गुरुवार, १५ एप्रिल, २०१०

गॉडस् गिफ्ट!

- शरद पवार

देव आपल्याला दिसत नाही... पण, त्याची अदृष्य शक्ती जाणवते! सामान्यांच्या दुनियेत जन्म घेऊन त्यांच्या


दु:खावर हळुवार फुंकर घालावी, अशी प्रार्थना आभाळातल्या देवाकडे करत असतानाच दैवी सूर उमटले...

ते होते गानकोकिळा लता मंगेशकर यांचे... त्यानंतर देवाच्या काठीचा आवाज ऐकायला आला... तो होता

मास्टर सुनील गावस्कर यांच्या खणखणीत स्ट्रेट ड्राईव्हचा! आणि मग साक्षात देवच दिसला... सचिनच्या रूपात!!

एका साध्या मध्यमवगीर्य कुटुंबात जन्मलेल्या या देवाची पाऊले कृष्णाच्या लिलेसारखी होती... नटखट आणि अवखळ! सचिन जसजसा मोठा होत गेला तसतसा त्याच्यातील अद्भुत शक्तीचा साक्षात्कार होऊ लागला. त्याच्या खेळावर जीव ओवाळून टाकणारे करोडो चाहते आज जगभर पसरलेत. या साऱ्यांचा श्वासच सचिन आहे... गेल्या वीस वर्षांपासून!

..................


विश्वातल्या मान्यवर खेळाडूंचे सारे विक्रम मोडून सचिन जगातला सवोर्त्कृष्ठ फलंदाज ठरला. क्रिकेटच्या दुनियेत त्याने नुकतेच गाठलेले यशाचे शिखर खरोखरच अलौकिक आहे. तमाम भारतीयांची मान गर्वाने उंच व्हावी अशा या लक्षणीय यशाला सलाम करताना सचिनचे अभिनंदन कसे करावे, त्यासाठी नेमके शब्द चटकन सुचत नाहीत. खरंतर मी स्वत: परमेश्वर मानत नाही, तरीही या क्षणी असे म्हणावेसे वाटते की तमाम भारतीयांसाठी सचिन 'गॉडस् गिफ्ट' ठरला आहे!

अर्थात त्याने हे यश मिळवले, ते कोणाच्या मेहेरबानीने नव्हे. लहानपणापासून अत्यंत कष्टाने मैदानावर जी मेहेनत त्याने केली, केवळ क्रिकेटवर सातत्याने लक्ष केंदीत केले, त्यामुळेच हा महान विक्रम तो करू शकला. मुंबई क्रिकेट क्लबचा अध्यक्ष या नात्याने सचिनची अनेक वैशिष्ट्ये जवळून पाहिली. त्यातले सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे पाय आजही जमिनीवर आहेत! अफाट लोकप्रियता, जागतिक प्रतिष्ठा आणि क्रिकेटचे अनेक सन्मान मिळवल्यानंतरही यशाचा अहंकार त्याला कधी शिवला नाही. वांदे-कुर्ला परिसरात क्रिकेटचे एक नवे स्टेडियम अलिकडेच तयार झाले. सचिन मुंबईत असला की सकाळी तो या स्टेडियमवर दिसणारच. खेळाप्रमाणेच त्याची वेळही इतकी अचूक की स्टेडियमवर सचिनला पाहून सकाळी ९ वाजता आपले घड्याळ चेक करून घ्यावे. दररोज तासभरच्या सरावानंतर मोठेपणाचे सारे मान बाजूला ठेवून सचिन सामान्य मुंबईकरांप्रमाणे लहान खेळाडूंमधे मिसळतो. त्यांना मार्गदर्शन करतो. क्रिकेटवर सचिनची मन:पूर्वक भक्ती असल्याचा हा बोलका पुरावा आहे. क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष असताना प्रकर्षाने जाणवलेल्या आणखी एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. भारताबाहेर परदेशात जे सामने खेळले जायचे त्यात सचिन, राहुल दविड आणि अनिल कुंबळे हे तीन असे खेळाडू मी पाहिले की जे मैदानातल्या खेळाविषयी गंभीर असायचेच, याखेरीज त्यांच्या वर्तनात कमालीची शालिनता आणि विनम्रता जाणवायची. कोणत्याही प्रसंगाला अत्यंत सभ्यपणे सामोरे जातांना, भारतीय सुसंस्कृतपणाचे दर्शन या तिघांनी जगाला घडवले. क्रिकेटच्या माध्यमातून भारताची प्रतिष्ठा वाढवणारे हे तिघेही माझ्या मते परदेशात देशाचे एका अर्थाने राजदूतच ठरले. विक्रमाचे जे शिखर सचिनने आज काबीज केले. त्यात खेळातले सातत्य, विनम्रता यांचा अर्थातच मोठा वाटा आहे. असे गुण जगात प्रत्येक खेळाडूत नसतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: