- राज ठाकरे
लतादिदी असो की सचिन तेंडुलकर, ही माणसे कोणताही पुरस्कार मिळण्याआधीच मोठी झाली आहेत. त्यांचे कर्तृत्व हे त्यांना मिळणाऱ्या पुरस्कारापेक्षा मोठे आहे. सचिनला अजून 'भारतरत्न' मिळाला नसला तरी त्याने क्रीडाक्षेत्रात भारतला जो बहुमान दिला आहे त्याच्या जोरावर सर्वसामान्यांच्या मनात तो 'भारतरत्ना'सारखाच आहे. त्याची इतर कोणत्या खेळाडूशी तुलना करायची म्हटले तरी मला ती करता येणार नाही. सर्वच बाबतीत तो सर्वांच्या पुढे आहे.
सचिनमध्ये बरेच गुण आहेत, मात्र कोणत्याही गोष्टीच्या खोलात जाणे हा त्याचा गुण मला सर्वाधिक मोठा वाटतो. घड्याळ असो की कार, ऑडिओ सिस्टिम असो की एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू. तो त्या वस्तूच्या खोलात जातो. त्या वस्तूमध्ये नेमके कोणते पार्टस् आहेत, त्यांचे नेमके कार्य काय याची तो सखोल माहिती करून घेतो आणि समोरच्याला ती देतोही.
सचिनच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा मी त्याला सर्वप्रथम भेटलो. त्यानंतर आजतागायत आम्ही भेटतच आलो आहोत आणि आमच्यात चांगलेच मैत्रीसंबंध आहेत. मुंबईतील त्याच्या मॅचेस मी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. एरवी त्या मी टीव्हीवरच बघतो. अत्यंत सरळ, मनमिळावू, विनम्र असा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे सहसा त्याच्या नावाला वादविवाद कधी चिकटत नाहीत. त्याच्यावर कधी तोंड उघडण्याची वेळ येत नाही. तो जे बोलतो ते त्याच्या बॅटनेच. तो जेव्हा बॅटिंगला उतरतो आणि तुफान फटकेबाजी करतो तेव्हा माझा काय किंवा प्रत्येकाचाच मूड पालटतो.
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा