शुक्रवार, २५ जुलै, २००८

कष्टकरी-शेतक-यांसाठी झटणार - उद्धव ठाकरे

परप्रांतीय इथे येतात, रोजगार मिळवितात, तर मग माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी शेतकऱ्याने मुंबईत का येऊ नये? कर्जबाजारी होऊन मरणाकडे वळण्यापेक्षा त्याने जीवनाकडे वळून मुंबईत बस्तान बसवावे, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे...
सांगत आहेत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे .......

मराठी तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी शिवसेना काय करीत आहे?

प्रश्ानंना उत्तरे द्यायला सुरूवात करण्यापूवीर् 'मटा'ला वर्धापनदिनाच्या मनापासून शुभेच्छा! मराठी तरुणांसाठी शिवसेनेने काय केले हे मला विचारण्यापेक्षा, शिवसेना-प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेमुळे जे असंख्य मराठी संसार उभे राहिले, त्यांना विचारा. शिवसेनेने त्यांना काय दिले आहे, हे तेच योग्यपणे सांगू शकतील.

मराठी तरुणांना संधी नाकारली जाते असे का होते?

विविध क्षेत्रांत मराठी तरुणांना संधी मिळवून देण्याचे काम शिवसेना करीत आहे. पण त्याचवेळी मराठी माणसाने स्वत:ची ताकद ओळखायला हावी. मराठीबद्दल चिंता करण्याची गरज नाही. मी सार्मथ्यवान आहे, आपल्यात हिंमत असेल तर तुमची संधी कुणीही हिरावून घेणार नाही. जिथे रोजगाराच्या संधी आहेत, तिथे मराठी तरुणांनी ठामपणानं पाय रोवले पाहिजेत.

' शिववडा' सुरू करून मराठी तरुणांना मोठ्या उद्योगांपासून वंचित ठेवणार आहात का?

वडापाव चांगल्या दर्जाचा दिला तर त्याच्यात जगप्रसिद्ध होण्याची क्षमता आहे. लंडन, न्यूयॉर्कमध्येही मग तो विकला जाईल. या वडापावाला अस्सल मराठी झटका असेल. मॅक्डोनाल्डचा बर्गर काय आहे? जर बर्गर जगभर विकला जात असेल, तर वडापावमध्येही जग व्यापण्याची क्षमता आहे. त्यामुळे शिवसेनेने वडापावाच्या धंद्याला उद्योगाचा दर्जा देण्याचे ठरविले आहे. या व्यवसायावर अनेकांचे संसार उभे राहत असतील तर या धंद्यात गैर काय? या माध्यमातून मी मराठी तरुणांना एका छत्राखाली आणण्याचे काम करीत आहे. त्यानंतर पुढे काय करायचे ते ठरवू.

इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतल्यास प्रगती झपाट्याने होते काय?

चांगल्या नोकऱ्यांसाठी इंग्रजी भाषेतून शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढत आहे. इंग्रजी आवश्यक आहेच. त्या भाषेचे महत्त्व कुणाला नाकारता येणार नाही. पण मातृभाषेकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. मराठी ही समृद्ध भाषा आहे. या भाषेला संतांची परंपरा आहे. आज सर्वत्र बॉलीवुडचा बोलबाला आहे. पण या बॉलीवुडचे जनक दादासाहेब फाळके मराठीच होते. मराठी माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. मराठी आलीच पाहिजे. पण त्याचबरोबर जगात इतरत्र पाय रोवायचे असतील तर इंग्रजीही आली पाहिजे.

मराठी अस्मितेबद्दल सध्या अनेक पक्ष बोलू लागलेत. हे पक्ष शिवसेनेच्या परंपरागत मराठी व्होटबँकेवर डल्ला मारतील असे वाटते काय?

आता कुणीही मराठी अस्मितेबद्दल गळा काढत असले तरी 'असली व नकली' यातला फरक मराठी माणसाला समजतो. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी मराठी माणसाची बांधिलकी आहे. गेली ४३ वर्षं शिवसेना मराठी माणसासाठी लढा देत आहे. याचा विसर मराठी माणसाला पडणार नाही.

मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत आहे. हे रोखण्यासाठी कोणती ठोस पावलं उचलत आहात?

शिवसेनेने मराठी माणसांसाठी लढा उभारला, तो मुंबईत मराठी माणसाने भक्कमपणे आपले पाय रोवावेत यासाठीच. त्याने विविध क्षेत्रे पादाक्रांत करावीत, हीच शिवसेनेची मूळ भूमिका आहे. प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला तो मराठी आणि महाराष्ट्राची शान वाढविण्यासाठीच. मराठी माणसाचा येथील रोजगार व व्यवसायावर खरा अधिकार आहे. परप्रांतीय 'मुंबई' या महाराष्ट्राच्या राजधानीत येतात, येथे रोजगार मिळवितात, तर माझ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि मराठी असलेल्या शेतकऱ्याने येथे का येऊ नये? कर्जबाजारी होऊन मरणाकडे वळण्यापेक्षा त्याने जीवनाकडे वळून मुंबईत बस्तान बसवावे, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे.

गिरणी कामगार हा मुंबईतला मोठा मराठी वर्ग. या वर्गासाठी शिवसेनेने आजवर कोणते काम केले?

खरेतर गिरणी कामगारांचा लढा उभा केला तो शिवसेनेनेच. गिरणी कामगारांसाठी शिवसेनाप्रमुखांनीच पहिला जोरदार आवाज उठवला. त्यावेळी या व्यासपीठावर त्यांच्याबरोबर जॉर्ज फर्नांडिस व शरद पवार होते. ते पुढे कुठे गेले हे त्यांचे त्यांनाच माहीत. गिरण्यांचा व कामगारांचा प्रश्न उग्र झाला तेव्हा राज्यकतेर् काँग्रेसवाले डोळ्यांवर कातडे ओढून बसले होते. आता मात्र काही बोलघेवडे सेनेने काय केले, असे विचारत आहेत. पण शिवसेना जेव्हा गिरणी कामगारांसाठी लढत होती, तेव्हा यांचा राजकीय जन्म तरी झाला होता का?

लोकप्रतिनिधी निवडताना शिवसेनेने मराठी माणसांना प्राधान्य दिले का?

अर्थातच! तुम्ही काढून पाहा. पत्रकार असोत, अर्थतज्ज्ञ असोत, शेतकऱ्यांचे नेते असोत. विधानसभा, परिषद, राज्यसभा, लोकसभा अशा सर्व सभागृहांमध्ये शिवसेनेने आवर्जून अभ्यासू, तज्ज्ञ अशा मराठीच माणसांना संधी दिली. तुम्हाला आठवत असेल तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या १३ दिवसांच्या सरकारात सुरेश प्रभू यांच्यासारखा मराठी अर्थतज्ज्ञ कॅबिनेट मंत्री झाला होता. याउलट राज्यसभेवर एकमताने उमेदवार निवडण्याची वेळ आली तेव्हा मात्र पी. सी. अलेक्झांडर, राहुल बजाज यांच्यासारखी नावे पुढे करण्यात आली.

सर्वसामान्य मुंबईकराला परवडतील अशी छोटी घरे विकासकांनी उभारावीत, यासाठीचा कायदा करण्यासाठी शिवसेना भूमिका घेणार का?

मराठी माणसांनी मुंबईतील स्वत:ची जागा विकू नये अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. त्याने कोणत्याही परिस्थितीत मुंबई सोडू नए. उलटपक्षी मुंबईत आणखी जागा घ्यावी. चाळींच्या पुनविर्कासात मराठी माणसांची फसवणूक होत असेल, तर त्यांच्याविरोधात आवाज उठविण्यासाठी शिवसेना मराठी माणसांच्या पाठीशी ठाम उभी राहील. पुनविर्कासाबाबत जोपर्यंत मराठी माणसाचे समाधान होत नाही, तोवर शिवसेना कोणत्याही बिल्डरला एकही वीट रचू देणार नाही.

भूमिपुत्रांना उद्योगांमध्ये ८० टक्के नोकऱ्या देणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु या कायद्याची अंमलबजावणी होत नाही?

भूमिपुत्रांना उद्योगंामध्ये ८० टक्के नोकऱ्या मिळाव्यात हा कायदा कोणामुळे झाला? सर्वप्रथम मागणी कोणी केली? त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष कोणी केला? आज बँका, पंचतारांकित हॉटेल, हवाई वाहतूक कंपन्या, रेल्वे यामध्ये मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या त्याचे सर्व श्रेय अर्थातच शिवसेनेला आहे. विविध उद्योगांमध्येही आज शिवसेनेमुळेच 'जय महाराष्ट्र' घुमतो आहे. गर्जतो महाराष्ट्र हा उपक्रम तरुणांना सुवर्णसंधी मिळवून देण्यासाठीच हाती घेतलेला आहे. हा उपक्रम ग्रामीण भागातील तरुणांसाठीही राबविला जाणार आहे.

मुंबईपेक्षा आपण शेतकऱ्यांच्या प्रश्ानंवर अधिक गांभीर्याने लक्ष देत आहात?

मुंबईच्या प्रत्येक प्रश्ानवर शिवसेना आवाज उठवतच आहे. मात्र, ग्रामीण भागाच्या तुलनेत मुंबईकर सुखी आहे. मुंबईत रात्री डोळे झाकूनही चालता येईल, अशी परिस्थिती आहे. खेड्यात दिवसा वीजच नसते, प्यायला पुरेसे पाणी नाही, रात्री-अपरात्री वीज आल्यावर शेताला पाणी द्यायला रात्रभर काम करावे लागते. अशात सर्पदंशाने अनेकांचा मृत्यू होतो. आपले पुढारी ग्रामीण जनतेला चुकूनही दर्शन देत नाहीत. त्यामुळे आता शिवसेना कष्टकऱ्यांना-शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सतत झटत राहील!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: