असायचा तेजाचा पर्वत माझा भारत
करायचा तार्यांशी शर्यत माझा भारत
कितीक नेते, किती लफंगे, भ्रष्टाचारी
लुटणार्यांची बनला दौलत माझा भारत
निखार्यांसही रंग येथल्या हिरवे-भगवे
युगायुगांचा आहे धुमसत माझा भारत
महाल होते सोन्याचेही इथे एकदा
कर्ज अताशा आहे मागत माझा भारत
दिल्लीमधला हरेक नेता सुखात आहे
जरी कधीचा पडला खितपत माझा भारत
सरकारांचे वाचुन धोरण प्रश्नच पडतो
कुणास आहे कळला कितपत माझा भारत
जरी भासतो एक तरी हा असे वेगळा
याचा भारत, त्याचा भारत, माझा भारत
इथे घेतला कोट्याधींनी शोध सुखाचा
अता चालला आहे हरवत माझा भारत
असे छेद अन असे विभाजन हवे कशाला
तुमचा - माझा एकच भारत, माझा भारत
जरी भटकलो दूरदूरच्या देशांमध्ये
सदैव असतो माझ्या सोबत माझा भारत
जळून माझी राख रहावी 'या' मातीतच
अनंतातही यावा संगत भारत
- प्रसाद शिरगांवकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा