकदिन' साजरा झालाच पाहिजे; कारण 'शिक्षकदिन' म्हणजे 'गुरूस केलेली मानवंदना' व 'गुरूचा केला जाणारा आदर' शिक्षकदिन अतिशय उत्साहाने साजरा केला जावा.
- सरोज आरोंदेकर, दादर.
'असे पाय' आहेत कुठे?
पूवीर्ची शिक्षणपद्धती आणि आताच्या शिक्षणात काळानुसार जसा आमूलाग्र बदल होत गेला तसाच शिक्षकी पेशाही आथिर्कदृष्ट्या बदलत होता. सर्व जग आज लक्ष्मीच्या मागे धावत असताना शिक्षकांनीच फक्त सरस्वतीची उपासना करत बसावं का? कदाचित हा आजच्या शिक्षकांचा विचार असावा. काही शिक्षकांचा अपवाद वगळता बहुतेक शिक्षकांनी लक्ष्मीची आराधना सुरू केलेली आहे. आज शिक्षणक्षेत्रात लक्ष्मीपुत्रच भरपूर गुण कमावत असताना आजचा गरीब विद्याथीर् अंगी गुण असूनही शिक्षणातील गुणात कमी पडतोय. शिक्षकदिनी श्ाद्धेने नतमस्तक होऊन पाय धरावेत असे पाय आज शोधावे लागतील.
- कमलाकर पांडे, गिरगाव.
मुळ हेतूचाच विसर
शिकणे व शिकविणे या शिक्षणक्षेत्रातील दोन प्रक्रिया परस्परावलंबी आहेत. शिक्षक आणि विद्याथीर् दोघांचा सहभाग यात आवश्यक असतो. पण शिक्षणप्रक्रियेत शिक्षकाचे स्थान महत्त्वाचे असते. शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम घडून येतो. आपल्या विषयाचे सखोल ज्ञान, शिकविण्याचे कैशल्य, वर्गावरील पकड, पेशाशी बांधिलकी, शिक्षकांचा वक्तशीरपणा याची विद्याथीर् कळत-नकळत नोंद घेतात. प्रेमळ, समजूतदार शिक्षक विद्यार्थ्यांना भावनिक-मानसिक आधार देतात. असे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आदरास पात्र होतात. शिक्षक-विद्याथीर् नातं बहुआयामी आहे. काळानुरूप या नात्यात फरक पडला आहे. हल्लीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकाविषयी आदर नाही आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांविषयी प्रेम, जिव्हाळा, आपुलकी राहिलेली नाही. शिक्षक हा पगारी नोकर बनवलाय, अशी सर्वत्र ओरड आहे. हे सत्य कटू असले तरी बऱ्याचअंशी वास्तव आहे. त्याला आथिर्क, सामाजिक कारणे आहेत. त्याचप्रमाणे पालकांची पाल्यांची बदलती मानसिकता कारणीभूत आहे. शिक्षकांसाठी आपल्या पेशाविषयी आत्मभिमान नाही. विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानसंपन्न न करता चारित्र्यसंपन्न, उत्तम नागरिक म्हणून घडविणे हा शिक्षणाचा मुख्य हेतू आहे. बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. शिक्षण ही परिवर्तनाची प्रक्रिया आहे. गरजेनुसार शैक्षणिक आराखड्यात, अभ्यासक्रमात ठराविक काळानंतर बदल होत राहणे गरजेचे आहे. पण हे बदल घडवून आणताना सर्व घटकांचा साकल्याने, सवोर्तपरी विचारविनिमय करून निर्णय घेणे आवश्यक आहे. आपली शिक्षणपद्धती अधिक जीवनोपयोगी, व्यवसायभिमुख होण्याची गरज आहे. त्यातून स्वयंरोजगाराची निमिर्ती होईल आणि बेकारीला आळा बसेल. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येचे प्रमाण हेही शिक्षणक्षेत्राचे अपयश आहे. त्यामुळे जीवन कौशल्य आणि समस्यांचे समायोजनाचे धडे शालेय पातळीवर देण्याची नितांत गरज आहे.
- बेर्नादेत रुमाव, कांदिवली.
कालाय तस्मै नम:
आपण असे म्हणतो की, आताचे गुरू व्यवसायिक झाले आहेत. त्यांनी व्यवसायिक का होऊ नये? काळ बदलला की सगळे संदर्भ बदलतात आणि माणूस संदर्भहीन असूच शकत नाहीत. आपण नाही का आपल्या पाल्याला काळानुसार बदलायला उद्युक्त करतो? मात्र झपाट्याने बदललेल्या जमान्यात विद्यार्थ्यांची गुरू आणि आई-वडिलांवरील निष्ठा लोप पावत चालली आहे. त्याला कारण पालक आणि गुरूही आहेत. त्यामुळे 'शिक्षकदिन' हा आज केवळ देखावा वाटतो. आताच्या विद्यार्थ्यांना सगळे दिवस सारखेच वाटतात. आताचा अभ्यासक्रम 'पर्यायी पध्दतीने' स्वीकारला असल्यामुळे विद्यार्थ्यांना अंदाजे उत्तरे लिहिण्याची सवय लागलीय. त्यामुळे एखाद्या विषयाचे सखोल वाचन करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल नसतो. आयती उत्तरे मिळतात, मग एखाद्या प्रश्ानचे उत्तर तयार करण्याचा प्रश्ान्च येतो कुठे? हे तयार उत्तरांचे काम पुस्तके करतात त्याहीपेक्षा कितीतरी पटीने क्लासेस्वाले करतात. त्यामुळे क्लासेस्ना जास्त महत्त्व आले आहे. शिक्षणाचे तीनतेरा वाजायचा प्रश्ान्च उद्भवत नाही. फक्त ते देण्याच्या आणि स्वीकारण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. शिक्षकदिनाच्या अनुषंगाने त्याबाबत चिंता करण्याची गरज नाही, मात्र संस्काराबाबत चिंतन करण्याची जरूर वेळ आलेली आहे.
- संजय जाधव, सांताक्रुज
सरकारची भूमिका दिखाऊ
आज शालेय वा महाविद्यालयीन शिक्षणाबाबत सरकारची भूमिका दिखाऊ आहे. शिक्षणक्षेत्रातही राजकारण आल्याने ना शिक्षकांना, ना सरकारला शिक्षणाचं गांभीर्य आहे! आय.आय.टी.सारख्या संस्था सरकारी यंत्रणेतून चालवूनदेखील आपला दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीच्या तोडीचा कसा ठेवतात? हाच न्याय शिक्षणक्षेत्रातील इतर संस्थांनी का अंगीकारू नये? ज्ञानाच्या 'क्रिमी लेअर'मधील विद्यार्थ्यांकडून प्रगती साधणे आय.आय.टी.ला सोपे असले तरी त्यांच्या प्रगतीच्या योजना निश्चित आहेत. सरसकट भारी शिक्षणकर लावून सरकारने शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी निश्चित कार्यक्रम आखल्यास व राबविल्यास भारतातील गरिबातील गरीबदेखील मोठा शिक्षणकर उस्फुर्तपणे भरेल.
- चंदकांत वाकडे, पुणे
समाजाचा दोष
स्वतंत्र भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांची जयंती म्हणजे शिक्षकदिन. प्राचीन काळी गुरूपौणिर्मेस गुरूंबद्दल आदर व्यक्त करत. मात्र त्या काळातील 'अज्ञानाचा अंधकार दूर करतो तो गुरू' ही व्याखा वर्तमानकालीन शिक्षकांना लागू होत नाही. यामध्ये समाजाचा फार मोठा दोष असून शिक्षकीपेशा हा उत्पादन न करणारा असल्याने त्याच्याकडे सहसा हुशार विद्याथीर् वळत नाहीत. त्यातच चंगळवादी जीवनशैलीच्या आकर्षणामुळे इतर सर्व व्यावसायिकांप्रमाणे शिक्षकी पेशास धंदेवाईक स्वरूप आले आहे. याचाच परिणाम म्हणून पेपर फोडणे, कॉप्या पुरवणे, शाळेतील शिक्षकांनी खाजगी क्लासात शिकवणे यासारख्या बेकायदेशीर कृत्यात शिक्षक बिनदिक्कत सहभागी होतात. हे टाळण्यास उत्तम उपाय म्हणजे शिशुवर्ग ते चौथीपर्यंतच्या शिक्षकांचे मुख्याध्यापकांनी व पाचवीपासून पुढच्या शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी वाषिर्क मूल्यांकन करावे. अनुत्तीर्ण होणाऱ्या शिक्षकांना कामावरून कमी करावे. उरलेल्यांना मिळणाऱ्या गुणांवर पगारवाढ अवलंबून ठेवावी. ग्रामीण भागांतील शिक्षकांना शहरी शिक्षकांच्या तोलामोलाच्या सुविधा द्याव्यात.
- डॉ. कृष्णकांत नाबर, माहीम
चितळे मास्तर हरवले?
विद्याथीर्दशेतील मुलांना शिक्षक अती वैचारिक पातळीवर शिकवतात. या वयात त्यांच्याशी सलगीने वागून त्यांना शिकवले तर निश्चितच ते त्यांच्या मनात खोलवर रूजेल. एकेकाळी शिक्षक आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना नावानिशी ओळखत. व्यवसायिकतेच्या पलीकडे जाऊन पालक व शिक्षक यांचे संबंध सलोख्याचे होते. विद्यार्थ्यांची प्रगती व भवितव्य यासंबधी त्यांच्यात वेळोवेळी चर्चा होत. ही आत्मीयता दुरापास्तच झाली आहे. पु. ल. देशपांडे यांचे 'चितळे मास्तर' सांगतात 'पोराला आपल्या हातात दिल्यावर त्याला घासून-पासून स्वच्छ करून या जगात पाठवायचे हेच माझे काम.' बहुधा असे शिक्षक आता फक्त पुस्तकातच दिसतील; कारण सध्याचे शिक्षक हे नियमपालन समजून विद्यार्थ्यांशी वागतात. अगदी शिक्षकदिनही तसाच.
- प्रतिश गायकवाड, मालाड
...................
शिक्षकदिनीच गुणगान...!
शिक्षका, तुझे शिक्षकदिनीच गुणगान
तुझ्या वर्गा मी प्रगट जाहलो, करावया सन्मान।।
तव लेक्चरची होय सांगता, भकास पडला रिक्त वर्गहा
प्रसन्न तरी ते 'हेड' तुझ्यावर, राधे कृष्ण भगवान।।
डॅडी-मम्मीची आज्ञा म्हणूनी, ट्यूशन क्लास मी जॉईन करूनी
शाळेला मग कसा येऊ मी, नका मानू अपमान।।
बेगडी शिक्षण आणि धोरणे, तुझे काम ते पाट्या टाकणे
धन्य शिक्षका, तुला लाभला सरकारी वरदान।।
कोण करी कोणाची कदर, जपला नाही कुणीच आदर
गुरू-शिष्यांचे होईल कैसे, मग हे आदान-प्रदान।।
कृतार्थ झालो या शिक्षकदिनी, कृतार्थ मीही तुझ्या दर्शने
दे आज्ञा मज उद्यापासूनी, मम ट्यूशन ठरो जीवदान।।
- माधव नाडकर्णी, अंधेरी
................
शिक्षक आदरस्थानीच!
देशाच्या माजी राष्ट्रपतींच्या गौरवार्थ आपण दरवषीर् ५ सप्टेंबर हा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करतो. आपल्या संस्कृतीमध्ये-परंपरेमध्ये शिक्षक किंवा आपल्या गुरूला फार मानाचे स्थान दिले गेले आहे. माता-पिता-देव यांच्याइतकेच आपल्या शिक्षकांचे आपल्यावर झालेले उपकार हे न फेडता येण्याजोगेच असतात. काळाप्रमाणे शैक्षणिक व्यवस्था बदलली. शिक्षणाची परिभाषा बदलली. शिक्षक-विद्याथीर् यांच्यातील नातेसंबधाचे संदर्भ बदलले. शिक्षकाच्या मनोवृत्तीमध्ये व्यावसायिकता वाढू लागली. विद्याथीर्ही ज्ञानाथीर् होण्यापेक्षा परीक्षाथीर् होण्यातच धन्यता मानू लागले. शिक्षणक्षेत्र काहीसे अधिक व्यवहारी व अर्थकारणांशी निगडित असे होऊ लागले. शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्याथीर् व त्यांना शिकविणाऱ्या शालेयसंस्था यातील दरी वाढू लागली. त्यातून पुढे खाजगी शिक्षण वर्ग-क्लासेसचे पेर फुटले. आज शाळेपेक्षाही खाजगी क्लासेस्ना अधिक मागणी आहे. शाळा असो वा खाजगी क्लासे्स; तेथे शिकविणारे शिक्षक हे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्यापरीने उत्तमोत्तम ज्ञाान देण्याचाच प्रयत्न करतात व म्हणूनच वर्षातून एक दिवस आपल्या शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी 'शिक्षकदिन' पाळणे आवश्यक वाटते. शिक्षणक्षेत्रात कितीही बाजारूपणा वाढला तरी शिक्षकांचे महत्त्व कमी होऊ शकत नाही. सामाजिक परंपरेनुसार शिक्षक हा आदरस्थानीच असणे आवश्यक वाटते.
- शरद वर्तक, चेंबूर
..................
शैक्षणिक अनर्थ
मुलांच्या खांद्यावर वह्यांचे ओझे, वह्यांचे ओझे
बापाच्या मानेवर, कर्जाचे बोजे, कर्जाचे बोजे।।
क्लासमध्ये जाती पोरे भरून भरून
शाळेचेही वर्ग पडती भकास होऊन,
गुण शतकांचे झळके 'व्यवहारशून्य'
तरी कसे लागतात निकाल हे ताजे, मुलांच्या खांद्यावर, वह्यांचे ओझे।। १।।
ज्ञान इथले झाली आता जीवघेणी स्पर्धा
हजारोंनी खर्च करीती वाढवण्या 'अर्धा'
मूल्य सारे जाते वाया इथे मुळातून.
देणाऱ्याचे हात धरती, म्हणूनिया माझे, मुलांच्या खांद्यावर वह्यांचे ओझे।।२।।
मतलबी शिक्षणाचा, असा हा प्रभाव
'कुपमंडूकाचा' मेळा, मिसळण्या अभाव
जीवनाशी घेती पैजा, मनात कुजून
पुस्तकी कीडे झाले बेकारांचे तांडे, मुलांच्या खांद्यावर वह्यांचे ओझे।।३।।
मुलांच्या खांद्यावर वह्यांचे ओझे, बापाच्या मानेवर कर्जाचे बोजे!!
- शशिकांत नेने, ठाणे.
........................
उल्लेखनीय पत्रं -
आजच्या स्पर्धात्मक जगात ज्ञानार्जनापेक्षा अर्थार्जनाला महत्त्व दिले जात आहे. जो विद्याथीर् जन्मजात हुशार आहे किंवा मेहनत करणारा आहे तोच या स्पधेर्त तरेल अन्यथा बाकी सगळे भरडले जातील. डॉ. राधाकृष्णन यांच्यासारख्या विद्वानांचे नाव इतिहासजमा झाले आहे. शिक्षकदिन फक्त नावापुरताच उरला आहे.
- अनिल बिडये, अंधेरी.
जास्त फी भरून शाळा-कॉलेज अथवा क्लासेस्मध्ये प्रवेश मिळू शकतो, मात्र पैसे भरून शिक्षण विकत घेता येत नाही. हे सर्वांना कळले तरच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जाणारा हा दिवस खऱ्या अर्थाने 'शिक्षक'दिन होईल.
- रोहन म्हात्रे, गिरगाव.
गुरू हे शिष्यांचे आराध्य दैवत; श्ाद्धास्थान. शिष्याची गुरूवरील असीम श्ाद्धा व गुरूचे शिष्यावरील उत्कट प्रेम यातूनच ज्ञानाचे स्त्रोत अखण्ड वाहतात. ही श्ाद्धा पूवीर् होती; आजही आहे अगदी शिक्षण ज्ञानाधिष्ठित न राहाता गुणाधिष्ठित झालं, शिक्षणाला बाजारी स्वरूप आलं तरीही.
- कृ. म. गात (निवृत्त प्राचार्य), विलेपालेर्.
खरा शिक्षक तोच असतो, जो विद्यार्थ्यांचे प्रश्ान् सोडवतो. मग तो शाळेतला असो वा क्लासमधला असो वा घरातला. ज्याप्रमाणे पणतीच्या ज्योतीने खोलीतला अंधार नष्ट होतो, त्याप्रमाणे ज्ञानाच्या ज्योतीने अज्ञानाचा अंधार जातो.
- वैशाली मुझुमदार, विलेपालेर्.
स्वत:ला वेळ नाही आणि असलाच तर रस नाही, म्हणून नर्सरीपासूनच मुलांना खाजगी शिकवणीकडे वर्ग करणारे पालक शिक्षकांचे अवमूल्य करीत आहेत. विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र राबणारे प्रामाणिक शिक्षक अजूनही आहेत. गुन्हेगारी, भ्रष्टाचार, अस्थिरता यामुळे अंधत्व आलेल्या समाजाला असे शिक्षक हुडकून काढण्याची गरज आहे. सत्याच्या चाळणीतून गाळलेली नवीन पिढी तयार होईल तेव्हाच शिक्षकांप्रतीचा ऋणनिदेर्श करण्यासाठी ठरविलेला हा दिवस खराखुरा शिक्षकदिन म्हणून साजरा होईल.
- सूर्यकांत भोसले, मुलुंड.
आईवडील दोघेही नोकरीनिमित्त १०-१२ तास घराबाहेर असताना प्रेमासाठी भुकेलेला हा कोवळा जीव मायेचा ओलावा शोधण्यासाठी शिक्षकांकडे दृष्टी लावून आहे. क्लासचे महत्त्व वाढले तरी शाळांचे व पर्यायाने शिक्षकांचे महत्त्व कधीच कमी होणार नाही. वाढता अभ्यासक्रम, शिक्षणखात्याकडून वारंवार येणारे आदेश व सतत बदलणारे शैक्षणिक धोरण यांमध्ये आज शिक्षकांनी ठामपणे उभे राह्यचे आहे. क्लासबरोबर विद्यार्थ्यांना आवश्यक अवांतर ज्ञानही तुम्हाला द्यायचे आहे. जेणेकरून तुमच्या समोरील विद्यार्थ्यांना जाणीव होईल 'गुरूबिन कौन बतावे बाट.'
- विभा भोसले, मुलुंड.
जे सरकार शिक्षकांना शिक्षणेत्तर कामासाठी राबवते, त्यांना पगार वेळेवर देत नाही, आवश्यक सोयी पुरवत नाही, शिक्षणावर एकूण उत्पन्नाच्या दोन टक्केही रक्कम खर्च करीत नाही, त्या सरकारपुढे सर्व विद्यार्थ्यांनी हात टेकले (जोडले) पाहिजे.
- श्रीनिवास डोंगरे, दादर.
आत्ताचा 'शिक्षकदिन' केवळ एक फॅड वाटतं. जो तो आपल्या आवडत्या शिक्षकाचा म्हणजे जो ओरडत नाही, रागावत नाही, मारत नाही 'शिक्षण कम करमणूक' करतो अशांना शिक्षक मानतो आणि जे शिक्षक 'आपली गरज' असं न मानून संस्कार, विद्या देतात, थोडं कडक, कठोर बनून, उद्दिष्ट मानून शिकवतात, त्यांना नावं ठेवली जातात.
- नीलम शिंदे, अंधेरी.
शिक्षणातील शिक्षकांचा म्हणजे पर्यायाने विद्यार्थ्यांचा आनंद घटतो आहे. शिक्षकांची/विद्यार्थ्यांची घुसमट वाढली आहे. कृतीप्रधान मन घडवणारे संस्कारक्षम शिक्षण देणाऱ्या शिक्षकाला मान द्यायलाच कोणी तयार नाही तर प्रयोगशील शिक्षणाबद्दल कोण बोलणार? शिक्षणात सर्जनशीलता हरपलीय.
- प्रा. एस. के. कुलकर्णी, इस्लामपूर.
सध्याच्या काळात विद्याथीर् आणि शिक्षकांमधील विद्यार्जनाचे माध्यम पैसा झाला आहे. त्यामुळे गुरू-शिष्याची भावना लोप पावली आहे. त्याला पालकदेखील तितकेच जबाबदार आहेत.
- मधुकर नाकती, वडाळा.
सध्याचे शिक्षण कम्प्युटर ते इंटरनेट या माध्यमातून चालू आहे. परंतु यापुढील काळात ते कोणते स्वरूप घेईल हे एकंदर विकासावर व विज्ञानावर अवलंबून आहे. तरीही गुरू-शिक्षक याशिवाय ज्ञान मिळणार नाही. म्हणून आपल्या सामाजिक जिवनास आकार देणाऱ्या शिक्षकांवर प्रेम करावे व शिक्षकदिन जरूर साजरा करावा.
- सुदर्शन मोहिते, जोगेश्वरी.
शिकवण्यापेक्षा इतर कामे
नवे सरकार नवे तराणे
संस्काराचे इथे उणे
तयास शिक्षण म्हणावे का?
- अनुराधा मेहेंदळे, ठाणे.
ज्ञानाधिष्ठित शिक्षण असो अगर गुणाधिष्ठित शिक्षण. शिक्षकाने त्याचे काम शिक्षकासारखे करावे एवढीच समाजाची अपेक्षा आहे. सगळेच साने गुरुजी व्हावेत अशी अपेक्षा नाही. परंतु शिक्षकदिन साजरा करण्याइतपत शिक्षकांनी स्वत:च्या वर्तनाने समाजाला आदर्श घालून दिला पाहिजे.
- अनंतराव बोरावले, फलटण.
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा