बुधवार, २१ ऑक्टोबर, २००९

पत्रकारितेत येणार्‍यांसाठी...

गेल्या काही वर्षांमध्ये दृकश्राव्य माध्यमाने पत्रकारितेच्या क्षेत्रात क्रांतीच घडविली आहे. पत्रकारितेला ग्लॅमर मिळवून देण्याचे काम विविध वृत्तवाहिन्यांनी केले आहे. पूवीR राजकारण- समाजकारण असे प्राथमिक उद्दीष्ट होते. मध्यंतरीच्या काळात मालक- संपादक असा प्रकार अस्तित्वात आला आणि आता पत्रकारितेला व्यावसायिक रुप आले आहे. व्यावसायिक म्हणून त्याकडे पाहिले जाते. या नानाविध पैलूंचा परिचय देणारे पत्रकारिता- विद्या हे किरण गोखले यांनी संपादित केलेले पुस्तक मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. हे पुस्तक तीन प्रमुख भागांमध्ये विभागलेले आहे. वार्तासंकलन, संपादन व लेखन या विषयावर पहिला भाग आहे. यात विविध प्रकारच्या संपादनावर विविध संपादकांनी लिहिले आहे. दैनिकाच्या संपादनावर 'लोकसत्ता'चे संपादक कुमार केतकर, सायंदैनिकाबाबत निखिल वागळे, साप्ताहिकाबाबत ह. मो. मराठे तर रविवार पुरवणीच्या संपादनाबाबत शंकर सारडा यांचे माहितीपूर्ण लेख आहेत. पत्रकारितेतील विविध क्षेत्रांमध्ये राजकीय (दिनकर रायकर), क्रीडा (वि. वि. करमरकर), चित्रपट व नाटय (कमलाकर नाडकणीR), वृत्तसंस्था (प्र. के. नाईक) यांचे लेख आहेत. या पुस्तकाचा आणखी एक विशेष म्हणजे अर्थ- उद्योग (निरंजन राजाध्यक्ष), विज्ञान (बाळ फोंडके), युद्ध (दिवाकर देशपांडे), शोध पत्रकारिता (आरुण साधू) व ग्रामीण पत्रकारिता (बा. भा. पुजारी) या मराठीत काहीशा उपेक्षित राहिलेल्या विषयांवरही यात चांगल्या लेखांचा समावेश आहे. अखेरच्या भागात पत्रकारितेसाठी आवश्यक ज्ञान व कौशल्ये यांची माहिती असून यात अरुण साधू, अशोक जैन, मनोहर बोर्डेकर, गिरीश कुबेर, दत्तात्रय पाडेकर यांचे लेख आहेत. या पुस्तकास कुमार केतकर यांची सध्याचा पत्रकारितेचा आवाका नेमका स्पष्ट करणारी प्रस्तावना लाभली आहे. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.
संपादन - किरण गोखले
लोकसत्ता, रविवार, १३ जून २००४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: