गुरुवार, १५ एप्रिल, २०१०

त्याचा जन्म क्रिकेटसाठी झाला...

- रमाकांत आचरेकर ,(सचिनचे गुरू व दोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक)

सचिनच्या आंतरराष्ट्रीय कारकीदीर्ला बघता बघता वीस वर्षे झाली, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही... अजूनही तो शाळकरी सचिन मला आठवतो! कुरळ्या केसाचा, कमी उंचीचा. लाजराबुजरा! त्याचा मोठा भाऊ अजित त्याला माझ्याकडे घेऊन आला, तेव्हा एक क्रिकेटप्रेमी पालक आपल्या पाल्याला घेऊन आलाय, असं मला वाटलं. पण, पठ्ठ्याने हातात बॅट घेतल्यानंतर मी चक्रावूनच गेलो... क्रिकेटची देवदत्त देणगी घेऊनच तो जन्माला आलाय, असे स्पष्टपणे दिसले. त्याचा स्टान्स, बॅट पकडण्याची शैली, फ्रंटफूट, बॅकफूटवरचा सफाईदार वापर आणि सर्वात विशेष म्हणजे गोलंदाजांवर हुकुमत गाजवण्याची ताकद.

मला दुसरा अर्जुन सापडला होता : सचिन रमेश तेंडुलकर! कारण माझ्याकडे त्यावेळी आणखी एक अर्जुन होता. विनोद गणपत कांबळी!! विनोदची बॅटिंग भन्नाट होती... त्यालाही देवाने दोन्ही हाताने भरभरून दिले होते. विनोद सचिनपेक्षा खूप मोठा होईल, असे मला त्यावेळी वाटत होते. या डावखुऱ्या फलंदाजाची नजाकत, त्याची आक्रमकता भारी. सचिनपेक्षा एक पाऊल तो पुढे असायचा. पण... नंतर सचिन खूप मोठा मोठा होत असताना विनोदला ती गती राखता आली नाही. एका एकाचा नशिब असतं.

सचिनला बाद करण्यासाठी मी स्टम्पवर नेहमी एक रूपयांचं नाणं ठेवायचो. त्याचा बोल्ड काढणाऱ्याला गोलंदाजाला ते नाणं बक्षीस! पण, सराव संपेपर्यंत बोल्ड काढण्याची करामत कुठल्याच गोलंदाजाला करता यायची नाही आणि नाणं सचिन घेऊन जायचा. अशी असंख्य नाणी त्याच्याकडे जमा झाली असतील... आणि मुख्य म्हणजे आजही त्याने ती जपून ठेवलीत. त्याची सरावाची भूक कधी संपायचीच नाही. एकदा बॅट घेतली की तो तासनतास सराव करत राहायचा. शेवटी आम्हीच कंटाळायचो. त्याच्यातील गुणवत्ता पाहून मी त्याला एका दिवशी दोन, चार सामन्यात खेळवायचो. स्कुटरवर पाठीमागे त्याला बसवला की स्वारी खुश! मग त्याला आधीच्या मैदानावरील कामगिरीपेक्षा सरस खेळ करण्याचा उत्साह यायचा...

वांद्याहून शिवाजी पार्कला सराव व पुन्हा शाळा अशी छोट्या सचिनची धावपळ पाहून अजितला त्याची शाळा बदलण्यास सांगितली. मी शारदाश्रममध्ये असल्याने तो या शाळेत आला असता तर शाळेलाही आणि मला त्याच्यावर आणखी लक्ष करण्यास पुरेसा वेळ मिळाला असता... त्यांच्या घरच्यांनी मला छान प्रतिसाद दिला. शिवाजी पार्कला काकांकडे राहायला आल्यानंतर तर तो क्रिकेटमय होऊन गेला... शाळेनंतर कीर्ती कॉलेजचाही मीच प्रशिक्षक असल्याने आमचं गुरू-शिष्याचं नातं आणखी गहिरं होत गेलं.

उण्यापुऱ्या पाच सहा वर्षात मला त्याचा लळा लागला. परदेश दौऱ्यावर जाताना तो माझा आशीर्वाद घ्यायला घरी येतो तेव्हा त्याचे जमिनीवर असलेले पाय पाहून मी थक्क होतो... एवढा मोठा माणूस होऊनही तो इतका नम्र कसा? असा प्रश्न मात्र मला पडत नाही. कारण ते तेंडुलकर घराण्याच्या संस्कारात आहे. म्हणूनच २० वर्षांनंतरही तो नवनवी शिखरे गाठत जातो तेव्हा मला फारसं आश्चर्य वाटत नाही. सचिन तू आणखी बरीच वर्षे खेळत राहा... माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: