आपलं रोजचं जगणं संघर्षानं भरलंय। हा जगण्याचा संघर्ष करत असताना आपल्या भावनांचा इतरांनी आदर केला नाही, किंवा त्यांचा अपमान केला तर आपल्याला दुःख होतं। कुणी कुणाला टाकून बोलतं, कुणी अपमानित करतं, दुस-याला आपल्याहून कमी समजतो, असमान समजतो. जातिभेद पाळतो. कुणी कुणावर कुरघोडी करतं, कुणी पुढे जात असलं तर त्याचा पाय ओढला जातो, कुणी कुणाला अडचणीत आणतं, कुणी कुणाला लुबाडतं, फसवतं. कुणी कुणाचा खून करतं, कुणी कुणाला नाडतं, गुलाम बनवतं. कुणी आपल्या बायकोवर, नव-यावर, मुलांवर, आई-वडिलांवर अथवा नातेवाईक, मित्रांवर सत्ता गाजवतं. इतकंच नाही तर कधी कधी आपणच आपले वैरी होतो. आपल्या मनासारखं नाही झालं तर आपण नाराज होतो. हे तीव्र असलं तर माणूस नैराश्यानं आत्महत्या करतो. याच्यातून माणसाच्या आयुष्यात दुःख निर्माण होतं, माणूस दुःखी होतो आणि इतरांनाही दुःखी बनवतो. मग माणसाला वाटतं, आपण सुखी झालं पाहिजे. आपलं दुःख दूर झालं पाहिजे. मग तो मार्ग शोधतो, सर्वात सोपा मार्ग म्हणजे देवाधर्माचा. आपलं दुःख दूर व्हावं यासाठी तो देवाचा धावा करतो, नवस करतो, उपवास धरतो, देवालयांचे उंबरठे झिजवतो, कर्मकांड करतो, दानधर्म करतो, अनादि काळापासून तो असं करत आलाय. पण त्याचं दुःख यामुळे नाही दूर झालं. दुःख हे सत्य आहे, असं ज्याने अवघ्या मानवजातीला त्यांच्या घराघरात जाऊन सांगितलं, त्या सिद्धार्थ नावाच्या मानवानं आपला अनुभव, बुद्धिप्रामाण्यवाद आणि अथक परिश्रमातून दुःख दूर करण्याचा शोध लावला आणि तो नव्या आणि ख-या धर्माचा मार्ग जगाला दाखवला. त्या मार्गालाच त्यानं ‘ धम्म ’ असं नाव दिलं.
सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा
सचित्त परियोदपनं, एतं बुद्धान सासनं
म्हणजेच कोणत्याही प्रकारचं वाईट कर्म न करणं, चांगल्या कर्माचा संग्रह वाढवणं, मन सतत शुद्ध राखणं, हीच बुद्धाची शिकवण आहे
ही धम्मपदातली गाथा आहे। यात बुद्धाच्या धम्माचं सार सामावलंय।
‘ धम्म ’ म्हणजे काय ? , या प्रश्नाचं उत्तर एका शब्दांत द्यायचं झालं तर या गाथेच्या आधारे असं देता येईल की, ‘ धम्म ’ म्हणजे सदाचार। म्हणजेच वर चर्चा केलेली वाईट कृत्ये माणसांनी न करणं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भगवान बुद्ध आणि त्यांच्या ‘ धम्म ’ या ग्रंथात धम्माची व्याख्या केलीय. ते म्हणतात, ‘ धम्म ’ म्हणजे सदाचरण. म्हणजेच, जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणसा-माणसातले व्यवहार उचित असणं. ते म्हणतात की, माणूस जर एकटाच असला तर त्याला धम्माची आवश्यकता असणार नाही. पण जेव्हा दोन माणसं कोणत्याही संबंधानं एकत्र येतात, तेव्हा त्यांना आवडो अथवा न आवडो, ‘ धम्म ’ हा पाहिजेच. दुस-या शब्दांत सांगायचं म्हणजे समाज धम्माशिवाय असू शकतच नाही. ‘
धम्म ’ म्हणजे जर सदाचार असेल तर मग सदाचार म्हणजे तरी काय ? सदाचार म्हणजे चांगलं आचरण। या चांगल्या आचरणावरच समाजातील नितिमत्ता राखली जाते. दुःखाला दूर करण्याचा आणि सुखी होण्याचा मार्ग सापडतो, असं बुद्धांच्या उपदेशातून आपल्याला दिसतं. तथागत म्हणतात की, माणसानं चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ त्याला चांगलं मिळतं, आणि जर त्यानं वाईट कर्म केलं तर त्याला वाईट फळ मिळतं. माणसाचं सुखी होणं अथवा त्याचं दुःखी होणं, हे तथागतांनी माणसाच्या कर्मावर अवलंबून ठेवलंय. यालाच बुद्धांचा कर्मनियम म्हणतात. दुःख दूर व्हावं म्हणून आजही समाजात पूजा, कर्मकांड, प्रार्थना, पोथी अथवा ग्रंथवाचन, वेगवेगळ्या प्रकारचे विधी, उपासतापास, नवससायास, हे मार्ग अवलंबिले जातात. तथागतांनी या मार्गांचा स्पष्ट शब्दांत निषेध केलाय. माणसाचं दुःखी अथवा सुखी होणं, हे अशी कर्मकांड, पूजा, प्रार्थना करण्यावर अथवा न करण्यावर अवलंबून नसून ते सुखी होणं माणसाच्या कर्मावरच अवलंबून आहे, हेच तथागतांचं अवघ्या मानवी समाजाला सांगणं आहे. जगातली नैतिक व्यवस्था ही कर्मनियमावरच अवलंबून आहे. इतर कशावरही नाही, असं तथागतांचं म्हणणं आहे.
आता प्रश्न असा निर्माण होतो की, कर्म हे कशातून उत्पन्न होतं ? याचं उत्तर आहे, मनातून. मन हेच कर्माचा कर्ता आहे. माणसाच्या सर्व त-हेच्या प्रवृत्ती, सद्विचार, दुर्विचार, भावभावना, वितर्क, मनातूनच निर्माण होत असतात. म्हणूनच तथागतांनी मन हेच केंद्रबिंदू मानलंय. मन मुख्य आहे. याचाच अर्थ असा की, जर माणसानं आपल्या मनाला चांगलं वळण लावलं. वाईट संस्कार केले, दुर्गुणांची कास धरली तर मनात वाईट प्रवृत्ती निर्माण होतील. म्हणूनच शरीराची सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्या मनाला चांगलं वळण लावण्यासाठी बुद्धांनी माणसाला सहज, सुलभ आणि खराखुरा उपाय अथवा मार्ग सांगितलाय, त्यालाच ‘ धम्म ’ असं म्हणतात. या धम्माचं पालन केलं की माणूस सुखी होईल, असं बुद्धांनी म्हटलंय.
- सुनील तांबे
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा