शुक्रवार, २५ जुलै, २००८

खरा ग्लोबल संत, नामदेव

महाराष्ट्राबाहेर पांडुरंगाची जितकी देवळं आहेत , त्याहीपेक्षा अधिक भक्तराज नामदेवांची आहेत। थेट पाकिस्तानातही नामदेवांचं मंदिर आहे. वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्रापुरता असलेली भागवत धर्माची ध्वजा आसेतूहिमाचल पोहचवण्याचा मान नामदेवांना आहे. संतांच्या मांदियाळीत सर्वात महत्त्वाचे असूनही ते सर्वाधिक दुर्लक्षित राहिले. .............................................



साक्षात देवाने ज्याच्या हातून नैवेद्य खाल्ला... मुक्ताबाईंनी ज्याला कच्च मडकं ठरवून विसोबा खेचरांचा शिष्य बनवलं... कोरडी भाकरी खाणा-या कुत्र्यामागे जो तूप घेऊन धावला... या आणि अशाच आणखी दोनचार चमत्कृतिपूर्ण प्रसंगांसाठी संत नामदेव आपल्याला माहीत आहेत। पण योगिराज ज्ञानेश्वरांना भक्तिभाव आणि प्रेमाशी नाळ जोडून ‘ माऊली ’ बनवणारे नामदेव. ज्ञानेश्वरीचं तत्त्वज्ञान अधिक सोपं करून कीर्तनाच्या रंगी रंगत वारकरी संप्रदायाची बैठक मांडणारे नामदेव. विठ्ठलचरिताचे उद्गाते नामदेव. परिसा भागवतापासून चोखा मेळ्यापर्यंत समाजाच्या सर्व थरांना भागवत धर्माची दीक्षा देणारे नामदेव. महाराष्ट्रात वारकरी विचारांचा ख-या अर्थाने प्रसार करणारे नामदेव. भागवत धर्माची ध्वजा कन्याकुमारीपासून पंजाबापर्यंत नेणारे नामदेव. गुरू नानक आणि संत कबीरांनाही गुरूसमान असणारे नामदेव. उत्तर भारतातील संतमताचे आणि हिंदी भावकवितेचे अर्ध्वयू नामदेव. मराठी , हिंदी , गुजरातीसह पाचहून अधिक भाषांत अभंगरचना करणारे नामदेव. लाखो अमराठी लोकांनी ज्यांच्यावरून आपले आडनाव घेतले आहे , ते नामदेव.



हे नामदेव आपल्याला खरोखर किती माहित आहेत ? आणि माहित नाहीत तर का माहित नाहीत ?



नामदेवांचा जन्म १२७० चा। ऐशी वर्षांचं आयुष्य म्हणजे मृत्यू १३५० चा. पश्चिम महाराष्ट्राच्या पलीकडचा महाराष्ट्र माहित नसणा-या संशोधकांनी त्यांचे जन्मस्थळ कराडजवळच्या बहे नरसिंगपूर हेच मानले. पण आला परभणी जिल्ह्यातले नरसी बामणी हेच गाव जन्मस्थळ सिद्ध झाले आहे. घरातच अनेक पिढ्यांचा विठ्ठलभक्तीचा वारसा मिळाला. विठुरायामागे लहानगा नाम्या वेडा झाला. पण त्याच्या भक्तीने विठ्ठल पण भुलला. दोघांनाही एकमेकांपासून करमेना. विठुराया त्याच्याशी बोलायचा , रागवायचा , माया करायचा. एकदा त्याने नाम्याला सांगितलं , लग्न झालंय तर घरी पण लक्ष दे. त्यामुळे नामदेव रागावून निघाला. मग विठोबानेच त्याला थांबवलं. हाताला धरून खेचून आणलं. बाबापुता करून समजावलं. एवढी त्यांची भक्ती. हे सारं आणि असंच नामदेवाने आपल्या शतकोटी अभंगांमधे सुरस पद्धतीने सांगितलंय.

‘ विठ्ठलचरिताचा उद्गाता ’ या लेखात ज्येष्ठ समीक्षक म। वा. धोंड यांनी नामदेवांच्या रचनेविषयी मांडलेले विचार नवा दृष्टिकोन देणारे आहेत. ते म्हणतात , ‘ नामदेवांच्या काव्यशैलीतूनच विठ्ठलाची ‘ मिथ ’ निर्माण झाली. पुंडलिकाच्या भेटीसाठी विठ्ठलाचा अवतार झाला. पण त्यानंतर अठ्ठावीस युगे तो राउळात विटेवर तिष्ठत उभा राहिला होता. नामदेवांनी त्याला परत बोलताचालता केला. राउळातून भक्तांच्या घरी आणला , भक्तांच्या बरोबरीने कामाला लावला. त्याला ‘ भक्तासारिसा ’ केला.

’ नामदेव ज्ञानेश्वरांना वयाने सिनियर , पण अधिकारानेही। मुक्ताबाई आणि गोरोबा काकांनी नामदेवांचं मडकं कच्च असल्याची प्रसिद्ध कथा आहे. त्यात निवृत्तीनाथ , ज्ञानदेव आणि सोपानदेव हे तिघे भाऊ नामदेवांच्या पाया पडले होते. विसोबा खेचरांनी सर्वात्मक भगवंताची ओळख करून दिल्यावर नामदेवांची भावभक्तीला विचारांचे अधिष्ठान लाभले. ज्ञानदेवांचा योग , ज्ञान आणि नामदेवांची भक्ती यांचा समन्वय झाला. त्यात दोघांचाही अधिक परिपूर्णतेच्या दिशेने प्रवास झाला. दोघांनी राज्यभर संतांची मांदियाळी उभी केली. सर्वांनी एकत्र येऊन उत्तरेत तीर्थयात्रा केली. दोघांचा भक्तीविषयीचा दृष्टिकोन स्पष्ट करणारी एक कथा प्रसिद्ध आहे. राजस्थानच्या वाळवंटात पाणी नव्हतं. तेव्हा ज्ञानेश्वर लघिमा सिद्धीने एका विहिरीत उतरून पाणी प्याले. तर नामदेवांनी विठ्ठलाला साकडे घालून पाण्याचा ओहोळ निर्माण केला. योगिराज ज्ञानदेवांना ज्ञानेश्वर माऊली बनवण्याचं श्रेय अनेक अभ्यासक नामदेवांना देतात , ते उगाच नव्हे.

नामदेव ज्ञानेश्वरांसोबतच्या पहिल्या तीर्थयात्रेच्या वेळी विठ्ठलाचा वियोग सहन करू शकत नव्हते। पण ज्ञानेश्वरांच्या संगतीने त्यांची भक्ती अधिक व्यापक झाली. ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर नामदेवांनी अनेक तीर्थयात्रा केल्या. ‘ ज्ञानदीप लावू जगी ’ ही उक्ती सार्थ केली. दुस-या तीर्थयात्रेत रामेश्वरापर्यंत त्यांनी भागवत धर्माचा दक्षिणदिग्विजय केला. त्यानंतर जवळपास पाच वर्ष संपूर्ण उत्तर भारत झाडून काढला. त्यानंतर दोनदा ते पंढरपुरातून तीर्थयात्रेसाठी निघाले. या दोन्ही वेळेस त्यांनी गुजरात , राजस्थान आणि पंजाब येथे जवळपास चाळीस वर्ष मुक्काम केला. पंजाबातील गुरुदारपूर जिल्ह्यातल्या घुमान येथे त्यांचं मुख्य ठाणं होतं. नामदेवांमुळेच हे गाव उभं राहिलं. नामदेवांच्या प्रभावामुळे दिल्लीच्या बादशहा अल्लाउद्दीनने तिथे मंदिरही बांधलं. त्याकाळातली वाहतुकीची आणि संवादाची साधने पाहता त्यांनी केलेल्या कामाची महती पटू शकेल.

उत्तर भारतात नामदेवांमुळेच भागवत धर्माचे विचार नव्यानेच पोहोचले होते. नाथ संप्रदायानेच सनातनी विचारांना थोडेफार आव्हान दिले होते. पण भागवत धर्मासारखा प्रेम , जिव्हाळा आणि साधेपणा त्यात नव्हता. त्यामुळे नामदेव तिथे नवी क्रांतीच करत होते. महाराष्ट्राप्रमाणेच भक्तीचं लोण त्यांनी सर्व जातीधर्मात पोहोचवलं. तिथेही सर्व जातींचे शिष्य उभे केले. एवढेच नाही , तर मुस्लिमांनाही उपदेश केला. त्यातून पुढे रामानंद , कबीर , रैदास , दादू अशा संतांनी समाजिक जागृती घडवून आणली. मीरा , नरसी मेहता , तुलसीदास , सूरदास अशा लोकप्रिय संतांच्या काव्यातही नामदेवांचा आदराने उल्लेख आढळतो. शिख धर्मीयांना देवतुल्य असणा-या गुरू ग्रंथसाहिबात नामदेवांच्या ६१ रचना मोठ्या आदराने समाविष्ट केलेल्या आहेत. आजच्या पंजाब , हरयाणा , दिल्ली , हिमाचल प्रदेश , राजस्थान , मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश तसेच पाकिस्तानातही नामदेवांची मंदिरं उभी आहेत. एकट्या राजस्थानात दी़डशेच्यावर नामदेवांची देवळं आहेत. अगदी जयपुरातही तीन देवळं आहेत. असं असलं तरी त्यांच्या हिंदी रचना मोठ्या संख्येने उपलब्ध नाहीत. ते बहुभाषिक कवी होते. जिथे गेले तिथली बोली स्वीकारली. गुजरातीत लिहिले , खडी बोलीत लिहिले , पंजाबीतही लिहिले. सर्वत्र जात राहिले , गात राहिले आणि लोकांची जीवनं बदलत राहिले. ‘ खरे तर संत नामदेवांच्या महाराष्ट्रातील चरित्र व कर्तृत्वपेक्षा पंजाबातील त्यांचे धर्मकार्य व हिदी कविता , त्या अत्यल्प असूनही , त्यांच्या व्यक्तिमत्वाची उत्तुंगता अधिक सांगत राहतात ’, असे संतसाहित्याचे अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर यांनी नोंदवलेले मत महत्त्वाचे आहे. नामदेवांचं आणखी एक वैशिष्टय हे की त्यांचा सगळा गोतावळा हा विठ्ठलभक्तीने भारावला होता. त्यांचे वडील दामाशेटी , आई गोणाई , बायको राजाई , आऊबाई , लिंबाई , लाडाई , नोगी या लेकासुना , तसेच नारा , गोदा आणि विठा हे मुलगे सगळ्यांच्याच कमी अधिक अभंगरचना उपलब्ध आहेत. त्यापैकी विठाचे काही अभंग तर थेट तुकारामांची आठवण करून देणारे आहेत. नामयाचि दासी जनाबाई आहेच. शिवाय शिष्योत्तम चोखा महार आणि त्याचे कुटुंब सोयराबाई , निर्मळाबाई , बंकामेळा , कर्ममेळा यांच्यावर नामदेवांचा थेट प्रभाव आहे. परिसा भागवत , जगमित्र नागा , जोगा परमानंद , सावता माळी , असंद सुदामा , नरहरी सोनार , अशा समकालीनांनी नामदेवांपासून स्फूर्ती घेतली होती. विशेष म्हणजे नामदेवांचा हा प्रभाव टिकावू ठरला. त्याचा प्रभाव आजही देशभर पाहता येतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: