एक घटनाक्रम.
१८५७.
मंगल पांडे नावाचा ब्रिटिश पलटणीतला तरुण गायीचं कातडं लावलेली काडतुसं वापरायला नकार देतो. या बगावतीसाठी त्याला देहांत शासन मिळतं . हा वणवा हिंदुस्थानभर पसरतो . या मातीला देश म्हणून पहिली ओळख देण्याचं काम मंगल पांडेनं केलेलं असतं .
१९४२.
गांधीजींची देशाला हाक . हजारो तरुण शाळा कॉलेजातलं शिक्षण , सरकारी नोकऱ्यांवर लाथ मारून स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतात. सगळ्या देशात ब्रिटिशविरोधाची लाट उसळते . प्रदीर्घ लढ्यानंतर ब्रिटिशांना त्यांच्या देशात जाणं भाग पडतं.
१९६५.
स्वातंत्र्यादरम्यान जन्मलेली पिढी तारुण्याच्या उंबरठ्यावर. स्वातंत्र्याने नक्की काय दिलं या विचारांनी गोंधळलेली . त्याच दरम्यान व्हिएतनाम , फ्रान्समधल्या तरुणांच्या चळवळींकडून प्रेरणा घेत इथला मध्यमवगीर्य तरुण संघटित होतो . वेगवेगळ्या झेंड्याखाली तरुणांचं संघटन वाढतं .
१९७५.
आणीबाणी . त्याआधीच्या वर्षी जयप्रकाश नारायण यांनी दिलेल्या संपूर्ण क्रांतीच्या हाकेतून संघटित झालेल्या तरुणांमध्ये संतापाची लाट उमटते. हा तरुण विचारी , शिक्षित , बुद्धिवादी . मोर्चे , सभा , निदर्शनं यामुळे देश ढवळून निघतो . अनेकांना तुरुंगाची हवा खावी लागते . राज्यर्कत्यांना निवडणुका जाहीर करणं भाग पडतं.
१९८५.
खासगी व्यावसायिक शिक्षणसंस्थांचं पेव . फीमध्ये प्रचंड वाढ . खासगी आणि सरकारी कॉलेजेसमधली दरी वाढते . ' इश्यूं ' ची कमी नसतेच. सोबतीला विद्याथीर्प्रतिनिधींच्या निवडणुका . राजकीय पक्षांच्या पंखाखाली विद्यार्थी संघटनांची चलती वाढते. लाखोंची मेंबरशीप आणि विराट अधिवेशनं गाजू लागतात.
आणि ......
२००७ ची संध्याकाळ.
शेतक - यांच्या आत्महत्यांचा विषय घेऊन विरोधी पक्ष रिंगणात उतरलाय. गेली पाच वर्षं आत्महत्या होताहेत. देशातलं हे प्रमाण सर्वाधिक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. कुठलीही तरुणांची संघटना मात्र यावर काही बोलल्याची नोंद नाही. जिथं आत्महत्या होताहेत त्या विदर्भातल्या तरुणाईवरही काही तरंग नाहीत......
००००००
खैरलांजी प्रकरणाला नुकतंच वर्ष झालं. शाहू फुले , आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात आजही दलित बायकामुलांना शेकडो बघ्यांसमोर जिवंत जाळलं जातं . वर्षभर त्या प्रकरणाचा तपास होत राहतो . चौकश्या झडत राहतात . दलित नेते मूग गिळून गप्प बसतात . चार दोन संघटना सोडल्या तर वर्षभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्यांच्यात स्वयंप्रेरणेने उभी राहिलेली तरुणांची एकही संघटना नसते ...
विकासाच्या नावाखाली एसईझेड आलंय . शेतक - यांच्या जमीनी लाटल्या जाताहेत. त्याच्या बदल्यात हातावर ठेवली जाणारी रक्कम कधीच उडून जातेय . शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या चार उद्योगांचं उखळ पांढरं होतंय . बंगालमध्ये नंदीग्राम धुमसतंय . बलात्कारित बायकांच्या किंकाळ्या बाहेरही येत नाहीत . महाराष्ट्रातही एकएक करीत एसईझेड जाहीर होताना शेतकरी असहाय्यपणे बघत राहतो , जमेल तसं सुटं सुटं लढत राहतो . हजारो एकर जमिनींची कुर्बानी देणाऱ्या राज्यात एसईझेडविरोधात एका झेंड्याखाली एकत्र यावं हे कुणाला सुचत नाही . शेतकऱ्यांची तरुण मुलं शेती विकून मिळालेल्या पैशांवर गाड्या उडवतात . दारुकामात रंगतात . बारमधे पोरींवर नोटा उधळतात . त्यांच्याच जमिनींवर उभ्या राहणा - या उद्योगांमध्ये काहीतरी नोकरी नक्की मिळेल या दिवास्वप्नांत रंगून जातात ...
राज्याचा आर्थिक , सामाजिक कणा मोडणाऱ्या घटना घडत राहतात . माध्यमांमधून त्या त्या दिवसाची सनसनाटी बेकिंग न्यूज म्हणून हव्या तशा रंगवल्या जातात. पण हे सगळं पाहताना पेटून उठणारा , डोळ्यात बदलाची स्वप्नं आणि ओठांवर लढण्याची भाषा करणारा तरुण कुठे आहे ? या घटनांविषयी लढणं तर सोडाच पण साधं मत व्यक्त करावसंही वाटू नये ? त्यांचं जग वास्तवापासून एवढं का तुटावं ? नातेसंबंध , पैसा , सेलिब्रेशन्स यांच्या गुंत्यात सामाजिक आणि राजकीय जाणीवा एवढ्या बोथट का व्हाव्यात ?... प्रश्न पडत होतेच . एकामागे एक घडणाऱ्या घटनांनी ते अधोरेखित होत गेले . लेखाच्या निमित्ताने अनेकांशी बोलणं झालं . यात अर्थातच नव्या पिढीचे प्रतिनिधी होते . मागच्या पिढीत तरुणांचं प्रतिनिधित्व केलेले कार्यकतेर् होते , तरुणांच्या मनोव्यापारांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ डॉक्टर होते , विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी होते ... या चचेर्तून नव्या पिढीचं बदललेलं चित्र स्पष्ट झालं . कारणं कळत गेली . आधीच्या पिढीने उगवत्या पिढीबद्दल ' आमच्या वेळी नव्हतं असं . ही पिढीच बिघडलीये ....' असं म्हणत गळा काढण्याइतपतच हे मर्यादित नाही हेही जाणवलं . ...................
हे बदल वेगाने जाणवू लागले ते ग्लोबलायझेशननंतर. ग्लोबलायझेशनचं राजकीय टोक थेट डाव्या देशांच्या पडझडीपर्यंत जाऊन पोहोचतं . रशियाचं अस्तित्व होतं तोपर्यंत अमेरिकेला पर्याय म्हणून तिसऱ्या जगातील देशच नव्हे तर भारतही रशियाकडे पाहत होता . स्वातंत्र्यानंतर भारताची धोरणंही रशियाधाजिर्णी राहिली . मात्र सोविएत युनियनच्या पाडावानंतर सगळं जगच हादरून गेलं . अमेरिका ही एकमेव आणि निविर्वाद महासत्ता राहिली . यानंतरची लढाई आथिर्क वर्चस्वाची आहे हे ओळखत जगभर राजरोसपणे अमेरिकन कंपन्याची आक्रमणं सुरू झालं . सरकारी बंधनं खुली होत खासगीकरण हा परवलीचा शब्द झाला .
ग्लोबलायझेशनपूवीर्ची पिढीही विभक्त कुटुंबपद्धतीतच वाढली असली तरी त्यानंतरचे सांस्कृतिक बदल प्रचंड वेगाने होत गेले. सरकारी नोकरीसाठी जीव टाकणारी पिढी कालबाह्य झाली . त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने पैसे देणारी करिअर्स सहज दिसू लागली . आयटी हा परवलीचा शब्द झाला . भारताकडे जगभरातून एक उत्कृष्ट सविर्स हब म्हणून पाहिलं जाऊ लागलं . परदेशी नोकऱ्यांचं कौतुक राहिलं नाही . यापाठोपाठ आला प्रचंड पैसा . मध्यमवगीर्य कुटंुबात बापाला नोकरीतून रिटायर होताना मिळालेल्या ग्रॅच्युईटी आणि फंडाच्या अनेक पटींत मुलाचं वर्षाचं पॅकेज असणं हे चित्र घराघरात दिसू लागलं . फॅशन , लाइफस्टाइल , खाणं , रिलेशनशिप या सगळ्या गोष्टींच्या अनुकरणासाठी तरुणांचं एकच लक्ष्य ठरलं , अमेरिका !
आथिर्क सुबत्तेबरोबर सांस्कृतिक जीवनात झालेली उलथपालथ चक्रावून टाकणारी आहे . नोकरीत एका ठिकाणी चिकटला की आयुष्याची इतिकर्तव्यता झाली , असं राहिलेलं नाही . हातातल्या संधीपेक्षा चांगली संधी मिळाली की तत्क्षणी नोकरी बदलण्याची तयारी असते . आयुष्यभराची सुरक्षितता , पेन्शन असले विचारही या तरुणांच्या जवळपास फिरकत नाहीत . मात्र आहे तो क्षण पुरेपूर उपभोगण्याची वृत्ती मात्र वाढली . माझं कुटुंब , माझे जवळचे मित्र , फारतर माझा ग्रुप यापलिकडे सामाजिक क्षितीज विस्तारत नाही . पडणारे प्रश्ान्ही ' माझे ' असतात . लहानपणापासून हा परीघ एवढाच राहील याची काळजी पालकांनी घेतलेलीच असते . शाळा , कॉलेज , क्लासेस , छंद ( असलेले , लादलेले ) यांत गुरफटत लहानपण संपतं . कॉलेजलाईफही याहून वेगळं नसतं . परीघ तोच , फक्त अॅक्टिव्हिटीज बदलतात . गेली पंचवीस वर्षं डाव्या चळवळीचं काम करणाऱ्या उदय नारकर यांचं यासंबंधातलं निरीक्षण लक्षात घेण्यासारखं आहे . ते म्हणतात , ' आजची पिढी अमेरिकेचं सगळ्या बाबतीत अंधानुकरण करते . चंगळवाद जनमानसात रुजलाय . साधनं आणि सुखसोयींची उपलब्धता म्हणजे सुख आणि ते मिळवण्यासाठीच जगायचं असतं , हीच जगण्याची मूल्यं असतील तर अशा समाजाकडून सामाजिक जाणीवांची अपेक्षा कशी धरणार ? मागच्या पिढीत चळवळींचं नेतृत्त्व केलेला मध्यमवर्ग आज अस्तित्वातच नाही . आहे तो नवश्रीमंत वर्ग . गरीब , वंचित , अन्याय , दारिद्य या शब्दांना या लोकांच्या शब्दकोशात थाराच नसेल तर या जाणीवा तरुणांमध्ये कशा दिसाव्यात ?'
मनस्विनी लता रवींद्र , आजच्या पिढीची नाटककार. सेन्सिबल . चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्मलेली . तिच्या मताबद्दल उत्सुकता होती . ' आधीच्या पिढीसारखा वैचारिक गोंधळ आमच्या पिढीत नाही . जुनं घट्ट कवटाळून नव्या गोष्टींची फळं चाखण्याची हाव धरण्याचा आधीच्या पिढीचा दुटप्पीपणाही नाही . पैसा आणि रिकग्निशन हवी हेच आमच्यावर लहानपणापासून बिंबवलं गेलं . आमच्या आजूबाजूला आमची म्हणावीत अशी इतकी कमी माणसं आहेत की , नातेसंबंधांबाबत असुरक्षित वाटणं साहजिकच आहे .' मनस्विनीची मतं स्पष्ट असतात . तिच्या आणि तिच्या पिढीच्या लिखाणात हे उमटतं . तिचं ' सिगारेटस् ' स्त्रीपुरुष नातेसंबंधाबद्दल बोलतं . ' अलविदा ' मध्ये मुलगी आणि आईचं नातं दिसतं . मनस्विनी हे मान्य करते . पण आळेकर , तेंडुलकरांच्या नाटकांमध्येही हे नव्हतं का ?
नातेसंबंधांच्या पॉवरपॉलिटीक्समध्ये त्यावेळचे सामाजिक संदर्भ येतातच . ते लक्षात येण्यासाठी काही काळ जावा लागत असेल कदाचित , असं तिचं म्हणणं ! लिखाणातून व्यक्त होणारी तिची पिढी एकेकटी . स्वत : च्या कोषात गुरफटलेली . नाटकांचंही असंच . प्रस्थापित नाटकांपेक्षा वेगळं मत मांडणारी समांतर रंगभूमीची धुरा खांद्यावर घेतलेली माणसं गेल्या पिढीपर्यंत दिसली . त्यांचं अस्तित्व जाणवलं . आजही अनेक गुणी मुलं तिथं धडपडताना दिसतात . पण पूर्णवेळ या चळवळीसाठी वाहून घेण्यासाठी लागणारं आथिर्क पाठबळ उभं करायचं तर त्यांना नोकरी व्यवसाय करणं भाग आहे . आणि आजच्या व्यवस्थेत पूर्णवेळ नोकरी धंदा करून नाटकासाठी वेळ काढणं अवघड होतंय . रंगभूमीवर काही करून दाखवण्याची क्षमता असलेली ही तरूण पिढी या क्षितीजावरून दिसेनाशी होण्याची भीती निर्माण झालीये.
आयटीवाल्या हायफाय पिढीचे मनोव्यापार समजून घेणारे डॉ . राजेंद बवेर् मात्र थोडा वेगळा विचार करतात . त्यांच्या मते , सामाजिक दरी एवढी प्रचंड आहे की ही मुलं समाजाच्या खालच्या स्तराशी रिलेट होऊ शकत नाहीत , हा त्यांचा दोष नाही . आत्महत्या करणाऱ्या विदर्भातल्या शेतकऱ्यांशी माझा काय संबंध , असा प्रश्न विचारण्याइतके सगळेच तरूण समाजापासून तुटलेले नाहीत . या प्रश्नाचं विश्लेषण करता यावं , एवढं या मुलांचं वाचन आणि अभ्यास नक्कीच आहे . पण यासाठी काय करायला हवं हे ना त्यांना कळत , ना याबद्दल काही करावं असे प्लॅटफॉर्म त्यांच्यासमोर असतात . वैयक्तिक पातळीवर ही मुलं सामाजिक बांधिलकी मानतात , असं बर्वे यांचं निरीक्षण आहे . त्यासाठी ठराविक काळ सेवा देण्याची त्यांची तयारीही असते . पण पूर्णवेळ वाहून घेण्याची गरज त्यांना वाटत नाही.
तरूणांच्या राजकीय सजगतेबद्दल तर चिंता करण्यासारखीच परिस्थिती आहे . आधी विद्याथीर् चळवळींच्या माध्यमातून राजकीय शिक्षण आपोआप व्हायचं . आज विद्यार्थी संघटनांचं अस्तित्व नावापुरतंच राहिल्याचं दिसतं . याची कारणं शिक्षणाच्या खासगीकरणामध्ये आहेत . वसंतदादा पाटील यांनी १९८६मध्ये खासगी इंजिनिअरिंग कॉलेजेस सुरू केल्यानंतर खासगी कॉलेजेसचं पेवच फुटलं . उच्च शिक्षण ही सरकारची जबाबदारी नाही , ही भूमिका घेत हळूहळू सरकारने आपला हात आखडता घेतला . या संस्थांनी आपले कँपस् चकाचक केले . वाट्टेल ती किंमत मोजून साधनसुविधांचं पीक कँपस्मध्ये आणलं . आपल्या मुलानं आयटी नाहीतर मॅनेजमेण्टमध्ये जावं हे नवश्रीमंतांचं स्वप्न झालं . मध्यमवर्गही मग त्यांचं अनुकरण करीत सर्वस्व पणाला लावून , वेळ पडल्यास कर्ज काढून तिथं प्रवेश घेण्यात धन्यता मानू लागला . मग सीईटीचे दरवषीर्चे नवे घोळ , नवे नियम , कोर्टकचेऱ्या या मांडवाखालून गेलेला आणि पालकांच्या अपेक्षांचं , कुवतीबाहेर केलेल्या अवाजवी खर्चाचं ओझं मानगुटीवर लादलेला तरुण कशाला आणि का विरोध करेल ?
विद्याथीर् संघटनांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडावेत ही प्रथा तोंडी लावण्यापुरतीच अस्तित्वात आहे असं दिसतं . विद्याथीर् करिअरिस्ट झालेत , कॉलेजतली मेंबरशीप कमी झालीय ही गोष्ट सगळ्याच विद्याथीर् संघटनांच्या प्रतिनिधींनी मान्य केली . पण संघटना नावापुरत्याच राहिल्यात , हे मात्र त्यांना मान्य नाही . अखिल भारतीय विद्याथीर् सेना ही शिवसेनाप्रणित विद्यार्थी संघटना . संघटनेचे प्रमुख अभिजित पानसे यांच्याशी बोलणं झालं . ' जेजे कॉलेजमधल्या प्राध्यापकाला काळं फासण्याच्या प्रकाराची माध्यमामध्ये रंगवून चर्चा झाली . त्याला नंतर कोर्टाने निलंबित केलं , याला मात्र फारशी प्रसिद्धी मिळाली नाही . गेली ३० वर्षं चचेर्च्या गुऱ्हाळात अडकलेला दप्तरांच्या ओझ्याचा प्रश्ान् आम्ही मागीर् लावला . शिक्षणतज्ज्ञांशी बोलून पुस्तकंही तयार केली . इंजिनिअरिंग मेडिकल शिवायही इतर करिअर असू शकतात , याचं भान आणि माहिती देणारं मार्गदर्शक पुस्तक आम्ही काढलंय ', असं ते सांगतात . खासगी इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस चालवणाऱ्या शिक्षणसम्राटांनी एक रुपया भाड्यावर सरकारी जागा लाटून लूटमार चालवल्याचा त्यांचा आरोप असतो . विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी क्रिकेटचे सामने , युवा साहित्य संमेलनं असेही उपक्रम चालवले जाताहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ही संघटना तशी नवी . संघटनेचे प्रमुख अदित्य शिरोडकर यांच्याशी बोलताना अनेक प्रश्न अजूनही ' अभ्यासा ' च्या पातळीवर असल्याचं लक्षात आलं . व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी असवी का , हा त्यातलाच एक मुद्दा . जनमानसाचा कानोसा घेताना यावर विद्याथीर् आणि पालकांच्या संमीश्र प्रतिक्रिया असल्याचं दिसल्याने तो प्रश्ान् म्हणून हातात घेऊ शकलेलो नाही . शैक्षणिक , सांस्कृतिक आणि सामाजिक अशा तीन आघाड्यांवर आमचं काम चालतं . केवळ सांस्कृतिक कार्यक्रमच नव्हे तर करिअर मार्गदर्शनाचे कार्यक्रमही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घेणार आहोत . विदर्भ आणि मराठवाड्यात या कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद मिळाल्याचं ते म्हणाले .
सांस्कृतिक उपक्रम हे आजच्या विद्याथीर् संघटनांचं नवं आकर्षण आहे . यामुळे तरूणांचा प्रतिसाद मिळतोच , शिवाय माध्यमातून चर्चा होत राहते . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नुकतंच झालेलं ' आम्ही दादरकर ' हे त्याचं उत्तम उदाहरण . चमकत्या सेलिब्रिटीजना घेऊन स्टेजवर होणाऱ्या कार्यक्रमांना युवकांचा अर्थातच तुफान प्रतिसाद मिळतो . रा . स्व . संघाशी वैचारिक बांधिलकी मानणारी अखिल भारतीय विद्याथीर् परिषद ही एकेकाळची राज्यातली सर्वात मोठी विद्याथीर् संघटना . या संघटनेचे प्रा . नरेंद पाठक यांच्या मते विद्यार्थ्यांच्या प्रायॉरिटीज बदलल्यात हे सत्य आहेच . ज्यांचा प्रश्न हातात घेऊन आंदोलनं करावीत त्यांचाच प्रतिसाद थंडा , असा अनुभव मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आल्याचं ते सांगतात . १९९२मध्ये अभाविपने काढलेल्या ऐतिहासिक सव्वा लाखाच्या मोर्च्याच्या आता केवळ आठवणीच उरल्यात . रस्त्यावर उतरून प्रश्ान् सोडवण्याचे मार्ग विद्यार्थ्यांना कालबाह्य वाटू लागलेत , असं त्यांचं निरीक्षण . शहरी भागात असं चित्र असलं तरी ' नाशिक छात्र वणवा ' या आंदोलनाच्या माध्यमातून गेल्या वषीर् नाशिकला दोन हजार विद्याथीर् एकत्र आले होते . आता कोल्हापूर अधिवेशनाला अडीच हजारांची उपस्थिती अपेक्षीत आहे . १८५७च्या उठावाला यावषीर् दीडशे वर्षं पूर्ण होताहेत . म्हणून त्यांनी एक फॅशन शो आयोजित केलाय . ' क्रांती परिधान महोत्सव ' असं त्याचं नाव असेल . डीजेच्या तालावर राष्ट्रभक्तीपर गीतंही सादर होतील . विद्यार्थ्यांच्या ' भाषे ' त बोलण्याची धडपड अभाविपसारख्या परंपरा जपणाऱ्या संघटनांनाही करावी लागते , हे पुरेसं बोलकं आहे . स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया ही मार्क्सवादी विचारांची बांधिलकी मानणारी संघटना . एकेकाळी शिक्षणाच्या खासगीकरणाविरोधात आंदोलनं गाजवलेली . ' आज आम्ही मार्क्सचं नाव घेऊन विद्यार्थ्यांकडे जात नाही ', एसएफआयचा अलोक देशपांडे सांगतो . ' खरंतर त्याची गरजही नाही . वैचारिक नाळ कोणाशी आहे यापेक्षा आम्ही काय मुद्दे घेऊन लढतो हे महत्वाचं आहे . भगतसिंग मात्र विद्यार्थ्यांना जवळचा वाटतो . एखादी विचारप्रणाली पटणं ही वेगळी गोष्ट आहे . त्यामुळे वैचारिक प्रबोधन हा नंतरचा भाग ', डाव्यांची भाषाही आता अशी बदलतेय . ' हजार पाचशे रुपये फीवाढ हा शहरी मुलांना फारसा मोठा प्रश्ान् वाटत नसला तरी ग्रामीण विद्यार्थ्यांचा विचारही त्यांना शिवू नये हे दुदैर्वी आहे . खरंतर विद्यार्थ्यांमध्ये कधी नव्हे एवढा अवेअरनेस आहे . त्यांना प्रश्नांची माहिती आहे . पण त्याची परिणती कृतीमध्ये होताना दिसत नाही ', हे नमूद करायला तो विसरत नाही . डी . एड . आणि नसिर्ंगच्या विद्यार्थ्यांची आंदोलनं ही एसएफआयची अलीकडच्या काळातली मोठी आंदोलनं . युक्रांदचंही पुनरुज्जीवन झालंय . पूर्णवेळ काम करणारी तरुण मुलं त्यांना मिळतात हे चित्रही दिसतं . दारूबंदी आंदोलन ते हाती घेताहेत .
महाराष्ट्र डी कास्ट होण्याची हाक देत पुन्हा एकदा सत्याग्रहाची भाषा तरुणांना किती भावते हे काळच ठरवेल.
राष्ट्रीयपातळीवर विचार करता आरक्षणविरोधात झालेलं आंदोलन हे अलीकडचं सर्वात मोठं विद्याथीर् आंदोलन . ' आमच्या पूर्वजांनी ' त्यांच्या ' पूर्वजांवर अन्याय केले यात आमचा काय दोष ?' असं म्हणत आंदोलन करणाऱ्या तरूणांची समाजाच्या तळागाळातल्या समाजाविषयीची मतं स्पष्ट होतात . आथिर्क निकषांवरच आरक्षण असायला हवं , असाच सूर सर्वत्र येतो.
यासर्व प्रतिनिधींनी कॉलेजमध्ये पुन्हा निवडणुका सुरू करण्याचा धरलेला आग्रह मात्र या सर्वांच्या बोलण्यात होता . लोकप्रतिनिधी निवडण्याचं अठरा वर्षं हे वय कायदा मानत असेल तर कॉलेजच्या निवडणुकीत तरूणांनी का मतदान करू नये हा , सगळयांचा प्रश्ान् . निवडणुका नसल्यामुळे विद्याथीर् संघटनांची कॉलेज कँपसमधली सद्दी संपली , शिवाय राजकीय पक्षांसाठी कार्यकतेर् तयार करणारे कारखाने थंडावले , हाही मुद्दा आहेच.
राजकीय पक्षांकडूनही तरूणांची भरती व्हावी , यासाठी मधूनमधून मोहिमा आखल्या जात असल्या तरी सक्रीय राजकारणात येण्याची क्रेझ कमी झालीये . राजकारणात निवृत्तीचं वय नसल्यामुळे अनेक वयोवृद्ध नेते वर्षानुवर्षं खुर्च्या उबवताना दिसतात . नव्यांना संधी मिळण्याची शक्यताच नसल्याने वयाच्या पंचेचाळिशीपर्यंत अनेक जण तरूणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आघाड्या सांभाळताना दिसतात . या संसदेत अनेक तरुण चेहरे दिसतात , असा युक्तिवाद कोणी करेल . पण ज्योतिरादित्य शिंदे , सुप्रिया सुळे , संदीप दीक्षित , सचीन पायलट , दयानिधी मारन , मिलिंद देवरा ... ही नावं वाचली तरी त्यांची पार्श्वभूमी लक्षात येते . पैशांचं पाठबळ नसणाऱ्या सामान्य कुटंुबातल्या तरूणांना तिकिटं दिलीच जात नाहीत . निवडून येणं ही दूरची गोष्ट . ' पॉलिटिक्स इज अ डटीर् गेम ' हे तरूण पिढीवर एवढं बिंबलंय की करिअर म्हणून याचा विचार करणं ही त्यांना अशक्यकोटीतली गोष्ट वाटते .
सोविएत रशिया कोसळल्यावर जगभर मुक्त बाजारपेठेतला खुला व्यापार सुरू झाला . भारतातही सार्वजनिक क्षेत्रांत सरकारने माघार घेत खासगीकरणाला सुरूवात केली . चळवळीमधले कार्यकतेर् गोंधळले . चळवळी थंडावल्या . त्याच दरम्यान एनजीओजनी डोकं वर काढलं . चळवळीतल्या अनेकांनी एनजीओमध्ये आश्रय घेतला . आजचे तरुण एनजीओकडे एक करिअर म्हणून बघतात . एमएसडब्ल्यू करणं ही त्याची पहिली पायरी . गंमतीची गोष्ट म्हणजे विद्याथीर् प्रतिनिधींशी बोलताना चक्क कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांमध्येही हे एनजीओजचं पीक आलं असल्याचं कळलं . विद्यार्थ्यांनी कुठल्यातरी एनजीओमध्ये सहभागी होणं वेगळं , पण आता कॉलेजमध्ये जाणारे तरूणच चक्क स्वत : च्या एनजीओज सुरू करताहेत अशी माहिती रुपारेल कॉलेजचा जीएस सुजय हांडेने दिली . कॉलेजमध्ये विद्याथीर् संघटनांपेक्षा एनजीओमध्ये असणं जास्त क्रेडिटेबल असतं , असं तो म्हणाला . तिथं कामाला शिस्त असते , सिस्टिीम असते . कालबद्ध कार्यक्रम असतो . साहजिकच तरूणांना या गोष्टींचं आकर्षण वाटतं . मात्र इथूनही निराश होऊन बाहेर पडणारे आहेतच . हर्षदा परब ही अशाच एका एनजीओमधून बाहेर पडलेली तरूणी . ' विमानप्रवास , फाइव्हस्टार हॉटेल्स , दारू यासाठी संस्थेचा पैसा वापरणारे अनेकजण एनजीओजमध्ये दिसत असले तरी ते तिथल्या ' उच्चवगीर्यांसाठी ' च असतं . उमेदवारी करणाऱ्यांना मात्र तुटपुंजा पगार मिळतो . निर्णयप्रक्रियेत त्यांचा कुठेही सहभाग नसतो . इथंही वर्षानुवषेर् जागा अडवून बसलेली माणसं आहेतच ', असं तिचं निरीक्षण . ना धड समाजसेवेचं सुख ना धड पैसा अशा मनस्थितीत अनेकजण बाहेर पडून स्वत : चा नवा संसार थाटून फंडिंगसाठी जाळं टाकून बसतात . फंडिंग असेपर्यंत कामाला जोर . नंतर ही समाजसेवेची कळकळ संपून जाते . अर्थात यातही तळमळीने काम करणाऱ्या एनजीओज आहेत . प्रश्नांना भिडून उत्तरं शोधण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्नही आहे . मात्र एकूण चित्र कापोर्रेट !
मनस्विनी बोलताना म्हणाली , ' चळवळी आम्हा तरुणांच्या भाषेत बोलत नाहीत , हे खरं आहे . अजूनही सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला मार्क्स , लेनिन , गांधीजी , जयप्रकाश , गोळवलकर गुरुजी यांच्याकडेच जायचं का ? बदलत्या परिस्थितीचे संदर्भ घेऊन आजच्या काळात काय उपयोगी पडणार आहे याचा विचार नको ? आजचे प्रश्न शेती , आरोग्य , उर्जा , दळणवळणाची साधनं , पर्यावरण यांच्याशी जोडले आहेत . त्याविषयावर बोलायचं , काम करायचं तर सखोल अभ्यास हवा आणि यासाठी कुणाची फारशी तयारी नाही . त्यामुळे संख्येने कमी असले तरी या क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या अभय आणि राणी बंग यांच्यासारख्यांच्या कामाबद्दल त्यांना आदर असतो.
सामाजिकप्रश्नांविषयी कळवळा नसलेले तरूण पर्यावरणाबद्दल मात्र सजग आहेत . कदाचित ग्लोबल प्रश्ानंशी रिलेट होणं त्यांना सोपं जात असावं . शाळा कॉलेजातलं शिक्षण , वाचन , इंटरनेट यामुळे असेल कदाचित पण ही जाणीव व्यापकपणे आढळते . प्लॅस्टिकचा वापर , जंगलतोड , जैविकसंपदा याबद्दल तरुणपिढीला अगदी अद्ययावत माहिती असते , असं गिरीभ्रमणासंदर्भातले अनेक उपक्रम राबवणारे क्षितीज या संस्थेचे सुहास जोशी सांगतात . पर्यावरणाचे प्रश्न घेऊन काम करणारेही अनेकजण दिसतात . काहीही साधनसुविधा नसताना , प्रसंगी स्वत : ची पदरमोड करून काम करण्याची त्यांची तयारी असते . कोणत्याही फंडिंगशिवाय गेली दहा वर्षं ' सह्यादी निसर्गमित्र ' सारखी संस्था कोकणातली ऑलिव्ह रिडले कासवं आणि समुदी गरुड वाचवण्याचं काम पदरखर्चाने करतेय . कोल्हापूरची ' निसर्ग ' ही संस्था तरुणांमध्ये निसर्गाविषयी जाणीवजागृतीचं काम करते . त्यांच्यातफेर् दरवषीर् वेगवेगळ्या जंगलात आयोजित केल्या जाणाऱ्या कँप्समध्ये इंजिनिअरिंग मेडिकलच्या मुलांची संख्या मोठी असते . याच कँपमधून त्यांना स्वयंसेवकही मिळतात . ट्रेकिंग , हायकिंग यासाठी जाणारे ग्रुपही हा अवेअरनेस तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात . मुंबई ठाण्यातले अनेक ग्रुप्स याबद्दल सजगतेनं काम करताहेत . मात्र यातही संस्थात्मक सहभाग कमी होत असल्याचं निरीक्षण चक्रम हायकर्सचे रवि परांजपे यांनी नोंदवलं . मुलांना कुणाचा अंकुश , शिस्त नको असते . त्यामुळे मित्रांनी मिळून बाहेर पडण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढलंय . यातही ' मजा ' करायला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते.
स्पधेर्चा ताण अगदी लहानपणापासूनच मुलांच्या मानगुटीवर असतो . त्यातून मुक्तता शोधण्याचे पर्याय सुरू होतात . चोरून सिगारेट ओढता ओढता ड्रग्जचा अंमल कधी सुरू होतो कळतही नाही . पुढची पायरी असते रेव्ह पाटर््या . गेल्या वषीर् पुण्याजवळ सिंहगडाच्या पायथ्याशी झालेल्या अशा पाटीर्त पकडेलेल्या शंभर जणांमधले बहुतेक उच्च मध्यमवगीर्य तरुण होते . यात मुलीही होत्या ! व्यसनांची कारणं केवळ नैराश्य आणि तणाव एवढीच नसतात . ऐशखोरी करण्यासाठी हे उद्योग करणारेही कमी नाहीत . एका मोठ्या दिवंगत नेत्याचा मुलगा अशा प्रकरणात बचावल्याचं उदाहरण ताजं आहे . हे प्रकरण फक्त नवश्रीमंतांपुरतं नाही . ऐश करण्याचं ते सर्व स्तरांमधलं समाजमान्य साधन झालंय . रात्री उशीरा बिअरच्या वासाने घमघमत घरी आलेल्या तरूण मुलाला ' कशी झाली पाटीर् ?' असं कौतुकाने विचारणारे पालक आहेत . शहरांतच नव्हे तर अगदी तालुक्याच्या गावांमध्येही बार्स आणि दारूची दुकानं मेडिकल स्टोर्सएवढ्या संख्येनं दिसतात . जमीनी विकून आलेले पैसे उडवत अनेक गुंठेबहाद्दर तरुण चौकांचौकांत झिंगू लागलेत , रात्री बारमधल्या पोरींवर नोटा उधळून सकाळी रिकाम्या खिशांनी घरी परतू लागलेत ! याचं काळजी करायला लावणारं दुसरं टोक म्हणजे बुवा , बाबा आणि मंदिरांसमोरच्या तरूणांच्या रांगा . चतुथीर् , पौणिर्मा , शनिवार हे हमखास गदीर् खेचणारे दिवस . धामिर्कतेपेक्षा यात अंधश्रद्धाच जास्त दिसते . दर्शनाच्या रांगेत काम सोडून तासन्तास उभं राहण्याची या आयटी पिढीची मानसिकता समजण्यापलीकडची आहे . एकीकडे सामाजिक उपक्रमांत तरूण दिसत नाहीत , अशी तक्रार अनेक संस्था संघटना करत असताना अनेक बुवा आणि बाबांच्या तथकथित सोशल अॅक्टिव्हिटीजला तरुणांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय . ' अध्यात्माच्या दुकानांवरची ही गदीर् काळजी करायला लावणारी आहे ', युक्रांदचे प्रणेते कुमार सप्तषीर्र् सांगतात . त्यांनी या मानसिकतेचं खूप चांगलं विश्लेषण केलं . त्यांच्यामते तरूणांमध्ये दोन प्रकारच्या प्रवृत्ती दिसतात . एक असते , इन्स्ट्रक्टिव , आदेशात्मक ! यांना फारसं लॉजिक न वापरता आदेश ऐकायला , पाळायला आवडतं . म्हणून ' अमक्याला हाकलून द्या . तमुक बंद करा ', अशा आदेशाच्या भाषेत बोलणारे बाळासाहेब ठाकरे आजही तरूणांच्या गळ्यातले ताईत आहेत . दुसरी प्रवृत्ती सजेस्टिव , सूचना ऐकणारी . माझं घर , माझा संसार , माझं लग्न , माझी मुलं असे प्रश्ान् घेऊन उत्तरं शोधायला लोक बुवा आणि बाबांकडे जातात तेव्हा त्यांच्या सूचनात्मक गोष्टी कोणताही विचार न करता पाळणारा हा वर्ग असतो.
' यातून काही चांगल्या गोष्टीही घडताना दिसतात . मुंबईतल्या एका लोकप्रिय बाबांचे तरूण शिष्य गणपती विसर्जनानंतर चौपाट्या स्वच्छ करताना दिसतात . बाबांनी सांगितलं म्हणून हुंडा न घेणारे , साधेपणाने लग्न करणारेही अनेकजण आहेत . मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या तरूणांकडून ' हा मेल २१ जणांना फॉरवर्ड करा नाही तर सर्वनाश ठरलेला ', असे मेल येतात तेव्हा यांच्यात तर्कनिष्ठता , योग्यायोग्यता , सारासार विचार करण्याची प्रवृत्ती आहे का याचीच शंका येते .
युवकांच्या सामाजिक जाणीवा एवढ्या बोथट होण्यामागे माध्यमंही तेवढीच जबाबदार आहेत , ही सार्वत्रिक तक्रारही आढळली . लोकांना जे आवडतं तेच आम्ही छापतो किंवा दाखवतो , असं म्हणणारी माध्यमं सेक्स व्हायोलन्स आणि पैशांभोवती फिरणाऱ्या घटनांनाच प्राधान्य देतात . वाचन , चर्चा , इतरांच्या सुखदु : खाची विचारपूस करायच्या वेळात लोक मालिकांमधल्या पात्रांच्या भावनाविश्वाशी एकरूप झालेले असतात . वर्तमानपत्रांच्या प्रादेशिक आवृत्त्या अत्यंत स्थानिक झाल्यात . जिल्ह्याचं शहर असलेल्या पुरवणीत वेगळ्या आणि त्याच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या आवृत्तीत जाणाऱ्या बातम्या वेगळ्या असतील तर आपल्या शेजारी काय जळतं आहे हे कसं कळावं ? बातम्या मनोरंजनाच्या पातळीवर आणल्यामुळे त्यातलं गांभीर्य हरवलंय . काही विधायक छापलं किंवा दाखवलंच जात नसले तर ते तरूणांपर्यंत कसं पोहचावं ?
आजचे तरुण मग सामुहिकरित्या काही करतच नाहीत असं मात्र नाही . पुण्या - मुंबईतल्या कॉलेजेसमध्ये सध्या इव्हेंटस आणि फेस्टिवल्सची धमाल आहे . पूवीर् कॉलेजमध्ये होणाऱ्या गॅदरिंगचं हे आधुनिक रूप . वेगवेगळ्या नावांखाली कॉलेजचं बॅनर वापरून हे फेस्टिवल्स होत असले तरी कॉलेजची भूमिका कँपस उपलब्ध करून देण्यापुरताच असते . बाकी स्पॉन्सरर शोधण्यापासून , स्टेज , पेंडॉल , पाहुणे , जजेस , रजिस्ट्रेशन या सगळ्या गोष्टी विद्याथीर् करतात . एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला लाजवेल अशा पद्धतीने या गोष्टी होतात . रुपारेलच्या सुजय हांडेवर त्यांच्या कॉलेजच्या ' क्षितीज ' फेस्टिवलची जबाबदारी आहे . ' फेस्टिवल्सचं बजेट एक लाखांपासून ऐंशी लाखांपर्यंत असू शकतं . मूड इंडिगो सारख्या फेस्टिवलचं बजेट तर कोटीच्या घरात असल्याचं सांगितलं जातं . एवढे प्रचंड पैसे अगदी जबाबदारीने हाताळले जातात . दरवषीर् इनचार्ज बदलत असल्याने आपल्यावेळी उत्तम कार्यक्रम व्हायला हवा , या जिद्दीने कार्यक्रम होतात . महिनाभर कॉलेजमधली किमान शंभरजणांची टीम फेस्टिवलसाठी राबते . बाहेरच्या कॉलेजेसमधून साधारण पाच - सात हजारांचा क्राऊड फेस्टिवलच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो , असं सुजय म्हणाला.
हेंसमग्र चित्र शहरी मध्यमवगीर्य तरूणांच्या विश्वात डोकावताना दिसलेलं आहे . ग्रामीण तरुण या सगळ्यापासून अनेक मैल दूर आहे . तालुक्याच्या गावी पदवी कॉलेजात शिकणाऱ्यांचे आथिर्क आणि सामाजिक प्रश्ान् निराळे आहेत . कमी उत्पन्न गटातल्या शेतकरी , शेतमजूर आणि दलित मुलांचा शहरी तरुणांच्या या विश्वाशी काडीचाही संबंध नाही . व्यावसायिक शिक्षण नसल्याने पदवीनंतर पुढे भेडसावणारा बेकारीचा प्रश्न आहे . शहरात संगणक जुना झाला पण ग्रामीण भागातला मुलगा अजूनही लोडशेडिंगच्या हिशेबात अभ्यासाचा मेळ घालतोय . सरकारी नोकऱ्या हेच अजूनही अंतिम ध्येय मानणाऱ्या या मुलांना खासगी क्षेत्रातली आव्हानं पेलता यावीत यासाठी ना सरकारी पातळीवर काही प्रयत्न होताहेत ना कॉलेजेसमध्ये काही शिकवलं जातंय . तिथं वीस वर्षांपूवीर्ंची स्थिती कायम आहे .
हे सगळं असं असलं तरी सगळाच अंधार नक्की नाही . समाजासाठी काही करण्याची आस असणारे गट काही करताना दिसत नसले तरी वैयक्तिक पातळीवर ही बांधिलकी मानतात . मराठी भाषा मरते आहे , अशी ओरड सर्वदूर होत असताना मराठी कविता , प्रवास वर्णनं , लेख , कथा , चुटके यांचे दजेर्दार ब्लॉग कल्पकतेने चालवणारे तरूणच आहेत . शेकडो वर्षांची परंपरा असलेले किल्ले , मंदिरं ढासळत असताना सरकारी मदतीची वाट न पाहता त्यांच्या जपणुकीसाठी पदरमोड करुन धावणारेही तरूणच आहेत . मुंबईतल्या बाँबस्फोट आणि जलप्रलयांत लोकांच्या मदतीसाठी कुणा राजकारण्याची किंवा सरकारी रसदीची वाट न पाहता जीव धोक्यात घालून धावणारे तरुणच होते . धामिर्क आणि जातीयतेची भाषा बोलणाऱ्या राजकीय पक्षांना त्यांचं व्याकरण मुळातून बदलायला लावणारेही तरूणच आहेत . आयटीचं शिक्षण घेऊन अमेरिकेची वाट पाहणारे हजारो असले तरी सिलिकॉन व्हॅलीतली हजारो डॉलर्सच्या नोकऱ्यांवर पाणी सोडून मातीच्या ओढीने परतणारे तरूणही आहेतच ....
जागतिकीकरणानंतर बदल होताहेत . त्यांच्या बऱ्या - वाईट परिणामांचं टागेर्ट तरुण पिढी असणार हेही साहजिक आहे . पण हा वेग जबरदस्त आहे . त्या वेगाने योग्य दिशा पकडून धावण्याचं आव्हान आहे . ते पेलता यायला हवं ...