गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;
मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भिवयी,
भिरकावुनि ती तशीच ध्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी।
गि~हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;
स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा।
गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते।
काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली।
काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या।
गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!
- बा.सी.मर्ढेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा