शुक्रवार, ४ जुलै, २००८

मराठी पाउल पडते पुढे


मराठी पाउल पडते पुढे


मराठी समाज म्हणजे नक्की काय हा प्रश्न गेली अनेक वर्षे डोक्यामध्ये होता. हा जसा माझ्या डोक्यात होता तसाच अनेकांच्या डोक्यात होता. महाराष्ट्रात राहणारा तो मराठी माणूस का ? मराठी बोलणारा तो मराठी माणूस का ? पण काही वर्षांपूर्वी श्वास चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णकमळ मिळाले आणि एका समाजात आनंदाची लाट उसळली. हा समाज मराठी भाषकांचा होता. अभिजीत सावंत इंडियन आयडॉलच्या अंतिम फेरीत पोहोचला तेव्हा गाठ खर्च करून एसएमएसचा धडाका लावणारे आणि तो विजेता ठरल्यावर नोबेल पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करणारे मराठी भाषकच होते. विंदांना ज्ञानपीठ मिळाला तेव्हा या समाजाला अतीव आनंद झाला. सचिन तेंडुलकरच्या १५ हजार धावा पूर्ण झाल्या तेव्हा हाच मराठी भाषक आनंदातिशयाने वेडा झाला. प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्या तो त्यांच्या आनंदाचा परमोच्चबिंदू होता. २१ वर्षांपूर्वी स्मिता पाटीलचं अकाली निधन झालं तेव्हा हा समाज सुन्न झाला....

मराठी माणूस समाज म्हणून वावरतो तो केवळ अशा आनंदाच्या आणि दुःखाच्या प्रसंगीच। एरवी हा समाज दुभंगलेला आणि शेकडो तुकडे झालेल्या काचेसारखा असतो. त्याला सांधणं आणि एकोप्याने वागायला लावणं ही गोष्ट खूप कठीण किंवा अशक्यच. मराठी माणूस समाज म्हणून एकोप्याने राहत नाही , हा आरोप गेली अनेक वर्षं याच समाजातील राजकीय , सांस्कृतिक आणि सामाजिक नेते करत आले आहेत. तरीही हा समाज एक काही होत नाही. जे समाज एकत्र नांदतात त्यामध्ये अनेकदा व्यावसायिक , व्यावहारिक आणि भौगोलिक कारणे असतात. व्यापार उदीम करायचा तर एकीने वावरावे लागते. पैशा-अडक्याच्या व्यवहारात एकमेकांवर विश्वास ठेवावा लागतो आणि भौगोलिकदृष्ट्या , राजकीयदृष्ट्या अडचणीच्या परिस्थितीत असलेल्यांना स्वसंरक्षणार्थ एकीने नांदावे लागते. मराठी समाजाला अशा आव्हानांना फारसे तोंड द्यावे लागत नसल्याने हा समाज विखुरलेल्या अवस्थेत राहिला , तरीही टिकला.


जे समाज एकीने राहतात त्यात अनेकदा त्यांचा बुद्ध्यांक तपासण्यासारखा असतो। कोणत्याही समाजाचा बुद्ध्यांक सारखा नसतो , हे खरे असले तरी हुशार माणसांना स्वतःची प्रज्ञा असते आणि त्यामुळेच आपल्या विचारांबाबत ते आग्रही राहतात. आपापल्या भूमिकांवर ठाम असलेली माणसे एकत्र येऊ शकत नाहीत आणि अनेकदा त्यांच्यात विचारांची आणि त्यामुळे व्यक्तींची दुही आढळते. मराठी समाजात बौद्धिक कुवत अधिक असल्याने जो इतरांशी फटकून वागतो आणि तो ते करताना स्वकियांच्या बाबतीतही फारसा भेदभाव करत नाही. त्यामुळेच अनेकदा असे चित्र दिसते की , नोकरीत वा अन्यत्र अन्य समाजात त्या एका माणसाचा शिरकाव झाला की तो आपल्याच भाऊबंदांना तिथे आणतो. दुर्दैवाने मराठी माणसाच्या बाबतीत असे घडत नाही.

अर्थात समाज म्हणून मराठी माणूस एकत्र आल्याचीही उदाहरणे आहेत। दीड वर्षांपूर्वी मुंबईत पदवीधर मतदारसंघाची विधानपरिषदेची निवडणूक झाली. त्यात काँग्रेस जिंकणार अशी हवा होती आणि परिस्थितीही तशीच होती. पण काँग्रेसने अमराठी उमेदवार उभा केला आणि जणू मुंबईतल्या समस्त मराठी पदवीधरांना आव्हान दिले. परिणाम हा झाला की , समस्त मराठी भाषक पदवीधर जोमाने बाहेर पडले आणि शिवसेनेचा मराठी भाषक उमेदवार निवडून आला. गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी पक्षांतर्गत मतभेद आणि फुटाफूट यामुळे शिवसेना विकलांग अवस्थेत होती आणि या पक्षाची मुंबईतील सत्ता जाणार हे जणू अटळ होते. पण मुंबई कोणाची , हा सवाल ऐरणीवर आला आणि वातावरण बघता बघता पालटले. मराठी माणसाची एकजूट पुन्हा एकदा दिसून आली. मटाने नवरात्रीच्या काळात गेली दोन वर्षे महिलांना वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालण्यासाठी आवाहन केले आणि या आवाहनालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. याचे एक कारण आपली एकजूट कॉलनीपासून-ऑफिसपर्यंत आणि रेल्वे प्लॅटफॉर्मपासून-मॉलपर्यंत दाखवून देण्याची मराठी समाजाची मानसिक गरज. संकटाच्या वेळी जसे अन्य समाज एकत्र येतात तसाच मराठी समाजही एकत्र आला. या समाजाची काही व्यवच्छेदक लक्षणे आहेत. त्याचा बुद्ध्यांक वरच्या दर्जाचा आहे. शिवाय विविध कला आणि शास्त्रे यात त्याला रुची आणि गती आहे.


चित्रपट , संगीत , नाटक , क्रिकेट या आणि अशा अनेक कलांमध्ये मराठी माणूस पारंगत आहे। त्याचे हे प्रभुत्व वारंवार सिद्ध होत आले। शिवाय सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांच्या क्षेत्रातही मराठी नेत्यांनी देशाला नेतृत्त्व दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज , पेशवे , स्वातंत्र्य समरातील झाशीची राणी , तात्या टोपे हे योद्धे आणि राज्यकर्त्यांनी इतिहास घडविला शिवाय लोकमान्य टिळकांनी भारतीय असंतोषाचा पाया रचला. त्याच वेळी आगरकर , चिपळूणकर , नामदार गोखले आदिंनी समाजसुधारणाचा नवा मंत्र दिला. महात्मा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर , धोंडो केशव कर्वे , प्रभुजींनी समाज प्रबोधनाचा वसा घेतला या आणि अशा अनेक सुपुत्रांनी मराठी समाजाला अभिमानास्पद चेहरा मिळवून दिला. सचिन तेंडुलकर , सुनील गावस्कर , माधुरी दीक्षित , आशुतोष गोवारीकर यांनी आधुनिक महाराष्ट्राची ओळख घडवली तर दिनेश केसकर यांच्या सारख्यांनी महाराष्ट्राची ध्वजा सातासमुद्रापार नेली. हा मराठी समाज टिकेल का असा प्रश्न विचारला जातो , त्यावर उत्तर हो हे आहे.

ज्ञानेश्वरांनी ७०० वर्षोंपूर्वी अमृतातेही पैजा जिंके अशी मराठीची विजय पताका फडकवली. त्यानंतर अनेक परकीय आक्रमणे होवूनही ही भाषा आणि हा समाज टिकला आहे. त्यामुळे तो आणखी हजार वर्षे टिकेल यात शंका नाही. मात्र , मराठी माणूस म्हटला की , फेटे , नऊवारी साड्या , तुतारी , लेझीम , तमाशा इतकेच जर कोणी डोळ्यापुढे ठेवले तर हा समाज संपल्यासारखा वाटेल. टोपीकर इंग्रजाने त्याची लांब टोपी केव्हाच फेकून दिली आणि मध्य पूर्वेतल्या मंडळीनी आपली मुंडाशी टाकली. तसाच मराठी माणूसही बदलत्या काळानुसार आपले रूप , पेहराव , भाषा आणि विचार हे सारे काही बदलत आहे. मराठी समाजाला स्वीकारायचे तर या बदलत्या स्वरूपातच स्वीकारायला हवे. म्हणूनच मंगळागौरी सजल्या नाहीत , तमाशाचे फड रंगले नाहीत किंवा पुरण पोळ्या शिजल्या नाहीत. मराठी समाज संपला असे मानण्याचे काहीच कारण नाही. समाजाची लक्षणे आणि उद्दीष्टे या पेक्षा खूप वेगळी आणि शाश्वत आहेत. जो ती पर्यंत टिकून आहे. तो पर्यंत या समाजाला धोका नाही. पायाला ठेच लागली तर आई गं असा उच्चार ज्याच्या तोंडून आभावितपणे निघतो असा एक माणूस हयात असेपर्यंत मराठी समाज टिकलेलाच आहे.

- भारतकुमार राऊत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: