गुरुवार, १५ एप्रिल, २०१०

सच्चा मित्र!

-अजित आगरकर, कसोटीपटू
आंतराष्ट्रीय कारकिदीर्ची वीस वर्षे... खरंच या पठ्ठ्याचे कौतुक करावं तितकं थोडंच. गेली अनेक वर्ष मी सचिनबरोबर खेळतोय, त्याचा खेळ जवळून पाहण्याची संधी मिळाली. अनेक यादगार खेळी तो खेळलाय. खरंतर मला आवडणारी त्याची एखादी खेळी सांगणं कठीणच! तरीही माझ्या डोळ्यासमोर येते ती शारजामधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची १४३ धावांची वादळी खेळी. खरं, सांगू त्यावेळी मी संघात असूनही त्याचा खेळ पाहिला नव्हता. पॅव्हेलियनमध्ये बसून सचिन असाच खेळत राहो, अशी प्रार्थना करत होतो. आमचा फायनलमधील प्रवेश त्या सामन्यातील नेट रनरेटवर ठरणार होता. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढले होते. सचिनच्या अफलातून खेळीने संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. नंतर हायलाईट्समध्ये तो सामना पाहताना सचिनची फलंदाजी मनसोक्त पाहिली. पाच षटकार, नऊ चौकारांसह त्याने १३१ चेंडूत १४३ धावा चोपून काढल्या होत्या. शारजातील त्या खेळीतील प्रत्येक फटका आजही डोळ्यासमोर येतो.

कटू प्रसंगांना तोंड देताना मित्र व संघसहकारी म्हणून सचिन सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. मुंबई संघात पदार्पण केलं तेव्हा संजय मांजरेकर व सचिननेच प्रोत्साहन दिले. त्यामुळे फारसं दडपण आलं नाही. भारतीय संघात माझी निवड झाल्याची बातमी ऐकल्यावर खूप आनंद झाला होता, पण दडपणही आले. खूप अस्वस्थ होतो, चांगली कामगिरी होईल का, हेच विचार सतत मनात येत होते. त्यावेळी सचिनने एक मार्गदर्शक व मित्र म्हणून खांद्यावर हात ठेवून समजावले, अन् मनातली भिती कुठे पळून गेली ते कळलंच नाही.

कठीण प्रसंगात मित्र म्हणून त्याचा जसा पाठिंबा लाभला, तसंच त्याच्या असण्याने ड्रेसिंगरुमचे वातावरण खुलते. समोरचा माणूस दुखावणार नाही, हे लक्षात ठेवून तो छान गंमती-जमती करतो. ज्या खेळाडूंसह त्याने मुंबईचे प्रतिनिधित्व केले, असे त्याच्या पिढीतील फारसे खेळाडू आताच्या संघात नाहीत. नवे चेहरे संघात सामील झालेत. त्यामुळे सचिन मुंबईच्या ड्रेसिंगरुमध्ये असतो, तेव्हा ही सारी नवी पोरं र्नव्हस होतात, पण मनमोकळा स्वभाव व खिलाडूवृत्तीने सचिन ज्युनियर-सीनियर हे अंतर कधी कमी करतो, तेच कळत नाही. हा माणूस म्हणजे जणू सद्गुणांची खाणच! प्रत्येक खेळाडूचा एक आवडता फटका असतो सचिन मात्र प्रत्येक फटका लीलया खेळतो. कार, वॉचेस, म्युझिक त्याला प्रचंड आवडतं, सध्या आयपॉड वैगरेअसल्याने सीडीज, कॅसेट्स घेऊन जाण्याची तारेवरची कसरत त्याला करावी लागत नाही.

गेल्या वीस वर्षांत सचिनच्या स्वभावात बदल झालेला नाही. माणुसकी तो जपतो. तो असाच अनेक वर्ष खेळत राहो, त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ असाच सुरू राहो... सचिनला माझ्या मनापासून शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: