गुरुवार, १५ एप्रिल, २०१०

आजही नम्र, निरागस

- गौतम राजाध्यक्ष, फोटोग्राफर
सचिनचे फोटो पहिल्यांदा काढले ते षट्कार पाक्षिकासाठी. १९९३-९४ च्या सुमारास. सोबत संजय मांजरेकरही होता. तेव्हा कुरळ्या-कुरळ्या केसांचा अबोल, निरागस, गोड सचिन आणि धीट संजय या दोघांच्या व्यक्तिमत्त्वामधला फरक ठळकपणे जाणवला. सचिन आजही तस्साच आहे. दरम्यानच्या काळात एका सोसायटी मॅगझिनसाठी, नंतर अजित तेंडुलकरने लिहिलेल्या 'असा घडला सचिन' पुस्तकाच्या कव्हरसाठी आणि तीन वर्षांपूवीर् माझ्या लेखासाठी त्याचे फोटो काढले. त्या प्रत्येकवेळी त्याच्या चेहऱ्यावरचा कोवळा, निरागस भाव कायम होता. तो हसला की एक हजार वॉटचा बल्ब लावल्यासारखे वाटते. त्यामुळे एवढ्या वर्षांत उन्हात खेळून त्याच्या चेहऱ्यावर एखादी सुरकुती आलीही असेल, पण तो हसला की लहानगा सचिनच वाटतो. अजित त्याला फोटोसाठी घेऊन आला होता, तेव्हा त्याच्या सर्व सूचना सचिन निमूटपणे ऐकत होता. फोटोसाठी मी सांगेन तसे करण्याचा प्रयत्न करत होता. आजही तो तेवढाच आज्ञाधारक आहे. आजही कॅमेऱ्याला तो धीटपणे फेस करू शकत नाही, तो बावरतो. मी त्याला तसे सांगितल्यावर त्याने ते लगेच मान्य केले. जाहिराती, शुटींग ही माझी क्षेत्रे नाहीत, क्रिकेट हे माझे क्षेत्र आहे, असे त्याने नम्रपणे सांगितले. अर्जुनाला जसा केवळ माशाचा डोळा दिसत होता, तसे क्रिकेट हे त्याचे एकमेव लक्ष्य आहे. त्यामुळेच तो एवढी मोठी मजल मारू शकला.

एखाद्या समारंभात तो आला की आवर्जून भेटतो, नमस्कार करतो, नम्रपणे बोलतो. मला त्याने कशाला एवढे महत्त्व द्यायचे? त्याने ओळख दाखवली नाही तरी त्याची गुणवत्ता कमी होणार नाही. पण ग्रेट माणसांमध्ये इथेच फरक असतो. सचिनसारखी ग्रेट माणसे यशानंतर, अनुभवानंतर अधिक नम्र होत जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: