गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥
ही वडिलांची वाडी तुमची तुम्हास ती लखलाभ असो
खुशाल फुटक्या बुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो
चंद्रावरती महाल बांधू, नको आम्हाला जीर्ण गढी ॥१॥
देव्हाऱ्यातील गंधफुलांतच झाकून ठेवा ती पोथी
अशी बुद्धीची भूक लागता कशी पुरेल अम्हा बोथी
रविबिंबाच्या घासासंगे हवी, कुणाला शिळी कढी? ॥२॥
शेषफणेवर पृथ्वी डोले! मेरूवरती सूर्य फिरे!
स्वर्गामध्ये इंद्र नांदतो! चंद्र राहूच्या मुखी शिरे!
काय अहाहा बालकथा या, एकावरती एक कडी ॥३॥
दहा दिशांतून अवकाशातून विमान अमुचे भिरभिरते
अणूरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते
नव्या जगाचे नायक आम्ही, तुम्ही पुजावी जुनी मढी ॥४॥
- वसंत बापट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा